खाजवा डोकं : अक्षरांच्या पलीकडे

Submitted by कुमार१ on 13 February, 2022 - 01:39

शब्दखेळ हे विरंगुळा विभागाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहूच.

पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे :

प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्‍या कोणीही नवा खेळ किंवा कोडे द्यावे.
खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे.

१. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही.

२. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल.

३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील.

४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे.

५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी). विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आणि एकाच शब्दात उत्तर असलेला नसावा.
नमुना म्हणून मी एक सुरुवात करतो.

खेळ क्रमांक १
तुम्हाला एका दोन खोल्यांच्या घरात नेले आहे. दोन्ही खोल्यांमध्ये भिंत आहे. एका खोलीत असताना दुसऱ्या खोलीतील काहीही दिसणार नाही हे लक्षात घ्यावे.
पहिल्या खोलीत एका भिंतीवर ओळीने तीन इलेक्ट्रिक स्विचेस आहेत. मात्र इथे एकही दिवा बसवलेला नाही. यातीन स्विचेसनी नियंत्रित केलेले तीन वेगवेगळे दिवे दुसऱ्या खोलीत आहेत. प्रत्येक दिव्याचा स्विच स्वतंत्र आहे. पहिल्या खोलीत फक्त एक खुर्ची ठेवली आहे. त्या खोलीत असताना तुम्ही 3 स्विचेसची उघडझाप कितीही वेळा करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार ते स्विचेस चालू /बंद स्थितीत ठेवू शकता.

असे करून झाले की तुम्ही पहिली खोली सोडणार आहात व दुसऱ्या खोलीत प्रवेश कराल. एकदा का तुम्ही इकडे आलात की तुम्हाला पहिल्या खोलीत पुन्हा जायला बंदी आहे.

आता दुसऱ्या खोलीतील दृश्य पाहू. इथे घरात असते तसे सर्व फर्निचर आहे. इथल्या तीन भिंतींवर प्रत्येकी एक याप्रमाणे बल्ब बसवलेला आहे. तुम्ही पहिल्या खोलीत स्विचेसची जी अवस्था ठेवली असेल, त्यानुसार तुम्हाला आता हे बल्ब चालू किंवा बंद अवस्थेत दिसतील. आता याच खोलीत थांबून तुम्हाला सांगायचे आहे की -

पहिल्या खोलीतील कुठला स्वीच( क्रमांक 1, 2 व 3 सर्व) इथल्या कुठल्या बल्बला नियंत्रित करतो ?

चला तर, खाजवा डोकं आणि द्या उत्तर !
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तुला त्यातील फक्त एका राजकुमारीला फक्त एकच प्रश्न विचारण्याची परवानगी देतो
>>>
म्हणजे, एकच राजकुमारी उत्तर देणार आणि बाकी दोन गप्प बसणार आहेत. असेच ना ?

नमिता
मला तीच खात्री प्रश्नकर्त्या कडून करून हवी आहे.
अन्यथा सोडवताना मनात गोंधळ होऊ शकतो

मी जे लिहित आहे ते अपेक्षित उत्तर असणार नाही तरीपण एक वेगळा विचार म्हणून लिहितो.

गुराख्याला लग्न करायचेच आहे. म्हणून त्याने हा प्रश्न विचारावा :
" लग्न करून माणूस खरंच सुखी होतो का?"

या प्रश्नावर जर संबंधित स्त्री कुठलेच उत्तर( हो/ नाही) न देता गप्प बसली तर ते मौन हेच माझ्या मते सत्य उत्तर आहे !
कारण वरील प्रश्नाचे ठाम हो किंवा नाही असे एकच उत्तर असू शकत नाही.

दुसरा मुद्दा.
लग्न करण्यापूर्वी कुठलीच व्यक्ती वरील प्रश्नाचे ठाम उत्तर हो किंवा नाही, कसे देऊ शकेल ? कारण इतरांचे अनुभव वेगळे आणि स्वतःला भविष्यात येणारा अनुभव हा नंतरच समजणार आहे.

