विविध आहार-प्रणाली आणि शरीराचा प्रतिसाद

Submitted by सई केसकर on 23 August, 2018 - 08:40

शाम भागवत यांच्या दीक्षित प्रणालीवरच्या धाग्यामुळे बरीच चर्चा झाली. त्यातून काही मुद्दे आले आहेत, ज्यांवर मी एक प्रतिसाद लिहायला घेतला होता. पण त्या प्रतिसादाचा लेखच होऊ लागल्यामुळे तो वेगळा लेख म्हणून इथे देत आहे. त्या चर्चेत आलेले काही प्रश्न आणि त्यांची (मला माहिती असलेली) उत्तरे इथे लिहीत आहे. पण त्या आधी एक महत्वाचा मुद्दा मांडण्याची गरज वाटते. आपण आहारात बदल, मग तो कुठलीही आहार प्रणाली (दर दोन तासांचा मिताहार (ऋजुता दिवेकर), आयएफ, दीक्षित, फाईव्ह टू, कीटोजेनीक) वापरून करीत असू. पण आपला मूळ हेतू काय आहे हे निश्चित असणे गरजेचे आहे. असे म्हंटले जाते की टाईप २ डायबेटीस हा लठ्ठपणामुळे होतो. पण अलीकडच्या संशोधनातून असे सिद्ध होते आहे की लठ्ठपणा हा टाईप २ होण्याचे पहिले लक्षण आहे. या दोन्हीमध्ये सूक्ष्मसा फरक आहे. लठ्ठपणा हा डायबेटीसचे कारण नसून ते एक लक्षण आहे. पण मग सगळ्या लठ्ठ व्यक्तींना डायबेटीस असतो का? याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. आणि सगळ्या सडपातळ व्यक्तींना डायबेटीस होण्याचा अजिबात धोका नसतो का? असेही नाही.

पण चाळिशीनंतर आहारात बदल करणारे, मग ते स्वयंप्रेरणेने असो किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने, बरेच लोक या पैकी एकाशी (लठ्ठपणा किंवा डायबेटीस) किंवा दोन्हीशी झगडत असतात. जे दोन्ही गोष्टींशी झगडत असतात त्यांचा एक उपगट होऊ शकतो. आणि अशा लोकांमध्ये अनुवांशिकतेमुळे आधी लठ्ठपणा आणि मग टाईप २ डायबेटीस अशी अधोगती झालेली दिसते. पण वरील पैकी कुठल्याही गटात तुम्ही असलात आणि तुम्ही वेगवेगळ्या आहार पद्धती वापरून तुमचे वजन किंवा साखर आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करत असाल तरी तुमच्या शरीराचा प्रतिसाद एकाच प्रकारचा असतो. आणि हे कसे होते ते मी इथे लिहायचा प्रयत्न करणार आहे. इथे मी शास्त्रीय रेफरन्सेस देत नाहीये कारण हे बऱ्याच पुस्तकातील माहितीवर आधारित आहे. ज्यांना जशी माहिती हवी असेल तशी आपण प्रतिक्रियांमध्ये चर्चेला घेऊ. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच एक संकलित धागा मिळेल.

वजन वाढीचे आणि ग्लुकोज वापराचे जीवरसायनशास्त्र

वजन कसं कमी होतं हे जाणून घेण्यासाठी शरीरातील एका महत्वाच्या अवयवाबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. ते म्हणजे पॅनक्रिया अर्थात स्वादुपिंड. या ग्रंथीला आपण शरीरातील "फूड डिस्ट्रिब्युशन मॅनेजर" असं म्हणू शकतो. आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम इथे तयार होणाऱ्या संप्रेरकांमुळे होत असते. स्वादुपिंडात अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि इप्सिलॉन अशी नावे असलेल्या पेशी असतात. त्यातून वेगवेगळी संप्रेरके सोडली जातात. आणि कुठलं संप्रेरक कधी येईल हे मात्र आपण खाल्लेले अन्न ठरवते. यातील दोन महत्वाची संप्रेरके आहेत इन्सुलिन आणि ग्लुकागॉन.

