कोविड १९ घडामोडी : समज, गैरसमज

Submitted by कुमार१ on 16 June, 2020 - 23:52

(शेवटचे संपादन : १४/७/२०२०)
........................

जानेवारी २०२० पासून कोविड१९ चे पडघम वाजू लागले. लवकरच त्याचा जागतिक प्रसार झाला. मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या हजाराची महासाथ आल्याचे जाहीर केले. यास अनुसरून इथे (https://www.maayboli.com/node/73752) “हात, जंतू, पाणी आणि साबण" हा धागा काढला . त्यात मुख्यत्वे हातांच्या दैनंदिन स्वच्छतेवर भर होता. पुढे त्या धाग्यात कोविडवर अधिक चर्चा होत गेली. त्यातून आपल्यातील अनेकांनी खूप चांगले प्रश्न विचारले. त्या धाग्यावर हातांची स्वच्छता आणि आजाराची माहिती यांची बरीच सरमिसळ झाली आहे. म्हणून एक कल्पना मनात आली. त्या धाग्यात आणि मला अन्यत्र विचारलेल्या गेलेल्या या आजाराबद्दलच्या प्रश्नोत्तरांचे एक स्वतंत्र संकलन करावे. त्यासाठीच हा नवीन धागा काढत आहे. इथून पुढची कोविडची सर्व चर्चा इथे व्हावी, ही विनंती. एक प्रकारे हा धागा म्हणजे 'कोविडपर्वाचा' उत्तरार्ध असेल.

मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांतून असे जाणवले की या आजाराचे बाबतीत समाजात बरेच गैरसमज पसरले आहेत. त्यांचे निराकरण करावे या उद्देशाने हा स्वतंत्र धागा काढत आहे. तो लेख स्वरूपात नसून लोकांकडून प्रत्यक्ष जे प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरे, या स्वरूपाचा आहे. अजून जसजसे लोकांचे प्रश्न वाढत जातील तशी या प्रश्नोत्तरांमध्ये भर घालता येईल. विविध प्रश्न शक्यतो प्रश्नकर्त्याच्या भाषेतच ठेवले आहेत.

नवीन वाचकांसाठी हे संकलन उपयुक्त ठरेल अशी आशा. सूचनांचे स्वागत !
........................................................
प्रश्न :

१. कोविडसाठी Antibodies चा उपाय पारंपारिक विषाणूनाशक औषधांपेक्षा भारी असतो का?

‘भारी’ असे नाही म्हणता येत; उपचारांच्या त्या दोन दिशा आहेत. सध्या सुमारे ५० प्रकारच्या करोनाविरोधी औषधांच्या चाचण्या चालू आहेत. ढोबळ मानाने त्यांचे असे वर्गीकरण करता येईल:
१. पारंपरिक रासायनिक औषधे ( HCQ इ.)
२. विषाणूविरोधी औषधे
३. अ‍ॅन्टिबॉडीज
४. मूळ पेशींचे उपचार.
या सर्वांचे रुग्णप्रयोग शास्त्रीय पद्धतीने चालू आहेत. त्यांचे दखलपात्र निष्कर्ष बाहेर यायला काही महिने जावे लागतील. काही रुग्णांना अ‍ॅन्टिबॉडीजच्या जोडीने विषाणूविरोधी औषधे देखील द्यावी लागतात.
पुरेसे निष्कर्ष हाती आल्याखेरीज अमुक एक उपचार ‘भारी’ आहे असे म्हणता येणार नाही.
…………………………………………………………………………………………………………..
२. कोविडसाठी बीसीजी लसीचे उपचार उपयुक्त आहेत का ?

बीसीजी लस आणि कोविड यांचा संबंध तपासण्यासाठी एप्रिलपासून अनेक रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष हाती यायला सुमारे ४ महिने तरी लागतील.
यानिमित्ताने बीसीजीबद्दल काही उपयुक्त माहिती:

१. ज्या देशांत ती बालपणी सर्वांना देतात, तिथे बालकांच्या श्वसनाच्या गंभीर आजारांचे प्रमाणात घट दिसली आहे.
२. मुळात ही लस जरी जीवाणूविरोधी असली तरी तिच्यात काही विषाणूविरोधी गुणधर्म आहेत.
३. या लसीचे देखील काही उपप्रकार आहेत. त्यानुसार तिचे गुणधर्मही बदलतात. याचाही पुरेसा अभ्यास व्हायचा आहे.
४. सध्यातरी करोना- 2 आणि बीसीजीचे उपचार यासंदर्भात पुरेसा विदा मिळालेला नाही
………………………………………………………………………………………………………………………………………….
. ड जीवनसत्व आणि कोविडची तीव्रता यांचा कितपत संबंध आहे ?
यासंबंधी आता जोरदार संशोधन आणि काथ्याकूट होत आहे त्यासंदर्भात काही रोचक मुद्दे असे आहेत:

