फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी लहानपणा पासून स्थूल आहे. वयात आल्यावर वजन जास्तच वाढले. वयाच्या 25 व्या वर्षी वजन 92 किलो होते, व उंची 5.3!! मूल झाल्यावर वजन अजूनच वाढले. काम ही बैठे व खूप डोके खाऊ!!! व्यायामाला अजिबात वेळ मिळत नव्हता. खूप खाण्याची सवय अजिबात नव्हती. खाण्याच्या सवयी सुद्धा वाईट नव्हत्या.

मग 2012 मध्ये अती वजन वाढलं, pcod चं ऑपरेशन झालं. वजन 115 किलो झालं!!! सगळे रिपोर्ट्स बॉर्डर वर. शुगर पण 140 fasting.... मग मात्र कंबर कसली. 2013 मध्ये नोकरी सोडली. स्वतः ची प्रॅक्टिस सुरू केली, ती सुद्धा फक्त कोअर एरियात( मी CA आहे आणि फक्त प्रोजेक्ट फायनान्स करते, व फायनान्स ची लेक्चर्स घेते). पहिले व्यायाम सुरू केला. एक ट्रेनर ठेवली. अंजली मुखर्जी चे डाएट सुरू केले. साधारण 2014 मध्ये 92 वर परत आले.
2015 ला परत 103 वर पोचले. व्यायाम सुरूच होता.
2016 ला परत एका daietician कडून डाएट केले. परत 85 वर आले. ते मेंटेन करत होते. तर 2017 मध्ये परत वजन वाढले. आणि हार्निया चे ऑपरेशन करावे लागले. 2016 व 2017 फार वाईट गेली. कारण घरात सगळ्यांचीच आजारपण व आई व सासू चा मृत्यू, सासर्यांची 3 मोठी आजारपण, माझं ऑपरेशन अशी सगळी मनाला आघात करणारी मालिकाच सुरू होती. वजन परत वाढलं.

सई केसरकरांचा IF वरचा लेख इकडे वाचला होता. काही दिवस फॉलो पण केला. पण जमलंच नाही ह्या भानगडी मधून.
जानेवारी 2018 पासून IF किंवा दीक्षित डाएट सुरू केले. पहिले 8 दिवस कठीण गेले. मग मात्र अंगवळणी पडलं. तशीही नी फार फुडी नाही. बाहेरचे खाणे अगदी 2-3 महिन्यातून एखादं वेळेस. त्यामुळे फारसे कठीण गेलं नाही. वजन हळू हळू खाली येऊ लागले. आज मी 82 ला पोचले आहे 96 वरून. साधारण 7 महिन्यात. अजूनही काही फायदे झाले
1. इंच लॉस खूप आहे
2. गुडघा दुखायचा बंद झाला
3. थायरॉईड जानेवारी त 5 होते ( 0.50) ची गोळी घेऊन, ते आता 3 आहे, गोळी न घेता.
4. मासीक पाळी अती वेळेवर येते , जी गेल्या 35 वर्षात कधीच आली नव्हती. ( इतर डाएट मध्ये असतानाही हे कधी झाले नव्हते) जे माझ्या दृष्टीने जादू समान आहे.

मी डाएट सुरू करताना माझे सगळे रिपोर्ट डॉ दीक्षित ना पाठवले होते. त्यांनी प्रोटीन खाऊन हे डाएट करायला सांगितले होते. मी डायबेटिक नाही. आता h1bc 3 आहे, 2017 मध्ये 4.6 होते. Fasting शुगर 82 आहे आणि pp 95. म्हणजे आता मी शुगरच्या सगळ्या धोक्यातून बाहेर आले.

ज्या अर्थी मला डायबेटीस नसतानाही माझे वजन कमी झाले, थायरॉईड ची गोळी बंद झाली, पाळी सुधारली, पाळीच्या वेळचा त्रास शून्य झाला, त्या अर्थी हे IF किंवा दीक्षित प्लॅन हा हॉर्मोन्स वर काम करतो. मला शुगर साठी हेल्प नकोच होती. कारण 2013 नंतर माझी शुगर कधीच 110 च्या वर गेली नव्हती. वजन मात्र वर खाली होत होते.

