शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी व इंग्लिश भाषेतील क्रियापदांची संख्या या मुद्द्यावरील एक रोचक लघुलेख इथे :
https://www.loksatta.com/navneet/marathi-grammar-sentence-formation-in-m...

यातील हे निवडक :
इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठीच्या शब्दसंग्रहात क्रियापदांची संख्या खूपच कमी आहे. जुन्यांपैकी अनेक क्रियापदं हळूहळू मागे पडत गेली आणि त्या प्रमाणात नवीन क्रियापदं वाढलेली नाहीत. अशा वेळी मराठीत आधीच असलेली क्रियापदं जाणीवपूर्वक वापरण्याच्या प्रयत्नाबरोबरच त्यांचा अर्थविस्तार करून नवीन संकल्पनांसाठीसुद्धा ती वापरणं हा एक मार्ग आहे. याचबरोबर नवी क्रियापदं घडवणं हेही महत्त्वाचं आहे. उदा. उत्पादणे, आदरणे, क्रोधणे, नमस्कारणे अशी काही जुनी, काही नवी क्रियापदं प्रचारात आणू शकतो.

तिथे अ‍ॅड कर असं म्हटलंय. मी तर अ‍ॅडले (अ‍ॅड केले) असं वाचलंय.
गुगलले हे मी वापरलंही असेन.

<‘अ‍ॅड कर’ यासाठी मराठीत ‘वाढव’ हे क्रियापद आहे>
हे पुन्हा शब्दाला शब्द ठेवून झालं.

Add payee साठी लाभार्थीचं नाव नोंदवा हे जास्त बरं वाटेल. (हिंदीतलं पानेवाला चपखल आहे. मराठीला पुन्हा संस्कृतची कुबडी लागतेच).

पूर्वी ( १०० ते ३०० वर्षां दरम्यान) घेणार आणि देणार हे दोन शब्द payee आणि payer ह्यांसाठी वापरले जायचे. उदा. रक्कम घेणार अमुक तमुक पुढे सही/ स्वाक्षरी/ अंगठा.

+१
अजूनही शासकीय दस्तनोंदणीमध्ये 'लिहून घेणार' आणि 'लिहून देणार' हे शब्द प्रयोग वापरले जात आहेत.

बरोबर.
set >> सर्व 156 (किंवा अधिक) अर्थ सापडण्यासाठी OED हा बृहदकोश बघावा लागेल.
Hartnup >>> हा अर्थात वैद्यकीय कोशात व छापील ऑक्सफर्डमध्ये असतो.

farmacy >>> हा वर लिहिल्याप्रमाणे सध्या अनधिकृतच आहे. आहारवैद्यकशास्त्रात त्याचा वापर सुरू झाला आहे.

ELBS with Oxford uni press ,by Hornby ,1976 शब्दकोश 1000+ पाने. यात set चे सर्व ११०+ अर्थासह वाक्यात उपयोग करून दिले आहेत. हे अधिक कामाचे आहे. पण मग त्यांनी शब्द कुठून आला हे देण्याला आवर घातला आहे.
तर ओक्सफर्ड कन्साइज डिक्शनरीत (1600 पाने) root/etymology वर भर दिला आहे. मोठ्या शब्दांचा संभाव्य अर्थ जाणून घ्यायला root उपयोगी पडतं. ( progress,regress,degrees वगैरे. किंवा perambulation, circumambulation वगैरे.

sphygmomanometer
Doctor Thingy
ब्लड प्रेशर ज्याने बघतात ते.

Thingy
a person or thing whose name one has forgotten, does not know, or does not wish to mention.
slang word!

संस्कृत मध्ये जसा अमरकोष आहे त्याच धरतीवर मराठीत 'शब्द्कौमुडी' हे पुस्तक आहे.हल्लीच मला हे मिळाले. ह्याचे संदर्भ बृहद्कोशातही येतात. म्हणजे ह्याची सॉफ्ट कॉपी असणार. लिंक कुणाला माहित असेल तर इथे शेअर कराल का?
लेखक आहेत यशवंत बळवंत पटवर्धन.

+१
'फलाणा'
अन्य नावे :
अमका, तमका, गोमाजी कापशे.

My suggestion
'फलाणा धीकाना'
हरकाम्या शब्द.

सुंदर धागा आहे.
>>>>>>>एखाद्या आजारावर उपचार करताना जेव्हा औषधांपेक्षा अधिक भर आहारशैली बदलण्यावर दिलेला असतो, तेव्हा अशा उपचारांना "farmacy"
मस्त!!!