१. आपल्या त्वचेत तयार होणारे ड आणि आपले राहण्याचे भौगोलिक स्थान यांचा घनिष्ट संबंध असतो. हे स्थान विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वरवर जाते तसे ड कमी प्रमाणात तयार होते.
२. ज्या शहरांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप असते तिथे देखील शरीरात ड कमी तयार होते.
३. वरील दोन्ही घटक वुहान, तेहरान, मिलान, सिएटल, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांना लागू होतात.

४. वाढत्या वयानुसार देखील त्वचेतील ड चे उत्पादन कमी होत जाते. बरेच जेष्ठ लोक आहारातून पुरेसे ड मिळेल याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना ड ची कमतरता होते.
५. तसेच दीर्घकाळ धूम्रपान केल्यास देखील ड ची कमतरता होते.

६. ड ची पातळी आणि श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध काही अभ्यासांत दिसला आहे.
..... जसे या विषयावर अधिक संशोधन होत राहील, तसा अधिकाधिक प्रकाश पडेल.
………………………………………………………………………………………………………………………..
४. गेल्या काही दिवसात “अमुक-तमुक रसायने खा आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवा”, या आशयाचे अनेक सल्ले ढकलपत्रांतून फिरवले गेले. त्यात किती तथ्य ?

या संदर्भात मला एका वैद्यकीय तज्ञांचे मत दखलपात्र वाटले. ते इथे लिहितो.
शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लागणाऱ्या विविध घटकांपैकी जर कशाची खरोखर कमतरता असेल, तरच तो घटक बाहेरून देण्याने उपयोग होतो.
“ प्रतिकारशक्ती वाढवा (बूस्ट)” हे विधान मुळात अशास्त्रीय आहे. जर एखाद्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर ती कमतरता बाहेरून घटक देऊन भरून काढली जाते. त्यामुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती पूर्ववत (नॉर्मल) होते.
तेव्हा नागरिकांनी निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही.

कोविड-प्रतिबंध आणि जीवनसत्वे:
१. क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत.
२. ड जीवनसत्व : वयाच्या 50 ते 55 नंतर जर हाडांची दुखणे उद्भवली असतील तरच संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधरूपात घ्यावे. उगाचच स्वतःच्या मनाने नाही.
……………………………………………………………………………………………………………………………………………….
. कोविड१९ साठी रक्तद्रव उपचार :
गेल्या काही दिवसात यावर खूप चर्चा होत आहे. म्हणून या बद्दलची काही शास्त्रीय माहिती :

१. या उपचारासाठी दात्याची निवड कशी करतात ?
खालील निकष पूर्ण करणारा दाता सुयोग्य असतो:

*वय १८ ते ५५ दरम्यान.
*१०१.३ अंश F च्यावर ताप येऊन तो तीन दिवस वा अधिक टिकलेला असणे.

*असा दाता स्वतः कोविडसाठी उपचार घेऊन नुकताच बरा झालेला असतो. त्यानंतर सुमारे १४ दिवस त्याला या आजाराची कुठलीही लक्षणे नसावी लागतात. त्याची प्रयोगशाळा चाचणी सलग दोनदा नकारात्मक यावी लागते.
*पहिले लक्षण आलेल्या दिवसानंतर एक महिन्याने त्याच्या रक्तातील IgG बॉडीजचे प्रमाण चांगले असते.

२. या उपचारात प्राप्तकर्त्या रुग्णास काही धोका असतो का ?
वरवर पाहता तसा नसतो पण, एक शक्यता राहते. जेव्हा आपण सध्याच्या करोनाविषाणू विरोधी antibodies दिल्या, तर कालांतराने या विषाणूच्या अन्य प्रकारापासून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
…………………………………………………………………………………………………………………………………………………
६. कोविड होण्याचे प्रमाण आणि लिंगभेद यात तथ्य किती ?
या प्रश्नाचे उत्तर वंश आणि देशानुसार वेगवेगळे आहे. तरी काही निरीक्षणे लिहितो.
या विषाणूचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा लिंगभेद नाही. पण, हा आजार झाल्यानंतर तो गंभीर होण्याचे आणि त्यातून पुढे मृत्यूंचे प्रमाण काही देशांत पुरुषांत अधिक दिसून आले आहे.

