मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रँडची वरची कादंबरी वाचल्यावर आपण काय मिस केले हे कळले.>>
मी उलट्या क्रमाने वाचले. आधी फाउंटनहेड, मग ॲटलास श्रग्ड आणि शेवटी वुई दी लिविंग.
वुई द लिविंग ही तिची पहिली कादंबरी.
रँड भारीच आहे. Happy

नोइडा एरपोर्टची चीफ आर्किटेक्ट डिझाइनरने ( अश्विनी सुलाखे.थोरात)
) या फाउंटनहेड पुस्तकाचा उल्लेख केला आहे. म्हणून वाचायला घेतलं होतं पण समजलं नाही.

वुई दी लिविंग हे अ‍ॅन(आयन) रँडचे अनुवादित पुस्तक वाचले. >>> मी खूप पूर्वी हे वाचले होते. ते एंगेजिंग वाटले होते. नंतर मित्रांकडून इतर पुस्तकांची स्तुती ऐकली व अ‍ॅटलास श्रग्ड आणले. त्याची काही पाने वाचली इतके लक्षात आहे Happy बहुधा इतर वाचनीय मटेरियल सहज उपलब्ध असल्याने डिस्ट्रॅक्ट होउन ते वाचायचे राहिले. नाहीतर तेव्हा फाउण्टनहेड व अजून एक कोणतेतरी वाचायचा प्लॅन होता. ऑफिसमधला एक मित्र महाफॅन होता. Virtues of being selfish वगैरे काय काय ऐकवत असे Happy त्यामुळेच इतके तरी वाचले.

तेव्हा मी इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत जीव्ह्ज आणि बर्टी वूस्टर च्या अफलातून दुनियेत होतो. त्यामुळे तेथेच रमलो.

Laurie Baker म्हणून एक आर्किटेक्ट होता. तो त्रिवेंद्रममध्येच राहिला आणि काही इमारती बांधल्या. गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन गावासाठी घरांच्या कल्पना दिल्या. विटांची स्वस्त घरे हे त्याच्या रचनेचे वैशिष्ट्य.

बहुरूपिणी : दुर्गा भागवत (चरित्र आणि चित्र) । अंजली कीर्तने . पाने ३१०.मूल्य । ₹३५०
तिनशे पानांच्या पुस्तकाचे दोन भाग आहेत. अर्धा भाग चरित्र आणि अर्धा चित्र म्हणजे त्यांची आवड,लेखन इत्यादी. दुर्गाबाईंच्या जीवनावर लघुपट बनवताना लेखिकेने खूप संदर्भ तपासले आहेत आणि ते सर्व दिले आहेत. त्यामुळे विश्वसनीय वाटते. लग्न,संसार झाले नाही आणि शिक्षणात पीएचडी मिळाली नाही ती गो.स.घूर्ये या स्वार्थी,प्रसिद्धीलोलूप,श्रेयलाटू गाईडमुळे या तीन गोष्टी वाईट झाल्या. संशोधनकाळात मध्यप्रदेशातील रानात फिरून खूप माहिती गोळा केली आणि निबंध लिहिला तरी घूर्येंनी तो माहिती अपूर्ण ठरवून विद्यापिठाकडे पाठवलाच नाही. शिवाय त्यांना हवी असलेलीली माहिती गोळा करवून स्वत:च्या पुस्तकासाठी वापरली. तसेच दुर्गाबाईंना मिळणारे विद्यावेतनही अडवले.
((हे असे चालणार असेल तर विद्यापाठांकडून होणारे संशोधन आणि गाईड प्रकरण रद्दच करावे हे माझे मत. मागे एकदा महाराष्ट्रातील बऱ्याच शिक्षकांनी कुठलाही अभ्यास न करता मेघालयमधून पीएचडी पदव्या मिळवल्या होत्या. असा काळा बाजार होण्याचे कारण गाईडपद्धत होय. ही बंदच करावी. विज्ञानातील बरेच संशोधन लोकांनी स्वत:केले आहे ते कोणत्याही गाईडशिवाय स्वत:चे पैसे खर्चून. ))
चित्रभागात दुर्गाताईंच्या इतर आवडीनिवडी आणि लेखनाची माहिती आहे.
लेखिकेने प्रथमच सांगितले आहे की दुर्गाताई कितीही वाचल्या तरीही संपतच नाहीत. खरं आहे.

