कोविड १९ घडामोडी : समज, गैरसमज

Submitted by कुमार१ on 16 June, 2020 - 23:52

(शेवटचे संपादन : १४/७/२०२०)
........................

जानेवारी २०२० पासून कोविड१९ चे पडघम वाजू लागले. लवकरच त्याचा जागतिक प्रसार झाला. मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या हजाराची महासाथ आल्याचे जाहीर केले. यास अनुसरून इथे (https://www.maayboli.com/node/73752) “हात, जंतू, पाणी आणि साबण" हा धागा काढला . त्यात मुख्यत्वे हातांच्या दैनंदिन स्वच्छतेवर भर होता. पुढे त्या धाग्यात कोविडवर अधिक चर्चा होत गेली. त्यातून आपल्यातील अनेकांनी खूप चांगले प्रश्न विचारले. त्या धाग्यावर हातांची स्वच्छता आणि आजाराची माहिती यांची बरीच सरमिसळ झाली आहे. म्हणून एक कल्पना मनात आली. त्या धाग्यात आणि मला अन्यत्र विचारलेल्या गेलेल्या या आजाराबद्दलच्या प्रश्नोत्तरांचे एक स्वतंत्र संकलन करावे. त्यासाठीच हा नवीन धागा काढत आहे. इथून पुढची कोविडची सर्व चर्चा इथे व्हावी, ही विनंती. एक प्रकारे हा धागा म्हणजे 'कोविडपर्वाचा' उत्तरार्ध असेल.

मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांतून असे जाणवले की या आजाराचे बाबतीत समाजात बरेच गैरसमज पसरले आहेत. त्यांचे निराकरण करावे या उद्देशाने हा स्वतंत्र धागा काढत आहे. तो लेख स्वरूपात नसून लोकांकडून प्रत्यक्ष जे प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरे, या स्वरूपाचा आहे. अजून जसजसे लोकांचे प्रश्न वाढत जातील तशी या प्रश्नोत्तरांमध्ये भर घालता येईल. विविध प्रश्न शक्यतो प्रश्नकर्त्याच्या भाषेतच ठेवले आहेत.

नवीन वाचकांसाठी हे संकलन उपयुक्त ठरेल अशी आशा. सूचनांचे स्वागत !
........................................................
प्रश्न :

१. कोविडसाठी Antibodies चा उपाय पारंपारिक विषाणूनाशक औषधांपेक्षा भारी असतो का?

‘भारी’ असे नाही म्हणता येत; उपचारांच्या त्या दोन दिशा आहेत. सध्या सुमारे ५० प्रकारच्या करोनाविरोधी औषधांच्या चाचण्या चालू आहेत. ढोबळ मानाने त्यांचे असे वर्गीकरण करता येईल:
१. पारंपरिक रासायनिक औषधे ( HCQ इ.)
२. विषाणूविरोधी औषधे
३. अ‍ॅन्टिबॉडीज
४. मूळ पेशींचे उपचार.
या सर्वांचे रुग्णप्रयोग शास्त्रीय पद्धतीने चालू आहेत. त्यांचे दखलपात्र निष्कर्ष बाहेर यायला काही महिने जावे लागतील. काही रुग्णांना अ‍ॅन्टिबॉडीजच्या जोडीने विषाणूविरोधी औषधे देखील द्यावी लागतात.
पुरेसे निष्कर्ष हाती आल्याखेरीज अमुक एक उपचार ‘भारी’ आहे असे म्हणता येणार नाही.
…………………………………………………………………………………………………………..
२. कोविडसाठी बीसीजी लसीचे उपचार उपयुक्त आहेत का ?