याची कारणमीमांसा तशी रोचक आहे. अद्याप यावरील संशोधन चालू आहे. अंदाजे काही निष्कर्ष असे आहेत :
१. साधारणपणे स्त्रियांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता अधिक असते. यामागे स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचा वाटा असतो. तसेच स्त्रीमध्ये दोन X गुणसूत्रे (XX) असल्याचाही या शक्तीला काही फायदा होतो. त्यामुळे शरीरात घुसलेल्या रोगजंतूंचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होतो.

२. बऱ्याच देशांत धूम्रपानाचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक आहे, हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो.
३. या विषयाची अजून एक बाजू. जागतिक महासाथीमुळे जे विपरीत मानसिक परिणाम होतात, ते मात्र स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असतात.
………………………………………………………………………………………………………………………………………..
. कोविडसाठी (संसर्गातून) सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याबाबत विशेष असं संशोधन जगात चालू आहे का?
होय, असे काही अभ्यास चालू आहेत.

१. अशा अभ्यासात बाधित लोकांपैकी किती मृत्यू पावतात याचे गुणोत्तर काढले जाते. ते देशानुसार भिन्न आहे.
२. एकदा बाधित झाल्यानंतर पुन्हा तोच संसर्ग होतो का हे आजमावले जाते. त्यासाठी माकडांवर काही प्रयोग झाले आहेत.
३. बऱ्या झालेल्या रुग्णांत विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज किती प्रमाणात निर्माण झाल्यात हेही मोजले जाते.
४. एकंदरीत करोना या विषाणू जमातीने शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अल्पकालीन असावी, असा सध्याचा अंदाज आहे.
५. त्यामुळेच लस शोधणे महत्त्वाचे ठरेल.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………….
८. घरगुती पातळीवर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सगळ्यांनी मोजावी का?
प्रश्न चांगला आहे पण त्याचे उत्तर सरळ नाही ! बरेच उलट-सुलट मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
१. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अन्य श्वसनाच्या आजारात देखील कमी होऊ शकते. उदा. न्युमोनियाचे अन्य प्रकार, अन्य दीर्घकालीन श्वसनविकार .

२. घरगुती वापराच्या oximeter यंत्रांची अचूकता बरीच कमी असते. विशिष्ट ऑक्सिजन पातळीच्या खाली त्यांची उत्तरे विश्वासार्ह नसतात.
३. अशी मोजणी घरी करताना दक्षता घ्यावी लागते. हात पुरेसे गरम असावे लागतात तसेच संबंधित बोटाच्या नखाला नेलपॉलिश असलेले सुद्धा चालत नाही.
४. उठसूट घरगुती मोजणीमुळे विनाकारण भीतीचे प्रमाण वाढत जाते.
हे सर्व बघता या उपकरणाचा उठसूट सर्वांसाठी वापर सुचविलेला नाही.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………
९. कोविडमुळे मृत्यू होण्याची कारणे काय आहेत ?

कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरात बरीच आहे. अशा काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते.
त्यातून मृत्यू होण्याची कारणे अभ्यासली जातात. आतापर्यंत विच्छेदनातून समजलेली तीन कारणे अशी आहेत:
१. विषाणूच्या थेट हल्ल्यामुळे झालेला शरीरपेशींचा नाश
२. अनेक रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या रक्तगुठळ्या
३. या विषाणूला रुग्णाच्या शरीराने दिलेला hyperimmune प्रतिसाद >>> अधिकाधिक पेशींचा नाश.
.......................................................................
१०. करोना २ ची लस खरेच लवकर उपलब्ध होईल का? ती घाईने बाजारात आणल्यास काही तोटे?

लसीचा मुद्दा उपस्थित केलाय हे छान झाले. सध्या या संदर्भात माध्यमांतून काही उलटसुलट आणि अर्धवट बातम्या आलेल्या आहेत. या निमित्ताने काही अधिकृत माहिती इथे देतो.
कुठलीही लस प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी ती सुरक्षित आणि प्रभावी अशी सिद्ध व्हावी लागते. हे दीर्घकालीन काम असते. एखाद्या लसीवरील संशोधन परिपूर्ण व्हायला तब्बल वीस वर्षे जावी लागतात. आता सध्याच्या आजारावरील लस्सीबद्दल पाहू.

ही लस जर घाईघाईत तयार केली तर तिच्या संशोधनातील बरेच टप्पे नजरेआड करावे लागतात. कुठलीही लस तिच्या संशोधनादरम्यान अनेक लोकांना देऊ पहावी लागते, तसेच तिचे निरनिराळे डोस देखील देऊन पहावे लागतात. त्यानंतर संबंधित लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यावरच योग्य निष्कर्ष निघतात.
हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते.
.................................................................................................................................................
११. करोनाचा संसर्ग डोळ्यांच्यावाटे होतो का?

