कुमार केतकरांना अनावृत पत्र

Submitted by pkarandikar50 on 26 October, 2009 - 05:03

प्रिय कुमार,
स.न.वि.वि.

मराठी वृत्तपत्रसृष्टीत मानाचा समजला जाणारा 'अनंतराव भालेराव' पुरस्कार तुम्हाला मिळाला, त्याबद्दल हार्दीक अभिनन्दन! अगदी योग्य वेळी, योग्य व्यक्तिची निवड ह्या पुरस्काराकरिता करण्याची समयसूचकता आणि औचित्य दाखवले म्हणून, निवड-समितीचेही अभिनंदन!!

बर्‍याचदा असले पुरस्कार 'जीवन-गौरव' स्वरूपाचे असतात, म्हणजेच ज्यांचे जीवितकार्य जवळपास संपत आले आहे अशा वयोवृद्ध, ज्येष्ठ व्यक्तिंना पुरस्कार देऊन त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक मार्ग असतो. भविष्यकाळात त्यांचे कडून फार काही मोठी कामगिरी घडेल अशी अपेक्षा नसते कारण त्यांचे वय आणि आरोग्य त्यासाठी अनुकूल नसते पण तुमच्या बाबतीत तसे नाही. तुमच्या पत्रकारितेच्या मुशाफिरीत तुम्ही काही उच्च शिखरे गाठली आहेत पण याहूनही अनेक उंच शिखरे सर करण्याची भरपूर उमेद [आणि रग] तुमच्याकडे शिल्लक आहे. ह्या पुरस्काराने तुम्ही आजपावेतो बजावलेल्या कामगिरीची मनमोकळी पावती देत असतानाच, तुमच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन आणि शुभेच्छा व्यक्त करणे हीच या पुरस्कारामागची भूमिका असावी असे मी मानतो!

एक अभ्यासू आणि लढाऊ पत्रकार अशी तुमची उजळ प्रतिमा आहे आणि ती काही 'प्रतिमा-बांधणी' [ईमेज-बिल्डींग] ची आधुनिक हत्यारे वापरून बनवलेली कृत्रिम प्रतिमा नाही. तुमचे नाणे नेहमीच खणखणीत होते आणि ते असेच ठसक्यात ठणठणत रहावे हीच सदिच्छा.

तुमचा मूळ पिंड अर्थशास्त्राच्या जाणकाराचा. इकॉनॉमिक्स टाईम्स मधे तुम्ही प्रामुख्याने आर्थिक विषय हाताळत होता पण त्याजोडीने सामाजिक आणि राजकीय विषयांवरचे तुमचे लेखन प्रत्ययकारी आणि मूलगामी असायचे, त्यामागे असलेली तुमची समाजहिताची कळकळ स्वच्छपणे दिसायची. अभ्यासपूर्वक माहिती जमा करणे आणि चौफेर वाचनाचा व्यासंग असणे पत्रकारितेला आवश्यक असले तरी ते भांडवल पुरेसे नसते. विचारांची दिशा, मनाचा कल, तर्कशुद्ध विश्लेषण आणि बदलत्या काळानुरूप विचारांची फेरमांडणी करण्याचे बौद्धिक धारिष्ट्य आणि नैतिकता या गोष्टी तितक्याच किंबहुना जास्तच महत्वाच्या असतात. तुमच्यासारख्या पत्रकाराकडून वाचकांना निव्वळ माहिती किंवा आकडेवारीच्या सांख्यिकी जंत्रीची अपेक्षा नसते तर उपलब्ध माहितीचा आणि वर्तमानाचा अन्वयार्थ उलगडून येणार्‍या भविष्याकडे अचूक अंगुलीदर्शन व्हावे अशी अपेक्षा असते. इकॉनॉमिक् टाईम्स , महाराष्ट्र टाईम्स, [ इकॉनॉमिक-पोलिटिकल ऑब्जर्वर आणि लोकमत मधील अल्पकालीन मुक्काम] आणि आता लोकसत्ता ह्या मुख्यप्रवाहातल्या दैनिकातली तुमची कामगिरी त्या अपेक्षांच्या पूर्तीच्या दृष्टीने लाख मोलाची ठरली आहे ह्याबाबत दुमत नसावे.

