फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हा लेख मला जाहिरात का वाटतो, ते सांगतो. (इथे जाहिरात म्हणजे जिथे पैशाची देवघेव आहे, अशे गोष्ट, असा अर्थ नाही, तर एखाद्या गोष्टीबद्दल ती किती छान आहे, उपयुक्त आहे, इ.इ. सांगणं.
मूळ लेखातला हा परिच्छेद पहा : "या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय. "

पुढचा भाग डॉ श्रीकांत जिचकरांचा महिमावर्णन करण्याचा आहे आणि त्यापुढे डॉ दीक्षितांचा. (अवांतर १ ते स्वतः त्यांचं नाव दिक्षित असं लावतात की दीक्षित याची कल्पना नाही. माझ्या माहितीप्रमाणे दीक्षित हे बरोबर आहे, म्हणून मी तसंच लिहितोय.
अवांतर २ : त्यांचं नाव ते कसं लावतात हे शोधण्यासाठी गुगल केलं तर पहिला व्हिडियो राजीव दीक्षित यांचा आला:_ डॉक्टरशिवाय निरोगी व्हायचा फॉर्म्युला )

त्यांनी नेमकं काय सांगितलंय याबद्दल मूळ लेखात अत्यंत त्रोटकपणे किहिलंय - आणि ते काय - " दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. "

हा संपूर्ण परिच्छेदही जाहिरातीत शोभावा असाच आहे.
मग पुढे भाषणाचा व्हिडियो पाहण्याबद्दल लिहिलं आहे.

तज्ज्ञाची गरज नाही, असंलेखकाने प्रतिसादांत अनेक वेळा म्हटलंय. या आताच्या परिच्छेदातही एक वाक्य आहे : आहारतज्ञांना पैसे द्यायला नको.
हा मार्ग चांगला का? याचं कारण कोणत्याही तज्ज्ञाकडे जायची गरज नाही, पैसे मोजायची गरज नाही.
म्हणजे ही एक नव्या प्रकारची आरोग्य चळवळ होणार असेल तर उत्तम.

पण पुढे त्यांनी इथे साधकबाधक चर्चा होईल या हेतूने लिहितोय, असंही जोडलंय. "पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे."

तर या बाधक चर्चेला ते कसे सामोरे जातात, हे आपण पाहिलं." मी तज्ज्ञ नाही, त्यामुळे मी उत्तर देणार नाही."मी यातला तज्ञ नाही हे सांगून झालेले आहे. त्यामुळे मला झालेल्या आकलनानुसार व कुवतीनुसार मी हे सर्व मांडले आहे हे लक्षात घ्यावे." तुम्ही तो व्हिडियो पहा.इ.इ."

आपण तज्ज्ञ नसलो, तरी अन्य आहारपद्धतींवर डॉ दीक्षितांचा हवाला देत टीका करण्याचे स्वातंत्र्य ते बजावतात. इतकी वर्षं डॉक्टरांना चुकीचं शिकवलं गेलं, असं विधानही करतात.
(अवांतर - विज्ञान तथ्यांची पडताळणी काय्म करत असते. नव्याने हाती आलेल्या निष्कर्षांमुळे जुने आकलन कालबाह्य झाले आहे, हे मान्य करण्याकरिता विज्ञानात पूर्ण वाव आहे. आरोग्य आणि आहाराच्या क्षेत्रातल्या संशोधनांत हितसंबंध गुंतलेल्या मंडळींकडून सहेतुक काही गोष्टी केल्या जात असल्या, तरीही त्या चुकीच्या आहेत हे पुढे जाऊन सिद्ध केले जाण्याची शक्यता कायम असते.)

उलट "बाधक" वाटणार्‍या मुद्द्यांना स्थितप्रज्ञाचा आव आणत बगल दिली जाते आणि तशी प्रशंसापत्रंही गोळा केली जातात.

वरच्या पंचावन मिनिटांत खाणं संपवण्याबद्दल काय *अटी लागू* आहेत, हे प्रतिसादांत आलंय.

मायबोलीवरच वजन आटोक्यात आणण्याबद्दल अनेक धागे आहेत, एकच उपाय सगळ्यांना आणि सदासर्वदा लागू पडत नाही, इतके तरी त्यातून कळावे. या धाग्यावर आपल्या सक्सेसफुल वेट लॉसची यशोगाथा लिहिणार्‍यांनी अन्य काही धाग्यांवरही ती लिहिली होती असं ही आठवतंय.

लेखात आलंय म्हणून लिहितोय : नुसते रोज ४५ मिनिटे भरभर चालणे ही आरोग्याची दुसरी गुरुकिल्ली आहे, असा एक दावा या लेखात आहे. वाढत्या वयाबरोबर कमजोर होत जाणारी हाडे, स्नायू, लवचिकता यांसाठी त्या त्या प्रकारचे व्यायाम करणं गरजेचं आहे, असं सांगणारे तज्ज्ञ आहेत आणि अनुभवान्ति मलाही ते उमगलेलं आहे. याही बाबतीत अनेक संशोधने होत असतात. दिवसातून दोनतीन वेळा अगदी ५-५ मिनिटांसाठी एरोबिक्स केल्यानेही फायदा होतो, असं सांगणारं संशोधनही आहे.

डॉ दीक्षितांनी शोधलेला मार्ग हा आपल्या जुन्या जीवनशैलीकडेच घेऊन जाणारा आहे, . अर्थात त्यामुळे त्यांचं श्रेय कमी होत नाही. बदलत्या जीवनशैली आणि खानपानशैलीमुळे काही आजार होतात, म्हणून तर त्यांना लाइफ स्टाइल डिसीज म्हणतात.

हा लेख आरोग्यम् धनसंपदा ऐवजी ललितलेखन या भागात असता, तर मी इथे प्रतिसाद देण्याचे कष्ट घेतले नसते.

हा लेख म्हण्जे माऊथ पब्लिसिटी आहे. एखाद्या गोष्टीने मला फायदा झाला आणि तेच जर ४ लोकांना सांगितले तर मला तरी चुकीचे वाटत नाही.
मायबोलीवर अनेक चित्रपट कसे चांगले याचे धागे निघतात. ते म्हण्जे त्या चित्रपटांची जाहिरात नाही तसंच हा धागा आहे असं मी समजेन.

