मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

महाभारत नव्याने वाचणे उपयोगाचे नाहीच >> असहमत. प्रत्येकाचा वाचनाचा उद्देश वेगवेगळा असू शकतो. वाचन काय आपण फक्त त्याचं तात्पर्य लक्षात यावं म्हणून करत नाही. लेखानाची शैली, त्यात वापरलेले शब्द, उपमा, इत्यादीमुळे होणारा आनंद, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळणे, एखादे वर्णन वाचता वाचता पूर्ण चित्रपट मनःपटलावर उमटत जाणे, त्यातून आधी डोळ्यासमोर असलेल्या व्यक्तिरेखा, जागा, गावं, प्रसंग हे सगळे आणखी रंगीत, उत्कट, खर्‍या वाटतील अश्या होत जाणे, विचारांना चालना मिळणे, आपल्या वर्षानुवर्षांतून निर्माण झालेल्या समजूती, मूल्ये ही योग्य आहेत का ह्याकडे सिंहावलोकन करून बघता येणे, आपल्या रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब कथेत पाहणे, एखाद्या व्यक्तिरेखेशी एकरूप होणे असे कित्येक उपयोग आहेत. महाभारताची सर्वच व्हर्जन्स सगळ्यांना आवडतील अशी नाहीत, परंतु केवळ एका कथेवर समाधान मानण्यापुरतं महाभारत हे साहित्य नाहीच मुळी. मुद्दाम साहित्य म्हणालो आहे, पुस्तक नाही.

मी पर्व , संपूर्ण वाचायचा आळस केला.पण पात्रांचे मानवीकरण जास्त आवडलं.एक इतिहस म्हणून जास्त पटतो.
युगांत, खूप आधी वाचले होते.त्यानंतर बरेच वर्षांनी पाडगांवकरांनी केलेला अनुवाद वाचला. आवडला.पण दुसरा खंड, लाय्ब्ररीत मिळाला नाही .मग सोडून दिले.

प्रत्येकाचा वाचनाचा उद्देश वेगवेगळा असू शकतो. वाचन काय आपण फक्त त्याचं तात्पर्य लक्षात यावं म्हणून करत नाही. लेखानाची शैली, त्यात वापरलेले शब्द, उपमा, इत्यादीमुळे होणारा आनंद, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळणे, एखादे वर्णन वाचता वाचता पूर्ण चित्रपट मनःपटलावर उमटत जाणे, त्यातून आधी डोळ्यासमोर असलेल्या व्यक्तिरेखा, जागा, गावं, प्रसंग हे सगळे आणखी रंगीत, उत्कट, खर्‍या वाटतील अश्या होत जाणे, विचारांना चालना मिळणे, आपल्या वर्षानुवर्षांतून निर्माण झालेल्या समजूती, मूल्ये ही योग्य आहेत का ह्याकडे सिंहावलोकन करून बघता येणे, आपल्या रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब कथेत पाहणे, एखाद्या व्यक्तिरेखेशी एकरूप होणे असे कित्येक उपयोग आहेत. महाभारताची सर्वच व्हर्जन्स सगळ्यांना आवडतील अशी नाहीत, परंतु केवळ एका कथेवर समाधान मानण्यापुरतं महाभारत हे साहित्य नाहीच मुळी. मुद्दाम साहित्य म्हणालो आहे, पुस्तक नाही. > >सुंदर पोस्ट हपा.

मायबोलीकर रेव्यु यांनी अनुवादित केलेले हरीश भट यांचे टाटा स्टोरीज .

