मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मागच्या पंधरा एक प्रतिसादांत दिलेली पुस्तकं वाचनालयात बघीतली आहेत. वाचून काढतो.
धन्यवाद. ग्रीशामचं पेलिकन ब्रिफ अनुवाद सापडला आहे.

मला वाटते इथे बहुतेक जणांनी वाचले असेल पण एक वैयक्तिक ऑल टाईम फेवरेट म्हणून इथे द्यायचा मोह टाळता येत नाहीये असे पुस्तक म्हणजे

"माझेही एक स्वप्न होते"

I too had a dream, ह्या अमुलचे डायरेक्टर डॉ. वर्गीस कुरियन ह्यांच्या आत्मकथेचा सुजाता देशमुख ह्यांनी केलेला सुंदर मराठी भावार्थ.

भारत सरकारच्या कोटा सिस्टम मधून परदेशी शिष्यवृत्ती मिळवण्याच्या प्रयत्नात असलेला एक होतकरू मल्याळी सीरियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन मुलगा, आईचे मामा अन् एकंदरीत केंद्र सरकारात मोठे प्रस्थ असणारे जॉन मथाई नातलग असूनही metallurgy ह्या आवडत्या विज्ञानात परदेशी शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे dairy technology विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन येतो, सरकारला लिहून दिलेल्या बाँड नुसार आनंद डेअरीला प्रशासक म्हणून नको वाटत असताना जॉईन होतो.

रेस्ट इज हिस्टरी, संस्था उर्फ अमुलची जडणघडण, इतिहास, त्यात डॉ. कुरियन ह्यांनी उपसलेले कष्ट, प्रसंगी नेहरू आणि इंदिरा गांधींच्या सोबत भांडून मिळवलेल्या सोयी केलेली दुग्ध व्यवसायाची वाढ, नुसती अमुल नाही तर दिल्ली मिल्क स्किमला ऊर्जितावस्था आणणे, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना करून त्याला एक ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलनस् बनविणे हे सगळे केवळ स्तिमित करणारे आहे. जागतिक लेव्हल वर नावाजलेले ब्रिटिश डेअरी तज्ञ आणि साक्षात कुरियन ह्यांचे गुरू ठरतील अश्या तज्ञांनी "म्हशीच्या दुधाची पावडर होऊ शकत नाही" असा दिलेला निर्वाळा, जिद्दीने देशी मशिनरी अन् प्रोडक्शन डिझाईन करून शेवटी जगात पहिल्यांदा म्हशीच्या दुधाची पावडर बनविण्याची किमया साधणे वगैरे वेगवान घडामोडी वाचकाला (मला तरी) खिळवून ठेवायला पुरेशा होत्या, आजवर वाचले नसल्यास जरूर वाचा

Screenshot_20220819-172053_Chrome.jpg

सही! लिस्ट मधे टाकले.

योगायोगाने एका गुजराती मित्राशी गप्पा मारत होतो. तो आणंदचाच निघाला. त्यानेही बरीच तारीफ केली डॉ कुरियन यांची.

एक संबंधित माहिती - एका मराठी उद्योजकांनी लिहीलेले पुस्तक आहे - बहुधा "माझी कॉर्पोरेट यात्रा". त्यांनी जी मशीन बनवली त्यांच्या विक्री/स्पर्धा संदर्भात अमूल च्या कोणाचातरी उल्लेख आहे. डॉ कुरियन किंवा दुसरे कोणीतरी. मला लक्षात आहे त्यावरून एक स्पर्धक म्हणून बहुधा यांना त्यांचा अनुभव कसा आला ते होते. नीट आठवले किंवा पुस्तक सापडले तर इथे दुरूस्त करतो. मला इतकेच लक्षात आहे की त्यात यांचा उल्लेख फार "फेवरेबल" नव्हता. पण बहुधा एक स्पर्धक म्हणून किंवा एक "टफ" कस्टमर म्हणून असावे.

"माझेही एक स्वप्न होते" ह्या पुस्तकातील काही भाग ह्या दुव्यावर: https://www.maayboli.com/node/6881

तसेच नवीन सदस्यांनी जर या उपक्रमातील ईतर लेख पाहिले नसतील तर या दुव्यावर जा. https://www.maayboli.com/aksharvarta

डॉ कुरियन यांच्याबद्दल बरेच वाचले आहे.

नंतर मात्र मला इतकेच लक्षात आहे की त्यात यांचा उल्लेख फार "फेवरेबल" नव्हता. हेसुद्धा वाचले आहे. ती एक सहकारी संस्था होती आणि मग कुरियन यांचा उदोउदो लोकांना बोचू लागला. विरोधी पक्ष तयार झाला.

