Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाचू आनंदे : उत्तमोत्तम
वाचू आनंदे : उत्तमोत्तम पुस्तकं कळतात इथे. धन्यवाद सगळ्यांना !
The Vegetarian by Han Kang, Winner of The 2024 Nobel Prize in Literature
कोणतंही अवॉर्ड विनिंग पुस्तक म्हणलं की ते थोडंतरी अतरंगी /अवजड/ डोक्याला शॉट असणार असं समजूनच मी वाचायला घेते. ह्या पुस्तकात तसं बोजड काही नाही. फक्त शेवटी शेवटी जरा बोरिंग आहे. आवर्जून वाचावं अशातलं वाटलं नाही, पण वाचून वेळ घालवला असंही नाही.
साऊथ कोरीया मधे घडणारी गोष्ट आहे ही. एक विवाहीत स्त्री अचानक मांसाहार न करण्याचं ठरवते, त्यानंतर तिच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यात काय काय घडतं ह्याची गोष्ट. कोरीयन लोक पक्के मांसाहारी आहेत बहुतेक कारण हिनी शाकाहार करायचं ठरवल्यावर कुटुंबीय तिला फार विरोध करतात. फक्त अरोग्याची पथ्यं असलेले लोक आणि बुद्धिस्ट साधू वेजिटेरिअन असतात असं म्हणून नवरा, आई वडील, बहिण तिला मांसाहार चालू ठेवण्याचा आग्रह करत असतात. ती मात्र शाकाहारच करते, हळूहळू खाणं च कमी करते. तिच्या अशा वागण्याचं कारण, त्याचे सगळ्या नातेसंबंधांवर होणारे परिणाम आणि दुखद शेवट ३ भागात (एकाच पुस्तकात १, २, ३ असे भाग) सावकाश उलगडत जातात. पैकी पहिले २ भाग मला आवडले. काहीतरी साधं तरीही वेगळं वाचायला मिळतय असं वाटत होतं. भाग ३ मला नाही आवडला, आवडण्यापेक्षाही भावला नाही. थोडं वेगळं काही लिहायला हवं होतं असं वाटत राहिलं. असो. अवॉर्ड विनिंग पुस्तक कळलं हे ही नसे थोडके Yahoo Smile
पुस्तकाचा विषय आणि
पुस्तकाचा विषय आणि मुखपृष्ठावरचं चित्र यांचा काहीच संबंध नसतो. लेखक पुस्तकाचे हक्क प्रकाशकास विकतो आणि पैसे घेतो. मग प्रकाशक त्यांच्याकडच्या पगारी चित्रकाराकडून चित्र काढून घेतो. ते बदलायला लावलं की त्या चित्रकारांचा अहंकार दुखावतो. म्हणजे चित्रकाराला पुस्तक वाचून (किंवा न वाचताही) जे काही समजले त्याचा केविलवाणा समज चित्रात उतरवतो.
मर्ढेकरांची कविता - दोन चहाचे पेले( mug) चित्र.( त्यांच्या दोन चार ओळी आणि मर्ढेकरांची चित्र चाललं असतं)
ओफबिट भटकंती - फक्त दोन सुटकेसचं चित्र.( पुस्तकातील फोटोंचे कोलाज योग्य वाटले असते)
वरील व्हेजिटेअरिअन. - एका बाईचा खांदा आणि पांढऱ्या कपड्यावर फुले!( काही डिश , भाज्या यांचं चित्र हवं)
पण ही भंकसगिरी आता AI मुळे बदलेल असं वाटतं. प्रकाशक स्वतः किंवा त्यांचे पगारी वाचक एखादं चागलं चित्र AI करून घेऊ शकतील.
“The Killers” ही अर्नेस्ट
“The Killers” ही अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी १९२७ साली लिहिलेली एक गाजलेली प्रसिद्ध कथा आहे.
हेमिंग्वेशी माझी पहिली मुठभेड झाली ती “फेअरवेल टू आर्म्स” च्या मराठी भाषांतराच्या वाचनाने. माझ्या आठवणीप्रमाणे हे USIS प्रणीत पुस्तक होते. ते वाचल्यावर अस्पष्टशी जाणीव झाली की अरे हे काहीतरी अपूर्व पुस्तक आहे. माझ्या तोडक्या मराठी वाचनात असे काही वाचले नव्हते. इंग्रजीची केवळ अक्षर ओळख झाली होती. इंग्रजी वाचन करणे खूप दूरची गोष्ट होती. पुढे कधीतरी महाराष्ट्राचा संबंध तुटला. सगळ्या देशात भटकंती सुरु झाली. वाचन केवळ टेक्निकल गोष्टीपुरते मर्यादित झाले. हेमिंग्वे विस्मरणात गेला. पुन्हा जेव्हा बूड मुंबई पुण्यात स्थिरावले तेव्हा इंग्रजी साहित्याची आठवण झाली. मग मात्र कुठेही थांबलो नाही. किती वाचू अन काय वाचू असे झाले.
त्या धुंदीत समग्र हेमिंग्वे वाचून काढला.
