इंटरमिटंट फास्टिंग ( IF ) - अनुभव

Submitted by केदार on 25 April, 2017 - 10:05

ओके ! इंटरमिटंट फास्टिंग ! IF

* * * * * फॅ़क्ट * * * * *
१. तुमच्याच भल्याकरता, तुम्हाला त्या अवधीत काही न खाता उपाशी राहावे लागते!
२. IF ही लाईफस्टाईल आहे. वेटलॉस प्रोग्रॅम नाही !
३. IF च्या आधीचे वजन ७३ किलो, सध्याचे वजन - ६९.८ आधीच्या बॉडीफॅट २० / IF नंतर १६%, सध्याच्या रिव्हाईज गोल - १०%

मी एन्डुरंस अ‍ॅथलिट (?!) आहे. IF चे नेट वर कळायच्या आधीच मी उपाशीपोटी मध्येच व्यायाम करायचो. म्हणजे सकाळी ६:३० ला सायकल चालवायला जायचो, तेंव्हा नाश्ता न करताच जायचो आणि जर ३ तासापेक्षा जास्त राईड असेल, ( किंवा १०० किमी पेक्षा जास्त ) तर १ १/२ तासानंतर मध्येच टपरीवर नाश्ता ( हाय कार्ब, उदा पोहे वगैरे) खायचो. पण २ एक तासाची राईड असेल तर काही न खाताच घरी यायचो, थोडक्यात माझ्या शरीराला काही न खाता व्यायाम करायची सवय होती.

मागे इथे सईचा लेख वाचून अन नंतर गुगल रिसर्च करून मी देखील IF ट्राय करायला काय हरकत आहे? हा विचार करून सुरूवात केली. खरे तर व्यायाम आणि उपास ह्यांची जोड कशी घालता येईल ह्यावर मी गुगली टाकला आणि मला लिनगेन्स साईटचा शोध लागला. http://www.leangains.com/ ह्याची लिंक मागच्या वर्षी मी सईच्या लेखावर पण दिली होती. ह्यावर बरीच चांगली माहिती उपलब्ध आहे. अर्थात मी वेटलिफ्टर नाही अन मला ६ पॅक्सही नाहीत, किंवा आणायच्या नाहीत. पण ह्यासाईटमुळे मला १६:८ प्रकाराबद्दल माहिती झाली आणि तीचा अवलंब करायला मी शिकलो.

माझा प्रवास !

मला ब्रेकफास्ट रोज हवा असायचा. अगदी लहानपणापासून वगैरे. त्यावेळी काही खाल्ले नाही की चिडचिड व्हायची. पण एकदा ठरवले की ठरवलेच. मग पहिल्या आठवड्यात हळूहळू एक प्लेट पोह्यांऐवजी अर्धी प्लेट पोहे असे केले आणि एकाच आठवड्यानंतर जमायला लागले. मग दुसर्‍या आठवड्यापासून ब्रेकफास्ट पूर्ण स्किप करून १६:८ सुरू केले. थोडक्यात जर ब्रेकफास्टची सवय असेल तर सुरू करायला अवधी द्या, अन्यथा सोडून द्याल.

संध्याकाळी ८:३० ते दुसरे दिवशी सकाळी १२:३० ते २ ह्या वेळात मी उपाशी राहतो. अर्थात ह्या वेळांमध्ये सकाळचा अन १० चा चहा किंवा कॉफी मात्र घेतो. थोडक्यात जे काही खायचे ते १२:३०-१ ते संध्याकाळी ८:३० पर्यंतच. शिवाय मी साखरेचे काहीही शक्यतो खात नाही. अगदी चहात साखर वगैरे सोडूनही दीड पावने दोन वर्षे झाली आहेत. मध्येच कधीतरी हुक्की आली की गोड खातो, पण ती हुक्की नेहमी येत नाही.

मग भूक लागल्यावर मी काय करतो?

* * * * * फॅ़क्ट * * * * *
हंगर पँग्स येतात. पण ते फक्त १० मिनिटेच टिकत असतात.

