डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ नायर - (ऑर्थोपेडीक, चेम्बुर)- मला एकदा ट्रेन पकडण्यासाठी धावताना गुडघ्याला मार लागला. ते दुखणे खुप वाढले आणि मी लंगडत चालू लागले. गुडघ्याला लागले तर ऑर्थोपेडीक कडे जातात असा माझा समज असल्याने मी स्वतःच जॉय हॉस्पिटलमध्ये डॉ नायर यांच्याकडे गेले. त्यांनी मला सांगितले की cartilage डॅमेज झाले आहे आणि ते कधीच बरे होणार नाही. मला एक पेन किलर देऊन बोळवण केली आणि एक फक्त झोपुन पाय वर खाली करायचा व्यायाम करायला सांगितला. पेन किलरने तेव्ह् ढ्यापुरते बरे वाटले. पायावर जोर पडला की पाय पुन्हा दुखु लागे. मी पुन्हा तिथे गेले तर त्याच गोळ्या घ्यायला आणि व्यायाम करायला सांगितले. असे २-३ वेळा झाले. मला वाटू लागले की माझा गुदघा आता पुर्ण कामातनं गेला आणि मला नी रिप्लेसमेंट करावी लागेल की काय पुढे मागे. मला कसलाही व्यायाम करणं अशक्य झालं. त्याने वजन भराभर वाढलं. शेवटी एकदा मी माझे अ‍ॅन्युअल चेक अप चे रिपोर्ट घेऊन डॉ गाडगीळ (माहिम) यांच्याकडे गेले असता त्यांना हा प्रोब्लेम सांगितला. त्यांनी मला स्पष्ट सांगितले की, तुला physiotherapy गरज आहे, ऑर्थोपेडीक डॉ ची नाही.

मग मी एका ओळखीच्या डॉ कडे जाऊन physiotherapy सुरु केली. तिच्या सल्ल्यानुसार वजन कमी केलं. आता माझा पायाचा त्रास ९९% कमी झालाय.

डॉ नायर मला सुरुवातीलाच सांगु शकत होते की तू physiotherapy सुरु कर म्हणून.

टिळक रोडवर स्वारगेट एन्ड कडे जाताना उजव्या हाताला एक अर्थोपेडिक डॉ आहेत ।तिथे पेशंट बघण्या पउर्वीच 500/600 रु फी जमाँ करावी लागत असे (2006/07 मधली गोष्ट) खुप महागडी अओषधे भरपूर टीटेस्ट आणि काहीही गुण न येणे हे वैशिष्ट्य होते

ओहो, मी या डॉक चा चांगला अनुभव चांगल्या वाल्या धाग्यावर लिहीला आहे. अर्थात फी जास्त होती का आठवत नाही. (टेस्ट जिथे सुचवली होती ते मात्र महाग ठिकाण होते.पायाची सोनोग्राफी १६०० रु २००५ साली.)

ह्या पानावर दिवसाला १०० + पोस्ट येत आहेत.....

सुट्टीला भारतात गेलात आणि आजारी पडलात तर तिथे उपचारासठी राहु नका लगेच परत या.>>-१

पण परिस्थिती अशी नाही. उलट इतर कुठेही आजारी पडून उपचाराला भारतात या<
असा बहुसंख्यांचा विश्वास आहे.
आशियातल्या मेडीकल टूरिजमसाठी प्रसिद्ध देशात भारत पहिल्या तीनात येतो. >>+१

बहुतेक लोक (खास करुन भारतात जन्मलेली, वाढलेली) आजारी पडल्यावर भारतात जातात. ज्याचा मुळे हा धागा काढायला प्रेरणा मिळाली ते देखिल २० वर्ष बाहेर राहुन पुण्यात उपचार करण्यासाठी गेले आणि चांगला अनुभव आला.

आम्ही देखिल २० वर्ष बाहेर राहुन काही झाले तर उपचारा साठी चिंचवड मधिल डॉक्टर/ हॉस्पीटल) गाठतो, (कधी कधी पुणे ते पण चिंचवड च्या डॉक्टर्च्या सल्याने )
वाईट अनुभव आम्हाला तरी फक्त बाहेरच्या देशात पण आलेले आहेत.