सगळेच साहित्य उजवे होते पण मी कधी विसरणार नाही अश्या अनेक कथा होत्या. त्यातल्या “The Killers” आणि “The Cat In The Rain” ह्या मला अत्यंत भावलेल्या कथा. ज्याना हेमिंग्वे काय चीज आहे हे जाणण्याची इच्छा आहे त्यांनी ह्या दोन कथा वाचाव्यात.
लेख वाचायच्या आधी ही कथा वाचावी अशी माझी विनंती आहे. ह्या दोनही कथा आंतरजालावर सहजप्राप्त आहेत तरीही मी इथे “The Killers”ची लिंक देतोय. जरूर वाचा.
https://www.yeyebook.com/en/ernest-hemingway-short-story-the-killers-eng...
कथेचा थोडक्यात गोषवारा असा आहे.
कथा समिट नावाच्या गावातल्या एका हॉटेलमध्ये घडते.
एका संध्याकाळी एका हॉटेल/काफे/रेस्तराँ मध्ये दोन व्यक्ति प्रवेश करतात. त्यांच्या बोलण्यावरून ते ह्या गावात अनोळखी आहेत ह्याची जाणीव वाचकाला होते. त्यांच्या उद्धट बोलण्यावरून भीतीची सूक्ष्म जाणीव होते. जॉर्ज हा त्या हॉटेलचा मॅनेजर आहे आणि निक अॅडम्स हा बहुतेक त्या हॉटेल मध्ये नियमित येणारा तरुण ह्या दोघाजणांच्या उपस्थितीत ही कथा घडते. बोलण्या बोलण्यातून कथा उलगडत जाते. हा हेमिग्वेचा खास टच! ते अॅंडरसन नावाच्या मुष्टीयोद्ध्याचा खून करण्याच्या उद्देशाने आले आहेत. वातावरणात भीतीचा पगडा वाढत जातो.
खुन्यांना खात्रीलायक बातमी असते की मधून मधून अॅंडरसन त्या हॉटेलात संध्याकाळच्या जेवणासाठी येत असतो. नेमका त्यांच दिवशी तो येत नाही. वाट बघून मारेकारी कंटाळून निघून जातात.
निक अॅडम्स मात्र ह्या प्रकाराने हादरून जातो. क्रूर अमानुष हिंस्र हिंसाचारचा त्याचा पहिला अनुभव असावा. अस्वस्थ झालेला निक अॅंडरसन अॅलर्ट करण्याची जबाबदारी घेतो आणि त्याच्या रहाण्याच्या जागी जातो. अॅडरसनला अर्थात आपल्या हत्त्येची सुपारी देण्यात आली आहे ह्या गोष्टीची कल्पना आहे. निक त्याला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करतो. की तू पोलिसांची मदत घे, किंवा ह्या गावातून पळून जा. असे केल्याने जे नशिबात आहे ते टळणार नाहीये हे अॅडरसनला चांगले माहित आहे. दैवात आहे त्याला सामोरे जाणे एव्हढेच त्याच्या हातात आहे.
शेवटी निक कंटाळून परततो आणि सगळ्याचा उबग येऊन स्वतःच ते गाव सोडून जायचे ठरवतो,
ह्या एका छोट्या कथेत हेमिग्वे पूर्णपणे साकार झाला आहे. त्याचे ठसे जागोजाग उमटले आहेत. केवळ त्या साठी म्हणून ही कथा वाचावीशी वाटते.
सरळ सोप्या शब्दात लिहिलेली कथा, एकही अनवट शब्द नाही. शब्दकोशात डोकावण्याची गरज नाही. उपमा नाहीत उत्प्रेक्षा नाहीत. विशेषणे नाहीत, अलंकारिक भाषा नाही. show, don't tell. पद्धतीची कथा. म्हणून मला भावली.
लेखक पुस्तकाचे हक्क प्रकाशकास
लेखक पुस्तकाचे हक्क प्रकाशकास विकतो आणि पैसे घेतो. मग प्रकाशक त्यांच्याकडच्या पगारी चित्रकाराकडून चित्र काढून घेतो. ते बदलायला लावलं की त्या चित्रकारांचा अहंकार दुखावतो. म्हणजे चित्रकाराला पुस्तक वाचून (किंवा न वाचताही) जे काही समजले त्याचा केविलवाणा समज चित्रात उतरवतो.
>>> असं सरसकट म्हणणे चुकीचं आहे.
सरसकट नाही परंतू काही चित्रे
सरसकट नाही परंतू काही चित्रे पाहिल्यावर हा विचार बळावतो.
"चित्र बदलायला सांगितल्यावर चित्रकाराचा अहंकार दुखावतो" यांची दोन उदाहरणे घडून गेली होती आणि ते लिहून आले होते ते मी वाचले आहे. आता आठवत नाही परंतू प्रसिद्ध व्यक्ती/ चित्रकार होते/आहेत.
पण हा प्रश्न AI सोडविणार स्वस्तात हे नक्की.
