हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ३: ओहिया आणि लेहुआची प्रेमकहाणी

Submitted by maitreyee on 8 July, 2016 - 06:40

भाग -१>>
भाग -२>>
भाग -३>>
भाग -४>>
भाग -५>>
भाग -६>>
भाग -७>>
भाग -८>>
भाग -९>>
भाग -१०>>

ओहिया आणि लेहुआची प्रेमकहाणी

एका टोळीच्या अलिइ ची एक सुंदर कन्या होती. लेहुआ तिचं नाव.
लेहुआ अगदी फुलासारखी नाजुक आणि सुंदर होती. सगळ्या बेटावर तिच्या सौंदर्याचा बोलबाला होता.
अलिइ आपल्या एकुलत्या मुलीला मौल्यवान वस्तूप्रमाणे जपायचा. लेहुआ अगदी लाजरी बुजरी होती, कुणाशीच जास्त बोलायची नाही.

त्या टोळीत एक नविन युवक आला. ओहिया त्याचं नाव. ओहिया दिसायला अत्यन्त रुपवान, प्रमाणबद्ध शरीराचा, ताकदवान आणि धाडसी होता. तो युद्धकलेत आणि क्रिडाकौशल्यातही निपुण होता. लवकरच तो अलिइ चा उजवा हात बनला.

एकदा अलिइने शेकोटीभोवती छोट्याश्या समारंभाचे आयोजन केले होते, त्या प्रसंगी प्रथमच ओहिया आणि लेहुआची नजरानजर झाली. पहिल्या नजरभेटीतच ओहयो आपलं हृदय पार हरवून बसला! लेहुआदेखिल त्याच्या एकटक नजरेने बावरली, लाजेने चूर झाली!

अलिइ च्या चाणाक्ष नजरेतून हे सुटले नाही. त्याने ओहियाला टोकल्यावर ओहियाने आपण लेहुआच्या प्रेमात पडल्याची कबुली दिली आणि अलिइकडे तिचा हात मागितला. अलिइ ला ओहियाच्या गुणांची कदर होतीच. त्याने दोघांच्या लग्नाला मान्यता दिली! लेहुआनेही लाजत लग्नाला रुकार दिला. ओहियाच्या आनंदाला पारावार राहिला नाही!

प्रथेप्रमाणे ओहियाने लेहुआसाठी घर बांधले. दोघांचे लग्न पार पडले.
बरेच महिने गेले. ओहिया आणि लेहुआ जणू काही एकमेकासाठीच बनले होते! एकमेकाच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. एकमेकाशिवाय दुसरे काही त्यांना सुचत नव्हते.

नियतीला त्यांचा हा आनंद बघवला नसावा. एक दिवस साक्षात पेले त्यांच्या घरासमोर आली! पेले ही हवाईयन संस्कृतीतील अग्नि / ज्वालामुखीची देवता अनेक कथांमधे येते. ही अफाट सुंदर परंतु शीघ्रकोपी आणि विनाशकारी क्षमता असलेली म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या कथा पण पुढे येतीलच.
**हर्ब काने या चित्रकाराने काढलेली तिची पेन्टिन्ग्स फार सुरेख आहेत. हे एक नक्की पहा : http://herbkanehawaii.com/image-catalog/gods-goddesses-legends/pele-g16/

तर ही पेले फिरत फिरत तिथे आली . ओहिया अंगणात लकडे फोडत होता. त्याचं रूप, लाकडे तोडताना लयबद्ध हालणारे त्याचे प्रमाणबद्ध शरीर पाहताच ती मोहित झाली. ती पुढे होऊन ओहियाच्या समोर आली, त्याच्या रुपाची उघड तारीफ केली. ओहियाने नम्रपणे तिचे स्वागत तर केले पण तिला फारसा प्रतिसाद दिला नाही. कसा देणार! त्याच्या नजरेला लेहुआखेरीज दुसरे काही सुंदर दिसतच नव्हते! भरीत भर म्हणून त्याच वे़ळी लेहुआ त्याचं दुपारचं जेवण घेऊन तिथे आली.

लेहुआला पहाताच जणू सर्व भान विसरून ओहिया तिच्याकडे धावला आणि तिला मिठीत घेतले.
पेलेचा ते पाहून जळफळाट झाला. तिने मग उघडपणे त्याला आपल्या मनीचा हेतू सांगितला.
ओहियाने लेहुआवरची नजरही न हटवता तिला नम्र नकार दिला. झाले! पेलेच ती, तिच्या मस्तकात संतापाची आग भडकली! सुडाने ती अक्षरशः धगधगू लागली !
नकार देण्याची जुर्रत करणार्‍या ओहयोचे तिने क्षणार्धात एका कुरुप झाडात रूपांतर केले!
लेहुआ ते पाहून शोक करू लागली. पेलेची क्षमा मागून तिने नवर्‍याच्या प्राणांची भीक मागितली. त्याच्याविना ती स्वतः जिवंत राहू शकणार नाही असे सांगून तिच्याकडे खूप गयावया केली. पण पेलेवर कसलाही परिणाम झाला नाही, लेहुआला लाथाडून आपला क्रोध शांत करायला ती उंच डोंगरात निघून गेली.