आणि शिक्षणासाठी पण काही गोरे भारतात येउन शिकतात. आमच्या भागातिल एक डोळ्याचा डॉक्टर हार्वड मध्ये पदवी घेतल्यावर चेन्नई मध्ये जाउन पुढील शिक्षण घेतले आहे. ( अमेरिकेत शिकलेल्या डॉक्टर कडुन बायकोच्या डोल्याचा आजार कमी होत न्हवता म्हणुन भारतात शिकलेल्या डॉक्टर च्या शोधात होतो. ह्याची appointment नाही मिळाली . शेवटी चिंचवड च्या आदित्य बिर्ला मध्ये आजार बरा झाला.

https://www.clevelandeyeclinic.com/ohio/doctors/william-f-wiley-m-d.htm

आमच्या एका नातेवाइकाचा भयानक अनुभव. फार जवळून पाहिलिये ही केस. एक चुकीचे निदान अन घर-दार कसे उध्वस्त होते ते पाहिलेय. त्यांच्या ८ वर्षाच्या मुलाच्या पायावर पांढरा चट्टा पडला होता. शहरातल्या स्किनवाल्या महान डॉक्टरने तपासाणी करून निदान केले की ह्याला लेप्रसी म्हणजे महारोग झालाय. लेप्रसिवरचे औषधही सुरु करायला सांगितले. आईवडिल कोसळले. सतात रडायचे, एक्मेकांना धीर द्यायचे. मुलाला इतर घरच्यांपासून वेगळे ठेवायला सांगितले. शेवटीआईने मन घट्ट केले व मुलाचे कपडे वेगळ्या बादलीत धुण्याकरता ठेवले व मुलाला घरातल्या घरात वेगळे कसे ठेवता येइल ह्यावर विचार सुरु केला. वडिलांनी ते वेगळे भिजवलेले कपडे पाहिले तेव्हा त्यांना गलबलले, म्हणाले, घरातून असे मुलाला वेगळे काढू नकोस. होणारच असेल तर हा रोग झाला आपल्या सगळ्यांना होउदे. पण आपण त्याला वेगळे नको काढायला. नंतर मग घरच्याच एका वडिलधार्‍यांच्या सूचनेनुसार एका चांगल्या आयुर्वेदीक डॉ. ला सेकंड ओपिनियन म्हणून दाखवले. त्यांनी त्या स्कीन्वाल्या डॉ. ला लाखोली वाहीली व औषधोपचार सुरु केला. त्यांच्या औषधाने तो डाग २-३ वर्षात कायमचा गेला. ही घटना जवळपास २० वर्षांपूर्वीची आहे. ह्या सर्व घटनेत, मुख्य गुन्हेगार होता, चुकीचे निदान करणारा डॉक्टर, पण त्याचे एक पैशानेही वाकडे झाले नाहे...तो मोकाटच सुटला. भरडले मात्र गेले ते कुठुंब.

.

ऑं ! कर्तव्यनिष्ठ सरकारी आयडीला का राग एतो ?
एकांद्याने खुस केलं कि त्येनला खुस करायाच पायजेल. ये सरकार बीचमे क्युं टपकती ? उधरसे कुच मिला क्या ?

सामान्य लोकांना आलेल्या वाइट अनुभवांच्या चर्चेत मेडिकल टुरिझम कसं घुसलं बुवा?

१. सामान्य लोक मेडिकल टुरिझम मध्ये मिळत असलेली सेवा/सुविधा घेतात का?
२. सामान्य लोकांना सेवा देणारे, माॅम ॲंड पाॅप क्लिनीक/हाॅस्पिटल चालवणारे डाॅक्टर्स मेडिकल टुरिझमशी सुद्धा संबंधित आहेत का? असल्यास त्यांचं प्रमाण किती?

हेच लिहिणार होतो.
बाहेरच्यापेक्षा इथले डॉक वाईट हे मान्य नाहीच. पण त्यासाठी मेडीकल टुरिझमचा आधार घेतला ते पटलेले नाही.

