एका धावकाचे (म्हणजे माझेच :P ) ‘मैत्री’ खातर आवाहन

Submitted by हर्पेन on 22 May, 2017 - 11:39

एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन

मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.

माझ्या धावण्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या प्रवासाला मायबोली साक्षी आहे. तसेच माझ्या मेळघाटातल्या अनुभव लिखाणाबरोबर ‘मैत्री’ ला मदत करा अशा केलेल्या आवाहनाला देखील अनेक मायबोलीकर कायमच प्रतिसाद देत आले आहेत. काही मायबोलीकरांनी तर मेळघाटात प्रत्यक्ष जावून स्वयंसेवक म्हणूनही काम केले.

आता ह्या दोन्हीचा इथे / परस्परांशी काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. तर तो संबंध असा.

मी आता यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लदाख येथे होणाऱ्या खारदुंग ला चेलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची आहे.

अधिक माहीती http://ladakhmarathon.com/races/khardung-la-challenge/

तसे पाहता मी आजवर चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा अशा शर्यती पार पाडल्या आहेत. पण तरीही ही अल्ट्रा माझ्याकरता खरोखरच मोठे आव्हान आहे.

मी माझ्या परीने सगळ्याप्रकारची तयारी चालू केल्ये. रजा मिळवून झाल्ये, जाण्यायेण्याची तिकीटे काढून झालेली आहेत. वेळापत्रकानुसार धावणे सुरु केले आहे. ( मागच्या आठवड्या पर्यंत सरासरी ६० ते ७० किमी धावणे करत होतो ह्या आठवड्यातले ध्येय एकूण १०० किमी आहे)

इतक्यातच 'मैत्री' संस्थेला त्यांचे मेळघाटातील उपक्रम चालू ठेवण्याकरता निधी कमी पडतोय अशी बातमी कळली. त्यामुळे मी ही स्पर्धा मैत्री संस्थेच्या कार्याला समर्पित करायचे ठरवले आहे आणि माझी अशी आकांक्षा / संकल्प आहे की या तीन-चार महिन्यात ‘मैत्री’ च्या मेळघाटातील कामाकरता किमान १००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे.

मैत्री संस्थेचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असले ल्या नागरिकांचे एका चांगल्या कामाकरता एकत्र येणे आणि तब्बल वीस वर्षे ते काम चालू ठेवणे. फक्त अडीच माणसे सोडली तर बाकी सर्व जण मैत्रीकरता काम विनामुल्य / स्वयंसेवा म्हणून करतात. ओव्हरहेड जवळ जवळ नाहीच. मेळघाटातल्या लोकांना औषधे सोडली तर वैयक्तिक वापराच्या कुठल्याही वस्तू फुकट वाटत नाहीत. सामुहिक वापराकरता सोलर वर चालणारा पंप आणि पाण्याची टाकी बसवून दिली पण त्याची देखभाल स्थानिक रहिवाश्यांकडून वर्गणी काढून केली जाते. स्थानिक लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. शाळा चालाव्यात म्हणून शैक्षणिक साहित्य दिले जाते. सध्या चालू असलेल्या योजनांचा ही सगळा भर कौशल्ये विकास (skill buildng/ development), व्यवसाय निर्मिती व उद्योजकता, सरकारी योजनांविषयी माहिती व पाठपुरावा, सेंद्रिय व पारंपारिक शेतीमधून उत्पादकता वाढवणे अशा कार्यक्रमांवर आहे.
अधिक माहीती करता - http://www.maitripune.net/Home.html

मी स्वतः काही वेळा काही दिवसांकरता मेळघाटात स्वयंसेवक म्हणून जाऊन आलो आहे.

तर अशा 'मैत्री' खातर ज्यांना जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे, यथाशक्ती यथामती जी काही रक्कम देउ करायची असेल ती मैत्रीच्या खात्यावर परस्पर जमा करावी अशी मी विनंती करतो.

