हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ४ : साक्ष चमकणार्‍या पाण्याची!

Submitted by maitreyee on 10 July, 2016 - 22:47

भाग -१>>
भाग -२>>
भाग -३>>
भाग -४>>
भाग -५>>
भाग -६>>
भाग -७>>
भाग -८>>
भाग -९>>
भाग -१०>>

साक्ष चमकणार्‍या पाण्याची

माउई बेटाची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.
बेटाच्या मध्यभागी ज्वालामुखीने बनवलेला उंच डोंगर. डोंगरामुळे ढग आडवले गेल्यामुळे बेटाच्या पश्चिमेला अगदी कोरडे हवामान आहे. इकडच्या बाजूचा डोंगर उतार उघडा वाघडा , राखाडी किरमिजी दिसतो.
maui1.jpg
याउलट आहे पूर्व बाजू! अडवलेल्या ढगांतून सतत होणार्‍या पावसाने बेटाची ही बाजू मात्र चिंब भिजलेली, धुक्यात गुरफटलेली, हिरव्याकंच पर्जन्यवनांनी आच्छादलेली अशी आहे. एका बाजूला डोंगर आणि दुसर्‍या बाजूला समुद्र . अतिशय उंचसखल आणि फिरायला दुर्गम भाग आहे हा.
maui2.jpg

तर याच भागातलं एक निसर्गरम्य गाव - हाना !
इथे वाइअनापना नावाचा समुद्रकिनारा आहे. वाइअनापना चा अर्थ आहे "चमकणारे पाणी."
हा काळ्या रेतीचा किनारा त्याच्या वेगळेपणामुळे प्रसिद्ध आहे.

blacksand.jpg

इथे किनार्‍याजवळ कातळांमधून लाव्हाने कोरलेल्या काही गुहा आहेत.

caves.jpg

एका गुहेबाहेर गोड्या पाण्याचे नैसर्गिक कुंड तयार झाले आहे. त्यातले पाणीही अगदी नितळ निळे आहे.
तर त्यासंबंधातली ही कथा :

एक हवाईयन राजकन्या होती - पोपोआलिया. दिसायला सुरेख, वयाने लहान.
एका दुप्पट वयाच्या, पाशवी ताकदीच्या क्रूर टोळीप्रमुखाशी - काकियाशी तिचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. खरं तर एका शक्तीप्रदर्शन स्पर्धेचं बक्षिस म्हणून ती काकियाला मिळाली !!

काकिया पोपोआलिया आणि आपल्या टोळीला घेऊन उंच डोंगरात राहू लागला. . बिचार्‍या पोपोआलियाला काकिया अतिशय वाईट वागणूक देत असे. शारिरीक छळ, मारहाण आणि मानसिक छळ यामुळे तिचं जगणं अवघड झालं होतं.
काकिया अतिशय संशयी आणि मत्सरी पुरुष होता. आपल्या मागे आपली तरुण आणि सुंदर पत्नी इतर कुणाशी तरी संधान बांधून असावी असा त्याला सतत संशय येई. त्यात त्याची मर्जी राखण्याचा प्रयत्न करणारे त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला तिच्याबद्दल काहीबाही सांगून आणखी चिथावत असत.त्याचा परिणाम म्हणून काकिया आपल्या बायकोला अधिकच छळत असे.

पोपोआलियाला एक भाऊ होता, पिलाउवी. त्याला तिची काळजी वाटल्याने तो तिच्याजवळच घर बांधून रहायला आला. पण भावाच्या येण्याने पोपोआलियाचे आयुष्य सुधारण्याऐवजी अजूनच खडतर झाले. त्याच्या येण्याने काकिया अजूनच बिथरला. त्याला आता या भावा- बहिणीत संबंध असल्याचा संशय येऊ लागला. तो तिला अधिकच छळू लागला.

