नागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)

Submitted by रसप on 30 April, 2016 - 04:08

'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.

Sairat.jpg

'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.

इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.

'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.

'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.

नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अ‍ॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !

'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवरा ..........

अभिषेक .. कमाल प्रतिक्रिया आहेत तुमच्या ... संस्कार काय , बाळाचे पाय काय .. कै च्या कै

चित्रपट करमणूकीसाठी असतात संस्कार करण्यासाठी पालक शिक्षक आहेत कि .... यापुर्वी बालक पालक, शाळा असे चित्रपट आले नव्हते का , बर ते बघितले म्हणून पोर बिघडली का ?

मला चित्रपट आवडला त्यात कुठेही कसलाही फालतूपणा नाही पण वक्रदृष्टी ठेवूनच चित्रपट पहायचा असेल तर सोडून द्या ,

कंपनी ड़ायरेक्टर आणि एम्लाॅयी ची मीटींग चालू असते..................
ड़ायरेक्टरःसांगा सैराट मधून तूम्ही काय शिकलात..............
पहिला एम्लाॅयीः सर आयुष्यात आचीॅ सारखी मुलगी पाहिजे खर तर...
दुसराः सर खर प्रेम या जगात टिकत नाही......
तिसराःसर लव स्टोरी मस्त आहे पण शेवट असा नव्हता दाखवायला पाहिजे..............
डायरेक्टरः अरे मूर्खांनो दुष्काळ असताना त्या नागराज ने 41 कोटी बाहेर काढले...आणि मग तुम्ही काय करता....प्रत्येक वेळी दुष्काळाच कारण सांगता..............!!!
मला धंदा पाहिजे धंदा....
बाकी काही माहिती नाही....
बाकी मला काहीच माहीत नाही............................................

दोन मिनिट वातावरण एकदम शांत.............

याला म्हणतात खरा सैराट....!!!

अतिशय उत्कृष्ट अशी मतं मांडलीत राजन खान आणि हेमांगी कवी ह्यांनी ,

निश्चित एकावी अशी आहेत.

स्पॉयलर अलर्ट!
काही पालथ्या घड्यांसाठीनी तर नक्कीच,
https://youtu.be/AHSzmZ-V9pA

..........

घ्या दिला अलर्ट!

चित्रपट प्रदर्शित होवून १४ दिवस झाले हो... इतर कारट्यांनी ती कामगिरी केली आधीच. तशी कामगिरी न करता चूकून घाईत् मुलाखतची फक्त लिंक दिलीय हे लक्षात घ्या. पण सुधारली हो चूक. Happy

झंपे,
प्लिज एक स्पॉयलर अ‍ॅलर्ट दे लिंक बरोबर, त्या पिसाळानी मुर्खासारखा सगळा शेवट सांगून टाकलाय, डिट्टेल मधे !
राजन खानने देखील शिव्या घातल्या त्याला.

डिजे ! फेसबुकवर मला कुणितरी शेवटच्या सिनचा फोटो पाठवुन " हा सिन पाहुन तूमच्या डोळ्यात पाणी आल असेल तर लाइक करा अशी पोस्ट पाठवली होती @#$% लेकाचे!

अभिषेक सावंत

तो ड्यारेक्टर चु ... झी दिसतोय.

त्याला म्हणावं फाईव्ह स्टार हॉटेल्स, आयपीएल व्यवस्थित चालू आहेत. बाकीचे सिनेमे पण धो धो चालताहेत. जंगल बुक चालला होता. त्या आधी नटसम्राट ने पण ४० कोटीचा गल्ला केला होता. तू आत्ता जागा झालास होय रे लब्बाडा ?

मुलाखत पाहिली, अजून चित्रपट पाहीला नाहीय पण पाहणार आहे.

स्वतःला तरुण म्हणणारे लोक गावात असे होतंच नाही म्हणतात हे बघून त्यांनी स्वतःचे डोळे बंद केले किकाय असे वाटायला लागले. राजन खान म्हणतात तसे गावोगावी प्रेमप्रकरणे होतात आणि त्याचे परिणाम पुढची पिढी भोगतेय.

