एका धावकाचे (म्हणजे माझेच :P ) ‘मैत्री’ खातर आवाहन

Submitted by हर्पेन on 22 May, 2017 - 11:39

एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन

मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.

माझ्या धावण्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या प्रवासाला मायबोली साक्षी आहे. तसेच माझ्या मेळघाटातल्या अनुभव लिखाणाबरोबर ‘मैत्री’ ला मदत करा अशा केलेल्या आवाहनाला देखील अनेक मायबोलीकर कायमच प्रतिसाद देत आले आहेत. काही मायबोलीकरांनी तर मेळघाटात प्रत्यक्ष जावून स्वयंसेवक म्हणूनही काम केले.

आता ह्या दोन्हीचा इथे / परस्परांशी काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. तर तो संबंध असा.

मी आता यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लदाख येथे होणाऱ्या खारदुंग ला चेलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची आहे.

अधिक माहीती http://ladakhmarathon.com/races/khardung-la-challenge/

तसे पाहता मी आजवर चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा अशा शर्यती पार पाडल्या आहेत. पण तरीही ही अल्ट्रा माझ्याकरता खरोखरच मोठे आव्हान आहे.

मी माझ्या परीने सगळ्याप्रकारची तयारी चालू केल्ये. रजा मिळवून झाल्ये, जाण्यायेण्याची तिकीटे काढून झालेली आहेत. वेळापत्रकानुसार धावणे सुरु केले आहे. ( मागच्या आठवड्या पर्यंत सरासरी ६० ते ७० किमी धावणे करत होतो ह्या आठवड्यातले ध्येय एकूण १०० किमी आहे)

इतक्यातच 'मैत्री' संस्थेला त्यांचे मेळघाटातील उपक्रम चालू ठेवण्याकरता निधी कमी पडतोय अशी बातमी कळली. त्यामुळे मी ही स्पर्धा मैत्री संस्थेच्या कार्याला समर्पित करायचे ठरवले आहे आणि माझी अशी आकांक्षा / संकल्प आहे की या तीन-चार महिन्यात ‘मैत्री’ च्या मेळघाटातील कामाकरता किमान १००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे.

मैत्री संस्थेचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असले ल्या नागरिकांचे एका चांगल्या कामाकरता एकत्र येणे आणि तब्बल वीस वर्षे ते काम चालू ठेवणे. फक्त अडीच माणसे सोडली तर बाकी सर्व जण मैत्रीकरता काम विनामुल्य / स्वयंसेवा म्हणून करतात. ओव्हरहेड जवळ जवळ नाहीच. मेळघाटातल्या लोकांना औषधे सोडली तर वैयक्तिक वापराच्या कुठल्याही वस्तू फुकट वाटत नाहीत. सामुहिक वापराकरता सोलर वर चालणारा पंप आणि पाण्याची टाकी बसवून दिली पण त्याची देखभाल स्थानिक रहिवाश्यांकडून वर्गणी काढून केली जाते. स्थानिक लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. शाळा चालाव्यात म्हणून शैक्षणिक साहित्य दिले जाते. सध्या चालू असलेल्या योजनांचा ही सगळा भर कौशल्ये विकास (skill buildng/ development), व्यवसाय निर्मिती व उद्योजकता, सरकारी योजनांविषयी माहिती व पाठपुरावा, सेंद्रिय व पारंपारिक शेतीमधून उत्पादकता वाढवणे अशा कार्यक्रमांवर आहे.
अधिक माहीती करता - http://www.maitripune.net/Home.html

मी स्वतः काही वेळा काही दिवसांकरता मेळघाटात स्वयंसेवक म्हणून जाऊन आलो आहे.

तर अशा 'मैत्री' खातर ज्यांना जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे, यथाशक्ती यथामती जी काही रक्कम देउ करायची असेल ती मैत्रीच्या खात्यावर परस्पर जमा करावी अशी मी विनंती करतो.

