शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Cobalt हा एक परिचित धातू. या शब्दाची जन्मकथा रंजक आहे.
शब्दाचा उगम जर्मन असून तो kobold या शब्दापासून तयार झालाय.

तर त्याची कथा अशी:
जर्मनीतल्या चांदीच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना एकदा एक चांदीसारखा दिसणारा पण वेगळा धातू सापडला. जेव्हा त्याचे शुद्धीकरण करून चांदी मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला तेव्हा मात्र चांदी काही मिळाली नाही. उलट त्या प्रक्रियेदरम्यान निघालेल्या वाफांमुळे कामगारांचे आरोग्य बिघडले. त्यातून कामगारांनी या अनोळखी धातूला भूगर्भातील सैतान किंवा वेताळाची उपमा दिली (kobold).

कालांतराने वैज्ञानिकांनी या धातूचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले. त्याचे नामकरण करताना वरील जुन्या ऐतिहासिक घटनेचीच नोंद घेतली.

Icterus = कावीळ
हा शब्द मूळ ग्रीक (ikteros) असून त्याची व्युत्पती रंजक आहे. या शब्दाचा दुसरा अर्थ एक पिवळा पक्षी असाही आहे (चित्र पहा):

icterus bird.jpg

एका प्राचीन समजुतीनुसार जर काविळीच्या रुग्णाने या पक्षाकडे पाहिले तर त्याची कावीळ बरी होते आणि तो पक्षी मरतो !

(अर्थात सामान्य व्यवहारात Icterus पेक्षा jaundice अधिक वापरला जातो )

लेखनकला अस्तित्वात येण्यापूर्वीपासून मौखिक वाङमयाची परंपरा अस्तित्वात आहे. या प्रकारच्या साहित्यासाठी एक सुरेख इंग्लिश संयुक्त शब्द वाचनात आला : orature.
त्याची फोड अशी :
Oral + literature

हा शब्द केनियाचे कादंबरीकार Ngugi wa Thiong'o यांनी भाषेमध्ये प्रचलित केला.

इंग्लिश शब्दांमधील अनुच्चारित (सायलेंट) अक्षरे हा एक रंजक विषय आहे. debt, doubt, psalm, psyche ही नेहमीची उदाहरणे बहुतेकांना माहीत आहेतच. अन्य काही मजेदार माहिती २-३ प्रतिसादांत लिहीन.
१.
संपूर्ण इंग्रजी वर्णमालेत V हे एकमेव अक्षर असे आहे की जे शब्दांमध्ये असताना नेहमीच त्याचा उच्चार होतो. (https://www.dictionary.com/e/silent-letters-in-english/ ).

या मुद्द्यावर भाषेशी खेळणाऱ्या अनेक आंतरजालीय मंडळींनी अनुच्चारित v चा शोध घेतलेला आहे. परंतु अद्याप V अनुच्चारित असलेला अधिकृत शब्द शब्दकोशांमध्ये आलेला नाही. Happy

अर्थात कवितेमध्ये e’er & ne’er ही जी रूपे वापरली जातात त्यामध्ये v लिहिताना सुद्धा उडवून टाकलेला आहे.

अनुच्चारित इंग्लिश अक्षरांच्या क्रमवारीत V नंतर J Q ही दोन अक्षरे आहेत. प्रमुख शब्दकोशांनुसार ती अनुच्चारित असणारा प्रत्येकी एक शब्द आहे.
* J हे अक्षर अनुच्चारित असणारा एकच शब्द म्हणजे :
Marijuana

* Q हे अक्षर अनुच्चारित असणारा एकच शब्द म्हणजे :
lacquer

इंग्लिश स्पेलिंगमध्ये अनुच्चारीत अक्षरे का असतात यावरील एक चांगला लेख इथे
https://www.scienceabc.com/eyeopeners/how-did-silent-letters-come-into-t...

त्यातील काही निवडक:

१. एकूण 60% स्पेलिंगमध्ये अनुच्चारीत अक्षरे आहेत
२. सोळाव्या शतकापर्यंत ‘knife’, ‘knight’, ‘know’ and ‘knock’ या शब्दांमध्ये k उच्चारला जात असे.

मला कधी कधी know हा एके काळी k सहित उच्चार असलेला शब्द आपल्या ज्ञा ह्या संस्कृत धातूचा cognate वाटतो. भारतात ह्याचा उच्चार ग, ग्न, द आणि ज असे तीन वर्ण वापरून होतो. गुजराती ग्न हा know च्या मूळ उच्चाराच्या जवळ जातो.

