एका धावकाचे (म्हणजे माझेच :P ) ‘मैत्री’ खातर आवाहन

Submitted by हर्पेन on 22 May, 2017 - 11:39

एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन

मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.

माझ्या धावण्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या प्रवासाला मायबोली साक्षी आहे. तसेच माझ्या मेळघाटातल्या अनुभव लिखाणाबरोबर ‘मैत्री’ ला मदत करा अशा केलेल्या आवाहनाला देखील अनेक मायबोलीकर कायमच प्रतिसाद देत आले आहेत. काही मायबोलीकरांनी तर मेळघाटात प्रत्यक्ष जावून स्वयंसेवक म्हणूनही काम केले.

आता ह्या दोन्हीचा इथे / परस्परांशी काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. तर तो संबंध असा.

मी आता यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लदाख येथे होणाऱ्या खारदुंग ला चेलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची आहे.

अधिक माहीती http://ladakhmarathon.com/races/khardung-la-challenge/

तसे पाहता मी आजवर चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा अशा शर्यती पार पाडल्या आहेत. पण तरीही ही अल्ट्रा माझ्याकरता खरोखरच मोठे आव्हान आहे.

मी माझ्या परीने सगळ्याप्रकारची तयारी चालू केल्ये. रजा मिळवून झाल्ये, जाण्यायेण्याची तिकीटे काढून झालेली आहेत. वेळापत्रकानुसार धावणे सुरु केले आहे. ( मागच्या आठवड्या पर्यंत सरासरी ६० ते ७० किमी धावणे करत होतो ह्या आठवड्यातले ध्येय एकूण १०० किमी आहे)

इतक्यातच 'मैत्री' संस्थेला त्यांचे मेळघाटातील उपक्रम चालू ठेवण्याकरता निधी कमी पडतोय अशी बातमी कळली. त्यामुळे मी ही स्पर्धा मैत्री संस्थेच्या कार्याला समर्पित करायचे ठरवले आहे आणि माझी अशी आकांक्षा / संकल्प आहे की या तीन-चार महिन्यात ‘मैत्री’ च्या मेळघाटातील कामाकरता किमान १००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे.

मैत्री संस्थेचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असले ल्या नागरिकांचे एका चांगल्या कामाकरता एकत्र येणे आणि तब्बल वीस वर्षे ते काम चालू ठेवणे. फक्त अडीच माणसे सोडली तर बाकी सर्व जण मैत्रीकरता काम विनामुल्य / स्वयंसेवा म्हणून करतात. ओव्हरहेड जवळ जवळ नाहीच. मेळघाटातल्या लोकांना औषधे सोडली तर वैयक्तिक वापराच्या कुठल्याही वस्तू फुकट वाटत नाहीत. सामुहिक वापराकरता सोलर वर चालणारा पंप आणि पाण्याची टाकी बसवून दिली पण त्याची देखभाल स्थानिक रहिवाश्यांकडून वर्गणी काढून केली जाते. स्थानिक लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. शाळा चालाव्यात म्हणून शैक्षणिक साहित्य दिले जाते. सध्या चालू असलेल्या योजनांचा ही सगळा भर कौशल्ये विकास (skill buildng/ development), व्यवसाय निर्मिती व उद्योजकता, सरकारी योजनांविषयी माहिती व पाठपुरावा, सेंद्रिय व पारंपारिक शेतीमधून उत्पादकता वाढवणे अशा कार्यक्रमांवर आहे.
अधिक माहीती करता - http://www.maitripune.net/Home.html

मी स्वतः काही वेळा काही दिवसांकरता मेळघाटात स्वयंसेवक म्हणून जाऊन आलो आहे.

तर अशा 'मैत्री' खातर ज्यांना जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे, यथाशक्ती यथामती जी काही रक्कम देउ करायची असेल ती मैत्रीच्या खात्यावर परस्पर जमा करावी अशी मी विनंती करतो.

देणगी: “मैत्री” या नावाने चेक / रोख देणगी म्हणून देता येईल.
“मैत्री”साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

जे कोणी जी काही रक्कम जमा करेल त्यांनी इथे तसे कळवावे. जर कोणाला स्वत:चा नामोल्लेख नको असेल तर त्यांनी मला तसे संपर्कातून (९८८११५२८८४) कळवल्यास त्यांनी दिलेली रक्कम अनामिक देणगीदाराकडून म्हणून नमूद करण्यात येईल. रक्कम परस्परच जमा करायची आहे मात्र केली की इथे जरूर कळवा. तसेच मी 'खारदुंग ला' करता करत असलेल्या तयारीबद्दलही वेळोवेळी इकडे कळवत राहीनच पण असे (मनोरंजन मुल्य नसलेले) धागे लगेच मागे जातात म्हणून वेळोवेळी मला शुभेच्छा देत राहून ह्या धाग्याला वर आणत रहा. कृपया धन्यवाद Happy

आठवडा पहिला - देणगीदार ६ - जमा झालेली रक्कम रुपये ३२००१/-
आठवडा दुसरा - देणगीदार ७ - जमा झालेली रक्कम रुपये ११६१२/-
आठवडा तिसरा - देणगीदार ४ - जमा झालेली रक्कम रुपये ५०००/-
आठवडा चौथा - देणगीदार ६ जमा झालेली रक्कम रुपये १०००१/-
आठवडा पाचवा - देणगीदार ४ जमा झालेली रक्कम रुपये १००००/-
आठवडा सहावा - 'जैसे थे' परिस्थिती
आठवडा सातवा - देणगीदार १६ जमा झालेली रक्कम रुपये २२५००/- एकूण (४३/७२) (९२११४/- /७२०००/-)
आठवडा आठवा चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज १६ किमी धावलो.
बरोबर दोन मित्र होते.
रस्ता नेहेमीचाच प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ सर्कल, पाषाण सर्कल आणि परत.