जेव्हा जगभरातले लोक इथे स्वस्त व चांगली सेवा म्हणून येतात, तेव्हा ते स्वस्त भारतीयांनापण स्वस्त वाटेल असे स्वस्त असते की त्यांच्या देशाच्या मानाने स्वस्त असते?

या सेगमेंटमधील जास्त मार्जीन देणारे कस्टमर अजुन यावेत म्हणुन केवळ, त्यांना विशेष वागनुक (चांगले बोलणे, स्टाफ कडुन चांगली वागणुक ई. ई.) मिळत नसेलच कशावरुन, जी इतरवेळेला निव्वळ पेशंट म्हणुन सगळ्यांनाच मिळायला हवी?

त्यांच्या देशाच्या मानाने स्वस्त असते.

आमच्या नगर जिल्ह्यात मस हुश्शार हुश्शार डॉक्टर आहेत. आमचा त्यांच्यावर भरवसा पण आहे. तरी मेडिकल टुरिझम विळद घाटात तर दिसला नाही बॉ. आणखी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये चालत असेल कदाचित.

स्पॉक,
हे खरे आहे. परदेशी नागरीक जास्त पैसा देतात.. पण त्यांच्या देशात ती सेवा आणि उपचार उपलब्धच नसतात. भारतीयांच्या नजरेतून ते चार्जेस जास्तच असतात तरी परदेशी नागरीकांना ते पंचतारांकीत हॉटेल्स्मधील वास्तव्यापेक्षा स्वस्तच वाटतात.. अर्थातच त्यांना जास्त चांगली ट्रीटमेंट मिळते आणि हे आताचे नव्हे तर विजया मेहता यांनी दिग्दर्शीत केलेल्या लाईफलाईन मालिकेच्या काळापासूनचे आहे.

परदेशी नागरीकांना जास्त महत्व देतांना अ‍ॅडमिट असलेल्या पेशंटस कडे दुर्लक्ष केल्याचा अनुभव मी स्वतः आणि एका मायबोलीकरणीने घेतला आहे... पण त्याबाबत लिहावे असे तिला वाटत नाही.

>>परदेशी नागरीकांना जास्त महत्व देतांना अ‍ॅडमिट असलेल्या पेशंटस कडे दुर्लक्ष केल्याचा अनुभव मी स्वतः आणि एका मायबोलीकरणीने घेतला आहे<<

चला, मेडिकल टुरिझम वाल्यांचे पण पाय मातीचेच असतात यावर दिनेश यांनी शिक्कामोर्तब केलं...

>> पण त्यांच्या देशात ती सेवा आणि उपचार उपलब्धच नसतात.<<
"स्वस्तात" हा शब्द घाला, नाहितर योरप्/अमेरिकेतुन लोकं थायलंड, भारतात उपचाराकरता गेले नसते (आल्टर्नेट मेडिसीनचा अपवाद)...

बाहेरच्यापेक्षा इथले डॉक वाईट हे मान्य नाहीच.>>>>>>अहो सगळेच डॉक्टर येडे किंवा बिनडोक आहेत असं कोण म्हणतय?
राज +१.
मेडिकल टुरिजम्चं म्हणाल तर स्वस्ताई एक कारण असलं तरी काही शस्त्रक्रिया, ट्रिटमेंट संबंधित अस्तित्वात नसलेले रेग्युलेशन हे सुद्धा एक कारण आहे. इथे अमेरिकेत बर्‍याच ट्रिटमेंटला अजून मान्यता दिली गेलेली नाही आणि मग लोकं बाहेर जाऊन त्या करवून घेतात. ते मेडिकल टुरिजमचा दाखला देणं म्हणजे वेडेपणा आहे. बाहेरुन लोकं आपल्या इथे भारतात येतात ते म्हणजे आपल्या टेकनिक किंवा डाक्टर जास्त अ‍ॅडवान्स्ड आहेत म्हणून थोडीच येतात का? भारतातल्या लोकांना परवडेल त्यापेक्षा महागात पडतं ह्या लोकांना पण त्यांना जितके इथे पैसे लागतील त्यापेक्षा कमी आहे म्हणूनच येतात ना?

