अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भीतीची लहर,
बोकलतचा कहर,
रात्री जेवण झाल्यावर सगळे अंगणात गप्पा मारत बसलो होतो, रात्री कधीतरी माझा डोळा लागला, रात्रीचे साधारण दोन अडीच वाजले असतील एका विचित्र घंटानादाने मला जाग आली,......(पुढील भाग लवकरच)

सुरवातीला मी जरासा गोंधळलो नंतर समजलं तो आवाज दूर शेतावरून येत होता. गावाच्या पश्चिमेला घनदाट झाडी होती. नंतर एक दीड किलोमीटर शेतीचा भाग आणि त्याच्यापुढे पूर्वेला माळरान. तर आवाज त्या घनदाट झाडीतून येत होता. सहज म्हणून मी नक्की काय प्रकार आहे हे पाहायला पुढे गेलो तर काळजात धस्स झालं पावलं जागेवरच थबकली, माझ्या मनगटावर लावलेलं यंत्र बीप बीप आवाज करायला लागलं, अमानवीय शक्ती आसपास असल्या कि ते यंत्र वाजतं. ती चक्क वेताळाची पालखी होती. सोन्याचा गोंडा लख्ख चमकत होता. आजपर्यंत जे फक्त ऐकत होतो ते माझ्यासमोर होतं डोळ्यांवर विश्वास बसत न्हवता. असा योग पुन्हा येणे नाही. काहीही करून गोंडा मिळवायचा आणि वेताळ गुलाम झाला कि त्याच्याकडून सोन्याचा हंडा मागून गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरवायची हा विचार पक्का केला. तसं पाहायला गेलं तर सरळ जाऊन तो सोन्याचा गोंडा मी हिसकावून आणू शकत होतो. परंतु शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या तत्वावर चालणार मी असल्याने युक्तीने तो गोंडा आणण्याचं ठरवलं. मी हळूहळू बांधांमागे लपत लपत त्या पालखिजवळ गेलो. सगळ्यात पुढे लहान पोरं त्यांच्या पाठीमागे बायका नंतर बाप्ये आणि वाजंत्री, सगळ्यात शेवटी वेताळाची पालखी आणि आजूबाजूला १५-२० म्हातारे अशी रचना होती,बायका बाप्ये पोरं सगळेच भान हरपून नाचत होते. पालखी जवळ आल्यावर बेमालूमपणे मी त्यांच्यात मिसळलो. आता सोन्याचा गोंडा चक्क एक हात जवळ होता पण पालखीत आग्या वेताळ बसला होता, निखाऱ्यासारखे लाल भडक डोळे, शक्तिमान मधल्या किलविष सारखं नाक, दोरखंड सारखे केस, माझ्याजागी दुसरा कोणी असता तर भीतीने पार बोबडी वळली असती पण मी खंबीर होतो आणि विषय गंभीर होता. पाच मिनिटं झाली असतील आग्या उठायचं नाव घेत न्हवता. कंटाळून मी गोंडा खेचायला जाणार इतक्यात चमत्कार झाला आणि झिंगाट गाणं वाजंत्र्यांनी सुरु केलं, गाण्याचे सूर ऐकून आग्याच्या अंगात वारं संचारलं आणि पालखी सोडून सगळ्याच्या पुढे जाऊन नाचू लागला. मिळालेल्या संधीचं सोनं करत मी सोन्याचा गोंडा उचलला आणि आल्या पावली माघारी वळलो. वेताळाच्या गोटात एकच खळबळ माजली होती. दुसऱ्या दिवशी गावात अनेक कुत्र्या मांजरींचा सुळसुळाट झाला होता. वेताळाचे हस्तक पशु पक्षांच्या रूपात येऊन गोंडा कोणी पळवलाय याचा शोध घेत होते. मी मजेत चहा पीत पीत त्यांची केविलवाणी धडपड पाहत होतो. त्यातलेच दोन चार धीट माझ्या घराची पाहणी करण्याकरता घरी शिरले. मग मात्र माझी सटकली, एका कुत्र्याची मानगूट धरल्यावर सगळे त्यांच्या मूळ रूपात आले आणि माझ्यावर हल्ला चढवला. परंतु एकाच वेळी दोन तीनशे जणांना लीलया लोळवणारा मी, माझ्यावर चौघांनी हल्ला करणं म्हणजे पेटत्या तेल विहिरीची आग फुंकर मारून विझवण्याचा प्रयत्न करण्यासारखं होतं, त्या चौघांचाही चपलेने आणि पोकळ बांबूने खरपूस समाचार घेतला, शेवटी गयावया करून पाया पडायला लागले तेव्हा मला त्यांची दया आली, मग घरातली धुणी भांडी त्यांच्याकडून करून घेतली आणि संध्याकाळी त्यांच्याकरवी वेताळाला निरोप पाठवला गोंडा पाहिजे असेल असेल तर सोन्याचा हंडा घेऊन रात्री बारा वाजता स्मशानाजवळ भेट. मी रात्री स्मशानाजवळ गेलो तेव्हा वेताळ आधीपासूनच वाट पाहत झाडावर लटकला होता. मी येताना दिसताच लगबगीने माझ्याजवळ आला आणि सकाळी त्याच्या हस्तकांनी माझ्या वर जो हल्ला केला त्याबद्दल माफी मागून सोन्याचा भरलेला हंडा माझ्या हवाली केला. दुसऱ्या दिवशी मी गावातल्या सगळ्यांना सोन्याची दोन दोन बिस्किटं दिली. गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला न्हवता. मी परत निघते वेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.आत्याचा उर अभिमानाने भरून आला होता. सगळ्यांनी मला अनेक आशीर्वाद दिले आणि रथातून माझी मिरवणूक एस टी स्टॅन्ड पर्यंत काढली. मुंबईची एस टी आली तसा मी आतमध्ये चढलो परंतु गावकरी खूपच भावुक झाले होते, मग मी लवकरच परत येऊन पुन्हा सोन्याची बिस्कीट देण्याचं आश्वासन दिलं तेव्हा सगळ्यांनी बोकलत नावाचा जय जयकर केला, अगदी माझी गाडी दिसेनाशी होईपर्यंत मला निरोप दिला. समाप्त.