ह्याच वेळी मोह टाळायचा. जर निग्रह नसेल तर आपण स्नॅक कडे नक्कीच वळणार. थोडक्यात, आपण हे का सुरू केले? ह्याचा तेंव्हा विचार केला, तर ती १० मिनिटे निभावून जाऊ शकतात. त्यावेळी पाणी प्यायचे. विचार केला तर हे सहज जमण्यासारखे आहे. फक्त आपण तेवढे निग्रही नसतो.

हळू हळू मला १६:८ जमायला अन आवडायला लागले. मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मी बॉउंड्रीज पार करायचा विचार केला.

Eat Stop Eat चा प्रवास. : १६ तास जमू लागल्यावर मी एकेदिवशी विचार केला की २४ तास ट्राय करून पाहायला काय हरकत आहे? आणि मग मी त्या दिवशी दुपारी जेवलोच नाही. दुपारी ३ वाजता ( नेहमीची वेळ संपल्यावर ३ तासाने) भूक लागली, पण पाणी प्यायलो. अन घरी चक्क साबुदाण्याची खिचडी केली होती. पण निग्रह ! मग चारला चहा. मग अचानक फ्रेशच वाटलाला लागलंन भौ ! एकदम अ‍ॅक्टिव्ह. अचानक कुठून तरी एनर्जी आल्यासारखे. रात्रीचे ८ वाजले, तरी जेवायला नको वाटले. मग ९:३० ला जेवलो. २५ तास ३० मिनिटे !! याहू !! मग दर आठवड्यात एकदा तरी २४ + तास उपाशी राहावे असे उगाचच वाटू लागले. मग सोमवार किंवा गुरूवार माझ्यासाठी बिझी दिवस असतात, त्या दिवशी मी २४ + तास उपाशी राहू लागलो. अन त्यातच आनंद वाटू लागला. थोडक्यात रोज १६:८ पण आठवड्यातून कधी कधी दोन तर एक दिवस तरी २४ + तास उपास. ब्लेंडेंड IF ! सोमवारी दुपारी कामच्या जागी पोचल्यावर जर जेवायचे ठरलेच तर सॅलड खात आहे. ( ३०० कॅलरीज) जेंव्हा २४ तास उपाशी राहायचे असते, तेंव्हा कामात गुंतवणे वा काही काम असणे आवश्यक आहे. अन्यथा विचारात "अन्नच" असतं.

मग व्यायामाचे काय?
* * * * * फॅ़क्ट * * * * *
खूप सारे बॉडी बिल्डर १६:८ फॉलो करतात !
उपाशी राहण्यापूर्वी व्यवस्थित खाल्ले असेल तर उपाशीपोटी व्यायाम करू शकतो.

दोन स्क्रिन शॉटस. पिक्चर्स स्पीक .... वगैरे वगैरे. ही सायकलिंग मी उपाशीपोटी केली आहे. आणि ह्यात HIIT - हाय इंटेंसिटी ट्रेनिंग केली आहे, त्यामुळे माझा हार्ट रेट पण खूप वाढलेला दिसेल. माझ्या हार्ट रेटच्या लेखांमध्ये तुम्हाला HIIT ची आणखी उदाहरण दिसू शकतील.

IMG_0872.PNG

ह्या वरच्या सायकलिंग मध्ये १००० पेक्षा जास्त कॅलरी ह्या उपाशीपोटी लागल्या आणि माझ्या शरीराने त्या विनासायस पुरवल्या. सायकलिंग झाल्यावरही मी अजिबात थकलेलो नव्हतो. फक्त खूप वार्‍यामुळे इरिटेट झालो होतो, कारण इथे वारे हे २५ ते ३० किमी प्रति तास असते, अन वार्‍यात सायकल चालवणे म्हणजे ..
आणि ह्या खालील चित्रात ८०० कॅलरीज

