फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

यात व्यायामाबद्दल कसे कोणी बोलत नाही? नुसत्या डायट कंट्रोल नवीन fat साचणे कमी होईल पण मूळ चे जे ' पुण्य ' आहे ते कमी करायला तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. किंबहुना , कोणताही आहार प्लान आणि व्यायाम हातात हात घालून गेले पाहिजे असे वाटते . एवढे बोलून मी खाली बसतो....

यात व्यायामाबद्दल कसे कोणी बोलत नाही? नुसत्या डायट कंट्रोल नवीन fat साचणे कमी होईल पण मूळ चे जे ' पुण्य ' आहे ते कमी करायला तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. >> बाबा मग त्याला फुकटात, विनासायास कसे म्हणता येईल Wink

व्यायामाशिवाय पर्याय नाही

>> बाबा, अगदीच फारशी गरज नाही. व्यायामाशिवायही वजन कमी होऊ शकतं. व्यायामाचा आणि फॅटलॉसचा तसा काही संबंध येत नाही. शरीरातली उपलब्ध उर्जा आणि फॅटस्वरुपात साठवली जाणारी उर्जा वापरली जाणे महत्त्वाचे आहे. ते व्यायाम करुन होते की बिनाव्यायामाचे त्याने काही फरक पडत नाही.

शरीराला दोन हजार कॅलरीची गरज आहे व शरीर पंधराशे कॅलरी सेवन करत असेल तर महिन्याला दोन किलो वजन आरामात कमी होतं. त्यात जर व्यायाम करुन रोज पाचशे कॅलरी खर्च केल्यात तर चार किलो कमी होईल. परंतु रोज दोन हजार कॅलरीची गरज आहे आणि अडीचतीन हजार कॅलरी सेवन केल्या आणि पाचशे कॅलरीच्या खर्चाचा व्यायाम घाम गाळून केला तरी ढिम्म फरक पडत नाही. अनेक जीममध्ये जाणार्‍या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. कारण त्यांना हे सांगणारं कोणी नसतं.

व्यायामाचा उपयोग शरीराच्या सर्व अवयवांची तंदुरुस्ती कायम ठेवायला, फ्लेक्सिबिलिटी ठेवायला आणि शारीरिक शक्ती वाढवायला होतो. तसेच व्यायामाच्या निमित्ताने काही महत्त्वाचे हार्मोन्स स्रवतात जे मूड चांगलाठेवण्यासोबतच इतरही अनेक फंक्शन्ससाठी गरजेचे असतात.

ढिस्क्लेमार-----माझे प्रतिसाद हे जनरल माहिती म्हणून स्विकारावे. हे कोणत्याही प्रकारे वैद्यकिय सल्ल्याच्या समकक्ष किंवा त्याऐवजी वापरण्यासाठी योग्य आहेत असे समजले जाऊ नये ही वाचकांना नम्र विनंती. आपल्या कोणत्याही आरोग्यसमस्येसाठी वैयक्तिकरित्या योग्य त्या तज्ञ सल्लागाराचे मत विचारावे व तेच समजून उमजून आचरण करावे.

डॉ. दीक्षित आणि डॉ. जिचकार साहेब यांचे यूट्यूबवरील व्याखाणे बघीतली, खूप छान वाटले आणि आजपासून हा डाएट प्लान सुरु करत आहे.
मित्रानो हा डाएट सुरु करण्या अगोदर मी ३-४ डाएट प्लान फॉलो केले आणि वजनामध्ये फरकपण झाला पण पोट कमी होत नव्हते, झाले तर फार कमी व्हायचे. चार वर्षापूर्वी वजन ८० किलो होते, माझी उंची १६७ से मी आहे. या उंचीला ६७ किलो वजन योग्य आहे असे मला समजले. मग काय रोज ५ - ८ किलोमीटर चालणे, योगा, सायकलिंग, खाण्यावर कंट्रोल हे सर्व करून मागील वर्षी याच महिन्यात माझे ६८ किलो वजन झाले. तीन वर्षामध्ये १२ किलो कमी केले, आणि आज एक वर्षांनी माझे वजन ७५ किलो झाले, मागील वर्षात व्यायाम खूप कमी झाला हे मी मान्य करतो पण खाण्यावर कंट्रोल अजून आहे... असो...डॉ. दीक्षित यांचे फेसबुक पेज वरील वजन कमी करण्याच्या यशोगाथा वाचून काढल्या आणि ठरवले आपणहि सुरु करू......आणि आजपासून सुरु केले.....धन्यवाद !

