हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - १ :पार्श्वभूमी

Submitted by maitreyee on 6 July, 2016 - 10:35

भाग -१>>
भाग -२>>
भाग -३>>
भाग -४>>
भाग -५>>
भाग -६>>
भाग -७>>
भाग -८>>
भाग -९>>
भाग -१०>>

नुकतीच हवाई ची ट्रिप झाली...
प्रवास वर्णन लिहिण्याचा बेत नाहीये, काळजी नसावी! Happy पण तिथे बर्याच स्थळांशी, रस्त्यांशी, झाडांशी , पानांशी निगडीत खूपशा स्थानिक आख्यायिका, छोट्या छोट्या लोककथा तुकड्या तुकड्यात ऐकायला, वाचायला मिळाल्या. मी तरी या कथा, ही पात्रं कधीच ऐकली नव्हती त्यामुळे या कथा मला इन्टरेस्टिंग वाटल्या आणि विसरुन जायच्या आधी लिहून इथे सगळ्यांशी शेअर कराव्या असं ठरवलं. बघा तुम्हाला कशा वाटतायत!

एक डिस्क्लेमर द्यायलाच हवा- मी तिथे पर्यटक म्हणून काहीच दिवसांसाठी गेले होते. माझा इतिहासाचा अभ्यास वगैरे नाही. टूर गाइड कडून, वेगवेगळ्या माहितीपत्रकांमधून, पर्यटन स्थळांच्या , म्युझियम्स वगैरेच्या बाहेरच्या पाट्या वाचून आणि काही संदर्भ इन्टरनेट वरून वाचून जमवलेली ही माहिती आहे. तेव्हा तपशीलात चुका असू शकतील. शिवाय नावा - गावांच्या उच्चारातही गडबड असू शकते. कुणाला अधिक माहिती असल्यास जरूर दुरुस्त करा!

पार्श्वभूमी:
h1.jpg

हवाई आता अमेरिकेचे ५० वे राज्य आहे. कमर्शियल टूरिस्ट स्पॉट आहेच. पण अमेरिकन संस्कृतीला आपलंसं करण्याआधीचा हवाई बेटांचा इतिहास बराच दूरवर जातो.

हवाई बेटे हा जागृत ज्वालामुखीचा प्रदेश. वारंवार होणार्‍या उद्रेकात लाव्हाचे लोट च्या लोट उसळतात आणि वाटेत येईल त्या प्रत्येक गोष्टीला होत्याचे नव्हते करतात. दुसर्‍या बाजूला याच बेटांवर मोठे डोंगर, पर्वत, नद्या, धबधबे आणि घनदाट पर्जन्यवनेही आहेत.

इथे मानवाचे पाऊल पडले ते म्हणजे सुमारे १५०० वर्षांपूर्वी! असे मानले जाते की पॅसिफिक मधल्या मार्किसस (मार्कीसा?) बेटवरून काही लोक कामचलाऊ होड्यांमधून हवाईला येऊन थडकले. ते इथे का आले याची कारणे नक्की माहिती नाहीत. कदाचित त्यांच्या बेटावर लोकसंख्येमुळे अन्नपदार्थ कमी पडत असतील म्हणून नविन प्रदेश शोधायला निघाले असावेत ? किंवा टोळीयुद्ध अथवा तत्सम कारणाने त्यांना त्यांचं बेट सोडायला भाग पडलं असू शकेल, किंवा साहस म्हणूनही असेल! हे लोक संख्येने फार नव्हते आणि मागासलेले (अप्रगत) होते. त्यांनी येताना कोंबड्या , डुकरे, भाज्या, कंद , फळे असे थोडेफार आणले होते. या बेटांवर तेव्हा खाण्यालायक काहीच नव्हते. अनिश्चित हवामान, प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत हे आदिवासी तरले, जगले हेच विशेष! या लोकांनी तिथे ब्रेडफ्रूट, नारळ, टारो (अळू सारखे कंद) याची लागवड केली. भाले, गळ वापरून मासेमारीही करायचे.
या नंतर बर्‍याच वर्षांनी ताहितीयन लोक इथे आले. कालांतराने जपान, फिलिपाइन्स इ. ठिकाणांवरूनही माणसे इथे स्थलांतरित झाली. हे सर्व लोक येताना आपापले देव, धर्म, चालीरिती, प्रथा घेऊन आले. त्यामुळे इथल्या लोककथांमधे वेगवेगळ्या संस्कृतींचे मिश्रण आढळते.