( थोडे अवांतर पण समांतर- एका प्रसिद्ध फोटोग्राफरला दुसऱ्या एका प्रसिद्ध गायिकेनी फोटोंचे काम दिले, ठरलेले पैसे दिले, फोटो काढून घेतले तरी तो फोटोग्राफर म्हणतो की त्या फोटोंवर माझा हक्क आहे. हे सर्व त्याने एका पुस्तकातही मांडले आहे.. हट्टीपणाच तो.)
तो फोटोग्राफर म्हणतो की त्या
तो फोटोग्राफर म्हणतो की त्या फोटोंवर माझा हक्क आहे. >>>
माझ्या माहितीप्रमाणे फोटोग्राफर म्हणतो आहे ते बरोबर आहे.
पैसे देऊन ती कलाकृती विकत
पैसे देऊन ती कलाकृती विकत घेतल्यावर कसं काय?
हल्ली मालिकांच्या पटकथा लेखकांकडून विकत घेतात आणि विकत घेणारा आपले नाव लावतो तसं. मला वाटतं अगदी सुरुवातीला मराठी एक चानेल होता आणि ते तसं करत होते.
केशवकुल,
केशवकुल,
“The Killers” ही अर्नेस्ट हेमिंग्वे यांची कथा आपण दिलेल्या लिंकवर वाचून काढली. सुचविल्याबद्दल आणि लिंक दिल्याबद्दल धन्यवाद . छान आहे. भरपूर संवाद, त्यामुळे वाचावीशी वाटते. शेवट थोडा विचीत्र वाटला. म्हणजे काहीच न घडणारा. ती सुपारी कोणी व का दिलीये हे पण कळत नाही.
माबो वाचक
माबो वाचक
धन्यवाद. ज्या काळी १९२७ साली ही कथा लिहिली गेली त्यावेळी शिकागो वगैरे शहरात माफियाचे साम्राज्य होते. बॉक्सिंगवर पैसे लावणे ही साधारण गोष्ट होती. अॅंडरसनणे बहुतेक कुठल्यातरी मॉबच्या बॉसला डबल क्रॉस केलेलं असणार. मी फार थोडक्यात लिहिले आहे.
ह्या लिंक वर खूप छान रसग्रहण आहे.
https://literarysum.com/the-killers-a-comprehensive-literary-analysis-by...
“The Killers”ची लिंक देतोय.
“The Killers”ची लिंक देतोय. जरूर वाचा.
https://www.yeyebook.com/en/ernest-hemingway-short-story-the-killers-eng... >>> नाही आवडली..
एखाद्या दीर्घ कथेचा/ कादंबरीचा छोटा तुकडा असावा असं काही..
वातावरण निर्मिती चांगली केलीये.
****
एक इंटरेस्टिंग fact मिळाली..
Ernest Hemingway was challenged to create an entire short story in six words. Hemingway wrote, "For sale: baby shoes, never worn." Thus creating a new genre of short storytelling - the six-word story
>> Impressive..
***
.
छन्दिफन्दि
छन्दिफन्दि
मी ह्यावर एक "short" लेख लिहिला होता. वेळ असेल तर जरूर वाचा
https://www.maayboli.com/node/85086
वरील व्हेजिटेअरिअन. - एका
वरील व्हेजिटेअरिअन. - एका बाईचा खांदा आणि पांढऱ्या कपड्यावर फुले!( काही डिश , भाज्या यांचं चित्र हवं) >>
ह्या पुस्तकात अन्गावर फुलांच्या चित्राचा सम्बध आहे. त्यामुळे मुखपृष्ठ योग्य आहे.
वरील व्हेजिटेअरिअन. - एका
डबल पोस्ट
'सिंधूतील साम्राज्ये' मूळ
'सिंधूतील साम्राज्ये' मूळ पुस्तकाचे ओझरते दर्शन(preview) google books dot co dot in वर सापडले.
Empires of Indus. (1976)छान वाटले.
शोधताना आणखी एक पुस्तक सापडले River Tales - Mithu Bhar (2024) .
एवढी चांगली पुस्तके येतात की वेळ पुरणार नाही. Preview वर भागवावे लागेल.
____________________________
Papilon पुस्तकाचा अनुवाद रविंद्र गुर्जर यांनी केलेला वाचून काढला पुन्हा. खूप वर्षांपूर्वी वाचले होते.
गडकऱ्यांची कवीचा कारखाना
गडकऱ्यांची कवीचा कारखाना नावाची गोष्ट स्टोरिटेलवर ऐकायला मिळाली.. आंतर जालावर ते लिखित स्वरूपातही सापडले.. परंतु ऐकायला जास्त आवडले.. हसू आल्याशिवाय रहात नाही
पुलं गडकऱ्यांना गुरु मानायचे आणि शांत शेळकेंच्या पुस्तकातही गडकऱ्यांच्या विनोदी लेखनाविषयी छान उल्लेख मिळाले. त्यामुळे उत्सुकता होती.
विकी वरती गडकऱ्यांचे काही लेख आहेत.. कोणाला हवे असल्यास त्याची लिंक
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A...
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/85086
Submitted by केशवकूल on 7 May, 2025 - 20:07>>>> लेख वाचला..