डाएट प्लॅन सुरू करून 1 महिना झाला, 1 महिन्यात चक्क 3 किलो वजन कमी झाले. पोटाचा घेर 2 इंच कमी झाला. डाएट मुळे काहीही त्रास झाला नाही. खूप फ्रेश वाटते नेहमी.

काल मी या डायटला सुरवात केलेली. सकाळी १० वाजता १ ग्लास कोमट पाणी घेतले.
१.३० वाजता १.५ चपाती, भाजी, १ वाटी वरणभात.
पण मला उलटी सारखे वाटू लागले. डोके खूप दुखत होते (हे १२ वाजल्यापासूनच सुरू झाले होते) ॲसिडीटी खूपच वाढली. संध्याकाळी आंबट उलटी झाली. डोकेदुखी सुरूच होती.
जे कुणी डायट करतात त्यांनी आपला दिवसक्रम सांगा ना.

नेल्सन, तुम्ही फेसबुकवर डॉक्टरना संपर्क करुन मग त्यांच्या सल्ल्याने डाएट सुरु केलेत तर? असं हा म्हणाला, तो म्हणाला नको. ते काही फी घेत नाहीत ना!
माझ्यामते दीड ही जेवणाची वेळ चुकली. सकाळी पूर्ण जेवण 10.30-11 ला करायचे आणि संध्याकाळी 5.30-6 ला. सासूबाई करतात म्हणून मला वेळ माहीत आहे.

निल्सन,
कोमट पाणी पण कोणाला झेपते कोणाला नाही.
तुमच्या वर्णनावरुन हे पित्त्+मायग्रेन आहे जे खाण्याच्या वेळा चुकल्यास्/नाश्त्यात डोसा वगैरे सारखे टू मच आंबलेले/पावासारखे मैदा प्रॉडक्ट खाल्ले तरी ट्रिगर होते.
मी उठसूट बरेचदा उपाशीपोटी गरम(कोमट) पाणी घ्यायचे तेव्हा पोटातून एक उष्णतेची लाट येते आहे, ती सुखकारक नाही असं जाणवायचं. (बहुधा यालाच अ‍ॅसिड रिफ्लक्स म्हणत असावेत.)
स्वतःला कोणत्या वेळी जेवण, कोमट्/नॉर्मल पाणी(फ्रिज मधले नाही)/त्यात लिंबू चालते वा नाही चालत हे प्रयोगांनी आणि डॉ सल्ल्याने ठरवावे लागते. (कधीकधी डायटिशियन एका ठराविक कँप मधली असली, ऋजुता वगैरे, तर सल्ले तसेच मिळतात.डायटिशियन नीट आपल्या जीवनपद्धतीत अगदी ड्रास्टिक बदल न करता हेल्दी बनवेल, त्यात आपल्या हेल्थ कंडिशन विचारात घेईल अशी बघावी लागते.)
तसेच मोठे बदल हळूहळू करावे लागतात.

टिळक स्मारक पुणे येथे झालेले त्याचे भाषण प्रत्यक्ष ऐकले , मी ओव्हर वेट नाही आणि मधूमेही नाही त्यामूळे मला फक्त त्यांची कन्सेप्ट ऐकायची होती ती फॉलो करण्याची शक्यता अजिबात नव्हती ,

मला त्यांनी सांगितलेल्या ब-याच गोष्टी पटल्या , अर्थात फक्त दोनदा खाणे हे मला किंवा पुण्याच्या खवय्याना एवढी सोपी गोष्ट नाही आणि गरज नसताना ती कोणी करत ही नाही , भले डॉक्टरांनी फूकटात भाषण दिले अस्ले तरीही :स्मितः:

सकाळी उठल्यानंतर चहा आणि काही वेळाने नाष्टा केल्याशिवाय दिवस सुरु होत नाही , दूपारसाठी डबा घेवून ऑफीसला गेल्यानंतर जेवणाच्या सुटीआधीच कोणी गार्डनचा खमंग वडापाव ऑफीसला मागविला असेल तर गेल उडत ते डाएट वगैरे असे म्हणून आस्वाद घेतला नाही तर कशाला जन्माला आलो आपण हा प्रश्न पडेल की . असच काहीस संध्याकाळी किंवा जेवणानंतरचे आईस्क्रीम घड्याळ बघून खाणे शक्य नाही .

कमी वेळा खाण एवढ सोडून किमान चालणे, पोहणे, सायकल चालवणे हे करायला पाहिजे हे पटले , अर्थात ते सर्व आधीपण करतच होतो पण आता अजून सातत्याने सुरु ठेवले. रोजच्या कोणत्याही तासभर व्यायामाने (रोज करत असाल तरच ) वजन नियंत्रणात राहते त्यासाठी इतका कडक डाएट करायची गरज आहे असे वाटत नाही , ज्यांना ते शक्य नाही त्यांनी हा विनासायास वेटलॉस कार्यक्रम किमान एकदा तरी करुन पहावा असच म्हणेन .

मी चार महिन्यापासून हे डाएट करत आहे.मी prediabetic होते.आता माझ्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या आहेत. मी glycomet 250mg दोनदा घेत होते.आणि सुरवातीला थोडे ऍडजस्ट करणे कठीण जाते,पण नन्तर त्रास होत नाही.वजनही कमी झाले आहे.flexibility वाढली आहे.तब्बेत जर चांगली रहाणार असेल तर एवढा त्याग करायला हवा असे माझे मत आहे.

निल्सन, मलाही ऍसिडिटी चा त्रास आहे. त्यामुळे मी जर सकाळी नाश्ता न करता दुपारी १ /२ ला जेवलो तर त्रास होईल. म्हणून मी ११ / ११:३० लाच जेवतो.

पण तुम्हाला नक्की काय प्रोब्लेम आहे हे डॉक्टर कडून आधी तपासून घ्या, मगच करा.

मिसळपाववर ह्याच विषयावर संयत भाषेत छान चर्चा चालू आहे.
तेथे श्री. वेदांत यांनी ६ ऑगस्ट रोजीच्या डॉ. दिक्षीतांच्या व्याख्यानाचा दुवा दिला आहे. त्यांना धन्यवाद.

वरील व्हिडिओ संदर्भात थोडेसे
६ ऑगस्ट २०१८ रोजी डॉ. दिक्षीतांनी पुण्यात दिलेल्या भाषणाचा हा व्हीडीओ आहे. वेळ ५५ः१९ मिनिटे

जागतीक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, २०२० पर्यंत भारतात जास्तीत जास्त मधुमेही रूग्ण असणार आहेत.

निरनिराळे डाएट प्लॅन का फसतात? किंवा त्यामध्ये सातत्य का ठेवता येत नाही?
१. काही प्लॅनमध्ये काहीतरी करून उपाशी ठेवतात. पण हे आयुष्यभर करणे जमणे शक्यच नसते.
२. काहीमध्ये असे काही भन्नाट पदार्थ सुचवलेले असतात. नंतर नंतर हे पदार्थ खाणे जिकीरीचे वाटायला लागते.
३. काहींमध्ये सतत किंवा रोज मार्गदर्शन घ्यायला लावतात. त्यामुळे पुढे पुढे स्वातंत्र्यच गमावल्यासारखे वाटते.
४.काही इतके खर्चिक असतात की पैसे संपल्यावर तो डाएट प्लॅनपण संपुष्टात येतो.
५. प्रत्येक माणसाची एक प्रवृत्ती असते. काहीं प्लॅनमधे त्या प्रवृत्तीविरोधातले खायला लागते. पण असे कायम करत राहणे जमत नाही.