बीसीजी लस आणि कोविड यांचा संबंध तपासण्यासाठी एप्रिलपासून अनेक रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष हाती यायला सुमारे ४ महिने तरी लागतील.
यानिमित्ताने बीसीजीबद्दल काही उपयुक्त माहिती:

१. ज्या देशांत ती बालपणी सर्वांना देतात, तिथे बालकांच्या श्वसनाच्या गंभीर आजारांचे प्रमाणात घट दिसली आहे.
२. मुळात ही लस जरी जीवाणूविरोधी असली तरी तिच्यात काही विषाणूविरोधी गुणधर्म आहेत.
३. या लसीचे देखील काही उपप्रकार आहेत. त्यानुसार तिचे गुणधर्मही बदलतात. याचाही पुरेसा अभ्यास व्हायचा आहे.
४. सध्यातरी करोना- 2 आणि बीसीजीचे उपचार यासंदर्भात पुरेसा विदा मिळालेला नाही
………………………………………………………………………………………………………………………………………….
. ड जीवनसत्व आणि कोविडची तीव्रता यांचा कितपत संबंध आहे ?
यासंबंधी आता जोरदार संशोधन आणि काथ्याकूट होत आहे त्यासंदर्भात काही रोचक मुद्दे असे आहेत:

१. आपल्या त्वचेत तयार होणारे ड आणि आपले राहण्याचे भौगोलिक स्थान यांचा घनिष्ट संबंध असतो. हे स्थान विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वरवर जाते तसे ड कमी प्रमाणात तयार होते.
२. ज्या शहरांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप असते तिथे देखील शरीरात ड कमी तयार होते.
३. वरील दोन्ही घटक वुहान, तेहरान, मिलान, सिएटल, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांना लागू होतात.

४. वाढत्या वयानुसार देखील त्वचेतील ड चे उत्पादन कमी होत जाते. बरेच जेष्ठ लोक आहारातून पुरेसे ड मिळेल याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना ड ची कमतरता होते.
५. तसेच दीर्घकाळ धूम्रपान केल्यास देखील ड ची कमतरता होते.

६. ड ची पातळी आणि श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध काही अभ्यासांत दिसला आहे.
..... जसे या विषयावर अधिक संशोधन होत राहील, तसा अधिकाधिक प्रकाश पडेल.
………………………………………………………………………………………………………………………..
४. गेल्या काही दिवसात “अमुक-तमुक रसायने खा आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवा”, या आशयाचे अनेक सल्ले ढकलपत्रांतून फिरवले गेले. त्यात किती तथ्य ?

या संदर्भात मला एका वैद्यकीय तज्ञांचे मत दखलपात्र वाटले. ते इथे लिहितो.
शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लागणाऱ्या विविध घटकांपैकी जर कशाची खरोखर कमतरता असेल, तरच तो घटक बाहेरून देण्याने उपयोग होतो.
“ प्रतिकारशक्ती वाढवा (बूस्ट)” हे विधान मुळात अशास्त्रीय आहे. जर एखाद्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर ती कमतरता बाहेरून घटक देऊन भरून काढली जाते. त्यामुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती पूर्ववत (नॉर्मल) होते.
तेव्हा नागरिकांनी निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही.

कोविड-प्रतिबंध आणि जीवनसत्वे:
१. क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत.
२. ड जीवनसत्व : वयाच्या 50 ते 55 नंतर जर हाडांची दुखणे उद्भवली असतील तरच संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधरूपात घ्यावे. उगाचच स्वतःच्या मनाने नाही.
……………………………………………………………………………………………………………………………………………….
. कोविड१९ साठी रक्तद्रव उपचार :
गेल्या काही दिवसात यावर खूप चर्चा होत आहे. म्हणून या बद्दलची काही शास्त्रीय माहिती :

१. या उपचारासाठी दात्याची निवड कशी करतात ?
खालील निकष पूर्ण करणारा दाता सुयोग्य असतो:

*वय १८ ते ५५ दरम्यान.
*१०१.३ अंश F च्यावर ताप येऊन तो तीन दिवस वा अधिक टिकलेला असणे.

*असा दाता स्वतः कोविडसाठी उपचार घेऊन नुकताच बरा झालेला असतो. त्यानंतर सुमारे १४ दिवस त्याला या आजाराची कुठलीही लक्षणे नसावी लागतात. त्याची प्रयोगशाळा चाचणी सलग दोनदा नकारात्मक यावी लागते.
*पहिले लक्षण आलेल्या दिवसानंतर एक महिन्याने त्याच्या रक्तातील IgG बॉडीजचे प्रमाण चांगले असते.