भारतात पुर्वी पासून ओळखीचे डॉक्टर नसतील तर फार त्रास आहे हे मात्र खरं आहे. बहुतांश डॉक्टरांनी त्यांचे स्वतःचे हॉस्पिटलं बांधलेली आहेत त्यामुळे काही अपवाद वगळता ह्या सगळ्या लोकांचा पहिला मुद्दा असतो म्हणजे त्यांनी ओतलेल्या पैशाची रिकवरी. मध्यंतरी आईची सर्जरी करायची वेळ आली तेव्हा ह्या अनुभवातून गेलो. ओळखीचे डॉकटर सतत बरोबर नसले असते सल्ला द्यायला तर अवघड परिस्थिती झाली असती.

आणि हो, ते भारताताची लोकसंख्या आणि वर ज्यांचा बाबत चर्चा सुरु आहे ते येडे डॉक्टर ह्यांचा काय संबंध?
ओवॉरॉल मेडिकल सायन्स क्षेत्रात प्रगती झाली आणि त्यामुळे लाईफ एक्स्पेक्टन्सी वाढली आहे. आता साधे वाटणार्‍या आजारांनी लोकं पटापट मरायची असा फरक झाला आहे पण बाकी प्रगत देशांच्या मानानी भारतात लोकं जस्त पटापटच मरतात फक्त आपली लोकसंख्याच इतकी जास्त आहे की लगेच पेपरात "आज भारत पाव टक्क्यांनी कमी झाला" अशी बातमी येऊन तुम्हाला सुगावा लागत नाही. भारतात नं १ किलर आजार म्हणजे कोरोनरी हार्ट डिसिज आहे. आता मला सांगा दारिद्र्य रेषेखालचेच काय तर त्याच्या वर असलेली सुद्धा किती लोकं एखादी तरी स्वतःचं आयुष्य वाढेल अशी स्पेशल प्रोसिजर करवून घ्यायची ऐपत ठेवतात?

माझ्या प्रतिसादातल्या फक्त एकाच वाक्यावर प्रतिसाद आले आहेत. त्यावरुन सर्वाना इतर कॉमेन्ट मान्य आहेत असे धरायला हवे. येथे आलेल्या अनेक प्रतिसादावरुन भारतातील डॉक्टर त्यानी हॉस्पिटल व शिक्षणासाठी केलेला खर्च वसूल करण्यासाठी काहीहि उपचार करतात असे दिसले त्यावरून माझ्या मित्राने असे सन्गितले.

परदेशी नागरीकांना जास्त महत्व देतांना अ‍ॅडमिट असलेल्या पेशंटस कडे दुर्लक्ष केल्याचा अनुभव मी स्वतः आणि एका मायबोलीकरणीने घेतला आहे...

हम. हे वाईट आहे.

आणि हो, ते भारताताची लोकसंख्या आणि वर ज्यांचा बाबत चर्चा सुरु आहे ते येडे डॉक्टर ह्यांचा काय संबंध?

काहीच संबंध नाही. भारतातील डॉक्टरांची निदान करण्याची क्षमता कनिष्ठ झालीय, याबाबत एक प्रश्न होता तो.
(ती श्रेष्ठ जरी असली, तरी आलेल्या वाईट अनुभवांशी त्याचा संबंध नाही.)

<<सामान्य लोकांना आलेल्या वाइट अनुभवांच्या चर्चेत मेडिकल टुरिझम कसं घुसलं बुवा? >>

दिगोची यांनी आत्ता पुन्हा लिहिलंच आहे.

इथून.

<<दिगोचि | 24 February, 2016 - 05:46

मेडिकल कॉलेजमधे प्रवेश मिळवण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात तेम्व्हा फक्त श्रीमन्त आइबापान्च्या मुलाना प्रवेश घेणे शक्य होते मग त्यन्ची लायकी असो वा नसो बहुधा नसतेच. असे अनेकजण इस्पितळात काम करत असत्तात. त्याना निदान करणे जमतच नाही. माझे एक मित्र आहेत ते म्हणतात की आजकालच्या डॉक्टरान्ची diagnostic ability कनिश्ठ दर्जाची आहे. म्हणुन अशा प्रकारची पैसे काढु परिस्थिती आहे. माझे मित्र स्वतः उत्तम cardiologist आहेत आणि येथिल युनिव्हर्सिटिमधे गेली अनेक वर्शे शिकवत आहेत. ते म्हणतात की सुट्टीला भारतात गेलात आणि आजारी पडलात तर तिथे उपचारासठी राहु नका लगेच परत या>>

कर्तव्यनिष्ठ , जबाबदार, प्रामाणिक, लोकाभिमुख सरकारी आयडीचा वन वे स्कॅनर चालू आहे की बंद झाला ? म्हणजे पुढचे अनुभव लिहायला.

