नागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)

Submitted by रसप on 30 April, 2016 - 04:08

'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.

Sairat.jpg

'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.

इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.

'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.

'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.

नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अ‍ॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !

'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नागराजने वेगवेगळ्या मुलाखतीत असं म्हटलंय की

मुलं ही पालकांची मालमत्ता नाही हे अनेकांना माहीत नाही. मूल एक स्वतंत्र व्यक्तीमत्व असतं. त्याला त्याचे निर्णय घेण्यासाठी सक्षंम करणे हे पालकत्व आहे. सक्षमीकरणासाठी त्याला योग्य ते संस्कार द्यावे लागतात. त्यासाठी स्वतःमधे बदल घडवून आणावे लागतात. मुलांवर निर्णय लादणे हे पालकत्व अशा समजुतीतून अनिष्ट रूढींचा जन्म होतो.

सिनेमात या दृष्टीने सुरूवातीपासून भाष्य केलं आहे. परश्यावर पण पुरूषप्रधान संस्कार झालेच आहेत. आपली बायको ही आपली मालमत्ता आहे, तिने कुणाशी बोलल्याने अस्वस्थ होणारा , धुमसणारा परश्यातला पुरूष हे नागराज ने दाखवलं. त्याला आर्ची जुमानत नाही आणि घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. स्त्रीने असं खंबीर रहायला हवं ही अपेक्षा यात दिसते.

अर्थात सिनेमा प्रत्येकाला वेगवेगळा दिसू शकतो.

यात कोणीही सरळ बुद्धीचा माणूस उदात्तीकरण शोधणार नाही.>>>>>

बरोबर विलभ, पण आपले लोकांच्या मूर्खपणा ला काही सीमा आहे का ?

हे बघा काही व्हाट्सअप फॉरवर्डस......


सैराट बघितल्या वर पुन्हा एकदा सिद्ध झाल
.
.
.
.
.
.
.
.
.
पाटलांकड चुकीला माफी नाही

२.
गुरूजी: मुलानो सैराट बगुन काय शिकलात?

मुले: पाटलाच्या नादि नाहि लागायचे.

ऋन्मेष, धागा चाईल्ड केअर कडे वळवू नकोस, इथले लोक 'एका लहान मुलाची रियल प्रतीक्रिया काय असू शकली असती' यावर बोलत आहेत, 'काय असावी' यावर नाही. Happy
पण एका इतक्या लहान मुलाकडून अभिनय कसा करुन घेणार हा मुद्दाही बरोबर.

देवकी माझी रिअ‍ॅक्शन त्या बाई सारखीच आहे Happy

(विचार अतीस्वार्थी,कॅलक्युलेटेड्,मनी माईंडेड वाटतील पण लग्नानंतर आयुष्याची किमान ४५-५० वर्षे त्या आयुष्यात काढायची असल्याने कोणत्याही मुलीचं लग्न हा आधीच्या आयुष्यापेक्षा अपग्रेड(निव्वळ पैसे नाही,शहर्,प्रेमळ माणसे,क्वालिटी ऑफ लाईफ या दृष्टीने.यात 'जात' हा मुद्दा अजिबात धरत नाहीये, कारण अगदी सारख्या जाती पोटजातीत करुन पण मुलीला संकटात टाकणारी लग्नं पाहिली नाहेत.)) असावा असं वाटतं. फ्रेंडस मध्ये जोई म्हणतो तसं 'आय वॉज अ सोप ऑपेरा स्टार, नाऊ आय अ‍ॅम अ वेटर, आय वॉज सपोझ्ड टु गो द रिव्हर्स वे' तसं काहीसं.
स्वतःच्या हिंमतीवर स्वतःच्या आर्थिक आणि इतर परिस्थिती चांगली नसलेल्या लग्नाला 'अपग्रेड' बनवणार्‍या कर्तबगार मुली पाहिल्या आहेत, पण सगळ्या मुली तशा नसतात.