२. या उपचारात प्राप्तकर्त्या रुग्णास काही धोका असतो का ?
वरवर पाहता तसा नसतो पण, एक शक्यता राहते. जेव्हा आपण सध्याच्या करोनाविषाणू विरोधी antibodies दिल्या, तर कालांतराने या विषाणूच्या अन्य प्रकारापासून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
…………………………………………………………………………………………………………………………………………………
६. कोविड होण्याचे प्रमाण आणि लिंगभेद यात तथ्य किती ?
या प्रश्नाचे उत्तर वंश आणि देशानुसार वेगवेगळे आहे. तरी काही निरीक्षणे लिहितो.
या विषाणूचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा लिंगभेद नाही. पण, हा आजार झाल्यानंतर तो गंभीर होण्याचे आणि त्यातून पुढे मृत्यूंचे प्रमाण काही देशांत पुरुषांत अधिक दिसून आले आहे.

याची कारणमीमांसा तशी रोचक आहे. अद्याप यावरील संशोधन चालू आहे. अंदाजे काही निष्कर्ष असे आहेत :
१. साधारणपणे स्त्रियांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता अधिक असते. यामागे स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचा वाटा असतो. तसेच स्त्रीमध्ये दोन X गुणसूत्रे (XX) असल्याचाही या शक्तीला काही फायदा होतो. त्यामुळे शरीरात घुसलेल्या रोगजंतूंचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होतो.

२. बऱ्याच देशांत धूम्रपानाचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक आहे, हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो.
३. या विषयाची अजून एक बाजू. जागतिक महासाथीमुळे जे विपरीत मानसिक परिणाम होतात, ते मात्र स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असतात.
………………………………………………………………………………………………………………………………………..
. कोविडसाठी (संसर्गातून) सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याबाबत विशेष असं संशोधन जगात चालू आहे का?
होय, असे काही अभ्यास चालू आहेत.

१. अशा अभ्यासात बाधित लोकांपैकी किती मृत्यू पावतात याचे गुणोत्तर काढले जाते. ते देशानुसार भिन्न आहे.
२. एकदा बाधित झाल्यानंतर पुन्हा तोच संसर्ग होतो का हे आजमावले जाते. त्यासाठी माकडांवर काही प्रयोग झाले आहेत.
३. बऱ्या झालेल्या रुग्णांत विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज किती प्रमाणात निर्माण झाल्यात हेही मोजले जाते.
४. एकंदरीत करोना या विषाणू जमातीने शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अल्पकालीन असावी, असा सध्याचा अंदाज आहे.
५. त्यामुळेच लस शोधणे महत्त्वाचे ठरेल.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………….
८. घरगुती पातळीवर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सगळ्यांनी मोजावी का?
प्रश्न चांगला आहे पण त्याचे उत्तर सरळ नाही ! बरेच उलट-सुलट मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
१. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अन्य श्वसनाच्या आजारात देखील कमी होऊ शकते. उदा. न्युमोनियाचे अन्य प्रकार, अन्य दीर्घकालीन श्वसनविकार .

२. घरगुती वापराच्या oximeter यंत्रांची अचूकता बरीच कमी असते. विशिष्ट ऑक्सिजन पातळीच्या खाली त्यांची उत्तरे विश्वासार्ह नसतात.
३. अशी मोजणी घरी करताना दक्षता घ्यावी लागते. हात पुरेसे गरम असावे लागतात तसेच संबंधित बोटाच्या नखाला नेलपॉलिश असलेले सुद्धा चालत नाही.
४. उठसूट घरगुती मोजणीमुळे विनाकारण भीतीचे प्रमाण वाढत जाते.
हे सर्व बघता या उपकरणाचा उठसूट सर्वांसाठी वापर सुचविलेला नाही.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………
९. कोविडमुळे मृत्यू होण्याची कारणे काय आहेत ?

कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरात बरीच आहे. अशा काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते.
त्यातून मृत्यू होण्याची कारणे अभ्यासली जातात. आतापर्यंत विच्छेदनातून समजलेली तीन कारणे अशी आहेत:
१. विषाणूच्या थेट हल्ल्यामुळे झालेला शरीरपेशींचा नाश
२. अनेक रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या रक्तगुठळ्या
३. या विषाणूला रुग्णाच्या शरीराने दिलेला hyperimmune प्रतिसाद >>> अधिकाधिक पेशींचा नाश.
.......................................................................
१०. करोना २ ची लस खरेच लवकर उपलब्ध होईल का? ती घाईने बाजारात आणल्यास काही तोटे?