IMG_0871.PNG

* * * * * फॅ़क्ट * * * * *
उपासामुळे डायबेटिस बरा होण्यास मदत होते. ज्यांनी IF केले त्यांचा अनेक रिव्हर्सल केसेस नेट वर दिसतील ( T2) आणि अनेक मेडिकल पेपर्स देखील ह्या विषयावर उपलब्ध आहेत.
वजन कमी होते. ( ओके ! वजन कमी होते. )

माझे वजन मुळातच "योग्य" आहे. रादर जीवनात मी कधीही जाड नव्हतोच. पण माणसाने नुसते वजन कधीही मोजू नये. बॉडी फॅट फॅक्टर मोजावा. माझ्याबाबतीत बॉडी फॅट हाच फॅक्टर होता. IF च्या आधी बॉडी फॅट साधारण १९% + होते. IF नंतर माझे वजन फक्त ७ पाउंडड्स कमी झाले, पण बॉडी फॅट आत्ता फक्त १६% आहे.

माझ्या मेंटेनन्स कॅलरी, म्हणजे आहे तसेच मेंटेन ठेवायला ( मी करत असणारा व्यायाम धरून ) लागणार्‍या कॅलरीज ह्या २२५० कॅलरी डेली आहेत ! आता हा कॅलरी गोल पाहून वजन कमी करणारे म्हणतील, बापरे, हे तर आमचं दोन दिवसाचं जेवण !

मी काय शिकलो? किंवा हवे तर टिप्स म्हणू

- भुक सहन होत असते, आपण ती सहन करत नाही.
- पूर्वी दुपारचे जेवण ते संध्याकाळचे जेवण ह्यात मी अनंत वेळा किचन मध्ये जाऊन उगाच काही तरी खायचो, किंवा निदान फ्रिज उघडून पाहायचो. ( मी खूप वेळा घरून काम करतो.) गेले ३-४ महिने असे काही होत नाही.
- सध्या मी जे काही खातो, ते खायच्या आधी आपोआप मनात कॅलरी / फॅट इत्यादी काउंट होतात, हे ओव्हरकिल आहे असे तुम्ही म्हणू शकता, पण IF मुळे माणसाला काय खावे ह्याचा IQ आपोआप निर्माण होतो.
- कधीकधी २० तासानंतर डोके दुखू शकते, किंवा वेळ जात नाही, त्यावेळी थोड्या दुधाचा चहा / ब्लॅक कॉफी हे पर्याय खूप चांगले आहेत.
- अ‍ॅज लाँग अ‍ॅज तुम्ही कॅलरी डेफिसीट ठेवता, तो पर्यंत तुम्ही हवे ते खाऊ शकता. जंक फुड ते हेल्दी फुड. लिबरेशन. अगदी हवे ते खा.
- घरी पाहूने आले किंवा आपण दुसर्‍यांकडे गेलो, तर १६:८ वेळापत्रकातच राहायची गरज नसते, त्या त्या वेळी, ते ते खायलाच पाहिजे ( किंवा नको) असा हा प्रोग्राम नाही. आपण ज्या क्षणी उपास सुरू केला त्या क्षणापासून आपण उपाशी, अश्या छोटे मोठे प्रसंगात उपाशी राहणे योग्य नाही.
- योग्य ते प्रोटिन आणि कार्ब व फॅट, दोन्ही वेळी जेवताना मिळणे आवश्यक आहे, अन्यथा थकायला झाल्यासारखे होऊ शकते.
- कुठल्याही डायट विना, वजन कमी होते. वजन कमी होताना पहिले कंबर आणि पोट ह्यातील फॅट्स कमी होतात. आणि ३ एक आठवड्यात फरक जाणवायला लागतो, तो इतरांना दिसेलच असे नाही, पण तुम्हाला जाणवतो.
- वजन केवळ उपाशी राहण्यामुळे कमी होते, त्यासाठी व्यायामाची अजिबात आवशक्ता नाही. पण व्यायाम केला, तर ज्यांना वजन लवकर कमी करायचे आहे, त्यांना जास्त मदत होते. कॅलरी डेफिसिट इज द की !