माझं सध्याचं डाएट
सकाळी बीन साखरेचा, कमी दुधाचा चहा
11 वाजता ग्रीन टी
1 वाजता जेवण, ह्यात 2 पोळ्या, भाजी, डाळ, ताक, सलाड
4 वाजता परत सकाळ प्रमाणे चहा
9 वाजता जेवण, ह्यात डाळीचे डोसे/घावन/टोमॅटो ऑम्लेट/ पनीर चिला/ डाळींच्या इडल्या/ सोया पॅटिस व रगडा/ मिसळ ह्या पैकी काहीतरी

माझं रुटीन साधारण पणे बदलत नाही त्यामुळे ह्या वेळा 90% पाळल्या जातात.

आता इतकी सवय झाली आहे की कोणी काही दिलं तर सरळ घरी घेऊन येते व जेवताना खाते.

ही माझी कथा

माझं सध्याचं डाएट
सकाळी बीन साखरेचा, कमी दुधाचा चहा
11 वाजता ग्रीन टी
1 वाजता जेवण, ह्यात 2 पोळ्या, भाजी, डाळ, ताक, सलाड
4 वाजता परत सकाळ प्रमाणे चहा
9 वाजता जेवण, ह्यात डाळीचे डोसे/घावन/टोमॅटो ऑम्लेट/ पनीर चिला/ डाळींच्या इडल्या/ सोया पॅटिस व रगडा/ मिसळ ह्या पैकी काहीतरी>>>>>>>>

तुमचे आधी अभिनंदन! पण दूध,फळं केव्हा खायची? त्या २ जेवणाच्या वेळेला का?
बाकी माझ्या बाईने असेच २ वेळ जेवण करून जर्रासे आलेले लव्ह हँडल्स घालवले.फ्क्त माझ्याकडे ती नास्ता, चहा घेते.

दुधा पेक्षा मी दही खाते. आणि फळं दुपारच्या जेवणात. आंबे खाते ना रोज, अजूनही. आम्हाला चौसा, नीलम, तोतापुरी.... कोणताही चालतो

वा, मोहन की मीरा- खूप इन्स्पायरिंग आहे तुमचा अनुभव. मी सुद्धा करते आहे आयएफ/दिक्षित पद्धतीने डायेट. बघुया काय रिझल्ट मिळतो. तीन महिन्यांनी रिव्ह्यू करीन.

खूप छान वाटल तुमच मनोगत वाचून. धागा काढल्याच समाधान वाटल. मुख्य म्हणजे तुमच्या या प्रतिसादामुळे ह्या धाग्यावर आपले अनुभव लिहायला बर्‍याच जणांना हुरूप व बळ मिळेल.

माझा मायबोलीच्या सदस्यांच्या स्वतंत्र विचारशक्तीवर विश्वास आहे. प्रत्येक संदेशातून काय घ्यायचे व काय नाही याची उत्तम जाण सगळ्यांना आहे हेही मला जाणवतय. त्यामुळे धाग्यावर आलेल्या (प्रत्येक) प्रतिक्रियांवर धागालेखकाने व्यक्त व्हायलाच पाहिजे असे नाही हे पथ्य पाळतोय. Happy

पण त्यामुळेच माझ्या मूळ हेतूवर लक्ष केंद्रीत करणे जमलेय. इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मान्य करून, याप्रकारे आपण आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपू शकतो याचा अनुभवही मी घेत आहे.
Happy

१९ फेब्रुवारी २०१८ रोजी क्रिप्ट यांनी याच विषयावर धागा काढला होता. त्या धाग्यावरही या आहारपध्दतीबद्दल अनुकूल असलेले बरेच जण असावेत असे जाणवले होते. त्या सर्वांनापण विनंती करतो की, त्यांनी आपले अनुभव निर्भीडपणे इथे जरूर मांडावेत.

तुमची ही कथा मिसळपाववर पण शेअर करायचा विचार करत आहे. आपल्याला शुभेच्छा.
_/\_

पण दूध,फळं केव्हा खायची? त्या २ जेवणाच्या वेळेला का?

@देवकी,
मला वाटते तुम्ही पाच मिनिटे खर्च करून हा व्हीडीओ पहावा. कारण या संकेत स्थळावर विचारलेल्या तुमच्या शंकांनुसार तुकड्या तुकड्यात उत्तरे मिळत राहतील. मात्र डॉ. दिक्षीत, हे एम बी बी एस डॉक्टर तर आहेतच पण त्याच बरोबर ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या शंका येऊ शकतील याचा अंदाज घेऊन ते विषय मांडू शकतात.