मी फारच उशीर केला दुर्गा भागवत वाचण्याचा पण आता एकेक वाचेन. विशेषत: १) ऋतुचक्र, २)आठवले तसे, ३)खमंग.

नवीन नवीन पुस्तकं कळत आहेत. छान परिचय होत आहे.
मी याच धाग्यावर 3 daughters of चायना , फँक्ट्री गर्ल्स या पुस्तकांचा उल्लेख वाचलेला. चिनी लोकजीवनावर आत्तापर्यंत फक्त पर्ल बक च द गुड अर्थ वाचलेलं. ते आवडलेलं त्या काळातील चीन आणि तिथलं शेतकरी वर्गाचं दैनंदिन आयुष्य. नुकतंच शांघाय गर्ल्स वाचलं.

शांघायच्या मुली
लेखिका : लिसा सी
अनुवाद : सुनन्दा अमरापूरकर

1937 च्या कालखंडात 'शांघाय' आशिया खंडाचं 'पॅरिस' होतं. या कालखंडात घडलेलं कथानक आहे. या शहरातल्या नोकर चाकर असलेल्या सुखवस्तू घरातल्या उमलत्या तारुण्यातल्या या दोघीजणी बहिणी - 'पर्ल' आणि 'मे'. आधुनिक, बिंधास्त आणि सुंदर ही. ह्या दोघी कॅलेंडर मधील जाहिरातींसाठी मॉडेल म्हणून काम करत असतात. मौजमजेचं आयुष्य स्वच्छंदी जगत असतात. हळूहळू भिंतीवरच्या मौल्यवान वस्तू गायब होतात. नोकर चाकर कमी केले जातात. कुटुंबप्रमुख एक दिवस सांगतो की जुगारात सर्वस्व हरवल्याने फर्निचर किमती सामानाबरोबरच तुम्हा दोघी बहिणींचा ही सौदा केलाय.

अमेरिकेहून आलेल्या पण मूळ चिनी वंशाच्या 'लुई'च्या दोन मुलांशी या दोघींचं लग्न परस्पर ठरवून - थोडक्यात त्याना विकून कुटुंबप्रमुख राहतो घर वाचवतो. तडकाफडकी लग्न होतं आणि आठवड्याभराने या दोघींना अमेरिकेत यायला सांगून लुई आपल्या मुलांबरोबर अमेरिकेला परत जातो.

स्वच्छंदी आयुष्याला ब्रेक लागल्याने दोघी बहिणी बिथरतात आणि तिकीट फेकून स्वतः धडपड करून स्वतंत्र जगायचं ठरवतात. दुर्दैवाने थोड्याच दिवसात जपान बरोबर युद्ध सुरू होतं. सौदा फिस्कटल्याने मध्यस्थाचा तगादा आणि युद्धातले बॉम्ब हल्ले या दुहेरी संकटात या दोघी अडकतात. कुटुंबप्रमुख गायब होतो. मुलीच्या आईने फेकलेली तिकिटे सांभाळून ठेवल्याने त्या तिकिटावर युद्धापासून दूर पळणे एवढेच यांच्या हातात उरलेले असते.

अपुरे पैसे, अपुरे अन्न, जोडीला पहिल्यापासून पावलं बांधलेली परिणामी नीट चालू न शकणाऱ्या आईला बरोबर घेऊन या दोघी बहिणी चालत चालत शांघाय पासून पळ काढतात.

वाटेत गुंडांकडून झालेले अत्याचार, आईचा मृत्यू , पर्लचे मृत्यूला शिवून परत येणे या पार्श्वभूमीवर या बहिणींना आता अमेरिकेत जाण्याशिवाय गत्यंतर नसते. अमेरिकेत पोहोचल्यावर संबंधित कागदपत्रांची शहानिशा करेपर्यंत यांना एका बेटावर ठेवलं जातं. त्यादरम्यान 'मे'ला मुलगी होते . पण 'मे' चं लग्न ज्याच्याशी झालेलं असतं तो लग्नावेळी 14 वर्षांचा बाळ नवरा असल्याने हे बाळ नवऱ्यापासून न होता 'मे' च्या पूर्वायुष्यातील मित्रापासून झालेलं असतं हे सत्य लुई कुटुंबीय स्वीकारणार नाहीत. तसेच प्रवासात झालेल्या दुर्घटनेमुळे पर्ल ला मुल होणे शक्य नाही असे डॉक्टरने सांगितल्याने हे मूल पर्ल चे आहे असं या दोघी बेमालूमपणे दाखवतात.

