नोटबंदी आणि भ्रष्टाचार

Submitted by सई केसकर on 14 December, 2016 - 05:43

गेला महिनाभर नोटबंदी आणि त्यातून जन्माला आलेल्या विविध अपत्यांचा अभ्यास आपण सगळेच करतोय.
निर्णय योग्य आहे किंवा अयोग्य, त्याची अंमलबजावणी चांगली की वाईट, आणि त्याचे पुढील परिणाम कसे होतील यावर प्रचंड आणि दमवून टाकणारी चर्चा झाली आहे. पण नोटबंदी चालू असतानाच, हा निर्णय जे बंद करण्यासाठी घेतला आहे त्यालाच तो प्रोत्साहन देऊ लागलाय हे उघड व्हायला लागलेलं आहे, याचं अगदी भक्त सुद्धा समर्थन करतील. तो म्हणजे भ्रष्टाचार.

नोटबंदी जाहीर केल्यापासून दर दिवसाला सरकार नियम बदलू लागले. पहिला एक आठवडा कुठल्याही व्यक्तीला रोख जुन्या नोटांच्या बदली नव्या नोटा सगळ्या बँकेत मिळायच्या. यासाठी पॅन कार्ड दाखवावे लागायचे. आठवड्याभरातच सरकारनी ते बंद केले कारण "काळा पैसा वाले काही नतद्रष्ट लोक", "भोळ्या भाबड्या गरिबांना" आपले पैसे घेऊन लाईनमध्ये उभे करत आहेत अशा बातम्या उघडकीला आल्या. रेल्वेची तिकिटे जुन्या नोटांनी काढायची परवानगीदेखील लगबगीने मागे घेण्यात आली कारण काही दुष्ट काळा पैसा बाळगणारे लोक जुन्या नोटांनी तिकिटं काढून ती लगेच रद्द करू लागले. परिणामी रेल्वेला नव्या नोटा रिफन्ड करता करता नाकी नऊ आले. गृहिणींच्या खात्यात अडीच लाखापर्यंत कुठलेही प्रश्न विचारले जाणार नाहीत या आश्वासनाचे एका आठवड्यातच धमकीत रूपांतर झाले. मग मधेच भारतीय बायकांच्या दागिन्यांच्या खणात डोकावण्याची इच्छादेखील व्यक्त झाली (अम्मांनी जाता जाता कान टोचले म्हणून बरं). त्यानंतर प्रधानमंत्रीजींच्या लाडक्या जनधन खात्यांना तंबी द्यावी लागली आणि आज अखेर तो दिवस आला, जेव्हा भ्रष्टाचार मुक्त अशा खाजगी बँकांवरदेखील छापे टाकण्याची वेळआली. महिनाभर ज्या (कॉपरेटिव्ह बँकांना डिवचून) बँकांचे मोदीजी गुणगान करत होते, त्यांच्याच दारी त्यांना पोलीस पाठवायची वेळ आली.

३५ दिवसांत सरकारने ५१ वेगळे वेगळे नियम तयार केले आणि मोडले. आणि त्यावरून सरकारला चांगलेच फैलावर घेण्यात आले आहे. अर्थात, या कोलांट्या उड्या सरकारच्या बेसावधपाणामुळेच झाल्या. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी घेतलेल्या एका निर्णयातून, गोरगरिबांनाही भ्रष्टाचार करू नका असं सांगायची जेव्हा वेळ येते, तेव्हा प्रश्न चूक बरोबर या चाकोरीच्या बाहेरून बघितला पाहिजे.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना भ्रष्टाचार हा असा साधा सोपा काळा-गोरा विषय वाटतो. काही लोक भ्रष्ट असतात, विशेषतः काँग्रेसमधील जवळपास सगळेच लोक भ्रष्ट आहेत. भ्रष्ट लोकांनी साठ वर्षं सत्ता बळकावली आणि भारतात भ्रष्टाचार माजला. तो भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आणि साठ वर्षं साठलेली घाण साफ करण्यासाठी थोडी कळ सहन केली पाहिजे. आणि बँकांच्या आणि एटीएमच्या बाहेर रांगा लावून आपण देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी हा छोटासा त्याग करतोय.

पण या अशा लिनियर विचारसरणीचा एक फार मोठा धोका आहे. तो म्हणजे असा विचार करून त्यात समाधान मानताना आपण एका खूप मोठ्या धडधडीत वास्तवाकडे पाठ फिरवतोय. ते म्हणजे आपण सगळेच भ्रष्ट आहोत. पुढे जाऊन असं देखील म्हणता येईल की हिंदी सिनेमासारखी भ्रष्ट आणि इमानदार असे दोन गटदेखील नसतात. आपण सगळेच कधी कधी भ्रष्ट आणि कधी कधी इमानदार असतो. भ्रष्टाचार हा माणसाच्या विवेकावर जितका अवलंबून असतो तितकाच त्याच्या परिस्थितीवर देखील असतो. भ्रष्टाचार कधी घडतो? एखाद्या भ्रष्ट व्यक्तीला कुठल्याही प्रकारची सत्ता मिळते. आणि सत्ताधारी असल्याचा फायदा घेऊन ती व्यक्ती भ्रष्टाचार करते. किंवा एखाद्या इमानदार व्यक्तीला सत्ता मिळते, जी टिकवण्यासाठी तिला आजूबाजूच्या दहा भ्रष्ट व्यक्तींच्या गुन्ह्याकडे कानाडोळा करावा लागतो. दोन देवाणघेवाण करणाऱ्या माणसांना एकाच सोयीच्या मार्गाने कर बुडवता येतो (रोकड देऊन) तेव्हा भ्रष्टाचार घडतो. किंवा निकाल काय लावायचा आहे हे आधीच ठरवून जेव्हा एखादा अभ्यास किंवा एखादा उपक्रम राबवला जातो तिथे भ्रष्टाचार घडतो.