हर्पेन खारदुंग ला साठी आणि मैत्रीच्या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा!
ऑनलाईन डोनेशन करता दिलेले अकाउंट सेव्हिंग्ज अकाउंट आहे की करंट अकाउंट? ट्रान्स्फर करताना ते नमुद करावे लागते.

ऑनलाईन डोनेशन करता दिलेले अकाउंट सेव्हिंग्ज अकाउंट आहे की करंट अकाउंट? >>
मानव,
दोन्ही सेव्हिंग अकाऊंटस आहेत.

आणि हो शुभेच्छांकरता धन्यवाद Happy

हर्पेन, दोन्ही उपक्रमांकरता शुभेच्छा.

'मैत्री'बद्दलची फर्स्ट हँड माहिती वडिलांकडून मिळाली होतीच. मला वाटते की ते गेले होते मेळघाटात तेव्हा तू देखील तिथे होतास. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन

हर्पेंन,
दोन्ही उपक्रमासाठी शुभेच्छा,

तिन महिने आहेत ना? मग माझ्या हातात वेळ आहे ... Happy हे लक्षात ठेवतोय.
तुमच्या स्पर्धेतील सहभागाबद्दल शुभेच्छा... Happy

धन्यवाद ट(व) ण्या, (टवणे सर म्हणजे कोण असे झालेले मला)
हो तुझे बाबा आणि मी स्वयंसेवकांच्या एकाच तुकडीत होतो. त्यानंतरही मी २-३ वेळा गेलो असेन पण आमची ती तुकडी एकदम भारी होती. बंब पेटवण्यापासून ते बासरी वाजवण्यापर्यंत सगळ्यात पटाईत असलेले तुझे बाबा (त्यांची बासरी अगदी जायच्या दिवशी नवीन तुकडी आल्यावर ऐकायला मिळाली तोवर वेळच नव्हता मिळाला.) तिथल्या भिंतीवर वारली चित्रं काढणरी श्रद्धा आणि व्यवसायाने मोटार मेकॅनिक असलेले आवड म्हणून मराठीत एमे केलेले दस्तगीर आणि मी असे आम्ही त्या तुकडीचे सदस्य होतो. नितांत सुंदर आठवणी... स्मरण रंजनात बुडालोच मी Happy

सिंडरेला, सिम्बा, बस्के , अन्जू, लिंटी, मित मंजूताई, महेन्द्र, निर्मल, प्राजक्ता
अनेकानेक धन्यवाद.

लिंटी - हो सप्टेंबर पर्यंत अवधी आहे. मी वर लिहिले असले तरी रक्कम एक हजारच हवी असे नाही. यथाशक्ती कितीही दिली तरी चालेल. भावना लाखमोलाची.
प्राजक्ता - पैसे भरलेस की कळव नक्की.

मी इथे धागा काढला त्याचवेळी फेसबुक वरही एक पान तयार करून असेच आवाहन केले आहे. मंडळी, सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की, त्या नंतरचा पहिला दाता मायबोलीवरूनच मिळाला आहे. त्याने अनामिक रहाणे पसंद केले असल्याने त्याचे नाव उघड करत नाहीये.

मी आजही १६ किमी धावलो.
एक मित्र पुर्ण अंतर बरोबर होता एक जरा कमी अंतर धावला.
रस्ता नेहेमीचाच प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ सर्कल, पाषाण सर्कल आणि परत.

आजही १६ किमी धावलो. बरोबर कोणीही नव्हते. एकटं धावायची सवय नसल्याने सुरूवातीला कठीण गेलं पण लवकरच लय सापडली. वाटेत काही ओळखीची धावरी आणि सायकलवाली मंडळी हाक मारती झाल्याने मस्त वाटलं. पाषाण सर्कलवरून परतताना ऊन डोळ्यावर आले की फारच त्रासदायक होते असा साक्षात्कार झाला. Happy
पण एकंदरित अरेच्चा आपण एकट्याने इतकं धावू शकतो की असं वाटून संतोष वाटला.

धन्यवाद अभि_नव

आज धावलो नाही. साधारण तासभर स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं.

नमस्कार!
आज सकाळी कालच्या व्यायामाचा परिणाम म्हणून अंग अंमळ दुखतच होतं. पण निग्रह पूर्वक उठलो बाहेर पडलो आणि १६ किमी धावलोच.
संपल्यावर मस्त वाटलं.

Pages