नवीन बाळासह - जॉयसह या दोघीजणी अमेरिकेतल्या संसारात प्रवेश करतात. डोक्यात सतत पैसे मिळवून पळायचे प्लॅन शिजतच असतात. इकडे त्यांच्यापुढे वेगळेच सत्य समोर येतं. इथल्या कुटुंबप्रमुखाला - म्हाताऱ्या लुईला खरा एकच मुलगा असतो, जो 'मे' चा नवरा असतो. मग पर्ल चा नवरा कोण असतो? तर 'कागदी - नवरा' . 'पेपर सन'. लुईने चीन वरून परत अमेरिकेला परतताना आपल्याला मुलगा झाला असं अमेरिकन सरकारला कागदोपत्री भासवून आपल्या जुन्या चिनी गावातले मुलगे बेकायदेशीरपणे अमेरिकेत वेळोवेळी आणलेले असतात आणि कॅफे, स्नॅक्स सेंटर, अँटिक वस्तूंचे शोरूम, रिक्षा चालवणे अशा अनेक व्यवसायात हे कागदी मुलगे कार्यरत असतात. अशा बेकायदेशीर लोकांसाज एक छोटे शहरच चिनी जनतेने तिथे उभं केलेलं असतं.

'मे' चा नवरा , परिणामी मे सुद्धा आणि छोटी मुलगी जॉय यांचेच फक्त नागरिकत्व परवाने खरे असतात. कालांतराने चिनी कम्युनिझम आणि माओवाद ज्यामुळे अमेरिकन सरकार बेकायदेशीर चिनी लोकांना हुसकवायला बघत असतं.

शेवटी काय होतं? पर्ल आणि मे काय करतात? बेकायदेशीर नागरिकत्वाच्या टांगत्या तलवारीला कसे सामोरे जातात? जॉयला आपले बायोलॉजिकल खरे आई-वडील कोण हे सत्य कसं कळतं? तिचे खरे वडील सद्यस्थितीत कुठे असतात? ती त्यांना भेटते का? या शांघायच्या मुली शांघायला परत भेट देऊ शकतात का ? या सगळ्या घटना या कथेत पुढे उलगडतात.

कथानकातली मूळ पात्रं म्हणजे या दोन बहिणी, त्यांचं भावविश्व , आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणं , एकमेकींसाठी जीव तोडून मदत करणं , काहीही झालं तरी दोघींनी एकत्र राहायचं ठरवणं, परिणामी प्रेमाबरोबर कधी कधी असूयेचे- हेव्यादाव्याचेही प्रसंग येणं, अमेरिकेतच राहायचय पण मनातून आपण शांघायच्या ब्यूटीफुल गर्ल्स होतो ही मूळ हळुवार ओळख जपणं हे सगळं पुस्तक वाचताना कुठेही कंटाळवाणं झालं नाही. फक्त शेवटी एक वैषम्य वाटलं की आत्ता पर्यँत जेवढं वाचलंय त्यात देश कुठलाही असो (भारत, चीन, पाकिस्तान) , धर्म कुठलाही असो स्त्री चे स्थान दुय्यम च होतं. सुखाचे, सपन्नतेचे, मजेचे दिवस उपभोगायला पहिले पुरुष पुढे त्यांचं झाल्यावर ते स्त्री उपभोगणार आणि जेव्हा संकट येईल तेव्हा मात्र त्याची जास्त झळ स्त्री ला बसणार .

आवडला आणि समजला पुस्तक परिचय,वर्णिता.
थोड्याच दिवसात जपान बरोबर युद्ध सुरू होतं. म्हणजे तो काळ आहे. अशा पुस्तकांतून/कादंबऱ्यांतून त्या वेळचा काळ उभा राहतो. एक प्रकारचा इतिहासच.
(पर्ल बकचे गुड अर्थ '७० साली वाचले होते. इंग्रजी चार यत्ता झाल्यावरचं पहिलं पुस्तक.)