जेव्हा आपण सत्ता हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर गांधी टोपी, कडक स्टार्च केलेला कुडता, जॅकेट घालून लाल दिव्याच्या गाडीतून चाललेला राजकारणी डोळ्यासमोर येतो. पण नोटबंदी करून मोदींनी जनधन खाती बाळगणाऱ्या गरिबांच्या हाती देशाची आर्थिक सत्ता देऊन टाकली. जी व्यक्ती कर भरण्यास आजन्म पात्र नव्हती, जिला घाई गडबडीत कुठल्यातरी पुढच्या सोयीसाठी बँकेत खाते उघडावे लागले, आणि ते खाते चालू अवस्थेत ठेवण्यासाठी लागणारा पैसादेखील त्या व्यक्तीच्या हातात नाही, अशा व्यक्तींना आहेत ते पैसे खात्यावर जमा करायला भाग पाडून मोदींनी त्यांच्या हाती कधीही नसलेली सत्ता त्यांना मिळवून दिली. आणि अर्थातच भ्रष्टाचार घडण्यासारखी स्थिती निर्माण करून दिली.

जेव्हा एखादी गरीब व्यक्ती १०-२० % कमिशन घेऊन एखाद्या धनाढ्य व्यक्तीला जुन्या नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देते, तेव्हा त्या गुन्ह्याचे समर्थन करायला तिच्याकडे कित्येक भावनिक कारणे असतात. पण सगळ्यात महत्वाचे कारण हे असते की आजवर कुणीही त्यांच्या खात्यात एकरकमी दोन लाख टाकलेले नसतात. आणि इतक्या सोप्या मार्गाने त्यांना कधीही वीस हजार मिळालेले नसतात. कुठलेही तात्विक आवाहन हातात असलेल्या सोप्या वीस हजार रुपयांपुढे निष्प्रभ ठरते. आणि जनधन खात्यांपासून ते २ जी पर्यंत सगळ्या पातळ्यांवरच्या भ्रष्टाचाराला या एकाच मानसिकतेतून बघता येते. भ्रष्टाचार करण्यासारख्या परिस्थितीत आल्यावर भ्रष्टाचार न करणे अवघड असते. आणि मानवी सद्सदविवेकाचा जर बेल कर्व काढायचे कुणी कधी धाडस केले, तर सच्चे इमानदार लोक हे नॉर्मल डिस्ट्रिब्युशनच्या बाहेर फेकले गेलेले आऊटलायर्स असतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपली बरीच जनता ह्या दुसर्‍या कॅटेगरीत पडते आणि हे छोट्या छोट्या भ्रष्टाचारांची सम टोटल खुप मोठी होऊ लागते. >> होय बुवा तो भाग समजला. त्याच्याशी सहमत आहेच. पण एक तिसरा वर्ग आहे जो यातील काहीच करत नाही, आणि अडवणूक होईपर्यंत कशातही सामीलही होत नाही. त्यांनी का म्हणून पॉलिटिकल करेक्टनेस दाखवावा?

म्हणजे मागणार्‍यांनी लाच मागितली तरी देणार्‍याकडे कॅशच नसेल, तो म्हणेल देतो पण चेकघ्या. एकदा का व्यवहार बॅकेत घेला की त्याच्या पाऊलखूणा राहातात. हे सगळं घडायला वेळ द्यायला हवा >>>> +१

पण एक तिसरा वर्ग आहे जो यातील काहीच करत नाही, आणि अडवणूक होईपर्यंत कशातही सामीलही होत नाही. >>>> अडवणूक होईपर्यंतच!! अडवणूक झाली की सगळे सामील होतातच. अडवणूक झाली म्हणून, नाइलाज आहे म्हणून, किंवा कारणे काहीही असोत. भ्रष्टाचार तो भ्रष्टाचारच!!

खरे तर नव्या नोटा तयार ठेवणे हे गुप्तपणे करताच आले नसते.
<<

पहिल्या दिवसापासून बँकांत २०००च्या नोटा मिळत होत्या, त्याआधीपासूनही काही अतिविशिष्ट लोकांकडे त्या होत्या, त्या कशा काय बुवा?

भजनसंध्या लवकर सुरू झाली वाट्ट्ं आज?

म्हणजे मागणार्‍यांनी लाच मागितली तरी देणार्‍याकडे कॅशच नसेल, तो म्हणेल देतो पण चेकघ्या. एकदा का व्यवहार बॅकेत घेला की त्याच्या पाऊलखूणा राहातात>>>

बालिश वाक्य.

