हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ९ : महाराजा कामेहामेआ

Submitted by maitreyee on 1 August, 2016 - 23:44

भाग -१>>
भाग -२>>
भाग -३>>
भाग -४>>
भाग -५>>
भाग -६>>
भाग -७>>
भाग -८>>
भाग -९>>
भाग -१०>>

महाराजा कामेहामेआ

हवाईच्या कथा राजा कामेहामेआच्या गोष्टीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत!
अर्थात ही निव्वळ दंतकथा नसून हा इतिहास आहे.
आपल्या इतिहासात जे स्थान शिवरायांचं आहे ते हवाईमधे राजे कामेहामेआचे आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये!

कामेहामेआ हा हवाईच्या इतिहासातला पहिला असा राजा होता ज्याने सगळ्या हवाई बेटांवर एकछत्री अंमल प्रस्थापित करु शकण्याचा पराक्रम केला.

km1.jpg

ही गोष्ट आहे अगदी अलिकडची. इतिहासाच्या भाषेत अगदी कालपरवाची.
साधारण १७५०सालाच्या आसपासपर्यन्त हवाई बेटांवर अनेक निरनिराळ्या टोळ्यांचे अधिपत्य होते. जास्तीत जास्त इलाख्यावर कब्जा करण्यासाठी त्यांची एकमेकात सतत भांडणे, लढाया चालत. इथे शांतता अशी कधी नव्हतीच . अनेक सामान्य लोक हकनाक मारले जात. सामान्यांना बरीचशी अन्यायकारक अशी कापु पद्धत अजूनही अस्तित्वात होती.

कामेहामेआचा जन्म नक्की कोणत्या साली झाला त्याची नोंद नाही. पण त्याच्या जन्मवर्षी आकाशात " पिसाच्या शेपटीचा तारा" प्रकट झाल्याचे लोक सांगतात. या वर्णनावरून तो हॅलेचा धूमकेतू दिसल्यचे वर्ष (१७५८)असावे असे मानले जाते.

हवाई बेटावरील (बिग आयलंड) कोना इथल्या अलिइची मुलगी केकुआपोवा गर्भवती होती . तिला डोहाळे कसले लागावेत तर एका अलिइचा डोळा काढून खाण्याचे!! तिचा नवरा केउआ याने शेवटी शार्क माश्याचा डोळा आणून तिला खायला घातला!! हा घटनेमुळे 'केकुआआणि केउआच्या पोटी एक महापराक्रमी मुलगा जन्माला येईल आणि तो पुढे आजू बाजूच्या सगळ्या अलिइंचा पाडाव करून संपूर्ण बेटावर सत्ता प्रस्थापित करेल 'असे भाकित एका कहुनाने(धमगुरु) केले!

झाले! आजूबाजूच्या इतर अलिइंच्या कानावर ही खबर गेलीच. ते कसे स्वस्थ बसणार ! ते सगळे त्या अजून जन्माला देखिल न आलेल्या बालकाच्या जिवावर उठले. केकुआला संरक्षण देऊन गुप्त ठिकाणी हलवण्यात आले. तिच्या मागावर इतर अलिइ आणि त्यांचे लोक सतत होतेच. त्यामुळे त्यांना सारखी लपण्याची जागा बदलावी लागत होती.
केकुआचे दिवसही भरत आले होते.

एके रात्री एका लहान झोपडीत केकुआ आणि केउआने आसरा घेतला. वादळी आणि पावसाळी रात्र होती. त्यात मारेकरी सतत मागावर. अशात नेमक्या अपरात्री केकुआला कळा सुरु झाल्या.
असं म्हणतात की अशा वाद्ळी रात्री अवघड ठिकाणी, बिकट परिस्थितीत जन्म घेणे हेही असामान्य माणसाचेच लक्षण आहे!
प्रसंग बाका होता. बाळाच्या रडण्याने त्यांची लपण्याची जागा गुप्त राहू शकणार नव्हती. मनावर दगड ठेवून बाळ जन्मताक्षणी केकुआ आणि केउआने निर्णय घेतला.
केउआने बाळ जन्मताक्षणी झोपडीच्या बाजूच्या भगदाडातून ते बाळ त्याच्या विश्वासू मित्र अलिइ नैओली याच्याकडे लगोलग सोपवले! नैओलीने ताबडतोब बाळ घेऊन तिथून प्रयाण केले आणि तो हवाई बेटाच्या उत्तर किनार्‍यावर सुरक्षितपणे पोहोचला. इकडे केकुआचे आणि केउआचे काय झाले असेल ? कुणास ठाऊक ! ते जगले की मारले गेले याची खबर कुणाला नाही.