धन्यवाद मृणाली ,वावे, देवकी,srd, ललिताप्रिती, साद Happy

अयान हिरसी अली हे नाव केव्हातरी ओझरतं वाचलेलं आठवत होत. Nomad हे पुस्तक लायब्ररीत दिसलं. मलपृष्ठ वाचताना लक्षात आलं की ह्याचा पहिला भाग आधी वाचला पाहिजे. पुस्तक लगेच मिळालंही.

इन्फिडेल
लेखिका : अयान हिरसी अली
अनुवाद : नीला चांदोरकर

सोमालियासारख्या कट्टर धर्मीय देशात जन्माला येऊन आणि जन्माने मिळालेल्या धर्माच्या ओझ्याखाली दबून गेल्यावर बंड करून धर्मनिरपेक्षतेकडे,आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे लेखिकेची वाटचाल कशी झाली याचे मनोगत म्हणजे हे पुस्तक आहे.

सोमालिया, सौदी अरेबिया, इथियोपिया ,केनिया अशा देशात वीस वर्षांची होईपर्यंत लेखिका राहिली. धर्माची शिकवण पुरेपूर आत्मसात करायचा प्रयत्न करत राहिली. त्यासाठी स्वतःच्या मर्जीने दिवसातून पाच वेळा नमाज आणि जोडीला बुरखा ही घालू लागली. पण जेव्हा धर्मग्रंथातून शांती आणि स्वातंत्र्य याचा पुरस्कार करणारा हा धर्म प्रत्यक्षात धर्ममार्तंडांचं धर्माच्या नावाखाली हिंसा करणं आणि स्त्रियांना गुलामाचे जीवन जगायला लावणं पुरस्कृत करत होतं ही विसंगती लक्षात येताच लेखिकेने बंड केलं.

स्वतःच्या देशाविषयी जे प्रेम सुरुवातीला होतं त्या प्रेमाची जागा हताशपणे द्वेषाने घेतली गेली. सुरुवातीला या तिच्या देशात स्त्रियांना बुरखा, रुमाल सक्तीचे नव्हते त्या स्वतंत्रपणे हिंडू फिरूही शकत होत्या. पण धर्मगुरूंचे वर्चस्व वाढलं. धर्माचा पगडा जास्तीत जास्त कट्टर होत गेला आणि स्त्रीच्या नम्रतेच्या नावाखाली तिचं स्वातंत्र्य जाऊन जाचक नियम /अटीत स्त्री बांधली गेली. या बुरख्याआड स्त्रीविषयी तिच्याच समाजातील आजूबाजूला राहणारा पुरुष तिच्याविषयी काय विचार करतो ते ही 2000 नन्तरच्या काळात तो भाग त्यांच्याच शब्दात दिलाय. विषाद वाटतो.

समानता फक्त धर्मग्रंथात आहे आचरणात नाही याविषयी जेव्हा लेखिकेने लहान वयात तोंड उघडलं तेव्हा तिला दूरुत्तरं करून गप्प केलं गेलं.

ज्या धर्मात, देशात स्त्रीला निर्णय स्वातंत्र्य नाही ,घरेलू हिंसा सर्वमान्य आहे, बहुपत्नीत्वामुळे स्त्रियांचे हाल होत आहेत, इतर धर्मियांचा आदर न करता द्वेष केला जातोय अशा देशातून ती संधी मिळताच पळ काढते आणि थोडीफार खोटी माहिती देऊन हॉलंडमध्ये निर्वासित म्हणून स्वतंत्रपणे जगायचा निर्णय घेते. इथेच तिला तिचं खरं आयुष्य सापडतं. आवडत्या क्षेत्रात हवं तितकं शिक्षण घेऊन ती राजकारणात उडी घेते. जेणेकरून स्त्रियांवरील अन्यायाला जोरदारपणे वाचा फोडेल.

हॉलंडचं तत्कालीन सरकार स्थलांतरितांना त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार शाळा काढायला परवानगी देते तेव्हा कुराणावरील आधारित शाळेमध्ये मानवी स्वातंत्र्य मूल्य शिकवली जात नाहीत हे तिचं निरीक्षण ती बेधडकपणे नोंदवते.