हा व्हिडीओ पाहिल्याने दिक्षीतांच्या डाएट प्लॅनबद्दल थोडक्यात कल्पना येईल व अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकदमच मिळून जातील.

पण ही आहारपध्दती सुरू करताना, एकदा तरी मूळ २ तासाचा व्हिडिओ पाहणे हे जास्त श्रेयस्कर असेल. कारण माझी अशी समजूत आहे की, शक्यतो तज्ञ व्यक्तिकडून ज्ञान मिळवायची संधी सोडू नये कारण अपूरे ज्ञान धोक्याचे ठरू शकते.

कारण माझी अशी समजूत आहे की, शक्यतो तज्ञ व्यक्तिकडून ज्ञान मिळवायची संधी सोडू नये कारण अपूरे ज्ञान धोक्याचे ठरू शकते.

२. तज्ञांकडे जायची आवश्यकता नाही.

--- भला इसमें से आपकी खरीखुरी प्रामानीक सम्जूत कोन्सी है शामभाव... ?

अंगावर यायला लागले की लोक लाइनवर यायला लागतात ह्याचेही प्रात्यक्षिक ह्या धाग्यावर मिळायलं..

ओ हेला महाशय, इकडे आणि बऱ्याच धाग्यांवर बघतेय, शब्दांचा कीस पाडून धागा भरकटवण्याची खुमखुमी आवरा कृपा करून.
तुम्हाला वाईट अनुभव आला असेल तर तसा लिहा, उगाच काय बळच काहीही बरळत बसायचं.
आणि हे माझे तुमच्यासाठी शेवटचे पोस्ट...अगदी टिकल्या/स्मायली पण नाही मिळणार Angry

अहो नमिता ताई, आणि नमिताताईंशी सहमत असलेले सर्व संबंधीत हो,
मलाच चिडवताय ना ते? चिडवू दे.

माझ साधं एक गणित आहे. मी चिडलो तर ते जिंकले आणि. .
मी काही त्यांना जिंकू देणार नाहीये. Happy

चांगल आणि वाईट हे फार सापेक्ष असते. त्यांच्या या पध्दतीमुळेच मी काहीतरी चांगल काम करतोय अशी प्रतिमा निर्माण होते. माझ्याबद्दल विश्वास वाटायला लागतो आणि त्यामुळेच या आहारपध्दतीबद्दल उत्सुकता वाटायला लागायची शक्यतापण असते. मायबोलीच्या सदस्यांना निरामय दिर्घायुष्य मिळावे हा माझा हेतू त्यामुळे सफल होत असेल तर ...
चालू दे त्यांच जे चाललय ते. Happy

थोडक्यात अशी माणसे आजूबाजूला असतातच. त्यांचे वाचन, अभ्यास व एकंदरीत व्यवहारज्ञान चांगल असत असा माझा अनुभव आहे. त्यांनी जे काही लिहलय त्यात काही तथ्य असेल तर ते लागलीच स्विकारायचे व त्यांना धन्यवाद ही द्यायचे असतात. पण त्यांच्या प्रत्येक प्रतिसादांना उत्तरे देत बसलो तर त्या उत्तरांचाच उपयोग ते त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी करायला लागतात. मात्र आपण त्यांचा उपयोग करून घ्यायला शिकल पाहिजे. Happy

तुम्ही जर नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की, हेच न कळल्यामुळे या अगोदरचा या विषयावरचा धागा बंद पडला. Happy
_/\_

त्यामुळे धाग्यावर आलेल्या (प्रत्येक) प्रतिक्रियांवर धागालेखकाने व्यक्त व्हायलाच पाहिजे असे नाही हे पथ्य पाळतोय. Happy
<<
फक्त काही स्पेसिफिक लोकांच्या प्रतिसादाखाली दंतपंक्तीप्रदर्शन न चुकता करतो. Rofl

{शक्यतो तज्ञ व्यक्तिकडून ज्ञान मिळवायची संधी सोडू नये कारण अपूरे ज्ञान धोक्याचे ठरू शकते.}
आपण स्वतः या विषयातले तज्ञ नाही , हे लेखकाने आधीच स्पष्ट केलंय.
मग डॉ दीक्षितांचे व्हिडियो शोधून इथे टाकण्यापलीकडे त्यांचं योगदान काय?
धाग्याचं शीर्षकच तो एक जहिरात आहे, हे स्पष्ट करत़ंय.

