नागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)

Submitted by रसप on 30 April, 2016 - 04:08

'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.

Sairat.jpg

'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.

इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.

'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.

'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.

नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अ‍ॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !

'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नागराजला आर्ट फिल्म्स बनवायच्या असतील तर त्या त्याने स्वतःच्या खर्चाने बनवाव्यात. झी सारख्या व्यावसायिक संस्थेची निर्मिती असेल, त्यांच फायनान्स हवा असेल तर त्यांचे पैसे भरून निघतील अशी तडजोड करायला हवी. त्याला नकार असेल तर दुसरा निर्माता पहावा.

फॅण्ड्रीच्या वेळेस त्याने स्वतःच कर्ज वगैरे काढून सिनेमा बनवला . मग त्याला फायनान्सर मिळाला. पुढे अ‍ॅवॉर्ड्स वगैरे मिळून बहुचर्चित झाल्यानंतर झी ने तो टीव्हीवर प्रदर्शित करण्यासाठी विकत घेतला. पण नंतर सिनेगृहात रिलीज करण्याचा धाडसी निर्णय झी ने घेतला. या सिनेमाला खूपच कमी खर्च आलेला होता. कुठल्याही कलाकाराने मानधन घेतलेलं नव्हतं. सैराट मधेही नवेच सारे असल्याने तिथे बचत झाली. त्यामुळे झी अजय अतुल वर खर्च करू शकत होते. त्यामुळे हॉलीवूडला जाऊन केलेलं रेकॉर्डिंग वगैरे जमलं.

झी चं पाठबळ नसतं तर हा सिनेमा ज्या पद्धतीने रिलीज झाला तशा पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असता का ?

आज बातमी वाचली, अर्चना . म्हणजेच रिंकू .. नववीत आहे. ८१ टक्के मार्क मिळवलेत. सरांसोबतचा आणि शाळेच्या गणवेषातला फोटो आलाय तिचा. !! छान वाटलं.
शिक्षण व्यवस्थित पुर्ण करून, अभिनयाचेही शिक्षण घ्यावे तिने. येतील त्या ऑफर स्वीकारु नयेत, असे वाटते.

अवांतर आहे म्हणा....

ती वरची लिंक निदान क्लिक करुन उघडायला लागतेय पण रसपंनी त्यांच्या परीक्षणातच शेवट काय असेल ह्याची स्पष्ट कल्पना दिलेली आहे !!!
त्यामुळे शेवट बघून धक्का बसेल असं आता अजिबात होणार नाही.

आता मी चित्रपट पाहायला जाणार आहे तो केवळ दोन कारणांसाठी. पहिलं कारण म्हणजे नागराज मंजुळे. त्यांनी जी गोष्ट सांगितली आहे ( जी आता तुकड्यातुकड्यांतून कळलीच आहे. त्यात दोष माझाच आहे कारण चित्रपटाविषयी जे लिहून येतंय ते वाचण्याचा मोह मला आवरत नाहीये. ), ती त्यांनी कशा पद्धतीने सांगितली आहे हे बघण्यासाठी ! कथा काय आहे ह्यापेक्षाही जास्त ती कशी खुलवलीय हे जास्त महत्त्वाचं. ह्या सिनेमाने आर्ट आणि कमर्शियल सिनेमा एकत्र आणून नवीन पायंडा पाडलाय असंही वाचलं.
दुसरं म्हणजे लोकांवर अक्षरशः गारुड झालेलं दिसतंय ह्या सिनेमाचं. हिंजवडीच्या थिएटरमध्ये आजच्या तेरा वरुन उद्याच्या शोजची संख्या अठरावर केलीय ! हे खूप विलक्षण वाटतंय आणि ह्या 'क्लासिक इन द मेकिंग' चं आपण साक्षीदार असलं पाहिजे असं वाटतंय.

आपण एक काम करून सगळ्या जातींचे धर्मांचे समांतर सेन्सोर बोर्ड बनवू तसच थोडे हुशार लोक आहेत त्यांचा पण सेन्सोर बोर्ड बनवू आणी सिनेमा तयार करायच्या आधी या बोर्ड्स ची परवानगी मिळवायची कुठल्याही जातीवर, नावावर, पत्रावर या बोर्डाचा आक्षेप असेल तर दिग्दर्शकाला आणि लेखकाला कथा बदलावी लगेल सगळ्यांमध्ये एकमत झाले कि मग निर्मात्याने चित्रपट निर्मिती करायला सुरुवात करायची. चित्रपट बनवून झाला कि सुद्धा परत ह्या बोर्डाकडे पाठवायचा ह्यांनी पास केला कि मग भारताच्या सेन्सोर बोर्ड कडे पाठवायचा.