देणगी: “मैत्री” या नावाने चेक / रोख देणगी म्हणून देता येईल.
“मैत्री”साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

जे कोणी जी काही रक्कम जमा करेल त्यांनी इथे तसे कळवावे. जर कोणाला स्वत:चा नामोल्लेख नको असेल तर त्यांनी मला तसे संपर्कातून (९८८११५२८८४) कळवल्यास त्यांनी दिलेली रक्कम अनामिक देणगीदाराकडून म्हणून नमूद करण्यात येईल. रक्कम परस्परच जमा करायची आहे मात्र केली की इथे जरूर कळवा. तसेच मी 'खारदुंग ला' करता करत असलेल्या तयारीबद्दलही वेळोवेळी इकडे कळवत राहीनच पण असे (मनोरंजन मुल्य नसलेले) धागे लगेच मागे जातात म्हणून वेळोवेळी मला शुभेच्छा देत राहून ह्या धाग्याला वर आणत रहा. कृपया धन्यवाद Happy

आठवडा पहिला - देणगीदार ६ - जमा झालेली रक्कम रुपये ३२००१/-
आठवडा दुसरा - देणगीदार ७ - जमा झालेली रक्कम रुपये ११६१२/-
आठवडा तिसरा - देणगीदार ४ - जमा झालेली रक्कम रुपये ५०००/-
आठवडा चौथा - देणगीदार ६ जमा झालेली रक्कम रुपये १०००१/-
आठवडा पाचवा - देणगीदार ४ जमा झालेली रक्कम रुपये १००००/-
आठवडा सहावा - 'जैसे थे' परिस्थिती
आठवडा सातवा - देणगीदार १६ जमा झालेली रक्कम रुपये २२५००/- एकूण (४३/७२) (९२११४/- /७२०००/-)
आठवडा आठवा चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अन्जू , हो आदित्य - मी आरामातच धावलो काल जोरात धावताना जितकी एनर्जी लागते तितकी नव्हतीच माझ्यात, पण घरी बसलो असतो तर अजूनच वाईट अवस्था झाली असती माझी.
आणि आज पुर्ण आरामच केला धावलो तर नाहीच पण बाकीही काही व्यायाम केला नाही. उशीरापर्यंत झोपलो Happy

प्रश्न थोडा बाळबोध वाटेल तरीही विचारतो.

प्रत्यक्ष रस्त्यावर धावण्यास सुरुवात करण्यापूर्वी ट्रेडमिलवर सराव करणे कितपत योग्य. आणि असा सराव करायचा असेल तर, किती वेगाने किती वेळ धावावे? किंबहुना, धावण्याआगोदर फास्ट-वॉक, जॉग आणि मग रनिंग असे योग्य आहे काय?

जाणकारांनी सल्ला द्यावा.

मला ट्रेडमिल चा फारसा अनुभव नाही. पण आधी ट्रेडमिलवर सराव करून रस्त्यावर धावायला कशा रीतीने उपयोग होईल हे कळले नाही, रस्त्यावर किंवा एकंदरीत धावणे चालू करायच्या आधी आणि नंतर केलेले स्ट्रेचिंग उपयोगी ठरते हे सांगू शकतो.

हर्पेन मस्तं चालू आहे. प्रतिसाद दिला नाही तरी तुमचा प्रॅक्टिस लॉग नियमितपणे वाचतो.
फायनल रेस आणि सरावासाठी आहारात केलेले बदल आणि पळण्यासाठी कायम केलेल्या खाण्याच्या सवयी आणि त्यामगचा विचार याबद्दलही जमत असल्यास नक्की लिहा.
माझ्यासारख्यांना नक्कीच ऊपयोग होईल ह्या माहितीचा.

धन्यवाद हायझेनबर्ग, या विकांतापर्यंत प्रयत्न करतो लिहायचा.
धन्यवाद जिज्ञासा, मलाही खूप भारी वाटतंय, पहिल्यांदाच असा धावलो . जाम वाट लागली पण जरा आत्मविश्वास वाढीस लागला Happy

काल सकाळी पाऊस होता त्यामुळे पळायला गेलोच नाही .