ज्याप्रमाणे फ्ल्यूचे अन्य विषाणू डोळ्यांच्यावाटे शिरू शकतात तसेच हाही विषाणू शिरू शकतो. पण, अशा प्रकारे संसर्ग झालेल्या व्यक्ती अत्यल्प आहेत. किंबहुना त्याचा पुरेसा विदा उपलब्ध नाही. आरोग्यसेवकांनी काम करताना आपला चेहरा पूर्ण झाकावा हे योग्यच. पण सामन्यांसाठी तशी शिफारस नाही. नाक व तोंड झाकणे पुरेसे आहे. हात नेहमी स्वच्छ ठेऊन ते डोळ्यांना लागणार नाहीत, ही काळजी घेतली की पुरे.
...................................................................................................
१२. सध्या जे रोगी कोविड१९ होऊन बरे झाले आहेत त्यांना यापुढे हा आजार पुन्हा होत नाही, हे खरे आहे का?

याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचा (antibodies) चा अभ्यास केला जातो. ही प्रथिने दोन प्रकारची असतात :
1. मारक (Neutralizing)
2. अ-मारक
यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही).
पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत.
........................................................................................................................
१३. “ आपला विशिष्ट रक्तगट (A) आणि कोविड१९ होण्याची शक्यता यांचा खरंच संबंध आहे का ?

या संदर्भात मोजके अभ्यास युरोपमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला गेला.
या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
अर्थात रक्तगट आणि हा आजार होण्याची अधिक शक्यता, यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. तेव्हा घाईने या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येणार नाही.

१३ ब
ओ (positive,निगेटिव्ह) रक्तगट आणि covid 19 च्या आजाराची तीव्रता ह्याचा काही संबंध आहे का ?

२००८ मधील करोना-१ या विषाणू संदर्भात असे काही जुजबी संशोधन प्रयोगशाळेत झाले होते. तूर्त सध्याच्या करोना-२ बाबत मात्र असे संशोधन बाल्यावस्थेत आहे. ‘ओ’ गटाच्या लोकांमध्ये काही विशिष्ट antibodies तयार होत असतात. त्यांच्यामुळे या विषाणूला पेशीत शिरण्यास प्रतिबंध होतो, असे एक गृहीतक आहे. पण सध्या कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही........................................................................................................................................................
१४. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, असे वाचले. हे खरं आहे का ?

होय त्यात काही तथ्य आहे.
या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो.
रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते.
सध्या हे गृहितक चर्चेत आहे. अधिक संशोधन होत आहे.
.................................................................................................................................................................................
१५. रुग्णाचा कोविड’मुळे’ मृत्यू झाला की अन्य आजार आणि कोविड’सह’ मृत्यू झाला, हे कसे ठरवायचे ?

मृत्यूचे निदान ही अचूक गोष्ट असते. पण, मृत्यूचे खरे कारण ही मात्र काही वेळेस (विशेषतः साथींच्या काळात ) वादग्रस्त गोष्ट ठरते. बऱ्याच वेळा मृत्यूचे कारण हे संबंधित डॉक्टरांचा अनुभव आणि परिस्थितीजन्य पुरावा यावरून दिले जाते. मृत्यूनंतर काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होते. अर्थात ही प्रक्रिया सर्वांचे बाबतीत केली जात नाही; तसे शक्यही नसते.
..........................................................................................
१६. “कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता.
आता हा आजार समाजात उद्भवल्याला सहा महिने उलटलेत. त्यादृष्टीने काही माहितीची भर:
१. असे काही रुग्ण तब्बल तीन महिने अंथरुणात खिळून आहेत.
२. काहींना उपचारानंतर लक्षणे अजिबात नाहीत, पण दोन महिने उलटल्यावरही त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष होकारात्मकच आहेत.
३. काहींमध्ये कालांतराने विशिष्ट प्रकारचा न्युमोनिया होऊ शकेल.
...............................................................................................
१७.
हॅप्पी हायपोक्सिया हा काय प्रकार आहे ?

‘हॅपी हायपोक्सिआ’ हे भयानक चुकीचे टोपणनाव आहे. योग्य वैद्यकीय नाव ‘सायलेंट H’ असे आहे.
म्हणजे काय ते सांगतो.

१. निरोगी माणसात ऑक्सिजनचे रक्तप्रमाण सुमारे ९५ mmHg इतके असते.
२. काही श्वसन आजारात ते कमी होऊ लागते. परंतु ते जेव्हा ६० पर्यंत खाली येते तेव्हाच रुग्णास जोराचा दम लागतो.