मायबोलीवर लोकांना खूप वेळ असतो आचरट कमेंट्स टाकायला एवढी एकमेकात मारामारी कायची तर समोरासमोर भिडा आणी काय ……. ती ….
ज्यांना गाळलेल्या जागा भरायची खूप हौस असल त्यांनी भरत बसा बाकी रसप तुमचा परीक्षण छान

हिम्सकूल

आज अनेक पालथ्या घड्यांशी सामना झाल्याने समजावून सांगण्याची माझी क्षमता संपली होती. त्यातून मोबाईल !

याच बाफवर कथा फोडणे आवडत नसल्याचे नमूद केलेले आहे , तर कथा कशाला फोडेन ? बातमीवरून कथेचा पत्ता लागतो असे तर्क बांधणारे आणि त्याळा अनुमोदन वगैरे देणारे असे लोक जर सदस्यत्वाचा निर्णय घेणा-या समितीत असतील तर संपलंच सारं. इथल्या काहींनी झी च्या लिंकचं कौतुक केलेलं आहे आणि त्यातल्या बातमीशी संबंधित लिंक दिली म्हणून सिनेमाची कथा फोडली असे आरोप करून स्वतःच सिनेमाची कथा काय असावी हे सांगून टाकलेले आहे. कुणावरही भन्नाट आरोप करण्यापूर्वी स्वतःचे आकलन योग्य आहे कि नाही हे त्रयस्थ इसमाकडून तपासून पहायला हरकत नाही.

ही बातमी वाचल्याने सिनेमाची कथा अशीच आहे असं मी म्हणतोय असा तर्क सिनेमा न पाहीलेले कसे बांधू शकतील ? त्यातून मी सिनेमा पाहीलेला नाही. उद्याच्या शो ची तिकीटे काढलेली आहेत असेही म्हटलेले आहे. हिम्सकूल ने योग्य शब्दात समजावून सांगैतलेले असूनही योग्य ते संपादन क करण्याचा दुराग्रह बाळगण्याला माझं तरी ऑब्जेक्शन नाही. कुणी काय करावं हा माझा प्रश्न नाही.

स्वतःच्या हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे इतरांवर आरोप होऊ नयेत एव्हढीच माफक अपेक्षा. बाकी पूर्वग्रह वगैरे बद्दल बोलून काही फायदा होईल असे वाटत नाही.

+१ mandard
सैराट काय सस्पेंस थ्रिलर आहे का? कपोचेंनी काय स्टोरी उघड केली? एकूण कल्पना रिव्ह्यूज वाचून आणि चर्चा वाचून येतेच. मला काही स्टोरी उघड केली वगैरे वाटत नाही. उगाच काय सगळे कपोचेंना टार्गेट करताय?

हिरीरीने बाजु मांडण्यापेक्षा दोन्ही बाजुकडील किती जणांनी हा चित्रपट कोरी पाटी घेउन पाहीला ते प्रामाणिकपणे सांगितले पाहीजे...
सैराट..... Love marriage केलेल्या सगळ्यांना जुने दिवस विषेशतः "प्रेम" हे "प्रकरण" असण्याच्या दिवसांची आठवण नक्कीच करुन देइल..... बाकी जातीभेद,वर्गभेद हा वैयक्तिक अनुभव आणि कुठल्या विचारांचे चश्मे लावुन आपण वावरतो त्यावर अवलंबून असणार...

रश्मी.. | 2 May, 2016 - 18:02 नवीन
रसप तुमचे पण परीक्षण छान आहे. पण मला वाटत की नागराज मंजुळे कडुन तुम्ही जी अपेक्षा ठेवताय ती वेगळी आहे. तुम्हाला असे म्हणायचे आहे का की नागराज हा ( सॉरी एकेरी उल्लेखाबद्दल) नसीरुद्दीन शहा आहे, आणी त्याने या वेळेस उत्तम दर्जाची आर्ट फिल्म ( उदा. स्पर्श, आक्रोश वगैरे) करण्याऐवजी चक्क त्रिदेव मध्ये जान ओतली आहे?

>>

हो.
हेच बनवायचं होतं तर नागराज मंजुळे आवश्यक नव्हता, असं माझं मत आहे आणि ते मी लेखातही मांडलं आहेच.