पहिलीच कथा स्वामी विवेकानंद आणि जमशेटजी टाटा यांच्या एका जहाजावरून केलेल्या प्रवासाची. त्या दोघांमधील संभाषणाचे पुरावे नाहीत, पण त्यांनी अमुक अमुक गोष्टींबद्दल चर्चा केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असलं काही वाचून जरा धाकधूकच वाटली. पण पुढे त्यांच्यातला पत्रव्यवहार इत्यादि गोष्टी आल्या.
सुरुवातीच्या कथा वाचताना जड विशेषणे आणि भाववाचक नामांच्या भडिमारात आशय दबल्यासारखा वाटला.
पुस्तकाची टॅगलाइनही 40 TIMELESS TALES TO INSPIRE YOU अशी असल्याने ते सगळं प्रचारकी होतंय का असं वाटत होतं. पण या कथांत सांगित लेल्या हकीगतीच इतक्या अद्भुत आहेत की पुढे पुढे विशेषण , भाववाचक नामांचा भडिमार कमी झाला की शैली बदलून जे घडलं तसं सांगितलं हे लक्षात आलं नाही.
या उद्योगसमूहाच्या धुरिणांनी केलेला इतका लांबचा, सखोल आणि विस्तृत विचार, तसंच त्यांनी निवडलेल्या तशाच व्यक्तींची कर्तबगारी अगदी पानापानावर थक्क करत गेली. CSR ही संज्ञाही कदाचित नसेल त्या काळात केलेल्या गोष्टी, उद्योगाच्या पलीकडे जाऊन स्थापन केलेल्या Indian Institute of Science , TIFR, NCPA, Cancer Hospital, टाटा स्कॉलर्स, ऑलिम्पिक्समध्ये भारताच्या सहभागासाठी प्रयत्न, National Instistute of Advanced Studies ! काय आणि किती!
काही गोष्टी तर अजिबातच माहीत नव्हत्या.
पंतप्रधान सहायता निधी अर्थात Prime Minister's Relief Fund स्थापन होण्यामागे जे आर डी टाटांची सूचना होती. या रिलीफ फंडाच्या विश्वस्तां पैकी एक टाटा ट्रस्टचा प्रतिनिधीही असे.
स्वातंत्र्य दृष्टिपथात आल्यावर टाटांनी अन्य काही उद्यमींसह भारताच्या विकासाचा सविस्तर आराखडा बनवला होता. त्यात अगदी पोषणाच्या गरजेचाही तपशीलासाकट समावेश होता.

अनुवाद शब्दशः केला आहे असं वाटतं. इंग्रजीतल्या वाक्यरचनाही तशाच ठेवल्या आहेत. कदाचित प्रकाशकांची तीच मागणी असावी. अनुवादित मजकूर वाचताना किंवा तशी शंकाही आली तर माझं डोकं याचं मूळ इंग्रजी काय असेल हे शोधत बसतं. पण मजकूरच इतका पकड घेणारा आहे, की या गोष्टींचा अडथळा आला नाही.
एके ठिकाणी जुलै १९६४ मध्ये जे आर डींनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख आला आहे. बहुधा, पुढे पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधींना असा अर्थ असावा.
मुं म ग्रं सं मधल्या ताईंनी हे पुस्तक वाचा असं मला सांगितलं. मीही तेच सांगेन.

हरचंद पालव पूर्ण पोस्ट छान .
च्रप्स, आधी लिहायला हवं होतं स्पोयलर आहे म्हणून. लक्षात नाही आलं. आता संपादन वेळ गेली.
अंजू, अवल , ओके.

मनोविकास प्रकाशनचे

गरिबीचे अर्थकारण । अभिजित व्ही. बॅनर्जी आणि एस्थर डुफ्लो
अनुवाद : अतुल कहाते
पहिली आवृत्ती । २० जून २०२१
( मूळ पुस्तक - Poor Economics | Abhijit V. Banerjee & Esther Duflo Translated
( 2011 First Published by Penguine Random House India 2011)

ISBN : 978-81-952350-9-4

मूल्य । ₹४००, पाने २८०.

हे वाचले. या लेखकांचे २०१९ चे Good economics for hard times हेसुद्धा वाचले आहे.

गरीब लोकांची माहिती गोळा करून त्याची कारणे वगैरे आकडेवारी मांडून गरीबी घालवण्याचे विवेचन आहे. मुळात गरीब लोकांना आपण गरीब का आहोत हे माहीत असतेच. फक्त ते आलेख,आराखडे काढून पुस्तकं छापत नाहीत.

