टेलीमार्केटिंगचा उच्छाद थांबवण्यासाठी कायदा असावा का????

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 5 October, 2017 - 06:15

मी 'रिलायन्स' आणि 'जिओ' अशा दोन कंपन्यांचे क्रमांक वापरतो. माझे दोन्ही क्रमांक DND (Do Not Disturb) मध्ये '0' (कोणत्याही प्रकारचे कॉल्स वा संदेश नको) या पर्यायासाहित नोंदणीकृत आहेत. http://www.nccptrai.gov.in/nccpregistry/search.misc या लिंकवर जाऊन पहिले असता माझे दोन्ही क्रमांक DND मध्ये यशस्वीरीत्या नोंदणीकृत झाल्याचे दिसत आहे.

असे असले तरीही गेल्या काही महिन्यांपासून मला माझ्या 'जिओ' च्या क्रमांकावर दिल्लीस्थित निरनिराळ्या (Expert Ayurveda, Ashvashakti, Herb On Natural, Efact Ayurveda, Green Gold Coffee (Banglore)) कंपन्यांकडून Weight Loss treatment चे संदेश येत आहेत. बरे एकदाच एखादा संदेश आला असता तर सोडून देता आले असते, मात्र हे लोक एकच संदेश अगदी न चुकता दररोज पाठवत आहेत. यापैकी Expert Ayurveda आणि Green Gold Coffee यांच्याशी आधी फोनवरून खूप वाद घालून, मग Registered AD ने पत्र पाठवून त्यांचे संदेश बंद करायला लावले. परंतु या कंपन्यांचे संदेश बंद होत नाहीत तोच अन्य कंपन्यांनी (Ashvashakti, Herb On Natural, E-fact) संदेश पाठवणे सुरु केले.

हे कमी की काय म्हणून माझ्या 'रिलायन्स'च्या क्रमांकावर मी 'न मागताही' शेअर मार्केटच्या टिप्सचे संदेश येत आहेत. हे प्रकरण तर आणखी त्रासदायक आहे, कारण वर उल्लेखलेले Weight Loss चे संदेश दिवसातून एकदाच येतात, मात्र हे शेअर मार्केटचे संदेश तर वेगवेगळ्या हेडरवरून दिवसातून काही तासात (शेअर मार्केट सुरु होण्याच्या अर्धा तास आधी ते मार्केट बंद झाल्यानंतर अर्धा तास नंतर) अनेक वेळा येत राहतात. हे संदेश कुठून येतात हे कळत नसल्यामुळे ते बंद करण्याविषयी कोणाला सांगावे, हेही कळत नाही.

परवा तर गोरेगावमधील 'मंगलम मोटर्स' मधील 'रजनीश पांडे' नावाच्या माणसाने थेट मला कॉल करून "गाडी घ्यायची आहे का?" असे विचारले. वास्तविक मी अंधेरीला राहत असल्याने गोरेगावमधील शोरूममध्ये चौकशी करण्याचा प्रश्नच नाही.

या सर्व त्रासाविषयी मी 'जिओ' आणि 'रिलायन्स' या दोन्ही service provider शी पत्रव्यवहार केला आहे. याच पत्राची एक एक प्रत TRAI (Telecom Regularity Authority of India) ला पाठवली. त्यापैकी TRAI ने जे उत्तर पाठवले त्यात कायदेशीर भाषा असल्यामुळे विशेष काहीही कळले नाही. 'जिओ' व 'रिलायन्स' यांच्याकडून काहीही उत्तर आलेले नाही.

तर या सर्व त्रासापासून 'कायमची' मुक्तता कशी मिळवावी? जिथून संदेश येतात ते नंबर्स ब्लॉक केले तरीही दररोज वेगवेगळ्या क्रमांकावरून संदेश येत असल्याने त्याचा काहीही उपयोग होत नाही. दिवसातून किमान १२-१५ वेळा सतत फोन वाजत राहिल्याने कामात लक्ष लागत नाही. (फोन silent वर ठेवू शकत नाही, कारण महत्वाचे कॉल्स miss होऊ शकतात. शिवाय फोन silent ठेवला तरीही फोनमध्ये नको असलेल्या संदेशांचा कचरा जमा होतच जाणार.)

