माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.
बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.
आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.
गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.
आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:
१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.
मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.
आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!
शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!
आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?
एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
https://www.bbc.com/news/uk
https://www.bbc.com/news/uk-63857329
ऑक्स्फर्डचा यंदाचा शब्द लोकांनी निवडलाय.
The winning word, "goblin mode", is a slang term describing "unapologetically self-indulgent, lazy, slovenly, or greedy" behaviour.
बातमीत हे वर्तन दाखवणारं छायाचित्र आहे. असं मी अनेकदा केलं आहे
वर्तन दाखवणारं छायाचित्र >>>
वर्तन दाखवणारं छायाचित्र >>> मस्तच
मी आमच्या परगावाच्या घरी एकटा असताना तसेच राहतो !
नेहमीच्या घरात "राहायचे" असल्याने तसे वागता येत नाही याची खंत आहे !!
(No subject)
बहुतेक कॉलेज कुमार हे चार वर्षं 'गॉब्लीन मोडमधे' असतात असे म्हणता येईल. खासकरून हॉस्टेलवर.
या निमित्ताने 'कोसला' च्या
या निमित्ताने 'कोसला' च्या मुखपृष्ठाची आठवण झाली :
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5498254067821005221?BookN...
biblio- = पुस्तक
biblio- = पुस्तक
यावरून तयार झालेले रंजक शब्द :
bibliophile = पुस्तकांची बांधणी व छपाई यात रस असणारा पुस्तकप्रेमी/ संग्राहक
bibliomane = पुस्तकवेडा व हाडाचा पुस्तकसंग्राहक
bibliophagist = पुस्तकी “किडा”
bibliopole = दुर्मिळ पुस्तकांचा विक्रेता
bibliography
bibliography
संदर्भग्रंथ किंवा संदर्भाची , माहितीच्या उगमाची यादी.
वरची पोस्ट बघून हाच शब्द आठवला.
अगदी बरोबर !
अगदी बरोबर !
हे घ्या अजून काही :
biblioclast पुस्तकांचा विध्वंसक
biblioklept पुस्तकचोर
bibliolatry पुस्तकभक्ती/ अवलंबित्व
bibliomancy बायबलमधील वचनांचा अन्वयार्थ काढणे
आयुर्वेदातील औषधांची नावही
आयुर्वेदातील औषधांची नावही ऐकून रोग पळ काढतो म्हणे.
अभयारिष्ट - अभय देणारे औषध, अभया'चा ( हिरडा हे मुख्य असलेला) काढा. त्रिदोष उत्पन्न करणारे पोट निरोगी झालं की आपोआपच अभय मिळतं.
पाषाणभेद - मूत्र खडे फोडणारे औषध.
आरोग्यवर्धिनी वटी - नावाप्रमाणेच आरोग्य वाढवणारी वडी/गोळी.
अरे वा !पाषाणभेद >>> हे
अरे वा !
पाषाणभेद >>> हे माहीत नव्हते.
https://www.etymonline.com
Biblio शब्द ज्या लॅटिन शब्दावरून पडला आहे, तो शब्द
byblos -papyrus अर्थ ईजिप्शियन भाषेत भूर्जपत्र किंवा खलिता किंवा पुस्तिका
इथे biblio prefix असलेले शब्द आहेत.
त्यापैकी -
Bibliokleptomania: Uncontrollable desire to steal books हा मलाही रोचक वाटला.
biblical हा ही वाचनात येतो अधुनमधून. याचा अर्थ ज्याचा मूळ संदर्भ बायबलमध्ये आहे. उदा. जॉशुआ, मॅथ्यू, अलिझा ही बिब्लिकल नावे आहेत. याचाही उगम biblio शब्दात आहे.
Biblio- is a combining form used like a prefix meaning “book” and occasionally, “Bible.” Biblio- comes from the Greek biblíon, meaning “book.”
या संदर्भातले सगळेच वाचून टाकले मी
आपण जेव्हा शब्दांचे उगम शोधतो, त्याच्या मुळाशी नवीन शब्द कळतो, पुन्हा त्याच्या संदर्भात आणखी एक नवीन शब्द कळतो. फार छान वाटतं हे असं नवनव्या मुळांशी जायला.
**"फार छान वाटतं हे असं
**"फार छान वाटतं हे असं नवनव्या मुळांशी जायला.
अगदीच +१११
मराठीमध्ये अपभ्रंश हा एक रंजक
मराठीमध्ये अपभ्रंश हा एक रंजक प्रकार असून त्याची आपण बऱ्याचदा चर्चा करतो. तसेच इंग्लिशमध्ये ‘क्रिएटिव्ह’ स्पेलिंग किंवा ‘इनवेंटेड’ स्पेलिंग असा एक मजेदार प्रकार आहे. सध्याच्या युगातील याचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे Google.