३. म्हणजेच ९५ ते ६० या टप्प्यात रुग्ण सायलेंट H अवस्थेत असतो.
४. या अवस्थेत रुग्णात दम लागलेला तर नसतोच, पण तो शांत आणि वरवर ‘सुखी’ (लक्षणविरहित )असतो. हा खरा विरोधाभास आहे.

५. मात्र असा रुग्ण अचानक गंभीर अवस्थेत (decompensation) जाऊ शकतो, हा या अवस्थेतील गर्भित धोका आहे. म्हणून त्याला हॅपी म्हणणे चुकीचे आहे.
.................................................................................
१८. करोना- २ विरोधी औषध शोधायला एवढा वेळ का लागतोय?

या संदर्भात काही मूलभूत माहिती:
विषाणूंच्या रचनेनुसार त्यांचे DNA व RNA असे दोन प्रकार आहेत. करोना- २ RNA या प्रकाराचा आहे. अशा प्रकारच्या विषाणूंची काही वैशिष्ट्ये:

१. त्यांचा जनुकीय संच खूप लहान असतो.
२. त्यामुळे त्यांचे जनुकीय बदल वेगाने आणि वारंवार होतात.

३. त्यांची रचना बरीच भिन्न स्वरूपाची असते.
४. त्यांची उत्क्रांती वेगाने होत राहिल्याने औषधांना त्यांचा 'पाठलाग' करणे तुलनेने अवघड जाते.

५. म्हणून नवनवी औषधे लवकर निष्प्रभ होऊ शकतात.
...........................................................................
१९. करोना विषाणू हवेतून पसरतो काय?

यावर डॉ. सौम्या स्वामीनाथन ( वैज्ञानिक WHO) यांचे स्पष्टीकरण असे आलेले आहे:

१. हा विषाणू हवेतून पसरतो, पण अत्यंत मर्यादित वातावरणात.
२. मुख्यता हवेतून पसरणारे जे विषाणू (उदाहरणार्थ गोवर) असतात, त्या तुलनेत करोनाचे पसरणे बरेच कमी आहे.

३. करोनाचे वातावरणात उडालेले कण 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहत नाहीत.
४. जर तो वरील २ प्रमाणे मुख्यतः हवेतून पसरणारा असता, तर एव्हाना आपणा सर्वांनाच त्याचा संसर्ग झाला असता.
………
२०. वाफ घेणे व रोगप्रतिबंध

वाफ आणि श्वसनसंस्था याबद्दल काही मूलभूत माहिती:
कुठल्याही श्वसनविकारात जेव्हा नाक चोंदणे, घशात खूप द्राव साठणे असे होते, तेव्हा वाफेने ते स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होते. सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत वाफ पोचत नाही. तेव्हा ‘वरच्या’ श्वसनमार्गाची स्वच्छता हा वाफेचा खरा उपयोग आहे.
तो कुठल्याही विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधातील उपाय असत नाही.
त्याचे महत्व श्वसनविकारातला पूरक उपचार इतकेच आहे.
.............................................................................
२१. इटोलीझुमॅब आणि रेमडेसीविर यात काय फरक असतो ?

१. रेमडेसीविर हे थेट विषाणूविरोधक आहे. ते आपल्या पेशींतील या विषाणूची तुफान वाढ थांबवते. ( अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘विर” असते. Antiviral या अर्थी)

२. इटोलीझुमॅब ही मुळात विशिष्ट प्रकारची antibody आहे. (अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘मॅब’ असते). जेव्हा विषाणू पेशीत हल्ला चढवतो, तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून तिथे प्रचंड दाहप्रक्रिया होते. काही वेळेस ही अनियंत्रित होते >> गंभीर आजार >> मृत्यू.
हे औषध दाहप्रक्रिया नियंत्रित करते.
...............................................................................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिता, चित्रफित चांगली आहे.
Vt,
* क्षमता कमी होणे फार पुढच्या स्टेजला होते.
>>>
निरोगी अवस्थेत ऑक्सिजन चे मापन साधारण 95. समजा ते कमी होऊ लागले. तरी लक्षणे दिसत नाहीत. ते कमी होत जेव्हा ६० ला जाते, तेव्हाच रुग्णास दम लागतो.