म्हणून या प्रश्नावर गप्प राहणे हे सयुक्तिक राहील

एकच प्रश्न पुरेसा नाही असे मला वाटत आहे. कारण उत्तर देणारी मुलगी मधली असू शकते. त्यामुळे तिच्या एकाच उत्तरावरून निष्कर्ष काढणे कसे शक्य आहे?
असो. उत्तराची वाट पाहतो. Happy

मला वाटते की प्रश्न असा विचारायचा आहे ज्याच्या उत्तरावरून एकतर तिघींपैकी एक व्यक्ती नक्कीच मधली आहे असे सांगता येईल अथवा मधली नक्कीच नाही हे सांगता येईल. तरच निश्चितपणे त्याला मधलीला डावलता येईल.

फार क्लासिक कोडे वाटत आहे हे.

मी तर म्हणेन कोणी सोडवले नाही मध्यरात्री पर्यंत तरी चिकू यांनी अथवा जर कुणाला हे कोडे आधीच माहीत असेल तर त्यांनी उत्तर देऊ नये. वाटल्यास पुढचे कोडे मध्यरात्री नंतर देऊन खेळ पुढे सुरू ठेवावा. नंतर ज्यांना हे कोडे सुटले त्यांनी तेव्हा सुरू असलेले कोडे सुटल्यावर या कोड्याचे उत्तर द्यावे.
यासाठी एक आठवडा मुदत द्यावी.
पहा पटत असेल तर.

**एक आठवडा मुदत द्यावी.
>>> माझ्या मते एकूण 48 तास मुदत असावी. शक्यतो भिजत घोंगडे नको.
अर्थात चिकू यांनी ठरवावे.

सगळ्यांचे तर्क वाचायला मजा येतेय, धन्यवाद सर्वांना Happy

कारवी - उत्तर बरोबर नाहीये. राजकुमारी आपल्या पित्याचे गुराख्याने प्राण वाचवले आहेत म्हणून पित्याच्या सांगण्यावरून त्याच्याशी लग्नाला तयार होतील, गुराख्याशी लग्न टळावे असे कोणालाही वाटणार नाही.

प्रश्न एकच आणि तोही एकाच राजकुमारीला विचारायचा आहे, ती राजकुमारी फक्त 'हो' किंवा 'नाही' अशी दोनच उत्तरे देऊ शकते. बाकीच्या दोन्ही राजकुमारी त्यावेळी गप्प असतात Happy

मी जे लिहित आहे ते अपेक्षित उत्तर असणार नाही तरीपण एक वेगळा विचार म्हणून लिहितो.

गुराख्याला लग्न करायचेच आहे. म्हणून त्याने हा प्रश्न विचारावा :
" लग्न करून माणूस खरंच सुखी होतो का?"

या प्रश्नावर जर संबंधित स्त्री कुठलेच उत्तर( हो/ नाही) न देता गप्प बसली तर ते मौन हेच माझ्या मते सत्य उत्तर आहे !
कारण वरील प्रश्नाचे ठाम हो किंवा नाही असे एकच उत्तर असू शकत नाही.

दुसरा मुद्दा.
लग्न करण्यापूर्वी कुठलीच व्यक्ती वरील प्रश्नाचे ठाम उत्तर हो किंवा नाही, कसे देऊ शकेल ? कारण इतरांचे अनुभव वेगळे आणि स्वतःला भविष्यात येणारा अनुभव हा नंतरच समजणार आहे.