अमेरिका, स्वीडन इ. मधे लाच घेणे बंद झाले का? अगदी रामराज्य अवतरले आहे का? जरा गुगल करून सांगा

सध्या लोकांकडे कॅश नाही पण लाच घेणे कुठे ही बंद झाले नाही. लाच आता सोने, फ्रीज, इ. वस्तूंमधे घेतली जाऊ लागली आहे. उलट लोकांकडे तर नविन नोटा मागितल्या जाऊ लागले आहे. अजुन बरीच रस्ते शोधले गेले आहे.
लाच सरकार नाही तर लोक मागतात. लोक सुधारली तर देश सुधारेल . त्यासाठी नोटबंदी वगैरे रस्ते फुसके आहे. हे इतिहासात कित्येकदा सत्य ठरले आहे.

पैसे सिस्टीम मध्ये येणार इस नॉट इक्वल टू कर मिळणार.

१. कारण ज्याच्या खात्यात पैसे जमा होत आहेत तो आधी टॅक्स ब्रॅकेट मध्ये असला पाहिजे.
२. छोटे छोटे अनेक डिपॉझिट ओळखीच्या किंवा नोकरांच्या अकाउंट मध्ये केले तर प्रत्येक आधी कधीही टॅक्स ब्रॅकेट मध्ये नसलेले अकाउंट इन्कम टॅक्सला तपासायला किती दिवस लागतील? आणि त्यात किती खर्च होईल?
३. भ्रष्टाचार करणारा संपला तर भ्रष्टाचार संपेल. पण जेव्हा भ्रष्टाचार करताना दोन्ही पार्टीज ना आर्थिक फायदा होतो तेव्हा तो संपणे केवळ नैतिकतेवरच अवलंबून असते. जसे की बिना पावती व्यवहार. यातून विकणाऱ्याला आणि विकत घेणाऱ्याला दोघांनाही आर्थिक फायदा होतो. मग पावती फाडायची जबाबदारी ही पैसे देणाऱ्याच्या नैतिकतेवर अवलंबून असते. त्यामुळेच बरेच मेणबत्ती घेऊन मोर्चे काढणारे मध्यमवर्गीय पोलिसांनी पकडल्यावर बिन पावतीचे पन्नास रुपये भरून सुटून जातात.
४. जर कॅशलेस व्यवहार करायला २% जास्त आकार घेतला जातो, तर कुठलाही नॉर्मल माणूस कार्ड का वापरेल? कॅशलेस व्यवहार तेव्हाच पॉप्युलर होईल जेव्हा तो करून रोकड देण्यापेक्षा जास्त फायदा होईल. किंवा आत्तासारख्या स्थितीत जिथे दुसरा काही इलाजच नाही.
५. आणि या पलीकडे जाऊन सगळी रोकड वाईट असा शिक्का मारला जातो आहे तो आणखीन चीड आणणारा आहे. आपल्यात बरेच लोक असे असतात ज्यांना खिशात कार्ड ठेवण्यापेक्षा एटीएम मधून काढलेल्या नोटा ठेवणे जास्त सोयीचे वाटते. या नोटा टॅक्स भरून जमा केलेल्या (किंवा करमुक्त) खात्यांमधून निघण्याचे प्रमाण जास्त आहे. त्या लोकांवर कॅशलेस इकोनॉमीची अरेरावी करायचे काहीच कारण नाही.
६. समजा १५ लाख कोटींपैकी १४ लाख कोटी किंवा त्याच्या वर परत बँकेत आले, तर आपण असं समजायचं का की भारतात फारसा काळा पैसाच नव्हता? मग शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली बेनामी मालमत्ता (ती देखील मोठ्या मोठ्या राजकारण्यांची) गोरी झाली का?
७. आणि समजा हा सगळा गोंधळ घालून शेवटी बीजेपी यूपीमध्ये आपटले, तर त्यांचा काळ्या पैशाविरुद्धचा हा असा लढा २०१९ पर्यंत चालू राहील का?

त्यांनी का म्हणून पॉलिटिकल करेक्टनेस दाखवावा?>>>> मला नाही वाटत सई त्यांनी तो पि सी दाखवावा म्हणत आहे पण ती फक्त निर्देशनास आणून देत आहे. ह्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार हा सुद्धा एक काँट्रिब्युटिंग फॅक्टर आहे आणि मला वाटतं ही एक सायकल आहे. म्हणजे ही पावलं उचलून एकदा बरेच चांगले चेक्स अ‍ॅन्ड बॅलन्सेस जर सरकारनी लावले तर पुढे कमी लोकांकरता अशी परिस्थिती निर्माण होईल की ज्यामुळे त्यांना करावाच लागतो भ्रष्टाचार. दुसरा मुद्दा ह्यात मला असा वाटतो की ह्या तिसर्‍या कॅटेगरित अगदी गरिब नसलेले पण येतात आणि त्यांनी जर ठरवून मेंटॅलिटी बदलली आणि भ्रष्टाचार नाही केला तर मदत होउ शकते.
आयटि कंपन्यां आणि त्यांच्या एम्प्लॉयींना यड्यात काढणारे पुष्कळ महानुभव स्वतः नक्की किती टॅक्स भरत असतील काय माहित? आयटि कंपन्या आणि त्यांच्या एम्प्लॉयींना टॅक्स हा भरावाच लागतो. हे एक साधं उदाहरण दिलं त्यातल्या त्यात नीट चेक्स अ‍ॅण्ड बॅललन्स असलेल्या प्रोसेसचं. अशीच प्रोसेस व्यवसाय करणार्‍यांच्या टॅक्स रिपोर्टिंग च्या भोवती लावली गेली तर अर्थातच कमी भ्रष्टाचार होईल. ह्या उपर व्यवसायिकांनी स्वतःहून नीट टॅक्स भरायचे ठरवले तर आणखिन प्रगती होईल. इथे त्यांना नेसेसेरिली जास्त फायदा होणार नाही पण फॉर ग्रेटर गूड म्हणून त्यांनी तसं केलं तर मदत होईल. मेंटॅलिटी चेंज केली पाहिजे, स्वतःहून.