डॉ दीक्षितांनी शोधलेला मार्ग हा आपल्या जुन्या जीवनशैलीकडेच घेऊन जाणारा आहे, . अर्थात त्यामुळे त्यांचं श्रेय कमी होत नाही. बदलत्या जीवनशैली आणि खानपानशैलीमुळे काही आजार होतात, म्हणून तर त्यांना लाइफ स्टाइल डिसीज म्हणतात.>>>>>

हे आरोग्याशी सबंधित नाहीये का?

हा लेख आरोग्यम् धनसंपदा ऐवजी ललितलेखन या भागात असता, तर मी इथे प्रतिसाद देण्याचे कष्ट घेतले नसते.>>>>

हे पहिल्याच प्रतिसादात लिहिले असते तर कष्ट वाचले असते.

दिक्षितांबद्दल, त्यांच्या पद्धतीबद्दल वा कार्याबद्दल मी किंवा कोणीही काहीही बोललेले नाही. जसे आय एफ बद्दल रिसर्च मधून अनुभवातून माहिती आहे तसेच दिक्षितांबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आधीपासून ऐकून माहित आहे. त्यांचा रेफरंस जिथे आला तिथे त्यांच्याबद्दल चांगलेच लिहिले आहे. लोक, काय लिहिले आहे ते न वाचता ऊगीचच भुई धोपटत आहेत. सई म्हणाली तसं आय एफ विरूद्धं दिक्षित असं कोणीही म्हणत नाहीये.
मी दोनदा लिहिलंय दिक्षितांची पद्धत फाईन ट्यून्ड आय एफ आहे... जे चांगले आहे.
एवढे स्पष्ट लिहिल्यानंतर आशा करतो डॉ. दिक्षितांचा मुद्दा घेऊन परत कोणी लिहिणार नाही.

बस्के, अंजली, मो_की_मी, आणि सगळेच
न्यूटनचा नियम फिजिक्सच्या भावे सरांनी शिकवला आणि मी शा़ळेतून बाहेर पडून तो भावे सरांचा नियम म्हणत सगळीकडे सांगत फिरू लागलो, कोणी प्रश्न विचारल्यास भावे सरांनी असेच आणि एवढेच सांगितले आहे म्हणून हे असेच आहे बाकी मला माहित नाही असे म्हंटल्यास काय वाटेल तुम्हाला? चाईल्डिश ?
जसे भावे सरांनी सांगितले नाही, मी शिकवतो त्यापुढे जाऊन माहिती घेऊ नका किंवा प्रश्न विचारू नका तसे दिक्षितांनी म्हंटले नसावेच. मला जर खरंच न्यूटनचा नियम ईतरांना समजाऊन सांगायचा असेल तर मी माझ्याकडची माहिती देऊन अजून माहिती मिळवून देण्याची किंवा मिळवून सांगण्याची तयारी दाखवणे ऊचित नाही का?

लेखकाला हा शोध डॉ. जिचकार यांचाच आहे असे वाटते असे त्यांच्या काही विधानावरून दिसतेय. पण डॉ. जिचकार त्यांच्या भाषणात "मी हे अमेरिकेत शिकलो, यावर अमेरिकेत खूप संशोधन झालंय, चाललंय" असे म्हणालेत याची त्यांनी नोंद घ्यावी. >> हे आधी लिहायचे राहून गेले होते.
अनेक वर्षांपासून हे ज्ञान ऊपलब्धं असतांना हा शोध क्रांतिकारी कसा तेच विचारले होते आधी भागवतांना.

साधना, फ्रीजचा कंप्रेसर बदलण्यासाठी शंभर प्रतिसाद चालतात पण ईथे अमूक आहारपद्धती बदला अशा गहन वैद्यकीय विषयासंबंधी चार प्रश्न विचारले की ते आरोप आहेत, दुर्लक्ष करा वगैरे कसे काय? वैयक्तिक बोलत नाहीये गैरसमज करून घेऊ नका पण तुम्ही कंप्रेसर बदलण्यासाठी जेवढी चिकित्सा केलीत त्याच्या १०% ही प्रश्न ईथे विचारले गेले नाहीत.

६:०२ मिनिटांचा विडिओ समजून घ्यायला पुरेसा आहे म्हणत आहेत.... त्यापेक्षा जास्त वेळ डॉक्टरकडे जाऊन सर्दी/पडशाचे कारण समजून घ्यायला लागतो.

पण थोडं अधिक वाचन केल्यावर आणि डॉ. दिक्षितांचे विडीओ बघितल्यावर इं फास्टींगचा हा एक प्रकार असावा असं जाणवलं. >> तज्ञ न म्हणवणार्‍या भागवतांनी हे आधीच खोडून काढल्याचे वाचलेत का तुम्ही अंजली?

हा धागा जाहिरतीचा वाटला तरी काय बिघडते? >>बस्के, सगळेच बदलते की एकदम. लेखकाने लिहिलेला प्रत्येक शब्दं वाचण्याचा दृष्टीकोन बदलतो वाचकाचा.
एकीकडे 'वॉट्सप फॉर्वर्ड्स अणि यावर विश्वास ठेवणारे' ह्या धाग्यावर लोक भरभरून खिल्ली ऊडवणारे लिहितात आणि ईथे एका वॉट्सअप मॅसेज मधल्या क्लेम्सची शहानिशा करू नका, प्रश्न विचारू नका म्हणत आहेत. अवघड आहे.

जाहिरात असेल तर मग why not call a spade a spade

मला सुद्धा "डॉक्टर या डाएटला घाबरले", "डॉक्टरांना माहिती नव्हते", "डॉक्टर लागणार नाही" ही विधाने खटकतात.
डायबेटिसचा कुठलाही चांगला डॉक्टर कधीही "५५ मिनिटात वाट्टेल ते खा" असा सल्ला देणार नाही. जेव्हा तुम्हाला डॉक्टर शुगरसाठी मेटफोर्मीन देतात, तेव्हा ती पथ्याच्या खाण्याबरोबरच घ्यायची असते. मेटफोर्मीन घेऊन तुम्ही वाट्टेल ते आणि वाट्टेल तसं खाऊ लागलात तर तुम्हाला अजून औषध लागेल. (आणि हे ५५ मिनिटात खाल्ले तरीही लागेल)

खरं म्हणजे सिलीब्रीटी डाएटिशियन्स अशी चुकीची माहिती पसरवत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्यवस्थित प्रोफेशनल असलेली ऋजुता दिवेकर.
तिच्या सगळ्या ओपन लेक्चरमध्ये ती सरळ लोकांना सांगते की डायबेटिक लोकांनी आंबा खायला काहीही हरकत नाही. आणि डॉक्टर चुकीचे सांगतात.