देणगी: “मैत्री” या नावाने चेक / रोख देणगी म्हणून देता येईल.
“मैत्री”साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

जे कोणी जी काही रक्कम जमा करेल त्यांनी इथे तसे कळवावे. जर कोणाला स्वत:चा नामोल्लेख नको असेल तर त्यांनी मला तसे संपर्कातून (९८८११५२८८४) कळवल्यास त्यांनी दिलेली रक्कम अनामिक देणगीदाराकडून म्हणून नमूद करण्यात येईल. रक्कम परस्परच जमा करायची आहे मात्र केली की इथे जरूर कळवा. तसेच मी 'खारदुंग ला' करता करत असलेल्या तयारीबद्दलही वेळोवेळी इकडे कळवत राहीनच पण असे (मनोरंजन मुल्य नसलेले) धागे लगेच मागे जातात म्हणून वेळोवेळी मला शुभेच्छा देत राहून ह्या धाग्याला वर आणत रहा. कृपया धन्यवाद Happy

आठवडा पहिला - देणगीदार ६ - जमा झालेली रक्कम रुपये ३२००१/-
आठवडा दुसरा - देणगीदार ७ - जमा झालेली रक्कम रुपये ११६१२/-
आठवडा तिसरा - देणगीदार ४ - जमा झालेली रक्कम रुपये ५०००/-
आठवडा चौथा - देणगीदार ६ जमा झालेली रक्कम रुपये १०००१/-
आठवडा पाचवा - देणगीदार ४ जमा झालेली रक्कम रुपये १००००/-
आठवडा सहावा - 'जैसे थे' परिस्थिती
आठवडा सातवा - देणगीदार १६ जमा झालेली रक्कम रुपये २२५००/- एकूण (४३/७२) (९२११४/- /७२०००/-)
आठवडा आठवा चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज शनिवार. एकूण चार तास धावायचे होते. धावलो.

पहाटे सुमारे चार वाजता एकट्यानेच सुरु केले मग सव्वापाचच्या सुमारास (१२-१३ किमी झाल्यावर) सुधाकर येऊन मिळाला. तो सव्वासहा वाजेपर्यंत बरोबर होता (तो वर २०-२१ किमी पळून झाले) मग नंतर दुसरी फळी ज्यात आधी शॅनन आणि मग अभिनव आणि पन्नू माझ्याबरोबर धावू लागले. ताज्या दमाच्या फळीतली मंडळी पुढे आणि मी मागोमाग अशा रितीने धावत धावत एकूण ३६ किमी अंतर पार पाडले.

आजही हवा दमट होती पण अजीबात कूरकूर म्हणून करता आली नाही Proud
कारण पन्नू मुंबई ला असतो तो पुण्यात काल रात्री आल्यावर आज सकाळी खराडीहून आमच्याबरोबर धावायला आलेला होता. मग काय धावलो आपला बिचारा तसाच Happy

अरेच्चा मंडळी ,
आता कुठे निम्मे अंतर धावतोय. अजून बरीच मोठी मजल मारायची आहे. प्रोत्साहन जरूर द्या.
रिस्पेक्ट जरूर कमवायचाय पण त्याला अजून भरपूर वेळ आहे Proud

आज एकूण तीन तास धावायचे होते. धावलो.
आज विमान नगर मधे एल्सॉम होती. (लास्ट संडे ऑफ द मंथ) त्यात सगळ्यात जास्त अंतर १५ किमी चे होते. सकाळी साडेअपाच ला चालू होणार होती. पोहोचत असतानाच पाऊस आला. साडेसात किमीचा लूप दोन वेळा धावायचा होता. १५ पळून झाल्यावर त्या लूप मधे धावयचा कंटाळा आल्याने मग विमानतळाकडे धावत गेलो नंतर डावीकडे वळून जेल पर्यंत जाऊन परत आलो. साडेआठच्या सुमारास परत थोडा पाऊस पडला. एकंदरित हवा चांगली होती. एकूण २५ किमी धावलो. मग स्ट्रेचिंग करून इराणी कॅफेमधे नाष्ता केला. हे कुठले कॅफे म्हणून म्हणतच होतो तर ते माझ्या एम्बीए कॉलेजच्या समोर पार्किंग / खेळायची जागा होती तिथे बांधलेल्या इमारतीतच झालंय हे रेस्टॉरंट. २००८ ते २०१० तिथे घालवलेल्या सगळ्या क्षणांची उजळणी झाली.
#स्मरणरंजनाची सकाळ

