हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ७: कोपिष्ट सुंदरी पेले!

Submitted by maitreyee on 21 July, 2016 - 08:45

भाग -१>>
भाग -२>>
भाग -३>>
भाग -४>>
भाग -५>>
भाग -६>>
भाग -७>>
भाग -८>>
भाग -९>>
भाग -१०>>

कोपिष्ट सुंदरी - पेले!

हवाई बेटे ही ज्वालामुखीतून बनली आहेत. सतत होणार्‍या उद्रेकांमुळे आणि लाव्हाच्या वाहण्याने या बेटांचा आकार, उकार, भूगोल सतत बदलत आला आहे.
जगातल्या सर्वात मोठ्या आणि जागॄत ज्वालामुखींमधे हवाईच्या बिग आयलंडवरच्या काइलाउआ या ज्वालामुखीचा नंबर लागतो.
निसर्गावर विजय मिळवल्याचा मनुष्यप्राण्याचा अहंकार (असलाच तर) या ज्वालामुखीच्या एका फटकार्‍यात कस्पटासारखा चिरडला जातो. त्याच्या उद्रेकांवर नियंत्रण तर सोडाच पण तो केव्हा कुठे किती होणार याचा अंदाजसुद्धा आधुनिक विज्ञानालाही आजवर अतिशय मर्यादित प्रमाणावरच लावता आला आहे.

आताच्या प्रगत मानवाची ही कथा तर मग अनेक शतकांपूर्वी इथे आलेल्या सर्वथा अप्रगत माणसाला या ज्वालामुखीमधे दैवी शक्ती दिसली असेल तर यात नवल काय ! त्यात ही दैवी शक्ती वेळोवेळी आपलं अस्तित्व समोरासमोर दाखवूनही देते!!
हवाईयन ज्वालामुखीची देवता "पेले" इथल्या अनेक दंतकथांमधे हजेरी लावते.
पेलेच्या विनाशकारी शक्तीमुळे तिचा दरारा असला तरी "नविन जमिनीला जन्म देणारी" म्हणून तिचा आदरही केला जातो.
बिग आयलंड वर व्होल्कॅनो नॅशनल पार्क आहे. तिथेच काइलाउआ शिखर आणि पेलेचं स्थान असलेलं हालेमाउमाउ हे ज्वालामुखीचं विवर आहे.
crator.jpg

त्याच ठिकाणी थॉमस जॅगर म्युझियम आहे. यात ज्वालामुखीची माहिती, भूगर्भातली हालचाल मोजणारी यंत्रे इ. तांत्रिक गोष्टींसोबत स्थानिक चित्रकार हर्ब काने याने काढलेली पेलेची एक से एक सुंदर पेन्टिन्ग्ज मांडली आहेत. इथे आणि पार्कमधे ठिकठिकाणी पेले आपल्याला भेटत राहते.

pele.jpg
** हा त्यातल्या एका पेन्टिंगचा फोटो - मूळ चित्र थॉमस जॅगर म्यूझियम - चित्रकार हर्ब काने***
या चित्रकाराची ही वेबसाइट आणि त्यातली ही पेलेची इतर चित्रं आवर्जून बघण्यासारखी : http://herbkanehawaii.com/image-catalog/gods-goddesses-legends/