डॉक्टरांचा अमुक अमुक "वर्ज्य" करण्याचा सल्ला हा तुमचे सगळे विकनेस लक्षात घेऊन दिलेला असतो. एखाद्याला रोज १ तास व्यायाम करा सांगितल्यावर तो/ती ऍव्हरेज आठवड्यातून ३ वेळा ३० मिनिट व्यायाम करतात. हे मी ऍव्हरेज म्हणते आहे. त्यात असेही लोक असतात जे रोज २ तास करतील आणि असेही असतात जे काहीही करणार नाहीत. भात बंद करा हा सल्ला दिला की किती लोक अगदी प्रामाणिकपणे भात बंद करतात?

डायबेटिक लोकांनी आंबा खावा हे सांगण्यापेक्षा डायबेटिक लोकांनी आंबा कसा, किती आणि कधी खावा हे सांगणे जास्त महत्वाचे आहे. आणि ते तुम्ही ऋजुताला पैसे दिल्याशिवाय ती सांगेल का? त्यापेक्षा अशा क्लायंट गोळा करायसाठी केलेल्या ओपन टॉकमधील अर्धवट माहिती ऐकण्यापेक्षा व्यवस्थित पैसे देऊन आपापल्या डॉक्टरला भेटणे कधीही जास्त हिताचे आहे. कुठलेही डाएट चालू करण्याआधी आपल्या डॉक्टरचा नीट सल्ला घेणेही आवश्यक आहे. दीक्षित डाएटनी जर शुगर व्यवस्थित कंट्रोल होते आहे असे दिसले तर डॉक्टरला भेटून मेफॉर्मिनचे नवीन प्रिस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे. आणि शुगर व्यवस्थित कंट्रोल होते आहे हे समजायला ती रोज मोजावी लागते. तशी ती रोज फास्टिंग आणि पी पी मो-ज-ली-च पाहिजे. माझ्या घरात माझ्या आईची गोळी अशी कमी कमी होत गेली. तिनी फक्त आहारातील कार्ब्स आणि शुगर कमी केले. वजन, बीपी, शुगर तीनही एकत्रच आटोक्यात आले. हे तिनी तिच्या डॉक्टरांना सांगून, तसेच रोज शुगर मोजून त्यांना फीडबॅक देऊन केले. वर्षभरात तिचे १०-१२ किलो वजन कमी झाले. पण हे सगळे तिच्या डॉक्टरशी व्यवस्थित डिस्कस करूनच झाले. आणि प्रत्येक स्टेपला डॉक्टरनी तिचे अभिनंदनच केले.

पुण्यातल्या कित्येक चांगल्या डॉक्टर्सना हे डाएट माहिती आहे आणि ते पेशंटना ते फॉलो करायला प्रोत्साहन देतात. माझ्या वडिलांचे एमडी डॉक्टर, माझ्या मुलाचे पीडियाट्रिशियन, तसेच आमच्या मित्र परिवारातील कित्येक यशस्वी डॉक्टर आधी डाएट कंट्रोल करायचाच सल्ला देतात. ते जमलं नाही तरच गोळ्या देतात. पण लोकांना ते जमत नाही कारण त्यांचा खाण्यावर ताबा नसतो. माझ्या वडिलांचा टाईप १ चा इन्सुलिनचा डोस बाकीच्या पेशंट्सच्या तुलनेत अत्यल्प आहे. याचे कारण त्यांनी काय खावे हे शिकण्यात त्यांचे सगळे आयुष्य घालवले आहे. आणि त्यांचा टाईप १ सुद्धा ९० % डाएटमुळे आणि व्यायामामुळे आणि फक्त १० % इन्सुलिनमुळे कंट्रोल झालेला आहे. आणि त्यांना इथपर्यंत आणण्यात के. ई. एमच्या डॉक्टर याद्निकांपासून ते आत्ताच्या त्यांच्या डॉक्टरपर्यंत सगळ्यांचे हातभार आहेत. याद्निकांनी त्यांना १९८५ मध्ये जो सल्ला दिला तोच आता या दीक्षित डाएटमधून आपल्याला मिळतो आहे.

औषधे खपवायची कॉन्स्पिरसी आहे. डॉक्टर लोक पेशंटच्या आजारी असण्यावर पैसे मिळवतात वगैरे सगळे ओव्हरसिम्पलीफिकेशन्स आहेत. भागवतांनी लिहिलेल्या लेखांनी जनजागृती होते आणि लोक इन्स्पायर होऊन आहारात बदल करतात एवढा चांगला भाग घेऊन, डॉक्टरांच्या मदतीनेच पुढे जाणे योग्य आहे.

हिंदी चित्रपट बहुतांशी हॉलिवूडवर बेतलेले असतात, फ्रेम टू फ्रेम कॉपी असते, कथा मूळची इथली असली तरी असल्या कथेवर तिकडे आधीच चित्रपट आलेला असतो, इथल्याने स्वतःचा म्हणून बनवला तर तिथल्या चित्रपटाचा प्रभाव असतोच वगैरे वगैरे वगैरे... लिस्ट लांबडी आहे.

त्यामुळे कुणीही हिंदी चित्रपटांवर लिहू नका. लिहायची उर्मी दाबता आली नाहीच तर फक्त व फक्त मूळ चित्रपटाबद्दलच लिहा. तुम्हाला हॉलिवूड इंग्रजी 1 अक्षरही कळत नाही हा बचाव चालणार नाही. यानंतरही उर्मी शिल्लक राहिली तर हिंदीबद्दल लिहायच्या आधी मूळ चित्रपटावर मणभर लिहा व शेवटी पुसटसा हिंदीचा उल्लेख करा. हेही तुम्हाला करता आले नाही तर नाईलाज म्हणून हिंदी चित्रपटावर तुम्ही लिहिलेले आम्ही वाचू, पण तुमचा रिव्ह्यू चित्रपट विभागात दिसता कामा नये. तो ललितमध्येच दिसला पाहिजे.