पोपोआलियाला आता हे सर्व असह्य झाले होते. एक दिवस ती पिलाउवीसोबत जंगलात फिरताना काकियाच्या चमच्यांपैकी कुणीतरी पाहिले आणि काकियाकडे चहाडी केली. झाले! काकियाने त्या दोघांनाही ठार मारण्याचे आदेश दिले!!
पोपोआलिया घाबरली. पण काकियाच्या माणसांच्या हातात पडण्याआधी आपली विश्वासू दासी मनोना हिला सोबत घेऊन ती तत्काळ तिथून पळून गेली! जंगलातून, दर्‍यांतून, गुहांमधून ठिकाणे बदलत लपत छपत राहू लागली. काकियाने तिला शोधायला माणसे पाठवली. पण त्यांना यश आले नाही.
वरचे वर कुठे कुठे ती दिसल्याच्या खबरा येत आणि तिच्या मागावरची माणसे पोहोचेपर्यन्त तिने ठिकाण बदललेले असायचे. काकिया संतापाने चवताळला होता.

पोपोआलिया आणि मनोना डोंगर दर्‍यातून, लाव्हाने कोरलेल्या गुहांमधल्या गुप्त मार्गांमधून प्रवास करत करत यथावकाश वाइअनापना या समुद्रकिनार्‍याजवळ पोहोचल्या.
waianapana2.jpg

किनार्‍याजवळच्या एका गुहेबाहेर चमकत्या नितळ पाण्याचे एक कुंड होते. गुहेत जायला त्या गोड्या पाण्याच्या कुंडातून पोहून पाण्याखालून जावे लागत होते.

waianapana.jpg

पोपोआलियाला ती गुहा लपण्यासाठी अगदी योग्य आणि सुरक्षित वाटली. ती आणि मनोना दिवसभर त्या गुहेत राहून रात्री अंधार पडल्यावर बाहेर येत आणि जवळच्या गावातील वस्तीवर अन्न शोधायला जात.

इकडे काकियाने तिचा शोध थांबवला नव्हता. अचानक समुद्रकिनार्‍यावरच्या मासेमारी करणार्‍या लोकांच्या बोलण्यातील " वाइआनपना किनार्‍याजवळच्या गावात रात्री फिरणार्‍या भुतां"बद्दल त्याच्या कानावर आले. धूर्त काकियाने त्याचा काढायचा तो अर्थ काढला आणि त्याने तडक वाइआनापना किनार्‍याकडे कूच केले.

बरेच शोधून आधी त्याच्या हाती काहीच लागले नाही . थकून एका टेकाडावर बसला असता खालच्या चमकत्या नितळ पाण्यात त्याला काहीतरी हलताना दिसले! ते एका पिवळ्या पिसाचे (काहिली) प्रतिबिंब होते!
ही काहिली केवळ राजघराण्यातल्या व्यक्तीच वापरू शकत. तर काहिली पाहून काकियाचा संशय बळावला , आणि नीट पहाताच पोपोआलिया आणि मनोनाची अस्पष्ट प्रतिबिंबं त्याला दिसली! मनोना आपल्या मालकिणीला पिसाने वारा घालत होती! असुरी आनंदाने त्याने तत्काळ गुहेत प्रवेश केला आणि त्या निष्पाप भयभीत स्त्रियांची अत्यन्त निर्दयीपणे आपल्या कुर्‍हाडीने हत्या केली!
गुहेबाहेरच्या त्या कुंडातले ते एरव्ही चमकणारे पाणी त्या दोघा दुर्दैवी तरुणींच्या रक्ताने लाल लाल झाले.

बिचार्‍या पोपोअलियाचे हाल तिच्या मरणानेच संपले!

असे म्हणतात की पोपोआलियावरच्या अन्यायाचा जाब विचारणारे तेव्हा कुणीच नसले तरी तिथल्या निसर्गाने काकियाने पाप पाहिले होते. त्या पापाची साक्ष देण्यासाठी अजूनही वसंत ऋतूत वर्षातल्या त्या ठराविक दिवशी कुंडातले चमकणारे पाणी आपला रंग बदलून रक्तासारखे लाल होते!!

