आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह.पा. बरोबर. भारताबाहेर शाकाहारी आणि सामिष पदार्थ एकत्र येऊ न देण्याबद्दल तितकी सेन्सिटिव्हिटी असणार नाही. सुधा मूर्तींची भीती सार्थ आहे.
माझी चूक मला मान्य आहे.

धन्यवाद भरत! माझा तो अनुभव बंगळूरातला होता. भारताबाहेर प्रगत देशात ग्राहक केस ठोकेल याची भीती असल्यामुळे (फूड अ‍ॅलर्जी, कॉन्टॅमिनेशनमुळे आजार आल्याचा दावा करणे इत्यादी) वेगळ्या लेव्हलची सेन्सिटिव्हीटी असू शकते (स्वस्त ठिकाणी असतेच असं नाही, पण महाग ठिकाणी असण्याची अपेक्षा आहे).

ह्या काकू मी प्युअर व्हेजिटेरिअन आहे लसूण सुद्धा खात नाही असे डिक्लेअर करतात तेव्हा त्याचा अर्थ मांसाहारी लोक इंप्युअर आहेत असा ही होतो. ते कोण लोक्स तर इतर जातीचे
ह्यात जात कुठे आली आणि मांसाहारी लोक इम्पुर आहेत आस अर्थ कुठे होतो. कदाचित जशी दृष्टी तशी सृष्टी ह्या म्हणीप्रमणे तुम्हाला ह्यात जात दिसली असेल. किती ही ओढून ताणून टीका.

ह्या काकू मी प्युअर व्हेजिटेरिअन आहे लसूण सुद्धा खात नाही असे डिक्लेअर करतात तेव्हा त्याचा अर्थ मांसाहारी लोक इंप्युअर आहेत असा ही होतो.
>>>>
माझ्या मते येथे "प्युअर" हा शब्द "व्हेजिटेरिअन" च्या संदर्भात वापरला आहे, व्यक्तीच्या नाही. जसे कि काही "व्हेजिटेरिअन" लोक अंडी खातात, तर त्यातला फरक सांगण्यासाठी. बरेच लोक "प्युअर व्हेजिटेरिअन" हा शब्दप्रयोग वापरताना ऐकले आहेः. काही गैर वाटत नाही.

माबो वाचक, मलाही तसंच वाटतं.'प्युअर' हा शब्द 'पूर्ण' या अर्थाने वापरला असावा.खरं तर कोणताच शब्द वापरायला नको.'व्हेजिटेरियन' आहे किंवा नाहीये.पण 'एरवी व्हेजिटेरियन आहे पण अंडी खातो आम्ही' असा एक वेगळा मधला प्रकार भारतात आहे(त्यांना स्वतःला टेक्निकली नॉन व्हेजिटेरियन म्हणायचे नसते कारण तसं म्हटलं तर चिकन फिश बीफ पोर्क सगळ्यांना वेगळं नाही म्हणत राहावं लागतं.व्हेजिटेरियन आहे पण अंडी खातो हे तसं तर विनोदी वाक्य आहे.)

सुमु सगळं बरोबर बोलत असतील असे नाही.पण एकंदर जुन्या पिढीच्या बाई, त्यात कर्नाटकी म्हणजे अजून कर्मठ असाव्यात.बरीच महान माणसं चक्रम असू शकतात.आता वाक्यावरून झालेला गोंधळ वाचला असेल तर पुढच्या वेळी सांभाळून बोलतील अशी आशा.

ह्या काकू मी प्युअर व्हेजिटेरिअन आहे लसूण सुद्धा खात नाही असे डिक्लेअर करतात तेव्हा त्याचा अर्थ मांसाहारी लोक इंप्युअर आहेत असा ही होतो.>>
चूक. त्याचा अर्थ मांसाहारी लोक इंप्युअर व्हेजिटेरिअन आहेत असा होतो. त्यात काही वाईट वाटण्यासारखं नाही. प्युअर व्हेजिटेरिअनच्या व्याख्येतच व्हेजिटेरिअन अन्नाव्यतिरिक्त काही न खाणे आहे. जर खाल्लं तर तुम्ही प्युअर व्हेजिटेरिअन नाही. प्युअर लोखंड म्हणजे लोखंडाव्यतिरिक्त काही नाही. त्यात अगदी सोने मिसळले तरी ते शुद्ध लोखंड नाहीच. मला नाही वाटत मांसाहार करणारे स्वतःला प्युअर व्हेजिटेरिअन म्हणवून घेण्याची फिकीर करत असतील. तसेच कुणी जर फक्त मासे खात असेल (प्युअर पेसकटेरिअन) तर त्याच्या दृष्टीने शाकाहार करणारे अगदीच इंप्युअर पेसकटेरिअन ठरतील Happy