माझे आयुष्य शहरात गेले, गावाशी संबंध फक्त सुट्टीपुरताच, त्यामुळे गावातली जातीव्यवस्था मला कधिहि दिसली नाही. त्यामुळे देशावर असेल जातपात, आमच्याकडे नाहीत हो इतके कट्टर लोक असा विचार मी बिनदिक्कत करत होते. तो विचार किती चूक होता हे काल कळले. माझ्या सख्ख्या चुलत भावाने गेल्या महिन्यात जातीबाहेर लग्न केले. मुलीच्या घरच्यांचा विरोध नव्हता पण आमच्याच घरातले लोक नाटक करायला लागले. बरे मुलेही पंचविशी आणि तिशीतली, स्वतःचे बरे वाईट कळणारी. गावानेही लग्नाला विरोध केला. इथे मुंबईत आम्ही म्हणू, आमच्या घरात आम्ही हवे ते करू, तुम्ही कोण विरोध करणारे (हाही भ्रम असावा माझा, वेळ आलीच तर हाही पडदा फाटेल कदाचित), पण गावी असे चालत नाही. शेवटी गावात लग्न करू नका, वाडीला जाऊन करा हा सल्ला गावकार्यानी दिला. गावाच्या विरोधात लग्न केलेल्यानी असे करायची पद्दत आहे. भावाने गावी सगळ्यांना पत्रिका दिलेल्या, एक गावकरी व्यक्ती, जी आम्हाला खूपच जवळची, तिने पत्रिका घेणे नाकारले, बाकी सगळ्यांनी घेतल्या. लग्नाला गावातले काही लोक आले. उरलेले लोक दुसर्या दिवशीच्या पूजेलाही आले. अर्थात ती व्यक्ती सोडून. लग्न निर्विघ्न पार पडले म्हणून काकाही निश्चिन्त झाला आणि आता पुढे संकट उभे राहिले.

गावकर्यानी आता घरावर घोषित बहिष्कार घातलाय. गावाचा एक महत्वाचा कार्यक्रम गेल्या 10 तारखेला होता ज्यासाठी आमच्या घराला टाळले गेले. लग्नाला दुसऱ्या काकाच्या घरातुन विरोध होता, त्यांच्याकडून वर्गणी घेतली आणि यांना मात्र टाळले. म्हणून मग हे सुद्धा गेले नाहीत.

गावकिची कामे वडीलकीच्या नात्याने काका करत होता, गावकर्यानी 'आता ती तुझ्या भावाच्या मुलाकडून करून घेऊ, कारण त्याने आमच्या बाजूने राहून विरोध केला. तू आमची कामे करायची नाहीत' असे काकाला सांगितले. म्हणजे या लोकांनी बहिष्कार तर टाकलाच सोबत इतकी वर्षे एकत्र नांदणाऱ्या घरात फूट पाडली. दोन्ही चुलत भावांची या विषयावरून भांडणे झाली. काका-मावशी या सगळ्या प्रकारामुळे दुःखी होऊन बसलेत. भावाच्या मृत्यूनंतर ज्यांना आपले म्हणून सांभाळले ते पुतणे असे उलटलेले बघून काकाला धक्का आणि स्वतःच्या बचतगटातल्या शेजारणींचा उल्लेख ' हि माझी माणसेच माझी धनसंपदा आहे, मी रक्ताचे पाणी करून त्यांना संभाळलेय' असा अभिमानाने करणारी माझी मावशी शेजारणींचे बदललेले रूप पाहुन संतापलीय आणि हताशही झालीय.

जातीव्यवस्थेचे चटके कधीही न सोसलेल्या मला हा सगळा प्रकार भयावह वाटतोय. घरातले जे विरोध करताहेत त्यांनी काही काका मावशीला पोसलेले नाही कि कधी कुठल्याही कार्यात मदत केलेली नाहीय, तेच उलटे काकाच्या मदतीवर जगताहेत, ज्यांनी लग्न केले ते दोघेही अनुरूप आहेत, दोघेही कमावताहेत, कोणावर अवलंबून नाहीयेत, तरीही फक्त जात हा एकच मुद्दा पकडून सगळे नाटक सुरु आहे.

जातीबाहेर लग्न करायचे तर गुपचूप रजिस्टर करायचे होते, दणक्यात करून वर पूजा बीजा कशाला घातलीत, हे पूजेचे जेवून गेलेले लोक आता सांगताहेत... हि पश्चातबुद्धी कोणी डोक्यात घुसवली माहीत नाही.

लग्न करणार्या दोघांचीही जात सामाजिक उतरंडीवर समान स्थानावर आहे, जर इथे दलित-सवर्ण हा घोळ असता तर काय घडले असते?

आणि तरीही आजचे तरुण महाराष्ट्राच्या गावात असे होत नाही म्हणताहेत.....