नवीन Submitted by नमिता' on 22 August, 2018 - 17:49

... माझ्या प्रतिसादांतून तुम्हाला झोंबण्यासारखं काय होतं बरे? तुम्हाला आवडत नसेल तर इग्नोर ऑप्शन आहे की. मी काय लिहावे काय नाही हे सांगायचा तुम्हाला कोणी अधिकार दिलाय?

@ मानव पृथ्वीकर
असू दे हो जाहीरात.
किंवा नसली तरी काय बिघडतय? Happy

मोकीमी यांचा अनुभव त्यावर थोडाच अवलंबून आहे.
हा अनुभव इथे मांडल्यावर त्यातून लोकांना जे काही शिकायला मिळाले त्याचा आणि या जाहिरातीच्या मुद्याशी काय संबंध आहे?
काहीच नाही. मग काय करायचे?
.
.
.
जे करायचे ते खालील प्रमाणे

@भरत
Happy

मात्र तुम्हालाच असे वाटत असेल की, भरत यांना प्रश्न / खुलासे विचारावेत व त्याद्वारे त्यांना व त्यांच्या मित्रांना या धाग्यावर प्रतिसाद द्यायची जास्तीत जास्त संधी मिळवून द्यावी. तर माझे काही म्हणणे नाही. मी फक्त शांतपणे वाचत राहणार आहे. Happy

तुमचा तसा हेतू नसेल तर मात्र एक सूचना करतोय.
याच पध्दतीने मजेशीर प्रतिसाद देऊन व त्याद्वारे जाळे टाकून सावज पकडायची पध्दत असते.
Happy

शाम भागवत, आपली संयमपूर्ण चिकाटी वाखाणण्याजोगी आहे.

यात फारसं विशेष अस काही नाहीये.
माझा एक आवडता विचार आहे.
या जगात कितीतरी जीव जंतू आहेत. पण या सर्वात मनुष्य प्राणी श्रेष्ठ आहे. जर माझे विरोधक ह्या सर्व जीव जंतूंच्या योनीत जन्म न घेता सर्वोच्च दर्जाच्या मनुष्यप्राण्याच्या योनीत जन्माला आले असतील तर नक्कीच त्यांच्या गाठी तेवढे पुण्य असले पाहिजे. पुण्यवान असल्याशिवाय हा नरदेह त्यांना कसा बरे मिळाला असता?

या विचारामुळे कोणत्याही विरोधकांबद्दल माझ्या मनात कटूता नसते. त्यांचा अपमान होईल अशी भाषाही त्यामुळे माझ्याकडून वापरली जात नाही. विरोधकांमुळे माझ्या हेतूला धक्का लागणार नाही एवढीच काळजी मी घेतो. बाकी आपल्याला काय करायचे आहे?

या पध्दतीमुळे माझे बरेचसे विरोधक माझे मित्र झालेले आहेत. अगदी जात धर्म सुध्दा मधे येत नाही. असो.

ह्या पानावरचा ६ मिनिटांचा व्हिडीओ बघितला. आऊट ऑफ द वे जाऊन काही करायचं नसल्यामुळे ‘झेपणेबल’ वाटतो आहे. निदान प्रयत्न तरी नक्कीच करुन बघता येईल. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

_/\_

मोहन की मीरा,
खूप ईन्स्पायरिंग आहे तुमचा प्रवास आणि लढाई. अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.
मी डाएट सुरू करताना माझे सगळे रिपोर्ट डॉ दीक्षित ना पाठवले होते. त्यांनी प्रोटीन खाऊन हे डाएट करायला सांगितले होते. >> हे बेस्ट केलेत.

मानव,
मोहन की मीरांना भागवतांनी लिहिलेला प्रतिसाद वाचलात का?
छान वाटले आणि शुभेच्छा ह्या खेरीज त्यांनी काहीही ईंट्रेस्ट दाखवलेला नाही. मोकीमी ह्यांच्या एवढ्या ईन्स्पायरिंग प्रवासात भागवतांना केवळ धागा आणि फेवर मधले प्रतिसाद कसे वाढतील ह्यातच ईंट्रेस्ट असल्यासारखं दिसत आहे म्हणून तो प्रतिसादही त्यांनी लेकी बोले सुने लागे करत वापरून सत्कारणी लावला. त्यांना कळकळ नेमकी कशाबद्दल आहे हे फारच गोंधळात टाकणारे आहे.