मुळात googol ही एक महाप्रचंड गणिती संख्या आहे. त्याचे स्पेलिंग ‘बिघडवून’ Google असे करण्यात आले.
उद्योगांची मुद्रानामे तयार करताना क्रिएटिव्ह’ स्पेलिंगचा वापर करतात.
इन्व्हेंटेड स्पेलिंगचा लहान मुलांच्या भाषा शिकण्याशी जवळचा संबंध आहे
(https://grammar.yourdictionary.com/spelling-and-word-lists/invented-spel...)l
वरील दुवा उघडत नाही.
वरील दुवा उघडत नाही. पण रोचक असणार.
{"message": "Internal server error"}
बघा बरे :
बघा बरे :
https://grammar.yourdictionary.com/spelling-and-word-lists/invented-spel...
धन्यवाद डॉक्टर.
धन्यवाद डॉक्टर.
>>>>>" A key takeaway from this study is that learning how to spell is much more than just memorizing words. It's a developmental process that goes far beyond just exploring the relationships between the symbols used to illustrate speech sounds. Thus, the process of invented spelling can play an important role in leading young learners to develop a deep, phonetically-based understanding of how to spell many words.
मला वाटतं स्पेलिंग बी मध्ये जी मुले येतात, त्यांनाही असेच काहीसे शिकवत असावेत.
probe या शब्दाचा भाषेतील
probe या शब्दाचा भाषेतील अर्थप्रवास रंजक आहे. पंधराव्या शतकात त्याचा उगम वैद्यकीय क्षेत्रातून झालेला आहे. त्याकाळी शरीरावरील जखमांची बारकाईने पाहणी करण्यासाठी एका पातळ धातूच्या कांडीचा वापर केला जाई. त्याला हे नाव होते.

पुढे कालौघात त्याला, “एखाद्या गोष्टीचा विशिष्ट दिशेने केलेला सखोल तपास” हा अर्थ प्राप्त झाला.
आधुनिक काळात उगम पावलेल्या जनुकीय अभियांत्रिकी या विज्ञान शाखेमध्ये डीएनए probe अशी संकल्पना अस्तित्वात आली.
skald, Biblio, probe>>> सर्व
skald, Biblio, probe>>> सर्व छान. आवडले.
नुकतेच केंब्रिज शब्दकोशाने
नुकतेच केंब्रिज शब्दकोशाने woman आणि man यांच्या व्याख्या विस्तारित केल्या आहेत. त्या अशा :
* "woman" to include "an adult who lives and identifies as female though they may have been said to have a different sex at birth."
* “man” is someone who “identifies as male though they may have been said to have a different sex at birth.
गेले 267 वर्षे अस्तित्वात असलेल्या शब्दकोशातील मूळ अर्थात हा महत्त्वाचा बदल आता झालेला आहे. यासंदर्भात पाश्चिमात्य जगात बऱ्यापैकी नाराजीचा सूर उमटला आहे :
https://www.theamericanconservative.com/cambridge-dictionary-redefines-w...
https://www.dailysignal.com/2022/12/16/why-redefinition-word-woman-matters/
<< woman आणि man यांच्या
<< woman आणि man यांच्या व्याख्या विस्तारित केल्या >>
छान. Political correctness आता शब्दकोशापर्यंत पोहोचला तर.
एका मराठी काव्यसंग्रहाचे
एका मराठी काव्यसंग्रहाचे ‘ब्लाटेंटिया’ हे मजेशीर नाव पाहून चक्रावून गेलो.
(https://www.aksharnama.com/client/article_detail/6486)
परिचयात त्यांनी या शब्दाचा अर्थ झुरळ दिला आहे. परंतु प्रत्यक्ष हा शब्द कुठे सापडला नाही.
(काव्यमय रूप असावे ).
Blatta हा मूळ लॅटिन शब्द आहे आणि त्यापासून Blattaria हे एक रूप विकीवर वाचायला मिळाले.
>>>Blatta हा मूळ लॅटिन शब्द
>>>Blatta हा मूळ लॅटिन शब्द आहे आणि त्यापासून Blattaria>>> रोचक.
माहित नव्हते.
ado हा शब्द रंजक आहे.
ado हा शब्द रंजक आहे.
शेक्सपियरच्या Much Ado About Nothing या नाटकामुळे तो बराच प्रसिद्ध झाला.