मी हे पुस्तक वाचलं अलीकडेच. कुरियन यांच्या कामाबद्दल आदरच आहे, प्रश्नच नाही. पण अनुवाद मला जरा कृत्रिम भाषेत वाटला. त्यामुळे मला खूप नव्हतं आवडलं हे पुस्तक.

पुस्तक छान आहे.बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले होते.आता फार नाही आठवत, पण संयत भाषाशैली आवडली होती.

वावे सहमत..
मी आधी अनुवाद वाचला. वाचनात काहीतरी अपूर्ण राहिलेय अशी चुटपुट लागली. मग मूळ पुस्तक मिळवून वाचले. ते वाचन अगदी खळाळत्या पाण्याच्या वेगाने पूर्ण झाले. ते अगदी ओघवते आणि सहजगत्या लिखाण वाटले.

पेलिकन ब्रिफ (अनुवाद, रविंद्र गुर्जर,चांगला) वाचलं. मूळ इंग्रजी १९९२चं. फार गडबडगुंडा वाटला. न्ययॉर्क बेस्ट सेलर म्हणे, आणि ग्रिशमचं (दुसरं) पहिलं गाजलेलं पुस्तक. एक दोन गोष्टी समजल्या नाहीत. डार्बी इतकी फिरते मागावरच्या लोकांना गुंगारा देत - हॉटेलं, देश जागा बदलते, विमान प्रवास,खाणं इत्यादी आणि पाठलाग होऊ नये / जागा ठावठिकाणा कळू नये म्हणून कार्डाने पैसे काढत नाही. मग बँकेतून सहीने पैसे काढते का? १९९२ अगोदर कोअर बँकिंग असतं? पत्रकारांची स्पर्धाही घुसडली आहे. शिवाय आठ खून होतात.

'The Firm' वाचतो. मग दुसरा लेखक शोधणे.

The Firm - John Grisham.
1991. नायक वकिली क्षेत्रातील पहिली परीक्षा चांगली उत्तीर्ण झालेला. सामान्यपणे नवोदितांना ज्या पगाराची नोकरी मिळते त्यापेक्षा फारच वरचा पगार,गाडी,घरासाठी कर्ज देणाऱ्या फर्म'मध्ये भरती होतो. रोजचे दहाबारा तास कायदेशिर कागदपत्रांचा अभ्यास हे काम. पुढे चौदा तास होत जाते. नायकाला घरी जायला वेळही मिळत नाही. त्याचे लग्न झालेले आहे. सुखसोयी भरपूर पण घ्यायला वेळ नाही. तर ही फर्म एवढा पगार का देऊ शकते कारण नेहमीच्या दाखवण्यासारख्या अशिलांशिवाय आणखी एक बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्या एकाला करविषयक मदत करण्यातून पैसे मिळत असतात. पण हे गुप्त असते आणि ते काम थोडा विश्वास बसल्यावर देण्यात येणार असते याचा सुगावा नायकास लागतो. याअगोदर असा सुगावा लागल्याने काम सोडून जाऊ पा हणाऱ्या पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झालेला असतो. इथून कादंबरी सुरू होते.

सरकारी खात्याचेही अधिकारी या फर्मवर लक्ष ठेवून असतात. कुणी एक आतला वकील सहभागी झाल्यास धाड घालणे सोपे होऊन ते काळे उध्वस्त करता येणार. त्यासाठी नायकाशी संपर्कात असतात. त्याच वेळी नायकावर फर्ममधलेही पाळत ठेवून असतात. याच्याकडे गुप्त काम देण्यालायक देण्यात अडचण येऊ नये. एकूण दोन विरोधी गटांमध्ये सापडलेला नायक सुटका करून घेतो का आणि यशस्वी होतो का यात कादंबरी संपते. कुणाचे काय होते हे वाचा. रंजक पण जरा तपशीलाच्या
गडबडगूंड्याकडे डोळेझाक केल्यास वाईट नाही.

अशोकाच्या शिलालेखांवर उजेड पाडणारं पुस्तक म्हणजे
सम्राट अशोक चरित्र
वा. गो. आपटे
आवृत्ती २०१८
गिरनारचा शिलालेख बऱ्याच जणांनी पाहिला असावा. यासारखे आणि इतर स्तंभलेख अशोकाने करवले आणि ते ओरिसापासून दिल्लीपर्यंत पसरले आहेत. त्यात त्याने काय सांगितले आहे हे या पुस्तकात सापडेल. शिवाय अशोकाच्या शिलालेखांचा शोध कसा आणि केव्हा लागला हेसुद्धा कळेल. हे सर्व उघड झाले नसते तर भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग झाकलेला राहिला असता. भारतातला शेवटचा चक्रवर्तिन राजा अशोक. शिवाय हा इतिहास आहे. खराखुरा. वाचलंच पाहिजे असं पुस्तक.