आधुनिक लोकशाहीत प्रसार-साधने अतिशय शक्तिशाली होतात पण त्याच बरोबर ही ताकद समतोल बुद्धीने आणि विधायक पद्धतीने वापरण्याची फार मोठी जबाबदारीही माध्यमांवर येऊन पडते. त्या जबाबदारीचे भान ठेवून लेखणी निर्भयपणे चालवणारे पत्रकार विरळा होत चालले आहेत. विकाऊ लेखणीच्या, उथळ [आणि भंपक सुद्धा] 'झुडुपी' पत्रकारांचे तण दिवसेंदिवस माजत चालले आहे. त्याच वातावरणात राहूनही तुमच्यासारखे तरुवर दिमाखात डवरतात ही आपल्या लोकशाहीची मोठीच उपलब्धी म्हटली पाहीजे.

आर्थिक प्रश्नांबाबत लोकशाही समाजवादाच्या, डावीकडे झुकलेल्या विचारप्रणालीचा तुमच्यावर दाट प्रभाव होता. तथापि आपल्या देशात चुकीच्या पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्था राबवली जात होती त्यामुळे आर्थिक विकासाऐवजी भ्रष्टाचार आणि राजकिय दांभिकता या विषवल्लींनाच खत-पाणी मिळत असल्याचे पाहून तुम्हाला जाणवणारी खंत तुम्ही वारंवार व्यक्त करत होता. जागतिक स्तरावर, अमेरिकेत उदयाला आलेले 'रेगॅनोमिक्स', ब्रिटनमधला 'थॅचरिझम', सोव्हिएत युनियन मधे गोर्बोचेव्ह-प्रणीत 'ग्लॅसनॉस्त', त्यानंतरचे सोव्हिएत युनियनचे विघटन, बर्लिन-भिंत कोसळणे ही सगळी स्थित्यंतरे म्हणजे काही एका रात्रीत आलेले त्सुनामी नव्हते तर आधीपासूनच त्या सगळ्या वादळांचे वारे हळूहळू जोर पकडत होते, ह्याची जाणीव तुमच्या लेखनातून स्पष्टपणे प्रकट होत होती. [काही झाले तरी शेवटी तुम्ही गोविंदराव तळवलकरांच्या तालमीतले मल्ल होता!] त्या बदलांच्या मागच्या प्रेरणांची आणि कारणांची मीमांसा तुम्ही सातत्याने करू लागला होता. १९९१ मधे नरसिंहराव सरकारने 'नवे आर्थिक धोरण' जाहीर केले त्याआधीपासूनच, 'भारताला आज ना उद्या आर्थिक उदारवाद स्वीकारावा लागणार' अशी आग्रही भूमिका तुम्ही मांडू लागला होता. खरे म्हणजे हे सगळे तुमच्या मूळच्या 'डाव्या' भूमिकेपासून दूर जाणारे होते पण प्राप्त परीस्थितीचे भान तुम्हाला होते. एकदा स्वीकारलेल्या तत्वाला 'शेंडी तुटो वा पारंबी तुटो' चिकटून राहण्याचा कर्मठ दुराग्रह तुम्ही कधीच धरला नाहीत. पण म्हणून वारा येईल तशी पाठ फिरवणारे वावदूक 'विचार-वंत' किंवा पोटभरू पत्रकारही तुम्ही कधीच नव्हता. वास्तवाचा धीटपणे स्वीकार करण्याचा बौद्धिक प्रामाणिकपणा तुम्ही दाखवला होता, हे मला वाटते तुमच्या शत्रूंनाही [तुम्हाला शत्रू असलेच तर] मान्य करावे लागेल.