मानव पृथ्वीकर यांनी माझ्या सन्मानार्थ नवीन सिग्नेचर दिली आहे,
बोकलतांचे घरी,
हडळी पाणी भरी.
इथून पुढे ही सिग्नेचर मी लेखाच्या सुरवातीला टाकणार आहे, तर ही सिग्नेचर दिसल्यास पुढील भयकथा वाचून धागा भरकटवू नये ही नम्र विनंती.

बोकलत या धाग्यावर मला फक्त तुमच्याच पोस्ट्स सत्य आणि वास्तववादी वाटतात. तुमच्या पदर्पणापासूनच मी हा धागा नियमित वाचायला लागले, तो पर्यंत हा धागा पहिल्या पानावरच्या लिस्टमधून जाण्यासाठी मी फक्त उघडून बँद करायचे. अचानक पोस्ट्सचा पूर यायला लागला,म्हणून वाचायला सुरुवात केली आणि तुम्ही सापडलात. भरपूर करमणूक झाली. आता तुमच्या डझनभर फॅन्स क्लब मध्ये मी पण. बरं ती सिग्नेचर टाकणं चालू राहू दे, मला शोधायला सोपं पडतं. Wink :फिदीफिदी:

हा धागा आता प्रशासनाने सोडून दिलाच असेल तर महीन्याचा किराणा, घराचा हप्ता, सोसायटी, फंड, इन्शुरन्स, गाडीचा इन्शुरन्स, रिव्हर्स मॉडगेज कर्जाचा हप्ता, फर्निचरचा हप्ता, गाडीचा हप्ता, वीजबिल, दूध, पेपर, सोसायटी मेन्टेनन्स, घरपट्टी, पाणीपट्ती, गॅस, फोनची बिलं, क्रेडीट कार्डाचे बिल, पेट्रोलसाठी पैसे, इस्त्रीवाला, बाई अशी सगळी आकडेमोड इथेच करत जाऊ का ? शोधायला सोप्पं पडेल. कागदावर केली कि तो कागद कुठल्या कच-यात जातो समजतच नाही.