या टेलीमार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांवर निर्बंध आणण्यासाठी एखादा कठोर कायदा सरकारने तयार करावा, असे आपल्याला वाटते का? सरकारने असा एखादा कायदा तयार करायचे ठरवल्यास त्यात कोणकोणत्या तरतुदी असाव्यात असे आपल्याला वाटते?
मला सुचलेले काही मुद्दे व त्यांचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे:
१. सध्या अस्तित्वात असलेले व नवीन सुरु होणारे सर्व मोबाईल क्रमांक हे by default DND (Do Not Disturb) मध्ये '0' या पर्यायासहित नोंदणीकृत व्हावेत.
स्पष्टीकरण : अशी मागणी करण्याचे कारण की आपला भ्रमणध्वनी क्रमांक DND मध्ये नोंदणी करून मार्केटिंगच्या कॉल्स, sms पासून सुटका मिळवता येते, ही गोष्टच अनेकांना माहित नाही. काहींना माहित आहे पण DND मध्ये नोंदणी कशी करायची हे त्यांना माहित नाही.

२. जर एखाद्या ग्राहकाला एखाद्या प्रकारचे (Health, Banking, Education, Real Estate) किंवा सर्वच प्रकारचे मार्केटिंग संदेश प्राप्त करण्याची इच्छा असेल म्हणजेच DND बंद करण्याची इच्छा असेल तर अशा ग्राहकाकडून स्वहस्ताक्षरात 'लेखी' पत्र मिळाल्याशिवाय DND बंद करण्यात येऊ नये.
स्पष्टीकरण : 'लेखी' पत्राची अट यासाठी कारण उद्या telecom operators नवीन सिम घेताना भरायच्या फॉर्ममध्येच कुठेतरी 'DND बंद करायचे आहे' अशा अर्थाचे एखादे वाक्य छापून ठेवतील किंवा त्या फॉर्मसोबत आणखी एखादा प्रिंटेड फॉर्म (ज्यावर DND बंद करायचे आहे असे छापलेले असेल) देऊन त्यावर स्वाक्षरी घेतील. त्यामुळे ज्यांना DND बंद करायचे असेल त्यांच्या स्वहस्ताक्षरात लेखी अर्ज द्यायला सांगणे हा उत्तम मार्ग आहे. यामुळे अशिक्षित लोकांना कोणतीही अडचण येणार नाही, कारण ज्याला लिहिता-वाचताच येत नाही, असे लोक मोबाईलवर आलेले जाहिरातीचे संदेश वाचण्याचा प्रश्नच नाही!

३. ज्याप्रमाणे औषधांच्या दुकानात फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे, त्याचप्रमाणे टेलीमार्केटिंग करणाऱ्या, sms broadcasting करणाऱ्यांना कंपन्यांना त्यांच्याकडे असलेला मोबाईल क्रमांकाचा database तपासून त्यातील DND नोंदणीकृत क्रमांक काढून टाकण्यासाठी एखादी वेगळी (dedicated) व्यक्ती असावी. येथे या व्यक्तींची संख्या त्या कंपनीकडे असलेल्या मोबाईल क्रमांकांच्या database वर अवलंबून असेल. जितका database मोठा, तितक्या जास्त व्यक्ती. यांना database सतत तपासत राहून त्यातील DND नोंदणीकृत क्रमांक वगळत राहणे हेच काम असेल. जर त्या कंपनीकडून DND नोंदणीकृत क्रमांकाला संदेश वा कॉल गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी या व्यक्तींची असेल.

४. एखाद्या टेलीमार्केटिंग, sms broadcasting करणाऱ्या कंपनीकडून वारंवार DND नोंदणीकृत क्रमांकाला संदेश, कॉल्स करण्याचे प्रकार घडत असेल तर सुरवातीस प्रती कॉल, प्रती sms मोठ्या रकमेचा दंड ठोठावण्यात यावा. तरीही त्यांनी DND नोंदणीकृत क्रमांकाला संदेश / कॉल करणे बंद न केल्यास त्या कंपनीचा व्यवसाय करण्याचा परवाना रद्द करणे. एखादी कंपनी विनापरवाना असा व्यवसाय करत असेल तर त्यांची सर्व संपत्ती सरकारी तिजोरीत जमा करणे. तरीही अशा कंपन्यांचे वर्तन न सुधारल्यास कंपनीच्या मालकास किमान ५ वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेची कायद्यात तरतूद असावी.

५. कोणत्याही मार्केटिंग मेसेजमध्ये कोणत्या कंपनीची जाहिरात आहे, याव्यतिरिक्त कोणत्या sms broadcaster ने पाठवला आहे त्यांचेही contact details असावेत. उदा. Buy luxurious 3BHK flat @ 1.99Cr in Versova........ Sent by ABC Telemarketing, contact 98********

सध्यातरी मला एवढे मुद्दे सुचले आहेत, आपल्याला काही सुचल्यास कृपया भर घालावी. काही काळाने या विषयी 'दूरसंचार मंत्री श्री. मनोज सिन्हा' यांना पत्र पाठवायचा विचार आहे.