जे प्रेम डिसक्लोज झाल्या झाल्या लोक जीवावर उठतील असं प्रेम करायचंच कशाला?अगदी 'प्यार वक्त नही देखता' म्हटलं तरी 'आपण स्वतःचा संसार उभा करण्याइतके कमावतो का' हा मुद्दा पहायला नको का?

देवकी तुमच्या मैत्रिणीची प्रतिक्रिया या असल्या प्रतिक्रिया पेक्षा तरी बरी आहे.

मी_अनु माझा हा प्रतिसाद चुकून तुमच्या प्रतिसादानंतर आला. तो तुम्हाला उद्देशून नाही मी लिहिलेल्या व्हाट्सअँप फॉरवर्ड विषयी आहे.

गैरसमज नसावा

अतरंगी मला ते माझ्या प्रतीक्रिये बद्दलच वाटले, माझ्या प्रतीक्रियेलाही अशी तीव्र रिअ‍ॅक्शन मनात येऊ शकते कारण ते शुद्ध 'लग्न म्हणजे चांगलं आयुष्य मिळवण्याची जॉब अपॉर्च्युनिटी' असे स्वार्थी विचार आहेत.पण तुम्ही स्पष्टीकरण दिल्याने बरे वाटले Happy

.

देवकी, अशांच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे. मुळात दोन्ही बाजूंनी समजुतदारपणे घेतल्यास मुलांना असे परक्या गावात पळून जायची गरजच भासणार नाही. चित्रगंधा/मी_अनु , मुळात घरातून योग्य समजूत मिळाली, तर प्रेम असूनही त्यांना आपापल्या वाटेवर प्रगती करता येइलच की. नवलाईचे चार दिवस संपले, की स्वतःच्या पायावर उभे राहायचे भान त्यांना येइलच की. त्यासाठी कुटुंबाकडून प्रेमाला विरोध का?
निव्वळ मनमोकळ्या चर्चेने असे तिढे सहज सुटतील, उगाच विरोध करून त्यांची मने मारणे कितपत योग्य?

एका इतक्या लहान मुलाकडून अभिनय कसा करुन घेणार >>

मी प्रतिसाद लिहीला तेव्हा माझा म्हणण्याचा अर्थ इतकाच होता की बाकी आख्खा क्लायमॅक्स परफेक्ट असतांना ते रडणे नॅचरल वाटत नाही. नुसतं भोकाड पसरलं असतं तरी चाललं असतं पण ते मोठ्या माणसांसारखं तोंडावर हात नेणं, बाकी हावभाव जरा अति वाटले. तो जो "अभिनय करून घेतला" आहे तो नॅचरल नाहीये हे ठळक जाणवतं.

असो. तो बाकी सिनेमाच्या मानाने हा काही फार मोठा मुद्दा नाही.

ज्यांच्या घरचे इतके कट्टर आहेत, ज्यांना मुलीमुलीचा जीव जाणे/स्वतःवर गुन्हेगारी कारवाई हे सर्व चालवून घेऊन पण प्रतिष्ठेपायी मुडदे पाडायचेत त्यांच्या मुलांनी तरी प्रेमात पडण्या आधी 'काही नडलंय का' हा विचार नक्की करावा.

त्यांना जे तरुन वयात त्यांच्या आई-वडिलांनी मिळू दिलेले नसते त्याचा बदला ते मुलांकडुन असा घेतात आम्ही प्रेम केले नही आई वडिलांच्या इच्छेने लग्न केले तुम्ही ही तेच करा.
मुलांनी आई-वडिलांच्या विरोधात निर्णय घेणे सहन होत नाही आमच्या शिवाय मुलांनी निर्णय घेतला याने अंहकार दुखावला जातो.