मागच्या पानावर जेम्स वांड यांनी परीक्षण केलेले रावपर्व- आर्थिक मन्वंतराचे शिल्पकार- हे प्रशांत दीक्षित लिखित पुस्तक नुकतंच वाचून पूर्ण केलं.
खरोखर अप्रतिम पुस्तक आहे.
1991 मध्ये निवृत्तीचे वेध लागलेला, वयपरत्वे प्रकृतीच्या कुरबुरी सुरू झालेला पामुलापार्थी वेंकटा नरसिंह राव हा आंध्राचा नेता कोणाच्या ध्यानीमनी नसताना भारताचा पंतप्रधान- दक्षिणेतून आलेला पहिलाच पंतप्रधान- बनला.
त्यावेळी देशावर मोठं आर्थिक संकट होतं. बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस होता. जेमतेम 10-15 दिवस पुरेल इतकंच परकीय चलन होतं. कर्जासाठी आणि मदतीसाठी दारोदार फिरणारा पण सगळीकडून झिडकारला जाणारा बिच्चारा देश अशी भारताची अवस्था होती. दिवाळखोरी(bankrupcy) जाहीर करून देश आर्थिक पारतंत्र्याच्या खड्ड्यात आज घालायचा की उद्या इतकाच प्रश्न होता.
अशावेळी पीव्हीएन राव आणि त्यांचे अर्थमंत्री डॉ मनमोहन सिंग या जोडगोळीने या बिकट परिस्थितीतून कसा मार्ग काढला, मंदीत संधी साधून देशाला विकासाच्या राजमार्गावर नेण्यात यश कसं मिळवलं याची ही थरारक, माहितीपूर्ण, fast paced कहाणी आहे. बुद्धिबळाचा हा पट मोठा इंटरेस्टिंग होता. खरंतर 1991 नावाचा एक थ्रिलर चित्रपट किंवा वेब सिरीज होऊ शकेल इतका हा घटनाक्रम नाट्यमय आहे. नेतृत्व या दोघांचं असलं तरी त्यामध्ये इतर अनेक लोकांचं योगदान होतं- तेही विस्ताराने पुस्तकात आलं आहे.
1991 नंतर जन्मलेल्या किंवा त्यावेळी लहान असलेल्या पिढीने तर आवर्जून वाचावंच असं हे पुस्तक आहे. Highly recommended! जेम्स वांड यांचे आभार!

Whitehat,

अहो आभार कसले मानता राव, आभार वगैरे नको एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ इतकेच म्हणतो मी Happy , परिक्षणाच्या मेहनतीची इतिश्री उत्तम झालेली पाहून अंमळ सुखावला परीक्षक आमच्यातला पण हे हे हे हे

मागच्या आठवड्यात काही रेल्वे संबंधित पुस्तके वाचली.

१) द टर्न अराउंड स्टोरी ओफ इंडिअन रेल्वेज (स्थानिक वाचनालयातून)
विवेक खरे.
मूळ पुस्तक (इंग्रजी) जानेवारी २००९
मराठी शब्दांकन- अभिजित थिटे.
२००४ ते २००९ लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना तोट्याकडे चाललेली रेल्वे त्यांनी आणि सधीरकुमार यांनी मिळून फायद्यात कशी आणली याची माहिती आहे. फार वाचनीय पुस्तक. आकडेवारीसह माहिती.
लेखक विवेक खरे हे रेल्वेत आहेत/होते असं दिसतंय पण त्यांच्याबद्दल काहीच लिहिलेलं नाही. कोणत्या पदावर कोणत्या डिपार्टमेंटला वगैरे ( टेक्निकल/ अडमिनिस्ट्रेशन/अकाउंटस/पब्लिक रिलेशन्स??).
पण लालुंचा ( त्यांची इतर राजकीय 'इमेज' काहीही असली तरी - लेखक) असली गावरान धडाका आणि समज फारच भारी होती. बिहारचे विक्रीकर खात्यातील कार्यक्षम कर्तबगार आइएएस अधिकारी सुधीरकुमार यांना लालूंनी उचलले आणि रेल्वेत 'ओफीसर ओन स्पेशल ड्युटीवर' नेमले. आतापर्यंत रेल्वेतलेच सीनिअर अधिकारी परीक्षा देऊन बढती मिळवून रेल्वे कारभार चालवत होते. नोकरी टिकवणे आणि पेन्शन मिळवणे आणि साहेबांची खपामर्जी होऊ न देणे या ध्येयापायी कर्मचाऱ्यांचे रेल्वेसोयींकडे दुर्लक्ष होतंय हे लालूंनी ओळखले. सर्व निर्णय स्वातंत्र्य सुधीरकुमारांकडे सोपवल्यावर चाके भराभर कशी फिरली ते वाचा या पुस्तकात.