असा डिस्क्लेमर चित्रपट विभागात येणार का??

3 July, 2018 - 21:49 ला भरत यांनी हे दिक्षीत डॉक्टरांचे मार्केटिंग आहे का अस विचारल आणि १० मिनिटांनी हाब यांनी हा लेख डॉक्टरांची जाहिरात करण्यासाठी आलाय अस जाहीर करून टाकल. पण त्यांना तस का वाटत हे लिहिले नाही. तसेच मला त्यांच्या हेतू विषयीही शंका आली म्हणून मला त्या आरोपांना उत्तर द्यावेसे वाटत नव्हते. पण आज २३ऑगस्टला ते त्याची कारणे देत आहेत म्हणून उत्तर देतोय.

खर तर असाच प्रश्न मला दुसर्‍याच दिवशी मिसळपावर विचारला गेला होता तोही अगदी स्पष्टपणे. तो जसाच्या तसा खाली देत आहे.
-----------------------------------------------------------------------
4 Jul 2018 - 1:56 pm | गवि
अनेकदा उद्देश चांगला असूनही कोणत्याही लहान सहान शंकेवरसुद्धा एकवाक्यी खुलासाही न देता किंवा पूर्ण स्पष्टीकरण न देता फक्त टीजर देऊन त्याऐवजी सगळा रोख केवळ "ते भाषण एकदा ऐका, ते भाषण पूर्ण ऐका", "अमुक इतकेच तास /मिनीटं तर द्यायची आहेत चांगल्या आरोग्यासाठी"..... असा सर्वांना एका टारगेटकडे रिडायरेकट् करण्याचा दिसला की प्रचारकी भास व्हायला लागतात.

इतर काही उदाहरणं:

"एकदा आमचे शिबिर अटेंड करा"
"एकदा आमच्या सेमिनारला या"
"एकदा त्यांची सीडी / डीव्हीडी पहा"
"सत्संगाला उपस्थित राहा"

त्याशिवाय (म्हणजे दोन तास किंवा चार तास वेळ काढून ते एकदाचं पूर्ण ऐकेपर्यंत, किंवा सेमिनार, शिबीर इत्यादी यात आधी वेळ गुंतवल्याखेरीज) फार काही प्रश्न चर्चा नको. उत्तर एकच, "एकदा ते पूर्णपणे करा / अटेंड करा/ ऐका / उपस्थित राहा" तिथेच सगळी उत्तरं मिळतील, काहीच शंका उरणार नाही. निरामय दीर्घआयुष्याची गुरुकिल्ली.

हा अप्रोच टाळला तर नवा विचार प्रसृत करण्याचा उद्देश आणखी जास्त चांगला परिणामकारक होऊ शकतो.
--------------------------------------------------------------------------

वरील विचारणा किती स्पष्ट आहे ते बघा. तसेच भाषाही कडक आहे. तरीही मला वरील प्रश्न प्रामाणिकपणे विचारल्यासारखा वाटला. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार न वाटल्याने मी त्याला त्याच दिवशी तासाभरात उत्तर दिले. तेच इथे चिकटवत आहे.

4 Jul 2018 - 2:50 pm | शाम भागवत
तुमचे म्हणणे बरोबर आहे. या पध्दतीने जाळ्यात ओढण्याच्या आणि पैसे कमावण्याचे प्रयोग फार चालतात हे मान्य. त्यामुळे कोणी असे करू लागला की शंका येणे अजिबात चुकीचे वाटत नाही.

मुळात माझे वजन योग्य असून पोट वगैरे अजिबात सुटलेले नाही. रक्तदाब किंवा मधुमेह वगैरे काही नाही. त्यामुळे या कुढल्या हेतूने मी याची सुरवात केलेली नाही. मला डॉ. दिक्षीतांचे विचार कळले आहेत. पटले आहेत. म्हणून मी जिवनशैली म्हणून याचा स्विकार केलेला आहे.

तरीपण मी या क्षेत्रातला तज्ञ नाही याचे मला भान आहे. अन्यथा मीच इथे सविस्तर लेखन केले असते. डॉ. दिक्षित व डॉ. जिचकार यांचे व्याख्यानाबद्दल उत्सुकता वाटावी ह्या मूळ हेतूनेच मी हा लेख लिहिला आहे. मला असे सारखे वाटते की, माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या तोंडून काहीतरी ऐकण्यापेक्षा त्या क्षेत्रातल्या तज्ञ माणसाच्या मुखातून लोकांनी सगळे ऐकावे. यासाठी ही धडपड मी करत आहे. यात माझा कोणताही स्वार्थ नाही.

मात्र एक मिपा कुटुंबातला सदस्य या नात्याने मी एक खात्री नक्की देतो. या मधे डॉ. दिक्षीतांचा एक नया पैशाचाही फायदा नाही. उलट डॉ. दिक्षीत व्याख्यानातच हे स्पष्ट करतात की मी तुम्हाला सगळ सांगितलेले आहे. आता मला पुन्हा भेटू नका. माझा कुठेही दवाखाना नाही. मी प्रॅक्टिस करत नाही. मी अध्यापक व प्रामाणिक संशोधक वृत्तीचा माणूस आहे. मला तुमच्या कडून एक पैसाही नको.

तरीपण एखादी शंका आली तर त्याचे निराकरण कसे करायचे हा प्रश्न उरतोच. यासाठी ते सांगतात की, काही अडचण असेल तर तुम्हाला काही डॉक्टरांचे फोन नंबर देतो. पण त्यांना फोन करू नका. त्यांना व्हॉटअ‍ॅपवर कळवा. ते तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतील. पण हे लक्षात ठेवा की हे डॉक्टर त्यांचा व्यवसाय सांभाळून या अभियानात विनामुल्य सेवा देत आहेत. त्यामुळे ते त्यांच्या सवडीने उत्तर देतील. लागलीच उत्तराची अपेक्षा करू नका. तरीही २४ तासांच्या आत तुम्हाला उत्तर नक्की मिळेल.

तुमच्या शंकेला जेवढे खुलासेवार उत्तर देता येईल तेवढे दिले आहे. याउप्पर ती भाषणे ऐकायची की नाही याबाबत निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे आहात.
माझ्या या उत्तरामुळे तुमची शंका फिटली नसेल तर त्याबद्दल क्षमा मागतो. कारण आता याबाबत सांगण्यासारखे माझ्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही.