वर मी व्यायाम करणार्‍यांना फायदा होतो असे लिहिले आहे. पण व्यायाम करायची गरज नाही, हे ही लिहिले आहे. दोन्ही एकत्र करत असताना नेमके काय होते?

ह्या चित्रात परत एकदा मी फास्टिंग मध्ये सायकल चालवली आहे.
स्पीड - ३१+ आणि हार्ट रेट अगदीच नगण्य - १३६ जो माझ्यासाठी लोअर झोन २ आहे. मागच्या चित्रात HIIT होते, ह्या चित्रात एरोबिक एन्ड्युरंस हा प्रकार आहे.

एवढ्या वेगाने दीड तास सलग अवघड असतं आणि खूप एनर्जी लागते. आणि ही सर्व एनर्जी उपाशीपोटी देखील आरामात मिळाली. हे IF मुळे
पण माझा हार्ट रेट तरीही गप्पा मारत चालवण्याच्या घरात आहे, आणि ते शक्य झाले, मी सतत सायकलिंग करत असल्यामुळे माझ्या मिचो मसल्स, तयार होणारे लॅक्टेट प्रचंड फास्ट प्रोसेस करायला शिकल्या, हा त्याचा गेन. ज्यात IF चा शून्य रोल आहे.

cycle_1.jpg

थोडक्यात काय? तर IF हे फक्त वेट लॉस साठीच नाही, तर ती लाईफस्टाईल आहे. जी मी आनंदाने फॉलो करतो.

http://www.diabetesincontrol.com/intermittent-fasting-and-its-beneficial...
http://jap.physiology.org/content/99/6/2128.long ( Intermittent fasting increases whole-body insulin sensitivity)
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4257368/
http://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0079324 ( black coffee for breakfast and the same total-caloric intake as the other two diets for lunch )
https://intensivedietarymanagement.com/fasting-cures-diabetes-t2d-4/

लोकांचे अनुभव आणि काही डॉक्टर्स मधुमेह व उपास ह्यावर बोलताना ह्या युट्यूब सर्च मध्ये दिसतील.
https://www.youtube.com/results?search_query=intermittent+fasting+and+di...

- तळटिप - मी स्वतः डॉक्टर नाही, मी फक्त अनुभव लिहितो आहे. ह्या विषयात टेक कंट्रोल ऑफ युवर लाईफ हे शब्दशः खरे आहे, पण मधूमेहाच्या गोळ्या बंद करण्याआधी आपल्या डॉक्टरशी नक्कीच भेटा व बोला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळच्या चहाला दहा बारा बिस्किटे खायचो, संध्याकाळी चहाला दहा बारा बिस्किटे >> बापरे, मला नुसतं वाचूनच घाम फुटला, अन तुम्ही आरामात २ वेळेला एवढं रिचवायचात >>>> त्यात काय... जो पर्यंत शरीर काही दुष्परीनाम दाखवत नाही किंवा स्वःतालाच ते जाणवत नाही तो पर्यंत आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही हा माझा स्वानुभव आहे.

बरोबर, मलाही हे दहाबारा बिस्किटे म्हणजे भयंकर प्रकार आहे हे आता आता कळले... नाहीतर काय मन भरेपर्यंत तोंड चालूच... Happy

ग्लुकोजच पाकीट उघडल की चहाबरोबर ते संपतच त्यामुळे १०/१२ खुप नाहीयेत :प

८ तासाची विन्डो ठेवायची ठरवल तर सकाळ्ची चांगली की दुपारची? ८ ते ४ किंवा १२ ते ८?

तुमची लाइफस्टाइल कशी आहे त्यावर अवलंबून असावे. तुम्हाला जी योग्य वाटेल ती ठेवा... मला सकाळी ८ ते ४ सोयिस्कर आणि उपयुक्त वाटते.