इन्सुलिन (ज्याची कमतरता किंवा अभाव यात डायबेटीस २ आणि १ होतात) रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे काम करते. इन्सुलिनचे हे एकच कार्य सामान्य लोकांना माहिती असते. पण इन्सुलिनचे दुसरे कार्य म्हणजे लिव्हर ला अतिरिक्त ग्लुकोज, ग्लायकोजेन आणि फॅट या रूपात साठवून ठेवायचे आदेश देणे. ग्लुकागॉन याच्या बरोब्बर उलट काम करतं. जेव्हा रक्तातील ग्लुकोज कमी होतं तेव्हा ग्लुकागॉन लिव्हर आणि स्नायूंमध्ये साठवलेल्या ग्लायकोजेनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं.७० किलोच्या माणसाच्या लिव्हरमध्ये १००-१२० ग्राम ग्लायकोजेन मावते. ग्लायकोजेनवर शरीर ८-१२ तास चालू शकते. आणि ग्लायकोजेन संपल्यावर ग्लुकोनियोजेनेसिस या प्रक्रियेतून कर्बोदके नसलेल्या पदार्थातून ग्लुकोज निर्मिती करतं. आणि फॅटचे किटोसिसनी केटोन मध्ये रूपांतर करतं. ग्लुकोज आणि कीटोन या दोन्ही इंधनांवर आपलं शरीर चालू शकतं.

कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. त्याखालोखाल प्रथिनांना इन्सुलिनचा प्रतिसाद असतो. आणि सगळ्यात कमी प्रतिसाद हा पालेभाज्या आणि फॅट्सना मिळतो. पण डाएटरी फॅटचा चुकीचा संबंध कोलेस्टेरॉलशी जोडला गेल्यामुळे फॅट्स बऱ्याच वर्षांपासून बदनाम झाले आहेत.

तुम्ही डाएट कुठलेही करा. वरील रसायनशात्र बदलणार नाही. आता फक्त कुठले डाएट हे या वरील साच्यात कसे बसते आणि यशस्वी होते हे समजून घेऊ.

१. थोड्या थोड्या वेळाने ५-६ वेळा खाणे

भागवतांच्या धाग्यात एक प्रश्न होता. की जर काहीही खाल्ल्याने इन्सुलिन स्रवते, तर दर दोन तासांनी थोडे थोडे खाल्ल्यास वजन का कमी होते?
तुम्ही कुठल्याही प्रस्थापित डाएटिशियनचा अशा आहाराचा दिनक्रम बघा. दर दोन तासांनी खायचे असले तरी ते काय खायचे याला अनन्यसाधारण महत्व आहे. बऱ्याच वेळा अशा प्रणालीमध्ये फॅट आणि कार्ब्स दोन्हीवर कंट्रोल असतो. शक्यतो शेवटचे जेवण हे सातच्या आत किंवा आसपास घेण्याचाही आग्रह असतो. अशा प्रणालीमध्ये एका जेवणात पोळी आणि भात एकत्र कधीच नसतो. मधल्या वेळेतील स्नॅक्ससुद्धा लो कार्ब्स म्हणावीत अशीच असतात. जसे की बदाम, ताक, ग्रीन टी, चीज इत्यादी. तसेच एका वेळी किती खायचे याला मर्यादा असते. साखर वर्ज्य असते.
काहीही खाल्ल्यावर इन्सुलिन स्त्रवते हे बरोबर आहे. पण ते किती स्रवणार हे आपले अन्न ठरवते. जर दोन दोन तासांनी आपण कमीत कमी इन्सुलिन स्रवेल असा आहार घेतला, तर
१. लिव्हरमध्ये ग्लायकोजेन साठणार नाही
२. मिळालेल्या थोड्या साखरेतून शरीराच्या पेशींना इंधन मिळत राहील
३. रात्री ७ ते सकाळी नाष्ट्यापर्यंत जे काही थोडेफार ग्लायकोजेन आहे ते वापरून शरीर फॅटवर चालू राहील.
पाहायला गेले तर इथेसुद्धा फास्टिंगची मदत घेतली जाते. पण ते सगळे तास झोपेतच गेल्याने ते आपल्याला जाणवत नाही.