असो.
__/\__

भरत व हाब यांचे हेतू मला प्रामाणिक वाटले असते तर मी हेच उत्तर ४ जुलैलाच इथे चिकटवले असते. २३ ऑगस्ट मी उजाडूनच दिला नसता.

समारोप :
डॉ. दिक्षीतांचे विचार याही अगोदर फेब्रुवारी २०१८ ला क्रिप्स यांनी मांडले होते. त्या धाग्यात हा डाएट प्लॅन सुरू करत असल्याचे काहीजणांनी लिहिले होते. ज्यांनी सहा महिने हा प्लॅन पूर्ण केला आहे अशा कोणाच्या तरी प्रतिसादाची मी वाट पहात होतो. असा प्रतिसाद ऑगस्ट पर्यंत येईल अशी मी अपेक्षा करत होतो. पण त्या धाग्यावर हेला यांची पोस्ट आल्यावर तो धागाच बंद पडला.

हा धागा काढल्यावर हेला यांच्या पोस्ट नंतर धागा बंद पडू नये याचा प्रयत्न करावयाचे ठरवले होते. मोकीमी यांची पोस्ट आली आणि मला धाग्याचे सार्थक झाल्याचे वाटले. आता ह्या धाग्यावर मांडलेला विचार मरणार नाही याची खात्री वाटायला लागली. इतकेच नव्हे तर बरेच जण आता या आहार पध्दतीबद्दल विचार करायला लागतील. आपले अनुभव शेअर करायला लागतील याची खात्री वाटायला लागली. मी मोकीमी यांना उत्तर देतानाही निरोप घेतल्यासारखेच लिहित होतो.

डॉ. दिक्षीतांचे विचाराने आता मायबोलीवर मूळ धरले आहे. या संकेतस्थळाच्या जन्मापासून या संकेतस्थळाशी निगडीत असलेल्या बुजुर्गांनीही या विचारांची दखल घेतलेली आहे. त्यामुळे मला आता आणखी काही करायचे शिल्लक राहिलेले नाही असे वाटते.
मराठी प्रेमी डॉ.जिचकार व डॉ. दिक्षीत यांना हे मराठीप्रेमी संकेतस्थळ नक्कीच आधार देईल याची मला खात्री वाटते.

भरत, हेला, हाब आणि आरारा यांच्या सहभागामुळे हा धागा मी सतत जिवंत व हलता ठेऊ शकलो व त्यामुळे मी जास्तीत जास्त सदस्यांपर्यंत पोहोचू शकलो त्यासाठी मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माझा हा धागा काढण्याचा हेतू जसा सफल झाला तसाच तुमचे सर्वांचे हेतू सफल होवोत.

सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.
_/\_

भरत, हाब आणी सई केसकर, तुमच्या तिघांचेही अनंत आभार. मला जे म्हणायचे होते ते परफेक्टली तिघांनीही मांडले आहे.

शामराव इथे दीक्षित, दीक्षित, जिचकार जिचकार चा जो अखंड जयघोष करत आहेत. इतरांनी कितीही मुद्दे माहिती मांडली तरी चर्चा त्या दोन नावांच्या बाहेर अजिबात जाऊ देत नाहीयेत. साधी आयएफ पद्धत आहे तिला दिक्षितांची पद्धत असे हिग्जबोसॉन सारखे नामाधिष्ठान देण्याचे प्रयत्न चालू आहेत. इतर कोणतेच विचार अकनॉलेज करत नाहीयेत, त्यांच्या दोन परस्परविरोधी वक्तव्यांना उघडे पाडले तर उत्तरादाखल दात दाखवून वेंगाडून (हे त्यांच्यामते सभ्य आहे) दाखवत आहेत. हे सगळे बघता धागा लेखकाचा हेतू आरोग्यप्रसार नसून विशिष्टनामप्रसार आहे हे स्पष्ट होत आहे.

दिक्षितांचा विचार, दिक्षितांचे अम्के, दिक्षितांचे ढमके हे जे भक्तभजन चालू आहे. त्याचा पाया मुळात आय एफ आहे. आणि आय एफ च्या चिक्कार पद्धती जगभर रुळलेल्या आहेत. दोन जेवणात पुरेसे अंतर इतके साधे ते सूत्र आहे. त्यात जगभरातले लाखो लोक, वैज्ञानिक, डॉक्टर, आहारतज्ञ आपआपल्या पद्धतीने रुल्स बनवून सोयिस्करपणे फॉलो करत आहेत व त्याचा प्रसार करत आहेत. डॉ. बर्ग, डॉ. फंग, डॉ. रॉबर्ट लस्टीग अशा डॉक्टरांचे प्रचंड फॅण फॉलोईंग आहे, माझ्या माहितीतले एक मोठे डॉक्टर आपल्या उपचारांत आयेफ + नियंत्रित केटोजेनिक पद्धतीचा वापर करत आहेत. फेसबुकवर हजारो मेम्बर्स असलेले शेकडो आयएफ ग्रुप आहेत. आयएफ च्या वेगवेगळ्या पद्दतींचेही वेगवेगळे गृप आहेत. अनेकांनी आपआपली खानपानशैलीनुसार जीवनपद्धती विकसित करुन आयएफ चा फायदा घेतला आहे. ह्याच पुढे जाऊन आयएफचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या ऑटोफ्याजी ह्या घटनेच्या शोधाबद्दल Yoshinori Ohsumi यांना नुकताच नोबेल पुरस्कार जाहिर झाला आहे.

हे इतके सगळे स्पष्ट आणी स्वच्छ ढळढळित दिसत असतांना जो मूळ विचार आहे त्याला डावलून केवळदिक्षितांचेच महिमामंडन करण्यामागे भागवतांचा काय हेतू असेल हा प्रश्न पडला तर हा प्रश्न विचारणारे खुपसट, वाह्यात आणि ट्रोल?.