हे दिगोची यांच्या मित्राचे पर्सनल अनुभव आणि त्यातून आलेले तितकेच पर्सनल उद्गार आणि आमीरचे तितकेच पर्सनल उद्गार याची तुलना करायची का? Wink

मला वाटतं प्रत्येकाने स्वतःचे अनुभव लिहिताना इथे खरे अनुभव लिहावेत, स्वतःचे भावूक शब्द घालून लिहू नयेत. तसेच सांगोवांगीचे अनुभवसुद्धा लिहु नयेत. कारण सांगोवांगीच्या गोष्टी असतात एक आणि पाहिल्या जातात दोन, सांगितल्या जातात तीन आणि लिहिल्या जातात चार. (हे वाक्य तो लहान मुलाला अत्यंत गंभीर आजार झाला आहे आणि त्यावर डॉ ने मित्र मैत्रिणींना बोलावून सांगितले बघा बघा त्या अनुभवाशी संबंधित आहे.)

मी आजवर अनेक डॉ पाहिलेत डॉ म्हणून आणि मित्र मैत्रिण म्हणून सुद्धा, पण पेशंट तपासताना किंवा काम करताना असा थिल्लरपणा करताना कोणालाही पाहिले नाही आहे. आणि माझी खात्री आहे की ते कधीही पाहाणार नाही. दीमा, ह्यांनी सांगितलेला प्रॉटोकॉल बाजूला ठेवला तरी मला खात्री आहे की प्रत्येक डॉने इतक्या वेदना आणि इतकं दु:ख पाहिलेलं असतं की डॉ काम करताना थिल्लरपणा करण्याच्या स्वभावाचा राहिलेला नसतो. पर्सनल आयुष्यात तो एक व्यक्ती म्हणून कितीही मजा मस्करी करणारा माणूस असला तरी पीजी लेव्हल चा डॉ पेशंटला तपासताना कधीच थिल्लरपणा करणार नाही, (जरी एखादा डॉने एखाद्या स्त्री पेशंटचा विनयभंग केला असला तरी तो त्या किश्श्यात सांगितलाय तसा उघडपणे थिल्लरपणा करणार नाही) डॉ चे आपापसात गप्पा मारणे हा थिल्लरपणा नाही. किंवा पेशंटच्या समोर एखादा जोक आपापसात मारणे हा ही थिल्लरपणा नाही.

मान्य आहे की काही डॉ पेशंट च्या समोर स्वत:चे पर्सनल कॉल घेतात, ओटी मध्ये ऑपरेशन करताना गप्पा मारतात जोक्स करतात. पण का करु नये त्यांनी. जर एखादा डॉ दिवसभर काम करत असेल आणि पर्सनल लाईफ जगायला पुरेसा वेळच नसेल तर त्यांनी कॉल्स घेतले आनि इतर कलिग्ज बरोबर जोक्स मारले तर त्यांचे काय चुकले?

रात्री साडेतीन वाजता मी प्रसूतीवेदनांनी तळमळत असताना आणि त्यानंतर चार वाजता सीझेरियन करतानाहीमाझ्या गायनॅक आणि नर्सेस किस्से सांगत जोक्स सांगत आणि पर्सनल गप्पा मारत बसल्या होत्या, मला नाही कधी त्यात वावगे वाटले. (माझ्यासोबत माझा नवराही होता आणि तो तर सरळ सरळ माझ्या वेदनांवर आणि माझ्या किंचाळण्यावर जोक्स मारत होता, त्याक्षणी त्याचा मात्र राग आला होता, की मी एवढी तळमळतेय आणि तू माझ्याचवर जोक्स कसले मारतोयस) एकतर त्यांना मी पैसे देतेय म्हणून मी माज दाखवू नये, ते माझ्यासाठी स्वतःची रात्रीची झोप मोडून थांबले होते तिथे. आणि मी हे अशी एकच रात्र जागणार होते, हे डॉ नर्सेस अशा किती रात्री जागरण करतात विचार करतो का आपण. आणि आपण आपल्या कामाच्या ठिकाणी मजा मस्करी करत नाही का. मग डॉनीच का नाही करायची, त्यांना स्ट्रेस बस्टरची गरज नसते का.