तळटीप : १. 'मार्केटिंग कंपनीमध्ये काम करणारे स्वतःच्या पोटासाठीच काम करतात' वगैरे छाप सल्ले नको आहेत. ते जरी त्यांच्या पोटासाठी काम करत असले तरीही त्यांना दुसऱ्यांचे कान खाण्याचा काहीही अधिकार नाही.
२. 'येणाऱ्या संदेशांकडे दुर्लक्ष करा व रविवारी वा सुट्टीच्या दिवशी ते संदेश डिलीट करा' असे सल्लेही नको आहेत. मुळात मोबाईल ही माझी वैयक्तिक वापराची वस्तू आहे. तो सार्वजनिक कचऱ्याचा डबा नाही, ज्यात कोणीही मार्केटिंगच्या संदेशांचा कचरा टाकत जावे! मुळात आपल्या मोबाईलमध्ये या मार्केटिंग कंपन्या संदेशांच्या रूपाने घुसखोरी करत आहेत, ही भावनाच त्रासदायक आहे.
(काही महिन्यापूर्वीच मा. सर्वोच्च न्यायालयाने 'आधार कार्ड' साठी नागरिकांचे बोटांचे ठसे, डोळ्यांच्या प्रतिमा (retina) घेणे हा प्रायव्हसीचा भंग आहे असे सांगितले होते. मग माझ्या मोबाईलमध्ये माझ्या इच्छेविरुद्ध येणारे मार्केटिंगचे संदेश हा माझ्या प्रायव्हसीचा भंग ठरत नाही का?)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व उपाय करुनही तुम्हाला असे कॉल मेसेज येत असतील तर विचित्र आहे बुवा.... मागच्या पंधरा वर्षात मी किमान सहा ते आठ नंबर घेतले, पण कधीही असा त्रास झालेला नाहीये. एकदा डीनडी केलं की कॉल वगैरे सर्व बंद होतात. डीएनडी करुनही मार्केटींग कॉल सुरु आहेत हे स्पेशल आहे.

(काही महिन्यापूर्वीच मा. सर्वोच्च न्यायालयाने 'आधार कार्ड' साठी नागरिकांचे बोटांचे ठसे, डोळ्यांच्या प्रतिमा (retina) घेणे हा प्रायव्हसीचा भंग आहे असे सांगितले होते. मग माझ्या मोबाईलमध्ये माझ्या इच्छेविरुद्ध येणारे मार्केटिंगचे संदेश हा माझ्या प्रायव्हसीचा भंग ठरत नाही का? +111 सहमत
मी पुर्वी पोस्ट्पेड वापरायचो डोकोमो च सहा महिन्यानंतर मुळ प्लान बदलुन डोकोमो ने दुसरा प्लान एक मेसेज पाठ्वुन ऐक्टिवेट केला त्याबद्दल कंपनीला विचारल असता कंपनी म्हणते तुम्ही मेसेज वाचायला नको होता. तीन महिने दखल घेतली नाही म्हणुन मी सिमकार्ड वापरायच बंद केल. त्याच १२०० रु बिल पेंडिंग आहे. त्यासाठी एका वकिलाकडुन कंपनीने नोटिस हि पाठवली आहे.

माझ्या नंबरवर शेयर मार्केटच्या फसव्या टीप्स येत असतात. असे मेसेज पाठवणार्‍याचा नंबर कळत नाही, त्या ऐवजी MD-HSFCBN
AD-ICISHR असे संकेतांक असतात.
याविषयी काही करता येईल काय?

राहुल१२३, मला सुद्धा हाच त्रास आहे. मी येत्या १-२ दिवसात SEBI ला पत्र पाठवणार आहे. त्याचा मसुदा हवा असल्यास आपल्याला देईन.
रच्याक, त्या संदेशांमध्ये Funny Software Ltd. किंवा Alora Trading Company चे शेअर्स खरेदी करायला सांगितलेले असतात का? प्लीज कन्फर्म करून सांगाल का???

रच्याक, त्या संदेशांमध्ये Funny Software Ltd. किंवा Alora Trading Company चे शेअर्स खरेदी करायला सांगितलेले असतात का? प्लीज कन्फर्म करून सांगाल का???>>>>>>>>>>
हो फनी सॉफ्टवेअरच्या जहिरातिंनी उच्छाद मांडला आहे. त्या आधी कंम्फर्ट कॉमोट्रेड च्या यायच्या.