वेताळबा
मला माहित आहे खालील गोष्टी वर तुमचा विश्वास बसणार नाही तरी जे सत्य आहे ते मी सांगत आहे फक्त अमानवीय धाग्यांच्या वाचकांसाठी..(ज्यांना मनोरंजनात्मक व काल्पनिक वाचायला आवडते त्यांनी बाजारातून चंपक व चांदोबा आणून वाचावे.. )
माझी आई सांगायची कि त्यांच्या माहेरच्या शेतात वेताळबा आहे. आईच्या माहेरची त्याला खूप मानतात. माझे आजोबा भूतांबरोबर फिरायला जात , रात्री भुते येऊन त्यांना हाका मारत. त्यांच्या हाकेला ओ द्यायची नसते. हाक आली कि आजोबा त्यांची पिशवी घेऊन जात त्यात एक थाळी ज्याला मध्यभागी भोक पाडलेले आहे , विबीत व शंख असे. बाहेर मग त्यांच्या गप्पा होत, पंचपक्वान्न ते आजोबांना खायला देत. पहिला माणसांचे खाणे पण भरपूर असायचे फक्त खाताना "आता बास " असे नाही म्हणायचे.. म्हणून आजोबा अगोदरच त्या ठिकाणी एक खड्डा काढत व त्या थाळीतून थोडे थोडे अन्न त्या भोकातून खड्ड्यात टाकत. आणि शेवटी तो शंख वाजवत घराकडे येत . शंख वाजवताना भुते बोंबलत सुटत व सावळ्या तू आमचा घात गेलास असे ओरडत व पूढील अमावस्येला परत बोलवायला येत.
आता मी जेंव्हा हि कथा आई कडून लहानपणी ऐकत असे तेंव्हा ती खरी वाटायची.. नंतर जरा मोठेपणी वाटू लागले कि आज्जीने आईला काहीतरी सांगितले तेच आईने आम्हाला सांगितले किंव्हा माझा आजा कदाचित लै हुशार असलं बिचार्या आज्जीला थाप मारून मित्राबरोबर रातीच तमाशाला किंव्हा हूंदडायला जात असलं.... मग मी पुढे पुढे आईला प्रश्न करायला सुरवात केली कि मग आजोबा का जायचे भुताबरोबर.. तर म्हणे त्यांच्या कडून आजोबानी खूप काही शिकून घेतले जसे माझ्या आजोबांना पक्षांची भाषा कळत होती,विंचू साप चावला तर ते उतरून द्यायचे वगैरे...जसे आणखीन मोठा झालो तस मनाला कळत गेलं कि आई अडाणी आहे त्यामुळे तिला हे आज्जीने सांगितलेलं खरं वाटणारच आपण आता शाळेत जातो चार पुस्तक वाचतो आपण हुशार आहोत असल्या गोष्टी खऱ्या नसतात.. पण आई त्या शेतावरील वेताळबाचा उल्लेल्ख करी कि तो अगदी छोटासा दगड होता आता त्याचा आकार वाढत आहे.. त्या दगडाला हात पाय पण फुटले आहेत.. मला ते पाहायचं होत पण आत्ता त्या गावी मामा राहत नाही इतर दूरचे पाव्हणे आहेत त्यामुळे तिकडे जायचा योग आला नाही.. माझी वाहिनी म्हणजे मामाची मुलगीच तिने एकदा वेताळबा सोबत काढलेला फोटो दाखवला तेंव्हा तो बेताळबा म्हणजे दगड चांगलाच उंच दिसत होता व त्याला डोक्याला जटा दिसत होत्या जस्या माणसाला असतात सर्व दगडाचे.. मी वहिनींना विचारलं कि हा दगड मोठा होतो असे आई सांगत असते ते खरं आहे का तर वाहिनी म्हणाल्या त्यांनी त्यांच्या लहानपणी पाहिलेला वेताळबा आणि आत्ताचा यात फरक आहे तो मोठा झाला आहेच पण आता त्याला कुबड आलेलं आहे चेहरा बघण्यासाठी खाली वाकावं लागत कारण जटामधून चेहरा नाही दिसत. मी पहिला त्यावेळी ताठ उभा होता तो...
आणि त्या नंतर एकदा मला तो कुबड आलेला खाली वाकलेला डोक्यावर जटा झालेला वेताळबा पाहायला मिळाला.. मी स्वतः डोळ्यांनी पहिला म्हणुन आज इथे लिहीत आहे..