"For sale: baby shoes, never worn."
वाचून खर तर आधी चमकले.. खूप powerful वाटली Katha.
वाचल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आले ते म्हणजे:
19 वे किंवा विसावे शतक. एका पाश्चात्य देश ( अमेरिका/ युरोप/ कॅनडा) एक नुकताच जन्मलेलं बाळ मृत्युमुखी पडल्यावर, आपलं दुःख बाजूला सारून आई/ बाप त्या बाळासाठी घेतलेले बूट विकायला काढतात कारण त्यांना उपासमार होत असलेल्या इतर अपत्यांची पोटे भरायची असतात..
अर्थात याला बॅकग्राऊंड, बघितलेल्या त्या काळातील Netflix सिरीज/ चित्रपट
खालील पुस्तके चांगली आहेत :--
खालील पुस्तके चांगली आहेत :--
मराठी:
विठोबाची आंगी - विनय हर्डीकर
अखेरीस नयनाची गोष्ट - श्याम मनोहर
भास ११.२४- भास प्रकाशन
आयडियाज् आर डेंजरस - राजू परुळेकर
माया महा ठगनी - संवेद गळेगावकर
अनुवादित:
बेलबॉय- अनीस सलिम (अनु. 'हरकाम्या', शुचिता नांदापूरकर फडके)
कांदिद - व्हॉल्टेअर (अनु. नरेश कवडी, साहित्य अकादमी प्रकाशन)
हाऊ फॅशिझम वर्क्स — जेसन स्टॅन्ली (अनु. मुग्धा कर्णिक)
कलिकथा व्हाया बायपास - अलका सरावगी (अनु. जयप्रकाश सावंत)
पाच शहरे - अहमेत हमदी तानपिनार (अनु. शर्मिला फडके)
तिस्ताकाठचा वृतांत- देवेश राय (अनु. विलास गिते, साहित्य अकादमी प्रकाशन)
महावीर आणि अंतर्तप - रजनीश
इंग्रजी:-
हाऊ द वर्ल्ड वर्क्स- नोआम चोम्स्की
मिडिया कंट्रोल: द स्पेक्टॅक्युलर ॲचिव्हमेंट्स ऑफ प्रोपगंडा- नोआम चोम्स्की
ब्लॅक बुक - ओरहान पामुक
हिंदी:
तीन सौ तीस कहावती कहानियॉं- विजयदान देथा
बाप रे, संप्रति... केवढी यादी
बाप रे, संप्रति... केवढी यादी!
बाय द वे, तुम्ही मागच्या पानावर लिहिलं होतं त्या 'सिंधूतील साम्राज्ये'चं मूळ इंग्रजी पुस्तक (एम्पायर्स ऑफ द इंडस) वाचायला सुरुवात केली आहे.
संप्रति यांच्या लिस्टवरून मी
संप्रति यांच्या लिस्टवरून मी ‘एम्पायर्स ऑफ इंडस’ विकत घेतलं त्याचवेळी मला प्रबोध कुमार संन्याल यांचे ‘उत्तर हिमालय चरीत’ (बंगालीतून हिंदी अनुवादित)पुस्तक सजेस्ट झालं. ते ही विकत घेतलं. या लेखकाने १९२४ ते १९६४ दरम्यान हिमालयातल्या वेगवेगळ्या भागात प्रवास केला त्याचं हे वर्णन. विशेषतः आत्ता पाकिस्तानात असलेल्या भागाचं वर्णन वाचताना मजा येतेय, गाळलेल्या जागा भरताहेत. उदा. कुपवाड्यातून शारदा पीठाला जायचा शॉर्टेस्ट रुट.
काही भौगोलिक संदर्भ आता लागत नाहीत उदा. शिवालिकच्या रांगेतल्या एका पर्वताला त्यांनी माउंट शिवलिंग म्हटलंय पण आता ते दिसत नाही पण बलुचिस्तानातल्या वाराही माऊंटन रेंजचं नाव मात्र अजूनही प्रचलित आहे.
ऐतिहासिक दस्तावेज म्हणून वाचनीय आहे.
सुनील दिवाण लिखित 'अफगाणिस्तान: साम्राज्याची दफनभूमी' वाचायला सुरु केले आहे.
परवेझ दिवाण लिखित 'जम्मू काश्मीर अँड लडाख' वाचायला सुरुवात केली होती. सध्या ते बाजूला पडलेय.
The Yearling - मार्जरी किनन
The Yearling - मार्जरी किनन रॉलिंग्ज
अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्याच्या दुर्गम, ग्रामीण भागात राहणाऱ्या ज्योडी या मुलाची आणि त्याचे वडील एझरा ऊर्फ पेनी, आई ओरी आणि त्याने पाळलेलं हरणाचं पाडस फ्लॅग यांची ही गोष्ट आहे.
बॅक्स्टर नावाचं हे छोटं कुटुंब शेतीवर आणि शिकारीवर आपला उदरनिर्वाह करत असतं. कष्टाचं जीवन. आजूबाजूला माणसांची फारशी वस्ती नाही. सर्वात जवळचे शेजारी म्हणावेत असं एक फॉरेस्टर कुटुंबही तसं लांबवरच राहणारं आणि वागाबोलायला उग्र, आडदांड असं.
