नागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)

Submitted by रसप on 30 April, 2016 - 04:08

'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.

Sairat.jpg

'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.

इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.

'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.

'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.

नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अ‍ॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !

'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फँड्रीशी तुलना तर हास्यास्पद आहे, दोन वेगवेगळे जॉनर असणार्या फिल्म आहेत इत्के साधे समजू नये हे खूप झाले!

<<

"जॉनर" चा मराठीत अर्थ काय होतो. Happy

अरे रिव्हू नाही आवडला, त्यातील काय काय नाही आवडलं, काहीच नसेल आवडलं तर तसं लिहिलं, विषय संपला. समोरच्याची अक्कल काढलीच पाहिजे का? लेखकाला त्या दिग्दर्शकाकडून काही वेगळी अपेक्षा होती, जी लेखकाच्या मते पूर्ण झाली नाही, असं मला वाटलं.
लेखकाचे मत पटले नाही तर होणारे वैयक्तिक हल्ले आवडले नाहीत.

सैराट ( काय किंवा कुठलाच चित्रपट) पाहणार्‍यांनी (कोणताही) चष्मा लावायची गरज नाही. वास्तव दाहक आहे, आणि ते तसंच दाखवलंय! हॅप्पी एन्डिंगवाले सिनेमे पाहयचीच सवय आपल्याला असेल अन् बहुदा त्यामुळेच हा अंगावर येतो इतकंच.
पोरं बी`~ घडतील... कदाचित आणि हा / असे चित्रपट पाहून... बिघडणारच असतील तर सॉरी बॉस तूम तो लेट हो गएं |

वास्तव दाहक आहे, आणि ते तसंच दाखवलंय!
<<

ह्या दाहक वास्तवा वर अगदि कालपर्वापर्यंत रामलीला वगैरे सारखे अनेक सिनेमे येऊन गेले. त्यावेळ पर्यंत कदाचीत दाहक वास्तवाचा स्पर्श कुणालाही झाला नसावा.
आज नागराज मंजुळे सारख्या तळागाळातील दिग्दर्शकांने हा विषय त्याच्या सिनेमात मांडल्यावर सगळ्यांचे डोळे कसे खाडकन उघडले व दाहक वास्तव अगदि नजरे समोर आले.

तळागाळातील दिग्दर्शक म्हणजे काय?

दिग्दर्शक हा दिग्दर्शक असतो, त्याला ही असली लेबले का म्हणून लावायची?

नवीन वाचक
फॅन्ड्रीच्या वेळी पण मंदार जोशी नामक एक सदस्य अशी मतं मांडत असत. नागराज मंजुळे तळागाळातून आला म्हणून त्याला आपला मानणारे किंवा त्याचा द्वेष करणारे (असलेच तर) एकदा सिनेगृहात गेले की हे सर्व विसरून फक्त सिनेमा पाहतात. अंधारात एकदा पडद्यावर चित्रं उमटायला लागली की आपले डोळे, कान आणि मेंदू यांचा ताबा समोरचा सिनेमा घेतो किंवा नाही घेऊ शकत.

अगदी स्वतःच्या मुलाने सिनेमा बनवला तरी त्या टुकार असेल तर आवडत नाही. तुमचे बेसिक्स क्लिअर करून घ्या. जिथे आपलेपणा असेल तिथे/

सैराट मी बघितला नाही त्याचे कारण -
गेल्या काही वर्षांपासून दर काहीएक मराठी चित्रपटांमागे एखादा तरी चित्रपट फार गाजावाजा करत येतो. त्याच्याविषयी सगळीकडे कसं छान छान छापून येत जातं. वर्तमानपत्रांमध्ये (विशेषतः - महाराष्ट्र टाईम्स मध्ये) सोशल मीडियावर, टीव्ही चॅनेल्सवर. अनेकदा तर असंही वाटायला लागतं की हा चित्रपट पाहणं हे जणू काही राष्ट्रीय कर्तव्य आहे किंवा मतदानाप्रमाणेच नैतिकदृष्ट्या सक्तीचं आहे. प्रतिव्यक्ती अडीचशे-तीनशेचं तिकीट, जाण्यायेण्याकरिता पेट्रोल + पार्किंग, थेटरात महागडे समोसे आणि पॉपकॉर्न + बाटलीबंद पाणी हा सगळा खर्च मिळून हजार बाराशेची खिशाला चाट बसली तरी फारसं समाधान मिळत नाही असंही अनेकदा झालंय. देऊळ, नटरंग, बालगंधर्व, लोकमान्य, हापूस, जयहिंद, एलिझाबेथ एकादशी, किल्ला, सरीवर सरी, पिपाणी, फक्त लढ म्हणा हे आणि असे अनेक चित्रपट पाहताना पैसे खर्चूनही अपेक्षित आनंद न मिळाल्याने फसवणूक झाल्याची भावना मनात निर्माण झाली.