कित्येकदा पत्रकाराला प्रवाहाविरूद्ध पोहण्याचे साहस करावे लागते. असे साहस तुम्ही बेधडकपणे दाखवल्याचे एक आणि थोडीशी तडजोड केल्याचे एक अशी दोन उदाहरणे मला आठवतात. ज्या काळी सोनिया गांधींना कोणी गंभीरपणे घेत नव्हते, त्या काळी तुम्ही, सोनिया गांधी उद्याच्या राजकारणातील सर्वात महत्वाच्या व्यक्ति ठरणार असल्याचे भाकीत वर्तवले होते. तेंव्हा अनेकांनी भुवया ऊंचावल्या होत्या [त्यात मीही एक होतो] आणि तुमच्या काही मित्रांनी थट्टेने तुम्हाला 'सोनिया-भक्त' अशी पदवीही बहाल केली होती! पण आपल्या वि्श्लेषणाच्या आधारे बनवलेली तुमची मते तुम्ही न कचरता मांडतच राहिलात. तुम्ही खरे ठरलात आणि तुमच्या मित्रांची जिरली! मी ह्याबद्दल प्रशासनसेवेतल्या माझ्याएका मित्राजवळ तुमची तारीफ केली, तशी तो म्हणाला, 'केतकरांनी आता होराभूषण अशी उपाधी धारण करावी आणि साप्ताहिक राशी-भविष्य लिहायला लागावे!' शेवटी 'गिरा तो भी मेरी टांग उपर' ह्या प्रवृत्तीचीच माणसे जास्त भेटतात, हेच खरे.

आता दुसरे उदाहरण [जे तेवढेसे सुखद नाही]. अर्थकारणाच्या रेट्याखाली माध्यमे सवंग होत चालली आहेत [इलेक्ट्रॉनिक माध्यमांबद्दल काही बोलण्याचीच सोय उरलेली नाही.] आणि माध्यमांचे झपाट्याने क्षुल्लकी-करण [ट्रिव्हियलायझेशन] होते आहे त्याविरुद्ध पोटतिडीकेने तुम्ही बोलता पण त्या अनिष्ट प्रवृत्तींपासून 'लोकसत्ते'ला काही तुम्ही वाचवताना दिसत नाही. विशेषतः निष्कारण इंग्रजाळलेल्या, धेडगुजरी मराठी भाषेचा वापर टाळण्याबाबत तुम्ही काही ठोस पावले उचलल्याचे दिसत नाही, हे माझ्यासारख्या तुमच्या हितचिंतक मित्रांना डाचते, हेही येथे नम्रपणे नमूद केलेच पाहीजे. मुंबई विद्यापीठाने मास-मिडियाचा पदवी अभ्यास-क्रम मराठी माध्यमातून सुरू करण्यासाठी रान उठवणारी 'लोकसत्ता', मराठी माध्यमातून मराठी भाषेच्या होत असलेल्या पिछेहाटीबद्दल मात्र काही बोलताना आणि करताना का दिसत नाही या प्रश्नाला फार काळ बगल देऊन तुम्हाला चालण्यासारखे नाही.