आणि डॉ आणि नर्सेस जर स्वतःच्या रेस्ट रूम्स मध्ये जिथे पेशण्ट नसतो तिथे एखाद्या पेशण्ट बद्दल किंवा नातेवाईकाबद्दल बोलत असतील तर तुम्ही त्याचा राग का मानावा? तुम्ही स्वतः कधीच कोणाचे दोष काढले नाहीत का कोणाच्या पाठीवर? तुम्ही कोणाची टर उडवली नाही का कोणाच्या पाठी?

एखादा डो जर प्रत्येक वेळी प्रत्येक पेशंटशी उर्मटपणे उद्धटपणे बोलत असेल तर त्याचा स्वभाव दोष आहे तो आणि त्याने तो बदलायला हवा कमीतकमी कामाच्या वेळी तरी, पण असं सुद्धा असू शकतं ना की एखादा डॉला त्याचा पर्सनल काही तरी प्रॉब्लेम आहे, अगदी काही दुखतय खुपतय आणि तो तुमच्यावर चिडला काही कारणाने. लिहिणारे तुम्ही स्वतः सगळेजण कधीच कोणावर खेकसत नाही का? अगदी बुद्धाच्या शांतपणे आणि संयतपणे करता का सगळं?

अजून एक डॉ वर आरोप केला जातोय, त्यांच्या फी बद्दल, अरे तुम्हाला जर पटत नाही त्यांची फी, तर जाऊ नका ना त्यांच्याकडे. त्या डॉ ने जबरदस्ती केलीये का की तुम्ही त्यांच्याचकडे जा. जा एखाद्या ट्रस्ट मध्ये ट्रीटमेण्ट करून घ्यायला. डॉ चांगला पाहिजे, सुखसोयी पाहिजेत तर तुम्हाल अफी नको का भरायला त्याप्रमाणे. पोस्ट ग्रॅज्युएट होई पर्यंतचा शिक्षणाचा खर्च मग क्लिनिक सेटप करायचा खर्च .. तो काय स्वतःला बरं करायचय म्हणून क्लिनिक उघडून बसलाय का? मग तो त्याने कुठून परत मिळवायचा? आणि डॉ ला घर नसतं का चालवायचं, त्याच्याही घरात माणसं असतात ज्यांच्या औषध पाण्याचा, शाळेचा खर्च त्याला करायचा असतो. मग त्याने फी का नाही घ्यायची. एखादा डॉ कमी पैशात ट्रीटमेण्ट करतो म्हणून सगळ्यांनीच करायची का?

इथे नाही पण बाहेर मी अनेकांना ऐकलय बोलताना की आमच्या जीवावर डॉ ने नवी गाडी घेतली, अरे तुम्ही सुद्धा घेताच ना नव्या गाड्या, तेव्हा तुम्ही तुमच्या कस्टमरच्या जीवावर कंपनीच्या जीवावर घेतली असं बोलून दाखवतं का कोणी.

तुम्ही साधी साडी आणि गाडी विकत घेता तेव्हा किती चौकश्या करता, मग ज्या डॉ च्या हातात तुम्ही स्वतःला सुपूर्त करता बरं करायला त्या डॉची माहिती मिळवून जाता येत नाही का तुम्हाला? उठले आणि शिरले डॉ च्या दवाखान्यात असं का करता?