गेल्या कित्येक वर्षांत बर्‍यापैकी समाधान देणारा एक चित्रपट म्हणजे श्वास. पण त्यातही अमृता सुभाषचं पात्र आक्रस्ताळं, अनाठायी आणि अनावश्यक वाटलं. ते वजा करता चित्रपट छान वाटला. त्याचा यूएसपी म्हणजे त्याचा शेवट. आजोबा नातवाला ऑपरेशनच्या दिवशीच घेऊन हॉस्पिटलमधून निघून जातात. त्याला आंधळा होण्याआधी जितकं दाखवता येईल तेवढं दाखवतात. शेवटी अंध मुलांच्या शाळेत घेऊन जातात तेव्हा तिथली मुले नायकाला स्पर्श करतात तो सीन तर अगदीच अप्रतिम. पण पुन्हा प्रश्न असा पडला की, डोळ्यांतून हमखास पाणी काढणारा सीन टाकून यश मिळवायचं असेल तर माहेरची साडी तरी काय वाईट आहे? कुठल्याही मुलीच्या बापाच्या डोळ्यातून पाणी निघणारच असा शेवट आणि इतर अनेक सीन (जवळपास चित्रपटाचा बहुतांश हिस्सा) माहेरच्या साडीत खच्चून भरले आहेत.

पुढे ह्या प्रश्नाचं उत्तर देणारा आणि शंभर टक्के चित्रपट पाहिल्याचा आनंद आणि समाधान देणारा चित्रपट पाहिला तो म्हणजे अश्विनि भावे निर्मीत - कदाचित. निळू फुले यांच्या अभिनयाने नटलेला हा शेवटचा चित्रपट. भावनिक नाट्य (मेलोड्रामा) न करता म्हणजेच काळजाला हात न घालता मेंदूला खाद्य पुरविणारा कदाचित हा एकमेव चित्रपट असावा. विशेषतः चित्रपटाच्या शेवटी सचिन खेडेकरने रंगविलेले पात्र आयुष्यभर स्वतःच्या मनात कुठलं रहस्य जपण्याचं ओझं बाळगून जगणार आहे हे कळल्यावर मनावर येणारा ताण प्रेक्षकाला अस्वस्थ करून सोडतो.

त्याचप्रमाणे ध्यासपर्व हादेखील एक परिपूर्ण आनंद देणारा चित्रपट होता. अर्थात हा एक वास्तविक चरित्रपट असल्यामुळे लेखकाचं काम सोपं होतं.

तसेच एक डाव धोबीपछाड, रेगे, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, आजचा दिवस माझा हे चित्रपट देखील काही प्रमाणात आनंद देऊन गेलेत. पण ते हुकूमी यश देणार्‍या विषयांवर बेतलेले असल्याने ते बघितले तर चांगलंच पण नाही बघितलेत तरी काही नुकसान नाही या कॅटेगरीतले होते.

थोडक्यात गाजावाजा केलेल्या मराठी चित्रपटांपैकी आनंद देणारे कमी आणि डोक्याला शीण आणणारेच संख्येने अधिक होते असा स्वानुभव आहे.

सैराट हा कदाचित आणि ध्यासपर्व प्रमाणेच १०० टक्के उत्तम किंवा श्वासप्रमाणे बर्‍यापैकी चांगला असूही शकेल पण तो जर फक्त लढ म्हणा किंवा पिपाणी सारखा बंडल चित्रपट निघाला तर अजून एक नुकसान पचवायची माझी तयारी नाही.