लसीचा मुद्दा उपस्थित केलाय हे छान झाले. सध्या या संदर्भात माध्यमांतून काही उलटसुलट आणि अर्धवट बातम्या आलेल्या आहेत. या निमित्ताने काही अधिकृत माहिती इथे देतो.
कुठलीही लस प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी ती सुरक्षित आणि प्रभावी अशी सिद्ध व्हावी लागते. हे दीर्घकालीन काम असते. एखाद्या लसीवरील संशोधन परिपूर्ण व्हायला तब्बल वीस वर्षे जावी लागतात. आता सध्याच्या आजारावरील लस्सीबद्दल पाहू.

ही लस जर घाईघाईत तयार केली तर तिच्या संशोधनातील बरेच टप्पे नजरेआड करावे लागतात. कुठलीही लस तिच्या संशोधनादरम्यान अनेक लोकांना देऊ पहावी लागते, तसेच तिचे निरनिराळे डोस देखील देऊन पहावे लागतात. त्यानंतर संबंधित लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यावरच योग्य निष्कर्ष निघतात.
हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते.
.................................................................................................................................................
११. करोनाचा संसर्ग डोळ्यांच्यावाटे होतो का?

ज्याप्रमाणे फ्ल्यूचे अन्य विषाणू डोळ्यांच्यावाटे शिरू शकतात तसेच हाही विषाणू शिरू शकतो. पण, अशा प्रकारे संसर्ग झालेल्या व्यक्ती अत्यल्प आहेत. किंबहुना त्याचा पुरेसा विदा उपलब्ध नाही. आरोग्यसेवकांनी काम करताना आपला चेहरा पूर्ण झाकावा हे योग्यच. पण सामन्यांसाठी तशी शिफारस नाही. नाक व तोंड झाकणे पुरेसे आहे. हात नेहमी स्वच्छ ठेऊन ते डोळ्यांना लागणार नाहीत, ही काळजी घेतली की पुरे.
...................................................................................................
१२. सध्या जे रोगी कोविड१९ होऊन बरे झाले आहेत त्यांना यापुढे हा आजार पुन्हा होत नाही, हे खरे आहे का?

याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचा (antibodies) चा अभ्यास केला जातो. ही प्रथिने दोन प्रकारची असतात :
1. मारक (Neutralizing)
2. अ-मारक
यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही).
पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत.
........................................................................................................................
१३. “ आपला विशिष्ट रक्तगट (A) आणि कोविड१९ होण्याची शक्यता यांचा खरंच संबंध आहे का ?

या संदर्भात मोजके अभ्यास युरोपमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला गेला.
या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
अर्थात रक्तगट आणि हा आजार होण्याची अधिक शक्यता, यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. तेव्हा घाईने या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येणार नाही.

१३ ब
ओ (positive,निगेटिव्ह) रक्तगट आणि covid 19 च्या आजाराची तीव्रता ह्याचा काही संबंध आहे का ?

२००८ मधील करोना-१ या विषाणू संदर्भात असे काही जुजबी संशोधन प्रयोगशाळेत झाले होते. तूर्त सध्याच्या करोना-२ बाबत मात्र असे संशोधन बाल्यावस्थेत आहे. ‘ओ’ गटाच्या लोकांमध्ये काही विशिष्ट antibodies तयार होत असतात. त्यांच्यामुळे या विषाणूला पेशीत शिरण्यास प्रतिबंध होतो, असे एक गृहीतक आहे. पण सध्या कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही........................................................................................................................................................
१४. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, असे वाचले. हे खरं आहे का ?

होय त्यात काही तथ्य आहे.
या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो.
रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते.
सध्या हे गृहितक चर्चेत आहे. अधिक संशोधन होत आहे.
.................................................................................................................................................................................
१५. रुग्णाचा कोविड’मुळे’ मृत्यू झाला की अन्य आजार आणि कोविड’सह’ मृत्यू झाला, हे कसे ठरवायचे ?