बुरख्याआड समाजात काय काय चालतं हे दाखवायला ती एक शॉर्ट फिल्म करते . 'शरणागती' नावाची ही फिल्म प्रदर्शित झाल्यावर दोन महिन्यात त्या फिल्मच्या दिग्दर्शकाचा निर्घुण खून होतो आणि त्याचे पडसाद पुढे तिच्या आयुष्यावर पडतात. अनेक राजकीय घडामोडी होऊन तिचं डच नागरिकत्व काढून घेऊन शेवटी पुन्हा उलथापालथ होऊन पुन्हा तिला नागिकत्व दिलं जातं. पण तोपर्यंत लेखिकेने अमेरिकेत राहायचा निर्णय घेतलेला असतो या पुढचा प्रवास लेखिकेने तिच्या 'नोमेड' या पुढच्या पुस्तकात लिहिला आहे.

हॉलंड ला आल्यावर अयान कुटुंबाकडून पूर्णपणे दुर्लक्षित होते, तिला ऑनर किलिंग चा ही धोका असतो. या सगळ्यांशी हिमतीने लढा कसा देते हे वाचनीय आहे. वर्ल्ड ट्रेड सेन्टरवरील हल्ल्यानंतर अनेक दहशतवादी कारवायांमध्ये मुस्लिम च जास्त का असतात याचं ही ती स्पष्टीकरण अस्वस्थ होत देते.

अशा पुस्तकांतून/कादंबऱ्यांतून त्या वेळचा काळ उभा राहतो. एक प्रकारचा इतिहासच. >> हो. आवड असेल तर हा इतिहास कंटाळवाणा होत नाही. इन्फीडेल मध्येही मुस्लिमबहुल देशात माजलेली अंतर्गत यादवी आणि त्यामुळं उभे राहिलेले प्रश्न हा इतिहास आहेच.

स्टीव्ह आणि मी
लेखिका : टेरी इरविन
अनुवाद : सोनिया सदाकाळ - काळोखे

आई 'लीन' अडलेल्या प्राण्यांची प्रसुती लिलया करणारी सुईण आणि नळदुरुस्तीची कामं चरितार्थासाठी म्हणून करणारे पण मनापासून घोरपडी, पाली, साप, मगरी अशांमध्ये रमणारे वडील 'बॉब' या दांपत्याच्या तीनही मुलांना अरण्य विद्येचे बाळकडू मिळालेलं. ज्या वयात मुलांना वाढदिवसाची गिफ्ट म्हणून वेगवेगळे बॉल्स किंवा खेळण्यातल्या आधुनिक गाड्या रोबोट्स हवेहवेसे वाटतात त्या सहा वर्षाच्या मुलाला स्टीव्हला गिफ्ट म्हणून एक खरखरीत जिवंत अजगर मिळाला होता जो पुढे त्याचा जिगरी दोस्तही झाला.

शासकीय वनाधिकारी किंवा प्राणी संरक्षक अधिकाऱ्यांची मगरी पकडण्याची त्या वेळची पद्धत अतिशय क्रूर होती. मगरी रक्तबंबाळ व्हायच्या. हे सहन न होऊन बॉबनी कुठल्याही हत्याराशिवाय मगरीना पकडण्याचे कौशल्य विकसित केलं होतं. ते बघत बघत मोठा झालेला स्टीव्ह आपोआप मगर मित्र झाला. पुढे जगविख्यात क्रोकोडाइल हंटर म्हणून प्रसिद्धीस आला.

अमेरिकेतील छाव्यांना ऑस्ट्रेलियात आश्रय मिळावा या कामा संदर्भात ऑस्ट्रेलियात आलेली टेरी तिथल्याच एका प्राणी संग्रहालयाला भेट देते आणि नानाविध प्राण्यांनी भरलेले स्वच्छ प्राणी संग्रहालय बघून भारावून जाते. त्याबरोबरच तिथल्या मगरींचा शो करणाऱ्या स्टीव्हच्या प्रेमात पडते. टेरी ची पार्श्वभूमी ही प्राण्यांशी निगडित असते. परंपरेने वडिलांकडून आलेला कार व्यवसाय करत असली तरी तिचा खरा लगाव प्राण्यांशी असतो. जो वारसा हक्काने तिच्या वडिलांकडून आलेला असतो. अशक्त सिंहाच्या छाव्याचे संगोपन रस्त्यात/ हायवेवर जखमी झालेले अनाथ प्राणी- पक्षांची शुश्रुषा टेरी आणि तिचे वडील मायेने करत असतात.