२८ एप्रिल पासुन १६ - ८ अशी सुरुवात केली, सकाळचा नाश्ता व दोन्ही वेळचा चहा बंद केला आहे - फारसा त्रास काही वाटला नाही कारण दुपारचे व रात्रीचे जेवण नेहमीप्रमाणे सुरु आहे. भुकेची जाणीव झाल्यास पाणी पितो, काल चतुर्थी असल्यामुळे ठरवुन काहिहि न खाता एक ग्लास उसाचा रस पिऊन २४ तास न जेवता राहू शकलो. या १५ दिवसात फायदा म्हणजे वजन ३ किलो (७७ - ७४) कमी झाले व आता महिन्यानंतर रक्त चेक करुन cholesterol level बघायची आहे. IF बद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते, अनुभव असतील, मला मात्र सध्यातरी यात काही अपायकारक वाटत नाहीये

आज 15 वा दिवस आहे. वजन 500 ग्रॅम कमी झाले असावे. वजन केले आत्ताच. 98.something होते ते 98 शार्प आहे आता. अर्थात हे फारच नेग्लिजीबल आहे. ईंचेस मध्ये काही फरक नाही.

चेहऱ्यावर ग्लो व स्किन टोन सुधारला आहे. बाकी विशेष फरक नाही. 16:8 चालू आहे, सोबत व्यायाम तासभर.

फार उत्साहवर्धक स्थिती नाही पण आता सातत्य ठेवणार आहे. खरे सांगायचे तर i am not happy right now. प ठिके,

मी आठवडाभर काटेकोर पालन करते पण रविवारच्या सुटीच्या दिवशी बोर्‍या वाजतो. सगळी जेवणं लेट होतात. Sad
मग सोमवार पण बोंबलतो Sad
पण सोमवार पासुन रेटुन नेते पुन्हा शनिवारपर्यंत

मला फायदा होतोय, वजन फक्त 1 किलोने कमी झालेय पण ईंचेस कमी होताहेत. पण मी अजून पूर्ण फॉलो करत नाहीये आणि काही कारणांमुळे रोजचे चालणे बंद पडलेय. लवकरच ते सुरू करेन आणि फास्टिंग च्या वेळाही नियमित करण्याचा प्रयत्न करेन. दुसरे महत्वाचे लक्षात आलेय की आधी मी जेवण स्किप केले की ऍसिडिटी व्हायची. ती अजून झालेली नाही.

मी बिनसाखरेचा चहा पिण्यापर्यत मजल गाठलिये, सध्या कार्ब कट डाउन चाललय, बाकी १६/८ जमत नाहिये अजुन , १२-१३ तास फास्टिन्ग आहे, अधल मधल स्नॅकिन्ग पुर्ण बन्द केलय पण आम्हि आरभशुर असल्याने सातत्य टिकवणच जमल पाहिजे.

मी पण प्रयत्न करतीये.. 14 -10 आरामात जमलय.. पण नाष्ट्याच्यावेळी फार खा खा होतीये..
हळूहळू वेळ वाढवेन..

मी १२-१३ तासाचं फास्टिंग करतेय. रात्री ८-८.३० ते १०-१०.३०
पण सगळा आहार नीट घेतला जात नाहीये. सकाळी ब्रेफाला केळं खाते. त्यानंतर क्वचित एखादं फळ खाल्लं जातंय कारण मधेच चहा होतो मग फळं खावं वाटत नाही.
आणि महत्वाचं म्हणजे बिस्किटं सुटलेली नाहीत. मोनॅको जीरा Sad Happy

वेळेअभावी, मुलांमधे, हेल्पिंग हॅन्ड नसल्याने पालेभाज्या वैगेरे जमत नाहीत. इतर भाज्या, अंडी, चिकन खाल्लं जातंय

गेला आठवडाभर १४ तासाचे फास्टिंग काही त्रास न होता जमले. सध्या काही काळ हेच सुरु ठेवणार आहे.

