शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्धायुष्य २० सेकंद आणि आयसोटोप्सचे त्याहून कमी!
मिली सेकंद मध्ये असणाऱ्यांसाठी कुठला मास स्पेक / इतर तत्व वापरले असेल डिटेक्ट करायला काही कल्पना?

हा धागा फार आवडतो.
मारुती चितमपल्ली यांनी वर्णन केलेल्या मोरनाचीला इंग्रजीत, https://en.wikipedia.org/wiki/Lek_mating म्हणतात. बरेच नर व मोर माद्या जमतात व एक एक मोर रिंगणात येउन नाचतो वगैरे. जी मादी लट्टू होइल, ती रिंगणात उतरते व त्यांचे मीलन होते. मग दुसरा मोर रिंगणात उतरतो. वगैरे.. मोरांमध्ये, अशा रीतीने जोड्या जमतात.

Lek mating
>>> वा ! प्रकार रंजक आहे. आवडला .

टाटा
येस टाटा जो शब्द आपले आई वडील आपल्या बालपणी आग्रहाने आपल्याला शिकवतात
आणि नातेवाईकांसमोर म्हणायला लावतात तोच तो टाटा. हा शब्द मुळात ब्रिटीश इंग्लिश
मधला नेहमीच्या वापरातला. ta-ta अस शोधल्यास शब्दकोशात मिळेल. अर्थ तोच आहे good bye.
TTFN म्हणजे TATA FOR NOW. हे पूर्वीच्या रेडीओ प्रोग्राम मध्ये वापरात होते.

आमंत्रण आणि निमंत्रण यात फरक काय

शब्दकोशानुसार ते दोन्ही शब्द एकमेकांचा अर्थ म्हणून दिलेले दिसतात
(बोलावणें, आंवतणें).
https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82...
मागे या मुद्द्यावर अन्य धाग्यावर चर्चा झाली असावी.
मला असे वाटते :

आपण एखाद्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष त्याला बोलावले तर ते आमंत्रण. याउलट आपण एखाद्याला टपाल किंवा इ माध्यमाद्वारे पत्रिका पाठवली तर ते निमंत्रण..

अर्थात हा निव्वळ माझा अंदाज.

आमंत्रण आणि निमंत्रण यात फरक काय आणि ते कुठे वापरायचे? >>> चिनूक्सने मागे कुठेतरी सांगितले होते - लग्न किंवा इतर समारंभाकरता असते ते आमंत्रण आणि यज्ञ आणि मयत-कार्याचे असते ते निमंत्रण. जुन्या संकेतानुसार आमंत्रण टाळता येते, निमंत्रण मात्र टाळायचे नसते.

man- या शब्दमुळाचा अर्थ 'हात' असा आहे.
यावरून तयार झालेले इंग्लिशमध्ये असंख्य शब्द आहेत. त्यातील नेहमीच्या वापरातले काही :

command; commando; commend; demand;
maintain; manage; mandate; manicure;
manifest; manipulation; manner; manual; manufacture; manuscript

या सर्वांचा मूळ अर्थ, 'हाताने' करण्याशी / हातात देण्याशी संबंधित आहे.

मला वाटायचं man हा शब्द Human पासून झालेला आणि मनू- मनुष्य ह्यापासून human शब्दं झालेला आहे. हाताचाही हात होता की यात ! Woman म्हणजे 'वामांगी' कसे, 'मनुस्मृती' ही कशी पहिली manuscript आहे असे तर्कवितर्क यातून काढून सगळं कसं आपणंच शोधलं हे ठोकून द्यायला भलताच वाव दिसतोयं. Happy Wink

'मराठी विज्ञान परिभाषा'

आजपर्यंत शासनातर्फे विज्ञान विषयांबरोबरच इतर विषयांचे एकूण ४८ परिभाषा कोश प्रसिद्ध झाले आहेत. त्यांतले ३५ महाजालावरही उपलब्ध आहेत.
https://www.loksatta.com/navneet/bhashasutra-marathi-science-definition-...

विक्रम गोखले यांच्यासंबंधी वाचताना thespian हा एक छान शब्द इथे वाचनात आला:
https://www.google.com/amp/s/www.businesstoday.in/amp/trending/entertain...

दिग्गज कलाकार या अनुषंगाने वापरलेल्या या शब्दाचे मूळ Thespis असून ते एका प्राचीन ग्रीक कवीचे नाव आहे.

Amazon हा बहुपरिचित शब्द.
मुळात ग्रीक पुराणानुसार amazon हा स्त्री योद्ध्यांचा वंश आहे.