त्यावर दुसर्‍या बाजूच्या काही कॉमेंट्स वाचून मी थक्क झाले. काय की, मी आता KFC, मॅकडॉनल्ड यांना ban करणार, फक्त veg restaurants ना सपोर्ट करणार, तुम्ही म्हणता ना हे चूक आहे मग मी अजून कर्मठ होणार अशा त्या कॉमेंट्स.त्यामुळे काही मध्यम मार्ग नाहीच का, कोण एका बाजूने extreme तर त्यामुळे दुसरा दुसर्‍या बाजूस extreme असेच चित्र दिसते. >>
मनमोहन , जितका बिनडोकपणा केल्यावर पूर्वी लोक तोंड लपवून घरात बसले असते तितका बिनडोकपणा आजकाल राईट विंग, हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या मॉब कडून उजळ माथ्याने केला जातोय. ह्याचं मला जाणवलेलं एक कारण म्हणजे सो कॉल्ड लेफ्ट लिबरल लोकांकडून केला गेलेला त्याच्याही वरताण बिनडोकपणा! बिनडोकपणाची स्पर्धाच चालू आहे (की जाणीवपूर्वक दोन्ही बाजूंच्या वरच्या पातळीवरून चालू ठेवली जातेय).

सुर्वेंनी ही पाटी लावून व्हेजिटरियन लोकांना इम्प्युअर ठरवून फिट्टंफाट केली आहे केव्हाच. Wink
20230801_092306.jpg

मायबोलीवर भरपूर लोकं जर्नल मेंटेंन करत असावीत असं वाटतं. सोशल मिडीयावर जरा काही खुट्ट झालं की लगेच जर्नलमध्ये नोंद. त्या जर्नलमध्ये सुधा मूर्ती असा एक वेगळा भाग पाडलेला असावा. मागे त्या कोणाच्या पाया वगैरे पडल्या तेव्हाची नोंद केली गेली असणार त्यात आणि मग आता त्या असं व्हेज नॉन व्हेज बोलल्या म्हणजे त्या ह्या लोकांच्या विरोधातच असणार, त्या पलिकडच्या लोकांनाच सपोर्ट करत असणार अशी आपली निरिक्षणं त्यात नोंदवून ठेवायची म्हणजे मायबोलीवर लिहितानाही सोप्पं जातं. >>>> प्युअर परफेक्ट लिहीलंयस, सायो!

व्हेजिटेरियन आहे पण अंडी खातो हे तसं तर विनोदी वाक्य आहे >> परदेशात नाही. अनेक देशांत अंडे हे मांसाहारात येत नाही कारण त्यात मांस, ऊती, स्नायू वगैरे नसतात. तिथे व्हेजिटेरियन नाश्ता म्हणून सर्रास अंड्याचे पदार्थ देतात. व्हेजिटेरियन आहे म्हणजे अंडी खातो हे ते गृहीत धरतात. अंडे नको म्हटले तर त्यांना वाटतं तुम्ही व्हिगन आहात, पण दूध, चीझ चालेल म्हटलं तर त्यांना विनोदी वाटत असेल.

४०० वा प्रतिसाद सुफळ संपूर्ण

विमान प्रवासात यासाठी Asian Vegetarian Airline Meal AVML हा पर्याय बऱ्याच विमान कंपन्यात असतो. तिथल्या स्थानिक फ्लाईट्स मध्ये नसेल, पण भारतीय स्पेकचे व्हेजिटेरियन प्रवासी बऱ्यापैकी असतात तिथे बहुतकरून असतो.