मान्य आहे की भागवतांची विज्ञान समजून घ्यायची तेवढी कुवत नसेल. पण याचा अर्थ असा होत नाही की दुसरे जे प्रश्न विचारत आहेत त्यांचा किडेकृमी म्हणून अपमान केला तर चालेल. ह्याचा अर्थ एवढाच होतोय की दिक्षितांवर जी दैवत्वाची खोटी पुटे ते चढवण्याचा जोरकस प्रयत्न करत आहेत त्याला आमच्यासारखे हाणून पाडत आहेत ह्याचा त्यांना भयंकर भयंकर त्रास होत आहे. पण त्यांचा मूळ स्वभाव आक्रमक नसल्याने व मुळात पोहर्‍यात पण काहीच नसल्याने दात विचकत कसनुसं हसून दाखवत आपल्या मनातले विरोधकांबद्द्लचे जहर सोकॉल्ड सभ्य भाषेत मांडणे इतकेच कार्य ह्या धाग्यावर त्यांच्याकडून घडत आहे.

आपल्याला आपल्या आकलनक्षमतेच्या कमतरतेमुळे, जगात काय चालू आहे हे जाणून न घेण्याच्या आळशीपणामुळे एखादी फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला ठावूकच नसते. मग कोणीतरी ऋजुता दिवेकर, दिक्षित सारखे व्याख्यानं द्यायला लागतात आणि लाखो रुपये ज्यासाठी लोक खर्च करतात तोच फायदा फुकटात सगळं हवं असणारांना फुकटात कसा होऊ शकतो हे दिसते तेव्हा अशांचा सर्व भर त्या फुकटात मिळतंय यावर असतो. याचे धोके ते लक्षात घेतीलच असे नसते.

वर हाबनी जे उदाहरण दिले आहे की न्युटनचे नियम भावेसरांनी सांगितले म्हणून भावेसर महान सांगत सुटायचे असा हा प्रकार आहे. त्याला आक्षेप घेतला तर इथल्या माननीय सदस्या, काय हो जर्रा काय भावेसरांना क्रेडिट मिळालं तर तुम्च्या का पोटात दुखतं म्हणुन खट्टू होणार... हा सगळा प्रकार वैज्ञानिक नव्हे तर व्यक्तिपूजनाचा आहे.

व्यक्तिपूजन दिक्षितांचे असो का आणि कोणाचे, ते जेव्हा सुरु होते तेव्हा त्याचे हेतू वेगळे असतात हे सांगायला काही थोर व्यक्ती असायची गरज नाही, साधे सामान्य ज्ञान आहे हे.

{मराठी प्रेमी डॉ.जिचकार व डॉ. दिक्षीत यांना हे मराठीप्रेमी संकेतस्थळ नक्कीच आधार देईल याची मला खात्री वाटते.}

नक्की. जिचकरांची जयंती आणि पुण्यतिथी आणि डॉ दीक्षितांचा वाढदिवस साजरा करूया.

हिंदी चित्रपट बहुतांशी हॉलिवूडवर बेतलेले असतात, फ्रेम टू फ्रेम कॉपी असते, कथा मूळची इथली असली तरी असल्या कथेवर तिकडे आधीच चित्रपट आलेला असतो, इथल्याने स्वतःचा म्हणून बनवला तर तिथल्या चित्रपटाचा प्रभाव असतोच वगैरे वगैरे वगैरे... लिस्ट लांबडी आहे.
त्यामुळे कुणीही हिंदी चित्रपटांवर लिहू नका. लिहायची उर्मी दाबता आली नाहीच तर फक्त व फक्त मूळ चित्रपटाबद्दलच लिहा. तुम्हाला हॉलिवूड इंग्रजी 1 अक्षरही कळत नाही हा बचाव चालणार नाही. यानंतरही उर्मी शिल्लक राहिली तर हिंदीबद्दल लिहायच्या आधी मूळ चित्रपटावर मणभर लिहा व शेवटी पुसटसा हिंदीचा उल्लेख करा. हेही तुम्हाला करता आले नाही तर नाईलाज म्हणून हिंदी चित्रपटावर तुम्ही लिहिलेले आम्ही वाचू, पण तुमचा रिव्ह्यू चित्रपट विभागात दिसता कामा नये. तो ललितमध्येच दिसला पाहिजे.
असा डिस्क्लेमर चित्रपट विभागात येणार का??

साधना, स्ट्रॉमॅन अर्ग्यूमेंट करण्यापूर्वी भागवतांच्या लेखावर (दिक्षितांच्या पद्धतीवर नव्हे) आक्षेप घेणारे काय म्हणत आहेत ते समजाऊन घेणार का?
विशाल भारद्वाज जेव्हा म्हणतो की मी मॅक्बेथ वर बेतलेला मकबूल बनवला आहे, ऑथेल्लो वर बेतलेला ओंकारा बनवला आहे तेव्हा लोकांना आनंदच होतो. ह्या कलाकृतीं भारतीय रसिकांपर्यंत आणण्यासाठी ते भारद्वाजची प्रशंसाच करतात. तुम्ही मणभर लिहा ओंकाराबद्दल पण तुम्ही ऑथेल्लोचा ऊल्लेख टाळला की तुमच्या हेतू वर प्रश्नचिन्हं ऊभे राहणारच.
जेव्हा एखादा अनुराग बसू बर्फी बनवून ही माझी 'ओरिजिनल' कलाकृती आहे म्हणतो तेव्हा पब्लिक आक्षेप घेते. अश्याने बर्फी सुंदर चित्रपट असूनही त्या कलाकृतीला गालबोट लागते.
ईथेही तेच होते आहे फरक एवढाच की दिक्षित स्वतः तसे म्हणत नाहीत (नसावेत असे मला वाटते) तर बाकी चळवळीचे अतिऊत्साही कार्यकर्ते (जागरूकता पसरवण्याला चळवळ , १ करोड लोकांचे टार्गेट वगैरे का म्हणत आहेत ते अजूनही कळाले नाही) क्रांतिकारी बदल वगैरे माहिती सोमिवर लिहित आहेत. मणभर लिहिणे सोडून द्या मोठ्या काळापासून जगभर पसरलेल्या आय एफ (किंवा जे काही मराठी नाव आहे) पद्धतीचा साधा ऊल्लेखही भागवतांनी केला नाही. अमितने सईच्या लिंक्स दिल्या तर त्याही खोडून काढल्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 'दिक्षित ऊवाच' कक्षेबाहेर जाऊन काही बोलायचे नाही सांगायचे नाही. दिक्षितोच्छिष्टं जगत् सर्वम.
लेटेस्ट भाषणबाजी पोस्ट मधेही त्यांनी तेच लिहिले आहे.