२. आय एफ

आयएफ बद्दल मीच इथे खूप दळून झाले आहे. त्यामुळे अजून जास्त लिहायची गरज नाही. पण ऋजुता दिवेकर पद्धतीत आपण जे ५-६ वेळा खातो ते सगळे आणि थोडे अधिक या पद्धतीत २ वेळा खातो. आयएफचा सुटसुटीतपणा हा या दोन वेळेच्या पोटभर जेवणात आहे. पण इथेही पोळी, भात, साखर यांना लगाम लावला नाही तर या प्रणालीचा काहीही उपयोग नाही. इथे तुम्ही जेव्हा १६ किंवा अधिक तास इन्सुलिन तयार होईल असे काहीही खात नाही, तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. आणि तुम्ही २ जेवणात जे थोडे जास्त खाऊन ग्लायकोजेन जमवलेले असते, ते त्या १६ तासात वापरून थोडे फॅटदेखील वापरले जाते. यातील काही तास जागृतावस्थेत असतात त्यामुळे भुकेची तीव्रता तुम्हाला अनुभवावी लागते. मग समजा, आपण इथेही २ वेळा अत्यल्प खाल्ले तर? तर तुम्हाला लगेच भूक लागते आणि तुमचे आयएफ मोडते. तसेच ऍसिडिटी वगैरे होण्याचाही संभव असतो. त्यामुळे १६ किंवा अधिक तासांच्या फास्टिंगवर जर तुम्ही राहणार असाल तर पोटभर खाणे आवश्यक आहे. तसेच प्रथिनांचा आणि हेल्दी फॅट्सचा (फुल फॅट दही, दूध, चीज, अंड्यातील पिवळे) यांचा समतोल राखणे गरजेचे आहे.
याचेच व्हेरिएशन ५-२ डाएट आहे. यात ५ दिवस तुम्ही ३ वेळा जेवायचे आणि २ दिवस कर्बोदके आणि प्रथिनविरहित कडकडीत उपास करायचा. इथे पुन्हा रसायनशास्त्र तेच आहे. २ दिवस कुठलाही साखरेमध्ये रूपांतरित होईल असा स्बस्ट्रेट तुम्ही खाल्लाच नाही, तर नाईलाजाने लिव्हर आणि स्नायूंमधले ग्लायकोजेन वापरून नंतर फॅटवर शरीर चालते. २ दिवसांचा उपास दीर्घकालीन असल्यामुळे उरलेले पाच दिवस व्यवस्थित जेवता येते. तुम्ही फास्टिंगची वेळ जितकी वाढवाल, तितकी खायची मुभा तुम्हाला फीडिंग विंडोमध्ये मिळते. कारण दीर्घकाळ फास्टिंग केल्याने फॅटबर्निंग सुद्धा जास्त होते.