साप सरड्यांपासून अजस्त्र मगरींचं स्थलांतर, पुनर्वसन करणे, सुसज्ज अशा प्राणी संग्रहालयाची उभारणी यासाठी मगरींचे शो करणे. प्रसिद्धी माध्यमांचा त्रास होताना जनतेच्या पाठबळामुळे कोर्टकचेऱ्यातूनही सही सलामत बाहेर पडताना जंगलातल्या क्रूर वाटणाऱ्या प्राण्यांपेक्षा माणूस हा प्राणीस किती क्रूर कपटाने वागतो याचा विषाद वाटतो.

प्राणी संग्रहालयाचा विस्तार,पूर आल्यावर जीव धोक्यात घालून केलेलं प्राण्याचं स्थलांतर, एमजीएम बरोबर केलेल्या अनेक डॉक्युमेंटरीज हे वाचताना आपण गुंग होतो. अशीच एक डॉक्युमेंटरी बनवताना अचानक वयाच्या फक्त 44 व्या वर्षी स्टिंग रे माशाच्या शेपटीच्या तडाख्याने झालेलं स्टीव्हचं निधन चटका लावून जातं. त्याच्या जाण्याने अपुरे राहिलेले असंख्य प्रकल्प टेरि कसे पूर्णत्वाला नेते हेही वाचनीय आहे. अशी ही विलक्षण साहसी आयुष्य जगणाऱ्या या दाम्पत्याची कहाणी. पुस्तक वाचताना वेगळ्या विश्वात रमतो आपण.

वर्णिता, थँक्स...
अयान हिरसी अलीची दोन्ही पुस्तकं किंडलवर विश-लिस्टला टाकली.

फिल्म दिग्दर्शकाच्या खुनाबद्दल कुठेतरी वाचल्याचं अंधुक आठवतंय. (ते हेच असेल असंही नाही)

१) खाडी देशातून एकेक जणी बंड करत आहेत पण . . स्त्रियांचे स्वातंत्र्य काढून घेणारे देश वाढतच आहेत. आणि बंड करणाऱ्या नंतर दुसऱ्या मुक्त देशांत जातात/ जातील तर पुढे काय? त्यांचे बंड निरर्थक ठरेल.
२) Terry Irwin इंग्रजी पाहिलं. शेवटी ओस्ट्रेलियातील प्रचलित शब्दांचे अर्थ दिले आहेत. यात फोटो नाहीत, मोठं आहे. आणखी एक यांचंच पुस्तक सापडलं.
३) मागच्या आठवड्यात दुर्गा भागवतची दोन पुस्तके वाचली. 'दुपानी' - छोट्या आठवणी आहेत. दुसरं खमंग - खूप जुन्या पारंपरिक पाकृचे प्रयोग केरून पाहिले ते आहेत. दोन्ही काही खास नाहीत. आठवेल तसं खूप चर्चेत असावं आणि त्यात दुर्गाबाईंनी काही लोकांचे अप्रिय किस्से दिले आहेत ( गाइड घूर्ये, इरावती कर्वे, . . इतर) त्यामुळे वाचनालयाने काढून टाकले असावे. खरं म्हणजे तेच हवं होतं. ऋतुचक्र - निसर्गाचं ललित वर्णन आहे म्हणे. म्हणजे त्यांच्या काळात शाब्दिक वर्णने करावी लागत. रंगीत फोटो देणे परवडत नव्हतं. सूर्यास्त फोटो आणि सूर्यास्त वर्णन तुलना केली तर तसं. अनंत कणेकरांनी दक्षिण भारतावर लिहिलेलं लाल माती निळे आकाश असं .
४)अरण्यवाचन, चला बनूया जंगल डिटेक्टिव -विश्वास भावे आणि न्यास ट्रस्ट डोंबिवली. पाने २००, रु ३७५. भरपूर रेखाटने आणि चित्रे. प्रकाशन ट्री इम्प्रिंट्स. २०२२.
ISBN : 978-81-951859-1-7
गेल्या १९ वर्षांतील जंगल शिबिरांच्या अनुभवातून साकारलेले पुस्तक. निसर्ग वाचन कसे करावे याची चांगली माहिती. तसेच अशा शिबिरांना प्रथमच जाणाऱ्यांनी वाचल्यास त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. चांगला संदर्भ ग्रंथ.