अर्थकारण सर्वांनाच कळते पण वळत नाही.
१)बाजारात जे विकले जाते ते आपल्याकडे असले पाहिजे.
२) ते देणारे आपणच आहोत. / ते घेण्यासाठी
लोक आपल्याकडेच आले पाहिजेत.
३) तसं होत नाही किंवा मागणीला पर्याय सापडतो आणि वेळ निघून जाते.

हेच जरा शैक्षणिक चौकटीत मांडले की झाले.

पण अशी पुस्तके असे मार्गदर्शक खरेच असते तर जगात गरीब राहिलेच नसते.

बाकी प्रवासात वगैरे आपण काही ग्रेट वाचतोय हे शाइनिंग मारण्यासाठी पुस्तक हातात मिरवायला ठीक आहे.

असो.

टाटा स्टोरीज >> छानच!

टाटांच्या आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी आधार देण्याच्या धोरणाचं अजून एक उदाहरण मला कालपरवाच कळलं. कोकणात आमच्या गावात निसर्ग चक्रीवादळामुळे बरंच नुकसान झालं होतं. आमच्या गावातला एकजण मुंबईला ताज हॉटेलमध्ये नोकरी करतो. त्याच्या घराचंही नुकसान झालं होतं. ते घर त्याला कंपनीकडून तेव्हा लगेच परत बांधून मिळालं! तेव्हा जनरेटर्स आणि इतर सगळ्याच साहित्याची टंचाई होती. पण त्यांनी मुंबईहून जनरेटरसहित सगळं सामान आणून त्याचं घर बांधून दिलं!

हंगर गेम्स ट्रायोलिजी झाली वाचून
किंडल अनलिमिटेड ला फुकट मिळाली म्हणून वाचली
वाचताना मजा आली, कारण तिथं विचार करावा अशी सवडच दिली नाहीये
कथानकाचा वेग अफाट आहे
पण ओव्हरालो बेसिक्स गंडले आहेत
म्हणजे हे लोकं असे का वागतात याचे काहीही स्पष्टीकरण दिले नाहीये
आणि हिरोईन तर आयुष्यभराची कन्फ्युज आहे Happy
कधी कधी वाटतं म्हणावं बाई एक कोण ते निवड ना
कधी पिटा कधी गेल परत पिटा
खिरापत वाटावी तसे किस वाटत सुटलीय Happy

पुस्तक झाल्यावर सिनेमे पण पाहिले पहिले 2
ते तर अजूनच अनाकलनीय आहेत

Lol टीन्स अशीच कन्फ्युज असतात ना?
'ब्लू जे' मध्ये शेवटच्या एक-दोन चॅप्टर मध्ये कायच्याकाय गुंडाळलं आहे. कॅपिटल मध्ये गेल्यावरची त्रेधातिरपिट तर प्रचंड बोर झाली मला वाचायला. पीटा ला कॅपिटल मध्येच ठेवायचं का परत आणायचं? परत आणलं तर नीट सुधारलेलं दाखवायचं का कसं? यात कायच्याकाय कन्विनिअंटली होतं.
पहिल्या भागात हेमिच, पीटा, कॅटनस.. तिची आई बहिण. त्यांनी म्हटलेली गाणी एकदम भारी वाटलेली. त्याची हळूहळू माती केली.
शेवटी १३ मध्ये भ्रमनिरास होणार हे दुसर्‍याच्या शेवटीच समजू लागलेलं, पण ते अंगावर आलं असतं तर मजा आली असती. इथे त्रयस्थ नजेरेने चला संपलं एकदाचं झालं.
पिक्चर मधली कास्ट तर गंडलेलीच वाटली. कॅटनस अशी आखिव रेखीव अंगापिंडाने बाळसेदार... गेल पण एकदम प्रिव्हलेज्ड. काय झेपलंच नाही मला. पीटा आणि हेमिचच त्यातल्या त्यात बरे निवडलेत. एफी आवडली एकदम.