आर्चि ला थोडीच माहिती असत तिच्या घरचे एवढे खुनशी आहेत. त्यांचा विरोध आहे लग्नाला आणि तो स्वाभाविक आहे. तिच्या मैत्रीणीशी बोलतानाही ती वडील किती प्रेमळ आहेत याचेच कौतुक करते.
आपल्या घरचे बाकी दुनियेशी कितीही वाईट वागले तरी आपण त्यांच्या रक्ताचे आहोत आपल्या चुका ते पोटात घेतील अशी आशा प्रत्येक मुलाला वाटत असते. पण काही पालकांना तसे वाटत नाही हे दुर्दैवाने सत्य आहे

ना मुलीमुलीचा जीव जाणे/स्वतःवर गुन्हेगारी कारवाई हे सर्व चालवून घेऊन पण प्रतिष्ठेपायी मुडदे पाडायचेत त्यांच्या मुलांनी तरी प्रेमात पडण्या आधी 'काही नडलंय का' हा विचार नक्की करावा.>> पण अशा माघारीने कट्टर मनोवृत्ती कधीच मागे हटायच्या नाहीत. उदाहरण थोडे वेगळे आहे, पण विचार करा, असाच जीवाचा विचार करून सावित्रीबाई अन महात्मा फुलेंनी आपला स्त्रीशिक्षणाचा मार्ग सोडला असता तर ?
बाबासाहेबांच्या या शोधनिबंधात अशा भेदांवर "आंतरजातीय विवाह" हा एक जालीम उपाय सांगितला आहे. केवळ त्यांनीच नव्हे तर इतरही अनेक सुधारकांनी अशा विवाहांचा हिरीरीने पुरस्कार केलाय. कित्येकांनी तर ठरवून स्वतः असे विवाह केले आहेत.
आपल्यापैकी सगळ्यांनाच असे करणे शक्य नसले, तरी आपल्याकडून अशा विचारांना थारा मिळणार नाही इतके झाले, तरी बरेच साध्य होईल.

अन तसही खरोखर प्रेमात पडलेली जोडपी मृत्यूचा विचार करून मागे हटतील, अशी उदाहरणे कमीच आहेत.

विलभ मला तुमचे आणि अनु यांचे दोघांचेही म्हणणे पटते आहे. खरं यामध्ये कायदा-सुव्यवस्था हा कळीचा मुद्दा आहे. चित्रपटात शेवट खूप परिणामकारक आहे हे मान्य. पण कदाचित आर्चीच्या फॅमिलीची या गुन्ह्यामुळे पार वाताहत होते आणि प्रिन्सला फाशी होते असं काही दाखवलं असतं तर अजून क्लिअर मेसेज गेला असता का?

अरेरे किती फालतु युक्तीवाद चालू आहेत.

कुणाला प्रेम कसे होते वगैरे बेसिक मध्ये लोचा आहे. Proud

मुळात प्रेम मला तरी वाटत नाही "सांगून येते " असे. बस हो जाता है.
इथे गोची आहे पालकांच्या समज आणि वैचारीकतेची.

अडनिड्या वयात प्रेम हे होणारच हे पालक समजत वा समजोइन घेत नाहेत.
मुले चुकीचे निर्णय घेवू शकतात, हरकत नाही. पण त्यांना मार्ग पालकांनीच दाखवावा ना? पालक तर वाढलेले असतात ना वयाने तरी?( हो , वयाचा आणि अक्कलेचा सबंध नाही हेच खरे. )
शेवटी पालक सुद्धा चुकीचेच मार्ग निवडातातच ना मग तसेच हे.
पण़ जर विश्वासात घेवून समज दिली वास्तवतेची तर होतात बदल. कमीत कमी नुकसान होवु शकते दोन्ही बाजूंचे.
आमची एक आजी म्हणायची की , रस्त्यावरची कुत्री मांजरी पण जन्म देतात तसेच माणसं सुद्धा देतात पण पालक होतातच असे नाही हेच खरे.( ह्याचा जमल्यास योग्य अर्थ काढावा, नाहितर सोडून द्यावं).

प्रेमभावनेत जर निर्णय अयोग्य असेल तर मारून मुटकून थोडी कोणी समजतं? कोणालाच वाटत नसतं की आपले आई वडील क्रूर होतील. रागवणे , नापसंती असू शकणे इतवरच अंदाज असतो.

