माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.
बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.
आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.
गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.
आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:
१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.
मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.
आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!
शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!
आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?
एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
arm candy
arm candy
जेव्हा एखादी प्रसिद्ध व्यक्ती सार्वजनिक समारंभात आपल्या सोबत एखाद्या आकर्षक ( /टंच) व्यक्तीला घेऊन फिरते तेव्हा हा शब्दप्रयोग वापरतात. बऱ्याच वेळा अशी सोबती म्हणून निवडलेली व्यक्ती भिन्नलिंगी असते (परंतु भिन्नलिंगी असलीच पाहिजे असे नाही).
अशा सोबत्याबरोबर त्या व्यक्तीचे प्रेमाचे अथवा भावनिक संबंध नसतात.
देखावा किंवा गर्दी जमवणे हा हेतू.
"He brought his stunning secretary as arm candy to the business party".
arm candy
arm candy
जेव्हा एखादी प्रसिद्ध व्यक्ती सार्वजनिक समारंभात आपल्या सोबत एखाद्या आकर्षक ( /टंच) व्यक्तीला घेऊन फिरते तेव्हा हा शब्दप्रयोग वापरतात.>>> ओह्.... सर्वप्रथम हेच आठवले.. 👇
अगदी अगदी
अगदी अगदी
झिरो झिरो सेवन . . .
क डॅ क !
arm candy >>>>> फॅशन
arm candy >>>>> फॅशन चित्रपटात यासाठी eye candy शब्द वापरला होता बहुतेक
फॅशन चित्रपटात यासाठी eye
फॅशन चित्रपटात यासाठी eye candy शब्द वापरला होता बहुतेक>>> तो तसा नसावा, eye candy हा खूपच प्रचलित शब्द आहे, त्याचा अर्थ नजरेला आकर्षक वाटणारं पण No substance असे जे काही असते त्या बाबत तो वापरतात.
दोघांची जातकुळी एक असली तरी
दोघांची जातकुळी एक असली तरी . .
"Arm candy" is a specific type of "eye candy" that is a person accompanying someone to a social event to enhance their public image.
"Arm candy" is a specific
"Arm candy" is a specific type of "eye candy">>+1
>>>पण No substance असे जे
>>>पण No substance असे जे काही असते त्या बाबत तो वापरतात.
हे माहीत नव्हते.
circle the wagons"
circle the wagons
= एखादे आक्रमण किंवा प्रखर टीकेपासून बचाव करण्यासाठी समूहाने एकदिलाने केलेली कृती.
याचा उगम रंजक आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिकेतील लोक स्थलांतर करीत होते तेव्हा ते घोडागाडीतून प्रवास करत. मुक्कामाच्या ठिकाणी जेव्हा स्थानिक हल्ल्यांची भीती असायची तेव्हा आपल्या कुटुंबीयांचे रक्षण करण्यासाठी त्यांना मध्यभागी ठेवून सभोवती सर्व घोडागाड्या गोलाकार आकारात मांडल्या जात. इथे त्याचे सुरेख चित्र पाहता येईल :
https://parentingthemodernfamily.com/circling-the-wagons-shutting-out-th...
एखाद्या कलाकृतीच्या संदर्भात
एखाद्या कलाकृतीच्या संदर्भात sequel & prequel हे दोन शब्द नित्य परिचयाचे आहेत. याच quel मालिकेतील अजून काही शब्दसंपदा पाहणे मजेशीर वाटेल :
midquel
threequel
paraquel or sidequel
. . . . . . . याहून अधिक उपप्रकार इथे पाहता येतील : https://en.wikipedia.org/wiki/Sequel#Chronologies
2025 चा ऑक्सफर्डचा खास शब्द
2025 चा ऑक्सफर्डचा खास शब्द आहे
rage bait
= समाजमाध्यमांवर लोकांना उचकवण्यासाठी जाणीवपूर्वक चिथावणीखोर लिहिणे.
>>>>>>>>rage bait
>>>>>>>>rage bait
= समाजमाध्यमांवर लोकांना उचकवण्यासाठी जाणीवपूर्वक चिथावणीखोर लिहिणे.
rage bait
rage bait
= समाजमाध्यमांवर लोकांना उचकवण्यासाठी जाणीवपूर्वक चिथावणीखोर लिहिणे.>>> जर कुण युरोप मधील क्लब फुटबॉल ट्विटरवर सातत्याने फॉलो करेल तर त्याला यासारखे नवीन येणारे शब्द फार आधी कळतील असे माझे निरीक्षण आहे. ऑलमोस्ट दर एक-दोन महिन्यांत एक नविन शब्द दृष्टीस पडावा इतके याबाबतीत हॅपनिंग प्लेस आहे ते.