पैसे सिस्टीम मध्ये येणार इस नॉट इक्वल टू कर मिळणार. >> ह्या पोस्टसाठी सई __/\__. हेच सांगायच कितीही प्रयत्न केला, तरी ह्यांना समजावून घ्यायचंच नाही.

@भास्कराचार्य
डोन्ट वरी. कीटनाशक (जे वर्षातून एकदाच घेतलं जातं) विकणाऱ्या माणसाला शेतकरी चेक का देऊ शकत नाही?
शेतकऱ्यांना आठवड्याला २५००० का लागावेत?

अशा प्रश्नांना मी कुठलाही पुणेरी खवचटपणा न करता सरळ उत्तर दिलेलं आहे.

अडवणूक होईपर्यंतच!! अडवणूक झाली की सगळे सामील होतातच. अडवणूक झाली म्हणून, नाइलाज आहे म्हणून, किंवा कारणे काहीही असोत. भ्रष्टाचार तो भ्रष्टाचारच!! >>> सुमुक्ता मी "अडवणूक" म्हणत आहे ती "काम व्हायला वेळ लागतोय" टाइपची नव्हे. समोरच्या टेबलावरचा माणूस पैसे मागतोय. दिल्याशिवाय काम करणार नाही. ते पैसे वरती झिरपत असल्याने तक्रार करून काही फायदा नाही. अशा स्थितीत सामान्य माणूस शेवटी पैसे देउन काम करून घेतो. अशा व्यक्तीला मी तरी इतरांच्या पातळीवर नेउन बसवणार नाही. या लोकांनी स्वतःहून घेतलेला निर्णय नव्हे तो. अनेक ठिकाणी सिस्टीम्स अशा एअर टाइट केलेल्या आहेत की त्याप्रमाणे वागल्याशिवाय सामान्यांना गत्यंतर नसते. या लोकांनी स्वतःला कमी त्रास होणारी पळवाट काढली (पोलिसांत, लाचलुचपतप्रतिबंध खात्यात वगैरे तक्रार करणे सोडून) हे खरे, पण मी त्यांना भ्रष्ट मानणार नाही.

छोटे छोटे अनेक डिपॉझिट ओळखीच्या किंवा नोकरांच्या अकाउंट मध्ये केले तर प्रत्येक आधी कधीही टॅक्स ब्रॅकेट मध्ये नसलेले अकाउंट इन्कम टॅक्सला तपासायला किती दिवस लागतील? आणि त्यात किती खर्च होईल?

अनेक खात्यात आता अचानक ४९,००० रु भरले गेलेले आहेत. ते बँकेच्या लोकांसमोरच झालेले आहे. त्या अ‍ॅकॉंऊंटसची माहीती आयकर खात्याला मिळालेली आहे ह्याचा अर्थ दर दिवसा गणीक माहीती गोळा केली जात आहे. प्रत्येक बँकेने केवायसी भरुन घेऊन अ‍ॅकाँऊट मधल्या अ‍ॅबनॉर्मल डीलींग्सची माहीती वरिष्ठां तर्फे आयकर खात्याला दिली पाहीजे. ते ज्यांनी माहिती दिली नाही तर त्या खात्याधारकाची व बँकेतल्या लोकांचीही खैर नाही !!

बर्याच बँकेनेच नविन पैसे खास लोकांनाच दिलेले ही समोर आलेले आहे ! त्यावर सुद्धा लगेच कारवाई झालेली आहे !! सरकारने आपली ईंटीलिजेंस गॅदरींग प्रणाली सुधारलेली आहे.

यात एक अजून महत्वाचा मुद्दा इन्स्टिट्यूशनल करप्शनचा आहे.

नोटबंदीच्या दुसऱ्या दिवशी पेटीएमच्या जाहिरातीवर मोदींचा फोटो आला. त्याबद्दल की(सोयीस्करपणे) कोणतीही कॉमेंट देण्यात अली नाही किंवा पीएमओ कडून त्याचे खंडन केले गेले नाही. आता अमेरिकेत व्हरायझनच्या जाहिरातीवर जर ओबामाचा फोटो आला तर पब्लिकला चालेल काय?
आणि या नोटबंदीचा थेट फायदा पेटीएमला झालेला सरळ सरळ दिसतोय. मग हा भ्रष्टाचार नाही का?