महाराष्ट्र राज्य-स्थापनेचा सुवर्ण-महोत्सव साजरा करत असतानाच, मराठी भाषा आणि संस्कृतीच्या अनारोग्याबाबत बरीच चिंता व्यक्त केली जाते आहे. 'याचसाठी केला होता का अट्टाहास?' असे खेदाने विचारण्याची वेळ आली आहे. प्रश्न फक्त महानगरातल्या मराठी टक्क्याचा नाही [जरी तो महत्वाचा असला तरी] तर एकूणच,'मराठीपणा' च्या भवितव्याचा आहे. मराठी भाषिक स्वतंत्र राज्य झाले म्हणून मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे खरेच काही भले झाले का? असल्यास, नेमके काय झाले? काय होऊ शकले नाही? काय करता येणे शक्य आणि आवश्यक आहे? ह्या प्रश्नांचा सकारात्मक उहापोह करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मला वाटते. ह्या बाबतीत तुमच्यासारख्या पत्रकाराकडे महाराष्ट्रातली सुजाण 'सायलेंट मेजॉरिटी' मोठ्या अपेक्षेने पहाते आहे. शासनाने ह्या निमित्ताने राज्याचे 'सांस्कृतिक धोरण' जाहीर करण्याची घोषणा केली खरी पण तेवढ्यात निवडणुकांची आचार-संहिता लागू झाल्यामुळे ते धोरण काही जाहीर झाले नाही. शासनाच्या माध्यमातून होणारे विचार-मंथन काही फारसे वैभवशाली किंवा गौरवास्पद नसते. [अपवाद दोन : औद्योगिक धोरण-१९९४ आणि महिलाविषयक धोरण-१९९४]. आपल्यासारख्या विचारवंत आणि अनुभवी पत्र-पंडितांनी या कामात विधायक सहभाग घ्यावा, समविचारी मंडळींना एकत्र आणावे अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. दुसरे असे की जे काही करावयाचे ते शासनानेच करावे असे म्हणून बाकी सगळ्यांनी आपले हात झटकणे हेही अयोग्य ठरेल. निदानपक्षी माध्यमांना तरी, एका व्यासपीठावर एकत्र आणून काही ठोस उपाय-योजना शासनाकडे मांडण्याचा आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी जनमताचा रेटा उभा करण्याचा एक प्रयत्न व्यक्तिशः तुम्ही आणि तुमच्या 'एक्स्प्रेस ग्रुप' ने करावा ही विनंति.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राची संस्थात्मक बांधणी नव्याने करण्याची वेळ आली आहे. त्याबाबतही शासनापेक्षा सुजाण जनतेलाच पुढाकार घ्यावा लागेल आणि आवश्यक तेथे शासनाची सक्रीय साथ मिळवावी लागेल. उदा. अखिल भारतीय मराठी महामंडळ भंपक माणसांच्या एका कंपूच्या विळख्यात अडकले आहे, त्याची सुटका आणि पुनर्गठण करण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्रात सांस्कृतिक दडपशाही आणि दहशवतवाद माजू पहातो आहे, त्याचा वेळीच बंदोबस्त व्हायला हवा. या झुंडशाहीची झळ व्यक्तिशः तुम्हालाही बसली आहे, तशीच डॉ. आनंद यदवांनाही बसली आहे. भांडारकर संशोधन केंद्रासारख्या विश्वविख्यात संस्थेची तर जी खुले आम नासधूस झाली त्यामुळे मराठी संस्कृतीचीच अब्रू गेली. अशा घटनांचे बाबतीत तर 'गुन्हे नोंदवण्या'पलीकडे शासन काही करताना दिसतच नाही. [तत्कालीन विरोधी पक्ष-नेते असलेल्या छगन भुजबळांच्या शासकीय निवासस्थानावर झालेल्या खुनी हल्ल्याची 'केस' ही पुढे सरकलेली नाही. नंतर सरकार बदलले आणि काही काळ स्वतः भुजबळ गृहमंत्रीपदावर विराज मान झाले अगदी तरीही! ] पण समजा, जाती-पातीच्या राजकीय नफ्या-नुकसानीचा विचार थोडासा बाजूला सारून शसनाने खरेच सांस्कृतिक क्षेत्रातल्या फौजदारी गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला आणि आरोपींविरुद्ध न्यायालयापुढे आरोपपतर दाखल केले तरी तेवढ्याने ही समस्या कायमची दूर होईल का? हा प्रश्न केवळ 'कायदा आणि सुव्यवस्थे' पुरताच मर्यादित आहे की महाराष्ट्राच्या सहिष्णु सांस्कृतिक परंपरेचा आहे ? ह्या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याचे दायित्व कुणावर आहे? त्यांना आपल्यावरील जबाबदारीची जाणीव आहे का? नसेल तर ती कुणी करून द्यायची? या बाबतीतही तुम्ही पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही तुमच्याकडून आहे.

तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करत असताना आणि तुम्हाला दीर्घायुरोग्य, जय, यश, स्वास्थ्य, शांती लाभो अशा शुभेच्छा देत असताना, तुमच्या चाहत्यांच्या तुमच्याकडून असलेल्या काही अपेक्षा व्यक्त केल्यामुळे माझ्या हातून काही औचित्यभंग झाला असेल तर माफ करा पण राहवले नाही म्हणून लिहिले. असो.