अच्छा ! चांगली माहिती दिलीत.
अच्छा ! चांगली माहिती दिलीत.
दर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात प्रमुख इंग्लिश शब्दकोश त्या वर्षाचा आढावा घेऊन हे पाहतात की त्यावर्षी कुठल्या शब्दांनी आपले सांस्कृतिक विश्व जास्तीत जास्त व्यापलेले होते.
त्यानंतर मतदान प्रक्रियेतून सर्वोच्च शब्द निवडला जातो.
दर वर्षाच्या शेवटच्या
दर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात प्रमुख इंग्लिश शब्दकोश त्या वर्षाचा आढावा घेऊन हे पाहतात की त्यावर्षी कुठल्या शब्दांनी आपले सांस्कृतिक विश्व जास्तीत जास्त व्यापलेले होते.
त्यानंतर मतदान प्रक्रियेतून सर्वोच्च शब्द निवडला जातो>> अच्छा , मग हे असे होण्या मागचे गणित साधारणत: असे असावे की युरोप मधील क्लब फुटबॉल हे मे ते ऑगस्ट वगळता पुर्ण वर्षभरचालू असते प्रत्येक विकेंड/ मिडवीक, आणि प्रमूख ५ लीग्ज च्या प्रमुख क्लबचे मिलिअन्स ॲन्ड मिलिअन्स ऑफ फॉलोअर्स संपूर्ण जगात पसरलेले आहेत. हे सर्व जण एकमेकांना ट्रोल करताना, आपापासात बोलताना वेगवेगळ्या जारगन्सचा वापर करतात आणि फुटबॉलच्या वैश्विक रिच मुळे हे शब्द वेगाने सर्वदूर पसरतात, आणि फुटबॉल व्यतिरिक्त इतर संभाषणातही पाझरतात. बरेच शब्द हे पुर्णतः नविन बनवलेले नसून आधी कधितरी ऐकलेले पण फारसे प्रचलित नसलेले असे असतात, पण एकदा का या फेऱ्यात आले की फार प्रसिद्ध पावतात.
सध्या असाच एक शब्द फार वापरात आलाय 'हेट वॉच' (Hate watch) म्हणजे निव्वळ हेटाळणी/ ट्रोल करण्यासाठी कोणताही परफॉर्मन्स मुद्दामहून पहाणे/ लाईव्ह ॲनलिसीस करणे. सध्यातरी हा फुटबॉल मॅचेस संदर्भात जास्त वापरला जतोय पण कदाचित पुढे मागे मुव्हीज, स्पिचेस अगदी प्रोटेस्ट या संदर्भात ही वापरायला स्कोप आहे.
* हेट वॉच
* हेट वॉच
>>> ऐकला होता.
ऑक्सफर्डच्या यंदाच्या शब्दस्पर्धेतील बाकीचे दोन शब्द हे होते :
aura farming
biohack
https://corp.oup.com/word-of-the-year/
डिक्शनरी डॉट कॉम चा या
डिक्शनरी डॉट कॉम चा या वर्षीचा शब्द आहे सिक्स - सेव्हन.
याला अर्थ तसं म्हटलं तर काही नाही. ते दोन आकडे एकत्र दिसले की ते तसे उच्चारले की मजा येते. हा शब्द आमच्याकडे लहान मुलांमुळे गेलं वर्षभर फेमस आहे.
छान आहे शब्द !
छान आहे शब्द !
हो हो हा 6 7 बराच फेमस झालाय
हो हो हा 6 7 बराच फेमस झालाय इकडे पण शाळांमध्ये. पार वैताग आणलाय. अर्थ बहुदा ठीक ठाक असा काहीतरी आहे. आणि त्याची हाताची ऍक्शन पण आहे काहीतरी. पोरगी खूपदा वापरत असते.
browse
browse
याचा मूळ शब्दशः अर्थ : प्राण्यांनी झाडाचा थोडाथोडा पालापाचोळा आणि कळ्या अधूनमधून चरणे.
सन 1870 पासून त्याचा लाक्षणिक अर्थ : (दुकानात) पुस्तके चाळणे असा झाला.
1982 पासून तो संगणक क्षेत्रात सध्याच्या अर्थाने वापरला जातो
= निरनिराळ्या संकेतस्थळावर विशिष्ट हेतू न ठेवता रँडम फिरत राहणे.