ह्या जहिराती पाठवणारे चोर AD-HDFSEC Or AD-ICISEC अश्या नावानी पाठवतात, म्हणजे वाटेल की आयसीआयसीआय किंवा एचडीएफसी कडुन आले आहेत.
हे मेसेज पाठवणारे ब्लॉक पण करण्याची सोय नाहिये मोबाइल मधे.
जे बिल्डर, वेटलॉस वाले मोबाइल नंबर नी मेसेज पाठवतात ते नंबर मी ब्लॉक केले आहेत. पण ह्या साठी काहीतरी उपाय सुचवा.

त्या आधी कंम्फर्ट कॉमोट्रेड च्या यायच्या.>>>>>> +११११११११११

मला तर असे वाटते की, Funny Software Ltd, Alora Trading Company, Commtrade या टीनपाट कंपन्या असाव्यात. (शेअर मार्केटमध्ये कशा काय लिस्ट झाल्या देव जाणे!) यांच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये कोणीही गुंतवणूक करत नसेल. म्हणून यांनी sms broadcast करणाऱ्या कंपन्यांना contract देउन अशा फसव्या टिप्स द्यायला सांगितले असेल!
आपले काय मत आहे याबद्दल?

कारण मी Nirmal Bang, Epicresearch आदींना जाब विचारला असता त्यांनी सांगितले की हे fraud मेसेज आहेत, आम्ही पाठवत नाही. Epicresearch ने तर पोलीस तक्रार दाखल केली आहे व त्याची प्रतही मला द्यायची तयारी दाखवली. तेव्हा कुठे माझा त्यांच्यावर विश्वास बसला.

आणखी एक महत्वाचे: आजच मला रिलायन्सच्या नंबर वर 'ज्योतिष जानिये पंडितजीसे' छाप संदेश आला. अशा मेसेज पाठवणाऱ्या कंपनीवर व ते न रोखणाऱ्या रिलायन्सवर 'महाराष्ट्र जादूटोणा कायद्यान्वये' तक्रार दाखल करता येईल का?

अहो वि मु, तुम्ही खोटं बोलताय हे म्हटलंच नाहीये मी. डीएनडी मध्ये असून असे होते याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. तुमचा नंबर कोण्या तरी फ्रॉडस्टरच्या लिस्टमध्ये गेला आहे व तिथून तुम्हाला हे सगळे कॉल-मेसेज येत अस्णार.

आठवा तुम्ही कोणाला मॉलमध्ये, पेट्रोलपंप किंव तत्सम ठिकाणी, लकी ड्रॉ साठी, वेबसाईटवर मोबाइल नंबर दिला होतात का? असे इल्लिगली कॉल मेसेज करणारे लोक इथून डेटा कलेक्ट करतात. त्यांच्यावर कोणाचेही कायदेशीर नियंत्रण नसते. कोण्या इन्डिविज्युअल माणसाने तुमचा नंबर घेऊन त्रास देण्यासारखे आहे हे. ह्यात तुम्ही ट्राय किंवा सर्विसप्रोवायडर यांच्याकडे कितीही माथेफोड केली तरी हे कॉल्स थांबणार नाहीत. कारण हे कॉल्स ऑथोराइज्ड अ‍ॅडवर्टायजर्सकडून येत नाहीयेत. एकदा जरी कोण्या अनधिकृत व्यक्ती वा संस्थेकडे तुमचा नंबर गेला तर तुमचे प्रोफाइल तयार होऊन, साधारण आर्थिक पत व वय , बघून तुमचा नंबर अनेक अनधिकृत घटकांकडे विकला जातो. मग असे कॉल्स सुरु होतात.

---------------

त्यासाठी खबरदारी म्हणून आपला नंबर कोणाही अनोळखी व्यक्तीला, ऑनलाइनवर अनधिकृत साईटवर कशासाठीही अजिबात देऊ नये. बरेच ठिकाणी आपले विजिटींग कार्ड टाकायची पद्धत असते, असे अजिबात करु नये. विजिटींग कार्ड हे विवक्षित व्यक्तीच्या हातीच दिले जावेत. अगदी हॉटेलात गेल्यावर फीडबॅक फॉर्मवर आपला नंबर लिहू नये. डिस्पोजेबल इमेल आयडी द्यावा.

After opening spam messages, on right hand top corner click --+]]]] people and &options click -----block the sender.

Check if you have this option in your phone.
Just blocked dmbiba and immediately got sms from amblustn blocked that too.

Hope it helps!