लग्न करणार्या दोघांचीही जात सामाजिक उतरंडीवर समान स्थानावर आहे,<<<<

असाच प्रकार मी पाहिला आहे जात सामाजिक उतरंडीवर समान पण मुलगा तेलगु मुलगी मराठी प्रेमविवाह
इथे जाती पेक्षा मुलांनी आई-वडिलांच्या इच्छे विरुध्द लग्न केले हे मोठ्ठे दुखणे होते. मुलांना बाहेर एकत्र फिरताना काहिंनी सांगितले होते आई-वडिलांनीच आगोदर खुप तमाशा केला सगळ्या नातेवाईकांना विनवन्या केल्या मुलिला समजावुन सांगा म्हणुन व जेंव्हा त्यांना वाटले की वोरोध करण्याला काही अर्थ नाही तेंव्हा लग्न करुन दिले

आता खुप नातेवाईक तुटले त्यांचे नातेवाईकांना विचारले का संबध तोडले तर उत्तर मिळाले आमची मुले पण बिघडतिल त्यांचे अनुकरन करतिल आमचे नाक कापले जाईल
लग्न झालेले जोडपे मात्र आनंदि आहे

माझ्या कोकणातील गावात एक घटना घडली गेल्यावर्षी. हरीजन मुलगी आणि त्याहुन थोडा वरच्या स्तरातील मुलगा यांचे प्रेम जमले. मुलाच्या घरुन अर्थातच विरोध. त्याने गळफास लावुन जीव दिला. डोळ्यासमोर पाहिलेला खेळकर, मेहनती मुलगा. Sad

साधना आणि विठ्ठल यांचे प्रतिसाद पाहून 'कोंकण महाराष्ट्रात आहे का?' या माझ्या प्रश्नाला उत्तर मिळाले.
धन्यवाद!

अहो सगळेच भारत देशात आहे. पर्वा जावेद अख्तरचा जाने पेहचाने पाहात होते, त्याने एक चांगले विधान केले, आपल्या समाजात सगळे वाईट ते दडपून ठेवायचे आणि असले काही नाहीच्चे म्हणायचे पद्धत आहे. अगदी पटले.

साधना, बरोबर आहे.
कोंकणातही हे जातपंचायतीचे आणि भावकी- गावकीचे फार आहे.
त्यात बहिष्कार घातला की अगदी मरणासारख्या वेळीही लोक को ऑपरेट करत नाहीत.
सख्खा पुतण्या काकांचे प्रेत उचलायला येत नाही केवळ गावकीचा बहिष्कार म्हणून हे स्चतः पाहिलेले आहे.

अगदी चार महिन्यांपूर्वी एका आमच्याच वाडीतल्या माणसाने मुलाने मर्जीविरुद्ध (जातीतच होते) लग्न केले म्हणून 'माझ्या मुलाचा आणि माझा यापुढे काही संबंध नाही आणि त्याच्यासंबंधित कुठल्याही गोष्टीला मला जबाबदार धरू नये' अशा आशयाचे पत्र लिहून जातपंचायतीत दिले असे कळले.

काहिही चालतं आपल्या भागातही.

होय साधना, पहिल्यांदा मीही अशाच भ्रमात होतो की आपले नातेवाईक जात-पात पाळत नाहीत. पण सख्ख्या मामेभावाच्या लग्नाच्या वेळी साधारण असाच अनुभव आला.
मामेभाऊ साधारण २३-२४ वर्षे वयाचा असताना जातीबाहेरच्या मुलीशी सूत जुळले. मामेभाऊ पडला पाटलाचा सुपुत्र (हो, इथेही पाटील आलेच). पोरगं कशानेही बधत नाही, म्हटल्यावर मामाने सरळ नात्यातल्या लोकांची बैठक बोलावली अन सांगितले "त्या पोरीशी लग्न करायचं असेल, तर सरळ गाव सोडून चालते व्हायचे. माझा तुझा संबंध संपला, घरातल्या एकाही माणसाकडून तुला एका रुपयाची पण मदत मिळायची नाही".
भावाचे पूर्ण उत्पन्न गावातल्या शेतीवरच होते, शेवटी अगतिक होऊन भावाने तिचा विषय सोडून दिला.:अरेरे:

शहरात त्यातल्या त्यात असे विवाह सहज शक्य होऊ शकतात, कारण बहुधा दोघेही शिक्षित, कमावते अन स्वतःच्या पायावर उभे असतात. अगदीच वेळ आली तरी परमुलुखात जाऊन दुसरा संसार उभा करू शकतात. गावात कित्येकदा दोघांकडेही कुठले व्यावसाईक शिक्षण नसते, उत्त्पन्न बहुतांश शेती अन जोडधंद्याशी निगडीत, आणि त्यामुळे गावातच. हाती न धड शिक्षण, ना वाडवडीलांची संपत्ती… अशा परिस्थितीत सगळे सोडून परमुलखात नव्याने सुरुवात करणे मोठे दिव्यच ठरते.