पेले! ती मूळची हवाईची नव्हती. तिचं कुटुंब ताहिती किंवा तिथल्याच कुठल्याशा बेटावर राहत होतं. प्रत्यक्ष आकाश हा तिचा पिता आणि भूमी ही तिची माता असे काही लोककथा मानतात. पेलेचं सौंदर्य असं की कुणालाही भूल पाडणारं , संमोहित करणारं! स्वभाव अत्यन्त मनस्वी! एखाद्यावर प्रेम केलं तर ते सर्वस्व उधळून.. पण तितकीच चंचल आणि शीघ्रकोपी ! तिच्यात धगधगता अंगार भरलेला होता जणू! संतापाच्या आगीत कधी कुणाला भस्म करेल सांगता यायचं नाही! तिच्या चंचल स्वभावाला कधी चैनच पडायचं नाही. सतत कुठल्या तरी दूरच्या गावाला ,प्रवासाला जायची स्वप्नं पडायची. तर पुढे एकदा झालं असं की तिच्या बहिणीच्या नवर्‍यावरच तिच्या सौंदर्याची जादू झाली! पेलेला तो स्वतःचा विजयच वाटला! पण बहीणदेखिल कुणी साधीसुधी स्त्री नव्हती !! ती होती प्रत्यक्ष जलदेवता - नमाको कहाई ! दोघींच्या संघर्षातून काहीतरी अनिष्ट घडू नये म्हणून पेलेच्या आई वडिलांनी तिला आणि तिच्या इतर भावंडांना छोट्याशा होडीत बसवून रातोरात दूर निघून जायला सांगितलं.
पेलेने मोठा भाऊ कामोहोआइच्या (समुद्री ड्रॅगन्स चा - शार्क माशांचा राजा !) मदतीने लहान भावंडांचे रक्षण करून तो खडतर प्रवास केला. बर्‍याच दिवसांनंतर त्यांची होडी एका छोट्या छोट्या बेटांच्या माळेजवळ पोहोचली. तीच ही हवाई बेटं!
या बेटांवर तेव्हा मनुष्यवस्ती नव्हती. उत्तरेच्या बेटांवर हिमदेवतांचं वास्तव्य होतं. पेले तिच्या भावंडांना घेऊन तिथे पोहोचताच त्या हिमदेवतांनी हिमवादळे सोडून त्यांना सळो की पळो करून सोडलं. पेलेने दक्षिणेकडच्या बेटांवर मुक्काम हलवायचा निर्णय घेतला. प्रथम ती गेली कौआई बेटावर. तिथे तिने आपल्या भावंडांसठी घर बांधायचं ठरवलं.
इथे दुसरंच संकट तिच्या पाठलागावर आलं! तिच्या बहिणीच्या रुपात !! नमाकोकहाई तिला सुखाने जगू देणार नव्हतीच ! पेलेने इथल्या किनार्‍यावर घर बांधायला घेतले, पण पेलेने अग्नीसाठी खड्डा खणताच नमाकोकहाई ते खड्डे पाण्याने भरून टाकी! असं बर्‍याच वेळा झालं. दोघी बहिणींमध्ये युद्ध झालं. पेलेला या पहिल्या युद्धात जखमी करून मृत्यूशय्येवर सोडून नमाकोकहाई निघून गेली. पण पेले त्यातून जगली, सावरली आणि सूडाग्नी उरात घेऊन अजूनच शक्तीशाली बनली. आता ती माउई बेटावर पोहोचली. यावेळी किनार्‍यावर खड्डा न खणता हालेकालिआ या पर्वतशिखरावर तिने मोठे विवर खणले आणि तिच्या अग्नीची तिथे स्थापना केली.

नमाकोकहाईला लवकरच याची खबर लागली. तिने उत्तुंग लाटांच्या रुपात माउईच्या किनार्‍यावर धडका द्यायला सुरुवात केली. यावेळी उंच शिखरावरचे पेलेचे अग्निविवर तिला विझवता आले नाही.पेलेनेही लाव्हाचे विस्फोट, ज्वाळांचे तांडव आणि अग्निस्फुल्लिंगांची बरसात केली. हे महायुद्ध बराच काळ चालले.
या महायुद्धाचा हिंसक शेवट हाना येथे झाला. दोघी बहिणींमधे पुन्हा घनघोर युद्ध झालं. नमाकोकहाईने माघार घेतली. पण पेलेनेही तिच्या भौतिक देहाचा इथे त्याग केला. मृत्यूनंतर तिला देवत्व प्राप्त झाले.

यानंतर पेलेने सर्वात दक्षिणेच्या बेटावर (हेच हवाईचे बिग आयलंड) काइलाउआ शिखरावर हालेमाउमाउ नावाचे प्रचंड मोठे अग्निविवर बनवले. तेच तिचे शाश्वत निवासस्थान बनले. हवाईयन लोकांच्या दृष्टीने हे जागृत शक्तीपीठच आहे . कारण पेलेने तिच्या अस्तित्वाच्या खुणा वरचेवर त्यांना दिल्या आहेत!
आजही तिन्ही सांजेच्या वेळी काइलाउआ शिखरावर हालेमाउमाउ विवराच्या जवळ गेलात तर तो आख्खा परिसर पेलेच्या लाव्हाच्या उजेडात झगमगत असलेला दिसतो. तिच्या अस्तित्वाची साक्ष देणारी ती ज्वलंत निशाणी !
crator_2.jpg
** हा फोटो अज्जिबत चांगला आलेला नाही याची जाणीव आहे. प्रत्यक्षातल्या नेत्रदीपक दृष्याशी याची तुलनाही नाही.