ज्योडीच्या जन्मापूर्वी पेनी आणि ओरीला अनेक वेळा मूल होऊनही ती सगळी मुलं दगावलेली असतात. त्यामुळे ओरीमधे एक अलिप्तपणा/थंडपणा आलेला असतो. पेनी मात्र तसा नसतो. ज्योडीशी त्याची दोस्ती असते. ज्योडी हा बारा-तेरा वर्षांचा, अवखळ, उत्साही असा मुलगा. शेतातली आणि घरातली त्याला करण्याजोगी कामं करत त्याचे दिवस मजेने चाललेले असतात, पण त्याला खेळायला एखादा सवंगडी हवा असतो, पाळायला एखादा प्राणी हवा असतो. फॉरेस्टर कुटुंबातील सगळ्यात धाकटा मुलगा फॉडरविंग हा ज्योडीचा दोस्त असतो. त्याच्याकडे असे बरेच प्राणी असतात. पण ज्योडीची आई मात्र प्राणी पाळायची परवानगी देत नसते कारण या तिघांचं पोट जेमतेम भरेल इतकंच त्यांच्या शेताचं उत्पन्न असतं.
एका अपघाती घटनेमुळे ज्योडीला आपला हा सवंगडी, हरणाचं पाडस मिळतं. तो त्याला जिवापाड जपतो, सांभाळतो, खाऊपिऊ घालतो, त्याचे लाड करतो. दोघे एकत्रच मोठे व्हायला लागतात. कादंबरीचा शेवट मला तरी अनपेक्षित होता. म्हणजे ज्योडी मोठा होणार, हे अपेक्षित होतं, पण त्यासाठी जी घटना कारणीभूत ठरते, ती मला तरी अनपेक्षित होती. असो. पुस्तक सुंदर आहे हे निर्विवाद.
एक अस्वल, जे बरीच वर्षं या लोकांना त्रास देत असतं, त्याच्या आणि इतरही काही शिकारींच्या प्रयत्नांचं वर्णन काही वेळा येतं. निसर्गाचं, बदलणाऱ्या ऋतूंचं, प्राण्यांचं, पक्ष्यांचं वर्णन तर भरभरून येतं. ज्योडीचे मनोव्यापार, त्याच्या भावभावना उत्कटतेने येतात. आपणच तिथे आहोत, असं वाटायला लावतील अशी चित्रदर्शी वर्णनं आहेत सगळी. सुरुवातीच्या भागात येणारं क्रेन पक्ष्यांच्या नृत्याचं वर्णन तर mesmerizing आहे!
हे पुस्तक १९३८ सालचं आहे. याला पुलित्झर पारितोषिक मिळालेलं आहे. मराठीत 'पाडस' नावाचा, राम पटवर्धनांनी केलेला याचा अनुवाद प्रसिद्ध आहे. मला भिलारला (पुस्तकांच्या गावात) 'पाडस' मिळालं होतं. वाचायला घेतलं, खूप आवडलंही. पण तिथल्या मर्यादित वेळेत फार वाचून झालं नाही. मग किंडलवर हे मूळ इंग्रजी पुस्तक शोधलं आणि वाचलं.
'Coming of age' किंवा 'वयात येणं', मोठं होणं ही संकल्पना केंद्रस्थानी असणारं हे पुस्तक आहे. अशा प्रकारचं पुस्तक वाचून संपताना एक जी हुरहूर वाटते, ती अपरिहार्य असते. किरण गुरवांनी अवस्थांतराच्या डायरीत 'चार पायांच्या प्राणीसृष्टीतून उठून दोन पायांच्या मानवसृष्टीत अवस्थांतरित होताना माणसाचं जे कायमचं मागं काही तरी हरवून गेलं तसंं भरपूर काय तरी कायमचं आपण मागे टाकलेलं आहे' या शब्दांत ही भावना परफेक्ट पकडलेली आहे.
मी 'पाडस' वाचलं आहे. मूळ
मी 'पाडस' वाचलं आहे. मूळ इंग्रजी पुस्तक नाही वाचलेलं.
मलाही खूप आवडलं होतं. जंगल, मनुष्य यांची एकत्र जीवनशैली आणि बाप-मुलाचं नातं : या दोन ठळक गोष्टी अगदी लक्षात राहिल्या आहेत.
अनुवाद सुद्धा आवडला होताच.
पाडस ह्या पुस्तकातली "गोष्ट"
पाडस ह्या पुस्तकातली "गोष्ट" मला खूप आवडली होती. पण भाषा जरा कृत्रिम वाटली होती. बहुतेक इथे त्याबद्दल चर्चा झालेली. इथे आमच्या घराजवळ येणार्या हरणाला नुकतच पाडस झालं आहे. ते बघून मला त्या पुस्तकाची परवाच आठवण झाली होती.
मूळ इंग्रजी पुस्तक नाही वाचलेलं.
