नागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)

Submitted by रसप on 30 April, 2016 - 04:08

'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.

Sairat.jpg

'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.

इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.

'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.

'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.

नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अ‍ॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !

'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वास्तववादि परिक्षण.
अगदि असेच वाटले, सिनेमा पाहताना.

अजय अतुलच्या ताश्या आणि नाशिक ढोलचा आता कंटाळा येऊ लागलाय. त्या झिगांट गाण्याचे सुरवातीचे संगीत ऐकून आता 'शांताबाई' गाणे सुरु होईल की काय असे वाटलेले.

नेहमीप्रमाणे रटाळ परिक्षण,रसप हे चित्रपट पाहयला जाण्याआधीच काय काय टिका करता येईल याचा साचा डोक्यात घेऊन जातात वाटतं.नागराज मंजुळे सारखा तळागाळातला दिग्दर्शक वरती येतो ,नवीन चेहरे घेतो आणि उत्तम चित्रपट देतो,प्रस्थापितांना यामुळे धक्का बसतो,व त्यांची उबळ काढायला कुणीतरी परिक्षण लिहीतो एवढाच ह्या चित्रपट समिक्षेचा अर्थ आहे.

रसप ,,परीक्षण अजुन वाचल नाही.. उद्या जाणार आहे पाहयला
तुमच्या लेखाच शीर्षक अजिबात आवडल नाही. Angry
बघताक्षणी वाटल,,, मंजुळेच तुम्ही नाव अस का लावाव ??????

चित्रपटाचा शेवट आडवळणानं का होईना सांगितल्याबद्दल धन्यवाद.

कयामत से कयामत तक, इशकजादे इत्यादी सर्व चित्रपटांचं मूळ प्रेरणास्थान 'रोमियो अ‍ॅण्ड ज्युलिएट' आहे. तेवढं सांगून काम भागतं. Happy

मंजुळेचा चित्रपट आहे म्हणून टिका होऊ नये ही अपेक्षा अथवा मंजुळेचा चित्रपट आहे म्हणून टीका करावी ही इच्छा. हे दोन्ही चुकिच्या समजुती आहे.
प्रत्येक चित्रपट एक कलाकृती असते ज्यात उणिवा असतात. कोणीही १००% बरोबर चित्रपट आजतागायत बनवू शकला नाही.

रसप काळा रंग दाखवण्याकरीता आधी पांढरा रंग दाखवावा लागतो तरच काळा रंगाचे महत्व दिसते. किंबहुना पांढरा रंग बघता बघता अचानक काळा रंग समोर आल्यावर तो परिणामकारक होतो. अन्यथा नुसता काळा रंग बघणे बरोबर वाटणार नाही.

त्या झिगांट गाण्याचे सुरवातीचे संगीत ऐकून आता 'शांताबाई' गाणे सुरु होईल की काय असे वाटलेले .+१
असच वाटतं.

चित्रपट आवडो / नावडो. पण नागराज कमर्शियल मंजुळे? आवडलं नाही.
शेवट सांगितल्यामुळे खरंतर..... जाउद्या.
तलाश चित्रपटाच्या धाग्याची आठवण आली.

फेसबुकवर सुद्धा अनेक महाभागांनी शेवट सांगितलेला आहे. त्यांना ठोकून काढणारी एक पोस्ट फिरतेय सर्वत्र. छान आहे मजकूर. पुन्हा सापडली की इथे शेअर करीन. म्हणतात ना सोनाराने कान टोचावेत

परिक्षण छान आहे.
पण, 'नागराज कमर्शियल मंजुळें' ह्या शिर्षकात पोपटराव ऐवजी कमर्शियल केलेले काहि पटले नाही.

'शाहरुख मयूर खान' अशी एक जाहिरात असायची पूर्वी. लोकांना त्यात काही गैर वाटलं नव्हतं.

आजकाल एकूणच असहिष्णुता फार वाढलीय.
Uhoh
Light 1

रसप तो स्वतःच्या तोंडाने म्हणायचा. इथे तुम्ही इतरांना म्हणत आहे. आणि तुम्ही "शाहरुख" नव्हे Wink
इतकाच काय तो फरक आहे.