आज १२किमी धावलो. मस्त वाटलं.

सॉरी, लिहायचे राहून गेले होते की मागच्या आठवड्यात २ जणांनी प्रत्येकी ५हजाराप्रमाणे एकूण १०हजार रुपये मैत्रीला देणगी म्हणून दिले.
एकूण देणगीदार ४९
एकूण देणगी रक्कम १,१८,११४/-
सर्वांचे मनापासून आभार

काल धावायला सुट्टी होती.
आज ३ तास धावलो, बरोबर अमनदीप होता, वाटेत प्रवीण झेले जो सलग १२१ दिवस पळून विश्वविक्रम करण्याच्या प्रयत्नात आहे तो भेटला. त्याचेच लक्ष गेले, रस्ता ओलांडून आमच्या बाजूला येऊन दोन शब्द बोलला, खूप छान वाटले.
अजून पुढे मायबोलीकर धावपटू बारीशकर हा पण भेटला, अनेक दिवस म्हणत होतो त्या प्रत्यक्ष भेटीचा योग आज आला.

खाणेपिणे संदर्भात हायझेनबर्ग यांनी केलेल्या विचारणे नंतर केलेले आत्मनिरीक्षण Happy

नेहेमीकरताच जे करतो ते म्हणजे
सकाळी दमदमीत नाश्ता ज्यात पोहे, उपमा, फोडणीची पोळी, पराठा वगैरे जे बनवले असेल ते त्याच्या जोडीला भाजका पापड, एखादी राजगिरा वडी, एक ग्लास भर ताक (दूध पित नाही अगोदर आवडायचे सध्या नाही आवडत) बरेचदा एक केळं

दुपारी डबा ज्यात भाजी पोळी दहीभात. (दहिभाताची एक मजा आहे, सकाळी विरजण लावलेल्या दुधात भात कालवून नेला की दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत अदमुरा दहीभात तयार, हा कधीच आंबट होत नाही पण त्याला फोडणी वगैरे काही नसते) शिवाय सॅलड आणि चटणी लोणचे पैकी काहीतरी असते.

रोजच्या जगण्यातला दैनदिन व्यवहारातील महत्वाचा बदल म्हणजे प्रयत्न असतो की रात्री साडेआठच्या आत जेवण झालेच पाहिजे. त्याकरता ऑफिसमधून घरी आलो की अबरचबर चिवडा चकली ई. काहीही खात नाही. एकदम जेवतोच. रात्रीच्या जेवणात आठवड्यातून निदान २ वेळा तरी भाकरी असते, कधी ज्वारी कधी नाचणी

काय खायचे ते जमतेच असे नाही पण काय नाही खायचे ते पाळतो सॉफ्ट ड्रिंक्स अजिबात नाही, पिझ्झा, बर्गर नाही , सामोसा, कचोरी नाही अर्थात कधीतरी चिट डे ला वडापाव, भेळ खातो पण बाहेरचे खाणे म्हणजे हॉटेलिंग जवळ जवळ बंदच

लडाख संदर्भातील तयारी
प्रोटीन करता म्हणोन रोज एक अंडे खायला इतक्यातच सुरु केले. ऑफिसमध्ये तोंडात टाकायला म्हणून ड्राय फ्रुट्स नेतो. अधोनमधून डार्क चॉकलेट, आमच्या ऑफिस जवळ ए बी सी फार्म आहे त्यांच्याकडे मिळते ती लेमसी, पेरू असे चालू असते.