म्हणून या प्रश्नावर गप्प राहणे हे सयुक्तिक राहील >>>

interesting आणि philosophical आहे हे नक्की...जरी कोड्याचे बरोबर उत्तर नसले तरी Happy

चिकू ओके.
मग कोड्याची डिफीकल्टी लेव्हल वाढलीय आणि चांगलेच इंटरेस्टिंग झालेय. Happy

मी काय विचार केला होता ते सांगतो.
विचारण्याचा प्रश्न " जर मी मधलीला विचारले, तू नेहमी खरे बोलणारी आहेस का? तर ती काय उत्तर देइल." (यात "जर मी मधलीला विचारले" हा भाग महत्वाचा त्या पुढचा प्रश्न हो किंवा नाही उत्तर असलेला कुठलाही चालेल.)
आता जीला प्रश्न विचारला तीच जर मधली असेल तर ती रँडम हो किंवा नाही काहीही उत्तर देईल. असे उत्तर आले म्हणजे जीला प्रश्न विचारला तीच मधली. मग तो इतर दोघींपैकी कुणाकडेही बोट दाखवून तिला निवडेल.

पण जीला प्रश्न विचारला ती जर मधली नाही, थोरली किंवा धाकटी यापैकी कोणीही आहे, तर मधली यावर काय उत्तर देईल हे त्यांना माहीत नसणार. थोरली असेल तर ती गप्प बसेल, किंवा मधली काहीही उत्तर देउ शकते म्हणुन "हो किंवा नाही" असे तीन शब्दी उत्तर देईल. असे तीन शब्दी उत्तर देणे म्हणजे खरे बोलणे ठरेल म्हणुन धाकटी असेल तर ती मात्र गप्पच बसेल. थोडक्यात जीला प्रश्न विचारला ती गप्प बसली (किंवा ते तीन शब्दी उत्तर दिले) तर ती मधली नाही हे निश्चीत मग तिलाच निवडणार.

पण असे निरुत्तर करणे अशा कोड्यात बहुदा चालत नाही, म्हणुन आधी विचारुन घेतले.
तुम्ही खुलासा केल्याने वरील उत्तर चुकीचे ठरते. आणि कोडे अजून इंटरेस्टिंग होते. विचार करतोय, उत्तराची उत्सुकताही वाढतेय, सोमवारी सकाळी मस्त कामाला लावले तुम्ही. Happy>>>

धन्यवाद मानव्_पृथ्वीकर!

*एक आठवडा मुदत द्यावी.
>>> माझ्या मते एकूण 48 तास मुदत असावी. शक्यतो भिजत घोंगडे नको.
अर्थात चिकू यांनी ठरवावे.>>>

असं करूया. उद्यापर्यंत जर उत्तर नाही आले तर मी इथे उत्तर/ उकल टाकीन. ४८ तास मुदत देऊ. चालेल?

चिकू
तुम्ही प्रश्न दिल्याच्या वेळेनंतर ४८ तास मुदत योग्य वाटते.

चालेल. मग उद्यापर्यंत वाट पाहूया. पण बहुतेक त्याआधी उत्तर येईलच..मायबोलीकर चाणाक्ष आणि तल्लख आहेत Happy

मला दिशा सुचलीय. पण मार्ग काढता येत नाही. इतरांनी प्रयत्न करून बघा.

गुराख्याला मधली मुलगी कोणती हे समजून घ्यायचे आहे. ते कळले की तो कोणाचीही निवड करू शकतो.

तर एका मुलीकडे बोट दाखवून दुसर्‍या मुलीला "ही तुमच्यातली मोठी /मधली / धाकटी का? असा प्रश्न विचारायचा.
आता त्याचा अंदाज बरोबर की चूक / जिला विचारलं ती खरं की खोटं बोलते अशी कॉम्बिनेशन्स करावी लागतील.

खूपच इंटरेस्टिंग आहे. अशी कोडी वाचली होती आणि उत्तरही माहित होते पण आता ते लक्षात नाही.

बेसिकली एकवेळ थोरली आणि धाकटी यांचे उत्तर एकच येईल असा प्रश्न तयार करता येईल पण मधली काहीही उत्तर देऊ शकते त्यामुळे तिला कसं नेमकं शोधावं हे बघायला हवं.

