शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
एकदा एका बातम्या देणाऱ्याने हेर पकडण्यात आल्यावर इंग्रजी mole चे भाषांतर एक तिल पकडा गया केले एक हेर पकडला होता तर केवढा हाहाःकार Happy

एकदा जनजीवन (पुरानंतर) स्थिरस्थावर हो गया है म्हणाला त्याला ठप्प झालं आहे म्हणायचे होते. मोठ्या विनोदी होत्या बातम्या.

Screenshot_20201028-205312_Chrome.jpg.

मानवदादा Lol
खबरं बडे जोक्स की थी Happy

अस्मिता , भारीच !!
मानव,
समजले नाही नक्की , संपादित केलंय ?

ऑक्सफर्ड शब्दकोशात 'वुमन' या शब्दाला सुचवण्यात आलेले आक्षेपार्ह समानार्थी शब्द (bitch, bint, wench, baggage, इ.) तिथे उभारल्या गेलेल्या लढ्यामुळे काढून टाकण्यात आले.
चांगला लेख :
https://maharashtratimes.com/editorial/samwad/neerja-article-on-oxford-d...

अपेक्षेप्रमाणे यंदा प्रमुख इंग्लिश शब्दकोशांचे मानाचे शब्द असे:

केम्ब्रिज : quarantine
डिक्शनरी. कॉम: pandemic

ऑक्सफर्डने एक शब्द न निवडता बरेच निवडले आहेत. त्यात covid चा समावेश आहे.

हे पूर्वी लिहिले होते :
१ लाख ६८ हजार शब्दांचा बृहद्कोश महाराष्ट्र दिनी प्रकाशित
(Submitted by कुमार१ on 1 May, 2020 - 16:14)

>>
आता हा कोश विस्तारित होऊन त्यात २,०४,१४० शब्द आहेत.
त्यांनी आता ५ कोश एकत्रित केले आहेत.
https://bruhadkosh.org/

अलीकडे प्रचारात असलेल्या अतरंगी या शब्दाची एक गंमत आहे.
सध्या तो “अंगी नाना कला असलेला’ किंवा ‘विलक्षण’ या अर्थाने वापरला जातो.

परंतु हा शब्द उपलब्ध अधिकृत शब्दकोशांत तरी सापडत नाही. मी बृहद्कोश, शब्दरत्नाकर आणि गुगलशोध हे सर्व करून पाहिले.

या शब्दाबद्दल तो हिंदी शब्दकोशात देखील सापडत नसल्याची रोचक चर्चा इथे (https://groups.google.com/g/shabdcharcha/c/E4mqGsYbM3M?pli=1)आहे.

कुणाला या शब्दाच्या मराठी उगमाबाबत अधिक माहिती असल्यास जरुर लिहा.

धन्यवाद वावे.
'अत्रंग' देखील कोशात सापडत नाही.

सध्या bruhadkosh.org हा ऑनलाईन दिसत नाहीये. तिथे खालील संदेश येतोय :
This Account has been suspended

कोणी जाणकार मदत करू शकेल का ?

वेबसाईट डोमेन रजिस्ट्रेशन ३ एप्रिल 2022 पर्यंत आहे. याचा अर्थ वेबसाईटच्या मालकाचे वेब होस्टिंग अकाउंट स्थगित करण्यात आले आहे. (कदाचित पैसे न भरल्यामुळे). तुम्ही आम्ही यात काही करू शकत नाही.

गेल्या वीस वर्षांत ब्रिटिश इंग्लिशमध्ये जो फरक पडला आहे, त्याचा एक चांगला अभ्यास इथे आहे :
https://www.lancaster.ac.uk/news/amazing-stuff-as-a-mini-revolution-swee...
त्यानुसार,
whom, upon & shall

या तीन शब्दांचा वापर बऱ्याच प्रमाणात (सुमारे पन्नास टक्के) कमी झालेला आहे.

ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशाचा यंदाचा (२०२१) मानाचा शब्द vax असून ते नाम व क्रियापद अशा दोन्ही अर्थाने वापरता येते :

vax =
१. vaccine or vaccination (नाम)
२. vaccinate (क्रियापद).

कोशनिर्मिती संबंधी एक सुंदर लेख :
https://www.loksatta.com/sampadkiya/visheshlekh/revenue-judging-transact...
त्यातले काही रंजक :

कोश-योगातला आणखी एक मोठा रंजक नमुना जरूर पाहा! भलतीच निराळी माहिती आणि भरपूर आश्चर्यकारक कथा, आख्यायिका, व्युत्पत्ती त्यामध्ये आढळतील! त्या कोशाचे नाव ‘हॉबसन-जॉबसन’! इंग्रजांना भारतीय उच्चार कधी सहज आणि नीट उमगायचे नाहीत. प्राण गमावलेल्या हसन-हुसेन यांचा शोक मोहरमच्या मिरवणुकीत दरवर्षी होतो; त्या हसन-हुसेनचा उच्चार इंग्रजी कानाला हबसन जाबसन असा ऐकू येई! तसेच ते शब्द लिहिले जात. इतके की कालांतराने हे अर्धवट किवंडे आणि बोबडे शब्द इंग्रजीत रूढावले गेले. अशा शब्दांचा एक थोराड कोश म्हणजे हबसन-जॉबसन. जगन्नाथचे जगरनॉट कसे झाले? कुप्रसिद्ध फोरासरोड या भागाचे नाव तसेच का पडले? अशा कितीतरी रंजक कथा आणि चुटक्यांनी भरलेला हा कोश!
...
वरील मजकुरातील ' किवंडे' चा अर्थ कोणाला माहित आहे का ?
शब्द गोड आहे...

सर्वांना धन्यवाद
....थोड्याफार फरकाने इथे संदर्भ मिळालाय:
किंवडा-डू, किवढ्या
पु. (तंजा.) बहिरा. [का. किवी = कान, किव्ड = बहिरा]

दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%...

पण त्यांनी कि वर अनुस्वार दाखवला आहे.
लोकसत्तातील लेखात मुद्रणदोष झालेला असू शकेल.

काही इंग्लिश भाषातज्ञांनी विस्मरणात गेलेल्या काही प्राचीन शब्दांचे पुनरुज्जीवन करायचे ठरवले आहे.
त्यापैकी respair (नवी आशा) हे एक ठळक उदाहरण आहे. हा शब्द सन १५२५मधला आहे.

तज्ञांच्या मते इंग्लिश भाषेला काहीसे नकारात्मक वळण जास्त लागलेले आहे. बऱ्याच मूळ सकारात्मक शब्दांचे नकारात्मक रूप काळाच्या प्रवाहात टिकवून ठेवले जाते; परंतु मूळ शब्दच मागे पडतात.

unkempt हे पण एक ठळक उदाहरण आहे. kempt हा मूळ शब्द पूर्वी विशेषण म्हणून वापरला जायचा.

आज एका नव्या अनधिकृत शब्दाचा परिचय करून देतो. हा शब्द तुम्हाला गुगलून सापडणार नाही कारण तो अजून शब्दकोशात आलेला नाही. परंतु अलीकडे तो आरोग्यविज्ञान क्षेत्रात वापरला जातोय.

हा शब्द आहे "farmacy"
स्पेलिंग आणि उच्चारावरून थोडा अंदाज आला का ?

एखाद्या आजारावर उपचार करताना जेव्हा औषधांपेक्षा अधिक भर आहारशैली बदलण्यावर दिलेला असतो, तेव्हा अशा उपचारांना "farmacy"
असे म्हटले जाते. (farm= शेत )

Pages