बाकी प्रोटीन किंवा अन्य कसल्याही प्रकारची सप्लिमेंट्स घेत नाही. पूर्ण भर नेहेमीच्या जेवणातच संतुलित आहार साधण्यावर

आज एल्सॉम होती. लास्ट संडे ऑफ द मंथ
पुणे रोड रनर्स नी आयोजित केलेली ही रन बोपदेव घाटमार्गे होती.
मात्र आज पाऊस अजीबात नव्हता. मला अडीचच तास पळायचं होतं पण २१ किमी करता मला दोन तासाच्यावर वेळ लागली आणि मी पुरे केलं.
म्हणजे परत जायचा कंटाळा केला Happy

हर्पेन, हा उपक्रम फारच छान चाललाय व याला मायबोलीकर जी साथ देताहेत ते वाचुनही खुप चांगले वाटते आहे.

मागच्या आठवड्यात २ जणांनी प्रत्येकी १ हजाराप्रमाणे एकूण २ हजार रुपये मैत्रीला देणगी म्हणून दिले.
एकूण देणगीदार ५१
एकूण देणगी रक्कम १,२०,११४/-

या आजच्या तारखेला मायबोलीकर देणगीदारांची संख्या एकूण देणगीदारांच्या संख्येच्या जवळपास ४०% आहे पण रक्कम मात्र एकूण रक्कमेच्या जवळपास ५०% आहे.

सर्वांचे मनापासून आभार!

हर्पेन, तुम्हाला सॅल्युट !!
चढावर धावणे किती कठिण असते ह्याचा अनुभव असल्याने हॅट्स ऑफ....
एवढ्या मोठ्या लाँग रन्स करतांना पाण्याचं कसं करता ? एका पोस्ट मध्ये वाचलं की पाठीवर पिशवी नेता, पण पाणी एवढ पाणी पुरतं का ?

धनश्री, धन्यवाद आणि सॅल्यूट !

सध्याच्या पावसाळी (पुण्यातल्या) वातावरणात जास्त पाणी लागत नाही, २ लिटर पाणी पुरतं, खरेतर उरायला नको पण कधी कधी उरतं. रन संपताना दुकानं उघडलेली असतात त्यावेळी लस्सी वगैरे पितो. सिंहगडावर जाताना नेहेमीच लिंबू सरबत पितो, पुरेसे ठरतंय.

आज ऊठून तयार झालो आणि पाऊस पडायला लागला, मग पाऊस थांबला की जाऊ म्हणताना झोपून गेलो. एरवी खरेतर एकदा जागा झाल्यावर असे होत नाही पण आज झोप लागली त्यामुळे शरीराला खरोखर गरज होती असे समजून फार अपराधी वाटून घेत नाहीये Proud

बा ......................... परे!!!!!

आज पुन: एकदा मूळ लेख आणि प्रत्येक प्रतिक्रिया वाचली!!!! अफाट, अचाट, अद्भुत............ पुन: पुन: वंदन.

किती जबरदस्त सुरू आहे हे सगळंच! धावणं, अक्षरश: तुम्ही किती सहज म्हणताय की मी ३५ किमी"च" धावलो!!! अवाक्! आणि तुमची कन्सेप्टपण किती ग्रेट आहे!

मला तर वाटतंय की हे सगळं काम आणि फक्त त्याचं वर्णनही‌ एखाद्याला आयुष्याच्या ध्येयाची प्रेरणा देऊ शकतं! आणि नैराश्य आलेल्यांना तर संजीवनीच. पुन: पुन: नमन.

मी माझ्या व्हॉटसअपवर ही पोस्ट शेअर केली आहे. फेसबूकवरही शेअर करू शकतो ना? तुम्हांला टॅग करू का म्हणजे तुम्हांलाही कळेल.

मला वाटतं निधी उभं करण्याचं प्राथमिक उद्दिष्ट केव्हाच पूर्ण झालं असेल, पण इतरांना प्रेरणा देण्याचं व्यापक उद्दिष्टसुद्धा सहज पूर्ण होईल.

आपल्याला खूप खूप शुभेच्छा! आणि ही सगळी संकल्पना, तुमचे प्रयत्न आधी समजून घेतले नाहीत, ह्याबद्दल दिलगिरी.