(चरणाऱ्या प्राण्याप्रमाणे)
>>>(चरणाऱ्या प्राण्याप्रमाणे)
>>>(चरणाऱ्या प्राण्याप्रमाणे)
चरणार्या उंडग्या गाय-बकरीप्रमाणे.
browse
browse
याचा मूळ शब्दशः अर्थ : प्राण्यांनी झाडाचा थोडाथोडा पालापाचोळा आणि कळ्या अधूनमधून चरणे.>>> हे नव्हतं माहीत, मुख्य म्हणजे त्या क्षेत्रातील असूनही.... मस्त 🐂
* उंडग्या >> मस्त शब्द !!
* उंडग्या >> मस्त शब्द !!
* मस्त *** >>> वा, मस्त चित्र. code काय ?
हुंडग्या गायी असा आहे ना शब्द
हुंडग्या गायी असा आहे ना शब्द ?
बारीक चणीची, दूध जास्त देते ती ?
(का.) उंडिग, उंडिगी, उंडगी =
(का.) उंडिग, उंडिगी, उंडगी = रिकामा, निरुपयोगी
हा मूळ कन्नड शब्द (दाते शब्दकोश)
हुंडणें =
अक्रि. इतस्ततः भटकणे
वा, मस्त चित्र. code काय ? >>
वा, मस्त चित्र. code काय ? >>>> 🐂 याच्या शेवटी स्वल्पविराम जोडा.
🐂,
🐂
धन्स
अर्धविराम लागला.
इंग्लिश भाषेचे एक महत्त्वाचे
इंग्लिश भाषेचे एक महत्त्वाचे शब्दकोशकार सॅम्युएल जॉन्सन यांची आज पुण्यतिथी (मृत्यू : १३ डिसेंबर, १७८४). त्यांनी एकहाती श्रम करून तयार केलेला इंग्लिश शब्दकोश हे इंग्लिश भाषेच्या विकासातील एक महत्त्वाचे आणि क्रांतिकारक पाऊल होते. शब्दकोश तयार करण्याचे काम कसे असते याबद्दल ते कोशाच्या प्रस्तावनेत लिहीतात,
“ Success without applause and diligence without reward”.
इंग्लिश साहित्यातील ज्या साहित्यिकांची वाक्ये अजरामर वचने म्हणून प्रसिद्ध झाली त्यामध्ये अग्रस्थानी शेक्सपियर आहे आणि त्या खालोखाल सॅम्युएल जॉन्सन. जॉन्सनच्या नावाने दिला जाणारा साहित्यिक पुरस्कार हा इंग्रजी साहित्यातील अतिशय मानाचा पुरस्कार आहे.
*एक महत्त्वाचे शब्दकोशकार
*एक महत्त्वाचे शब्दकोशकार सॅम्युएल जॉन्सन * - ते तर एक चालता बोलता शब्दकोश, ज्ञानकोश व संवादमहर्षि होते. बॉस्वेल यांनी जॉन्सन यांच्या लिहिलेल्या चरित्राला चरित्रात्मक साहित्यात मानाचं स्थान आहे. त्यातले संवाद, चर्चा इ. बॉस्वेल याने स्वतः टिपण करून ठेवलेली होती व त्यासाठी जॉन्सन यांच्याबरोबर तो सर्वत्र फिरत असे. ह्या चरित्राचा ( popularly known as ' Boswell's Johnson ' ) कोणताही भाग वाचायला घेतला तरीही जॉन्सन यांचा व्यासंग, लोकसंग्रह, संवाद कौशल्य , विनोदबुद्धी इ.चा प्रत्यय येतोच.
*Boswell's Johnson >>> अगदी
*Boswell's Johnson >>> अगदी बरोबर !
याबद्दल पूर्वी वाचले होते. महाराष्ट्रात 19 व्या शतकाच्या अखेरीस विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘निबंधमाले’च्या अंकांमध्ये सात भागांची लेखमाला लिहून जॉन्सन यांचे चरित्र कथन केले होते.
जॉन्सन यांच्या शब्दकोशातील काही शब्दांचे त्यांनी दिलेले अर्थ पुढे कालौघात बरेच बदलत गेलेले आहेत. त्यापैकी एक खास उदाहरण म्हणजे
womanise हा शब्द.
या शब्दाचा जॉन्सननी दिलेला अर्थ हा ‘मृदु करणे’ असा आहे. हा अर्थ मोठा काव्यात्म आहे. आज ‘वुमनाइजर’ म्हणजे स्त्रीलंपट!
Pages