फलाणा धीकाना'
गुजराती लोक फार वापरतात - फलाणो ढिकणो

farmacy >>> यावरून आठवले :

एखादा नवा इंग्लिश शब्द कोशात कसा समाविष्ट होतो याची रोचक माहिती मी COEDच्या प्रस्तावनेत वाचली होती. इंग्लंडमध्ये इंग्लिश भाषेतील शब्दांचा एक महासंग्रह असतो. त्यात जगभरात इंग्लिश बोलल्या जाणाऱ्या देशांमधून जे जे नवे शब्द तयार होत राहतात त्यांचा समावेश केला जातो.

दरवर्षी भाषा समितीची एक बैठक होते. त्यात नव्या शब्दांचा आढावा घेतला जातो. पुढे त्याला संख्याशास्त्रीय निकषही लावले जातात. त्यातून काही नव्या शब्दांची निवड होते आणि मग ते बृहदकोशात समाविष्ट केले जातात. मूळ महासंग्रह हा बृहदकोशाच्या कित्येक पट मोठा असतो.

समाजातील अनेक घडामोडींचा शब्दार्थावरही परिणाम होत असतो. एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ काही काळानंतर पूर्णपणे विरुद्ध असाही होऊ शकतो. मराठीतली दोन सर्वपरिचित उदाहरणे म्हणजे :

परोक्ष
राजीनामा

त्यांचे मूळ अर्थ कालौघात बरोबर विरुद्ध होऊन बसले आहेत !
अशाच एका इंग्लिश शब्दाच्या उत्क्रांतीचा हा वृत्तांत.

fact हा सर्वपरिचित शब्द. त्याचा अर्थ आपण सगळे जाणतोच. परंतु त्यात आमूलाग्र बदल आता होऊ घातले आहेत.

2017 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागारांनी “alternative facts” हा शब्दप्रयोग लेखनात वापरला. त्यानंतर तो अक्षरशः साथ आल्याप्रमाणे विविध माध्यमांमध्ये फैलावला.

भाषा अभ्यासकांच्या मते आता हळूहळू fact अर्थ बदलाच्या किंवा विस्तारण्याचा दिशेने प्रवास करीत आहे. काही वर्षात त्याचा अर्थ
any information, whether correct or incorrect, true or untrue
असा शब्दकोशात येऊ शकतो !
https://thestandardspeaks.com/fact-is-fiction/amp/

लैंगिक अल्पसंख्याक ("sexual minority") असा शब्द प्रयोग आता वैद्यकात रूढ झाला आहे.
त्यामध्ये खालील सर्वांचा समावेश होतो :
Lesbian, gay,
bisexual, transgender
आणि
asexual / pansexual = जी व्यक्ती स्वतःला स्त्री किंवा पुरुष असे संबोधू इच्छित नाही.

इंग्लिश लघुरुपांचे विविध अर्थ हा एक रंजक विषय आहे.
एकाच लघुरूपाचे निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये अनेक वेगवेगळे अर्थ असतात.
लघुरुपांचे काही शब्दकोशही अलीकडे जालावर लोकप्रिय झाले आहेत.

PA हे एक नेहमीचे उदाहरण.
याचे तब्बल 128 अर्थ (दीर्घरुपे) आहेत !
https://acronyms.thefreedictionary.com/PA

संपादकीय लिहिणार्‍या व्यक्तीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू ?
editor असे आपण पटकन म्हणतो.

पण याहून एक विशेष शब्द आज वाचला तो म्हणजे:
editorialist

Hysteria हा शब्द इंग्लिशमध्ये सुमारे दोन हजार वर्षापासून वापरात आहे. परंतु त्याचे अर्थ मात्र आश्चर्यकारकरीत्या बदलत गेलेले दिसतात.

१. प्राचीन काळी त्याला बायकांचा शारीरिक आजार समजले गेले होते. Hystera याचा शब्दशः अर्थ आहे गर्भाशय. तत्कालीन समजूत अशी होती, की ज्या स्त्रीचे गर्भाशय जागेवरून 'हलते किंवा फिरते' , तिच्या वागण्यात विचित्र बदल होऊ लागतात.

२. या समजूतीमुळे या अवस्थेवर काही भन्नाट उपचार केले जात. जसे की, तीव्र वासाचे काही पदार्थ हुंगायला देणे किंवा ते योनीतून आत सोडणे.

३. कालांतराने या शब्दार्थात, एखाद्या स्त्रीला मूल न होणे किंवा तिने लग्न न करणे अशीही विचित्र भर पडली !

४. विसाव्या शतकात जेव्हा मानसशास्त्राचा रीतसर अभ्यास झाला तेव्हा hysteria हा शारीरिक आजार नसून ती एक मनोवस्था असल्याचे मत मांडले गेले. तेव्हापासून हा शास्त्रीय अर्थ लागू झाला.
अर्थातच ती स्त्री किंवा पुरुष अशा दोघांतही दिसू शकते.

Pages