जरा मोठी पोस्ट होईल पण बरेच दिवस झाले लिहायची होती आता लिहितेच. नियमित पळत असल्याने त्यासाठी अजून थोडे वजन कमी केले पाहिजे हे माहित होते. त्यात बॉडी फॅट कॅल्क्युलेटरने २७ टक्के फॅट दाखवले. मला गेले २ वर्षे झाली ३-४ किलो वजन कमी करायचं आहे आणि कितीही व्यायाम, डाएट केली तरी ते होत नव्हतं.

कारणं मुख्यं ३:
१. मी पाचही दिवस सॅलड आणि सूप खाऊन राहू शकते. जेवणही सर्व समतोल असतं आणि रात्री ८-८.३० ला होतंच. पण रोज रात्री साधारण दहा वाजता गोड काहीतरी खायची हुक्की येते आणि ते खाल्लं जातंच. ते बंद करणं जमत नव्हतं.
२. पाच दिवस केलेलं सर्व डायट विकेंडला बोंबलतं. त्यात कधी वाईन, स्वीट्स, बाहेरचं जेवण यातलं काहीतरी एक तरी होतंच.
३. डायट करूनही वजन कमी होत नाहीये याची चिडचिड वाढून कधीतरी उगाच जास्त खाल्ले जात होते.

मी सईचा लेख वाचल्यावरही IF करायचा विचार करत होते पण तितका नाही जितका या लेखानंतर केला. गेले तीन आठवडे चालू आहे आणि हा चौथा. दिवसा १२-८ च्या दरम्यान जेवण आणि स्नॅक खाल्ले जातात. बाकी काळ आराम.

सुरुवातीचा आठवडा सकाळी ब्लॅक कॉफी घेतली. तसा काही चवीचा प्रॉब्लेम नाहीये ना साखर घेण्याचा, चहाही लागतोच असे नाही पण तरीही सकाळी डोके दुखत होते. आणि रात्रीही १० वाजले की गोड खायची इच्छा होत होती. IF मुळे ते खाणे बंद झाले. रात्रीही डोके दुखत होते. आता ते कमी झाले आहे. सकाळचा चहा आता घेतला नाही तरी चालतो आणि घेतला तर बिनसाखरेचा फक्त थोडे दूध घालून घेतो, नवराही बिनसाखरेचा चहा घेत आहे.

मला नाश्त्याची सवय कधीच नव्हती त्यामुळे बाकीच्या डायट मध्ये ब्रेकफास्ट केलाच पाहिजे म्हणून उगाच काहीतरी खावे लागायचे(ओट्स, ठेपला असं काहीतरी) आणि मग जेवण कमी त्यामुळे अजून चिडचिड. आता IF मध्ये ब्रेकफास्टच्या टेन्शन नाहीये त्यामुळे बरे आहे असे वाटते. शिवाय नीट दोन वेळचे जेवण करता येते. साधारण ५०० कॅलोरीज चे एक जेवण असे १२.३० ला आणि रात्री ८ ला होते. मध्ये खाणे बरेच कमी झाले आहे. चहा, काही स्नॅक धरले तरी १२०० पर्यंतच होते.

सध्या एक महिना झाला नोकरी नाहीये. त्यामुळे घरी राहून उगाच जास्त खाणे झाले असते ते सर्व टळले आहे शिवाय सकाळी १२ पर्यंत काय करायचे म्हणून व्यायामही सकाळीच होत आहे. वजन २.५ पाउंड कमी झाले आहे फक्त म्हणजे साधारण १ किलो. तरीही ते कमी झाले हे चांगले आहे कारण आधी तेही होत नव्हते. शनिवार रविवारी रात्री उशिरा पर्यंत बसून टीव्ही बघत खायची सवय बंद पडली. बसलो उशिरा तरी काही खात नाही त्यामुळे लवकर झोपणेही होत आहे. एकूणच सकारात्मक बदल आहेत. नवऱ्याचेही वजन ३ पाउंड कमी झालेय. मी IF च्या आधीही हाच डायट ठेवला होता आणि तसाच व्यायाम करत होते तरीही जो फरक पडला नव्हता तो आता दिसत आहे. शिवाय जेवण नीट होत असल्याने कॉन्स्टिपेशन किंवा बाकी त्रास नाहीत. Happy आणि हो गोड खाल्ले तरी दिवसा खाल्ले जाते आणि त्यानुसार रात्रीचे जेवण कमी जास्त करता येते. Happy
चांगली गोष्ट म्हणजे सध्याचे IF नियमित ठेवू शकते कारण नवीन जॉब मधेही जाताना सकाळी बिनसाखरेचा चहा घेऊन जायचे आणि एकदम १२ वाजता जेवायचे हे तर आरामात होऊ शकते. Happy एकूणच छान बदल आहेत.
हे खाली चित्रात दोन जेवणाचे चार्ट आहेत. पोळी, भात खाऊनही व्यवस्थित चालू आहे. Happy