१) ते केळीचे पान तोडण्याअगोदर अनेक पक्ष्यांनी त्यावर विष्ठा टाकलेली असते. ( त्यात बुरशी, bacteria सुद्धा असतात. हा आरोग्याचा आणि स्वच्छतेचा मुद्दा मी मुद्दाम आणला आहे.) नंतर आपण ते दोन्ही बाजूंनी व्यवस्थित धुवून पुसून नैवेद्यासाठी, स्वतः जेवण्यासाठी, जेवण बांधण्यासाठी आवर्जून वापरतो. हे काहींना चालेल का? एकदा एका ब्लॉगमध्ये मासळी केळीच्या आणि हळदीच्या पानात बांधून त्याची पोटली केली होती तेव्हा काही viewers नी आक्षेप घेतला होता. दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये सामिष जेवणच केळीच्या पानावर वाढले होते. काही तुरळकांनी का होईना, आक्षेप घेतले होते. म्हणजे केळीच्या पानाभोवती एक पवित्र aura प्रस्थापित झाला. ते पान कदापि पुन्हा वापरले जाणार नाही हे माहीत असूनही ती species च पवित्र ठरवली गेली.
२)पश्चिमेकडचे उंच कमोड सुखवस्तू भारतीयांमध्ये वापरात आले तेव्हा त्यावर बसून पेपर वाचणे, सिगारेट ओढणे वगैरे इतर कामेसुद्धा उरकली जाऊ लागली. आता त्या खोलीतले वर्तमान पत्र किंवा सिगारेटचे पाकीट बाहेर दिवाणखान्यात आणायचे का? दुसऱ्या कोणी किंवा दुसऱ्यांदा कोणी मनात कोणताही किंतु न बाळगता त्याला हात लावायचा का? तिथे ठेवलेला लायटर किंवा काड्यापेटी पुन्हा वापरायची की नाही? कधी कधी चष्मा तिथे विसरला जातो. त्याचे काय?

Pure non veg वाल्याना.
पनीर किंवा भाज्या बघून उल्टी येते.
त्यांनी पण असे जाहीर बोलावे का?
पनीर साठी वापरलेल्या चमचा आमच्या साठी वापरू नका>>>>>>

प्युअर नॉनवेज असे काहीही नसते. नॉनवेजवाले लब्बाड नॉन वेजसोबत वेज पण खातात. बटर पनीर वाढुन झाले की तोच मोठा चमचा बटर चिकनमध्ये घालुन चिकन स्वतःच्या ताटात वाढुन घ्यायला त्यांचा काही म्हणजे काहीच आक्षेप नसतो. (१. मोठा चमचा उर्फ डाव लिहिलेय हे लक्षात घ्या, नाहीतर उष्टा चमचा समजुन अजुन ५० पाने खरडली जातील. २. दोघांची ग्रेवी सारखीच असते हे माबोवरच्या अनंत रेसिपिज वाचल्या की कळते. चिकन रेसिपी आली की हमखास ‘मी पनीर्/बटाटा/दोडके/गिलके वापरुन करेन’ ही कमेंट येतेच. त्यामुळे ह्याचा चमचा त्याच्यात गेला तरी कोणाला काही कळणार नाही.)
आक्षेप असायला मुळात असे काही झालेय हे चिकनच्या गडबडीत लक्षात यायला हवे ना.. आणि आले तरी काय त्यात इतके? चव बघु म्हणुन जरासे इतकुसे बटर पनीर एका कोपर्‍यात वाढुन घेतलेले त्यांना चालते.

पण ह्यामुळे नॉन्वेजवाले प्युअर राहात नाहीत. फक्त आणि फक्त वेजवालेच प्युअर असतात.

मायबोलीवर भरपूर लोकं जर्नल मेंटेंन करत असावीत असं वाटतं. सोशल मिडीयावर जरा काही खुट्ट झालं की लगेच जर्नलमध्ये नोंद>>>>>>

मी तर सगळा सो मि बंद केलाय फक्त माबोचे जर्नलच वाचते. पार मोदीपासुन ते बिडेन का बाय्डेन पर्यत सगळ्यांची खबर उर्फ वाभाडे काढलेले वाचुन माझी मते बनवते म्हणजेच प्रत्येक प्रतिसादाबरोबर ती १८० डिग्रीत फिरत राहतात.