ताहितीयन लोकांनी इथे थोड्याफार प्रमाणात समाजव्यवस्था अस्तित्वात आणली, जी बराच काळ इथल्या समाजव्यवस्थेचा कणा होती. टोळीचा राजा (अलिइ), प्रिस्ट/ धर्मगुरु आणि सर्वसामान्य लोक असे सामाजिक थर. त्यांचे कायदे- म्हणजे त्यांना असलेले अधिकार आणि मनाई असलेल्या गोष्टी ठरलेल्या असत - त्याला "कापु पद्धत" असे नाव होते. अर्थात जगात कोठेही असते त्याप्रमाणे राजे आणि धर्मगुरु यांनाच काय ते अधिकार! विशेषतः राजाला अमर्याद अधिकार असत, एका इशार्‍यावर लोकांच्या जीवन मरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्याला असे. सामान्य लोकांनी मात्र "काय करायचे नाही" याचीच यादी लांब! समाजाच्या नियमांना "कापु" असं नाव असलं तरी बहुतेकदा "एखादी गोष्ट करण्यास मनाई" अशाच अर्थाने कापु हा शब्द पहायला मिळतो. सामान्यांना "कापु" असलेल्या गोष्टी पाहिल्या तर अवाक व्हायला होईलः
-अलिइच्या वाटेत येणे / दृष्टीस पडणे
-अलिइच्या पेक्षा उंच मानेने चालणे(!)
-अलिइच्या वाटेत/ त्याच्या मालकीच्या कोणत्याही गोष्टीवर आपली सावली पाडणे
-अलिइ बोलत असताना मधे बोलणे
-लाल अथवा पिवळी पिसं आभूषणात वापरणे (ती महत्त्वाच्या /राजघराण्यातील व्यक्तींसाठी राखीव असत!)

हे वरचे काही कापु होऊ नयेत म्हणून व्यवस्थाही असे. म्हणजे अलिइ एखाद्या वाटेने येणार असेल तर त्याच्यापुढे आधी त्याचे सेवक शंख फुंकून इतरांना सावध करत. तो आवाज ऐकला की सामान्य लोकांनी अ‍ॅम्ब्युलन्स येत असल्याप्रमाणे बाजूला व्हायचं आणि डोक्यामागे हात घेऊन जमिनीवर पालथे झोपायचे!!

hw2.jpg
हे एक त्यासंबंधीचे म्यूरल एका म्यूझियम मधले.

काही लॉजिकल कापुही होते - जसे ठराविक ठिकाणी मासेमारी करण्यास ठराविक काळ कापु, (उदा. माशांच्या विणीच्या काळात), ठराविक झाडे तोडण्यास कापु वगैरे.
स्त्रियांसाठी वेगळे कापु होते!
त्यांनी केव्हा कुठे किती जेवावं, याचे कडक नियम होते. काही पदार्थ खायला कापु, नवर्‍याच्या जेवणाच्या भांडयात आपले जेवण बनवण्यास कापु, नवरा जेवताना त्या खोलीत जायला कापु, शिवाय सामान्यांना असलेले बाकीचे कापु पण त्यांना होतेच! एकुणात काय बायकांना नुस्ते कापुच कापु!! Happy

या कापु असलेल्या गोष्टींचं अनवधानाने किंवा मुद्दाम उल्लंघन झाल्यास शिक्षा एकच! भयंकर प्रकारे मृत्यू ! कधी जाळून कधी दगडांनी ठेचून तर कधी पाण्यात बुडवून. टोळीचे "कापु अधिकारी" असत , ते त्या त्या गुन्हेगाराला शोधून काढून अत्यन्त निर्दयपणे शिक्षेची अंमलबजावणी करत. सुनावणी नाही की साक्षी पुरावे नाहीत!! या कापु पद्धतीच्या सहाय्याने टोळीचे राजे त्यांची सत्ता, दहशत राखून असायचे आणि त्यांच्या दृष्टीने त्यांच्या टोळीत सुव्यवस्थाही. लोकांनाही ते मान्य असे कारण त्यांच्या मते हे कापु देवांनीच बनवले होते आणि ते मोडल्याने देवाचा कोप होणारच अशी समजूत होती.
इतकेच नव्हे तर आपल्या हातून कापुचे उल्लंघन झाले आहे असे समजताच ती व्यक्ती काही वेळा स्वतःच आत्महत्याही करायची!
या शिक्षेतून मुक्ती देण्याचा अधिकार एक अलिइला होता किंवा अजून एक विचित्र मार्ग होता. प्रत्येक गावात किंवा मुलखात एक पुऊहोनुआ " Pu'uhonua " (आश्रय मंदीर) असायचं. कापुचा भंग झाल्यावर कापु अधिकारी तुमच्यापर्यन्त पोहोचायच्या आत जर तुम्ही या मंदिरापर्यन्त पोहोचलात (जे अजिबात सोपं नसायचं) तर तुमची शिक्षा माफ! तिथे रक्तपाताला मनाई होती! या मंदिरात माफीची प्रार्थना करून तुम्हाला परत समाजात मिसळता यायचं!
puuhanou.jpg
एका आश्रयमंदिराची प्रतिकृती : Place Of Refuge - Big Island
watchers.jpg
मंदिराचे राखणदार!