diet 1.JPGdiet 2.JPGdiet 3.JPG

थँक्सऑल.

विद्या.

आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे असल्यामुळे मटात दोन बातम्या (?) आल्यात खाली त्याची लिंक देतीये, नक्की वाचा

http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/reason...

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/high-bloo...

इथली चर्चा वाचून म्हटलं आधी आपल्याला मुळात फास्टिंग जमतंय का आणि किती ते पाहावं. म्हणून एक दिवस करून पाहिलं, तर १३ तासांचं फास्टिंग करता आलं.
सकाळी उठल्यावर रोजची अर्धा कप कॉफीही घेतली नाही. जरा वेळाने पोटाने सिग्नल दिल्यावर अर्धा कप कोमट पाणी प्यायले. मग ११ वाजेपर्यंत ३-४ दा कोमट पाणीच प्यायले. त्यानंतर मात्र लक्षात आलं की आपलं कामात लक्ष लागत नाहीये. मग अर्धा कप कॉफी घेतली.
मुळात फास्टिंग जमलं याचा मला आनंद झाला. हा सवयीचा भाग आहे हे लक्षात आलं. (माहित होतंच, पण कधी करून पाहिलं नव्हतं.)
पण तरी आय.एफ.साठी मनाची अधिक तयारी करावी लागेल. (तरी गोड काहीच आवडत नसल्याने त्या आघाडीवर चिंता नाहीये.)
सध्या एकंदरच दिवसभरातला आहार थोडा थोडा कमी करते आहे.

इथल्या रिसेन्ट प्रतिसादांवरून असे वाटते आहे की माबोवर "मायबोली फिटनेस ट्रॅकर" अशा नावाचा एक धागा काढायला काही हरकत नाही.
तिथे आपण आपले इंडीव्हिजुअल गोल डिक्लेर करून रोज (किंवा आपल्या सोयीच्या इंटर्वलने) कुठपर्यंत आलो याबद्दल एक अपडेट टाकू शकतो. गोल काहीही असू शकतील. वेटलॉस पासून ते किती किमी पाळायचे इत्यादी. असा सर्वसमावेशक धागा काढायची कल्पना कशी वाटते? तसेही आपण दिवसातून कितीतरीवेळा मायबोलीवर येतो. त्यातच हे विधायक कार्यदेखील होऊन जाईल! काय?

वरील एवढ्या कळकळीचे कारण हे सुद्धा आहे की माझासुद्धा आता मानसिक प्लॅटू आला आहे. आणि असा एखादा ग्रुप मला अकाऊंटेबल ठेवणार असेल तर कदाचित माझा उत्साह परत येऊ शकेल.

तिथे आपण आपले इंडीव्हिजुअल गोल डिक्लेर करून रोज (किंवा आपल्या सोयीच्या इंटर्वलने) कुठपर्यंत आलो याबद्दल एक अपडेट टाकू शकतो. गोल काहीही असू शकतील. वेटलॉस पासून ते किती किमी पाळायचे इत्यादी.>>असा धागा वाचल्याचे आठवते आहे.