आधी शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायांवर उभे राहून मग प्रेमविवाहाचा विचार करावा असं सांगणार्यांना कळलं असेल की कधीही केलं तरी पायघड्या मिळणार नाहीतच.

बापरे साधना.. मला गावच नाही पण सासरच्या गावी आमच्या लग्नावरून असा काही राडा झाल्याचे ऐकिवात नाही. नशिबच म्हणायचे म्हणजे.

एबीपी माझा आणि आयबीएन लोकमत वर साधारण दोन किंवा तीन वर्षांपूर्वी कोकणात आंतरजातीय विवाह केलेल्या एका जोडप्याची मुलाखत दाखवलेली होती. लग्न करून ते दोघे मुंबईला पळाले पण अद्याप घरचे लोक त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत. या गोष्टीला तीस पस्तीस वर्षे झालीत. मुलांना गाव माहीत नाही. चुलतभावाने मदत केली म्हणून त्यालाही वाळीत टाकलेले आहे. त्याला कुणी मदत करत नाही आणि गाव न सोडल्याने त्याची अवस्था भयाण झाली आहे. जातपंचायतीने त्या जोडप्याच्या मुलांशी कुणी लग्न करू नये असा फतवा काढला आहे.

काही देवळात दर्शन घेऊ देण्यावर आजही बंधने आहेत. या निमित्ताने हळू हळू असं काहीच नसतं पासून हे आहे हे मान्य करण्याकडे प्रवास सुरू झाला हे थोडे नाही. ज्यांना जाच होतो त्यांनी हे असं वास्तव आहे असं ओरडल्याने त्यांच्यावर जातीयवादी शिक्के मारण्याचं काम सोशल मीडीयावर चालू आहे.

शहरात कदाचित बहिष्काराने फारसा फरक पडत नाही कारण आजूबाजूला सगळेच वेगवेगळ्या जातींचे असतात. पण गावकुसात अशी बंधने कसोशीने पाळली जातात, अगदी साध्या साध्या कामांसाठीसुद्धा गावातील लोकांचीच मदत लागते.
अशा परिस्थितीत बहिष्कार संपूर्ण कुटुंबास मुळापासून नष्ट करू शकतो. कित्येक सुसंस्कृत अन शिकलेली ओळखीची कुटुंबे आहेत जी प्रतिष्ठेच्या नव्हे तर केवळ बहिष्काराच्या भीतीने अशा विवाहास विरोध करतात.

दुर्दैव हे, की या प्रकारात कायदसुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. Angry

दुर्दैव हे, की या प्रकारात कायदसुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही

>>>>>>>>

कायदा सर्व करु शकतो, पण बळी नेहमी बकरीचा (कमजोर) दिला जातो वाघाचा नाही, शिवाय व्होट बँक पण सांभाळावी लागते,

कायदा करू शकतो पण संबंधित आधीच घाबरलेले असतात. त्यांना आयुष्य तिथेच काढायचे असते, कायदा 24 तास सोबत राहात नाही.

नी, माझ्या सख्ख्या भावानेही जातीबाहेर लग्न केलेय, पण ते इथे शहरात. मुलगी दुसऱ्या जातीची हे घरात आम्ही सोडून फक्त ह्याच काकाला माहीत होते. आई इतकी घाबरत होती कि तो विषय आम्ही काढला नाही आणि मुलीचे आडनाव गावावरूनच असल्याने लग्नाला आलेल्या कोणी काही विचारले नाही. आडनाव सावंत, गुरव, राऊत वगैर असते तर लोकांना प्रश्न पडले असते. लोक असल्या बाबतीत खूप भोचकपणा करतात. इतरांना खूप उशिरा, लग्नाला काही वर्षे लोटल्यावर कळले. जर भाऊ गावातच राहणारा असता तर आज जे होतेय ते झाले असते असे आता वाटतेय.

बहिष्कार प्रतिबंधक कायदा आलाय किंवा.येऊ घातलाय.
http://www.loksatta.com/maharashtra-news/law-will-make-to-prevent-the-so...
ही जुनी बातमी आहे. यानंतर मंत्रिमंडळाने या विधेयकाला संमती दिल्याचे वाचल्याचे आठवते.

भम, मी वाचलंय या कायद्याबद्दल. हा राबविणे खूप कठीण जाणार.

Pages