हे फक्त मी सैराट का बघणार नाही त्याचं अगदी वैयक्तिक असं कारण आहे. माझा चित्रपटाला अजिबात विरोध नाही किंवा इतरांनाही तो बघू नका असा सल्ला देण्याचा इरादा नाही.

सबब, या प्रतिसादावर कुठलाही वैयक्तिक स्वरूपाचा हल्ला अपेक्षित नाहीये याची कृपयाच नोंद घ्यावी ही विनंती.

सहकार्याकरिता आगाऊ आभार, धन्यवाद, इत्यादी.

Morning show ला एकाट्याने गेलात तर 90 रू मध्ये काम होईल. सामोसे पॉपकॉर्न न खाता घरून सँडविच आणि बाटलीत पाणी घेऊन जावे. बाईक न नेता सायकलने गेलात पेट्रोल चा खर्च वाचेल आणि पार्किगचाही.

त्यांनंतरही चित्रपट फालतू निघाला तर फार वाईट वाटणार नाही आणि आदिवतीय असेल तर तुमच्या शिरस्त्यात्याप्रमाणे पाठवा कुटुंबाला

ज्यांच्या मनाची पाटी स्वच्छ नाही त्यांनी पाहीला नाही तर बरंच आहे.
आमचा एक मित्र असंच काही बाही मनात ठेवून मुलगी पहायला गेला नव्हता. नंतर तिचं लग्न झालं. काही दिवसांनी त्याला कळालं की बस मधे जिला पाहण्यासाठी तो लवकर निघायचा, तीच होती ती.. असल्यांना इतरांनी काय सांगायचे ?

मी सैराट चा जब्राट फॅन आहे पण एक गोष्ट खटकते....ती म्हणजे पाट्लाच्या घरात असलेला छ्त्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि मूर्ति... ते दाखवायची काही गरज मला तरी वाटत नाही....पाटील हे नाव पुरेसे होते वरची जात दाखवण्यासाठी....एक शिवभक्त म्हणून ही खंत मनात राहतेच

आशुचँप, तुमचा प्रतिसाद वैयक्तिक आहे (म्हणजे बिपिन चंद्रांनी काय करावं काय करू नये सांगणारा) पण 'हल्ला' नाही , अशी तळटीप टाका बघू !
Wink

{{{ Morning show ला एकाट्याने गेलात तर 90 रू मध्ये काम होईल. सामोसे पॉपकॉर्न न खाता घरून सँडविच आणि बाटलीत पाणी घेऊन जावे. बाईक न नेता सायकलने गेलात पेट्रोल चा खर्च वाचेल आणि पार्किगचाही. }}}

पुण्यातल्या मल्टीप्लेक्स मध्ये पाण्याची बाटली आणि खाद्यपदार्थच काय, पण हातात एक पिशवी देखील घेऊन जाऊ देत नाहीत आणि आता वयाच्या सत्तराव्या (प्लीज नोट सत्तराव्या (७०) बरे, सतराव्या (१७) नव्हे) वर्षी सायकल चालवायला मी काही पिकूतला कॉन्स्टीपिटेड अमिताभ नाही आणि आशूचॅम्प* तर नाहीच नाही. या वयात मॉर्निंग शो बघणे जमणार नाही, सकाळची वेळ बागेची मशागत करण्यात जातो. {फेसबुकावर माझ्या बागेचे फोटो पाहू शकाल}

* प्रतिसाद वैयक्तिक असला तरी हल्ला करणारा नाही.
तळटीप सौजन्य - डॉ. साती मायबोलीकर {यांच्या नावाचं क्रेडिट न देता तळटीप वापरली तर माझी साहित्यचोरीच्या धाग्यावर बदनामी होईल}

शिवाजी महाराजांचा फोटो घरात दाखवला त्यात गैर काय?

