शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असा एक क्लासरूम फर्गुसन कोलेजच्या फिसिक्स् डीपार्टमेंट मध्ये आहे/होता. त्याची आठवण झाली.

सध्या लोक ट्विटर किंवा फेसबुक वर लिहिताना "शब्द शब्द जपुनी" वापरा. कारण सध्या राजकीय दृष्ट्या समुचित शब्द वापरावेत अशी प्रथा आहे. अशा शब्दांची जंत्री तुम्हाला आंंतर जालावर सहज
उपलब्ध आहे. सहज गंमत म्हणून हे शब्द पहा.
Master/slave – Largely used in the tech industry, master and slave signifies the relationship where one device has control over and initiates the commands of another. It’s also used in real estate to describe the “master” bedroom. Better to use primary and secondary, parent and child.

Whitelist/blacklist – Again, largely tech terms (although blacklist has cultural significance, too), they describe security controls to allow or limit, respectively, access to a system or network. Allow or deny or include or exclude are better choices. (For a broader application to replace blacklist, boycott is better.)

<< Master/slave >>
Political correctness च्या आग्रहामुळे आता git master ऐवजी git main असा बदल आता करण्यात आला आहे.

क्रिकेट आपल्या सर्वांच्या आवडीचा खेळ. भारताच्या सर्व नागरिकांना क्रिकेट आणि आपला संघ आपापली मते असतात. आणि ते ती हिरीरीने मांडत असतात. वेळ प्रसंगी हमारा तुमरीवर पण येतात. पहा मायबोलीवरचे "क्रिकेट १,२,३,४,५,६ आणि सध्या ७" धागे. ह्या खेळात वापरले जाणारे विचित्र शब्द उदा.
स्लिप, सिली, लांग लेग, शोर्ट लेग, स्क्वेअर लेग, गली, चायनामॅॅन, थर्ड मन, यॉर्कर, आणि अजून कितीतरी. ह्या शब्दांच्या कथा जाणून घेण्यासाठी ह्या दोन लिका
http://www.cricketer.50webs.com/Cricket/Cricket_Explained_5.htm
https://www.bbc.co.uk/bitesize/articles/z683qp3

वरीलपैकी दुसरा दुवा पाहिला. छान आहे
पहिल्या दुव्यावर जात असताना ते स्थळ सुरक्षित नाही असे संगणक म्हणतो आहे.

<< ते स्थळ सुरक्षित नाही असे संगणक म्हणतो आहे >>
मला अजिबात काही प्रॉब्लेम येत नाहीये. जाहिराती दाबून टाका सर. uBlock Origin वापरा तुमच्या ब्राउजरमध्ये. नाही तर तोच लेख या पानावर वाचा.

सर, ते तस आहे खर. Not Secure असा संदेश येतो.
Anyway मी त्याचे कंटेंट माझ्या खाजगी ब्लॉगवर कॉपी करून ठेवले आहेत. आपल्याला पाहिजे तर ते बघू शकता.
https://somelikit.blogspot.com/2022/10/cricket-terms.html#more

उबो
सरांना पहिल्या दुवाविषयी प्रॉब्लेम आहे.

एके ठिकाणी मला ही शब्द कोशांची ही भली मोठी यादी मिळाली.

Student’s English-Sanskrit Dictionary
Aryabhushan School Dictionary
English Community Kosh
A Dictionary: English and Sanskrit
Puranic Encyclopaedia
प्राचीन चरित्रकोश
Hindi Community Kosh
संख्याशास्त्र WORD
बैंकिंग शब्दांवली
व्यवसाय व्यवस्थापन
कार्यालयीन WORD
कार्यदर्शिका WORD
Marathi Community
परिभाषा
पदनाम
शिक्षणशास्त्र
स्थापत्य अभियांत्रिकी
विद्युत अभियांत्रिकी
यंत्र अभियांत्रिकी
वित्तीय
भूगोल
प्रशासन
शासन व्यवहार
मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
न्यायव्यवहार
साहित्य समीक्षा
महाराष्ट्र शब्दकोश r
गणितशास्त्र
A dictionary, Marathi and English
शरीर परिभाषा
लोकप्रशासन
वैज्ञानिक
कृषिशास्त्र
जीवशास्त्र
रसायनशास्त्र
वाणिज्यशास्त्र
भूशास्त्र
अर्थशास्त्र
ग्रंथालयशास्त्र
धातूशास्त्र
औषधशास्त्र
भौतिकशास्त्र
राज्यशास्त्र
मानसशास्त्र
मराठी पर्यायी शब्दकोश
The Practical Sanskrit-English Dictionary
Sanskrit Community Kosh
A Sanskrit English Dictionary
Shabda-Sagara

http://mr.upakram.org/node/3614
मराठीतील कोशवाङ्मयाची यादी
उपक्रम वर
सुचना हे पण not secure स्थळ आहे. पण उघडायला हरकत नसावी.