काल सैराट पाहिला , त्याच्याबद्दल आधीच सोशल मिडीयातून बरे वाईट ऐकले होते, पण स्चःता बघितल्याशिवाय कुठेही चर्चा करायची नाही तसेच आलेल्या पोस्ट पुढे पाठवायच्या नाहीत असेच ठरविले होते.

चित्रपट अत्यंत सूंदर आहे, सिनेमागृहातच पाहण्यासारखा. मुळात यात चूकीचे काहीही दाखविलेले नाही. नायक नायिकांचे प्रेम हे त्यांच्या सज्ञान वयातच दाखविले आहे, घर सोडून पळून गेल्यानंतर होणा-या हाल अपेष्टांच अत्यंत वास्तव चित्रण मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे, अजय अतूल सारखे दिग्गज आपल्या गाण्यांच्या जादूनी अक्षरशा सिनेमागृहातच लहान मुलांनाही नाचायला लावतात. मित्रांसाठी जीवावर उदार होणारी मैत्रीही दाखविली आहे ,आणि परशा आर्ची अभियनात कुठेही मार खात नाही , . चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे यात कॉमेडी,अ‍ॅक्शन,रोमान्स,आणि वास्तव या सर्वच गोष्टी एकत्र पहायला मिळतात.

सैराट बघून वैराट होवू नका अशा आशयाची एक पोस्ट चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच काही अल्पबुद्धी किंवा बुध्धीहीनाकडून फिरविण्यात आली होती, चित्रपट न पाहताच त्यावर असा रोष कसाकाय लिहू शकतात लोक हेच कळत नाही.
हॅट्स ऑफ टू - सर्वच टीम ,नागराज मंजूळे आणि अजय अतूल , नक्कीच पहा एक अप्रतिम चित्रपट "सैराट"

>> चित्रपट न पाहताच त्यावर असा रोष कसाकाय लिहू शकतात लोक?

कारण त्यांचा वेगळाच अजेंडा असतो. तात्या, महेश, आदित्यनाथ७१ इत्यादी कट्टर कट्टेकरी लोकांचा विरोधाचा सुर हा योगायोग वाटतो का तुम्हाला? सनव यांचा सन्माननिय अपवाद.

This is ultimate joke on whatsapp (‪#‎सैराट‬ )
डाॅक्टर मुलीला ः प्रेग्नंट कशी झालीस ?
मुलगी : आईवडिल पिक्चर पाहायला गेले आणि bf घरी आला
डाॅक्टर : तुला एकटीला ठेऊन कसे गेले ?
मुलगी : सैराट पाहायला गेले होते , माझ्यावर वाईट संस्कार होतील म्हणून घरीच ठेवलं

काही दिवस समाजातल्या, माबोवरच्या प्रतिक्रिया ऐकत आहे वाचत आहे.
माध्यम आहे म्हणून मला प्रतिक्रिया द्यावी वाटते. तिला द्यायचच होत म्हणून नाही देणा र.
इथे नंदिनी यांचा जो लेख याच चित्रपटावर आहे तो जास्त संयुक्तिक वाटतो.
पराडकरानी जे लिहिल ते त्यांचा फीडबॅक परामीटर फॉर्म भरल्यासारख लिहिलेल वाटत. (बायस्ड रिव्ह्यु)

कुठलीही कलाकृती ही त्या त्या कलाकृती संदर्भातील पूर्वग्रह बाजूला ठेवून पाहावी तशी आम्ही पाहिली.आणि ती सुन्दर वाटली.खरी वाटली.सार्थ वाटली.

तेव्हा हा सुंदर चित्रपट, त्या चितारलेल्या गोष्टी साठी पाहवा. चित्रपटाचा शेवट अतिशय 'बोलका' सर्वानी पहावा. सगळ्या वयाच्या व्यक्तिनी पहावा.

आत्ताच सिनेमा पाहील्यावर दोन्ही रिव्ह्यूज पूर्ण वाचले. खरं म्हणजे सिनेमागृहात रसपच्या अर्धवट वाचलेल्या रिव्ह्यूची आठवण येत होती. या सिनेमासाठी नागराज मंजुळेची गरज नाही असं म्हणताना त्याला काय म्हणायचंय हे कळालं.

पण अनेक दृश्यात सिनेमा भाष्य करत राहतो हे उरतंच. नागराज मंजुळेला वजा केलं तर सैराट असा नसता. संपूर्ण सिनेमाभर तो व्यापून राहीलेला आहे.

रसपचं वेगळं मत सुद्धा मंजूर आहे.