टिन्स असतात कन्फ्युज मान्य आहे पण तिच्या मनात गोंधळ कमी आणि हेतू जास्त वाटतात
शेवटच्या भागात गेल म्हणतोच की थेट की ज्यासोबत ती सर्वाईव्ह करू शकेल अशालाच ती जीवनसाथी म्हणून निवडेल
हेमीच पण एकदा म्हणतो की प्लनिंग करणे तुझ्यासाठी नाही

त्यामुळेच ही तुकडी घेऊन एकदम कॅपिटल मध्ये घुसते त्याच वेळी वाटलेलं की फियस्को होणारे सगळा किंवा मग थेट हिंदी सिनेमा

कास्टिंग गंडलं आहे याबाबत अगदीच सहमत

एकतर पुस्तकात हे सगळे 16 17 वर्षाचे म्हणलं आहे पण सगळे कलाकार 25 च्या पुढेच आहेत
जेनिफर लॉरेन्स मात्र अप्रतिम दिसली आहे आणि त्यामुळे व्यक्तिरेखाला सूट करत नाही
म्हणजे आता सिनेमा ग्लॅमरस करायला त्यांना हे करणे भाग आहेच
पण पुस्तकात तिचे वर्णन सर्वसाधारण दिसणारी मुलगी असेच आहे
ही हिरोईन चक्क देखणी वगैरे आहे
पहिल्या भागात कतो चे काम करणारा तर आपला बायोर्ण आयर्नसाईड आहे, वायकिंग मधला
कसला यांग दिसतंय त्यात

आमच्याक्डे ही पुस्तके लेक टीनेजर अस्ताना वाचलेली( तिनेच) त्यात एक लोखंडाचा का कसलातरी ड्रॅ गन असतो तो युद्धात मरतो त्यावेळी ढसाढसा रडणे झाले होते. पिक्चर पण पाहिलेत दोन का तीन. मजा म्हणजे तेव्हा आम्ही २९ मजल्याव र राहात असू मुंबईत नवीनच होतो. व कुठे कुठे फटाके वाजले की मोठे ढुंम ऐकू येइ. तेव्हा लेक म्हणे बघ हंगर गेम्स मध्ये कसे कोणी मेले की ढुंम होते तसे होते आहे. म्हणून घाबरत असे.

आता आपण राहात आहोत तो डिस्टोपिया जास्त भयानक आहे मुलां साठी. तो पचवायला ह्या पुस्तकांची मदत होईल. बाकी तो रुलिन्ग क्लास त्यांची मने रमवायला गेम्स. हकना क मरणा रे गरीब. सर्व वैश्विक आहे.

मी गेली 20 एक वर्षे जॉन ग्रीशाम आणि रॉबिन कुकचा आहे. बहुतेक सगळी पुस्तक मराठीत आणि इंग्रजी मध्ये पण वाचून झालीत. कालच ग्रीशामचे द रेनमेकर पुन्हा वाचले अन पुन्हा आवडले, रात्री द क्लायंट सुरू केलंय. जबरदस्त आहे. कोर्ट रूम द्रामा लिहावा तर ग्रीशाम नेच.

द क्लायंट खूप छान आहे . गुंतवून ठेवणारं.

पुस्तक अभिप्राय जरा लांबलाय. स्पोयलर ही आहे.मी राहते तिथं एक उपक्रम होता त्यासाठी मी हा अभिप्राय लिहिला होता. तोच इथं देतेय. काटछाट करावी नाही वाटली.