पण जर डाएट प्लॅन यशस्वी व्हायला पाहिजे असेल तर तो प्लॅन कसा असायला पाहिजे? किंवा डॉ. दिक्षीतांचा डाएट प्लॅन मध्ये सात्यत टिकवणे का शक्य होते?
१. पैसे लागणार नाहीत.
२. तज्ञाकडे जायला लागणार नाही.
३. मशीन विकत आणायला लागणार नाही.
४. कुठलाही पूरक आहार विकत आणायला लागणार नाही.
५. आयुष्यभर आनंदाने करता आले पाहिजे.
जास्त माहितीसाठी पहा ३०ः०८ ते ३२ः २४

जिवनशैली बदला.
डॉ. दिक्षीतांनी ७ राज्यातल्या २७ शहरातील १००० मधुमेहींचा अभ्यास केल्यावर, मधुमेहावरील सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये काय बदल केला पाहिजे?
जास्त माहितीसाठी पहा ४४:३४ ते ४६ः२३

मधुमेहाबद्दल डॉक्टर लोकांना चुकीचे शिकवल गेलयं.
डॉक्टर लोकांना शिकवले गेलेय की मधुमेह हा बरा होणारा आजार नाही तर तो कायम वाढत जाणारा आजार आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे.
जास्त माहितीसाठी पहा ४६:२४ ते ४६ः५२

अवांतर : भागवत साहेब अभ्यास वाढवा असा शेरा येणार हे गृहित धरलेले आहेच. Wink
कृ.ह.घ्या.

भागवत, मी इथे वाचून आणि बहिणीने कळकळीने सांगितले म्हणून विडिओ बघितला.
मी आयेफ पास्ट मधे केले आहे. त्या ने फार फायदा होतो हे दिसलेच होते.
विडिओ बघण्यापूर्वी दोन वेळा श क्यच नाही , तर नकोच बघायला असा विचार केले ला.
पण बघितला आणि फारच भारी वाटले.
हे बघायच्या आधी २ महिने मी सगळ्याप्रकारचे डाएटस बंद केलेले. मोटिवेशन गेलेले. काहीही खात होते.. (असा पिरियेड मधे मधे कधीतरी येतो, वर्षातून - जेव्हा मी फ्रस्ट्रेशन मोड मधे असते.)
दिक्षितांचा विडिओ पाहिला आणि वाटले, ट्राय करून बघायला काय हरकत आहे..
३-४ आठवडे झाले.
मी आयेफ आणि दिक्षित दोन्ही पाळतेय. (सकाळी ९:३० आणि संध्याकाळी पाच अशा जेवण्या च्या वेळा)
वजन तर कमी झालेच आहे, पण कमी व्हायला अवघड अशा ठिकाणचा (पोट वगै रे) इंचेस लॉस सुरू झालाआहे.
मला पुन्हा हुरुप आलाय व्यायाम आणि डायेट चा.
मात्र हे आणि आयेफ दोन्ही मधे थोडा व्यायाम केल्या शिवाय फरक पडत नाही हा अनुभव आहे.
१. वजन कमी होणे, इंचेस लॉस २. आतून हलके वाटणे. ३. दोन वेळा च खाल्याने खूप वेळ रिकामा मिळणे
हे सरळ फायदे दिसतायेत.

_/\_

@निल्सन,
दोन जेवणांच्या मधे अजिबात न खाल्याने बर्‍याच जणांना त्रास होतो. याबाबत डॉ. दिक्षीत म्हणतात की, आपल्याला वेळोवेळी खाण्याची सवय झालेली असते. त्या सवयीला अनुसरून जठरात पाचक रस तयार होत असतात. त्यावेळेस जर खाल्ले गेले नाही तर ते पाचक रस अतिरिक्त ठरून अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

त्यासाठी असा त्रास होऊ लागल्यास प्रथम पाणी प्या. (कोंबट अजिबात नको. त्याने त्रास वाढण्याची शक्यता असते. गार पाण्याने बरे वाटण्याची शक्यता असते.) तेवढ्याने बरे वाटले नाही तर दोन चमचे घरी बनवलेल्या दह्यापासून २०० मिली. ताक पिऊन पहायला हरकत नाही. (हेही गार करून प्यायला हरकत नाही.) नारळाचे पाणी पिऊन पहायला हरकत नाही.