मलाही हा त्रास बराच होतो. आणि हे नंबर्स ब्लॉक सुद्धा होत नाहीत. एवढे हजारो लाखो मेसेज मी आजवर उडवायचीही तसदी घेतली नाहीये. मुळात मोबाईलमध्ये मेसेज बॉक्स नावाचा काही प्रकार असतो हेच मी विसरून गेलोय. अगदी बॅंकेची कामे करतानाही जेव्हा ओटीपी येतो तेव्हा त्याचे वर स्क्रीनवरच नोटीफिकेशन येते तिथेच वाचून घेतो. बाकी माझ्यासाठी व्हॉटसप हेच जीवन उरलेय. माय मरो आणि मावशी जगो त्यातली गत झालीय. पण मला नाही वाटत आता या माईला जगवायला काही कायदा निघेल. झेलणे ईतकेच आपल्या नशिबी आहे.

नाना,
डीएनडी रजिस्टर्ड नंबरला मेसेज येणे, हे चुकीचे आहे. तसा कॉल/मेसेज आल्यास पाठविणार्‍यावर ट्राय व संबंधित मोबाईल कंपनीने कारवाई करणे अपेक्षित आहे.
यांनी कंपनीस / ट्राय कडे तक्रार केलेली आहेच.
माझे सर्व नंबर डीएनडी रजिस्टर्ड असतात, सर्व तक्रारी करूनही फनी सॉफ्टवेअर मेसेज मलाही येत आहेत.

आरारा, समजले नाही. मोबाईलमधील मेसेज झेलणे आणि सरकार झेलणे या दोन गोष्टीत कमालीचा फरक नाही का? नोकरी जातेय तर जाऊ दे, दुसरी मिळेल, पण छोकरी जातेय तर जाऊ दे असे कोणी म्हणेल का? Happy

मला पहिला वैताग यायचा, पण मी नंतर मोबाईलला मेसेज बॉक्स आहे हेच विसरून गेल्याने आता काहीही त्रास होत नाही.
अर्थात हा काही उपाय नाही झाला हे मान्य. मी ते कोणाला सुचवतही नाहीये. फक्त स्वानुभवकथन केले ईतकेच ..

कायदा कसा नि काय करायचा? समजा कायदा केला नि No call and SMS हे अ‍ॅक्टिव्ह केले नि तरी कुणि कॉल किंवा एसेमेस केलाच तर तुम्ही फार तर तक्रार कराल, सरकारकडे, पण अश्या अनेक तक्रारी आल्यातरी त्या सर्वांची डिटेल चौकशी करावी लागेल की जेंव्हा कॉल केला होता तेंव्हा No call and SMS हे अ‍ॅक्टिव्ह होते की नव्हते? आणि अश्या प्रत्येक केसची चौकशी झाल्यावर जर पुरेसा पुरावा मिळाला तरच काहीतरी कायदा करू शकेल - म्हणजे तुमची केस दाखल करून घेईल. मग बसा वाट बघत केंव्हा निकाल लागतो ते.

आणि ही चौकशी होईस्तवर ती कंपनी दिवाळ्यात निघालेली असेल तर?
आमच्याकडे तर धमालच आहे - डू नॉट कॉल लिस्टवर असूनहि, चॅरिटीज ना कॉल करायला परवानगी आहे म्हणे, मग काय, हार्ट रिसर्च, कॅन्सर रिसर्च, आणखी काय वाट्टेल ती चॅरिटी काढून कॉल करतच रहातात. कॉलर आय डी बघून फोन उचललाच नाही तर सतत कॉल येत रहातात. फोनवर सांगितले की इथे फोन करू नका तर काही दिवस ते बंद होते.
म्हणून आम्ही फार क्वचित फोन उचलतो, कॉलर आय डी वर ओळखीचा नंबर दिसला किंवा कुणाचा कॉल एक्स्पेक्टेड असला तरच घेतो नाहीतर जाऊ दे अ‍ॅन्सरिंग मशीन वर!

>>आमच्याकडे तर धमालच आहे<<
लँडलाइन बंद करुन तोच नंबर सेलुलरवर पोर्ट केल्यासासुन हा त्रास कमी आहे; फोनबुकमध्ये नंबर नसल्यामुळे असेल कदाचीत...

>))आठवा तुम्ही कोणाला मॉलमध्ये, पेट्रोलपंप किंव तत्सम ठिकाणी, लकी ड्रॉ साठी, वेबसाईटवर मोबाइल नंबर दिला होतात का? असे इल्लिगली कॉल मेसेज करणारे लोक इथून डेटा कलेक्ट करतात. )))))

अगदी बरोबर. आमच्या सर्व कार्डाडाची DND चालतात परंतू एका प्रदर्शनात ईमेल दिलेला त्यांंचे मेल येतात.