थोरली आणि धाकटी यांचे उत्तर एकच येईल असा प्रश्न : उदा. "जर मी राजाला तू थोरली आहेस का असं विचारलं तर तो हो असं उत्तर देईल का?"
गुराख्याने जर हा प्रश्न थोरलीला विचारला तर ती स्वतःच थोरली असल्याने राजाचं आणि तिचंही उत्तर 'हो' असेल. जर धाकटीला विचारला तर ती थोरली नसल्याने राजाचं उत्तर नाही असेल आणि म्हणून ती असत्य असं 'हो' हे उत्तर देईल. पण समजा ती मधली असेल तर 'हो' म्हणेल किंवा 'नाही' म्हणेल. म्हणजे संदिग्धता तशीच आहे.

भरत आणि मामी, तुम्हाला स्वर्ग नरकाच्या दाराच्या कोड्याची नक्कीच आठवण झाली असेल .
पण या कोड्यात मधल्या राजकुमारीमुळे संदिग्धता वाढली आहे आणि तीच तर गंमत आहे Happy

हो ना.

तीच तर गंमत आहे. >> तुमची गंमत होतेय पण आमचं काय! Lol

मी असा काही विचार करतेय..
ब ला एक प्रश्न असा काही विचारावा की याचं उत्तर अ आणि क सारखेच देतील का. उदा. ब मधली आहे का या प्रश्नाचं उत्तर अ आणि क चे सारखेच असेल का.
पण अजून नीट दिशा मिळत नाहीये

म्हणजे थेट एखादीवर गंभीर आरोप करायचा किंवा इतर दोघींनी कट केला आहे असं काहीतरी प्रश्नार्थक सांगायचं. >> असं नसेल. त्यातल्या एकीशी लग्न करून त्याला आयुष्य काढायचंय आणि इतर दोघी मेव्हण्या होणार आहेत. आधीच पंगा घेऊन कसं चालेल?

तसं नाही हो मामी !
काहीतरी स्फोटक बोललं म्हणजे दोघीजणी चवताळून उठतील........ पण सत्य बोलणारी व्यक्ती शांत आणि अविचल असते

असा विचार करतो आहे Happy

गंमत केली कुमार१ सर.

हो मी देखिल एक विचार करत होते की गुराखी म्हणतो की 'मी जर थोरली किंवा धाकटीशी लग्न केलं तर मधली मरेल. पण जर मधलीशी लग्न केलं तर ती मरणार नाही. असं असेल तर तु माझ्याशी लग्न करशील का?' असा काहीसा प्रश्न. (यात त्या बहिणींचं एकमेकींवर प्रेम आहे हे अध्याहृत आहे.) पण काही निष्पन्न झालं नाही.

मी स्वर्गनरकाचं कोडं वाचलं नव्हतं. पण तेच कोडं रस्त्यातला फाटा - त्यातला कोणता मार्ग इच्छित स्थानी नेतो, असं वाचलं होतं.

हे मायबोलीवरच आहे का आठवतोय.
पण तिथे एकापेक्षा जास्त प्रश्न विचारायची मुभा होती बहुतेक

माझ्याकडेही एक उत्तर होते सकाळी. पण खात्री नाहीये त्या तर्काची. थोड्या वेळाने टाईप करून देतो. चूक असेल तर अजून ट्राय करायला वेळ राहील.

आता उत्तर नीट समजावे या करता आपण एका रांगेत तीन घरं आखून त्यांना १, २, ३ असे घर क्रमांक देउन त्या तिघी बहिणींना एकेका घरात उभे रहायला सांगू, गुराख्याकडे तोंड करून.

आता गुराखी पहिल्या घरातील मुलीला उद्देशून हा प्रश्न विचारतो:
"तू थोरली आहेस का? आणि दुसऱ्या घरातील मधली आहे का? या दोन्ही प्रश्नांचे उत्तर सारखेच आहे का?"