गोव्यात, कोकणात खूप ठिकाणी वेताळाची मंदिरे आहेत. काही ठिकाणी त्याला, वेताळ, वेतोबा किंवा बेताळ, देवचार असे संबोधले जाते. काही ठिकाणी राखणदार, आजोबा किंवा सिमेकरी. प्रत्येक गावचा एक राखणदार किंवा त्याच्या अखत्यारीत जितके गाव किंवा एरिया नेमलेला आहे तेवढा. राखणदार, आजोबा किंवा सिमेकरी यांचा वेष धोतर, डोक्याला मुंडासं, खांद्यावर घोंगडे, पायात कोल्हापुरी वहाण व हातात घुंघराची काठी असा असतो. तर वेताळ किंवा बेताळ, पायघोळ धोतर अंगावर दागिने, मुकूट, ढाल तलवार अशा वेशात मुर्ती असते. काही मंदिरात नग्न मुर्ती असते. काही मुर्ती पुरूषभर उंचीच्या तर काही फक्त तीन ते साडेतीन फूट. कुठे मुर्ती पाषाणी, तर कुठे लाकडी. फक्त ज्या लाकडाची मुर्ती असते, ते लाकूड गावकरी जाळत नाहीत. खूप ठिकाणी स्मशानात सुद्धा असलेली नग्न वेताळाची मंदिरे पाहाण्यात आहेत. पुर्वीच्या काळी दळणवळण साधने, वीज नाही तेव्हा रात्री अपरात्री घरी जायला जर उशीर झाला तर बिनधास्त सोबतीसाठी राखणदाराला हाक मारायची व तो आपल्याला घरापर्यंत सोडायला येतो, अशी एक समजूत होती. काही ठिकाणी व्यक्ती दिसते तर काही ठिकाणी फक्त पेटवलेली चुड (माडांच्या झावळ्यांपासून बनवलेली मशाल टाइप ) दिसते. म्हणजे तो जवळपास आहे हे समजून चालायचे.
गोव्यात जेव्हा शिमगा असतो तेव्हा अगदी आजही काही चमत्कारिक विश्वास न बसणार्‍या गोष्टी घडतात. त्यातील एक म्हणजे साळ या गावातील गड्यांची जत्रा.

अनामिका तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी आणि तुमचे अनुभव सुद्धा लिहा. आवडतात वाचायला आम्हाला.

"साळ" या गावचा गडे उत्सव खूप प्रसिद्ध आहे. उत्सवाची सुरूवात होते होळी पोर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी. साठ ते सत्तर फुटाची होळी असते. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार हा उत्सव चालतो. भावीकांची तसेच जिज्ञासूंची चिकार गर्दी असते. अशीच एकदा एक जर्मन बाई आली होती. तिला ह्या सगळ्यावर एक डाॅक्युमेंटरी बनवायची होती त्यांच्या एका चॅनेलसाठी, म्हणून तिने चोरून शुट केलं पण तिच्या कॅमेर्‍यात काहीही कॅपचर्ड झालेलं नव्हतं. अंधश्रद्धा निर्मूलन वालेही इथे येऊन गेलेले आहेत. (मी त्यांच्या विरोधात नाहीये. ) ते आपलं काम करतात आणि त्यांच्यासाठी अगदी हॅट्स ऑफ. महाराष्ट्रात, कर्नाटकात अनेक भोंदू साधू , अमुक रकमेचे डबल, पैशांचा पाऊस, नरबळी वगैरे प्रकार त्यांनी बंद केलेले आहेत. त्यामुळे त्यांची कार्यपद्धत जशी असेल तसंच त्यांनी वागावं व जर खरच अंधश्रद्धा वगैरे असतील तर त्या दूर कराव्यात. असो. तर त्यांनाही हे गूढ अजून तरी उलगडलेले नाही.
प्रत्येक गावचा एक राखणदार किंवा देवचार असतो. "ती" मशाल दाखवतांना प्रत्यक्ष पहाण्याची संधी ही साळातल्या गडे उत्सवात मिळते. ही इथल्या जागृत भूमीका देवीची कृपा असे जाणकारांकडून सांगितले जाते. गडे हे चौसष्ट असतात, त्यामुळे त्यांना चौसष्ट योगिनींचे प्रतीक मानले जाते. कधी ते बावन्न तर कधी चाळीस ही असतात. म्हणजे जर कधी एखाद्या गड्याला ऊत्सवात भाग घ्यायचा नाही तर त्याने गावच्या सीमेबाहेर रहावे, गावात प्रवेश केला तर संचार होउन ऊत्सवात सामिल होणे भाग पडते. गड्यांचा वेष म्हणजे बनियन, पांढरे धोतर, कमरेला जाडजूड पट्टा. व अनवाणी. साधारण 11.30 ते 12.00 च्या दरम्यान देवीचं तीर्थ घेतल्यावर गड्यांच्या अंगात संचार होतो व पहिल्या रात्री ते करूल्या म्हणजे मातीची तोंड बंद असलेली मडकी शोधायला निघतात. हे करतांना त्यांना खूप वेळ लागतो. व प्रत्येकाला मिळाल्यावर होळीच्या ठिकाणी परत येतात. अगदी म्हातारे गडे एरवी काठी घेऊन चालणारे, संचारात एखाद्या तरूणालाही लाजवतील अशा आवेशात पळतांना दिसतात. परत येतांना काही नवीन गड्यांना देवचार लपवून ठेवतो. ते दोन ते तीन दिवसांनी परत दिले जातात. त्या दिवसांत ते कुठे कसे रहातात? काय खातात? हा पत्ता खुद्द त्यांनाही नसतो. होळीकडे करूल्या ठेवल्यानंतर उर्वरित गडे बाकींच्या शोधात निघतात तेव्हा हजारोंच्या संख्येने लोक गड्यांच्या मागोमाग देवचाराची मशाल बघायला धावतात. व जिथे गडा मिळणार तिथे देवचार मोठी चुड (मशाल) पेटवून दर्शन देतो. गड्याला चार गडे खांद्यावर घेऊन परत होळीकडे आणतात व देवीचे तीर्थ पाजले जाते. दोन गडे ह्या बेशुद्ध गड्याला घेऊन अक्षरशः फरफटत नेउन प्रदक्षिणा घालायला सुरुवात करताच तो शुद्धीवर येतो व परत धावायला लागतो. मग सगळे गडे परत रानात धाव घेतात, व तिसर्‍या दिवशी स्मशानातून जळकी लाकडे, मडक्या, हाडे काही बाही आणतात. त्या रात्री प्रत्येक घराची दारे खिडक्या बंद ठेवण्यात येतात. गडा नेसलेल्यांना तीन दिवस गावाच्याबाहेर जाता येत नाही, तसेच सीमेबाहेर कोणीही जावू नये असा रिवाज आहे. अशा रीतीने हा उत्सव तीन दिवस चालतो.