निव्वळ पैसे घेणे हा भ्रष्टाचार असू शकत नाही. मोदी पेटीएमकडून किंवा अंबानींकडून (ज्या दोन कंपन्यांनी बेधडकपणे जाहिराती साठी त्यांचा फोटो वापरला) कुठल्याही प्रकारचा प्रचाराचा खर्च घेत नाही हे सिद्ध करायची नैतिक जबाबदारी मोदींवर नाही का? याकडे आपण काँफ्लिकट ऑफ इंटरेस्ट म्हणून का बघू नये?

>>>अनेक खात्यात आता अचानक ४९,००० रु भरले गेलेले आहेत. ते बँकेच्या लोकांसमोरच झालेले आहे. त्या अ‍ॅकॉंऊंटसची माहीती आयकर खात्याला मिळालेली आहे ह्याचा अर्थ दर दिवसा गणीक माहीती गोळा केली जात आहे. प्रत्येक बँकेने केवायसी भरुन घेऊन अ‍ॅकाँऊट मधल्या अ‍ॅबनॉर्मल डीलींग्सची माहीती वरिष्ठां तर्फे आयकर खात्याला दिली पाहीजे. ते ज्यांनी माहिती दिली नाही तर त्या खात्याधारकाची व बँकेतल्या लोकांचीही खैर नाही !!

एखादी कामवाली बाई १५ वर्ष भांडी घासून घरात पैसे साठवते आहे. तिने सगळे पैसे ५०० १००० च्या नोटांमध्ये साठवलेले आहेत. महिन्याला २००० प्रमाणे एका वर्षाचे २४. असे तिनी १० वर्ष साठवले आणि नोटबंदी मुळे अचानक खात्यात भरले. तिच्या खात्याची माहिती अगदी तत्परतेने बँकेनी आयकर खात्याला दिली.
त्यानंतर आयकर विभाग तिला शिक्षा करण्यासाठी नक्की तिच्या कडे काय कागदपत्र मागणार हे सांगावे. आणि अशा किती भांडीवाल्यांचे आयकर विभाग पर्सनली इंटरव्यू घेणार तेही सांगावे. आणि या सगळ्या बायकांच्या मागे लागताना आयकर खाते भ्रष्टाचार करणार नाही यावर लक्ष ठेवायला कोण?

>>पैसे सिस्टीम मध्ये येणार इस नॉट इक्वल टू कर मिळणार.<<

आॅफकोर्स नाॅट फ्राॅम डे वन, पण जसजशी सिस्टम मचुर होत जाईल तसतसा टॅक्स रेवेन्यु वाढत जाईल. एक लक्शात घ्या कि हे सगळं भविष्यात होण्याकरता कुणीतरी/कुठेतरी सुरुवात करायलाच हवी होती, जी मोदि सरकारने अडखळत का होइना केलेली आहे. याचा लाॅंगटर्म इंपॅक्ट देशासाठि फायदेशीर आहे किंवा नाहि हे सांगण्या/कळण्याकरता अर्थतद्न्य असण्याची आवश्यकता नाहि. परंतु डिमोनटायझेशन करायलाच नको होतं असं ठाम मत असणार्यांनी एकतर चष्मा बदलावा किंवा मायोपियासाठि इलाज करुन घ्यावेत.

भ्रष्टाचाराचं समुळ उच्चाटन आपल्या हयातीत होणं अशक्य आहे; आपल्या पुढच्या पिढीत ते होईल किंवा नाहि ते आपण मुलांवर दिलेल्या संस्कारावर अवलंबुन आहे...

<<<<< त्यानंतर आयकर विभाग तिला शिक्षा करण्यासाठी नक्की तिच्या कडे काय कागदपत्र मागणार हे सांगावे. आणि अशा किती भांडीवाल्यांचे आयकर विभाग पर्सनली इंटरव्यू घेणार तेही सांगावे. आणि या सगळ्या बायकांच्या मागे लागताना आयकर खाते भ्रष्टाचार करणार नाही यावर लक्ष ठेवायला कोण? >>>>>>

सई मॅडम, हल्लीच एक न्युज आली होती, एका कचरा गोळा करणार्या बाईला ५०० / १००० च्या नोटांची बंडल कचर्याच्या ढी गार्यावर दिसली ! तिने लगेच पोलिस स्टेशनला जाऊन त्याची वर्दी दिली, दोन पोलिस आले तिच्या बरोबर जागा व नोटा बघायला , त्यांनी त्या नोटा आपापसात वाटुन घेतल्या , दोन बंडल तिच्या गळ्यातही मारायला बघितल, तिने सऱळ नकार दिला आणी पोलिस ठाण्यात जाउन वरिष्ठांना घेऊनच आली व झालेला प्रकार दाखवला !! जर त्या नोटा घ्याय च्याच असत्या तर तिने पोलिसांना माहिती देण्याची तसदी घेतली नसतीच !!

ह्या उदाहरणावरुन काय तो बोध घ्याल अशी अपेक्षा ठेवतो !!

या नोटबंदीचा थेट फायदा पेटीएमला झालेला सरळ सरळ दिसतोय. मग हा भ्रष्टाचार नाही का?<<<<

पेटीएम वापरणे म्हणजे देशसेवा असे चित्रे उभे झालेले आहे. ते चित्र टीकेस पात्रही झालेले आहे आणि स्तुतीसही!