३. दीक्षित पद्धत

यामध्ये ५५ मिनिटांच्या २ विंडो दिल्या आहेत. त्यात तुम्ही तुमच्या संबंध दिवसाचा योजलेला आहार घ्यायचा आहे. साधारण सकाळी १२ आणि रात्री ८ अशा या २ वेळा असतात. रात्री ८ ते सकाळी १२ म्हणजे १६ तासाचे फास्टिंग आहे. म्हणजेच इथेही फास्टिंगचा आधार घेतलेला आहे. १२ पर्यंत काहीही खायचे नाही किंवा ४० कॅलरीजच्या आतले द्रवपदार्थ (जसे की २ चमचे दह्याचे ताक किंवा बिनसाखरेचा पाण्याचा चहा) घ्यायचे, हे अंगवळणी पडायला अवघड असले तरी एकदा सवय झाली की व्यवस्थित जमायला लागते. पण यात जर तुम्ही पोळी, भात साखरेचे प्रमाण वाढवले तर काय होईल? सकाळच्या जेवणानंतर तुमची साखर शूट होईल. त्यामुळे ती आटोक्यात आणायला बरेच इन्सुलिन लागेल. आणि उरलेल्या साखरेचे भरपूर ग्लायकोजेन बनेल. हा इन्सुलिन स्पाईक तुमचे शरीर आवरून ठेवते आहे तोपर्यंत ८ वाजताचे तसेच लोडेड जेवण येईल!
फॅट बर्निंग हवे असेल तर लिव्हर पुन्हा पुन्हा रिकामे झाले पाहिजे. आणि हे उपाशी न राहता साध्य करायचे असेल तर ज्या खाद्यपदार्थांनी इन्सुलिन तयार होते ते कमी खाल्ले पाहिजेत.
टाईप २ साठी तुम्ही हे डाएट करत असलात, तर जेवणाच्या कन्टेन्टबद्दल जागृक असणे जास्त महत्वाचे आहे. कारण टाईप २ मध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत. आणि फास्टिंगमुळे आणि कर्बोदके कमी केल्यामुळे, पेशींची प्रतिसाद द्यायची ताकद सुधारते. म्हणूनच असा आहार घेणाऱ्या बऱ्याच जणांचे मॅफॉर्मिनचे प्रमाण हळू हळू कमी होऊ लागते.

४. केटोजेनीक डाएट

वरील तीनही प्रणालींमध्ये आपण फास्टिंग आणि कर्बोदके नियंत्रित ठेवण्याचा खेळ बघितला. पण असेही एक डाएट आहे जे या सगळ्याला बगल देऊन एका क्रांतिकारी मार्गाचा अवलंब करते. आपण पहिले की कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद असतो. मग आपण कर्बोदके खायचे सोडूनच दिले तर? आपण ज्याला धान्य म्हणतो ते सगळे कर्बोदकांमध्ये मोडते. तसेच साखर. कीटोजेनीक डाएट मध्ये प्रत्यक्ष कर्बोदके (म्हणजे साखर आणि धान्य) वर्ज्य असतात. अप्रत्यक्ष कर्बोदके (जी भाज्यांमधून मिळतात) २० ग्रॅमच्या आत घ्यायची असतात. कर्बोदकांच्या मागोमाग प्रथिने रक्तशर्करा निर्मितीत सहाय्य करतात. त्यामुळे प्रथिनेही बेताची खाण्याकडे कीटोजेनीक डाएटचा भर असतो. आणि उरले काय? तर ८० % फॅट खाऊन हे डाएट गेले जाते आणि असे डाएट करून लोक वजनही कमी करतात आणि साखर सुद्धा नॉर्मल ठेवतात. कारण यांचे शरीर कधी ग्लुकोजवर चालतच नाही. सतत फॅटचे कीटोनमध्ये रूपांतर करून ही माणसे किटोसिसमध्ये असतात. जेव्हा शरीराला ग्लुकोज लागते, तेव्हा प्रोटीनपासून ते तयार केले जाते. याला ग्लुकोनियोजेनेसिस असे म्हणतात. त्यामुळे कर्बोदके खाल्ली नाहीत तरी शरीर व्यवस्थित (आणि याविषयात काही तज्ज्ञांच्या मते, जास्त चांगले) चालते. टाईप २ डायबेटीससाठी हे डाएट चांगले आहे हे दाखवून देणारे अनेक प्रयोग पाश्चात्य देशांमध्ये झाले आहेत.
अर्थात अशा नियमांमध्ये चपखल बसणारे अन्न मांसाहारी आहे. शाकाहारी कीटोजेनीक डाएट अतिशय अवघड आहे, पण भारतात लोक शाकाहारी कीटोजेनीक डाएट करतानादेखील दिसतात. इतके फॅट खाऊन कुणी वजन कमी करू शकेल का? याचे उत्तर हो आहे. कारण वरील रासायनिक प्रक्रियांमध्ये अत्यल्प इन्सुलिन तयार करण्याच्या गुणधर्मात फॅट चपखल बसते. असे डाएट करून एचडीएल वाढवून एलडीएल कमी झालेलया लोकांवर संशोधनही झालेले आहे. स्टीवन फिनी, टीम नोक्स, पीटर आटीया हे असे काही डॉक्टर्स आहेत ज्यांनी कीटोजेनीक डाएटवर संशोधनही केले आहे आणि आपापले ग्रुप्स तयार केले आहेत. यांची नावे गूगल केल्यास साऊथ आफ्रिकेतले बॅन्टिंग डाएट आणि अमेरिकेतील व्हर्टा ही संस्था काय करते ते वाचनीय आहे.
अर्थात कीटोजेनीक डाएट टोकाचे असल्याने त्याची सवय व्हायला वेळ लागतो आणि रोजच्या आयुष्यात काटेकोरपणे पाळण्यात अडथळे येऊ शकतात. तसेच, किटोसिसमधून बाहेर आल्यावर पुन्हा किटोसिसमध्ये जायला वेळ लागतो.