पत्रकारितेचे जग धकाधकीचे असते. दररोज 'डेड-लाईन' शी दोन हात करावे लागतात, रोज ऊठून नव्या समस्या उद्भभवतात. असे असताही वैयक्तिक आवडी-निवडी, छंद जोपासण्यासाठी आणि मित्र-मंडळींच्या गोतावळ्यात 'रिलॅक्स' होण्यासाठी तुम्ही कसा काय वेळ काढता ते तुमचे तुम्हालाच माहीत. ललित-साहित्य, विशेषतः काव्य, चित्रकला आणि छायचित्रकला [अगदी अक्षर-लेखन कलाही], संगीत, वेचक नाटके आणि चित्रपट या सगळ्यांचा आस्वाद तुम्ही रसिकतेने घेता आणि तुमची 'टेस्ट' अतिशय छान विकसित झालेली आहे, तिला आधुनिकतेचा स्पर्श झालेला आहे, एव्हढेच नव्हे तर तुमच्या व्यक्तिमत्वाला त्यामुळे एक शीतल, सुखद आणि मोहक परिमाण लाभलेले आहे. ऊठ-सूट भाषणबाजी करणे तुम्हाला साफ ना-मंजूर असते पण जेंव्हा तुम्ही बोलता तेंव्हा ते अगदी मनापासून, मोजकेच पण सडेतोड्पणे बोलता आणि त्यात इतरांपेक्षा वेगळा, असा खास तुमचा 'कुमार-अ‍ॅंगल' असतो !

एका बाबतीत तुम्ही विलक्षण सुदैवी आहात. तुम्हाला शारदाबाईंची समजूतदार आणि प्रगल्भ साथ लाभली आहे. तुम्ही ईश्वरवादी नाही हे मला माहीत आहे पण एव्हढा एक अपवाद करून, तुम्ही त्याबद्दल ईश्वराचे आभार मानायला हरकत नसावी! तुमच्यासोबत शरदाबाईंचेही अभिनंदन करायला हवे कारण तुमच्या यशात त्यांचाही बरोबरीचा वाटा आहे!

कळावे. लो.अ.ही. वि.

बापू करंदीकर

गुलमोहर: 

छान लिहिलं पत्र, पाठवून द्या.

आजवर मायबोलिवर मी कुमार केतकरांबद्दल चांगले कधीच वाचले नाही. तुमच्या पत्रातून मात्र त्यांच्याबद्दल सर्वच चांगले वाचण्यात आले.

आजवर मायबोलिवर मी कुमार केतकरांबद्दल चांगले कधीच वाचले नाही >>> अगदी अगदी मी पण बी
पण छान लिहीलयत पत्र

आजवर मायबोलिवर मी कुमार केतकरांबद्दल चांगले कधीच वाचले नाही >>> अगदी अगदी>>>

मी तर शेवटी काहीतरी उपहासत्मक असेल म्हणुन वाचत होतो....

प्रतिक्रीया देणार्‍या सर्वांना धन्यवाद! पण मला एक कळलं नाही, मा.बो. वर यापूर्वी कुमार केतकरांवर सडकून टीका करणारं काही प्रसिद्ध झालं होतं का? काही महीन्यांपूर्वी मीच मा.बो. वर 'गुड बाय टु यु लोकसत्ता' या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता आणि लोकसत्तेमधल्या इंग्रजाळलेल्या मराठीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर किंवा पूर्वी कुमारवर टीका करणारं काही आलं असल्यास निदान माझ्यातरी वाचनात आलं नाहीय. त्यामुळे माझ्या लेखामुळे काही मा.बो. करांना अपेक्षाभंग झाल्यासारखं का वाटलं ते मला समजलं नाही.
ते असो पण तेंव्हाची माझी टीका व्यक्तिशः केतकरांवर नव्हती आणि माझ्या 'त्या' लेखात मांडलेली माझी मतं आजही तीच, तशीच आहेत. मी लोकसत्ता घ्यायचं बंद केलंय पण कुमारचे अग्रलेख इ-लोकसत्त्तामधे जरूर वाचतो. एक पत्रकार म्हणून आणि एक मित्र म्हणून कुमारबद्दल मला वाटणारा आदर आणि प्रेम आजही कायम आहे. त्यामुळे मला जे मनापासून वाटलं तेच मी 'अनावृत्त' पत्रांत लिहिलं आहे.
-बापू करंदीकर.