पेलेच्या लाव्हाच्या लोटांनी विनाशाचे तांडव केले तरी कालांतराने त्यातूनच या बेटावर नव्या जमिनीची निर्मिती केली आहे. पूर्वी होता त्यापेक्षा या बेटाचा आकार खूप मोठा झाला आहे.

पेलेचे तिच्या या बेटांवर बारीक लक्ष असते. तिच्या चंचल स्वभावानुसार आजही तिच्या जिवाला कधी शांतता नसते ! ती सतत वेगवेगळी रुपे धारण करून या बेटावरून त्या बेटावर फिरत असते. कधी वृद्ध स्त्रीच्या तर कधी सुंदर तरुणीच्या रुपात येऊन कुणाचीही परीक्षा बघते. ती प्रसन्न झाली तर घेणार्‍याची झोळी फाटेल इतके मोठे दान त्याच्या पदरात टाकते. जाणता अजाणता तिचा उपमर्द केला तर मात्र तिच्या क्रोधाच्या तडाख्यात सापडणार्‍याची खैर नसते! मग तो सामान्य मानव असो, तिचा स्वतःचा प्रियकर असो वा तिचे आप्तस्वकीय!! ती संतापून तांडव करते तेव्हा या बेटांवर भूकंप होतात. ती एखाद्याला शिक्षा देते तेव्हा लाव्हाचे लोट वाहतात.
तिच्या अशा काही कथा पुढल्या भागांमधे ...

-- क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाले माउ माउ >>> मस्त नाव आहे Happy

त्या ज्वालामुखी विवराच्या इतक्या जवळ झाडे बघून आश्चर्य वाटले. निसर्ग अजब आहे.

एकदमच भन्नाट चाललीय लेखमालिका.
हे फोटो आणि इतक्या रसाळ गोष्टी वाचून 'जीवन मे एक बार जाना हवाई' असं वाटायला लागलंय!

मस्त आहे हा ही लेख. पेले चे चित्र पण आवडले. ही व्रूस्चिक राशीची मंगळ प्रॉमिनंट असलेली तापट मुलगी वाट्ते आहे. व तिचे ताप व वरदाने आपल्याकडे शनी महाशय करतात त्या स्वरूपाचे आहेत. ( संदर्भ शनिमहात्म्य!!) त्यांची आई धोरणी व प्रोअ‍ॅक्टिव्ह वाट्ते. त्रास होण्या आधी कारण दूर केले.

हाले माउ माउ म्हणजे पाळण्यातून आपण बाळाला उचलून घेताना म्हणतो तसे वाट्ते आहे.

धन्यवाद!
रिया, डीजे Happy हो ना, एकदम इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे पेले !
माधव - तिथे जवळ झाडे आहेत कारण ते विवर खूप खोल आहे. दिवसा पाहिले तर नुस्ता धूर दिसतो. लाव्हा अ‍ॅक्टिव्हिटी सहसा दिसत नाही. त्या विवरातून लाव्हा फ्लो कित्येक वर्षात झाला नाहीये. पण आजू बाजूच्या कित्येक मैल परिसरात असलेल्या जमिनीतल्या फटींमधून वरचे वर होतो . आम्ही गेलो तेव्हा एका ठिकाणी झाला होता. पण मैलभर आधीच तिथे जायचे रस्ते बंद करून टाकतात अशा वेळी त्यामुळे तो लाइव्ह लाव्हा काही बघता आला नाही.

