रवा बेसन लाडू

Submitted by सशल on 21 October, 2011 - 16:59
लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बारीक रवा २ वाट्या
बेसन १ वाटी
साजूक तूप १ वाटी
साखर दोन वाट्या
पाणी (पाकासाठी) एक वाटी
भरपूर केशर आणि वेलची

क्रमवार पाककृती: 

तूपावर रवा भाजून घ्या खमंग ..

मग त्यातच बेसन घालून भाजा, खमंग, हाताला अगदी हलकं लागेल, रंगही बदामी यायला हवा ..

भाजून झाल्यावर हीट बंद करा ..

मग दुसर्‍या भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करा ..

पाक झाला की तो रवा-बेसन मिश्रणात घाला, बरोबर केशर आणि वेलची पूड घाला ..

हे मिश्रण जसजसं गार होईल तसतसं आळत(?) जातं .. संपूर्ण गार झालं की लाडू वळा .. वळताना एक केशराची काडी लावा .. असं केलं तर फार सुंदर दिसतात लाडू ..

वाढणी/प्रमाण: 
छोट्या आकाराचे २०-२५ लाडू होतील
अधिक टिपा: 

सगळं जुळून आलं तर फार मस्त लागतात हे लाडू ..

ह्याच पाकाला काकू शेपूट येणारा पाक म्हणते म्हणजे चमच्याने पाक टेस्ट केला की तो भांड्यात पडताना शेपूट येतं .. Happy

ह्या रेसिपीने माझे लाडू आतापर्यंत कधीही फसलेले नाहीत, काकूने रेसिपी देताना फसणार नाहीत अशी ग्वाही दिली होती .. Happy

माहितीचा स्रोत: 
काकू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे आमचे लाडू :

ladoo.jpg

ताजे नाहीयेत, गणपतीत केलेले होते. Happy प्रमाण हेच आणि सगळं असंच, फक्त केशर बेसना भाजून होताना घातलं. आणि त्याबरोबर दुधाचा मसाला पण घातला, त्याची एक वेगळीच मस्त चव येते. Happy

सशल, हा माझ्याकडून झब्बू. मला जरासे ओलसर मिठाईसारखे लाडू आवडतात. तसेच तोंडात विरघळावेत, जास्त चावावे लागू नयेत म्हणून बदामाची पावडर किंवा मिल्क पावडर घालते. आज बदाम पावडर घातली. आईचे प्रमाण थोडे वेगळे आहे. चार वाट्या रव्याला साडेचार वाट्या बेसन, पाकासाठी पाच वाट्या साखर-तीन वाट्या पाणी. रवा-बेसन वेगवेगळे भाजून घेतले. ह्या प्रमाणात बरेच लाडू होतात. मी वाटी लहान घेते. लहान वाटीच्या हिशोबात माझे पंचवीस-सव्वीस लाडू झाले.

Rava-besan ladu.jpg

सगळं जुळून आलं तर फार मस्त लागतात हे लाडू
हा हा हा.
अगदी खरं आहे. आपलाही मूड असायला हवा.
अगदी मनानं लाडूत घुसल्यावर मस्त होतात.;)

मी आज हे लाडु केले.पाकात घातल्यावर लगेच मिश्रण घट्ट झालं. मग दुधाचा हबका मारुन लाडु वळले.
माझी आई हे लाडु उत्तम करते. तीच्या मते मिश्रण आळायला जेवढा जास्त वेळ लागेल तेवढा पाक
आतपर्यंत शिरतो आणि लाडु छान लागतो. कमीत कमी २ तास तरी लागले पाहिजेत. कधी कधी ७-८ तासही लागतात.
तात्पर्य आमच्याकडे सगळं जुळुन आलं नाही. Happy

एक प्रश्न आहे, लाडवाकरिता कोणते बेसन वापरावे? जाड की बारीक? इथे मिळणारा ब्रँड सांगितला तरी चालेल.

इथले सगळे झब्बू मस्त आहेत!

मला अजूनही लाडू करायला जमलेलं नाही त्यामुळे फोटो टाकायला उशीर होत आहे ..

ज्ञाती, अगं मी नेहेमीचं (बारीक) बेसन (जे आपण पिठल्यासाठी, कढीसाठी वापरतो ते) च वापरते .. लाडवाचं बेसन नाही वापरत यासाठी ..

सशल, तुझ्या रेसिपीने काल हे लाडू केले. प्रथमच पाकातले लाडू करण्याचे धाडस केले पण एकदम मस्त जमलेत.रेसिपी एकदम पर्फेक्ट आहे.मी लाडू बेसन वापरले.तुला आणि तुझ्या काकूला धन्यवाद Happy

सशल, ३-४ दिवसांपूर्वी हे लाडु केले आणि आज संपले सुद्धा. ह्यावेळी चांगले ५ तास मुरले मग वळायला घेतले. पाक करताना फेस कमी झाल्यावर १ मिनीटात रवा-बेसन मिश्रण ओतले. रेसिपीसाठी धन्यवाद!

माझे लाडु फसले. मिश्रण खुप चिकट झाले. पाक जास्त झाला असे वाटते. बघते अजुन १-२ तास ठेउन. वड्या पडतात का पाहते.

सशल आत्ताच रवा बेसन लाडु केले पण पाकासाठी १ कप पाणी घेण्याऐवजी चुकुन २ कप घेतले. आता लाडु (शिरा?) तर मऊ झाले आहेत , चवीलाही छान लागतायत. पण टीकतील का? काय करावे?

मी एक्सपर्ट वगैरे नाही त्यामुळे उपाय सुचवू शकणार नाही पण फ्रीजमध्ये ठेवून बघा .. नक्कीच जास्त टीकतील .. Happy

Pages