म्हणजेच या लक्षणाची ही प्रक्रिया 95 ते 60 या रेंजमध्ये बरीच उशीराने चालू होते. समजा, घराच्या मापनात ऑक्सिजन सातत्याने कमी होताना दिसला तर सरळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

धन्यवाद!
>>>>निरोगी अवस्थेत ऑक्सिजन चे मापन साधारण 95. समजा ते कमी होऊ लागले. तरी लक्षणे दिसत नाहीत. ते कमी होत जेव्हा ६० ला जाते, तेव्हाच रुग्णास दम लागतो.<<<
दम लागण्याचे लक्षण उशिरा दिसते ते बरोबर. पण स्वतःहून श्वास रोखुन धरण्याची क्षमता मोजत असलो तर तेही इतक्या उशिरापर्यंत समजणार नाही का? म्हणजे आज मी ७० सेकंद श्वास रोखु शकते. रोज मोजताना दिवसाच्या वेळेप्रमाणे, विश्रांती किती झाली, कसला स्ट्रेस आहे ह्याप्रमाणे ७० चे ६४-६५ किंवा ७२-७५ सेकंद होतील. पण सातत्याने ७० चे ६५, ६२, ६०, ५७, ५० असे होत जाईल की एकदम जेव्हा ऑक्सिजन ६० ला जाईल तेव्हा अचानक ७० चे २०-२५ सेकंद होतील?

Oxymeter विषयी माझ्या एका डॉक्टर मैत्रीणी बरोबर जी चर्चा झाली त्यातील मुद्दे मांडते आहे. कोणत्याही आजाराची काही बाह्य लक्षणे (symptoms) असतात आणि काही लक्षणे ही अंतर्गत असतात (signs). Those that are perceived by the patient (for example, cough, high temperature, shortness of breath) are called symptoms and those that are revealed through clinical examination (for example, blood cell count, chest CT scan, blood oxygen levels) are termed as signs. In case of Covid-19, it is being observed that some asymptomatic patients may show signs that go undetected and can lead to complications. Oxymeter is a relatively easy way to catch hypoxia (which is a sign and not symptom) early in especially asymptomatic patients. Even if you are not Corona positive, detection of hypoxia is a crucial factor in getting early treatment. त्यामुळे माझ्या मैत्रिणीच्या मते जर घरी अस्थमा असलेले किंवा इतर श्वसनाचे आजार असलेले ज्येष्ठ नागरिक किंवा सदस्य असतील तर Oxymeter घेऊन ठेवणे उपयोगी आहे. त्याचा तारतम्याने वापर केला तर या उपकरणाचा फायदाच होईल.

लस हा प्रतिबंध करण्याचा उपाय झाला.
तो यशस्वी नाही झाला तरी काही हरकत नाही.
फक्त रोग बरा करण्यासाठी प्रभावी औषध का येत नाही.
हा प्रश्न आहे.
त्याची काय कारण आहेत.

वरील सर्वांचे आभार !
* तारतम्याने वापर केला तर >>> +१

* फक्त रोग बरा करण्यासाठी प्रभावी औषध का येत नाही. >>>

त्यासाठी प्रयत्न चालूच आहेत. आपण जर इतिहासात बघितले, तर अन्य काही गंभीर आजारांच्या बाबतीत देखील प्रभावी औषध निर्माण व्हायला बराच कालावधी गेलेला आहे.

हे एक सत्य घटना पझल सोडवा-
आमच्या परिचयाचे एक आजोबा करोनामुळे admit आहेत. प्रकृती स्थिर आहे. घरी पत्नी, मुलगा सून व 11 वर्षाची नात. गेले अनेक महिने आजीआजोबा घरातच होते. तरी आजोबांना करोना झालाच कसा? त्यांना लक्षणं दिसली म्हणून टेस्ट केली. नंतर घरातील इतर 4 जणांची टेस्ट केली तर ते सगळे निगेटिव्ह आहेत. मुलगा सून दोघेही अत्यावश्यक सेवेत नाहीत त्यामुळे फक्त ग्रोसरी आणायला बाहेर जायचे. नातीलाही बाहेर खेळायला पाठवत नव्हते.
तर मला पडलेले प्रश्न-
मुंबई ऑलरेडी कम्युनिटी स्प्रेड च्या फेजमध्ये आहे का?
असं असू शकतं का की घराबाहेर न पडून आजोबांना करोना झाला पण घरातील ज्याने कोणी त्यांना हा प्रसाद दिला त्याची टेस्ट निगेटिव्ह आली किंवा त्याचा करोना 3 दिवसातच बरा झाला?

Swab चाचणी पुन्हा होकारात्मक >>>

या मुद्द्याबाबत वैद्यकिय संदर्भातील माहिती लिहीतो. ( अर्थात प्रत्यक्ष हे रुग्ण तपासणी करणारे डॉ च इथे खात्रीने सांगू शकतील).
१. दाखल केलेल्या रुग्णाचे पुढील २ सलग चाचणी निष्कर्ष नकारात्मक आले आणि लक्षणे संपली, की तो “बरा” झाल्याचे मानले जाते.