आमच्या गावात हा सिनेमा येईल की नाही माहित नाही. पहायचा तर आहेच. पण सर्वजण शेवटाबद्दल जे लिहीत आहेत ते वाचुन सिनेमा पहाणे सहन होईल का याचीच भिती वाटत आहे आता. मनाला तोवर स्ट्रॉंग बनवते.

>> सर्वजण शेवटाबद्दल जे लिहीत आहेत ते वाचुन सिनेमा पहाणे सहन होईल का याचीच भिती वाटत आहे <<

ऑनेस्टली, कठीण आहे.
आमचे कुटुंब तडक बाहेर पडले होते थेटरातून.. Sad

विज्ञानदासू ह्यांच्याशी सहमत आहे.

सिनेमा ह्या माध्यमाचा अभ्यास असणार्‍यांनी समीक्षेच्या भानगडीत पडावे. इतरांच्या समीक्षा केवळ वैयक्तिक मते म्हणून वाचायला आणि स्वतः सिनेमा पाहून स्वतःचेही बरे वाईट मत बनवायला हरकत नाही.

संकेतस्थळाने विनामूल्य जागा उपलब्ध करून दिलेली आहे म्हणून कुणीही कशावरही ज्ञानप्रदर्शन करावे हेही होत राहीलच म्हणा!

>> 'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.

आज केलेली बटाटयाची भाजी कालच्या ढोबळी मिरचीच्या भाजीपक्षा कमी पडलीय!

Happy Happy Happy Why to compare apples and oranges?

>> तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो

शिर्षकात (Movie Review) अस लिहीलय म्हणून हा पुढचं -

सिनेमा हे माध्यम आणि ते माध्यम वापरून केलेला सिनेमा हेच जर कळले नसेल तर 'मला दिसलेला/कळलेला' सिनेमा असं शिर्षकात असायला हवं होत.

सोन्याबापूंनी Ratatouille सिनेमाताला उर्धृत केलेला परिच्छेद एकदम चपखल आहे ह्या लेखावर.

- (सुजाण सिनेमाप्रेमी) सोकाजी

सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत >>>> नायकाचा मित्र अरबाज शेख आहे, जो चला हवा येऊ द्या मध्ये ( २५ -२६ एप्रिल २०१६) आला होता.

छान सिनेमा आहे.

तेव्हा हा सुंदर चित्रपट, त्या चितारलेल्या गोष्टी साठी पाहवा. चित्रपटाचा शेवट अतिशय 'बोलका' सर्वानी पहावा. सगळ्या वयाच्या व्यक्तिनी पहावा.>>>>>>> +१

जबराट आहे सैराट , नक्की बघा , हा रिव्ह्यु वाचुन सिनेमाविषयी निगेटीव्ह मत झालं होतं पण सिनेमाच्या प्रत्येक फ्रेम गणिक मत बदलत गेलं.
सिनेमा पाहिल्यावर परत हा रिव्ह्यु वाचला . लेखकाला सिनेमा कितपत कळतो असं वाटुन गेलं.
मी जर ह्या रिव्ह्युला मार्क द्यायचे ठरवले तर अर्धा ही स्टार नाही देऊ शकणार.

'हा चित्रपट न आवडणे हा नैतिक गुन्हा आहे' अश्या अर्थाची कुठलीही सूचना न चित्रपटापूर्वी, नंतर वा दरम्यान दिली गेली नाही, तसेच मला कुणी तसे सांगितलेही नव्हते, त्यामुळे मी हे टाळू शकलो नाही. त्याबद्दल क्षमस्व !
Light 1
Uhoh

हा रिव्ह्यू न आवडणे हा नैतिक गुन्हा आहे' अश्या अर्थाची कुठलीही सूचना न रिव्ह्यूपूर्वी, नंतर वा दरम्यान दिली गेली नाही, तसेच श्रीला कुणी तसे सांगितलेही नव्हते, त्यामुळे श्री हे टाळू शकला नाही. त्याबद्दल क्षमस्व !
दिवा घ्या

समीक्षेत सारासार विचार गरजेचा असतो, तुमचे रीव्ह्यूज एककल्ली आणि मला खूप कळते अशा आशयाचे असतात.

इतक्या मोठ्या सिनेमात जर चार्दोन चांगल्या गोष्टी सापडल्या असतील तर त्याही लिहायच्या असतात समीक्षकाने.

सगळंच कसं फेल गेलय हे सांगणारे अभ्यास नसणारे शेरेबाज असतात.

फँड्रीशी तुलना तर हास्यास्पद आहे, दोन वेगवेगळे जॉनर असणार्या फिल्म आहेत इत्के साधे समजू नये हे खूप झाले!

Pages