राखणदार बद्दल मी पण ऐकले आहे. माझ्या आजोळच्या घराभोवती एक भुजंग फिरायचा, तो फक्त आजीला दिसायचा.
तोच राखणदार होता असे मी त्यांच्या बोलण्यात ऐकलेले.

माहितीबद्दल, धन्यवाद या माहितीबद्दल. रात्रीस खेळ चाले या सिरीयल मध्ये पांडुने या होळी उत्सवाबद्दल माहिती सांगीतली होती.

हो कविता, आणि ह्या पादुका(जोडे चामडी) एक फुट तरी असतील बहुतेक. खूप लोक नवस पण बोलतात पादुका अर्पण करण्याचा. खूप वर्षं झाली आरवलीला जाऊन. "रात्रीस खेळ चाले" चे मधले आणि शेवटचे काही भाग मिस केले होते रश्मी. बहुतेक त्यामुळे पांडूची स्टोरी मिस झाली. आई सांगते की नव्या कोर्या पादुका नंतर झिजलेल्या असतात. वापरून झिजल्यासारख्या.

हो अनामिका
गेल्या वर्षी गावी गेल्यावर मी निरखून बघितल होतं.
पादुका खरच झिजलेल्या असतात.
IMG_20181005_165909.jpg

अरे व्वा...खूप दिवसांनी काहीतरी वेगळे वाचायला मिळाले...अनामिका, रमेश रावल आणि बाकी सर्वांनी लिहित रहा Happy

धन्यवाद एन्जेलिका, उमानु.
विनिता, सापाच्या रुपात वावरणाऱ्या राखणदाराबद्दलही ऐकले आहे. असे म्हणतात की, ठराविक वास्तु, बाग, किंवा देवाची जागा अशा ठिकाणी त्याचे वास्तव्य असते. त्याचे पूजन केले जाते. तो कुटुंबाचे रक्षण करतो असा समज आहे. त्यासाठी ठराविक दिवशी ,वारी(बुधवार, रविवार) तुपाचा दिवा वगैरे लावतात.

अनामिका
घरात वेतोबाला पुजलं का जात नाही हे माहित असेल तर सांगा ना..