पुस्तकाचे नाव -- उत्तरकांड
लेखक -- डॉ एस एल भैरप्पा
अनुवाद -- उमा कुलकर्णी

रामायण आपण टीव्हीवर बघितलंय. काही काही पुस्तकातून वाचलय. तसच 'उत्तरकांड' हे पुस्तक रामायणावर आधारित आहे. फक्त यातल्या घटना सीतेच्या दृष्टीकोनातून मांडल्या आहेत. कथाबीज तेच आहे. फक्त वास्तवाच्या जास्त जवळ जाणारे वाटते. सीतेच्या प्रथम पुरुषी निवेदनातून ही राम कथा उलगडत जाते. राम-लक्ष्मण यांबरोबर इतरही व्यक्तिरेखा सीते बरोबर आपल्याला भेटतात. नकळत आपणही या पुस्तकात -- सीतेच्या भावविश्वात गुंतत जातो.
सुरुवात होते वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातून. लव-कुश छोटी बाळं सांभाळताना, एकटीने वाढवताना सीता त्रासलेली असते . सर्वसामान्य माणसासारखी मेटाकुटीला आलेली असते . लोकापवादाला बळी पडून रामाने सीतेचा त्याग केलेला असतो. आश्रमाच्या वेशीपाशी सोडल्यावर नवर्‍यानं सोडल्याचा अपमान , परित्यक्ते चं दुःख, निराशा , भय अशा मिश्र भावनांच्या गर्तेत सीता खचून गेलेली असते. सुरुवातीला वाटत राहते तिला की काही काळाने राम येऊन घेऊन जाईल पण तसं घडत नाही. दरम्यान लव-कुश यांचं आगमन होतं. त्यांना वाढवण्यात तिचे दिवस सरत असतात.
त्यांना वाढवत ती आपल्याला तिचा जीवनप्रवास सांगते. शेतात झालेला जन्म , रामाचा पण जिंकणे, मग विवाह कोसलच्या राजवाड्यातलं वास्तव्य, तिथं चाललेले राजकारण , या राजकारणाचे प्रत्येकावर उमटलेले पडसाद, रामाबरोबरचा वनवास, ती रामबरोबर वनवासात जायचा निर्णय घेते तेव्हा झालेला तिचा गौरव आणि पुढे सर्वांना माहीत असलेले , घडलेले रामायण सीता सांगते.
आपल्याला राम माहीत आहे तो सत्यप्रिय , कर्तव्यतत्पर , शूर योद्धा, वेद पारंगत, तत्त्वनिष्ठ आणि धर्मश्रेष्ठ . कुठेच शोधुनही वैगुण्य सापडणार नाही. वनवासात गेल्यावर निसर्गात रमणारा( आताच्या जगात बोललं जातं तसं पॉझिटिव राहणारा .आहे त्यात आनंदाने समाधानाने जगणारा) आकाश, दर्या, डोंगर, नदी , झाडं ,जंगल यात सौंदर्य शोधणारा ही आहे. पण काही ठिकाणी त्याचं वागणं अनाकलनीय होतं. सीतेला जसे प्रश्न पडतात तसे आपल्यालाही पडतात.
* सीतेचा त्याग केलेला असतो तो लोकापवाद असतो म्हणून. पण त्याही आधी ज्या क्षणी तो रावणाचा वध करतो आणि सीता आनंद होऊन त्याला सामोरी जाते तेव्हा मौन बाळगून राहतो बराच वेळ. पहिली हाक मारतो ती नेहमीप्रमाणे 'प्रिये', 'भार्ये' ,'सीते ' अशी न मारता 'जनकराजपुत्री' अशी मारतो . पुढे स्पष्टीकरण देतो की हे युद्ध तुझ्यासाठी केलं नाही तर ईक्ष्वांकू वंशाची कीर्ती राखण्यासाठी केले. एवढा काळ तू अपकीर्ती असलेल्या राक्षसा जवळ राहिली आहे त्यामुळे पातिव्रत्यवर विश्वास नाही.
पुस्तकात शेवटी जेव्हा सीता हेच धर्मसभेत संतापून विचारते तेव्हा राम सांगतो की दीर्घकाळ झालेल्या युद्धाची दमणूक, भयग्रस्त मन, तुझ्या हरणाच्या हट्टामुळे झालेले अपहरण या उद्विग्नतेमुळे ते असंस्कृत शब्द बाहेर पडले.
पण याच उद्विग्न अवस्थेत राम मंदोदरीला मात्र रावणाचा शव संस्कार करणे कसे योग्य आणि लंकेच्या राज्य कारभाराविषयी बिभीषणाला राजकारणाचा पाठ नीट सुसंगत देतो.
* वयाच्या अठराव्या वर्षी रामाने गौतम ऋषींना त्यांच्या व्यभिचारी पत्नी अहल्यादेवी यांना माफ करायला लावले होते . स्वतःच्या मनःशांतीसाठी ऋषींनी ज्या समाजात पत्नीचा त्याग केला त्याच समाजात पत्नीचा स्वीकार केला पाहिजे कारण पत्नी पश्चात्तापाने दग्ध आहे. मग अशा रामाने स्वतः सिंहासनावर बसल्यावर काहीही चूक न केलेल्या, शुद्ध स्व- पत्नीचा मात्र लोकापदाच्या भयापोटी त्याग का केला ? यावर राम निरुत्तर होतो.
* जशी सीता लांब राहिली तसाच राम ही लांब राहिला. बिभीषण, सरमा यांची साक्ष त्याला पटली नाही. सीतेलाच अग्निपरीक्षेला सामोरं का जावं लागलं?