केदार्,सई -
गेले १५ दिवस आयेफ करतोय. जे कधी मला शक्य होइल असे वाटले नवते. सकाळी नाश्ता , दुपारी जेवण , ४ ला चहा ते डायरेक्ट दुसरे दिवशी नाष्टा. वजन ट्रॅक करतोय फारसा फरक नाही पण मला हलकं वाटत्य , पण सकाळी केलेले वजन अन संध्याकाळी केलेले वजन यात १.५- १.८ किलो चा फरक येतोय Sad संध्याकाळी वाढते. असे का बरे होत असावे? वजन काटा बरोबर आहे.

रात्रभरात खालेल्या अन्न पाण्याचे पचन होऊन प्रातःर्विधी, घाम द्वारा विसर्जन यामुळे असा फरक दिसतो.

>>>वजन ट्रॅक करतोय फारसा फरक नाही पण मला हलकं वाटत्य , पण सकाळी केलेले वजन अन संध्याकाळी केलेले वजन यात १.५- १.८ किलो चा फरक येतोय Sad संध्याकाळी वाढते. असे का बरे होत असावे? वजन काटा बरोबर आहे.

आपले शरीर हे एक पोते आहे. दिवसभर खाऊन त्यात आपण काहीबाही भरत असतो. त्यामुळे सकाळी उपाशीपोटी आणि रात्री १-१.५ किलोचा फरक होणे साहजिक आहे.
शक्यतो वजन करताना खालील नियम पाळावे

१. रोजचे वजन एकाच वेळी करायचे. शक्यतो सकाळी बाथरूमची ट्रिप झाल्यावर पण काहीही खायच्या आधी (पाणी सुद्धा प्यायचे नाही)
२. वजन करताना साधारण सारख्या पेहेरावात करायचे (रोज करायचे असल्यास) कारण त्यामुळे ३००-४०० ग्रामचा फरक पडतो.

पण तुम्हाला अगदीच घाई नसेल आणि तुमचा १ आठवडा खाण्यावर ताबा राहत असेल तर मी आठवड्यातून एकदाच वजन करायचा सल्ला देईन. ज्यांना अगदी २० किलो वगैरे कमी करायचे आहे त्यांना रोज वजन केल्याचा फायदा होतो कारण त्यांचे वजनही दिसून येईल एवढे रोज कमी होते.

बाप्रे !! २१ किलो !
मी बरोबर १५ दिवस केले अन लग्नाला गावी गेलो. बर्‍या पैकी कमी झाले होते वजन १५ दिवसात . निदान इंचेस तरी झाले असतील कारण या वेळी आई सह बाकी नोटीश्यांनी बारीक झालास रे अशी टीपण्णी केली. परत इथे आल्यावर रुटीन कोलमडले. मी संध्याकाळी ६-६.३० ला कलींगड खात होतो वाडगाभर ते बंद झाले या पावसामुळे. आता पर्यंत रात्री उपाशी झोपणे ही अशक्य कोटीतली गोष्ट वाटत होती ती आता ईत्की अवघड गोष्ट वाटत नाही. अभी भी हिंम्मत हारी नैये. गेले असंख्य दिवस प्रयत्न करुनही कमी न होणारे वजन निदान २-४ कि ने तरी कमी झाले याचा अधिक आनंद आहे मला. म्हणजे कसं ना ते आपलं चावी सापडल्याचा आनंद झालाय::फिदी: अता कंट्रोल ठेवून वजन मेंटेन करणार. मला अजून६-७ कि कमी कराय्चेत पाहू. सई केदार जागत्ता ठेवा रे हा धागा.

Thanks☺
मंजुताई, खरतर केला असता फोटो अपलोड . पण मला सोशल वेबसाईटवर पर्सनल फोटो टाकायला नाही आवडत

अभिनंदन मानिनी.
शक्य असल्यास आता वजन किती आहे ते सांगा.

२६ फेबला माझे वजन ८२.७ होते अन आता ६१.३ म्हणजे एकुण २१.४ किलो कमी झाले.

मला अजुन १५ किलो कमी करायचेत बघु कसे काय जमेल

Pages