कविता, वेतोबा संरक्षक देवता जरी असली तरी भुतप्रेतांचा अधिपती व उग्र देवता आहे.
तसेच त्याच्या बरोबर त्याची सेना, भूतपिशाच्य असतात त्यामुळे शक्यतो घरात पुजलं जात नाही.
त्यांच्या स्थानी म्हणजे तिथल्या वहिवाटी प्रमाणे त्यांचा नैवेद्य असतो. काही ठिकाणी केळी व नारळ तर काही ठिकाणी चक्क दारू व रोट. (आपल्या दहा भाकर्‍या एकत्र थापल्या तर हा बनेल. ) पिठाचा एक जाडजूड पदार्थ असतो. व कधीकधी त्यातही दारू मिसळतात.
पण काही घराणी याला अपवाद आहेत. जसं की देवी शर्वाणी बरोबर देव वेताळ पुजला जातो. तसे फोटो लावलेले पाहाण्यात आहेत. देवीचा मदतनीस किंवा सेनापती. आपलं कार्य त्याच्याकडून देवी करून घेते असं म्हणतात. कधीकधी काही घराण्यात पूर्व परंपरेनुसार देवघरात देव वेताळाचे फोटो ठेवलेले आढळतात व परंपरेने कुलाचाराचा भाग म्हणून पुजले जातात. शक्यतो उग्र देवता घरात मुद्दाम पूजत नाहीत, पण कुणाची कुलदेवताच जर उग्र देवता असेल तर तोही अपवाद असतो. त्यामुळे घरात कुलदैवताची पुजा जरूर करावी.

कणकवली पासुन सुमारे ३२ व देवगड पासून ३५ किलोमीटर अंतरावर मालवण तालुक्यात चिंदर म्हणून गाव आहे. तेथे प्रत्येक ३ वर्षांनी डिसेंबर महिन्यात एक विचित्र घटना होते. त्या घटनेला लोक गाव पळ असे म्हणतात.जेव्हा गाव पळ असते तेव्हा गावातले सगळे लोक स्वताच गाव सोडून जातात ३ दिवसा साठी. ३ दिवस गाव पूर्ण ओसाड असत कोणीही राहत नाही गावात एवढाच काय तर त्या ३ दिवसात गावात एस. टि बस सुधा येत नाही. कणकवली बस डेपोत आधीच सूचना दिलेली असते कि ३ दिवस चिंदर मध्ये एस.टि सेवा बंद आहे.
हे ऐकून मला कुतूहल वाटले म्हणून मी विचारले कि मग ३ दिवस काय होत कोण राहत तिथे आणि गाव सोडून सगळे का पळतात . तेव्हा त्या म्हणाल्या हे गाव त्या ३ दिवसात भूतानी झपाटलेल असत . ३ दिवस या गावावर फक्त भूतांच राज्य असत. गाव खूप सुंदर आहे घरापासून २ मिनटांच्या अंतरावर एक नदी सुधा आहे. जेव्हा गाव पळ असते तेव्हा वाडीतले सगळे लोक नदीच्या पलीकडे जाऊन छोट्या छोट्या झोपड्या बांधून राहतात. गावात फक्त सकाळी ८ ते १२ या वेळेत न आवाज करता काही पुरुष मंडळी जी धीट आहेत तीच पिण्यासाठी लागणार पाणी किवा इतर वस्तू आणायला जातात.आणि १ २ वाजण्याच्या आत पुन्हा परत येतात.

यंदाच्या डिसेंबरला पण पळ आहे तेव्हा जाऊन पाहावे ...

कणकवली पासुन सुमारे ३२ व देवगड पासून ३५ किलोमीटर अंतरावर मालवण तालुक्यात चिंदर म्हणून गाव आहे. तेथे प्रत्येक ३ वर्षांनी डिसेंबर महिन्यात एक विचित्र घटना होते. त्या घटनेला लोक गाव पळ असे म्हणतात.....
यंदाच्या डिसेंबरला पण पळ आहे तेव्हा जाऊन पाहावे ...
Submitted by भुत्याभाउ on 10 October, 2018 - 01:18

हे 'आचरा' गावात होते. माझी आत्या आचरा या गावातील पिरावाडीमध्ये राहते. आचरा हे गाव चिंदरच्या पुढे आहे. (कणकवली-आचरा मार्गावर कणकवलीहून आचरा येथे जाताना आधी चिंदर आणि मग आचरा येते.)

https://youtu.be/AiI9R5hBw_w
हा व्हीडीओ पहा. (हा मूळ ABP Majha चा सुमारे ३-४ वर्षांपूर्वीचा video आहे. तेव्हाच मी download करून ठेवला होता. आता त्यांनी तो Youtube वरून काढून टाकला आहे, म्हणून मी माझ्या account वरून पुन्हा अपलोड केला आहे.)

Pages