मृत्यूचे निदान ही अचूक गोष्ट असते. पण, मृत्यूचे खरे कारण ही मात्र काही वेळेस (विशेषतः साथींच्या काळात ) वादग्रस्त गोष्ट ठरते. बऱ्याच वेळा मृत्यूचे कारण हे संबंधित डॉक्टरांचा अनुभव आणि परिस्थितीजन्य पुरावा यावरून दिले जाते. मृत्यूनंतर काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होते. अर्थात ही प्रक्रिया सर्वांचे बाबतीत केली जात नाही; तसे शक्यही नसते.
..........................................................................................
१६. “कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता.
आता हा आजार समाजात उद्भवल्याला सहा महिने उलटलेत. त्यादृष्टीने काही माहितीची भर:
१. असे काही रुग्ण तब्बल तीन महिने अंथरुणात खिळून आहेत.
२. काहींना उपचारानंतर लक्षणे अजिबात नाहीत, पण दोन महिने उलटल्यावरही त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष होकारात्मकच आहेत.
३. काहींमध्ये कालांतराने विशिष्ट प्रकारचा न्युमोनिया होऊ शकेल.
...............................................................................................
१७.
हॅप्पी हायपोक्सिया हा काय प्रकार आहे ?

‘हॅपी हायपोक्सिआ’ हे भयानक चुकीचे टोपणनाव आहे. योग्य वैद्यकीय नाव ‘सायलेंट H’ असे आहे.
म्हणजे काय ते सांगतो.

१. निरोगी माणसात ऑक्सिजनचे रक्तप्रमाण सुमारे ९५ mmHg इतके असते.
२. काही श्वसन आजारात ते कमी होऊ लागते. परंतु ते जेव्हा ६० पर्यंत खाली येते तेव्हाच रुग्णास जोराचा दम लागतो.

३. म्हणजेच ९५ ते ६० या टप्प्यात रुग्ण सायलेंट H अवस्थेत असतो.
४. या अवस्थेत रुग्णात दम लागलेला तर नसतोच, पण तो शांत आणि वरवर ‘सुखी’ (लक्षणविरहित )असतो. हा खरा विरोधाभास आहे.

५. मात्र असा रुग्ण अचानक गंभीर अवस्थेत (decompensation) जाऊ शकतो, हा या अवस्थेतील गर्भित धोका आहे. म्हणून त्याला हॅपी म्हणणे चुकीचे आहे.
.................................................................................
१८. करोना- २ विरोधी औषध शोधायला एवढा वेळ का लागतोय?

या संदर्भात काही मूलभूत माहिती:
विषाणूंच्या रचनेनुसार त्यांचे DNA व RNA असे दोन प्रकार आहेत. करोना- २ RNA या प्रकाराचा आहे. अशा प्रकारच्या विषाणूंची काही वैशिष्ट्ये:

१. त्यांचा जनुकीय संच खूप लहान असतो.
२. त्यामुळे त्यांचे जनुकीय बदल वेगाने आणि वारंवार होतात.

३. त्यांची रचना बरीच भिन्न स्वरूपाची असते.
४. त्यांची उत्क्रांती वेगाने होत राहिल्याने औषधांना त्यांचा 'पाठलाग' करणे तुलनेने अवघड जाते.

५. म्हणून नवनवी औषधे लवकर निष्प्रभ होऊ शकतात.
...........................................................................
१९. करोना विषाणू हवेतून पसरतो काय?

यावर डॉ. सौम्या स्वामीनाथन ( वैज्ञानिक WHO) यांचे स्पष्टीकरण असे आलेले आहे:

१. हा विषाणू हवेतून पसरतो, पण अत्यंत मर्यादित वातावरणात.
२. मुख्यता हवेतून पसरणारे जे विषाणू (उदाहरणार्थ गोवर) असतात, त्या तुलनेत करोनाचे पसरणे बरेच कमी आहे.