शेवटी, व्यायाम या सगळ्यामध्ये कुठे बसतो?

तुम्ही डायबेटिक असाल तर व्यायाम, तोदेखील कार्डिओव्हॅस्क्युलर, अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही उपाशी पोटी व्यायाम केलात, तर लिव्हरमधील आणि स्नायूंमधील ग्लायकोजेन झटकन वापरले जाते. त्यामुळे रक्तातील साखर स्नायूंमध्ये पुन्हा घेतली जाते. माझ्या स्वतःच्या अशा (अनावश्यक) प्रयोगातून असे दिसून आले, की व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतरच्या रक्तशर्करेत २० युनिटचा फरक पडतो. म्हणजे फास्टेड साखर १०० असेल तर ४० मिनिट सायकलिंग नंतर ती ८० झालेली असते! हा फरक तुम्ही डायबेटिक आहात किंवा नाही हे ठरवण्याइतका मोठा आहे.
पण हेच वेटलॉस साठी खरे ठरू शकेल का? समजा आपण फक्त व्यायामाने वजन कमी करायचे ठरवले आणि आहार भक्कम ठेवला, तर लिव्हर रिकामे करायला (ज्याला वर पहिल्या प्रमाणे ८-१२ तास शारीरिक क्रियांच्या माध्यमातून लागतात) किती व्यायाम करावा लागेल? आणि जरी आपण भरपूर व्यायाम केला, तरी शरीर "चालू" ठेवायला जेवढे उष्मांक लागतात त्यापेक्षा फारच कमी उष्मांक व्यायाम करून खर्ची पडतात. पण यामुळे व्यायाम निरुपयोगी आहे असे आहे का? तर नाही. व्यायामानाने अर्थातच ग्लायकोजेनचे साठे कमी होण्यास मदत होते. पण तो साखर कमी करण्यास जितकी परिणामकारक आहे तितकी वजन कमी करण्यास नाही. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण हे व्यायामापेक्षा महत्वाचे आहे. कारण अन्न आपल्या हॉर्मोनल सिस्टमवर जसा परिणाम करते तसा व्यायाम करत नाही. मात्र, व्यायामाने मेंदूमध्ये एंडोर्फिन्स सोडले जातात, ज्यामुळे आनंदी वाटते. त्यामुळे सतत व्यायाम करणाऱ्या लोकांना व्यायामाचे "ऍडिक्शन" होते. व्यायाम एक महत्वाचे अँटीडिप्रेसंट आहे.

शरीराचे रसायनशास्त्र समजून घेतले की काय खावे आणि काय खाऊ नये याचा अंदाज येतो. पण असे बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम आहे. तसेच गोळ्या असतील तर डॉक्टरना विचारूनच बंद करणे किंवा कमी करणे योग्य आहे. शेवटी कुठलेही डाएट आपल्याला आणि आपल्या जीवनशैलीला सूट होणे महत्वाचे. त्यामागील प्रिन्सिपल एकच असणार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय उत्तम लेख! एकदम सुटसुटीतपणे इतक्या मोठ्या विषयाचा मस्त आढावा घेतला आहेस.
धन्यवाद Happy

छान माहिती. लेख परत दोन तीनदा शांतपणे वाचून घ्यावा लागणार आहे.