आज Wordle (6) मध्ये बराच वेळ झुंजल्यावर oracle हे उत्तर आले.
मला हा शब्द म्हणजे संगणकातील काहीतरी इतकेच ऐकून माहिती होते. परंतु आज पूर्ण उलगडा झाला.

१. त्याचा मूळ अर्थ आहे:
कौल आणि भविष्य जाणून घेण्यासाठी लोक जात असत ते देवतांचे ठाणे

२. संगणक क्षेत्रातील अर्थ म्हणजे ते अगदी पूर्वीच्या संगणक नावाचे एक लघुरूप आहे.

Oracle also means any person or thing serving as an agency of divine communication.

E.g. Warren Buffett is known as "Oracle of Omaha".

आजचा शब्द.
Zemblanity
शब्दाकोशकरांच्या मते प्रत्येक शब्दाला विरोधी अर्थाचे शब्द असायाला हवेत. १७५४ साली
होरॅस वालपोलने serendipity हा शब्द शोधून काढला. इथे त्यावर चर्चा झालेली होती हे
आठवते. त्याचा अर्थ आहे अवचित एखादा सुखकारक शोध. अरब लोकांनी श्री लंकेला हे नाव दिले होते. दक्षिण दिशेला असणारे, उबदार, हिरवागार परिसर, मसाल्याचे पदार्थ, नयनरम्य चौपाट्या, गोड कूजन करणारे पक्षी ह्यांनी नटलेली जागा.
अगदी अलीकडच्या काळापर्यंत ह्या शब्दाच्या विरोधी अर्थाचा शब्द नव्हता. तो हल्ली हल्लीच प्रचलित झाला. तो आहे Zemblanity.
उत्तर ध्रुवा जवळचा, मरणाची थंडी, गवताचे एक पातेही उगवत नाही, बर्फाळ प्रदेश, वैराण
अशा प्रदेशाचे नाव आहे. Zembla. त्यावरून zemblanity हा serendipity ह्याच्या विरोधी अर्थाचा शब्द आला. म्हणजे दुःखदायक, दुर्दैवी, पण अपेक्षित असा शोध.
Novaya Zemlya ही उत्तर ध्रुवाजवळची रशियाच्या अधिपत्याखाली असणारी बेटं.
नाबोकोव नावाच्या कादंबरीकाराच्या "Pale Fire" नावाच्या कादंबरीत ह्याचा उल्लेख (१९६२) आहे.

Collins शब्दकोशाने 2022 चा
त्यांचा विशेष बहुचर्चित शब्द काहीसा लवकर जाहीर केलेला आहे. तो आहे:

permacrisis.
= अस्थिरता आणि असुरक्षिततेने व्यापलेला व लांबलेला कालावधी.

रेंगाळलेला कोविड, युक्रेन युद्ध इत्यादी गोष्टींची त्याला पार्श्वभूमी आहे.

https://www-thehindu-com.cdn.ampproject.org/v/s/www.thehindu.com/news/in...

एखाद्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर त्याचा अल्प गोषवारा दिलेला असतो. तो कुतूहल चाळवणारा
असतो. त्याला इंग्लिश मध्ये blurb म्हणतात हे बहुतेकांना परिचित आहे.
या शब्दाचा उगम ग्रीक/ लॅटिन वगैरे नसून ते एका लेखकाने निर्माण केलेल्या विनोदी स्त्री पात्राचे नाव आहे :

Miss Belinda Blurb !

https://www.merriam-webster.com/words-at-play/word-history-blurb-publishing

या blurb पासून एक संयोगशब्द असा तयार झाला आहे :

blad =
bl(urb) + ad

party या शब्दाचे विविध अर्थ आपल्याला परिचित आहेत सर्वसाधारणपणे समूहाची पार्टी म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर मेजवानी किंवा समारंभ असे दृश्य येते.