पत्र आवडलं. मलाही निवांत पाटलांसारखंच वाटत होतं सुरुवातीला. Happy
बापू, लेख असा नाही, पण घडमोडींवर चर्चा होतात तिथे सहसा लोक टीकाच करतात त्यांच्यावर.

मी तर शेवटी काहीतरी उपहासत्मक असेल म्हणुन वाचत होतो >> Lol

बापू तुमचे पत्र आवडले. Happy एकेकाळी लोकसत्ताबद्दल मलाही फार जवळीक वाटायची.

पण सुमारराव आणि आम्ही वक्री आहोत त्यामूळे टिका केली जातेच. बाकी लोकसत्तात काही दम राहीला नाही, ह्या अधोगतीला सुमाररावच जबाबदार ! शिवाय चांगला अग्रलेख अन लोकसत्ता हे कॉम्बीनेशन गेले कित्येक वर्षे नाहीये. अग्रलेखातूनही लोटांगन घातल्याशिवाय केतकरांना पुढे जाता येत नाही.

बापू तुमचे पत्र छानच आहे..:)
पण एकंदर कुमार केतकरांचे जे लेखन माझ्या वाचनात आलय त्यावरून ते अन्बायस्ड नाही वाटले मला कधी. अर्थात हे माझं मत. मी केदारच्या मताशी थोडाफार सहमत आहे की लोकसत्ताची लोकप्रीयता कुमार केतकर संपादक झाल्यावर कमी झाली, त्याला कारणंही बरीच असतिल. आम्ही तर केवळ लोकमुद्रासाठी रविवार लोकसत्ता घेतो आता.
खप वाढला म्हणजे लोकप्रीयता वाढली असे म्हणता येत नाही, कारण खप सगळयाच वर्तमानपत्रांचा वाढला आहे.

बापू, कुमारांचे 'पाप' म्हणजे ते इन्दिराजींचे समर्थक आहेत. सोनियांची ते बलस्थाने पटवून देतात. केतकर हे सर्व धर्म समभावाचा पुरस्कार करतात. काँग्रेसचे ते समर्थक आहेत. ते सोनियाचे व गांधी घराण्याचे भाट आहेत .एका विशिष्ट पक्षाविरुद्ध ते लिहितात. (ते कॉन्ग्रेसविरुद्ध ही लिहितात पण अशा गोष्टीकडे मुद्दाम दुर्लक्ष करायचे असते ना...:)) या सर्वांचा विरोध करणारा एक गट आहे. तो विरोध नोंदवण्याची त्यांची त्यांच्या 'संघटना'नी केलेल्या संस्कारानुसार एक खास पद्धत आहे. आता ही मंडळी कोणत्या 'ग्रुप'ची असतील हे लक्षात येण्याइतके सूज्ञ तुम्ही आहातच. केतकरानी 'आज सूर्य पूर्वेला उगवला ' असे विधान केले तरी ते त्यानी नक्कीच सोनियाना खूष करण्यासाठी केले आहे असा कांगावा सुरू केला जातो. कारण केतकराना राज्यसभेवर जायचे आहे असाही एक जावईशोध आहे. तुम्ही इथे तुरळक येता अन्यथा 'जपानी अर्थव्यवस्थेवर इथियोपिअन लोक्संगीताचा परिणाम' या बीबी वर सुद्धा तुम्हाला केतकरांवर झोड उठविलेली दिसली असती....

<<आजवर मायबोलिवर मी कुमार केतकरांबद्दल चांगले कधीच वाचले नाही>>
अनुमोदन.
<<कुमारांचे 'पाप' म्हणजे ते इन्दिराजींचे समर्थक आहेत. सोनियांची ते बलस्थाने पटवून देतात. केतकर हे सर्व धर्म समभावाचा पुरस्कार करतात. काँग्रेसचे ते समर्थक आहेत. ते सोनियाचे व गांधी घराण्याचे भाट आहेत .एका विशिष्ट पक्षाविरुद्ध ते लिहितात.>>
असेच, पण जरा कुत्सितपणे, derogatory लिहीलेले. शिवाय टीका कुणालाच आवडत नाही, म्हणून कुणी टीका केली की टीकाकारालाच वाईट ठरवायचे ही एक जगन्मान्य पद्धतच आहे.