True Caller इन्स्टॉल करून घ्या. खूप उपयोग होतो. ते स्पॅमर कॉल नोटिफिकेशन दाखवते. आपण सेटिंग केले तर स्पॅमर्स् automatically ब्लॉक पण करते.

आरारा, समजले नाही. मोबाईलमधील मेसेज झेलणे आणि सरकार झेलणे या दोन गोष्टीत कमालीचा फरक नाही का? नोकरी जातेय तर जाऊ दे, दुसरी मिळेल, पण छोकरी जातेय तर जाऊ दे असे कोणी म्हणेल का?
<<
समजले तरी तुमच्या नेहेमीच्या सवयीने तुम्ही पेडगांवी जाणारच, हे आम्हाला ठाऊक आहे. तेव्हा, अधिक इस्कटून सांगणार नाही Happy

राहुल१२३, मला सुद्धा हाच त्रास आहे. मी येत्या १-२ दिवसात SEBI ला पत्र पाठवणार आहे. त्याचा मसुदा हवा असल्यास आपल्याला देईन.
रच्याक, त्या संदेशांमध्ये Funny Software Ltd. किंवा Alora Trading Company चे शेअर्स खरेदी करायला सांगितलेले असतात का? प्लीज कन्फर्म करून सांगाल का???

>>

ऑफलाईन असल्याने प्रतिसाद द्यायला उशीर झाला. ह्याच कंपन्यांचे शेयर्स खरेदी करायचे मेसेज येतात. यात अजुन SAIBABA म्हणून एक कंपनी आहे, तिचे शेयर्स घ्या म्हणून मेसेज येत असतात.

.

@ बिपीन चन्द्र हरीश्चन्द्र कामुळकर, आपण दिलेली लिंक पाहिली. वास्तविक ते फोनचे फिचर आहे, ज्यामध्ये आपण गाडी चालवत असतांना फोन DND मोडमध्ये जाईल. (म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे येणारे कॉल्स, sms यांची रिंग वाजणार नाही, यात काही ठराविक क्रमांकाला वगळण्याचा पर्याय असेल). परंतु हा मूळ समस्येवर उपाय नाही. कारण तुम्ही गाडी चालवताना आलेल्या sms ची रिंग वाजली नाही तरीही तो sms तुमच्या फोनमध्ये येऊन 'कचरा' जमा होणारच. (हो, माझ्यामते कचराच!) जो तुम्हाला तुमचा वेळ खर्च करून साफ करावा लागणार. तुम्ही गाडी चालवत असतांना एखादा मार्केटिंग कंपनीचा कॉल आला आणि रिंग न वाजल्याने तुम्ही तो तेव्हा उचलला नाही तरीही ते लोक तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा कॉल करून पिडणारच.

इथे मला सर्व मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांवर काही बंधने अपेक्षित आहेत, जसे की कोणत्याही परिस्थितीत DND नोंदणीकृत क्रमांकाला संदेश वा कॉल करता कामा नये. वाटल्यास तुम्ही sms किंवा कॉल करण्यापूर्वी प्रत्येक क्रमांक http://www.nccptrai.gov.in/nccpregistry/search.misc या लिंकवर जाऊन चेक करा!

आज मला दुपारी एक sms मार्केटिंग करणाऱ्या कंपनीचा स्वतःचा sms आला. मी मुद्दाम त्यांच्याकडे false enquiry केली. त्यातून असे कळले की, जर आपण त्यांचे standard subscription घेतले तर DND मध्ये रजिस्टर नसलेल्या क्रमांकाला संदेश जातात. आणि special subscription घेतले (ज्याचे चार्जेस जास्त आहेत) तर DND मध्ये नोंदणीकृत असलेल्या क्रमांकालासुद्धा संदेश जातात!

आता बोला!!!

Screenshot_2017-10-30-15-32-12-136_com.android.mms_.png

विमु,

याहून भारी आयडिया पाहिली मी. एक एसेमेस आला,

You have successfully registered to receive messages from XXXXXXXX. Sms STOP XXXXXXX to अमुक number to unsubscribe.