ललिताप्रीति Happy
Srd, खरय. पण जर त्या जिवंत राहिल्या तर काहीतरी करू शकतील न. दुसऱ्या देशात पण राहताना मृत्यू ची टांगती तलवार आहेच पण सरकारकडून सुरक्षितता दिलेली तरी आहे. स्वदेशात सरकारच पहिले कंठस्नान घालेल. निदान निर्वासित मुस्लिम स्त्रियांना तिच्या आवाजाने जाणीव होतेय की आपल्याला जो त्रास होतोय तो नुसती प्रार्थना करून कमी होणार नाही. आणि मुळात ह्याला त्रास म्हणतात जो देण्याचा हक्क धर्माने कुणालाही दिलेला नाही.

टेरी इरविन च दुसरं कुठलं पुस्तक. जमल्यास नाव द्या इथं. अनुवादित पुस्तकात बरेच फोटो आहेत, रंगीत पण आणि कृष्णधवल पण. शेवटी सगळया उल्लेख आलेल्या प्राण्यांची इंग्रजी नावे आणि फोटो पण आहेत.

नर्मदा परिक्रमेवरच पुस्तक जगन्नाथ कुंटे यांचं उपलब्ध होत. तुम्ही उल्लेख केलेल्या लेखकाचं नव्हतं. मला तुम्ही दिलेल्या परिचयातील वाक्य आवडलेलं की कुठूनही पुस्तक उघडून वाचलं तरी छान वाटतं. मलाही परिक्रमा जमणार नाही कधी. त्यामुळं तो प्रवास वाचून अनुभवायचाय.

१)
Terryचं आणखी एक पुस्तक.
The crocodile hunter : The incredible life and adventures of Steeve and Terry Irwin .
Authors - Steeve and Terry Irwin .स्वत:च

२)
श्री नर्मदा दर्शन
प्रथमावृत्ती: ऑक्टोबर २०१४
लेखिका : रेवाशंकर ( हा लेखक आहे, आवडीने स्त्री नाम घेतलं आहे. )
पाने ३४०
रु २००
या पुस्तकात बऱ्याच परिक्रमावासींचे अनुभव अर्धा ते दोन पाने आहेत. त्यामुळे कुठूनही वाचता येतं. त्यांचे फोन नंबर दिले आहेत. तीन जणांना वाटसप संपर्क केला, दोघांचे उत्तर आले लगेच. तिसरे नुकतेच वारलेत हे कळलं.

३)
नर्मदे हर || जगन्नाथ कुंटे (पहिले पुस्तक) वाचायचं बाकी आहे.
साधनामस्त ॥ / जगन्नाथ कुंटे ( दुसरे पुस्तक)वाचलं.
पाने २५०

आणखी एक परवा वाचलं 'नर्मदायन' . त्यात लेखकाने कठपोर ते मिठीतलाई बोटीचा प्रवास (२८ किमी,चार तास खाडीतून) दिला आहे. खूप त्रासदायक आहे लिहिलं आहे.
यूट्यूबवर लोकांनी विडिओ टाकले आहेत. बोटीचं (होडकंच असतं) तिकिट १०० अधिक देणगी १०० ते पाचशे रु. लाईबफ जाकेबिकेट चैन परवडत नाही. अंकलेसर ते भडोच मधून नर्मदा सागराला मिळते तिथे नदीपात्र एवढे रूंद कसे ही शंका होती. नर्मदा ओलांडायची नाही हा नियम म्हणून लांबून समुद्रातून बोटी नेतात. आणि भाविक रस्ता पुलावरूनही जात नाहीत.
परिक्रमेत उघड्यावर झोपलं तर डास फार चावतात. कुंटेंनी याबद्दल लिहिलं आहे. मलेरिया जात नाही.