सिनेमा असो वा डाएट.. काही नवीन ऐकले पाहिले की त्याबद्दल अजून माहिती काढून विषयाबद्दल ज्ञानकक्षा रुंदावण्यास बघावे कोणी लिहिलेले झापडबंद कानांनी ऐकून ते आणि तेवढेच खरे आहे बाकी आम्हाला काही ऐकायचे नाही असे म्हणू नये हे योग्यच नव्हे का?
आणि जर काही too good to be true प्रकाराचे वाटत असेल तर त्याची माहिती पहिल्याने काढावी.

भरत व हाब यांचे हेतू मला प्रामाणिक वाटले असते तर मी हेच उत्तर ४ जुलैलाच इथे चिकटवले असते. २३ ऑगस्ट मी उजाडूनच दिला नसता. >> जय हो!

https://www.maayboli.com/node/67243
ह्याला म्हणतात अभिनिवेषरहित ज्ञानाधारित माहितीपर आणि जबाबदार लेख.
सवाशे दीडशे पोष्टींपर्यंत भागवतांच्या लेखाची दखलही न घेणारे त्या लेखावर वाचून समजून प्रतिसाद देत आहेत हे बघणे सुखावह आहे.

हे इतके सगळे स्पष्ट आणी स्वच्छ ढळढळित दिसत असतांना जो मूळ विचार आहे त्याला डावलून केवळदिक्षितांचेच महिमामंडन करण्यामागे भागवतांचा काय हेतू असेल हा प्रश्न पडला तर हा प्रश्न विचारणारे खुपसट, वाह्यात आणि ट्रोल?.
Submitted by हेला on 23 August, 2018 - 05:05 >> चांगली पोस्ट हेला आधी नमूद करायचे राहून गेले.

भागवत,
प्रामाणिकपणे सांगतो आहे... (असे आता मुद्दाम सांगतो लागते म्हणे)
मायबोली म्हणजे वॉट्सअ‍ॅप नव्हे. तुमचा दिक्षितांच्या कार्यप्रसाराचा हेतू नक्कीच चांगला आहे पण सोमि वर (वॉअ‍ॅ नव्हे) दिक्षितांच्या कार्याची जुजबी ओळख सांगून लेखाचा मूळ फोकस आहारप्रणाली, तिचा ईतिहास, त्यामागचे विज्ञान, जगभरातल्या शास्त्रज्ञांचे प्रयोग, संशोधक व विषय तज्ञांचे विचार ह्यावर ठेऊन, आणि दिक्षितांच्या आहारप्रणालीतून ह्याचा फायदा कसा मिळवता येऊ शकतो हे अधोरेखित केले तर लेख जास्त विश्वासार्ह वाटून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.
दिक्षित आणि जिचकारांना त्यांच्या कामाचे श्रेय मिळायलाच हवे पण हेतू दिक्षित आणि जिचकार प्रसाराचा आहे की त्यांनी सुचवलेल्या आहारप्रणालीच्या ते एकदा नक्की करा.
तुम्हाला आणि सर्वांनाच शुभेच्छा!

हायझेनबर्ग आणि त्यांच्या समविचारी मित्रमंडळाची भागवत्/दिक्षित यांच्या लेख/प्रणाली प्रित्यर्थ दिसलेली आपुलकि, दर्जा वाढवण्याबाबतची तळमळ बघुन माबोवर भाईचारा कायम आहे या गोष्टीचा पुनःप्रत्यय झाला... Happy

@शाम भागवत,
पुन्हा एकदा म्हणावेसे वाटते, तुमची चिकाटी खरेच वाखाणण्याजोगी आहे. आभार व पुलेशु!

न्यूटनचा नियम भावेसरांचा आहे सांगणे हे निरागस टाईप वाटून मी कदाचित सोडून देईन. पण तेच सनातनचे आठवले, आणि कोणी भोंदू विचार कोणी मांडू लागलं तर तावातावाने अंतापर्यन्त भांडायला येईन. थोडक्यात विचार साधारणतः चांगला, पॉझिटिव्ह, बर्‍यापैकी शास्त्रीय असला तर कोणी सांगितला हे एखाददा सांगेन पण परत परत त्यावर वाद घालून माझी एनर्जी दवडणार नाही. चूझ द बॅटल्स यु नो Proud (हा माझा नियम नाही, सो वेळ असेल आणि भलतीकडे वाद घातला तर ही पोस्ट मला गप्प बसवायला वापरु नये. हुकुमावरुन) Proud

इथे भरत, आरारा, हेला यांच्या पोस्ट लेखकाची खिल्ली उडवणार्‍या वाटलेल्या. हाबच्या पोस्ट बाल की खाल टाईप असल्या तरी खिल्ली अ‍ॅटिट्युड न्हवता मला वाटलेला. जाताजाता, मला भागवतांच्या स्मायली जाम आवडलेल्या रिप्लाय म्हणून. त्या वर्क पण करत होत्या. ज्यांच्यावर येत होत्या ते इरिटेट झालेले, भरत यांनी तर आपल्याच पोस्ट नंतर आपणच स्मायली टाकल्यावर माझे माफक मनोरंजन ही झाले. Happy

अकरावीला फिजिक्स शिकवायला एक कन्नड स्टाईलने बोलणारे कुलकर्णी सर होते. त्यांनी पहिले अनेक दिवस किरचॉफ्स लॉ जाम मन लावून शिकवलेला. तेव्हा पासून त्यांना आम्ही किर्‍चॉफ कुलकणी म्हणू लागलो ते वरच्या भावे सरांवरुन सहज आठवलं. Happy

>>> भरत यांनी तर आपल्याच पोस्ट नंतर आपणच स्मायली टाकल्यावर माझे माफक मनोरंजन ही झाले
हो हो Lol