शाकाहारी विरुद्ध मांसाहारी किंवा मिश्रहारी हा वाद कधीच होण्याचे काहीच कारण नाही.
किती तरी मुस्लिम लोकांची लग्न समारंभ मी अटेंड केलेली आहेत.
ते सुधा शाकाहारी लोकांसाठी वेगळी जेवणाची सोय करतात.
आणि अगदी काटेकोर पने.
प्रतेक घरात एक तरी family मेंबर हा शाकाहारी असतो .
त्याची पूर्ण काळजी बाकी लोक घेतात.
त्याचे जेवण बनवण्याचे कढई,तवा,चमचा कोणी मांसाहार बनवताना वापरत नाही.
जेव्हा पाहुणे येतात तेव्हा पण शाकाहारी लोकांचे जेवण अगोदर बनवून वेगळे ठेवले ले असते..
सार्वजनिक ठिकाणी पण मांसाहारी लोक शाकाहारी लोकांच्या भावना समजतात.
खरी खोडसाळ जमात ही शाकाहारी लोकांची आहे ..त्या मध्ये काही प्रांत आणि ठराविक धर्माची आणि जातीची लोक करतात..खाजवून खरूज काढतात.
मग ते आयआयटी मुंबई मधील प्रकरण असू,किंवा विमानातील जेवणाचे प्रश्न असतील.
राहत्या इमारती मधील वाद असतील.
हे सर्व वाद हे शाकाहारी लोक उकरून काढतात.
कारण त्यांना अजून तरी लोक गंभीर पने घेत नाहीत.
सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली की शेपूट घालतील.
ह्यांना ते राहतात तिथे रस्त्यावर पण नॉनव्हेज जेवणाच्या गाड्या चालत नाहीत,हॉटेल चालत नाहीत.
पण मासे बाजारात ,दुकान ह्यांची असतात ती मात्र ह्यांना चालतात.

लय खोडसाळ जमात आहे ही.
उगाचच सार्वजनिक माध्यमावर शाकाहार चे महत्व सांगणार आणि मांसाहार ची हेटाळणी करणार.

एक तर ते फूड वर vlogs बनवणारे डोक उठवतात.
ये देखो भाई कीतना चीझ dala है.
ये देखो कितना butter dala है.
ये देखो kitna पनीर dala है.
हे पनीर,बटर ,घी , चीझ लोकांना लवकर वर देवाच्या दरबारात पोचवेल.
त्या पेक्षा ते नॉनव्हेज atom प्रोटीन्स बाकी गरजेचे मिनरल आणि व्हिटॅमिन तरी शरीराला देतील.
एक दोन वर्ष आयुष्य वाढेल.

शरिराला सर्व प्रकारची मिनरल्स (ठराविक प्रमाणांत) हवी असतात. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक वाईट.

जास्त रेड मिट खाल्ल्याने विविध प्रकारच्या कॅन्सरचे प्रमाण वाढलेले बघायला मिळते. दुसर्‍या बाजूला आहाराविषयीच्या भ्रामक कल्पनांनी भारतीय महिलांमधे अशक्त ( anemic condition - due to deficiency of folate, vitamin B12, iron.... अनेक प्रकार आहेत) असण्याचे प्रमाण जास्त आहे. ज्याला जसा जमेल तेव्हढा बॅलन्स करायला हवा. काय खायचे ते खा पण प्रमाणांत खा पण दुसर्‍यांच्या खाण्याला नाके मुरडू नका.

आहारातली विविधता एक दुसर्‍यांना मदत करणारी आहे. सर्वांचा आहार एकाच प्रकारचा राहिल्यास ( व्हेज/ नॉन व्हेज) समतोल ( जो काही आहे तो) नाहिसा होईल. आज टमाटे ५० रुपये पाव आहेत, सर्व लोक व्हेज झाल्यास भाज्यांच्या किंमती अवाक्याबाहेर जातील, किंवा सर्वांनीच मिट खातो म्हटल्यास तेव्हढा पुरवठा नाही आहे.

<<ज्याला जसा जमेल तेव्हढा बॅलन्स करायला हवा. काय खायचे ते खा पण प्रमाणांत खा पण दुसर्‍यांच्या खाण्याला नाके मुरडू नका>> सहमत.
(प्रमाणात खा/खाऊ नका ज्याचा त्याचा प्रश्न)

<<सर्व लोक व्हेज झाल्यास भाज्यांच्या किंमती अवाक्याबाहेर जातील>> याबद्दल कदाचित वेगळी वस्तुस्थिती असू शकते. पशुधनास लागणारी जमीन, खाद्य, पाणी इत्यादि विचारात घ्यावे लागेल तसेच व्हेज म्हणजे दूध चालत असेल तर त्यासाठी लागणारे पशुधन याचाही विचार करावा लागेल.