आता पहिल्या घरातील व्यक्ती थोरली/धाकटी/मधली अशी एकेक गृहीत धरून काय काय उत्तर येतील ते पाहू.

१. पहिल्या घरात थोरली:
यात दोन शक्यता, १अ: मधली दुसऱ्या घरात आहे किंवा १ब: मधली तिसऱ्या घरात आहे.

१अ: दुसऱ्या घरात मधली: पहिल्या घरात थोरली आहे तिला उद्देशुन प्रश्न केलाय: यातील तू थोरली आहेस का याचे उत्तर "हो". दुसऱ्या घरातली मधली आहे का याचे ही उत्तर "हो". दोन्ही उत्तर सारखी आहेत का? "हो". थोरली खरे बोलते उत्तर देते "हो."
१अ उत्तर: हो.

१ब: तिसऱ्या घरात मधली: आता तू थोरली आहे का याचे उत्तर "हो", दुसऱ्या घरातील मधली आहे का याचे उत्तर "नाही". दोन्ही उत्तर सारखी आहेत का? "नाही". ती खरे बोलते, उत्तर देते "नाही."
१ब: उत्तर: नाही.

आता यापुढे प्रश्नाचा पहिला भाग, दुसरा भाग असे म्हणुयात.
२. पहिल्या घरात धाकटी.
२अ: दुसऱ्या घरात मधली: पहिल्या भागाचे उत्तर "नाही", दुसऱ्या भागाचे उत्तर "हो" दोन्ही उत्तर सारखे? "नाही". पण ही खोटे बोलते उत्तर देते: "हो"
२अ: उत्तर: हो.

२ब: तिसऱ्या घरात मधली. पहिल्या भागाचे उत्तर "नाही", दुसऱ्या भागाचे उत्तरही "नाही". दोन्ही उत्तर सारखे? "हो". ही खोटं बोलते, उत्तर देते "नाही."
२ब उत्तर: "नाही".

३. पहिल्या घरात मधली.
आता यात ३अ दुसऱ्या घरात थोरली, तिसऱ्या घरात धाकटी, आणि ३ब दुसऱ्या घरात धाकटी, तिसऱ्या घरात थोरली या दोन्ही मध्ये उत्तर "हो"येईल किंवा "नाही" येईल, केव्हा काय येईल सांगता येत नाही.

तर:
उत्तर "हो" केव्हा येऊ शकते?
मधली दुसऱ्या घरात असेल तर किंवा मधली पहिल्या घरात असेल तर. कारण ती तिसऱ्या घरात असेल तर उत्तर देणारी थोरली किंवा धाकटी असेल आणि त्या उत्तर नाही देतात (१ब आणि २ब) हे आपण पाहिलेच आहे.
म्हणजेच हो उत्तर आले असेल तर तिसऱ्या घरातली नक्कीच मधली नाही. गुराखी तिसऱ्या घरातली मुलगी निवडेल.

उत्तर "नाही" केव्हा येऊ शकते?
मधली तिसऱ्या घरात असेल तर किंवा मधली पहिल्या घरात असेल तर. कारण ती दुसऱ्या घरात असेल तर उत्तर देणारी थोरली किंवा धाकटी असेल आणि त्या उत्तर "हो" देतात.(१अ आणि २अ)
म्हणजेच उत्तर नाही आले तर दुसऱ्या घरात नक्कीच मधली नाही. गुराखी दुसऱ्या घरातील मुलगी निवडेल.

ओके राहू दे....
पण प्रश्न देखील १ च विचारायचा आहे बहुतेक...?
मी प्रश्न आणि प्रश्नाला एक अशी precondition --- जेणेकरून थोरली, धाकटी असेल तर सारखेच उत्तर मिळेल (हो / नाही) आणि मधली असेल तर त्याविरूद्ध ( नाही / हो ) उत्तर मिळेल -- असे पाहिले....पण चीकू नाही म्हणतात,

Pages