नागराज मंजुळे सारखा तळागाळातला दिग्दर्शक वरती येतो ,नवीन चेहरे घेतो आणि उत्तम चित्रपट देतो,प्रस्थापितांना यामुळे धक्का बसतो,व त्यांची उबळ काढायला कुणीतरी परिक्षण लिहीतो एवढाच ह्या चित्रपट समिक्षेचा अर्थ आहे.>>>

वा वा छान छान.
रसप, अहो कळलं का आतातरी तुम्हाला? एखादया चित्रपटाबद्दल समीक्षा लिहिताना दिग्दर्शकाची बॅकग्राउंड, तो तळागाळातील आहे की नाही हे आधी बघायचं आणि तसं असेल तर निगेटिव्ह काही काही लिहायचं नाही..फक्त तारीफ पे तारीफ करायची. अन्यथा तुम्ही 'प्रस्थापितांची उबळ वाले' असं म्हणून तुमच्यावर सहिष्णू दगड भिरकावले जातील. तुम्हीही इतरांप्रमाणे चित्रपटाचं 'परिक्षण' न करता 'प्रमोशन' केलं असतं तर बरं झाल असतं.
तुम्ही मंजुळे व त्यांच्या चित्रपटांबद्दल भरभरुन चांगलं लिहिलं आहे. शिवाय तुम्हाला न आवडलेल्या गोष्टींबद्दल टीकाही केली आहे. पण असं चालत नाही सहिष्णू लोकांना. फक्त स्तुती करायची. टीका अजिबात नाही. टीका करणं हा असहिष्णू प्रकार आहे. Wink

शाहरुख मयूर खान' अशी एक जाहिरात असायची पूर्वी. लोकांना त्यात काही गैर वाटलं नव्हतं.

आजकाल एकूणच असहिष्णुता फार वाढलीय. >>>>>>> इथे फक्त एकच वाक्य सुट होईल. कपिल च्या शो मधल पलक च वाक्य,, " टॉक टु माय हॅन्ड " Wink Light 1

.

मायबाप, तुम्ही माझं नाव घेऊन पर्सनल अटॅक करताय Happy

असो, पर्सनल अटॅकला उत्तर दयायची आणि हा धागा भरटवायची इच्छा नाही...सो माझा पास!

.

माबा अहो तुम्ही स्वतः वर हे लिहिलंय ना-
मंजुळेचा चित्रपट आहे म्हणून टिका होऊ नये ही अपेक्षा अथवा मंजुळेचा चित्रपट आहे म्हणून टीका करावी ही इच्छा. हे दोन्ही चुकिच्या समजुती आहे.प्रत्येक चित्रपट एक कलाकृती असते ज्यात उणिवा असतात. कोणीही १००% बरोबर चित्रपट आजतागायत बनवू शकला नाही.

हे तुम्ही अगदी करेक्टच लिहिलंय. मलाही precisely हेच म्हणायचं आहे. रसप यांनी मंजुळेंचं भरपूर कौतुकही केलंय की. पण टीका करण्याचाही त्यांना तितकाच हक्क आहे. त्यावरुन त्या केशव तुलसींनी 'प्रस्थापितांची उबळ' वगैरे काहीच्या काही लिहिलं आहे. तुम्ही रसप यांचे इतर रिव्ह्यू वाचले आहे का? कट्यार किंवा नटसम्राट किंवा बाजीराव-मस्तानी सारख्या प्रस्थापित (???) टीम्सनी बनवलेल्या मुव्हीजचे रिव्ह्यूज ही त्यांनी कौतुक +टीका असेच लिहिले आहेत. (किंवा बा-म बद्दल नुसती टीकाच!). त्यांच्याशी disagree करु शकता (मी बा-म च्या बाबतीत सहमत नाही) पण त्यांच्या मताचा आदर करायला काय हरकत आहे?

सनव तुमच्या वरिल प्रतिसादाशी १००% सहमत!

आजकाल समिक्षकांनी कुठल्याही 'कलाकृतीचे' समिक्षण करण्यापूर्वी ती कलाकृती ज्या दिग्दर्शकाने सादर केलेय त्याचे नेटिव, तो तळागाळातला आहे की नाही, हे पहिले तपासून पहायला हवे. तो जर तसा नसेल तर त्याच्या कितीही सरस कलाकृतीवर यथेच्छ टिका करा, पण तो जर तळागाळातील असेल तर मात्र त्याच्या टुकार कलाकृतीवर देखिल टिका न करता फक्त स्तुती सुमनेच उधळायला हवीत अशी काही सहिष्णू लोकांची आजकाल इच्छा असते.

सूचना :-
वरिल प्रतिसादाशी सैराट सिनेमाचा काही संबध नाही. फक्त आजच्या असहिष्णूतेच्या काळात सहिष्णू समिक्षण कसे असावे ह्या बद्दल वरिल प्रतिसाद आहे.

.

भावांनो आणि (त्यांच्या) बहिणींनो, Light 1

भांडू नका, एकजूट ठेवा !!