पण अ‍ॅसिडिटीच्या त्रासावर काळा/ग्रीन किंवा २५ टक्के दूध घातलेला बिनसाखरेचा गरम चहाचा उपयोग होण्याऐवजी त्रास वाढण्याचीच शक्यता वाढते. (ज्यांना चहाची सवय आहे त्यांना जिवनात एकदम पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते त्यांनी चहा प्यायला हरकत नाही. किंवा आपण काल रात्रीपासून काहीच खाल्लेले नाही या विचाराचा ताण ज्यांना सहन होत नाही त्यांनाही हा चहा मदत करू शकतो. )

तरीही उपयोग झाला नाही तर डॉ. श्रीकांत जिचकारांच्या व्हिडिओमधे दिलेल्या लो कार्बोहैड्रेट पदार्थ जसे काकडी, टरबूज पदार्थ खाऊन यावर मात करता येऊ शकेल. हे पदार्थ थोडे अल्कलाईन असल्यामुळे फायदा होऊ शकतो. मात्र हे पदार्थ खाणे ही तात्पुरती उपाययोजना आहे ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

दोन मुख्य जेवणाच्या व्यतिरिक्त इतरवेळेस खात राहून त्यावेळेस पाचक द्रव्य तयार करण्याची सवय आपणच आपल्या शरीराला लावलेली असते. ती सवय मोडून काढून फक्त दोन ठराविक वेळेतच पाचक रस तयार करण्याची नवीन सवय आपल्या शरीराला लागेपर्यंत हे करायला लागते. (या सर्व प्रक्रियेलाच दोन प्रमु़ख जेवणाच्या वेळा ओळखा असे डॉ. दिक्षीत म्हणत आहेत.) साधारणतः महिन्याभरात हे जमायला हरकत नसावी. एकदा हे जमले की, पुढे काही त्रास होईल असे वाटत नाही.

मात्र ज्यांना हा डाएट प्लॅन सुरू करायच्या अगोदरपासूनच अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य होईल कारण यामधे अ‍ॅसिडिटी होण्याची कारणे वेगळी असण्याची शक्यता असू शकते.

ज्यांना मधुमेह आहे अथवा जे मधुमेह पूर्वस्थितीत आहेत त्यांनी डॉ. जिचकारांनी सुचवलेले लो कार्बोहैड्रेट पदार्थ डायबेटीशिअनच्या सल्यानेच घ्यावेत.

पण कमी व्हायला अवघड अशा ठिकाणचा (पोट वगैरे) इंचेस लॉस सुरू झालाआहे.

नानबा,
डॉ. दिक्षीतांनी त्यांच्या डाएट प्लॅन बद्दल एक विशेष सांगितलेले आहे. ते म्हणजे
"इतर डाएट प्लॅनमधे गालफड थोडीफार बसतात. माणूस आजारीपण दिसायला लागतो. पण या डाएट प्लॅनमधे गालफड कधीही बसत नाहीत. कमी होणार्‍या वजनाबरोबर पोटाचा घेर ही कमी होत असतो."

थोडक्यात वजन कमी होतय पण पोट मात्र तिथेच राहतय, असे होत नाही. त्यामुळे हा डाएट प्लॅन झटकन विश्वास मिळवतो. त्यामुळे सातत्य टिकवण्याला फायदा होतो.

थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, या प्लॅनमधे नैराश्य यायची शक्यता कमी असते. कारण यात नियमांनी करकचून बांधल्यासारखे वाटण्याचे प्रमाण खूप कमी आहे.

यशस्वी डाएट प्लानची लक्षणे
{१. पैसे लागणार नाहीत.
२. तज्ञाकडे जायला लागणार नाही.}

Happy
नवीन Submitted by भरत. on 13 August, 2018 - 13:56

---- भक्त संप्रदाय कसे सुरु होतात हे मात्र वस्तुनिष्ठ पद्धतीने समजले....