वाइअनापना किनार्‍याजवळ हानाच्या आसपास रहाणारे स्थानिक लोक आपण स्वतः हा चमत्कार पाहिल्याचे सांगतात.अर्थात ते टूरिस्ट लोकांशी बोलत नाहीत पण स्थानिक टूर गाइड , ड्रायव्हर्स वगैरेशी त्यांची मैत्री असते.

काही अभ्यासकांनी उत्सुकतेने हा काय प्रकार आहे त्याचा पाठपुरावा केला. त्यांचे निष्कर्ष आश्चर्यकारक होते!
वसंत ऋतूत काही ठराविक दिवशी खरोखरच इथले पाणी लाल झाल्याचे त्यांना आढळले. पण ते रक्त किंवा तत्सम काही नसून, त्याला एक विशेष कारण होते! एका विशिष्ट जातीच्या अगदी लहान आकाराच्या लाल रंगाच्या श्रिंप ची त्या सुमाराला त्या भागात तुफान पैदास होते. या श्रिंप ना त्या कुंडात वाढणारी एक शेवाळाची जात खायला आवडते. इतके श्रिंप दाटीवाटीने ते शेवाळ खायला गर्दी करत असल्यामुळे ते पाणी लाल दिसते!! ते शेवाळ खाऊन संपलं की ते निघून तरी जातात किंवा मरतात तरी. त्यामुळे ठराविकच काळ हा चमत्कार बघायला मिळतो !!

मानवी मन अजब आहे! मेंदूला न आकळणार्‍या गोष्टींचं समर्थन करायला काय काय गोष्टी रचेल काही सांगता येत नाही!! Happy

हवाईयन माणसांनी ही घटना दर वर्षी पाहिली असेल, आणि त्यांच्या सुपीक मेंदूने ही कथा रचली असेल ? की ही कथा खरीच घडली असेल आणि त्या लाल श्रिम्पचीही जन्म मृत्यूची साखळी तिथेच असणे हा फक्त एक योगायोग असेल? कुणास ठाऊक!!

- क्रमशः

***
या कथेतली नावे गाइड ने सांगताना मला नीट कळली नव्हती. ती नावे आणि आणखी काही संदर्भ शोधायला खालील वेबसाइटस चा उपयोग झाला :
http://www.sacred-texts.com/pac/index.htm
http://www.to-hawaii.com/maui/geography.php
***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुंदर पद्धतीने ही सीरीज उलगडतीये........
अजूनही निखळ आनंद देणार्‍या लोककथा एंजॉय करता येत आहेत याचं मनस्वी समाधान वाटलं अगदी..
क्रमशः या शब्दाने खूपच आनंद झाला .. ( पहिल्यांदाच!! Wink )

हा पण भाग सुरेख. इथे अब्युझिव नवरा आहे. किती युनिवर्सल गोष्ट. ते गोड्या पाण्याचे कुंड मस्त असेल. मला वाटले होते काही केमिकल किंवा शैवाला मुळे लाल रंग येत असेल. पण ही तर श्रिंपची बाळे निघाली. अजून वाचेन ह्या बद्दल.

तुमची लेखन शैली पण अगदी एफर्ट्लेस आहे. वाचायला छान वाट्ते.

छान आहे ही पण , सगळ्या गोष्टी तिथक्या निसर्गाच्या चमत्कारावर बेतल्या आहेत हे इंटर्स्स्टींग !
अता एखादी ट्रॅजेडी नसलेली कथा येउ दे :).

छान लिहिलय, इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
पण वाचल्यावर एक जाणवले, की जगाच्या पाठीवर कुठेही जा, अगदि प्यासिफिक मधिल मोहोरिच्या दाण्यायेवढ्या बेटावर गेलात, तरी तेथिल मानव जमातीत "स्त्रीची" जागा उपभोग्य वस्तु व दुय्यमस्थानीच, अपवाद बहुधा आसाम/ब्रह्मदेशाचा असावा. अन्यथा पुरुषी आचरटा अहंकारी/क्रुर वृत्तीची उदाहरणेच जागोजागी दिसतात, अगदी लोककथांमधुनही, वास्तवातही... . त्यासर्वाचा "अतिरेक" मध्यपूर्वेत झाला असावा... !