२. समजा, यानंतर अल्प काळात चाचणी निष्कर्ष पुन्हा + आला. तरीही हा बहुधा पुनर्संसर्ग नसतो. त्यावेळेस शरीरातील विषाणू infectious असण्याची शक्यता नसते. किंबहुना अशा व्यक्तीत लक्षणे परत दिसत नाहीत.

३. अशा काही रुग्णांची कल्चर तपासणी करून पाहिल्यावर ती नकारात्मक आढळली आहे.

सनव,

१. स्वाब चाचणी बद्दल एक महत्त्वाचा मुद्दा. साधारणपणे ती घशातील द्रावातून करतात. त्याचा निष्कर्ष + येण्याचे प्रमाण 32 - 40% इतपतच आहे.

२. घरातील सर्वांची चाचणी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी आणि एकाच व्यक्तीने स्वाब घेऊन केली आहे का, हेही पाहावे लागेल. स्वाब घेण्यामध्ये कुशलतेचा भाग आहे.

३. घरातील अन्य तरुण व्यक्ती बाहेर ये जा करतात. त्यांना संसर्ग होऊन ते लक्षणविरहित वाहक असू शकतात. तसेच तरुण निरोगी व्यक्तीला झालेला हा आजार नकळतपणेही बरा होऊ शकतो.

महत्वाचे :

कोविड१९ हा समाजात उद्भवलेला पूर्ण नवीन आजार आहे. संबंधित रुग्णांचा जागतिक पातळीवर सतत अभ्यास चालू आहे. त्यातून त्याचे स्वरूप हळूहळू उलगडत आहे. त्यानुसार तज्ञांची मते तयार होत आहेत.

आजाराचे स्वरूप देखील विविधांगी आहे. त्याच्या अभ्यासात सूक्ष्मजीवशास्त्र, औषधवैद्यक, श्वसनरोग, संसर्गजन्य आजार आणि सामाजिक वैद्यक या सर्व शाखा अंतर्भूत आहेत. या प्रत्येक शाखेचे तज्ञ वेगळे असतात. त्यामुळे कुठलाही एक तज्ञ वाचकांच्या सर्व शंकांचे समाधान करू शकणार नाही.

वरील चर्चेत काही प्रश्नांची उत्तरे देताना मी संबंधित तज्ञांशी चर्चा केलेली आहे. तुमचा एखादा दुसरा प्रश्न बाकी राहिलेला असू शकेल. त्याबद्दलची चर्चा आणि अभ्यास सवडीने झाल्यावरच त्याचे उत्तर देईन.

काही वॅक्सीन घेऊन आयुष्यभर इम्युनिटी मिळते पण कोविडच्या वॅक्सीनने फक्त वर्षभर मिळणार,असे का? Immune cells ज्या तयार होतात वॅक्सीनने त्या नष्ट का होतात?

के तु,
करोना-2 लसींचे प्रयोग अद्याप चालू आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षक कालावधीबाबत आताच भाष्य करणे अयोग्य.
लस तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार तिचा संरक्षक कालावधी (सं का) ठरतो.

१. काही लसी ( देवी, पिवळा ताप) या सौम्य केलेल्या जिवंत जंतूंपासून बनविल्या होत्या. देवीचा ‘सं का’ पन्नास वर्षांहून अधिक काळ होता.

२. करोना २ च्या बाबतीत त्या विषाणूच्या एका प्रथिनाचा वापर लस तयार करण्यासाठी होतो. ते प्रथिन पूर्णपणे की अंशतः वापरायचे यावर मतभेद आहेत. त्यानुसार संबंधित लसीच्या संकात फरक पडेल.

३. वरील प्रकार २ च्या लसींचा सं का १ पेक्षा खूप कमी असतो. म्हणून त्यांना बूस्टर द्यावे लागतात.

४. सारांश : लस तयार करताना संशोधकांना तराजूच्या एका पारड्यात प्रभावीपणा तर दुसऱ्यात सुरक्षितता ठेवावी लागते. तो समतोल साधणे जिकिरीचे असते.

@कुमार१ ,आले लक्षात. सुरक्षितता कि प्रभावीपणा यामध्ये एकाची निवड करावी लागते.माझ्यामते सुरक्षितता हा मुद्दा या आजारवरील लसीत धरला गेला असावा.