प्रशासकीय कामात वापरला जाणारा शब्द 'धारीका' म्हणजे नक्की काय? सदनिका तपासणी धारीका किंवा प्रशासक धारीका असे शब्द आहेत. पण अर्थ कळत नाहीये. गुगलवर पण काही दिसत नाहीये.

Cynic या शब्दाची व्युत्पत्ती रंजक आहे.
या शब्दाचे मूळ ग्रीक असून त्याचा अर्थ कुत्र्याप्रमाणे असा आहे.
अशा लोकांना कुत्र्याची उपमा का दिली असावी याची चार कारणे इथे वाचता येतील :

https://en.wikipedia.org/wiki/Cynicism_(philosophy)#:~:text=10%20External%20links-,Origin%20of%20the%20Cynic%20name,the%20Cynosarges%20gymnasium%20at%20Athens.

तीव्र उष्णता आणि शब्द निर्मिती !
जगातील बर्‍याच देशांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये उष्ण तापमानाने कहर केला आहे. एरवी त्या देशांना अशा उच्च तापमानाची सवय नसल्यामुळे त्यांच्या भाषेत त्यासाठी खास विशेषणे नाहीत.

जपानचे उदाहरण पाहू.
त्यांच्याकडे एरवीचे उच्च तापमान (C) असल्यास हे शब्द वापरात आहेत :
दिवसा >३५ C : moshobi
रात्री > २५ : nettaiya

परंतु आता वाढलेल्या तापमानामुळे एका खाजगी हवामान संस्थेने खालील नवे शब्द योजले आहेत :
दिवसा >४० C : kokushobi
रात्री > ३० : chounettaiya

https://japantoday.com/category/national/japan-weather-association-creat...

अल्पोपहार आणि अल्पोपाहार यापैकी कुठला शब्द बरोबर आहे? मोल्सवर्थ शब्दकोशात दोन्ही शब्द सापडले नाहीत.

उपाहार = फराळ
म्हणून
अल्पोपाहार बरोबर वाटतो.

(उपहार= देणगी)

मी दोन फेसबुक ग्रुप्सचा सदस्य आहे. Give stuff away for free आणि Mumbai Giveaways.
ज्यांना आपल्याकडच्या वस्तू देऊन टाकायच्या आहेत ते लोक तशी घोषणा ग्रुपवर करतात. ज्यांना ती वस्तू हवीशी वाटेल ते तसं सांगतत. अर्थात फुकट.
ज्यांना एखाद्या वस्तूची गरज आहे तेही अशी वस्तू कोणाला देऊन टाकायची आहरतात? अशी विचारणा करतात.
या ग्रुपवर दोन शब्दांशी परिचय झाला.
preloved
rehoming

third rail असा एक शब्दप्रयोग वाचनात आला.
काही देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ट्रेन्सना विद्युत पुरवठा करणारी रुळावर लावलेली एक यंत्रणा असते. ती अर्थातच उच्च विद्युत दाबाने भारित असते.
यावरून राजकारणामध्ये third rail हे लाक्षणिक अर्थाने वापरले जाते. एखादा सामाजिक विषय अतिशय वादग्रस्त आणि स्फोटक असतो; जो कोणी त्याला हात लावायला जाईल त्याला जोरदार झटका बसतो !

https://en.wikipedia.org/wiki/Third_rail_(politics)#:~:text=The%20third%20rail%20of%20a,subject%20will%20invariably%20suffer%20politically.

translation या शब्दाचे बरेच अर्थ आहेत. नेहमीचा तर सर्वांना परिचित आहे. दुसरा अर्थ मजेदार आहे.

पूर्वी देशद्रोही लोकांना हद्दपार करायची शिक्षा असे. तिला ट्रान्सलेशन म्हणत. यावरून इटालियनमध्ये एक छान वचन आहे. त्याचा अर्थ.:

"भाषांतरकार हा (एक प्रकारे) द्रोही असतो !"
(तो मूळ लेखनाशी इमानदार राहू शकत नाही)

uppity हा एक मजेदार अनौपचारिक शब्द वाचण्यात आला. शब्दाकडे पाहिल्यावर पटकन वाटते की तो 'हुच्च प्रवृत्ती' साठीचे नाम असेल. परंतु तसे नसून ते व्यक्तीविशेषण आहे.
( an uppity MP and his lady wife).

Pages