आज धागा चाळला. विषयात मला काही रस नसला तरी धागालेखकांची ट्रोलिंगला स्मायलीने मारायची ट्रिक मला तरी खूप आवडली. किमान (खरंतर शून्य) शब्दांत कमाल आशय. कधी गरज पडल्यास मीही वापरीन म्हणतो! मी त्या स्माईलीचा घेतलेला अर्थ याप्रमाणे -
"तुमचा प्रतिसाद/आक्षेप 'पाहिला'(नॉट नेसेसरिली 'वाचला'). पुढीलपैकी एक/अनेक कारणास्तव (प्रतिसाद हेत्वारोप करणारा वाटला/खिल्ली उडवणारा वाटला/वादासाठी वाद / कीबोर्डयुद्ध खेळायची खुमखुमी/असांसदिक भाषा) उत्तर देण्याची तसदी घ्यावीशी वाटली नाही. क्षमस्व"
मला वाटतं मायबोलीने वरील भावनेसाठी एक स्पेशल स्माईली उपलब्ध देण्याची गरज आहे. कितीतरी अनावश्यक प्रतिसाद आणि लोकांचे श्रम आणि वेळ वाचेल त्याने.
@शाम भागवत,
पुन्हा एकदा म्हणावेसे वाटते, तुमची चिकाटी खरेच वाखाणण्याजोगी आहे. आभार व पुलेशु!>>+१

भागवतांच्या स्मायलीशी नोटाबंदीतल्या बोकीलगाथेच्या वेळी परिचय झालाय. त्यामुळे तीत मला इरिटेट होण्यासारखं काही नाही.
त्या स्मायलीच्या ३.१४ यांनी दिलेल्या अनेक अर्थांत "तुमच्या मुद्द्याला मजजवळ उत्तर नाही" हा पर्याय मिसिंग आहे. तो सगळ्यात आधी हवा.

शीर्षकापासूनचा जाहिरातीय टोन आणि भक्तिभावाने ओथंबलेले आवाहन , तज्ज्ञांबद्दल मारलेल्या कोलांट्या उड्या आणि शेवटचा जिचकार दीक्षितांना या धाग्यामुळे मायबोलीने स्वीकारले हा नोटाबंदी यशस्वी झाली यासारखा दावा पाहता, माझा टोन त्यांच्या लेखनाची खिल्ली उडवणारा झाला असेल, तर त्याबद्दल मला काही वावगे वाटत नाही.

बर झाल आठवण झाली.
तुम्ही या धाग्यावर सुरवातीलाच उल्लेख केल्यावर, ती बोकीलगाथा शोधायचा प्रयत्न केला. पण सापडलीच नाही. त्यात मी जे काही लिहिले होते ते २-३ वर्षांनी बदललेल्या परिस्थितीत तपासून पहावयाचे होते.
यास्तव त्या गाथेची लिंक वगैरे मिळू शकेल काय?

शाम भागवत यांच्या लेख लिहीण्यामागची भावना प्रामाणिक आहे. त्यांनी प्रांजळपणे कबूल केलेले आहे कि मी या विषयातला तज्ञ नाही. त्यामुळे वाचकांनी आपल्या जबाबदारीवर ही माहिती तपासून घेणे आवश्यक आहे असे मला तरी वाटते. बोकील यांच्याप्रमाणे त्यांनी लेखात तरी मला समजते असे दावे केलेले नाहीत. जिचकार हे उच्चशिक्षित असले तरी ते डॉक्टर किंवा आहार तज्ञ म्हणून किती अधिकारी व्यक्ती होते याची कल्पना नाही. त्यामुळे या विषयावर माझ्या नेहमीच्या डॉक्टरशी केलेली बरी.

अर्थात या विषयातले तज्ञ असतील आणि त्यांनी जर या पद्धती फोल आहेत अथवा त्याच्या मर्यादा काय आहेत हे दाखवून दिले तरी ते पुरेसे आहे. सगळीच शास्त्रीय माहिती मला समजेलच असे नाही. त्यामुळे फॅमिली डॉक्टरला भेटणे अनिवार्य आहे.

मी आताशी प्रतिसादांच्या दुस-या पानांवर आहे. पुरेसा गोंधळ झालेला आहे. शेवटपर्यंत वाचू शकेन किंवा नाही कल्पना नाही.

@डागदार अड्डावाला
तुमच्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून मी असे सुचवीन की, तुम्ही हा सहा मिनिटांचा व्हिडिओ प्रथम पहा. त्यात काय लिहिले आहे/ सांगितले आहे ते पटले व अनुसरावेसे वाटायला लागले तर मात्र लेखात दिलेले दोन तासाचे दोन्ही व्हिडिओ ही पहा. त्यानंतर पुढची पाने वाचली तरी चालतील.

कोणताही गोंधळ न होता तुम्हाला विषय कळावा ही शुभेच्छा.

_/\_

@सई केसकर,
तुम्ही डॉ. याज्ञीकांचा उल्लेख केलात आणि मन एकदम भूतकाळात गेले. ते माझ्यापेक्षा ४ वर्षांनी मोठे. एकाच चाळीत राहायचो आम्ही. १९७७ आम्ही चाळ सोडली तोपर्यंत जवळून पाहिले त्या कुटुंबाला. एकदम आदर्श कुटुंब.

त्यांचे वडील पण डॉक्टर होते. ते पण पैशासाठी डॉक्टरकी करणारे नव्हते. सामाजीक जबाबदारीचे भान बाळगणारे होते. पण काळाच्या खूपच पुढे असलेले होते. त्यामुळे त्यांना खूप त्रासही सहन करायला लागला. त्यांचा मुलगा म्हणून रंजन खरोखरच शोभतो. वडिलांसारखीच सामाजिक भान ठेवणारा, बोर्डात येणारा हुषार मुलगा, मितभाषी व स्पष्टवक्तेपणा असूनही समोरचा दुखावला जाणार नाही याची काळजी घेणारा वगैरे वगैरे स्मृती जाग्या झाल्या. ८वीत असतानाच ११ वी ची शास्त्राची पुस्तके तो वाचत असे. आईला बरे नसल्यामुळे घरातली सर्व कामे सांभाळून अभ्यास करत असे.

लहानपणी खूप चांगली माणसे भेटली. जवळून पाहायला मिळाली. त्यांचेबद्दल ऐकायला मिळायचे. त्याचा विचारांचा खूप मोठा परिणाम माझ्यावर झाला. फक्त असा काही परिणाम होतोय हे त्यावेळेस कळले नाही इतकेच.

माझ्या मनात कुठेतरी कोपर्‍यात असलेली एक जुनी छानशी आठवण जागी करून दिल्याबद्दल धन्यवाद.
_/\_

Pages