त्यामुळे उत्पादनांवर मोदींचा चेहरा ह्यात व्यावसायिकतेबरोबर देशसेवा वगैरेचाही भावनिक अँगल आहे जो पुन्हा एक व्यावसायिक भागच आहे, पण तो त्या कंपनीपुरता!

हा भ्रष्टाचार नाही. भ्रष्टाचार म्हणजे कायद्याच्या चौकटीबाहेर असा व्यवहार करणे ज्यात दोन्ही पार्ट्यांचा फायदा होतो आणि सरकारचा तोटा होतो. पेटीएमने मोदींचा चेहरा लावला म्हणून सरकारकडे कर भरायला नकार दिला आणि व्यवसाय वाढला म्हणून मोदींना टक्केवारी नेमून दिली तर तो भ्रष्टाचार!

एखादी कामवाली बाई १५ वर्ष भांडी घासून घरात पैसे साठवते आहे. तिने सगळे पैसे ५०० १००० च्या नोटांमध्ये साठवलेले आहेत. महिन्याला २००० प्रमाणे एका वर्षाचे २४. असे तिनी १० वर्ष साठवले आणि नोटबंदी मुळे अचानक खात्यात भरले. तिच्या खात्याची माहिती अगदी तत्परतेने बँकेनी आयकर खात्याला दिली. >>> सिरियसली ? १० वर्ष बिनव्याजी पैसे ठेवणारी महान असणार .

>>>>कुठल्याही प्रकारचा प्रचाराचा खर्च घेत नाही हे सिद्ध करायची नैतिक जबाबदारी मोदींवर नाही का<<<<

नैतिक जबाबदारी हे दोन शब्द अचानकच खूप महत्वाचे झाले आहेत. आजवर ह्या शब्दांना सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जागा मिळत नसे. हे सिद्ध करायची जबाबदारी मोदींवर नाही का हे बघायला निवडणूक आयोग, न्यायालय वगैरे संस्था आहेत. जसे इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा भ्रष्टाचार सिद्ध होत नाही तोवर भ्रष्टाचार म्हणता येत नाही तसाच न्याय इथे लावता येतो का हे पाहूयात. Happy

आॅफकोर्स नाॅट फ्राॅम डे वन, पण जसजशी सिस्टम मचुर होत जाईल तसतसा टॅक्स रेवेन्यु वाढत जाईल
<<

जोपर्यंत अव्वाच्या सव्वा कर आकारणी बंद होत नाही, आकारलेल्या कराच्या मोबदल्यात मला काहीही नागरी सुविधा मिळाल्याचे दिसत नाही, उलट कराच्या पैशातून सरकार व सरकारी नोकर ऐश करतानाच दिसतात, तोपर्यंत लोक "काळा" पैसा बनवायचे सोडणार नाहीत.

बिल्डर लोक ६०-४० करतात म्हणून आपण ओरडतो, पण तो बिल्डर, किंवा कच्ची पावती देणारा सोनार, हे सगळे आपल्याला व्हाईट पर्चेसचा ऑप्शन देतच असतात. आपण स्वतः ब्लॅक पेमेंट पसंत करतो, कारण त्यावर द्यावा लागणारा टॅक्स आपल्याला चुकवायचा असतो. बेपारी खिशातून टॅक्स देत नाही. साधं हॉटेलचं बिल येतं त्यात अमुक्तमुक टॅक्स च्या नावाखाली एक्स्ट्रा पैसे लावून येतातच. पावती हवी असेल, तर ८-१२% जास्त लागतील, हे जेव्हा ५० लाखाच्या खरेदीवर ४-६ लाख एक्स्ट्राचे बोकांडी बसतील हे ध्यानी येतं, तेव्हा आपणच गुपचूप स्टँपड्यूटी चुकवण्यासाठी चोरी करत असतो.

व्यावसायिकांकडे मागितली जाणारी लाच टॅक्सपेड पैशातून कुणी देईल असं वाटतंय का कुणाला?

टॅक्स रेव्हेन्यु वाढवायचा सेन्सिबल उपाय म्हणजे टॅक्सचे दर कमी करणे, व अधिकाधिक लोकांना टॅक्सेबल ब्रॅकेटमधे आणणे.

जुलूमजबरदस्तीने सरकार अव्वाच्या सव्वा "टॅक्स" उर्फ प्रोटेक्शन मनी उकळत असेल, तर बेपारी व सामान्य माणूस त्यावर इलाज शोधायला समर्थ असतोच. बार्टर, गोल्डबेस्ड पॅरलल इकॉनॉमी उभी राहिल, किंवा सगळ्यात सोपे म्हणजे सरकार बदलले जाईल.

नैतिक जबाबदारी हे दोन शब्द अचानकच खूप महत्वाचे झाले आहेत. आजवर ह्या शब्दांना सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जागा मिळत नसे. हे सिद्ध करायची जबाबदारी मोदींवर नाही का हे बघायला निवडणूक आयोग, न्यायालय वगैरे संस्था आहेत. जसे इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा भ्रष्टाचार सिद्ध होत नाही तोवर भ्रष्टाचार म्हणता येत नाही तसाच न्याय इथे लावता येतो का हे पाहूयात.
<<

अर्थात,

सगळ्या दुनियेला नैतिकता शिकवणार्‍यांवर ती पाळायची काहीच जबाबदारी नसते, हा उजेड डोक्यात पडून धन्य झालो!