मी जेव्हा नियमित जिमला जायचे त्या काळात माझा ट्रेनर नेहमी सांगायचा की जेवण व व्यायाम याचा वजनावर परिणाम 80:20 इतका आहे. त्याची या निमित्ते आठवण झाली.

छान लेख.
या सगळ्या पद्धतींनी वजन कमी होत असलं तरी काही इतक दुष्परिणाम असतात का? E.g. केटोजेनिक डाएटने वजन कमी होईल, पण इतकी फॅट खात राहिल्याचे काही इतर दुष्परिणाम असतील का?

मस्त लेख आहे सई.
>>आयएफ बद्दल मीच इथे खूप दळून झाले आहे. त्यामुळे अजून जास्त लिहायची गरज नाही. पण ऋजुता दिवेकर पद्धतीत आपण जे ५-६ वेळा खातो ते सगळे आणि थोडे अधिक या पद्धतीत २ वेळा खातो. आयएफचा सुटसुटीतपणा हा या दोन वेळेच्या पोटभर जेवणात आहे.>> आय एफ समजण्यात माझा काही गोंधळ झाला आहे का? माझी समजूत अशी आहे/होती की सकाळी १०/११ ते रात्री ७/८ ही जी विंडो खाण्याकरता ओपन असते त्यात तुम्ही ३,४ वेळा खाऊ शकता. (म्हणजे समजा १० वाजता नाश्ता, १२.३०- जेवण, ३ वाजता चहा आणि ७ ला रात्रीचं जेवण). किती आणि काय खाता हा मुद्दा महत्वाचा आहेच. दिक्षित डाएट पण तू म्हणतेस तसंच आहे की मग.

@सायो

आयएफ मध्ये विंडो असते. . पण मूळ तत्व २ मिल्स ए डे हेच आहे. म्हणजे ब्रेकफास्ट किंवा डिनर यापैकी एक काहीतरी स्किप करायचे. बहुतांश आयएफ करणारे लोक लंच आणि डिनर करतात. मध्ये एखादे स्नॅक असेल तर ते मूठभर बदाम वगैरे असते. पण कित्येक जण हळू हळू मधले स्नॅकिंग सोडून देतात कारण भूक अशी नियंत्रित होते की खावेसे वाटत नाही. काही काही लोक मग पुढे ओमॅड (वन मिल ए डे) कडे वळतात. काही लोक १६-८ करतात काही १८-६ काही २०-४. यात जो लहान आकडा आहे तो इटिंग विंडोचा आहे. काही वेळेस दुसऱ्या दिवशी बाहेर खाणे होणार असेल तर आदल्या दिवशी एकदाच जेवणे जमू शकते.

सई, सुंदर लेख.
बर्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात.
मला सतत पडत असलेला प्रश्न:
किटोज डायट मध्ये इतक्या फॅट/प्रोटीन मुळे किडनी वर ताण पडतो का?

>>> कारण भूक अशी नियंत्रित होते की खावेसे वाटत नाही.
माझा आयएफ सुरू केल्यास हाच अनुभव आहे - एकंदरीतच आहाराबद्दलचा दृष्टीकोन बदलतो. मिताहारात आनंद वाटू लागतो. आणि नेमकं म्हणूनच मला व्यक्तिशः ते सस्टेनेबल वाटतं.
मिळेल त्या विंडोत जमेल तितकं हादडणं असा अर्थ घेणार्‍या आणि तसं करणार्‍यांचं मला म्हणूनच नवल वाटतं. म्हणजे खाणं हाच धर्म आणि डायेट प्लॅन ही नाइलाजाने आणि मनाविरुद्ध करायची बाब आहे असा काहीतरी दृष्टीकोन बहुधा खूप खोलवर रुजलेला असतो का?
तसंच इथे अमेरिकेत सहसा फास्टिंगबद्दलच्या चर्चांमध्ये लोक प्रोटीन लॉसबद्दल फार कन्सर्न्ड दिसतात. मुळात शरीरात इतकी प्रोटीन्स पम्प करायची आवश्यकता असते का?