मला आज आयसीआयसीआय कडून फोन आला. अगदी मधाळ आवाजात मला क्रेडिट कार्ड घ्यायचा आग्रह करत होती ती. मला पण मोकळा वेळ होता,खूप चौकशी केली, छान गप्पा मारल्या. शेवटी सांगितले की मला क्रेडिट नको आहे, उलट माझ्या कडेच खूप पैसे पडून आहेत, तर मी बँकेलाच क्रेडिट द्यायला तयार आहे, तर तसे करता येणार नाही म्हणाली. मग म्हणालो की तू छान मार्केटिंग करतेस आणि मी तिला माझ्याच (non-existent) कंपनीत दुप्पट पगारावर जॉब ऑफर दिली. शेवटी २०-२५ मिनिटांनी धन्यवाद म्हणून मीच फोन ठेऊन दिला. वेळ बरा गेला माझा.

आजवरच्या अनुभवातून कळलेल्या गोष्टी.
१. कितीही कंटाळा आला तरी ते लोक हँगअप करत नाहीत. म्हणून आपण अगदी निवांत गप्पा मारायच्या. म्हणजे त्या वेळात ते इतरांना पिडत नाहीत.
२. कंटाळा आला असेल तर सध्या मालक घरी नाही, मी इथला नोकर आहे म्हणून सांगायचे.
३. मुद्दाम मराठीतच बोलायचे.
४. आता घाईत आहे, पण मला इंटरेस्ट आहे, नंतर फोन करा सांगायचे.
५. कंटाळा आला की फोन कट करायचा.

माझे आई-बाबा ‘वोडाफोन’ या कंपनीचा मोबाईल वापरतात. त्यांना आत्ता थोड्यावेळापूर्वी वोडाफोन कडून फोन आला. ‘जर तुम्ही तुमचा दुसरा alternate number वोडाफोन मध्ये पोर्ट केलात तर दोन्ही (म्हणजे आधीचा वोडाफोन आणि पोर्ट केलेला दुसरा) मोबाईल क्रमांकाचे मिळून एकच बिल येईल आणि त्यावर discount मिळेल’ अशी काहीतरी तो ऑफर सांगत होता. बाबांनी तर त्याला ‘कशाला हव्यात तुम्हाला नसत्या चांभारचौकशा?’ असे विचारून उडवून लावले. आईच्या मोबाईलवर त्या मुर्खांचा (मूर्ख का म्हणतो ते पुढे कळेल!) फोन आला तो मी उचलला. मला सुद्धा त्याने अशीच ऑफर सांगितली. मी त्याला एवढेच विचारले, “शक्यतो लोक २-२ वेगवेगळ्या कंपनीचे सिम वापरतात कारण एकाला नेटवर्क मिळत नसेल तर दुसऱ्याचा वापर करता येईल. आता माझे दोन्ही नंबर मी वोडाफोनचे घेतले आणि एखाद्या भागात उदा. माझ्या गावी वोडाफोनची रेंज नसेल तर काय उपयोग आहे २-२ मोबाईल नंबर असून???” हे ऐकल्यावर त्याने फोन कट केला!
खरंच वोडाफोनसारख्या कंपनीतील लोक इतकाही साधा विचार करत नसतील का? की ते ‘वोडाफोन’ च्या ऑफिसमध्ये कामावर येण्यापूर्वी ‘व्होडका’ पिऊन येतात??? Proud Proud Proud

विशेष म्हणजे आई-बाबा दोघांचेही मोबाईल क्रमांक DND मध्ये नोंदणीकृत आहेत!

मी तीनचार म्युचूल फंड कंपनींच्या साईटवर हा अनुभव घेतलाय. तुम्ही कुठल्याही इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या साईटवर जाऊन सिप किंवा इतर इन्व्हेस्टमेंट करायला गेलात की खाली एक टिक करायला सांगतात, त्यात लिहिलेले असते की मी dnd मध्ये काहीही लिहिले असले तरी या अमुक्तमुक कंपनीकडून कसलेही मेसेज व कधीही कॉल आलेले मला चालतील. माझे dnd याना बंधनकारक नाही. जोवर तुम्ही यावर टिक करत नाही तोवर तुम्ही पुढे जाऊच शकत नाही.

हळूहळू हे सगळीकडे येणार व dnd ला काहीही अर्थ उरणार नाही.

True Caller इन्स्टॉल करून घ्या. खूप उपयोग होतो. ते स्पॅमर कॉल नोटिफिकेशन दाखवते. आपण सेटिंग केले तर स्पॅमर्स् automatically ब्लॉक पण करते.>>>>>

ट्रू कॉलर तुमच्या फोनवरून तुमची माहिती चोरते. हे लक्षात ठेवून हे अँप वापरा.