इथे अमेरिकेत तर एक गंमतच चालू झाली आहे. म्हणजे प्रे. ओबामाने जे म्हंटलेच नाही ते सुद्धा "'तो ते म्हणू शकेल' याबद्दल माझी खात्री आहे म्हणून मी 'तो तसे म्हणालाच' असेच म्हणणार!" असा प्रचार रश लिंबॉ करत आहे!

त्यातून नुसतेच अळणी सत्य सांगण्यात काय गंमत आहे? त्याने वर्तमानपत्रे खपत नाहीत. म्हणून जरा मालमसाला, तिखट मीठ घालतातच सगळे. कुणाला नावडतीचे मीठ अळणी लागते ते मग ती बाई बिचारी नावडती होते.

देवदत्त, रॉबीन्हूड आणि झक्की,
या तीनही [आणि त्यापूर्वीच्याही काही] प्रतिक्रिया वाचल्यानंतर मी चांगलाच बुचकळ्यांत पडलो आहे!

'केतकरांबद्दल तुम्ही लिहिले आहे ते काही पटले नाही बुवा!' अशी प्रतिक्रिया मी समजू शकतो. 'केतकर हे काही भालेराव पुरस्कार मिळण्यास पात्र पत्रकार नाहीत' असं कुणाचं मत असल्यास मला त्यावरही काही म्हणायचं नाही कारण प्रत्येकाच्या आवडी निवडी वेग़ळ्या असू शकतात. 'पण केतकर इंदिरा आणि सोनिया समर्थक आहेत हेच त्यांचे पाप'. म्हणजे नक्की काय? ही व्याजोक्ती म्हणायची का सरळ शब्दार्थ घ्यायचा?

अलीकडेच लोकसभेच्या आणि नंतर तीन राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. सगळीकडे काँग्रेसला बहुमत मिळालं. याचा अर्थ असा होतो का, की भारतात 'पापी' लोकांची बेसुमार पैदास होते आहे? शेवटी, जे लोक मतदान करायला बाहेर पडतात त्यापैकी बहुसंख्य लोक 'दगडापेक्षा वीट मऊ' असाच विचार करून मतदान करतात [असा माझा तरी समज आहे]. जे लोक मतदानाला जाण्याऐवजी एका अनायसे मिळालेल्या सुट्टीचा आनंद उपभोगतात त्यांच्या बद्दल काय बोलणार ?

केतकर आंधळेपणानं काँग्रेसचं समर्थन करतात असं मला तरी कधी वाटलं नाही. वेळ येईल तेंव्हा काँग्रेसवर किंवा त्या पक्षाच्या सरकारांवर केतकर सडकून टीका करतातच की! अगदी परवाच्या महाराष्ट्रातल्या निवडणुक-निकालांवर भाष्य करताना एका टी.व्ही. चॅनेलवर हेच केतकर म्हणाले होते की, 'काँग्रेस-प्रणीत आघाडीचा विजय म्हणजे परीक्षेत एखाद्या विद्यार्थ्यानं काठावर पास होण्यासारखं आहे. आघाडी सरकार आधीच शेफारून गेलेलं होतं पण तरीही लोकांनी त्यांनाच परत निवडून दिलं. आता पुन्हा पाच वर्षं राज्य करायला मिळाल्यावर ते आणखीनच शेफारून जाण्याची शक्यता आहे! त्यांनी वेळीच सावध झालेलं बरं.' दुसर्‍या दिवशीच्या लोकसत्तेतही त्यांनी असाच सूर लावला होता.