३. करोनाचे वातावरणात उडालेले कण 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहत नाहीत.
४. जर तो वरील २ प्रमाणे मुख्यतः हवेतून पसरणारा असता, तर एव्हाना आपणा सर्वांनाच त्याचा संसर्ग झाला असता.
………
२०. वाफ घेणे व रोगप्रतिबंध

वाफ आणि श्वसनसंस्था याबद्दल काही मूलभूत माहिती:
कुठल्याही श्वसनविकारात जेव्हा नाक चोंदणे, घशात खूप द्राव साठणे असे होते, तेव्हा वाफेने ते स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होते. सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत वाफ पोचत नाही. तेव्हा ‘वरच्या’ श्वसनमार्गाची स्वच्छता हा वाफेचा खरा उपयोग आहे.
तो कुठल्याही विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधातील उपाय असत नाही.
त्याचे महत्व श्वसनविकारातला पूरक उपचार इतकेच आहे.
.............................................................................
२१. इटोलीझुमॅब आणि रेमडेसीविर यात काय फरक असतो ?

१. रेमडेसीविर हे थेट विषाणूविरोधक आहे. ते आपल्या पेशींतील या विषाणूची तुफान वाढ थांबवते. ( अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘विर” असते. Antiviral या अर्थी)

२. इटोलीझुमॅब ही मुळात विशिष्ट प्रकारची antibody आहे. (अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘मॅब’ असते). जेव्हा विषाणू पेशीत हल्ला चढवतो, तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून तिथे प्रचंड दाहप्रक्रिया होते. काही वेळेस ही अनियंत्रित होते >> गंभीर आजार >> मृत्यू.
हे औषध दाहप्रक्रिया नियंत्रित करते.
...............................................................................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Black cat.
5000 हजार लोक निवडून त्यांना अत्यंत मर्यादित संख्ये नी व्हायरस नी बाधित करून .
ते परत बरे तर होतीलच नंतर परत 10 हजार लोक बाधित करायच .
नियंत्रित पने.
असा प्रयोग जगात झाला आहे का सामूहिक प्रतिकार शक्ती विषयी निष्कर्ष काढण्यासाठी.

माझा एक मित्र करोनातून आताच बरा झाला. 15 दिवसांपूर्वी त्याला कुठल्याच पदार्थाचा अजिबात वास येत नव्हता. ते कन्फर्म करायला त्याच्या बायकोने त्याचे डोळे मिटून नाकासमोर हिंग धरला होता. तरी पण त्याला काही समजले नव्हते.
आता बरा झालाय तर वास चांगला येतोय त्याला.

साद
बरोबर. वास व चव या गेलेल्या संवेदना परत येतात. हा विषाणू नाका तोंडातील मुख्य चेतातंतूना इजा करत नाही. त्यांच्या सहाय्यकारी तंतूना तात्पुरती इजा करतो.

अत्यंत मर्यादित संख्ये नी व्हायरस नी बाधित करून .

हे शास्त्रीय पद्धतीने करणे म्हणजेच लस देणे,

रॉ व्हायरस मुद्दाम घुसवून प्रयोग शक्य नाही

अत्यंत मर्यादित संख्ये नी व्हायरस नी बाधित करून .
हे शक्य नाही किंवा covid19 विषयी आत्मविश्वास नसल्या मुळे तसा प्रयोग झाला नाही.
जगात एका पण देशात,एका पण जिल्ह्यात, सामूहिक प्रतिकार शक्ती तयार झाली ह्याचे उदाहरण नाही.
मग लोकांची दिशाभूल का केली जात आहे.

आपण कृत्रिम रित्या प्रयोग केला नाही

पण आपोआप इन्फेक्शन मिळून बरे झालेले हजारो आहेत, म्हणूनच तर अशा लोकांना अँटिबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत

जुरासिक पार्कात आहे ... जिंदगी अपना रास्ता खुद ढूंढ लेती है

अँटिबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत
Antibody टिकत नाहीत जास्त दिवस हे पण तीच मंडळी सांगत आहेत.
T cell ह्या महत्वाच्या आहेत.
त्या सरळ विषाणू चा खात्मा करतात,त्यांना लक्षात ठेवतात.
पण त्या कशा वागतील,आणि त्यांची आताची रोग ओलखाची स्थिती ह्याचे निदान करणे शक्य नाही ते किचकट आहे.
हे पण सांगितले जाते.