तर असा एकूण हा समाज. ही पार्श्वभूमी मुद्दाम लिहिली, पुढे मी ज्या लोककथा लिहीन म्हणतेय त्या यामुळे जास्त चांगल्या रिलेट करता येतील अशी आशा आहे.

या समाजांच्या देव देवता निसर्गाच्या वेगवेगळ्या रुपात होत्या. जसे समुद्राचा देव, पिकांचा देव, ज्वालामुखीचा देव, निर्मिती करणारा देव, रक्षण करणारा देव , विनाशाचा देव वगैरे. हे देव एकदम शक्तिशाली पण तरीही मानवी भाव भावना असलेले असायचे. थोडे फार आपल्या देवांसारखेच. त्यांच्या संदर्भातल्या आणि दंतकथा नंतरच्या भागात.

--क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हवाईचे फोटो पुष्कळ पाहिले आहेत आत्तापर्यंत पण हे सगळे वर्णन आज पहिल्यांदाच वाचले. वर्णन आणि त्यानंतर फोटोज बघायला फारच आवडले ! शीर्षकही एकदम मस्त. हवाईयन सुरस आणि चमत्कारिक गोष्टी Happy

खूप इंटरेस्टिंग होणार ही सिरीज...पुढचा भाग लवकर लिही.

छान लेख!
हवाई बेटे एका वेगळ्याच नजरेतून पहायला मिळणार.

पुढिल लेखांच्या प्रतिक्षेत.

मस्तं आहे.

जमल्यास तिकडून

आयसी लुसी, युसी लुसी, हसी तुसी, लस्सी पिसी
आणि
राप चिकी लाकी चिकी लाकी चिकी चू

चा नेमका अर्थ काढून आणा लहानपणासून नेमका अर्थच कळंत नाहीये जाम. Proud

हवाई बेटे ही पॉलिनेशिया त्रिकोणाचे एक टोक आहेत. त्याची उरलेली दोन टोके म्हणजे न्युझीलँड आणि इस्टर बेटे. ही माहिती महत्त्वाची कारण हवाई मधले मुळचे रहिवासी हे पॉलिनेशियन वंशाचे लोक जे नौकानयनात पारंगत होते. या बद्दल बर्‍याच थेअर्‍या आहेत - यातला अभ्यास असणारे अजून सविस्तर व खात्रीशीर माहिती सांगू शकतील

टण्या, बरोबर आहे. मार्कीसस बेटेही त्या त्रिकोणातच येतात. तिथले लोक नौकानयन करत असले तरी त्यात फार प्रगत वगैरे नसावेत, कारण हवाईचे पहिले रहिवासी तिथे कनूसारख्या लहान बोटींमधून आले असे मानले जाते. अर्थात मी तज्ज्ञ नाही. नक्की कल्पना नाही.
आज संध्याकाळी पुढची गोष्ट टाकते.

खूपच रंजक माहिती व त्याचबरोबर तिथली समाजव्यवस्था व्यथित करणारी !
<< एकुणात काय बायकांना नुस्ते कापुच कापु!! >> डोमा: Sad
<< यातला अभ्यास असणारे अजून सविस्तर व खात्रीशीर माहिती सांगू शकतील >> फार पूर्वीं जेमस मिशनेर [ कीं मिचनेर ?] यांची 'हवाई' ही कादंबरी वाचली होती. अत्यंत अभ्यासपूर्वक लिहीलेली ही 'पुलित्झर प्राईझ विनींग' महा-कादंबरी आहे. तिथल्या तीन पिढ्यांभोंवती गुंफलेल्या रंजक कथानकातून हवाई बेटांचा इतिहास, भूगोल व संस्कृति यांची चांगलीच ओळख होते. युरोपातून पहिले ख्रिश्चन मिशनरी हवाई बेटांवर जातात तेंव्हाचा गलबतातील त्यांच्या प्रवासाचं, 'हवाई'हून परतणार्‍या गलबतातून त्याना मिळालेल्या व प्रथमच पाहिलेल्या 'केळी' ह्या फळाबाबतच्या त्यांच्या प्रतिक्रियांचं वर्णन मला अजूनही स्पष्ट आठवतंय !

वाह!! मस्तं रोचक सुरुवात..
हवाई ला काही दिवस राहिल्यावर रिटायर व्हायला उत्तम जागा आहे असचं ठरवलं होतं.. ऑल डे हॉलिडे.. Happy

वॉव... आता या सीरीज च्या निमित्ता ने तेथील लोककथा, आख्यायिका ही वाचायला मिळतील..

Pages