युद्धाच्या पार्श्वभुमीवर प्रतिभा रानडे ह्यांनी लिहिलेलं "पाकिस्तान.. अस्मितेच्या शोधात" हे पुस्तक वाचलं. फाळणीनंतर पाकिस्तान हा देश तयार झाला पण त्याचं "राष्ट्र" झालं नाही. भारताचा कडवा द्वेष किंवा इस्लामबद्दलचे कर्मठ प्रेम यापैकी कशाभोवतीही पाकिस्तानचे राष्ट्रजीवन धड उभे राहू शकलेले नाही. आपल्या अस्तित्वाचा मूलाधार काय असायला हवा, याचे उत्तर इतक्या वर्षानंतरही त्या देशाला सापडू शकलेले नाही. इराण, तुर्की, इराक, इंडोनेशिया ह्यांनी यदाकदाचित इस्लामशी फारकत घेतली तरी त्यांना त्यांची इराणी, तुर्की, इराकी अशी ओळख आहे. त्यांनी तिथली इस्लामपूर्व संस्कृती जपली, प्रसंगी मिरवलीही. पण भारताशी सर्व प्रकारचे संबंध तोडायची ह्या इर्ष्येतून पाकिस्तानने त्या भुप्रदेशातल्या सगळ्या परंपरांशी फारकत घेतली. मोहेंजोदडो, हडप्पा सारखी ठिकाणं तिथे असताना त्या देशाने त्यांच्याशी संबंध नाकारला. हिंदुस्थानी शास्त्रीय गायन नको म्हणून रागांची नावं बदला, हिंदू देवांशी संबंधीत गाणी गाऊ नका असे आदेश काढले. हळूहळू तिथली ती कला जवळजवळ लोप पावली. इतकच नव्हे तर नवा देश वसवताना त्या प्रदेशातल्या प्रमुख भाषा म्हणजे पंजाबी, सिंधी, बंगाली, बलोची वगैरे सोडून उर्दू ही मोहाजिरांची भाषा राष्ट्रीय भाषा म्हणून निवडली. तिथूनच खरतर अस्मितेचा प्रश्न सुरू झाला आणि पुढे तीन "ए" म्हणजे अल्ला, आर्मी आणि अमेरिका ह्यांच्या गुत्यांतून तो देश अजूनही बाहेर पडू शकेलला नाही. बांग्लादेश स्वातंत्र्य युद्धापासूनचा काळ ह्या पुस्तकात आला आहे. पुस्तकात झुल्फिकार अली भुट्टोंपासून पुढच्या म्हणजे झिया उल हक, बेनझिर भुट्टो, नवाज शरीफ आणि पर्वेज मुफर्र्फ ह्या सगळ्या राज्यकर्त्यांच्या कारकर्दीचा एकेका प्रकरणात आढावा घेतला आहे. "गोष्ट" सांगण्याच्या निमित्ताने काही संदर्भ परत परत येत रहातात पण त्याने रसभंग होत नाही. शेवटच्या "शोध घेताना" ह्या प्रकरणात बर्याच क्षेत्रांचा आढावा घेतला आहे. एक गोष्ट खटकली ते म्हणजे पाकिस्तानातल्या खेळ किंवा क्रिकेटचा, श्रीलंका टीमवरच्या हल्ल्याची घटना वगळता अजिबात कुठे उल्लेख नाही. नव्वदीच्या आधी हॉकी आणि पुढे क्रिकेट हे दोन्ही पाकिस्तानी संघ चांगले होते. बाकी सगळी बजबजपुरी असताना हे कसं काय साध्य झालं हे वाचायला आवडलं असतं. त्यानिमित्ताने एका गोष्टीची पुन्हा खात्री पटली ती म्हणजे एकाच वेळी स्वतंत्र झालेल्या भारतात लोकशाही रुजली ती भारताला सुरुवातीच्या काळात मिळालेल्या द्रष्ट्या राज्यकर्त्यांमुळेच! शिवाय आपण जन्मलो ते लोकशाही राष्ट्रात पुढे रहातोही आहोत लोकशाही राष्ट्रात.. म्हणजे खूपच भाग्यवान आहोत ह्याचीही जाणीव झाली. आता स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास सांगणार "इंडिया आफ्टर गांधी" हे पुस्तक वाचायचं आहे.
White Rose, Black Forest
White Rose, Black Forest (Eoin Dempsey)
महायुद्धावर आधारित फिक्शन अधूनमधून वाचायला मला आवडतं. तसंच हे आवडीखातर वाचण्याचं पुस्तक आहे.
आयुष्यात सर्व काही गमावून बसलेली तरुण नायिका सुनसान ब्लॅक फॉरेस्टमध्ये आत्महत्या करायला निघाली आहे. गडद थंडी, सगळीकडे बर्फ, अशात कुठेतरी जाऊन स्वतःवर गोळी झाडून घ्यायची असा तिचा विचार आहे. दिशाहीन चालत निघालेली असताना तिला एके ठिकाणी एक सैनिक अर्धमेला होऊन पडलेला दिसतो. त्याच्या पाठीवर पॅराशूट असतं. एक सॅक, त्यात काही सामान. गणवेशावर जर्मन स्वस्तिक आणि नाव.