प्रामाणिकपणे सांगायचं तर हार्वर्डच्या सायंटिस्ट्सनी शुगर लॉबीला बळी पडून फॅटच फक्त डीमनाइज करणारे शोधनिबंध प्रकाशित केले वगैरे वाचल्यापासून मी तज्ज्ञ आणि त्यांचं रीसर्च पेपर्सवरचं अबलंबित्व याकडेही जरा संशयानेच पाहते.

किटोज डायट मध्ये इतक्या फॅट/प्रोटीन मुळे किडनी वर ताण पडतो का? >> सई ऊत्तर देईलच डीटेलमध्ये पण माझे चाराणे.
किटोज डाएट मध्ये कीटोसिस प्रक्रियेत कार्ब्स कमी करून शरीराला एनर्जीकरता फॅट वापरण्यास प्रोत्साहन देणे आणि शरीराला ह्या प्रकरच्या कंडिशनिंगची सवय लागेल असे बघणे आहे. बॉडीमधले सतत वापरले जाणारे फॅट्स रिप्लेस करण्यासाठी फॅट कंटेंट वाढवणे आवश्यक आहे. पण एक्सेस फॅट पुन्हा शरीरात साठून राहणार म्हणून कंटेंट वाढवतांना कीटोसिस प्रक्रियेतला फॅट लॉस ग्रुहित धरून फॅट ईंटेक ऑप्टिमल ठेवणे जरूरी आहे.

माझ्या मते शरीर जसे फॅट साठवून ठेऊ शकते तसे प्रोटीन्स नाही ठेऊ शकत. प्रोटीन्स मेनली मसल बिल्डिंग आणि रिकवरीसाठीच वापरले जाते आणि एक्सेस प्रोटीन किडनीवर ताण टाकतात कारण साठवून ठेऊ शकत नसल्याने शरीराला त्यांची विल्हेवाट लावावीच लागते. तरूणपणी ह्याने किडनी हेल्थवर फारसा विपरित फरक दिसत नाही पण वय वाढतांना किडनीवरचा ताण कमी करणे हितावह आहे.
कुठल्याही डाएटमध्ये वाढवलेले फॅट वा प्रोटीन ईंटेक प्रत्येक शरीराची गरज ओळखून (ह्यात फिटनेस गोल आणि डाएट मुळे बदललेल्या गरजा गृहीत धरून) 'ऑप्टिमल' नंबरचाच असायला हवा.
हा ऑप्टिमल नंबर अंदाजपंचे काढू शकतो पण डाएटिशनची मदत घेणे नक्कीच हितावह आहे.

>>>तसंच इथे अमेरिकेत सहसा फास्टिंगबद्दलच्या चर्चांमध्ये लोक प्रोटीन लॉसबद्दल फार कन्सर्न्ड दिसतात. मुळात शरीरात इतकी प्रोटीन्स पम्प करायची आवश्यकता असते का?
https://www.youtube.com/watch?v=Gj3o5A1wp5Q

खरंतर मला कीटोजेनीक डाएट पर्सनली इतके टोकाचे वाटते की मी त्याच्या लॉन्ग टर्म परिणामांचा विचार करण्याइतपत विचारच करू शकत नाही.
पण किटो करत असताना सोडियम घ्यावे लागते कारण किटोसिसमध्ये किडनी सोडियम डम्प करतात. तसेच कॉन्स्टिपेशन हा परिणाम आहे. त्यासाठी किटोवाले सिलियम हस्क (इसबगोल) पोळीतसुद्धा घालतात.
मी अशा कित्येक सोशल मीडिया ग्रुप्सवर आहे जिथे लोक किटो आणि फास्टिंग असेही एकत्र करतात.
पण पर्सनली मी कधी पूर्ण कार्ब्सरहित आहार घेईन असे मला वाटत नाही. २ जेवणांपैकी १ कार्ब्सरहित (एग्स, चिकन, चीझ ऑम्लेट इत्यादी) असते आणि एक व्यवस्थित १ किंवा १.५ पोळीवाले असते. एवढ्यात मी सुखी आहे.