* त्या काळातल्या रिती रिवाजात सुद्धा राम खालच्या जातीच्या शबरीची उष्टावलेली बोरे आनंदाने खातो. वनवासाच्या सुरुवातीच्या काळात त्याच कुळातल्या गुहाराजाशी मैत्र करतो. हाच राम नंतर एका शूद्राचा शिरच्छेद करतो. कारण का तर तप करणे हे शूद्र जातीचे काम नाही . एक क्षुद्र तप करतो म्हणून राज्यात अराजकता माजते . अठरा वर्षाचा एक मुलगा मरण पावतो का तर राज्यात अराजकता माजली आहे. उपासमारीने, योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून मुलगा मरण पावला का याचा शहानिशा न करता एक शुद्र तप करतोय म्हणून हे घडलं यावर राम त्या शूद्राचा शिरच्छेद करतो हा कुठला राजधर्म?
आपण शंकराचं मंदिर म्हणलं की फक्त शिवलिंग पूजतो. गणपती, देवी या मंदिरात फक्त ते ते देव आपण पूजतो. राम मंदिर म्हणलं की अपवाद वगळता कुठेही राम - सीता - लक्ष्मण - हनुमान हे एकत्र पूजतो . पण खरं म्हणजे सीतेचे अपहरण झाल्यानंतर राम-लक्ष्मण-सीता हे एकत्र अत्यंत कमी काळ होते. ती आधी लंकेत. त्यानंतर थोडा काळ कोसल देशात रामाबरोबर, नंतर शेवटपर्यंत एकटी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात. राम कोसल देशात एकटा आणि लक्ष्मण त्याची पत्नी उर्मिला बरोबर कौसल्या मातेच्या जनपदात.
आणि एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे ती म्हणजे उर्मिला. तिला न विचारताच बंधू प्रेमामुळे लक्ष्मण वनवासाला जातो. त्या वेळेला तिथे सीते प्रमाणे पतीबरोबर न जाता ती राजवाड्यात राहिली तर सुखासीनतेला चटावलेली म्हणून अनेकांनी तिची निर्भत्सना ही केली. पण इथे उर्मिला तिचे स्पष्ट मत ती मांडते. एक तर नवविवाहिता .त्यात तिचं मत न विचारता लक्ष्मण जायचा निर्णय घेतो. वनवासात येऊन करू तरी काय. उलट राजवाड्यात राहून तिने कौसल्यामाता ,सुमित्रामाता यांची काळजी घेतली. स्पष्टवक्ती व्यवहारी आणि सेवाभावी, मृदू अशी उर्मिला वाटते.
रामाचा वागणं लक्ष्मणाला पटलं नाही तेव्हा रामाच्या राज्यात राहायचं तर राजाज्ञा ऐकलेच पाहिजे . ती नको म्हणून कौसल्या मातेला माहेरून मिळालेल्या जनपदात लक्ष्मण जाऊन राहिला. तिथे शेतीत नवनवीन प्रयोग करू लागला. रामा च्या तोडीस तोड शूर योद्धा, व्यावहारिक गोष्टी जाणारा, निरागसपणे वहिनीच्या, भावाच्या पायातले काटे काढणारा, राजसिंहासनाच्या शेजारच्या आसनाची आसक्ती नसणारा असा लक्ष्मण जास्त आवडला.
पुस्तकाच्या सुरुवातीला सोशिक, हतबल वाटणारी सीता हळूहळू परिपक्व, ठाम विचारांची आणि स्वतंत्र, स्वावलंबी ही होते . मुलं मोठी होताच ती स्वतःसाठी शेती पिकवते. त्यासाठी अपार मेहनत घेते. स्वतःच्या पायावर उभी राहते. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःला सापडते. सुरुवातीला पती म्हणेल ते प्रमाण अशी ती शेवटी धर्मसभेत कठोरपणे रामाला प्रतिप्रश्न करते. त्याच्या वागण्याचे कारण विचारते आणि शेवटी धर्मसभेत जेव्हा महर्षी आता महाराणी पद स्वीकारावं म्हणून सीतेला सुचवतात तेव्हा ती ठामपणे नकार देते व मनःशांतीसाठी स्वतःच्या कृषी भूमीत परत येते.
या धर्म सभेनंतर राम पूर्वीच्या धडाडीने राज्यकारभार करू शकत नाही. कुश ला राज्यपद , लव ला युवराज पद देऊन स्वतः मुलांना राज्यकारभाराचे शिक्षण देतो. शरयू नदीवर ' सानंद' गावी - लक्ष्मणाच्या गावी जातो. मुलांना युद्धतंत्रा बरोबर राजधर्म ही शिकव म्हणून गळ घालतो. लक्ष्मणाने ती जबाबदारी घेतल्यावर एकांतवासात राहतो आणि एक दिवस पहाटे नदीवर स्नान वेळी नदी प्रवाहात खडकाला अडकलेला रामाचा देह सापडतो.
लंकेच्या घटने नंतर राम- सीता, राम - लक्ष्मण, सीता - लक्ष्मण या कोणाचेच नाते पहिल्यासारखे राहिले नाही. हे त्यांना एकाकीपण कुणाच्या निर्णयामुळे आले? या सगळ्यांनी आलेली परिस्थिती स्वीकारली. सुखी कोणीच झाले नाही.
यांच्याबरोबरच भरत, कौसल्या, कैकयी, रावण, सुग्रीव या ही व्यक्तिरेखा आपल्याला माणूस म्हणून भेटतात. राग, लोभ, संताप, हताशपणा, कपटीपणा, निखळ मैत्र अशा मानवी रुपात. देवत्व किंवा पराकोटीच्या आदर्श रुपात भेटत नाहीत हे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य .