माझ्या मते ,

अँटिबॉडीज igm आणि igg अशा दोन्ही सापडल्या आहेत

IgG antibody दीर्घकाळ इम्युनिती देतात व त्यांच्या निर्मितीत T cell चाही सुरुवातीला रोल असतोच
म्हणजे तेही डेव्हलप झालेले असणारच

उलट सुलट माहिती प्रतिकूल परिणाम करते.
गंभीर बाधा झालेले covid19 बाधित मी बघितले आहे मरता मरता वाचले आहेत.
असंख्य संकटाना तोंड देवून.
एक तर मदतीला कोण येत नाही.
बेड मिळत नाहीत.
हॉस्पिटल admit करुन घेत नाहीत.
1 तास जरी उशीर झाला तरी जीव जावू शकतो एवढी गंभीर अवस्था विषाणू निर्माण करतो.
काही ना कमी त्रास होतो ह्याचा अर्थ विषाणू कमजोर आहे असा नाही तो व्यक्ती विषाणू च्या कमी संपर्कात आला आहे असा आहे.
मग हे कमी त्रास झालेले अफवा पसरवतात काही होत नाही ,विषाणू एक कल्पना आहे.
मग लोक नियम तोडतात आणि संकटात सापडतात.
तसेच ही सामूहिक प्रतिकार शक्ती ची चर्चा लोकांना निष्काळजी बनवते.
Covid 19 मध्ये सामूहिक प्रतिकार शक्ती कार्य करते असा ठाम निष्कर्ष नाही.
मग तो विषयच नको.

करोनाची बाधा झाल्यापासून दहा दिवसानंतर तो रुग्ण इतरांना संसर्ग देऊ शकत नाही अशा अनेक बातम्या आता येत आहेत.
हे खरे आहे का?
असल्यास: तो रुग्ण अद्याप बाधीत असतानाही पसरवू शकत नाही हे कसे घडते. त्याच्या नाका-घशात / मलमूत्रात करोना विषाणु दहा दिवसांनंतर रहात नाही का?

मानव,
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी जरा वेळाने या विषयावरील नवीन धागा उघडून तिकडे देत आहे.
https://www.maayboli.com/node/75809
इथली पृष्ठसंख्या आता प्रमाणाबाहेर गेल्याने हे पाऊल योग्य वाटते.
धन्यवाद !
पुढील सर्व चर्चा तिकडे...

सध्या नवीन कोरोनाची लाट आली आहे. त्याबद्दल सर्वसाधारण जनता फारशा प्रतिबंधक काळज्या घेत नाहीत असे दिसते.

अत्यंत दिशाहीन आणि हताशेने भरले आहे सर्व जनमानस! इतके हताश पहिल्या लाटेच्या वेळेस वाटत नव्हते अन तेव्हा तर लस देखील दृष्टोपत्तीत नव्हती.... या शिवाय आता आर्थिक संकट ओढवून घ्यायची स्थिती राहिली नाही.... लशीचे व्यवस्थापन पेंड खात आहे.
सर्व कॉर्पोरेट हाऊसेस ना आपापल्या संस्थेतील कर्मचार्^यांचे लसीकरण स्वतः कर्ण्यास सांगितेले तर? फक्त लस सरकार देईल.... या मुळे, त्यांना अनुशासनिक अनुभव असल्या मुळे काम सुरळित होईल आणि सरकारचा बोझा कमी होईल.... हातातून वेळ निस टत आहे.

टॅबलेट स्वरुपात काहि द्यायच अस्त तर ठीक आहे, पण इन्जेक्शन आहे, शिवाय नन्तर येउ शक्णारी काही लक्षणे आहेत, त्यामुळे अनुभवी वैद्यकीय कर्मचारीच हवेत लस द्याय्ला. माझ्या तीन चार नातेवाईकांना उत्तम अनुभव आला एकुण नोंद णी ते लस घेईपर्यन्त व्यवस्थापनाचा.

कुमार सर.. Psorasis च्या पेशंट ला covid vaccine घेता येत नाही का..वय ६० च्या पुढे..काय guidelines आहेत?

केया,
हाच प्रश्न चालू धाग्यावर घ्या ना.
तिकडे उत्तर देतो.

Pages