मार्गी,
I must say you are very kind hearted and generous.

मी करू पाहत असलेली कृती प्रेरणादायी आहे पण ते फक्त तितकंच आहे, पुनः पुनः नमन जरा जास्तच होतंय Happy
आणि शेअरिंग च्या बाबतीत नेकी और पुछ पुछ!

धन्यवाद श्री, मी मागे म्हटलं तसं मलाही तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचून हुरूप येतो.

आज १० किमी धावलो, चतु शृंगी देवळाच्या पायऱ्या ५ वेळा धावत वरखाली केल्या.

आज हवामान मस्त होतं.

IMG_20170802_063526.jpg

मस्त हर्पेन
ह्या वीकांतास किंवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीस काही दिवस पुण्यनगरीत मुक्काम आहे
पळायला यायला जमेल (झेपेल) की नाही माहित नाही, पण फोन नक्की करतो

आज तळजाई टेकडीरस्त्यावर, २ किमी वॉर्म अप नंतर ४ वेळा वरखाली असे एकूण १५ किमी धावलो. बरोबर सुधाकर होता. शेवटच्या फेरीच्या वेळी अरुण आलेला. सुरुवातीला भरून आलेलं होतं, मधेच पाऊस पडला, शेवटी चक्क ऊन पडलं होतं.

हर्षद, राम राम आणि साष्टांग प्रणिपात तुला Happy
तुझ्या मोहिमेसाठी सगळ्या उत्तम शुभेच्छा आणि इतक्या अभिनव उपक्रमाबद्दल कौतुकसुद्धा! माबोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलायस.
खूपच उशिरा प्रतिसाद देतेय, त्याबद्दल मनापासून सॉरी.

आज ४ तास २०मिनिटे लावून ४० ते ४१ किमी धावलो.
रस्ता नेहेमीचाच
प्रभात रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यपीठ चौक, पाषाण सर्कल, नेकलेस रस्ता, बावधन, चांदणी चौक, कोथरूड डेपो, पौड फाटा, एस एन डी टी, कॅनॉल रस्ता आणि परत असे दोन वेळा केले.
बरोबर अमनदीप, राम यादव, अभिनव दोन्ही वेळा होते. अरुण दुसऱ्या फेरीच्या वेळेस आला.

राम आणि अभिनव तर दोघे भल्या पहाटे खराडी वरून आले. असे मित्र म्हणजे #माथ्यावर वरदहस्त.

ग्रेट सर!

एक अवांतर प्रश्न विचारू का? पहाटे चारला धावताना तुम्हांला कधी कुत्र्यांचा त्रास नाही का झालाय? Happy Happy

मार्गी,
अजिबात होत नाही असं नाही म्हणता येणार पण मला आता जरा सवय झाल्ये किंवा कुत्र्यांना माझी सवय झाल्ये. : P

शिवाय मी धावतो त्या रस्त्यांवर भटकी कुत्री फार नाहीयेत, म्हणजे निदान त्यांच्या झुंडी वगैरे नाहीयेत.

कुत्र्यांच्या भीतीमुळे, मी पहिल्यांदा जेव्हा एकटा धावलो होतो तेव्हा हातात बारकी काठी घेऊन धावलो होतो पण ते फारच त्रासदायक ठरते, कुत्री भुंकतात मागे येऊ पाहतात पण त्यांना जास्त जवळ येऊ देत नाही. धावण्याचा वेग जरा हळू केला आणि मोठ्या आवाजात त्यांच्याशी बोलले की जास्त त्रास देत नाहीत. काही वेळा समोरून येणाऱ्या कुत्र्यावर मीच त्यांच्या अंगावर धावून जाण्याची हूल देतो.

धावताना आपल्या बरोबर कोणी असले की देखील ही भीती कमी वाटते.

एकंदरीत त्रास म्हणता येईल असा त्रास कधी झाला नाही.

Pages