मस्त हर्पेन !!
मी आहे आज उद्या पुण्यात, फोन करतो

आदित्य सिंग भारी आहे.
सकाळी बरोबर सहा वाजता पळायला जमणार नव्हते तरी निव्वळ भेटायला म्हणून भर पावसात आला होता.
खूप भारी वाटलं.
आज पहाटे जोरात पाऊस होता. पावसामुळे धावायचं का नाही अशी दोलायमान अवस्था असताना, आदित्य येणार त्यामुळे आपणही निदान जाऊन तर येऊ पासून सुरु होऊन व्हाया ८ किमी धावू मार्गे शेवटी निर्धारित १५ ऐवजी १६ किमी धावण्यामधे झाली.

#समाधानी सुफळ सकाळ

देणगी बद्दल तपशील आज मिळाले.

कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की मागच्या आठवड्यात चार जणांनी मिळून ( एक जणांनी ५००० आणि एक जणानी ३००० आणि दोन जणांनी प्रत्येकी १००० अशा रितीने ) एकूण १०हजार रुपये मैत्रीला देणगी म्हणून दिले.

सर्वच देणगीदारांचे मनापासून आभार !

हर्पेन , भेट झाल्याने भारी वाटल
आम्ही आज जेवण झाल्यावर शतपावली करुया का वगैरे विचार करतो, तितक्या सहज तु "आज ८ किमी करुया का १६" वगैरे ठरवत होतास!! धडकीच भरली मला Happy
तुला परत अनेक अनेक शुभेच्छा

ते पिक्चरमध्ये दाखवतात ना, हिरो सात दिवस सात रात्र सायकल चालवून मदत गोळा करतो, तसे फील आले हा धागा वाचून Happy
बाकी तुमच्यासोबत धागाही सुसाट धावतोय..

madya , रीया, आदित्य, श्री, ऋन्मेऽऽष, जाई, अन्जू
प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद मंडळी!

आदित्य अरे मंगळवार बुधवार गुरुवार १५, ८, १५ असे पळायचे असते पण पावसामुळे एखादा दिवस अदलाबदल केला तरी चालवतो मी म्हणून ठरवत होतो किती धावायचं ते.

जाई. , मी सकाळी धावतो. सध्याच्या प्लॅननुसार आठवड्यातून पाच दिवस. पुर्वतयारी म्हणशील तर धावायच्या आधी, काही सांधे मोकळे करणारी हालचाल / कवायत / व्यायाम प्रकार करतो.

तर आज बुधवार ८ किमी धावलो आणि ५०० मी. पोहलो.

आम्ही आज जेवण झाल्यावर शतपावली करुया का वगैरे विचार करतो, तितक्या सहज >>> मला इथल वाचून हाच विचार आला होता ... सकाळी ५.३० उठायला कंटाळा येतो , पण तुम्ही फक्त पळायला ४-४३० ला बाहेर पडता ... _/\_
शुभेच्छा

धन्यवाद प्राची. - रोज इतक्या लवकर नाही उठत. फक्त शनिवारी (आठवड्यातून एकदा) कारण चार तास धावायचे असते आणि सुट्टी नसते ऑफीसला Happy

आज नाही धावलो. पोहायचा विचार होता पण तेही केले नाही. पुर्ण आराम.

आज ४ तास धावलो. आजचे किमी ३५ च झाले. अधून मधून पाऊस होता. भिजायला झाले. घरी आल्यावर जरा थंडी वाजून आली मग चक्क दांडी मारायचे ठरवले आणि मारली.

मग काय दिवसभर भरपूर झोप आणि विश्रांतीच विश्रांती Happy

काळजी घे रे
पाउसाच ३५ किमी म्हणजे भारी आहे

Pages