थोडक्यात पुस्तक वाचणे झेपेल हे समजलं.

लेखिका असं लिहून रिवा ( नर्मदेचं मप्रतलं नाव) आणि वडलांचं नाव शंकर असं घेतल्याचं प्रस्तावनेत म्हटलं आहे.

वर्णिता , छान पुस्तक परिचय . उत्तमोत्तम पुस्तके सुचवत आहात . यातले शांघायच्या मुली वाचले आहे . वाचताना खरंच काही ठिकाणी मुलींचे वाईट वाटते .
पुस्तकाचे नाव - कशीर , मूळ लेखिका - साहना विजयकुमार
अनुवाद - उमा कुलकर्णी
काश्मिर ची सद्यस्थिती आणि काश्मीरमधील पंडित यांच्यावर आहे .
वाचताना असे वाटते की आपण किती स्वातंत्र्यात रहातो .

The Racketeer (John Grisham)

बर्‍याच वर्षांनी जॉन ग्रिशमचं पुस्तक वाचलं.
कादंबरीचा नायक अर्थात वकील असतो. तो काम करत असलेल्या लॉ फर्ममधल्या एका छोट्या घपल्यासाठी त्याला पाच वर्षांची शिक्षा झालेली असते. पाचपैकी दीड-दोन वर्षं पूर्ण झालेली असताना बाहेर एका न्यायाधीशाचा खून झाल्याची बातमी येते.
नायक एफ.बी.आय.ला संपर्क करतो. खून कुणी केलाय त्याचं नाव सांगण्याच्या बदल्यात स्वत:च्या सुटकेची आणि नंतरच्या प्रोटेक्शनची मागणी करतो. तो एक एक माहिती सांगत जातो, एफ.बी.आय.ला त्याचा पडताळा येत जातो. आणि मग एका टप्प्यावर सुटका आणि प्रोटेक्शन ही मागणी एफ.बी.आय.ला मान्य करावी लागते.
नायक सुटतो, नाव-चेहरा बदलतो, वेगळ्या गावात रहायला जातो. पण जजच्या खुन्याच्या साथीदारांपासून त्याला धोका असतोच. त्यातून तो स्वत:चा बचाव कसा करतो, त्याची ही गोष्ट आहे.

त्याला तुरुंगात असूनही जजच्या खुन्याची माहिती कशी काय असते, त्या माहितीचा तो नंतरही कसकसा उपयोग करून घेतो, हा यातला इंटरेस्टिंग पार्ट आहे. तुरुंगातलं वातावरण, एफ.बी.आय.ची काम करण्याची पद्धत, संशयित गुन्हेगारांची जबानी घेतानाच्या ट्रिक्स, हे सगळं वाचायला सुद्धा मजा येते.

मात्र हे लीगल थ्रिलर नाही.
नायक वकील असतो आणि विशेष केसमध्ये कैद्यांची सुटका झाल्यानंतर त्यांचे काय काय अधिकार असतात, याबद्दल त्याला बारीकसारीक कायदेशीर माहिती असते, इतकाच यातला लीगल भाग आहे.
तो तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पाठलाग, गुंगारा, योजनाबद्ध पलायन वगैरे वाचायलाही मजा येते. स्टोरीटेलिंग झकास आहे.
काही ठिकाणी नायकाची योजना जरा अतिच बद्ध वाटते. ती अंमलात आणताना कुठेही कोणताही गोंधळ होत नाही, ऐनवेळी कुणी वेगळं टपकत नाही, बाकी काहीही गडबड होत नाही. पण ते सांगताना जगोजागी मस्त सस्पेन्स, कलाटण्या आहेत. त्यामुळे कंटाळवाणं होत नाही.

याची firm वाचली आहे पण आठवत नाही. मजेदार असतात>>>
मजेदार? जॉन ग्रिशम? बर्‍यापैकी सिरीयस असतात हो.

Srd, सगळी पुस्तके नोटेड. धन्यवाद. नर्मदे हर हर संपत आलंय आता.
अश्विनी, हो वाईट वाटत राहतं वाचताना.
ललिताप्रीति, छान अभिप्राय. खूप वर्षे झालीत जॉन ग्रीशम ची थरारक पुस्तकं वाचून.

Pages