'जन हो, सोनिया गांधींच्याच हातात देश सोपवा' असा, प्रचारकी थाटाचा उपदेश तेंव्हाही केतकरांनी केला नव्हता, तर 'सोनिया गांधी भविष्य काळात भारताच्या राजकारणातली सर्वात महत्वाची व्यक्ति ठरतील' असं मत त्यांनी नोंदवलं होतं आणि त्यामागची कारण-मीमांसाही सविस्तर मांडली होती. कोणाला ती पटली असेल अगर नसेल किंवा 'केतकरांचा हा होरा चुकणार बरं का' असंही बर्‍याच जणांना वाटलं असेल [त्यापैकी मीसुद्धा एक होतो, हेही मी स्पष्ट केलं आहे!] पुढे खरोखरच सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाचं सुकाणू हाती घेतलं आणि बघता बघता जनाधारही मिळवला. शेवटी केतकरांच 'अ‍ॅनॅलिसिस' अचूक निघालं. हे सगळं कसं नाकारणार? एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांना 'त्या'वेळी झालेलं परिस्थितीचं आकलन [रीडींग] यथायोग्यच नव्हतं का? म्हणूनच तर मी खुल्या दिलानं त्यांच्या नावची पावती फाडली. व्यक्तिशः मी सोनिया गांधींचा समर्थक झालो आहे [किंवा होतो का] अथवा नाही हा प्रश्नच उपस्थित होत नाही कारण मी त्याबाबतीतली माझी कोणतीच मतं मतं मांडलेली नाहीत. मुद्दा फक्त केतकरांच्या पत्रकारितेचा होता आणि तेवढ्यापुरताच मी त्या विषयाला हात घातला होता.

असो.मला जसं काही प्रतिक्रियांनी बुचकळ्यात पाडलं तसं, माझं विवेचनही वाचकांना सुस्पष्ट न वाटल्याची शक्यता मला मान्यच आहे.

बापू करंदीकर

बापू, हूड उपहासात्मक बोलताहेत. तुम्हांला पाठिंबा नाही म्हणता येणार, पण जे केतकरांवर टीका करतात त्यांच्यासाठी ते उत्तर आहे.
देवदत्त सरळ सरळ तुमचा लेख पटला नाही असेच म्हणतोय की Happy

राहता राहिले झक्की... त्यांच्याविषयी फक्त तेच सांगू शकतील Proud

चुकीची दुरुस्ती

माझ्या लेखाच्या शीर्षकात 'अनावृत्त' असा शब्द वापरला आहे, तो 'अनावृत' असा असायला हवा हे एका अज्ञात मा.बो. करांनी मला इ-मेल वरून कळवलं. मी त्यांचा आभारी आहे. आता ती चूक दुरुस्त होऊ शकत नाही पण निदान कबूल करायलाच हवी.

-बापू.

माझे म्हणणे: मी मायबोलीवर केतकरांविषयी बरीच टीका वाचली आहे. त्यातून माझा असा समज झाला आहे की ते सोनिया नि काँग्रेसचे फार मोठ्या प्रमाणावर समर्थक आहेत. अगदी अंधश्रद्धा आहे त्यांची तशी. त्यांचे हे लिहीणे इथल्या बर्‍याच लोकांना आवडत नाही. विशेषतः मोदी, गोध्रा,मुस्लिम अतिरेकी इ. विषयांवरील. म्हणून मग केतकरांनाच नावे ठेवली जातात. तेच मी वाचतो.
तुमचे पत्र वाचून मला खरे तर शंकाच यायला लागली की तुम्हीपण हे उपहासात्मक लिहीत आहात कि काय?

मी इथल्या परिस्थितीबद्दल लिहीले याचे कारण असे की आजकाल, "सर्व मुसलमान अतिरेक्यांना सोडून देऊन त्यांचा सन्मान करा " असे केतकर जरी म्हणाले नसतील, तरी माझ्या मते ते तसे कदाचित् म्हणतीलहि' असे म्हणून तसा प्रचार करायचा हे निदान इथे तरी चालू आहे.

बापू करंदीकर,
तुम्ही तुमच्या लेखनात संपादन करून केव्हाही बदल करू शकता.

इथले काही प्रतिसाद "शब्दाचे योग्य रूप कोणते?" या धाग्यावर हलवले आहेत