पाने १२५
अमेय प्रकाशन
आवृत्ती ???
_____________________

२) Short History of Indian Railways
Rajendra Aklekar.
( Available on kindle unlimited)
लेखकाने खरोखरच भारतीय रेल्वेचा इतिहास आटोपशीर मांडला आहे. ऐतिहासिक पत्रं, नोंदींचे संदर्भही प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दिले आहेत. काही मजेदार आठवणी आणि घटना दिल्या आहेत.
इस्ट इंडिअन रेल्वे, जीआइपी, बीबीसीआइ,मद्रास रेल्वेच्या उगमापासून ते आइसीएफ वन्दे भारत तेअगदी बुलेट ट्रेन प्रकल्पापर्यंत सर्व महत्त्वाच्या घटनांचा आढावा मनोरंजक पद्धतीने थोडक्यात घेतला आहे.
वाचनीय पुस्तक.

__________________
३) रेल्वे स्टोरिज - रस्किन बॉन्ड
लेखकाचं आयुष्य डेहराडून, मसुरी,आणि शिमला येथे गेलं. आताही तो(८८) तिथेच राहून पुस्तक लिहितो आहे.
गोष्टीवेल्हाळ आहेच. त्यामुळे रमतगमत किस्से वाचत राहायचं. सोप्या आणि साध्या शैलीत त लिहिलेलं पुस्तक - penguin books.

______________
आणखी एक नवे पुस्तक
Hill Railway of Indian Subcontinent - Richard Wallace. ( Published February/June 2021) चाळलंय. माथेरानच्या ट्रेनचं पाहिलं. इतरही ब्रिटीश इंडियातील सात आहेत.

Scribd membership वर( फ्री?) आहे.
फोटो भरपूर दिले आहेत आणि माहिती आहेच.
पुस्तक लय भारी.

बोटी आणि विमानं प्रवास मला आपले वाटत नाहीत. (Relate with). रेल्वे प्रवास भरपूर होतात आणि जरा जागरूक राहिले तर प्रवासाचा आनंद पुरेपूर मिळतो. चार पाच तासांत सहप्रवाशांशी एवढ्या गप्पा होतात की जणू काही बरेच वर्षं शेजारीच होते.

Elenor oliphant is completely fine Vachat ahe.

वरचे बरेच परिचय वाचायचे आहेत. वाचते एकेक.

एक मदत हवी होती. शरद ऋतु विषयी लेखकांनी काही लिहिलेली अशी पुस्तकं कुठली आहेत?
'ऋतुचक्र' म्हणून दुर्गा भागवत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे असं कळलं. ते कुठल्या लायब्ररीत मिळतंय ते शोधतेय. अजुन काही पुस्तकं आहेत का? तर इथे लिहा.

दृष्यांचे फोटो दाखवण्याचा काळ २०००नंतर आला. म्हणजे रंगीत फोटोवाली पुस्तके छापणे हळूहळू परवडू लागले. पण १९६० च्या अगोदरचा काळ म्हणजे एक दोन पाने सूर्यास्ताचं वर्णन असा प्रकार. सौंदर्याचं ललित लेखन. त्या
वेळचे लेखक शोधावे लागतील. ( वाचनालयातील पिवळी पडलेली पुस्तके)
बाकी फोटोग्राफी सुधारली तरी भावनांसाठी (आणि गंधासाठी) शब्दच लागतात.

ऋतूचक्र (१९५४) हे कालच वाचनालयातून मिळालं. या पुस्तकात दुर्गाबाईंनी बारा महिन्यांत ( चैत्र - फाल्गून) निसर्गतील प्राणी पक्षी आणि सृष्टी कशी बदलते ते ललित प्रकारातले निबंध लिहिले आहेत. मध्य प्रदेशातील आदिवासी जमातीवर संशोधन करत असताना तिथे बरीच वर्षं राहिल्या होत्या त्यामुळे निसर्गाचं जवळून अवलोकन केलेलं आहे.[पाहा :बहुरूपिणी - दुर्गा भागवत (चरित्र आणि चित्र) । अंजली कीर्तने . ] तसेच लहानपणी शहरातल्या मोठ्या वाड्यांत राहण्यामुळे शहरी भागही पाहिला आहे. ते सर्व या पुस्तकात नोंदवलं आहे. सूर्य चंद्र तसेच डोंगर आणि समुद्राचंही वर्णन आहे. छोटेसे छान पुस्तक.