ती व्यवसायाने नर्स असते. नाझींमुळेच तिचे सगळे कुटुंबीय मारले गेलेले असतात. तरी त्या सैनिकाला मदत न करता तसंच निघून जायचं हे तिला पटत नाही. ती त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचं ठरवते.
तिची ती खटपट, तो सैनिक कोण असतो, गेस्टापोंना संशय येणं, पाठलाग, त्यांच्यापासून सुटका करून घेण्याची पुढची धडपड, अधेमध्ये तिचे फ्लॅशबॅक्स – अशी ही कादंबरी आहे.
‘व्हाइट रोझ’ या चळवळीबद्दल याआधी कधी वाचण्यात आलं नव्हतं. ते या पुस्तकामुळे समजलं. त्या चळवळीतली दोन प्रमुख नावं - हान्स आणि सोफी - फ्लॅशबॅकमधली पात्रं म्हणून येतात.
युद्धपरिस्थिती, थंडीचे बर्फाळ दिवस, वुड केबिनमध्ये ते लपूनछपून राहत असतात तेव्हाची परिस्थिती, त्यातलं डिटेलिंग हे सगळं एन्गेजिंग आहे.
त्या सैनिकाचं मिशन, पुढे त्यात या नर्सचा छोटासा पण महत्वाचा सहभाग, हे जरा फिल्मी वाटलं, पण वॉर-फिक्शनच्या प्रेमापोटी चालवून घेतलं.
(बर्फात तो सैनिक तिला पहिल्यांदा दिसतो, ती त्याला मदत करते वगैरे वाचताना ’फना’ सिनेमात काजोलला अर्धमेला आमिर खान दिसतो तो सीन आठवला. पण सिनेमा आधी आलाय, पुस्तक बरंच नंतरचं आहे.)
पराग, एकदम दमदार वाचन!
पराग, एकदम दमदार वाचन!
मीपण इंडस वाचायला घेतलं आणि
मीपण इंडस वाचायला घेतलं आणि अगोदरचे मागे पडलं. एकेक वाचून होईपर्यंत संप्रति१ पुढची यादी टाकतात. वाचनाचा वेग वाढवायला हवा. दुसऱ्या एका धाग्यात पुस्तकांबद्दलची पुस्तक यात the house of paper कळलं. भाषांतर झालं आहे.
David Davidar याचं नाव ऐकून होतो. शोभा डेच्या पुस्तकात याचा उल्लेख आला होता. तिच्या एका पुस्तकासाठी विचारणा करण्यासाठी पेंग्विन प्रकाशनाने पाठवलेला माणूस. तो आला तेव्हा त्यांच्याकडे पाहून तिला खरं वाटेना हाच तो प्रकाशकाचा माणूस. तर याच्या नावाचे एक पुस्तक वाचनालयात दिसले " The house of blue mangoes" ( अनुवाद होता) लगेच घेतले.
तमिळनाडू राज्यातील तिरुनेलवेलीच्या आसपास डेविडचं सुरुवातीचं आयुष्य गेलं आहे. (हा नीलम आंब्याचा प्रदेश blue mangoes) तिथले जातीय राजकारण, खालच्या जातींना होणारा त्रास, ( वरच्या जातीतील लोकांसमोर खालच्या जातीच्या स्त्री पुरुषांनी छाती उघडी टाकूनच गेले पाहिजे, पाणवठ्याचे नियम, रस्त्याने जाताना सावली पडून न देणे इत्यादी), तसेच खालच्या जातींमध्ये ही जन्मजात वैर असणे) क्रिश्चन धर्मात जाणे डेविडने पाहिले, ऐकले आहे. ब्रेस्ट वॉर( धर्मांतरानंतर स्त्रिया चोळ्या घालून लागल्या तर वरच्या जातींचा अपमान होऊन चोळ्या फाडणे ,अत्याचार झाले). अंदावर व वेधूर जातीतले वैर. लेखकाने जातींची नावे मुद्दाम बदलली आहेत. आणखी प्रक्षोभ व्हायला नको म्हणून. तरीही तिथला इतिहास लेखकाने मांडला आहे. वाघाच्या शिकारीचे प्रकरण हेसुद्धा जातीवैराकडे राजकीय पद्धतीने कसं नेलं जातं याचं उदाहरण. याच काळात ब्रिटीश ही होते आणि त्यांच्याबद्दलही घटना आहेत.
एकूण पुस्तक जबरदस्त आहे.
(David Davidar विकीपान पाहा.)
"Are you reading a comic book
"Are you reading a comic book Mom" -टिपिकल यंग अडल्टचा पालकांवर असलेल्या गाढ अविश्वास दाखवणार्या टोन मधे प्रश्न आला. दुसर्या यंग अडल्टने पण भुवया उंचावून पाहिले. मुलांकरता / मुलांबरोबर वाचलेल्या ग्राफिक नॉव्हेल्स सोडल्यास मी आजवर एकही ग्राफिक नॉव्हेल वाचली नाही हे लक्षात आले.