मला दिवसातून 3 4 तरी फोन येतात असले बिनकामाचे. आमचे लॅनड लाईन नंबर देखील कंपनीने विकलेत त्यामुळे मोबाईल, लॅन्ड लाईन दोन्हीकडे मुक्त संचार असतो टेली मार्केटर्सचा. फोनवरच्या कॉलरच्या आवाजावरून व मागे सुरू असलेल्या गोंगाटावरून लगेच लक्षात येते, टेलेमार्केटर आहे हे. मी कामात असेन तर फोन उचलताच कट करते. काम नसेल तर मात्र मी गोड शब्दात प्रॉडक्ट नको म्हणून सांगते. शेवटी फोन करणारी मुलेही नोकरी म्हणून हे करताहेत, त्यांना पगारापलिकडे अजून कसलाही फायदा होत नाही. त्यांच्या एम्प्लॉयरचा राग त्यांच्यावर का काढावा? कधी कधी भरपूर वेळ हाती असला तर प्रॉडक्ट् डिस्कशन करून शेवटी कळवते म्हणत टाटा बाय बाय करते.

कस्टमर केअरला फोन करुन अत्यंत अर्वाच्य शब्दात टेलीमार्केंटींग वाल्यांची तक्रार करायची व मानसिक त्रास दिल्याबद्दल पोलिसात मोबाईल कंपनी विरुध्द तक्रार करु अशी धमकी द्या.

पुन्हा कधीच टेलीमार्केंटीगवाले फोन करणार नाही. ( स्वानुभव ४ सिमधारी)

कस्टमर केअरला फोन करुन अत्यंत अर्वाच्य शब्दात टेलीमार्केंटींग वाल्यांची तक्रार करायची व मानसिक त्रास दिल्याबद्दल पोलिसात मोबाईल कंपनी विरुध्द तक्रार करु अशी धमकी द्या.>>>>>

पहिल्यांदाच आपले आणि माझे मत जुळले!!! असो. मार्केटिंग मेसेज पाठवणाऱ्या कंपन्यांची सायबर सेलकडे तक्रार करून झाली. तेवढ्यापुरते संदेश बंद होतात, पुन्हा ये रे माझ्या मागल्या!!! (दुर्दैवाने मला शिव्या घालता येत नाहीत)

ट्रू कॉलर तुमच्या फोनवरून तुमची माहिती चोरते. हे लक्षात ठेवून हे अँप वापरा.
नवीन Submitted by साधना on 18 April, 2018 - 13:45

-- साधनाताई. एकदा कोणी स्मार्टफोन घेतला की माहीती चोरायला सुरुवात होते. त्यामुळे अमुक एकच अ‍ॅप असं करतं असं वाटत असेल तर तो भ्रम आहे असं समजा. इंटरनेटशी जोडलेला आपल्या हातातला स्मार्टफोन ही आपल्या व्यक्तिगत माहीतीची किल्ली आहे. दॅट्स ऑल.

तुम्ही कोणाशी फोनवर बोलत असाल, किंवा फोन बाजूला ठेवून समोर बसलेल्याशी संभाषण करत असाल. तरी रेकॉर्डिंग मधून किवर्ड उचलून तुम्हाला जाहिराती टार्गेट केल्या जातात. आणि हे काही गुपित राहिलेले नाही, जगजाहिर झालंय. आपण करत असलेल्या गुगलसर्चमधून किवर्ड उचलून आपल्याला मेल्स येणे ही आता बाबा आदम के समय की टेक्नॉलॉजि झाली आहे.

स्मार्टफोन हे आधुनिक काळातले गुप्तहेर आहेत. देशातल्या सर्व महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींनी स्मार्टफोन वापरु नये या मताचा मी आहे. कारण अमेरिकेचा गुप्तहेर ते सोबत घेऊन फिरत आहेत असेच समजा.

साधनाताई. एकदा कोणी स्मार्टफोन घेतला की माहीती चोरायला सुरुवात होते. त्यामुळे अमुक एकच अ‍ॅप असं करतं असं वाटत असेल तर तो भ्रम आहे असं समजा.>>>>

माहिती चोरली जाते माहीत आहे, पण मुद्दाम अँप घेऊन आपण चोराला खजिना उघडून देतो.

व्होडाफोन चे खुपदा कॉल्स येतात. नवीन कनेक्शन हवं आहे का विचारणारे. आज मला airtel कडून एक कॉल आला होता. पलीकडची बाई म्हणत होती की तुम्हाला खुप जास्त बिल येतं आहे असा आम्हाला तुमचं बिल चेक केल्यावर कळलं. बिल कमी करुन देते म्हणत होती. मी म्हटलं की मी जास्त बिल भरायला तयार आहे. तर तिनी फोन ठेऊन दिला.