विशिष्ट जातीचे लोकच महाराजांचा फोटो लावतात का? ऐतेन....
पण काय गरज होती शिवाजी महाराजांचा फोटो दाखवून असे वाईट व्रुत्ती दाखवायची....विशिष्ट जातीचे लोक शिवाजी महाराजांचा फोटो लावतात असे नाही पण त्यांचा फोटो लावून त्यांना काय दाखवायचे होते हे मला कळत नाही....

Tyanna he dakhvayche asel ki lok aadarsh mhanun fakt photo lavtat, putale gharat thevtat. Pan man matr tevdhe mothe karta yet nahi.

Abhishek Sawant अगदी बरोबर ... चित्रपट बघताना ती गोष्ट मलाही खटकली होती.. कारण ती intentionally दाखवलेली होती.
त्यामागच कारण नागराज मंजुळेच सांगू शकतील...

तसा फोटो लावलेल्या एखाद्या घरातल्या व्यक्तिंकडून दिग्दर्शकाला काही अप्रिय अनुभव आला असेल असा माझा एक अंदाज.

बिपिन चन्द्र जी, माझं कुठलंही लिखाण वापरताना मला लि सौ नाही दिलंत तरी चालेल तुम्ही.
'तुमच्यासाठी काय पण!' - माझं लिखाण कॉपीपेस्ट्ला उपलब्ध!

अहो पाण्याची बाटली आणि थोडा खाऊ नेता येतो बर्का. मी कित्येकवेळा नेला आहे मल्टिपेक्समध्ये. तुम्हाला तर किती संधी आहे. वयोवृद्ध माणसाना त्रास देत नाहीत सहसा. अगदीच दिला तर सान्गायचे कि मला वेळच्या वेळी गोळ्या घ्याव्या लागतात त्यासाठी खावे लागते. मी हे पॉपकॉर्न वगैरे नाही खात.
त्याहूनही त्रास झाला तर पेपरला बातमी द्यायची, मल्टिप्लेक्सकडून ज्येष्ठ नागरिकांना अरेरावी.

सायकलचा मुद्दा निकालात निघाला पण लिफ्ट घेऊन जाऊ शकाल असे वाटते.

प्रतिसाद वैयक्तिक आहे पण हल्ला नाही. तुमचे पैसे वाचून चांगले चित्रपट बघता यावेत अशी कळकळ आहे, बाकी काही नाही

नताशा, बरोबर आहे तुमचे....पण शिवाजी महराजच का ??? लोक गांधीजींचे फोटो आणि पुतळे लाऊन सुध्दा वाईट काम करतातच ना...त्यांचा पण आदर्श कोणी घेत नाहीत लोक फक्त फोटोच लावतात

अर्थात त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान होईल वैगेरे काही नाही...कारण त्यांचे स्थान आमच्या ह्रूदयात आहे ...पण कारण जाणून घ्यायला आवडेल दिग्दर्शका कडून

हळूहळू जसजसे अधिकाधिक लोक हा चित्रपट पाहत आहेत, तसतसा अभिनिवेश बाजूला राहून प्रामाणिक प्रतिक्रिया येत आहेत, म्हणजे फेसबुकवर तरी.

अभिषेक,

तुम्ही उगाच इश्यू बनवत आहात.
गांधीजींच्या फोटोखाली बसून गैरकाम करताना दाखवलेलं नाही का कधी ? तसंच हे. छत्रपतींच्या फोटोसमोर बसून माज करणं दाखवलंय. ह्यात न समजण्यासारखं काय आहे ?

लोक पिशवीत कॅमेरा पिशवीत लपवून नेतात आणि शूटिंग करून पायरेटेड कॉपी बनवितात म्हणून सोबत पिशवी नेऊ देत नाहीत आणि पाण्याची बाटली स्क्रिन्वर फेकतात म्ह्णून तीही नेऊ देत नाहीत असे थेटरात सांगण्यात आले. मी ते मान्य केले आणि महिला कर्मचार्‍यांशी वाद घालण्यात तसाही अर्थ नाही.

रसप, इश्यु चा प्रश्न नाही...मी माझा विचार मांडला, एक शंका व्यक्त केली एव्हडच....एक शिवभक्त म्हणून मला ते चांगले नाही वाटले...तुम्हालाही ते न आवडावे असा आग्रह नाही...

Pages