फुलासारखी नाजूक लेहुआ दु:खाने पार उन्मळून पडली. तिचा विलाप ऐकून इतर देवता जाग्या झाल्या. त्यांना तिचा शोक बघवला नाही. तिच्या दु:खाने त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले.
लेहुआ आणि ओहियासारख्या निष्पाप प्रेमी जिवांना पेलेने दिलेली क्रूर शिक्षा त्यांना मान्य नव्हती. पण पेलेच्या शिक्षेला मागे घेण्याची शक्ती त्यांच्याकडेही नव्हतीच!
मग इतर देवतांनी मिळून लेहुआला तिच्या ओहियाजवळ घेऊन जाण्यासाठी युक्ती शोधली!
त्यांनी तिचे रूपांतर नाजूक सुंदर फुलामधे केले आणि आता वृक्ष बनलेल्या ओहियाच्या खांद्यावर तिला कायमचे विसावू दिले.

हा ओहियाच्या झाडाचा फोटो.
ohiotree.jpg
(माझ्याकडचा फोटो तेवढा काही चांगला नाही, साधारण शिरिषाच्या फुलासारखे असते हे फूल. गुगल सर्च करून पहा!)

आजही ओहिया आणि लेहुआ हवाईत अजरामर आहेत.

ओहिया ची झाडं हवाईत सगळीकडे दिसतात. पेलेच्या ज्वालामुखीतला तप्त लाव्हा त्याच्या मार्गातल्या सगळ्या गोष्टींना भस्मसात करत असला, तरी कालांतराने त्या मृत्यूच्या तांडवावर मात करून पहिली नवजीवनाची खूण त्या लाव्हावर उगवते ती ओहियाच्या रोपट्याच्या रुपात! अर्थात त्याच्यासोबत त्याची लाडकी लेहुआही असतेच!

हे दोघे प्रेमी जीव एकत्र असतात तेव्हा सगळीकडे हसरं ऊन पसरतं.
मात्र लेहुआला ओहियापासून तोडले तर लेहुआबरोबर देवताही अश्रू ढाळू लागतात अन मुसळधार पाऊस पडतो!

म्हणून लेहुआचे फूल ओहियाच्या झाडावरून कधीच तोडू नये असं हवाईयन लोक मानतात.

-क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. छान आहे ही गोष्टं. आपल्याकडे झाड व फूल यांना एकच नाव असतं - गुलाबाचे झाड नी गुलाबाचं फूल. इथे वेगळी नावं दिसतात.

व्वा, मस्त आहे ही लोककथा... Happy त्याच्यात तेथिल प्रदेशाप्रमाणे धार्मिक/दैविक तथ्य असेलच असे मी तरी मानतो बोवा Wink

किती सुंदर कथा आहे ही.. झाडावरुन फुल न तोडायची कल्पनाच सुंदर..

इथेही मला एक योगायोग दिसतोय, न्यू झीलंडमधले पोहोतुकावा फूल पण रंगरुपाने असेच असते. पण वेगळे असते झाड ते.

भारी!! Happy

मै: एक सूचना - प्रत्येक भागाच्या सुरुवातीला किंवा शेवटी, इतर भागांच्या लिंक्स देता येतील का? म्हणजे मग सलग पणे सगळे भाग वाचले जातील.

क्युट आहे ही पण गोष्टं !
सुरवातीला वाटलं लेहुआ सुंदर म्हणजे तिला मिळवण्यासाठी टोळ्क्युद्ध टाइप कथा असेल, इथे वेगळीच कथा आहे, हिरोच्या मागे लागलेली अग्निदेवता :).

मस्त चालू आहे ही मालिका.

पेलेच्या ज्वालामुखीतला तप्त लाव्हा त्याच्या मार्गातल्या सगळ्या गोष्टींना भस्मसात करत असला, तरी कालांतराने त्या मृत्यूच्या तांडवावर मात करून पहिली नवजीवनाची खूण त्या लाव्हावर उगवते ती ओहियाच्या रोपट्याच्या रुपात! अर्थात त्याच्यासोबत त्याची लाडकी लेहुआही असतेच! >>> कथा तर सुंदर आहेतच पण त्यानंतर तुम्ही लिहीत असलेल्या कथासारामुळे अजून छान वाटतय वाचताना.

मस्त कथा. आवडली एकदम.

तुझी हवाई वरची मालिका बघून मलाही काही काळ फार हुरूप आला होता अलास्का ला जिथे जिथे फिरणं झालं त्याबद्दल लिहीण्याचा पण लगेच मावळला. एव्हढा अभ्यास काही जमायचा नाही.

>> पेलेच्या ज्वालामुखीतला तप्त लाव्हा त्याच्या मार्गातल्या सगळ्या गोष्टींना भस्मसात करत असला, तरी कालांतराने त्या मृत्यूच्या तांडवावर मात करून पहिली नवजीवनाची खूण त्या लाव्हावर उगवते ती ओहियाच्या रोपट्याच्या रुपात! अर्थात त्याच्यासोबत त्याची लाडकी लेहुआही असतेच!

हे वाचून अलास्कातलं "फायरवीड" आठवलं. वणव्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हेच उगवतं म्हणून त्याला फायरवीड म्हणतात अशी त्याची गोष्ट आठवली. अलास्कात सगळीकडे ह्या फायरवीड चे मखमली गालिचे दिसतात.

सहीए! Happy

मला सत्यवान-सावित्रीची कथाच आठवली वाचताना.

झाडाला आणि फुलाला वेगवेगळं नाव - हा मुद्दा पण इंटरेस्टिंग आहे.