Meerut hospital offers negative Covid result for Rs 2,500, FIR filed
Meerut Chief Medical Officer (CMO) Rajkumar Saini ordered a probe on Saturday after a person showed him the video, which is 2 minutes and 38 seconds long, and also the 'negative report of Covid-19 test', at his office.

https://indianexpress.com/article/india/meerut-hospital-offers-negative-...

Meerut hospital offers negative Covid result for Rs 2,500, FIR filed
Meerut Chief Medical Officer (CMO) Rajkumar Saini ordered a probe on Saturday after a person showed him the video, which is 2 minutes and 38 seconds long, and also the 'negative report of Covid-19 test', at his office.

Sad

सामूहिक रोगप्रतिकार शक्ती हे गृहितक आहे की practically siddh झालेला सिद्धांत आहे.
जगातील कोणत्या देशांनी हा प्रयोग करून साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवल्याचे उदाहरण आहे का?

WHO discontinues hydroxychloroquine and lopinavir/ritonavir treatment arms for COVID-19

WHO discontinues hydroxychloroquine and lopinavir/ritonavir treatment arms for COVID-19

मोदींच्या हायड्रोक्सी क्लोरोकवींनच्या सर्जिकल strike चे काय होणार ?

एक तर covid 19 चे उपचार बद्द्ल आपल्या मर्यादित माहिती आहे त्या मुळे हे औषध चुकीचे हे औषध बरोबर असे ठाम पने व्यक्त होवूच नका.
अजुन प्रयोग च चालू आहेत.

मोदींच्या हायड्रोक्सी क्लोरोकवींनच्या सर्जिकल strike चे काय होणार ?

असले प्रश्न विचारणे हास्यास्पद आहे.

IMG_20200707_102206.jpg

आम्ही हा. क्लोरोक्वीन बंद केले , गेल्या आठवड्यात.
आता फेबिफ्लू आणि आयव्हरमेक्तीन सुरू आहे.
फेबिफ्लू भयानक महाग आहे , 200 मिलिग्रॅम ची गोळी असते , पहिल्या दिवशी 1800 चा डोस , एकदम 9 गोळ्या, मग 800 , म्हणून 4 गोळ्या

सोबत झिंकोविट आणि व्हीटेमिन सी
ऑक्सिजन

उपचारांची माहिती उपयुक्त .
कृपया या धाग्यावर राजकारण नको. >> + १
अजून एक विनंती .

सर्वांनी प्रतिसाद मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीतच लिहावेत( एखादा दुसरा तांत्रिक शब्दाचा अपवाद वगळता )
धन्यवाद.

ती 4500 ला 100 मिलीग्राम डोस वाली गोळी कोणती?रॅमिडेसिवीर ना?
ती अजून बॅन नाहीय ना?
त्याचा पूर्ण कोर्स चा खर्च 63000(अधिक हॉस्पिटल चा खर्च) आहे म्हणे.पण परिणाम कारक असावी.हीच गोळी सिपला अजून स्वस्तात बनवणार आहे.

ओह ओके
मी गोळ्या समजले असेन.(बहुतेक त्या बातमीत हे काय आहे हा उल्लेखच नव्हता)

एकाच घरातल्या एकाला कोव्हिड असल्याचे निष्पन्न होणे आणि इतरांच्या टेस्ट निगेटिव्ह येणे याबाबत

संसर्ग झालेला असतानाही स्वॅब टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. (संसर्ग झाल्यापासून टेस्ट पोझिटिव्ह येण्याचा एक कालवधी आणि संसर्ग दूर झाल्यावरचा कालावधी). यामुळेच भारतात स्वॅब टेस्ट चार पाच दिवस थांबून करू लागले कारण आधी फॉल्स निगेटिव्ह रिझल्ट मि़ ळून टेस्ट फुकट जात होत्या.
अँटिबॉडी टेस्ट केल्यावर एखाद्याला संसर्ग झा ला होता का हे कळते.

(हे मी वाचलेले आठवणीतून लिहितोय. आता पुन्हा पडताळून पाहिलेले नाही. डॉक्टर अभ्यासून नीट लिहू शकतील.)

या दोन्ही टेस्ट्सची तुलना करणारा एक चार्ट पाहिला होता.

मला अस वाट्ते की medicine बद्दल खात्रीने नाही बोलता येत !!! ,
एकाच आजाराला, दोन वेगळ्या व्यक्तीना, एखादे same medicine वेगवेगळे निकाल देउ शकते.... + treatment depend on various parameters.....

आपण सर्वसामन्यांनी covid 19 infection कसे झाले ??? ह्याबाबतीतले अनुभव सांगितले तर सर्वांना फायदा नाही होणार का?

कुमार सर,
ह्यावर अधिक सांगतीलच....

Pages