आय एफ आणि त्या अनुषंगाने दिक्षितांच्या आहारपद्धतीचा प्रसार करण्यासाठी जो जबाबदार आणि अनबायस्ड सूर हवा तो लेखात आणि प्रतिसादात आजिबात दिसून येत नाही. तुम्ही सई केसकरांचे लेख बघा ... ते अभ्यासू आहेत आणि बॅलन्स्ड सुद्धा...पण आग्रहाचा वा जाहिरातबाजीचा सूर आजिबात दिसत नाही.
आता ह्याला भागवत साहेबांचे लिखाणाकडे दूर्लक्ष्य म्हणावे की सोमि वर वैद्यकीय संदर्भात सल्ले देतांना ठेवायचे जे भान असते त्याबद्दलच्या अनुभवाची कमतरता. पण त्यांचा अंतस्थ हेतू चांगला आणि मदत करण्याचा असावा हे आधी लिहिल्याप्रमाणे अजूनही वाटते.

तुमची ही कथा मिसळपाववर पण शेअर करायचा विचार करत आहे. >>> ह्यावर तुम्ही स्वतःलाचा 'का?' असा प्रश्न विचारून पहा.

मला कुठे काही खूप छान दिसले तर मी माझ्या सोमिवरच्या दहा मित्रांना त्याबद्दल सांगेन... त्या जागेचे कौतूक करीन...पण जाहिरात का करेन?
कोणी ती जागा किती वाईट आहे असे म्हंटले तर आता ह्या अपप्रचाराने माझे नुकसान होते की काय असे वाटून अजून चार जणांपाशी माझा सात्विक वैताग का बोलवून दाखवेन.

आय एफला वैज्ञानिक आधार आहे.. तो आधार घेऊन दिक्षितांची फाईन ट्यून्ड आहारपद्धतीही त्याच आधारावर अवलंबून असेल जे खरंच चांगले आहे. पण त्याबद्दल चर्चा घडवून आणण्यासाठी आणि माहिती प्रसार करण्यासाठी आपला अभ्यास, रिसर्च, संशोधन, मत एकदा लेखात मांडले की झाले... त्यावर पुढे चर्चा होईलच. पण पुन्हा पुन्हा डॉ. दिक्षितांची जाहिरात करून नेमके काय साध्य होते आहे ते कळत नाहीये. आणि सर्वात चक्रावणारे जर काय असेल तर ते Intermittent Fasting बद्दलचा ऊल्लेख न करता... केवळ दिक्षितांचा आहारपद्धतीबद्दल बोलत आहेत.
म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा ऊल्लेख न करता ते गुरुत्वाकर्षण फिरुत्वाकर्षण वगैरे काही नसते हो ही आमची पद्धत वापरून रॉकेट लाँच करा.

भागवत साहेब साधक बाधक चर्चा घडून येण्यासाठी खालील प्रश्नांची ऊत्तरे देणार का?

दिक्षितांची पद्धत म्हणजे Intermittent Fasting आहे का?
असल्यास मग हातच्या कांकणाला थेट कांकणच न म्हणता आरसा दाखवत हे आमचे स्पेशल कंगन का म्हणायचे?
दिक्षितांची पद्धत Intermittent Fasting नसून वेगळी वा क्रांतीकारी असल्यास ती कुठल्या सायंस जर्नल मध्ये त्यांच्या नावावर छापून आली आहे का?
भाषणात/विडिओत सर्वसामान्य जनतेसमोर हे वैज्ञानिक रेफरंसेस देणे शक्य नसेल समजू शकतो, पण सोशल मिडियावरून नक्कीच ऊपलब्धं करून देता येतील. तर आम्हाला वाचण्यासाठी विडिओ व्यतीरिक्त लिखित स्वरूपात फॅन मेड साहित्य सोडून काही सायन्स पेपर्स ऊपलब्धं आहेत का?
यू-ट्यूब विडिओ म्हण्जे काही वैज्ञानिक आधार नाही हे तरी तुम्हाला मान्य आहे का?

स्मायली टाकण्याची तसदी कृपया घेऊ नका.
जर चर्चेच्या मुद्द्यांना ऊत्तरं असतील तरच लिहा.

वरच्या पोस्टमधून तसे ध्वनित होत नसल्यास थेट लिहितो की,
मी दिक्षितांच्या आहारपद्धतीवर आक्षेप घेत नाहीये ती Intermittent Fasting वर अवलंबून आहे हे माहित आहे.
जाहिरात का करावी लागत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

Pages