पळून जाणारी मुलं बेजबाबदार नसतातही नेहमीच पण पालकच संवाद साधत नाहीत. पर्याय ठेवत नाहित तेव्हाच हे प्रकार झालेले आढळतात असे निरिक्षण आहे.
राहता राहता , लहान मुलाची प्रतिक्रिया..

सुरक्षित वातावरणात वाढलेले मुल कधीही कुठल्या अचानक नजरेसमोर आलेल्या , कधीच न अनुभवलेल्या क्षणाला अशी प्रतिक्रिया देवू शकते.
अगदी प्रचंड गर्दी ना पाहिलेले मुल गोंगाटाला घाबरते ते ह्याच कारणासाठी की हे नवीन आहे....
एक प्रसंग आठवतोय मला माझाच जेव्हा माझी मुलगी दीड एक वर्षाची होती व अचानक झोपेतून उठून किचन मध्ये आली मला शोधत तर मी नेमके तेव्हाच कापलेले भळभळलेले बोट घेवून हळद थापत होते. माझे बोट कापलेले पाहून मी रडालेच नाही, ओरडलेच नाही पण अचानक माझे रक्त पाहून तिने भोकाड पसरलेले. मी मुद्दम हसले की अग काही नाही झाले व जवळ घेतले. तेव्हा ती हसली मी हसताना पाहून.

नाही मला नाही असे वाटत. उलट योग्य जागी चित्रपट संपला आहे. त्या गुन्ह्याबद्दल समाज काय शिक्षा देतो यापेक्षा खडकावर जिद्दीने उगवलेले रोपटे, एक हसता-खेळता संसार केवळ अहंकाराच्या मस्तीपायी खुडून टाकला जातो, त्याची जी बोच आहे ती जास्त प्रभावी आहे.

ज्या नोटवर सगळे थिएटर हळहळते, तिथेच सिनेमा संपला नाही आणि पुढे न्यायालय, प्रिन्सला शिक्षा वगैरे दाखवत बसले असते तर सगळा इम्पॅक्टच निघून गेला असता.

त्यापेक्षा ते क्रौर्य किती अनाठायी होते याचा विचार करतच प्रत्येकजण घरी जातो.

स्वता:हा नागराज मंजुळे ची दुसरी पत्नी गार्गी कुलकर्णि ब्राम्हण आहे असे फेबु वर वाचले आहे खरे खोटे फेबु जाणे.>>>>>>>>>

खर आहे का?
लिंक द्या,,

आशुचॅम्प आणि झंम्पी +१

दोघांच्याही पोस्ट पटल्या.

सावरकर सुद्धा रोटी आणि बेटी व्यवहाराचे पुरस्कर्ते होते.

मुले घरातून पळून का जातात ? पालक त्यांची विचारसरणी समाजाच्या भीतीने मुलांवर लादतात म्हणूनच ना?

माझा मुलगा/मुलगी पौगंडावस्थेत कोणत्याही धर्माच्या/ जातीच्या मुलामुलींच्या प्रेमात पडले तरी मी त्यांना फक्त इतकेच सांगेन कि बाळांनो शिक्षण घ्या, स्वतःच्या पायावर उभे रहा आणि मग निवांत तुम्हाला हवे तसे हवे तेव्हा लग्न करा.
हे इतके साधे सरळ आणि सोप्पे असायला हवे.
पण त्यात समाज काय म्हणेल, लडकी खानदान कि इज्जत, वगैरे वगैरे आणले कि समस्या निर्माण होतात.

माझा मुलगा/मुलगी पौगंडावस्थेत कोणत्याही धर्माच्या/ जातीच्या मुलामुलींच्या प्रेमात पडले तरी मी त्यांना फक्त इतकेच सांगेन कि बाळांनो शिक्षण घ्या, स्वतःच्या पायावर उभे रहा आणि मग निवांत तुम्हाला हवे तसे हवे तेव्हा लग्न करा.
हे इतके साधे सरळ आणि सोप्पे असायला हवे.

एकदम सहमत!!

Pages