सन १४०० पासून आजपर्यंत त्याचा अर्थप्रवास मजेदार आहे.
ado = at do = "to do"
to do >>> sexual intercourse >>>> fuss
असा अर्थप्रवास.
greenbackहा अनौपचारिक शब्द
greenback
हा अनौपचारिक शब्द अर्थकारणावरील लेखात वाचनात आला.
हा शब्द अमेरिकी डॉलरला उद्देशून वापरतात.
(He took out a thick wad of greenbacks).
त्याचा इतिहास रंजक आहे. सन १८६० मध्ये अमेरिकेत ज्या चलनी नोटा छापल्या होत्या त्यांची मागची बाजू हिरव्या रंगाची होती. या नोटा युद्धाच्या परिस्थितीत छापल्या होत्या. त्यांना सोन्याचे पाठबळ किंवा अन्य सरकारी संरक्षण पुरेसे नसायचे.
नवीन वर्षाची सुरुवात
नवीन वर्षाची सुरुवात
Eunoia
या विक्रमी शब्दाने करतो.
इंग्लिशमधील मुख्य पाच स्वर असलेला हा सर्वात लहान शब्द आहे.
त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झालेली आहे
https://www.guinnessworldrecords.com/world-records/shortest-word-in-the-....
आज oxygeusia या शब्दाचे
आज oxygeusia या शब्दाचे वैशिष्ट्य पाहू.
त्याचा अर्थ आहे " चवीची तीक्ष्ण संवेदना"
या शब्दात इंग्लिशमधील पाच मुख्य स्वर आणि काही वेळेस स्वर असणारा y देखील आहे.
असे एकूण सहा स्वर असलेला हा सर्वात लहान शब्द आहे.
sarcasm, irony & satire
sarcasm, irony & satire
हे तीन शब्द कोशामध्ये एकमेकाचे समानार्थ म्हणून दिलेले असतात
(https://www.thesaurus.com/browse/sarcasm)
परंतु त्या तिघांच्या स्वतंत्र अर्थामध्ये बर्यापैकी फरक आहे. तो त्यांची योग्य उदाहरणे वाचूनच छान समजतो.
तसेच वरील इंग्लिश शब्दांचे जालकोशांमधले मराठी अर्थ देताना उपरोध, उपहास हे सगळे अर्थ एकाच शब्दाचे म्हणून दिलेले असतात. तिथे काहीशी अर्थखिचडी होते.
अगदी मराठी शब्दकोशात सुद्धा असे दिलेले असते :
उपरोध = Irony, sarcasm.
(https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B...)
हा प्राणी ओळखता येतो आहे का ?
हा प्राणी ओळखता येतो आहे का ?
...
...
..
....
मला त्याचे नाव वर्डलमुळे समजले...
koala
हो, हा प्राणी माहिती आहे. हा
हो, हा प्राणी माहिती आहे. हा ऑस्ट्रेलियात आढळतो. हा सगळ्यात मंद प्राणी असावा अशी शंका व्यक्त केली आहे. कारण हे कोआला फक्त निलगिरीची पानं खातात. त्यात अजिबात ऊर्जा नसते. शिवाय ती पानं झाडावर असली तरच त्यांना ओळखू येतात म्हणे. पानं तोडून समोर वाढली तर ती हीच आहेत हे लक्षात न येऊन ते उपाशी रहातात. यांचा मेंदू शरीराच्या मानाने सगळ्यात लहान व गुळगुळीत आहे. कुठलेही पान खाऊन राहू शकत असतानाही एकाच पानासाठी एकमेकांचा जीव घेऊ शकतात म्हणे.
याआधी मला स्लॉथ हा प्राणी मंद वाटायचा कारण तो फक्त गवत खातो त्यातनं काहीही ऊर्जा मिळत नाही.
One of the stupidest animal नाव असलेल्या व्हिडिओत बघितले.
*निलगिरीची पानं त्या व्हिडीओ मधे Eucalyptus leaves म्हणून सांगितली आहेत, तो ऑस्ट्रेलियातील निलगिरीचा वेगळा प्रकार असेल तर कल्पना नाही. व्हिडिओ सापडला तर देईन.
सापडला.
https://youtu.be/5diQgv20ewg
अस्मिता, छान माहिती.
अस्मिता, छान माहिती.
wordle सोडवताना * oal* इथपर्यंत येऊन ठेपलं होतं.
शेवटी a टाकला तेव्हा सहावा प्रयत्न संपला होता. मग त्यांचे उत्तर आले.
कधी ऐकलाच नसल्यामुळे शब्द येणे अवघड होते.
koala.. हो माहीत आहे.अस्मिता
koala.. हो माहीत आहे.अस्मिता म्हणाली तसे तो ऑस्ट्रेलयात आढळतो.
Pages