तसेही क्लीन चिटा देण्यात वाकबगार लोकांपुढे काय बोलावे?

न्यायालय इ. संस्था :

नोटबंदीबद्दल न्यायालयाने दिलेल्या कानपिचक्यांचं काय झालं? काही नवी बातमी ऐकू आली नाही अशात?

>>>>एखादी कामवाली बाई १५ वर्ष भांडी घासून घरात पैसे साठवते आहे. तिने सगळे पैसे ५०० १००० च्या नोटांमध्ये साठवलेले आहेत. महिन्याला २००० प्रमाणे एका वर्षाचे २४. असे तिनी १० वर्ष साठवले आणि नोटबंदी मुळे अचानक खात्यात भरले. तिच्या खात्याची माहिती अगदी तत्परतेने बँकेनी आयकर खात्याला दिली.
त्यानंतर आयकर विभाग तिला शिक्षा करण्यासाठी नक्की तिच्या कडे काय कागदपत्र मागणार हे सांगावे. आणि अशा किती भांडीवाल्यांचे आयकर विभाग पर्सनली इंटरव्यू घेणार तेही सांगावे. आणि या सगळ्या बायकांच्या मागे लागताना आयकर खाते भ्रष्टाचार करणार नाही यावर लक्ष ठेवायला कोण?<<<<

१. ठळक केलेल्या 'अचानक' ह्या शब्दाबाबत - सगळे पैसे अचानक बँकेत भरायचा नियम नाही. पावणे दोन महिन्यांची मुदत दिलेली आहे.

२. त्यानंतरसुद्धा योग्य ती कागदपत्रे सादर करून ३१ मार्चपर्यंत ते पैसे भरता येणार आहेत.

३. माणशी अडीच लाखापर्यंत पैसे भरायला काहीही आडकाठी नाही.

४. सुरुवातीचे काही दिवस नुसते नोटा एक्स्चेंजही सुरू होते.

५. दोन तीन आठवडे अनेक ठिकाणी जुन्या नोटा चालतील असा नियम होता.

हे सगळे केल्यानंतर त्या कामवालीला काही अडचण भासू नये. Happy

सिरियसली ? १० वर्ष बिनव्याजी पैसे ठेवणारी महान असणार .
<<

हो श्री, सिरियसली.

बँकेत पैसे ठेवायचे, म्हणजे अल्पउत्पन्न गटासाठी किचकट प्रकार असतो.

एकतर, हातात किती पैसे आहेत हे "नवर्‍या"ला एक्झॅक्टली समजते.

दुसरे, बँकेत खाते म्हणजे मिनिमम बॅलन्स वगैरे अटींखाली पैसे अडकून पडतात. कार्ड वगैरे फी भरून वापरायला तुम्हाआम्हाला परवडते, पण आयुष्याची श्रिशिल्लक ३०-४० हजार असणार्‍यांना एटीएम कार्ड घेणे व वापरणे परवडत होते का?

या गरीबांना बँका कर्जेही देत नाहीत हो.

बँकेकडून कर्ज मिळवणे काय असते, त्याबद्दल लिहिलंय मी इथे आधी. जौद्या. विषयांतर आहे ते.

पण हो, सिरियसली, लोक घरात पैसे ठेवतात. तुम्ही ठेवत नसाल, पण तुमच्या नॉन आयटी नोकरदार नातेवाइकांत चौकशी करून पहा. अन मग इथे लिहा, की कुणीच ठेवत नाही Wink

>>टॅक्स रेव्हेन्यु वाढवायचा सेन्सिबल उपाय म्हणजे टॅक्सचे दर कमी करणे, व अधिकाधिक लोकांना टॅक्सेबल ब्रॅकेटमधे आणणे.<<

सहमत. पण उत्पन्नाचे सगळे सोर्सेस सिस्टम मध्ये आणल्याशिवाय टॅक्स ब्रॅकेट कसं ठरवणार? लोक एव्हढे ईमानदार आहेत, ॲक्चुअल/टोटल इंन्कम डिक्लेर करण्या इतपत?..

>>>हा भ्रष्टाचार नाही. भ्रष्टाचार म्हणजे कायद्याच्या चौकटीबाहेर असा व्यवहार करणे ज्यात दोन्ही पार्ट्यांचा फायदा होतो आणि सरकारचा तोटा होतो. पेटीएमने मोदींचा चेहरा लावला म्हणून सरकारकडे कर भरायला नकार दिला आणि व्यवसाय वाढला म्हणून मोदींना टक्केवारी नेमून दिली तर तो भ्रष्टाचार!