Marjane Satrapi या जन्माने इराणी पण आता पॅरिस मधे स्थायिक असलेल्या लेखिकेचे Embroideries नावाचे पुस्तक वाचले. एकदम छोटेखानी पुस्तक आहे. लेखिकेची चित्रांची शैली एकदम मिनिमलिस्ट आहे . पण तरी अनेक बारकावे आहेत.
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या वरच्या स्थरातल्या इराणी खानदानातल्या वेगवेगळ्या जनरेशनच्या बायका चहासोबत त्यांच्या से*लाइफच्या आठवणी शेअर करतात, इतर परिचित स्त्रियांबद्दल गॉसिप करतात अशी स्टोरी लाइन आहे .
आता त्याच लेखिकेची इतर दोन पुस्तके मागवलीत लायब्ररीतून.
अॅड्ल्स विषयावर गप्पा असल्या तरी इरॉटिक अजिबात नाहीये
Marjane Satrapi - हे नाव खूप
Marjane Satrapi - हे नाव खूप ओळखीचं वाटतंय, पण संदर्भ आठवेना.
ललिता, तू 'पर्सेपोलिस' वाचलं
हे नाव खूप ओळखीचं वाटतंय, पण संदर्भ आठवेना.
<<<<<<<
ललिता, तू 'पर्सेपोलिस' वाचलं असशील बहुतेक. तिचं गाजलेलं ग्राफिक नॉवेल आहे ते. त्यावर सिनेमाही आला होता.
रॉ हिटमॅन
रॉ हिटमॅन
लेखक,: हुसैन झैदी
अनुवाद: उल्का राऊत
बऱ्याच दिवसांनी एक क्राइम स्टोरी वर आधारित पुस्तक वाचले.हुसैन झैदी यांनी लिहिलेली आणि उल्का राऊत यांनी अनुवादित केलेली ही सत्यकथा नक्कीच वाचनीय आहे.
एक भारतीय गुप्तहेर, raw एजन्सीने दिलेली कामगिरी पूर्ण करतो पण त्या बदल्यात त्याला आयुष्याची पाच वर्षे तुरुंगात काढावी लागतात. त्या पाच वर्षात बड्या नामचीन गुंडांशी त्याचा आलेला संबंध, एक डॉन म्हणुन त्याला बाहेर मिळत असलेली कुप्रसिद्दी, कमांडो ट्रेनिंग च्या वेळेस ज्या अग्निदिव्या मधुन त्याला जावे लागले यावर आधारित हे पुस्तक. एकदा जरुर वाचावे असे.
आपल्या सर्वांना, your mission, should you choose to accept it हा MI मधला dialogue माहीत असेलच. त्यात एक लाईन आहे, as always should you or any member of your team be caught or killed the secretary will disavow any knowledge of your actions. या वाक्याची प्रचिती पुस्तक वाचताना सतत येत रहाते. आपल्याच देशात कामगिरी पार पाडणाऱ्या एजंट्सना पण एजन्सी कशी काय वाऱ्यावर सोडु शकते हा प्रश्न पडतो.
पुस्तकाची एकूण मांडणी आवडली, छोटे छोटे chapters आहेत त्यामुळे लिंक लागत रहाते आणि पुस्तक कंटाळवाणे होत नाही. अनुवाद पण छान झालाय.
ज्यांना हुसैन झैदी यांची शैली भावते त्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल.
सिंधुतील साम्राज्ये"- ॲलिस
सिंधुतील साम्राज्ये"- ॲलिस अल्बिनिया याचं मूळ इंग्रजी पुस्तक Empires of the Indus वाचून काढलं. अप्रतिम आहे . सगळीच प्रकरणं आणि लेखन आवडलं. सिंधू नदीच्या मुखापासून ते संगमापर्यंत प्रवास केला आहे तो रोजच्या रोज वहीत टिपून पुस्तक लिहिलं आहे. त्यासाठी केलेलं वाचन आणि अभ्यास सूची मागे दिली आहे ती पाहूनच भ्या वाटतं. काही पुरातन खडकचित्रांबद्दल गावातल्या एक दोघांनी माहीत नाही सांगितल्यावरही लेखिकेने इतरांना विचारून गाईड मिळालाच व ती जाऊन पाहिलीच . हे फार आवडलं. नंतर त्या चित्रांविषयी इतिहासकार, पुरातत्व विभागाने कसं दुर्लक्ष केलंय हे विशेष. आमच्याकडे राजकारण, लाल फीत आणि श्रेय कुणी घ्यायचं यांच्या ओढाताणीत खूप काही हरवलं जातं.
सिंधूची खोरं भारतीयांसाठी अभिमानाचं होतं पण ते फाळणीत बरचसं पाकिस्तानात गेलं. गंगेपेक्षाही अधिक उत्सुकता वर्धक वाटलं.
नक्की वाचावं असं पुस्तक.
लेखिका अलिस अल्बीनिया ही willium darlymple ची चुलत/मावस बहिण लागते हे विकीपेजमधून कळलं.
Pages