मला हे असं एक्स्ट्रिम काही जमू शकत नाही. आपला घरचा जो नॉर्मल आहार आहे तोच कंटिन्यु करुन त्यात कमी जास्त फेरफार करुन काही करायचं तर जमू शकेल. म्हणजे पोळी एकच. आमटी, भाजी जास्त, भात अगदी दोन घास टाईप.
पण डाएट करतोय तर आपल्याकरता एकदम काहीतरी वेगळंच शिकवणं इज नॉट माय कप ऑफ टी.

सई, छान लेख,
संकल्पना सोप्या शब्दात समजावून सांगणे ,हे तुझ्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.

माझा अनुभव सांगते. आपण भारतीयांना कार्ब खायची इतकी सवय अस्ते की सुरुवातीला कार्ब सोडले की धडाधड वजन कमी होते. पण नंतर तसे टिकवता येत नाही, तेच लो कार्ब खाऊनही वजन काही कमी होत नाही. निदान मला तरी अडचण आली. तसे मी हे ल्दी खाते, फार काही जंक फूड खात नाही. नवरा सांगायचा की कॅलरी मोज, पण समस्त बायकांप्रमाणे मी लक्ष दिले नाही. वाटायचे, मी तर हेल्दीच खाते. मग एक दिवस खरेच कॅलरीज मोजल्या, मग शॉक बसला :-). नट्स हेल्दी, एग्ज हेल्दी वगैरे.. मग १ ते २ पौंड वेट लॉस एका आठवड्यात ह्या दराने माझी कॅलरीज की गरज नेट वरून काढली, आणि तसे खाणे सुरू केले. लो कार्ब नाही. ओट्स, भात, किन्वा सगळेच खाते. फक्त समोसे, चिप्स, इंडियन बफेट थांबवले. आणि २ महिन्यात ८-१० पौंड्स कमी झाले आहेत.

स्वाती,
तसंच इथे अमेरिकेत सहसा फास्टिंगबद्दलच्या चर्चांमध्ये लोक प्रोटीन लॉसबद्दल फार कन्सर्न्ड दिसतात. मुळात शरीरात इतकी प्रोटीन्स पम्प करायची आवश्यकता असते का?>>>> व्हिगन डाएट करणार्‍या (नुसते करणार्‍याच नव्हे तर संशोधन करून त्याप्रमाणे व्हिगन जीवनशैली अनुसरणार्‍या) लोकांच्या म्हणण्याप्रमाणे शरीराला प्रोटीन्सची इतकी गरज नसते. जे काही शाकाहारी, नॉन डेअरी जेवणातून प्रोटीन मिळते ते पुरेसं असते. माझा संदर्भ इथून घेतलेला आहे. मी तज्ञ नाही , त्यामुळे ते कितपत खरे आहे माहित नाही.
प्रामाणिकपणे सांगायचं तर हार्वर्डच्या सायंटिस्ट्सनी शुगर लॉबीला बळी पडून फॅटच फक्त डीमनाइज करणारे शोधनिबंध प्रकाशित केले वगैरे वाचल्यापासून मी तज्ज्ञ आणि त्यांचं रीसर्च पेपर्सवरचं अबलंबित्व याकडेही जरा संशयानेच पाहते.>>> याबद्दल अनेक अनुमोदन.

सायो, +१
टोकाचे डाएट केले किंवा पूर्ण आहारच बदलला तर उलट परीणाम होऊ शकतो.

मी दिक्षितांची आहार-प्रणाली आचरणात आणु इच्छीतो. पण मला हायपर अ‍ॅसिडीटी आहे. पोट जास्तवेळ रीकामे राहीले की, डोकेदुखी,मळमळ, ऊलट्या चालु होतात. म्ह्णणून जास्तीत जास्त वेळ [ साधारण पाच ते सहा तास] तिव्र भूक लागू नये, यासाठी कोणता आहार घ्यावा ?

Pages