त्या अर्थावरून तयार झालेला Glamazon हा संयोगशब्द भारदस्त आहे.
Glamazon = glamor + amazon
उंच व आकर्षक स्त्रीसाठी हा शब्द वापरतात

आत्ताच हा वाक्प्रचार बातम्यात वाचला. त्या निमित्ताने.
'cross the Rubicon'
रुबीकॉन ही उत्तर इटली मधली एक छोटीसी नदी आहे. "ती पार करणे" ह्या वाक्प्रचाराला एव्हढे महत्व का प्रोप्त झाले? ह्या वाक्प्रचाराचा शब्दकोशातला अर्थ आहे कि असा निर्णय घेणे कि ज्यापासून माघार घेणे शक्य नाही. थोडक्यात लक्षमण रेषा ओलांडणे.
ह्या वाक्प्रचाराचा जुलिअस सीझर ह्या सुप्रसिद्ध रोमन योद्ध्याशी आहे. त्याने १० जानेवारी 49 BC मध्ये असा एक निर्णय घेतला कि ज्यामुळे रोमन इतिहासाला वेगळे वळण मिळाले. सीझर त्यावेळी गॉलचा म्हणजे सध्याचा दक्षिण फ्रांसचा गव्हर्नर होता. त्याच्या असाधारण कर्तृत्वामुळे रोममधील राजकारणी अस्वस्थ होते. त्याच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी त्यांनी सीझरला हुकुम केला कि त्याने आपले सैन्य बरखास्त करून रोमला परतावे.
गॉल आणि इटलीच्या सीमेपर्यंत तो त्याच्या सैन्यासह आला. इथेच ती रुबिकॉन नदी होती. सीझर जाणून होता कि एकदा का त्याने ही नदी सैन्यासह ओलांडली की तो एक अक्षम्य अपराध ठरला असता. आणि रोमच्या दृष्टीने तो साम्राज्याचा शत्रू मानला गेला असता. हे जाणूनही त्याने नदी ओलांडली. आणि यादवीची सुरवात झाली.
“The die is cast.”
हे सीझरने उच्चारलेले वाक्यही त्याच वेळचे आहे.
Having won the civil war – defeating the de facto leader of the Roman state, Pompey – Caesar named himself as the dictator of Rome. But it only lasted five years as he famously did not heed the warning of another famous idiom – “Beware the Ides of March” – and was stabbed to death.

Beware the ides of March is a warning to watch out for betrayal or misfortune. It's often used in political contexts. The term ides of March refers to March 15—the day on which Roman Emperor Julius Caesar was assassinated in 44 b.c.e. For this reason, it has become associated with bad omens, betrayal, and misfortune
इंग्लिशमध्ये लिहिल्याबद्दल क्षमस्व.

cross the Rubicon'
छान. आवडला

थायलंडमधील ऑटोरिक्षांना tuk-tuk
असे मजेदार नाव आहे. त्या रिक्षांच्या इंजिनाच्या आवाजानुसार हा शब्द निर्माण झाला आहे - नादानुकारी शब्द.
(पूर्वी आपल्याकडे मोटरसायकलला फटफटी म्हणायचे त्याची आठवण झाली)

काही स्वच्छतागृहांमध्ये कमोडच्या शेजारी स्वतंत्र Bidet असते.
Bidet हा फ्रेंच शब्द मजेदार आहे. त्याचा शब्दशा अर्थ "लहान घोडा" (pony) असा आहे.
ज्याप्रमाणे आपण लहान घोड्यावर स्वार होतो तीच कल्पना यावर बसताना आहे !
Happy

scald हा परिचित शब्द आहे.

आज वर्डलच्या निमित्ताने skald हा शब्द प्रथमच पाहण्यात आला. हा स्कॅन्डीनावियातील जुना शब्द असून
" शूरवीरांची गीते रचणारा कवी"
असा त्याचा अर्थ आहे.

होय ! सोडवलेय ..
त्याचा दुसरा अर्थ :

सैनिकी पोषाख सुशोभित करण्यासाठी वापरायची रंगीत पट्टी किंवा किनार

शब्दकोशाची ‘महाशक्ती’!
https://www.loksatta.com/sampadkiya/features/dictionary-super-power-oxfo...

प्रत्यक्षात ही ‘ओईडी’ आजच्या गूगलच्या जमान्यात कालबाह्य व्हायला हवी होती, पण ऑक्सफर्डचाच काय, केम्ब्रिज किंवा अमेरिक वेबस्टर यापैकी कुठलाही खानदानी शब्दकोश इतिहासजमा झालेला नाही.

खूपच रोचक शब्द, वाक्प्रचार, म्हणी कळताहेत. man म्हणजे हात हे माहीत नव्हते. आता मॅन्युअल, मॅन्युफॅक्चर्ड याचे अर्थ सुस्पष्ट होतायत. मॅन्स्प्लेनिंग (the explanation of something by a man, typically to a woman, in a manner regarded as condescending or patronizing.) का म्हणतात कदाचित कन्व्हेन्शनल (पारंपारिक), बहुश्रुत man म्हणजे पुरुष या शब्दापासुन उत्पत्ती असावी.

Pages