या शब्दाच्या मुळाशी गेल्यास बरीच रंजक माहिती मिळते.
पार्टीचा मूळ अर्थ "कुठल्यातरी कारणाने विविध लोकांनी एकत्र जमणे" असा होता.
एका नव्या संशोधनानुसार मिळालेली माहिती इथे दिली आहे:
https://historyofyesterday.com/the-first-party-took-place-12000-years-ago/

सुमारे 12,500 वर्षांपूर्वी एका गावातील मुख्य स्त्रीच्या अंत्यसंस्कारासाठी जी माणसे जमली होती त्याचे वर्णन पार्टी असे केलेले दिसते.

teenager हा बहुपरिचित शब्द. त्याच धर्तीवर एक वेगळा शब्द एका दिवाळी अंकातील लेखात वाचण्यात आला.
सध्या आपण सगळेजण
screenager
झालेलो आहोत !

बरोबर
याच धर्तीवर हिंदीतल्या दावतचे २ अर्थ आहेत:

१. बुलावा; भोजन के लिए आमंत्रण।
२. किसी को कोई काम करने के लिए दिया जानेवाला निमंत्रण। आवाहन।

https://www.rekhtadictionary.com/meaning-of-daavat?lang=hi

<<सुमारे 12,500 वर्षांपूर्वी एका गावातील मुख्य स्त्रीच्या अंत्यसंस्कारासाठी जी माणसे जमली होती त्याचे वर्णन पार्टी असे केलेले दिसते.>>
त्याचे वर्णन पार्टी हे अलिकडचे म्हणजे जेव्हा त्या गुहेत उत्खनन झाले तेव्हाचे ना?

होय.

cue & clue

या दोन्ही शब्दांच्या अर्थात समानता आहे. समानार्थी शब्दकोश पाहिले असता दोन्ही शब्द प्रथम क्रमांकावर एकमेकाचे समानार्थी दाखवलेले दिसतात:
https://www.thesaurus.com/browse/cue

पण त्या दोघांमधला सूक्ष्म फरक इथे चांगला दिला आहे:
https://journals.sagepub.com/doi/full/10.1177/03010066221080617#:~:text=...
160 260 178 978

scarlet letter
या शब्दप्रयोगासंबंधी कुतूहल वाटल्याने शब्दकोशातून त्यासंबंधी वाचन केले. ती माहिती रंजक आहे..
या शब्दाचा उगम Scarlet Letter: A Romance या अमेरिकी कादंबरीपाशी जाऊन ठेपतो. या कादंबरीत, एका स्त्रीने विवाहबाह्य संबंधातून मुलीला जन्म दिलेला असतो. पुढे तिला याचा पश्चात्ताप होतो.

समाजात अशा प्रकारचे वर्तन (?गुन्हा) केलेल्या व्यक्तीच्या गळ्यात शेंदरी रंगातील A हे अक्षर अडकवले जाई. ( A = Adultery). कालौघात या शब्दप्रयोगाचा अर्थ बदलत गेला. A = Able असाही अर्थ लावण्यात आला होता.

सध्या त्याचा अर्थ असा आहे:
एखाद्याने केलेल्या चुकीच्या गोष्टीबद्दल अपराधी वाटत असेल, तर ती भावना scarlet letter या शब्दात व्यक्त केली जाते.

ज्यांना रसायनशास्त्रात रुची आहे त्यांच्यासाठी.
पिरीओडीक टेबलमध्ये चार नवीन मूलतत्वे सामील करण्यात आली आहेत. त्यांना तात्पुरती म्हणून खालील नावे देण्यात आली आहेत.
त्यामुळे आता एकूण संख्या ११८ झाली आहे. सध्या त्यांना संख्यावाचक लॅटिन नावे अशी आहेत.
ununtrium, ununpentium, ununseptium, and ununoctium, for elements 113, 115, 117 and 118. ही एलेमेंट्स निसर्गात सापडणार नाहीत तर ती accelerators
मध्ये तयार झाली. त्यांचे आयुष्य केवळ काही क्षणापुरतेच मर्यादित होते.
ह्यापैकी पहिले म्हणजे ununtrium 113 हे जपानच्या निशिना सेंटर रिकेन institute मध्ये मिळाले. म्हणून त्याला japonium, rikenium and nishinarium are being considered
ttps://www.theguardian.com/science/grrlscientist/2013/nov/22/grrlscientist-elem...

Pages