अजुन तरी अन्न धान्य,भाजी पाला,दूध धुपती.
ह्याचा भारतात तुटवडा नाही.
Surplus utpadan आहे.

रशिया,अमेरिका सारखे विशाल भूमी असणारे देश आहेत.

त्या मुळे तो विषय नाही.
.प्रश्न एकच आहे कोण काय खाते ह्याच्या उठाठेवी करायची गरज नाही.
मांसाहारी आपली मर्यादा पाळून च वागतात.
Pure शाकाहारी लोकांचीच जास्त नाटक असतात..
आणि कधी कधी डोक्यात जातात.

अजुन तरी अन्न धान्य,भाजी पाला,दूध धुपती.
ह्याचा भारतात तुटवडा नाही.
Surplus utpadan आहे.>>>>

दिवास्वप्नातुन जागे व्हा आणि ताटात काय पडतेय ते पाहा…

Dudh रस्त्यावर फेकून द्यावे लागते जास्त उत्पादन झाले म्हणून.
टोमॅटो फेकून द्यावे लागतात.
सरकारी गोदामात हजारो टन गहू,तांदूळ खराब होतो.
जास्त उत्पादन असते म्हणून.

साधना.
एका कोणते तरी उदाहरण ध्या त्याचा भारतात तुटवडा आहे.
मग त्याच वस्तू वर बोलू या

मानव- हिरव्या भाज्यांसाठी पण वरिल गोष्टी (जमिन, पाणी) तसेच खते या गोष्टी लागणार आहेतच आणि आता भर म्हणून extreme weather... मधे त्यांनी तग धरायला हवा.

आठ अब्ज लोकांसाठी एक प्रकराचा आहार राहिल्यास तोटेच जास्त दिसतात. मग काही प्राण्यांचे प्रमाण अमाप वाढेल. प्राणी food chain चाच भाग आहेत, कुणा एकाचे प्रमाण वाढले तर बॅलन्स बिघडणार. आमच्याकडे deer चे प्रमाण वाढल्यामुळे शेतीला त्यांचा त्रास होतो, कमी करण्यासाठी एकाला मारा आणि $20 मिळवा.

निसर्ग चक्र सुरळीत चालावे माणूस हा स्वार्थी प्राणी त्याचा आहार,विहार नक्कीच बदलणार नाही.
मांसाहार ची गरज सांगताना नालायक माणसांना बिलकुल मोठेपणा देवू नका.
त्या दर्जा ची मानव जात नाही
स्वार्थ होत असेल तर पृथ्वी ला पण माणसे सुरंग लावतील
स्वार्थासाठी पृथ्वी वरील वातावरण खराब करण्या पर्यंत माणूस गेला च आहे.
अन्न चैन नीट राहावी म्हणून कोण शाकाहारी नाही किंवा कोणी मांसाहारी नाही (. हे वाक्य फक्त आणि फक्त माणसा साठी आहे बाकी कोणत्याच प्राण्यांसाठी नाही इतर प्राणी प्रामाणिक असतात आणि स्वार्थी बिलकुल नसतात. )
. निसर्ग,अन्न चैन,वातावरण ह्याचा विचार स्वार्थ सोडून करण्या इतका हुशार माणूस नक्कीच नाही.
मांसाहार आवडतो आम्ही करणार .
बस.
इतकेच उत्तर योग्य आहे

रस्त्यावर फेकून देण्याचे कारण अमाप पिक आहे हे नाही आहे. मायबोलीवर गंगाधर मुटे यांचा एक धागा आहे, वांग्यांची शेती बद्दल.... फार कमी वेळांत या गोष्टी ग्राहकां पर्यंत पोहोचवाव्या लागतात.

आमच्याकडे deer चे प्रमाण वाढल्यामुळे शेतीला त्यांचा त्रास होतो, कमी करण्यासाठी एकाला मारा आणि $20 मिळवा>>>>>

चांगली सोय आहे. इथे कित्येक प्राणी येऊन नुकसान करतात, गप्प बसुन बघावे लागते.

Pages