वा, छान लिहिलस वर्णिता. मी अजून वाचलं नाही, आता वाचेन.
एकूणच रामायणात रामाच्या मागे फार व्यक्तीरेखा झाकल्या गेल्यात.
धन्यवाद!

वा, छान लिहिलस वर्णिता. मी अजून वाचलं नाही, आता वाचेन.
एकूणच रामायणात रामाच्या मागे फार व्यक्तीरेखा झाकल्या गेल्यात.
धन्यवाद! >>> ह्यालाच मम म्हणते.

मस्तलिहिलं आहेस वर्णिता.

मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे सीता आणि ऊर्मिला यांच्यातलं नातं ज्या प्रकारे दाखवलं आहे, ते. दोघींच्या स्वभावांमधला फरक, त्यामुळे त्यांच्यात होणारे वाद-संवाद, बहिणी-बहिणींचं नातं वास्तववादी दाखवलं आहे.

मुळात रामायणाकडे घडलेली गोष्ट म्हणून बघणे चूक ठरते. एक गंडलेली काल्पनिक कथा ठीक.
एवढा काळ तू अपकीर्ती असलेल्या राक्षसा जवळ राहिली आहे हे एक नवीन. गर्विष्ट महापराक्रमी महादेवभक्त ब्राह्मण राजा होता ना?
Answer to How can Ravan be both Rakshas and a Brahmin? by Pritish Dash https://www.quora.com/How-can-Ravan-be-both-Rakshas-and-a-Brahmin/answer...

मला आता भैरप्पा हे न वाचण्याचे लेखक वाटतात.