संध्याकाळी हालेआउमाउला तो लाव्हा ग्लो बघण्ञासाठी आम्ही गेलो तेव्हा मनात एक धाकधूक वाटत होती की आपण उगीच अपेक्षा वाढवून तर जात नाही आहोत ना ?! तरीसुद्धा जेव्हा प्रत्यक्ष ते दृष्य बघायला मिळालं तेव्हा कल्पिताहून कितीतरी नेत्रदीपक असा तो नजारा होता !! हालेमाउमाउ बघायला सर्वात सोयीची जागा म्हणजे थॉमस जॅगर म्यूझियमचे आवार. आम्हाला तिथे पोहोचयला अंमळ उशीर झाला होता. थॉमस जॅगर म्यूझियम ला जाणारा रस्ता रेंजर्स नी बंद केला होता . त्यांचे पार्किंग फुल्ल झाले होते, पण एका पर्यायी वाटेने जरा दूर पार्क करून दुसर्‍या बाजूने हालेमाउमाउला जाता येईल असे सांगण्यात आले. इथे पार्किंग बरेच दूर होते. त्या किर्र अंधारात पार्किंगपासून हालेमाउमाउ च्या व्ह्यूइंग एरियापर्यन्त जायला अर्धा - एक किमीची चढून जाणारी पायवाट होती. त्या पायवाटेवरचे रिफ्लेक्टर्स सोडले तर दूरवर कुठेही दिवे दिसत नव्हते. वर चांदण्यांनी भरलेले आकाश, ऐन उन्हाळा असला तरी शिखरावरची हवा एकदम थंड झाली होती. कुडकुडत आम्ही चढ चढून जरासे वर आलो मात्र! समोरच हालेमाउमाउ दिसले! त्या प्रचंड विवराचे मुख आणि आसपासचा परिसर लाल केशरी उजेडाने उजळून निघाला होता. लाव्हाच्या हालचालीमुळे तो उजेड एखाद्या पेटत्या ज्योतीच्या आभेप्रमाणे हलत होता, जिवंत वाटत होता ! अद्भुत !! दिवसभर ऐकलेल्या पेलेच्या कथांच्या वातावरणनिर्मितीमुळे असेल, पण एक भारावून टाकणारा अनुभव होता!
फोटो तर खूप घेतले आम्ही. पण प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणार्‍या अनुभवाची सर त्याला शतांशानेही नाही!

हालेमाऊमाऊचा गुगलवरचा हा फोटो मला खूप आवडला.

http://images.fineartamerica.com/images-medium-large-5/halemaumau-by-moo...

आणि एका ठिकाणी दगडांचा ढीग करु नका अशी पाटी दिसली. त्याचे कारण कळेल का?*

http://octopup.org/img/2006/hawaii/m/Hawaii-Saturday-052--Halemaumau-Vol...'t-Build-Rock-Piles.jpg

* संपादीत. गुगल वर याचे कारण सापडले. Happy

मालिका मस्त चालू आहे. पुढील भागाच्या प्रति़क्षेत.

पियू , जबरी फोटो आहे तो वरचा!
आमच्या सग़ळ्या बॅटर्‍या दिवसभरात संपल्यामुळे एक फोन मधे धुगधुगी शिल्लक होती तेवढ्यावर आले तसे काढले फोटो Happy ते rock piles प्रकरण मला तर आताच कळतंय !! यडपट टूरिस्टांची आयडिया दिसतेय !!

यडपट टूरिस्टांची आयडिया दिसतेय !!

>> नाही गं.. त्यामागे लॉजिकल कारण आहे.

Rock-pile building not only destroys physical geologic evidence, but it could also destroy important archaeological evidence of Hawaiian use. They erase Hawaiian history.

पियू, तेच म्हणत होते मी - ते रॉक पाइल्स बनवणे ही मुळात टूरिस्टांची क्रेझी आयडिया आहे असे दिसतेय नेट वर जे वाचले त्यावरून .

रॉक पाईल्स कसल्या ऑस्स्म दिसतात, आणि करायला मजा येते. त्याने पुरावे कसे बरे नष्ट होतात? जणू काही ते बारके दगड आहेत त्या ठिकाणी ठेवण्याने महापुरावे मिळणारेत. Proud
मै, वरचं वर्णन मस्त केलंयस. नक्की जाणार इथे.
ओके अपडेट: अशा रॉक पाईल्स केल्या आणि मग ज्वालामुखीतला लाव्हा त्यावरून गेला तर त्या पाईल्स वेगवेगळ्या ठिकाणाचे दगड जमवून प्रसंगी तोडून केल्याने geological पुरावा म्हणून रहात नाही असं वाचून वाटलं. मेक्स सेन्स.

Pages