शोधक, रावपर्वबद्दल कळवल्याबद्दल धन्यवाद!
ओरिजिनल परीक्षण जेम्स वांड यांचं आहे. ते वाचूनच मी पुस्तक घेतलं and I was not disappointed! . Happy

मागच्या पंधरवड्यात वाचलेली पुस्तकं -

१) नर्मदे हर || जगन्नाथ कुंटे (पहिले पुस्तक) हे आता वाचलं.
पाने २५० पहिल्या नर्मदा परिक्रमेविषयी आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या यात्रेंविषयी शेवटच्या पानांवर थोडक्यात दिलं आहे. यांना काही विशेष अनुभव आले आहेत. अश्वत्थामा दिसणे, योगसमाधी लागणे इत्यादी. फक्त लंगोटीवरही बरेच फिरले. एकूण सामान्य माणसास जमणे नाही. त्यांच्या निरीक्षणानुसार ८०%परिक्रमावासी मप्र.तले आणि वीस टक्के महाराष्ट्र आणि इतर राज्यातले असतात. अगदी काटेकोर नियमाने परिक्रमा कशी करतात हे कळले.

मुदुमलाईच्या रानात राहून हत्तींवर माहिती गोळा करून 'एका रानवेड्याची शोधयात्रा' पुस्तक लिहिणारा
मेघनाथ कुंटे हा यांचाच मुलगा हे माहीत नव्हते.
(( साधनामस्त ॥ / जगन्नाथ कुंटे दुसरे पुस्तक हे अगोदर वाचलं होतं.चौथ्या नर्मदा परिक्रमेतील अनुभव आहेत.))
---------------------------
(२)
झाशीची राणी
-दत्तात्रय बळवंत पारसनीस.
(मूळ पहिली आवृत्ती १८९४, शुभसूचक प्रकाशन )
ही आवृत्ती १९९६, वरदा बुक्स )

पहिली पारसनिसांची प्रस्तावना पूर्ण दिली आहे. राणीचे हे चरित्र बरेच जणांनी वाखाणलेलं आहे. संदर्भ दिले आहेत.
वाचनीय पुस्तक.
पारसनीसांनी त्या वेळी ब्रिटिश अधिकारी, माहितगार लोक आणि राणीचा दत्तकपुत्र दामोदरपंत यांच्याशी संपर्क साधून राणीची खूप माहिती गोळा केली, सत्यता छाननी करून चरित्र लिहिलं आहे. ब्रिटिश आणि राणी राजकीय संबंध, तसेच पेशव्यांशी संबंध याबद्दल माहिती आली आहे. नंतर बंडात पडून ग्वाल्हेर कोटासराई येथे रणांगणावर मृत्यू वर्णन आहे.
माहिती देणाऱ्यांनी शेजारच्या दतिया,ओरछा संस्थानातील बुंदेलांशी संबंध काय होते हे सांगण्याचं गाळलेलं आहे हे जाणवतं. २००९ -२०१० या काळात हिंदी चानेलवर झाशीची राणी मालिका होती आणि त्यात या संपर्काचे भाग होते. ओरछाची एक राणीही त्या वेळी घोड्यावर बसून युद्धाला जात असे हे दाखवलेलं आठवत आहे.
----------------------------
(३)
सर्जनशील' - डॉ. अविनाश सुपे.
जाडजूड आत्मकथन पुस्तक. आज वाचले. त्यात मनोरंजन किंवा विशेष माहिती काही नाही. डॉक्टरकीचा, शिक्षणाचा आणि नंतर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये केलेल्या नोकरीचा आढावा.
शेवटी पन्नास पाने युरोप अमेरिका, न्युझीलंड ओस्ट्रेलिया फिरले. फोटोग्राफी आणि ट्रेकिंग.

---------
(४)
'स्वत:विषयी' - अनिल अवचट
पाने १५०.
१९८३-१९८४ दुसरीकडे वेगवेगळे भाग प्रकाशित. ते एकत्रित पुस्तक.
आज वाचले. ओतूरला बालपण नंतर पुणे. शाळा आणि वसतीगृह जीवन, किस्से. मग मेडिकलला प्रवेश आणि तिथले किस्से. सुनंदाशी लग्न आणि दोन मुली झाल्या एवढा भाग आहे.
विशेष काही नाही.

---------------------

Pages