माझ्यावर असे हल्ले होतील, ह्याची जाणीव ठेवूनच मी लिहिलं आहे. मला केशव तुलसी ह्यांच्या पोस्टबद्दल जराही आश्चर्य वाटले नाही. अजूनही खूप सुनावलं जाईल, ह्याचीही मला कल्पना आहे.

तुम्ही लिहिलेल्या पोस्टी पुन्हा वाचा त्यातून काय अर्थ निघतोय आणि तुमचे म्हणणे काय आहे हे बघा.

असो..
रसप यांच्या परिक्षणाशी बर्‍याच ठिकाणी सहमत आहे. आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले .
माझ्याकडून विषय इथेच थांबतो.

टीका कोणी कोणावर व का करावी? हा मोठा गहन प्रश्न आहे. आपल्याला एखाद्या कलाकृतीतलं काही खटकलं असेल तर व मनापासून आणि प्रामाणिकपणे तसं वाटत असेल तर जरूर टीका करावी.

http://www.loksatta.com/lekh-news/artical-on-world-laughter-day-1-may-12...

इथे या लेखात डॉ. सुवर्णा दिवेकर (आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांच्या मातोश्री आणि त्यांच्या पुस्तकाच्या अनुवादक) यांनी तर चक्क राम गणेश गडकरी, पु. ल. देशपांडे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, इंद्रायणी सावकार व व. पु. काळे या नामवंत लेखकांवर टीका केली आहे.

याउलट, गंगाधर गाडगीळ, मुकुंद टांकसाळे या तुलनेने सुमार विनोदी लेखन करणार्‍या लेखकांचे मात्र दिलखुलास कौतुक केले आहे. कारण काय तर ज्यांच्यावर टीका केली आहे त्यांनी स्त्रीपात्रांवर विनोद करीत त्यांना पुरुषांपेक्षा दुय्यम रंगविले आहे. तर गंगाधर गाडगीळांसारख्या लेखकांनी त्यांच्या शेंडा बुडखा नसणार्‍या साहित्यात नायक बंडूला बावळट तर नायिका स्नेहलतेला स्मार्ट दाखविले आहे. बस्स एवढ्यावरूनच लेखिकेच्या गुडबुकात गाडगीळ, टांकसाळे हे लेखक आपसूकच येऊन बसले तर स्त्रीपात्र पुरुषांच्या तुलनेत फिके दाखविणारे गडकरी, देशपांडे, अत्रे, काळे हे बाईंच्या टीकेस पात्र ठरले.

नागराज मंजुळेही आपल्या पिस्तुल्या, फँड्री यांसारख्या शीर्षकापासूनच वेगळेपण दर्शविणार्‍या कलाकृतींमुळे काहींच्या गुडबुकात कायमचे बसले असल्याने त्यांच्यावर टीका करणे त्यांच्या समर्थकांना आवडत नसले तरी इतर कुणाला त्यांच्या 'सैराट' या नव्या चित्रपटात खटकण्यासारखे असू शकते आणि त्यावर त्यांना टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे हे समजुन घ्यायला हवे.

ओके माबा.चुकीचा अर्थ माझ्या पोस्टमधून निघत असला तर तो माझ्या लिखाणाचा दोष असावा. पण मी तुमच्या ' मंजुळेचा चित्रपट आहे म्हणून टिका होऊ नये ही अपेक्षा' वाल्या पोस्टशी पूर्ण सहमत आहे. त्यामुळे माझ्याकडूनही या चर्चेला फुलस्टॉप Happy

@रसप - प्लीज कीप रायटिंग. एकतर्फी प्रमोशनल रिव्ह्यूज आवड्त नाहीत त्यामुळे तुमचे रिव्ह्यूज वेगळे उठून दिसतात.

बाकी काही म्हणायचे नाहीये फ़क्त एक डायलॉग कॉपी पेस्ट करतोय ratatouille मधला
In many ways, the work of a critic is easy. We risk very little, yet enjoy a position over those who offer up their work and their selves to our judgment. We thrive on negative criticism, which is fun to write and to read. But the bitter truth we critics must face is that, in the grand scheme of things, the average piece of junk is probably more meaningful than our criticism designating it so. 

-Anton Ego (Ratatoullie)

@रसप - प्लीज कीप रायटिंग. एकतर्फी प्रमोशनल रिव्ह्यूज आवड्त नाहीत त्यामुळे तुमचे रिव्ह्यूज वेगळे उठून दिसतात.

>> धन्यवाद !

@सोन्याबापू,

खरंय..!!
अश्याच आशयाची एक पोस्ट मध्यंतरी हर्ष भोगालेंनी लिहिली होती. हाच अ‍ॅप्रोच हवा आणि आहे.

Pages