इकडे त्यांच्या बाळाचे नाव पाइआ असे ठेवले गेले. नैओलीच्याच देखरेखीत पाइआ हळूहळू मोठा होऊ लागला. लहानपणापासून त्याला युद्धकलेचे शिक्षण देण्यात आले. पाइआ त्याच्या वयाच्या मानाने अंगापिंडाने थोराड होता.
पाइआ ५ वर्षांचा होईपर्यन्त इकडे त्याचे काही मारेकरी मेले तरी किंवा बरेचसे त्या भाकिताबद्दल विसरलेही. त्यामुळे पाइला पुन्हा घरी त्याच्या टोळीत परत आला. पाइआचा मामा कलानीओपु त्यावेळी राजा होता. पाइआला राजकुमाराची वस्त्रे देण्यात आली. मामे भाऊ आणि राजाचा वारस किवालोसोबत त्याला युद्धाचे आणि कापु कायद्यांचे शिक्षण आणि राजकीय मुत्सद्देगिरीचे शिक्षणही त्याला मिळाले आणि त्याने ते भराभर आत्मसात केले. हा मुलगा कधीच हसायचा नाही की कुणाशी जास्त बोलायचा नाही. त्यावरून त्याला कामेहामेआ (एकलकोंडा) असं म्हणू लागले.
कामेहामेआ आता तरुण झाला होता. त्याची उंची ७ फूट होती असे मानले जाते. तो अफाट ताकदवान आणि युद्धकलेत निपुण होता. कलानीओपुने आपल्या भाच्याच्या सामर्थ्यावर विश्वास टाकला होता. कामेहामेआनेही तो विश्वास सार्थ ठरवत आपल्या मामासाठी बर्‍याच लढाया जिंकल्या. किवालोला ते फारसं आवडत नव्हतं. तो कलनीओपुचा वारस असला तरी कामेहामेआचं महत्त्व नाही म्हटले तरी त्याच्या डोळ्यात खुपायचं.
कलानीओपु आणि कामेहामेआचं प्रस्थ त्या बेटावर वाढतच गेलं.

होता होता १७७९ साल उजाडलं. हे वर्ष कामेहामेआसाठीच नव्हे तर तमाम हवाईयन संस्कृतीच्या पटलावर एक प्रचंड मोठ्या बदलाची चाहूल घेऊन आलं!

राज्यात पिकांची देवी लोनोचा उत्सव सुरु होता. अचानक किलाकेकुआ खाडीच्या काठावर मोठा कोलाहल झाला.
समुद्रातून एक महाकाय आकार किनार्‍याच्या दिशेने सरकत येत होता ! एक राक्षसी नौका!! त्या लोकांनी इतकी मोठी नौका कधी पाहिलेलीच नव्हती . हळूहळू ती जवळ येताच लोकांना त्या नौकेवरचे त्रिकोणी मुकुट घातलेले गौरवर्णीय दिव्यपुरुष दिसले! साक्षात देवच हे! शंकाच नाही!! सगळे सामान्य जन गुडघे टेकवून या देवांचं अभिवादन आणि स्वागत करू लागले.

देव ?? हे देव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन कुक आणि त्याचे साथी होते.
बाहेरच्या प्रगत जगाची पहिली पाउलखूण कॅप्टन कुक च्या रुपाने हवाई बेटांवर येऊन थडकली होती!! हवाई बेटं आता बाहेरच्या जगापासून फार काळ लपून राहणार नव्हती!
आगामी प्रचंड मोठ्या बदलांची, नव्या युगाची आता हवाईत सुरुवात होत होती!

-क्रमशः

टूरिस्ट गाइड्स खेरीज इतर संदर्भ येथून साभार :
https://www.nps.gov/puhe/learn/historyculture/kamehameha.htm
http://www.hawaiihistory.org/index.cfm?fuseaction=ig.page&PageID=398

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कलानीओपुचा आपल्या पुतण्यावर विश्वास होता. >>> इथे भाच्यावर पाहिजे ना? मामा:भाचा :: काका:पुतण्या.

इथे एपिक चॅनलवर देवदत्त पटनाईकांची 'देवलोक' ही भारतीय पुरातन साहित्यावरची मालिका चालू आहे. काल त्यांनी सांगितले की साहित्यात तीन प्रकार असतात: १. फॅक्ट २. फिक्शन ३.मिथ्स. मायथॉलॉजी/लोककथा यांत खूप धूर असतो पण त्याच्या मुळाशी ९९% वेळा ठिणगी तरी असतेच. ती मालिका बघताना हटकून या मालिकेची आठवण होते.

मस्त.
सगळेच भाग सुंदर झालेत.

कलानीओपुचा आपल्या पुतण्यावर विश्वास होता.>> इथे 'भाच्यावर' असे हवेय ना?

धन्यवाद लोकहो!
हा भाग इतिहास असल्यामुळे संदर्भ बघून स्थळ , काळ, घटना यांच्या अचूकतेची परत वाचून खात्री करावी लागत आहे, आणि हा भाग तसा लंबलचक पण आहे, त्यामुळे लिहायला वेळ झाला जरा.
पुढचा भाग या मालिकेचा शेवटचा असेल, बहुतेक उद्या किंवा परवा टाकेन.
भाच्याची करेक्शन केली आहे:)
नंदिनी - अगदी अगदी! मलाही कृष्णजन्माची आठवण झाली होती. शिवाय यात मामाही असल्याने वाटले आता मामाच हल्ला करतो की काय , पण तसे काही नव्हते Happy

मस्त!

या कामेहामेआ ने आपलं उपरणं पुर्वी मुली सलवार कुर्त्यावर ओढणी जशी बांधायच्या खेळताना वगैरे तसं बांधलं आहे.