डॉ. दिक्षीतांनी त्यांच्या डाएट प्लॅन बद्दल एक विशेष सांगितलेले आहे. ते म्हणजे
"इतर डाएट प्लॅनमधे गालफड थोडीफार बसतात. माणूस आजारीपण दिसायला लागतो. पण या डाएट प्लॅनमधे गालफड कधीही बसत नाहीत. कमी होणार्‍या वजनाबरोबर पोटाचा घेर ही कमी होत असतो."
थोडक्यात वजन कमी होतय पण पोट मात्र तिथेच राहतय, असे होत नाही. त्यामुळे हा डाएट प्लॅन झटकन विश्वास मिळवतो. त्यामुळे सातत्य टिकवण्याला फायदा होतो.
थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, या प्लॅनमधे नैराश्य यायची शक्यता कमी असते. कारण यात नियमांनी करकचून बांधल्यासारखे वाटण्याचे प्रमाण खूप कमी आहे. >>>>> आय एफ किंवा दिक्षितांनी सुचवलेला डाएट प्लॅन चांगला असेलही त्याबद्दल वाद नाही... तुम्हीही दिक्षितांचा अभ्यास व प्लॅन जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचावा ह्या ऊदात्तं हेतूनेच हा लेख लिहिला असेल..... पण दिक्षितांनी वा तुम्ही सरसकट ब्लँकेट स्टेटमेंट्स करून फॅक्ट्स न देता ईतरांचे अभ्यास आणि प्लॅन मोडीत काढून ते पाळणार्‍या लोकांना नाऊमेद का करावे?
ही चीप मार्केटिंग ट्रिक पटली नाही.
योगाभ्यास करणे चांगलेच आहे पण म्हणून आपले योगाचे घोडे रेटण्यासाठी पाश्चिमात्यांच्या जिम मध्ये जाऊन आयर्न पंप करण्याला वाईट का म्हणावे?
चांगल्या डाएट प्लॅनची महती सांगा पण तसे करतांना ईतर प्लॅन्सवर टीका करण्याची गरज पडू नये असे वाटते.... काय चांगले काय वाईट वाचकांवर सोडून द्या... गालफडं बसण्याचा, नैराश्य येण्याचा आणि आजारी दिसण्याचा अनुभव तुमचा स्वतःचा असेल तर तसे नमूद कराल का?

गालफडांबाबत जे लिहीलेय ते दिक्षीत सर जे म्हणतात त्यावर आधारीत आहे. तुम्ही तुमची मते मांडा की.
इतर प्लॅन दिक्षीत सरांपेक्षा कसे चांगले आहेत ते जरूर लिहा. लोक जे फायद्याचे असेल ते घेतील. अगदी मी सुध्दा त्याला अपवाद नाही.
Happy

२. तज्ञाकडे जायला लागणार नाही.

--- दिक्षितांच्या व्हॉट्सप गृपमध्ये दिक्षितांसह जे कोणी नवीन लोकांना मार्गदर्शन करतात ते तज्ञ नाहीत व असतील तर त्यांची गरज नाही असे म्हणायचे आहे का भागवत साहेब?

बाकी, दिक्षित काय म्हणत आहेत ते व्हीडिओ मध्ये स्पष्ट दिसु-ऐकु येत असतांना भागवत इथे "दिक्षित असे म्हणत आहेत तसे म्हणत आहेत" अशी काही विधाने करत आहेत, त्याची आवश्यकता काय ते काही कळले नाही. दिक्षितांची स्टेटमेंट्स इथे तुम्ही अ‍ॅडव्होकेट करत आहात का की बातमीदाराच्या भुमिकेत आहात की त्यांचे दूत म्हणून इथे लिहित आहात हे लै कन्फुझिंग आहे.

मिपावर संयत भाषेत चर्चा आहे, म्हणजे इथे नाही की काय? Wink

Pages