बाकी स्वार्थ हा प्रत्येकाकडेच आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेने स्वत:चा लाभ याचा विचार केलाच तर कितीतरी कथा उगवतील. राज्य हे एकालाच देत राहिले तर इतरांचे काय? उद्या रामाची मुले राज्यसिंहासनावर बसतील, लक्ष्मणाचे काय? कौरवांच्यापैकी इतर शंभरांचे काय?

पूर्वी लग्ने लवकर होत. राम वनवासाला निघताना कौसल्या,कैकेयी सुमित्रा या अगदी साठीला आलेल्या नसणार की त्यांची सेवा करायला सून लागेल. मग भरत,शत्रुघ्नांच्या बायका नव्हत्या?
बाकी काही प्रश्न विचारायचे नसतात कारण मग पटणारे उत्तर नसते. एकच उत्तर - मागच्या जन्मीचे शाप, वरदान,उ:शाप यावर कटवतात.
एकूण या महाकाव्यांवर आधारित दशावतार, कथकली,परदेशांत ( बाली,कंबोडिया . . .) नाट्यप्रयोग हे करमणुकीसाठी उत्तम आहेत. राम-रावण युद्ध, अशोकवनात मारुती, लंका वगैरे मनोरंजन करायला वाव आहे.

Marathi Translation of 'IF IT IS MONDAY IT MUST BE MADURAI Srinath Perur Marathi Translation Copyright with Rohan Prakashan. Published by arrangement with PENGUIN BOOKS INDIA Pvt. Ltd.

ISBN 978-93-86493-44-6

अनुवाद : उल्का राऊत

MADURAI TE UZBEKISTAN

॥ मदुराई ते उझबेकिस्तान ॥

प्रकाशन क्र.:४७९ : रोहन प्रकाशन

पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०१८

मूल्य : दोनशे चाळीस रुपये (Rs.240)

बरीच गंभीर पुस्तके वाचल्यावर हे खुसखुशीत विनोदी प्रवास वर्णनाचं पुस्तक हाती लागलं.
कन्डक्टेड टुअर्स कुणी लेखक करत नसतो कारण काहीच हाती लागत नाही. पण परदेशप्रवास त्या नियमातून बाद. कारण स्वस्त होतो. आणि बरोबर येणारी सांपल्स आपलीच भारतीय असतातच. ते युरोप टुअरमध्ये पहिल्या लेखात. मग केरळ,धारावी,पंढरपूरसुद्धा आहे. नक्की वाचा.

धन्यवाद सगळ्यांना Happy
वावे, अगदी अगदी. वास्तववादी.

पूर्वी लग्ने लवकर होत. राम वनवासाला निघताना कौसल्या,कैकेयी सुमित्रा या अगदी साठीला आलेल्या नसणार की त्यांची सेवा करायला सून लागेल. >>> हे असंच माझ्या ही मनात आलेलं. Lol पण आता तिथेच एकत्र राहिली ना लक्ष्मण येइपर्यंत . जनक राजाकडे जाऊन नाही राहिली म्हणून तसं लिहिलं. नाहीतरी या सगळ्या राण्यांना त्यांच्या खास सख्या होत्याच की सेवेसाठी.
बाकी स्वार्थ हा प्रत्येकाकडेच आहे. >>> हो आणि स्वप्रिती पण.

ललिताप्रिती, मी म्हणलं एकाच जागी पुस्तकांच्या गृपमध्ये राहील म्हणून इथंच पोस्ट केलं.

* त्या काळातल्या रिती रिवाजात सुद्धा राम खालच्या जातीच्या शबरीची उष्टावलेली बोरे आनंदाने खातो. वनवासाच्या सुरुवातीच्या काळात त्याच कुळातल्या गुहाराजाशी मैत्र करतो. हाच राम नंतर एका शूद्राचा शिरच्छेद करतो. कारण का तर तप करणे हे शूद्र जातीचे काम नाही . एक क्षुद्र तप करतो म्हणून राज्यात अराजकता माजते

उत्तर कांड हे नंतर घुसडलेले आहे यावर बर्‍याच अभ्यासकांचे एकमत आहे. मूळ रामायणातला राम दिलदार आहे.

Pages