किंवा मोदींच्या ९०० कोटींच्या प्रचारखर्चातील किती पेटीएम (आणि रिलायन्सने) केला असेल आणि त्या बदल्यात मोदी देशाला वेठीला धरून त्यांचा फायदा करून देत असेल तर तोही भ्रष्टाचारच. १०० %. कारण इथे तुमच्या डेफिनिशन प्रमाणे दोन्ही पार्ट्यांना फायदा झालेला आहे. पण अर्थातच प्रचार खर्च उघड करायचे "ऐतिहासिक पहिले पाऊल" मोदी कधीच उचलणार नाहीत. फारतर फार आपल्या खासदारांना बँक डिटेल्स अमित शहा कडे पाठवायला सांगतील.

यात विशेष कौतुक आणि चीड या गोष्टीची येते की मोदींचे हे खाजगी कंपन्यांच्या जाहिरातीत येणं (जे कुठल्याही देशात असं लीलया होत नाही) त्यांच्या अंध समर्थकांना बिलकुल विचित्र वाटत नाही. आणि मोदींचे त्यावर सोयीस्कर मौन याला फक्त ह्युब्रिस या इंग्रजी शब्दात व्यक्त करता येईल.

३. माणशी अडीच लाखापर्यंत पैसे भरायला काहीही आडकाठी नाही.
<<

बेफि,

माणशी १०-१२ करोड भरायलाही आडकाठी नाहीये.

मेरा पैसा सुरक्षित है.

अडीच लाखाखाली भरले, तर "प्रश्न विचारणार नाही" असं "आधी" जाहिर केलं होतं.

प्रॉब्लेम तिथे नाहिच्चै.

मी एकदा पैसे भरले, की मला हवे तितके बाहेर काढू देत नाहियेत हा प्रॉब्लेम आहे.

गावा-खेड्यांतून लग्नासाठी, किंवा अमुक कारणासाठी हातात गोळा केलेली कॅश बँकेत भरली, तर खर्चायला तितक्याच वेळात कॅश बदलून मिळते आहे का?

>>
४. सुरुवातीचे काही दिवस नुसते नोटा एक्स्चेंजही सुरू होते.
<<

कस्लं डोंबलाचं नोटा एक्स्चेंज? समजा माझ्या घरात कुणी 'गेलं'. अंत्यविधीसाठी लागतील तितके पैसे मिळत होते का? २००० रुपडक्यात कडबा, तिरडी, मडकं, "गुरूजी" प्लस 'वैकुठरथ' तरी मिळतो का भाड्याने? की या सगळ्यांनी तात्काळ पेटीएम बडवायला सुरुवात केली होती? पेशंट 'गेला' की काय होतं, ते दिसतं मला. महाराष्ट्राच्या कुठल्याही बिंदूवर बसलेलो असलो, तरी त्या बिंदूला किम्मत नाहिये का तुमच्या सरकारच्या दृष्टीने?

सरकार काय तुमच्या माझ्यासारख्या धनदांडग्यांना पोसायला बनलेलं अस्तं का?

कैच्याकै समर्थन करायलेत तुम्ही.

>>
५. दोन तीन आठवडे अनेक ठिकाणी जुन्या नोटा चालतील असा नियम होता.
<<

हो.

कुठेकुठे? अर्धसत्य बोलणे चालते का तुमच्यात?

>>>>प्रचार खर्च उघड करायचे "ऐतिहासिक पहिले पाऊल....<<<<

निवडणुकांमध्ये वापरल्या जात असलेल्या नोटांवर नोटाबंदीमुळे नियंत्रण येते. खर्च उघड करायचे नव्हे पण खर्च ताब्यात आणायचे पाऊल उचलले गेलेले आहे.

समजा आज निवडणूका झाल्या तर लाखो रुपयांची खैरात होत असे ती आज कशी होईल? नोटा पुरेश्या झाल्यानंतर आणि पुन्हा काळे व्यवहार सुरू झाल्यानंतर हे प्रकार पुन्हा सुरू होऊ शकतील. त्याला बराच वेळ लागेल व तेवढ्या अवधीत बरेच अनअकांऊंटेड पैसे अकाऊंट फॉर होतील.

>>>>मी एकदा पैसे भरले, की मला हवे तितके बाहेर काढू देत नाहियेत हा प्रॉब्लेम आहे.<<<<

सई केसकर आणि तुम्ही वेगवेगळ्या मुद्यांवर बोलत आहात. मी सई ह्यांना उत्तर देत आहे. माझे तेच उत्तर तुम्ही काढत असलेल्या विषयावर एकदम निराळेच वाटणे साहजिक आहे. पण चर्चा त्या विषयावर चाललेलीच नाही. वर एक कामवालीचं उदाहरण आलं आहे त्यावर ते लिहिलं आहे.

>>>>कैच्याकै समर्थन करायलेत तुम्ही.<<<< वर लिहिलेलेच येथेही लागू!

>>>>हो.

कुठेकुठे? अर्धसत्य बोलणे चालते का तुमच्यात?<<<<

एक उदाहरण पेट्रोल पंप! आठ दिवसांपूर्वी तर शिरवळच्या टोलवरही घेत होते, किमान दोनशेचा टोल तेथे लागू नसूनही. बाकी जाहीर न केलेल्याही अनेक ठिकाणी अजूनही जुन्या नोटा घेत आहेत. ज्यांना ज्यांना त्या डिपॉझिट करणे शक्य आहे ते त्या घेत आहेत.

Pages