मी पुन्हा म्हणतेय ह्या सगळ्याचा अर्थ असा नाही की मी अमान्य करतेय की डॉ चुकीची प्रॅक्टिस करतात. आहेत असे अनेक जण, खोटे डॉ सुद्धा आहेत. पण आपल्याल व्हिजिलण्ट राहायला नको का? तुम्ही जर अशी कारणे देणार असाल की आम्ही मुल होण्यासाठी डेस्परेट झाले होतो, माझ्या आईबाबांना बरे नव्हते म्हणून मला काही सुचत नव्हते, म्हणून मी डॉ ला काही प्रश्न विचारला नाही किंवा मी लहान होती म्हणून डॉ ने काय सांगितले ते मला समजले नाही. तर हा तुमचा दोष आहे आणि स्वतः व्हिजिलण्ट राहाणे तुमची जबाबदारी.

तुम्ही असं कधी करता का की मी गडबडीत होतो म्हणून दार उघडच ठेवून निघालो आणि म्हणून चोराने चोरी करु नये, ती त्याची नैतिक जबाबदारी आहे? नाही ना? तुम्ही दार लावून लॉक करून जाता ना? घरातले सोने नाणे गॅलरीत मांडून ठेवता का? नाही ना ते बरोबर कडीकुलुपात किंवा लॉकर मध्येच ठेवला ना मग डॉ कडे जातानाच व्हिजिलण्ट का नाही राहात? इथे जर कोणी माझी मानसिकता म्हणून कारण देणार असेल तर तुमची मानसिकतेची जबाबदारी तुम्ही घ्या आणि आता तरी बदला, do not be emotional fool be practical.

मी पुन्हा सांगतेय की प्रत्येक डॉ प्रामाणिकच आहे असा माझा दावा नाही, तुम्हाला अप्रामाणिक डॉ भेटला असेल तर तुमच्यात एवढा स्मार्टनेस आणि डोळसपणा हवा की तुम्हाला ते समजलं पाहिजे आणि योग्य वेळी तुम्ही डॉ बदलला पाहिजे. जगात चोर कोणत्या ना कोणत्या वेशात भेटतातच, ते समजायची जबाबदारी स्वतःची असते. तुम्ही असे म्हणूच शकत नाही की तू डॉ आहेस ना मग चोर्‍या का करतोस आमच्या खिशातून, किंवा तुझी चोराची विचारसरणी आहे ना मग तुला डॉ होण्याचा अधिकार कोणी दिला? (तुम्ही स्वतः प्रत्येक गोष्टीत अगदी शंभर टक्के प्रामाणिक आहात का?)

तुम्हाला कोणत्या डॉ.चा कसा अनुभव आलाय वागलेत हे नावानिशी सांगायलाही हरकत नसते, मग त्या डॉ च्या प्रॅक्टिस वर परिणाम झाला तर ते त्याचे नशिब किंवा त्याच्या काळ्या कृत्यांसाठी त्याला झालेला दंड म्हणा हवं तर, पण तुम्ही ती सिच्युएशन आता इथे लिहिताना तरी एक थर्ड पर्सन म्हणून बघा आणि ह्यात पूर्णपणे दोष डॉ चाच आहे की ह्यात माझी काही जबाबदारी होती का की जी मी डॉ वरचा (आंधळा) विश्वास ह्या नावाखाली टाळली ह्याचा विचार करा जरा introspection करा. जसे मला खूप पोटात दुखत होते आणि रिसेप्शनिस्टने दुर्लक्ष केले, तुमच्या सोबत जे झाले ते फार वाईट झाले. खरच खूप वाईट झाले, पण मला सांगा तुम्हाला कोणी थांबवले होते का त्या डॉ च्या कॅबिन मध्ये घुसायला? तिथे आरडा ओरडा करायला? का स्वतःचा सभ्यपणा दाखवत सहन करत बसायचं अशा वेळी, ही आपली स्वतःची जबाबदारी नाही का? जर तुमच्या पोटात दुखत होतं आणि ते कसं दुखतं ते मी पाहिलं आहे, अरे दुखतय ना मग ओरडा ना जोरात कण्हतय न मग कण्हा ना जोरात का तिथे ओठात दात दाबून सहन करता? तुम्ही जर जोरजोरात कण्हला असतात तर काय बिशाद होती त्या रिसेप्शनिस्टची तुम्हाल तिथे थांबवून ठेवायची? (हे उदाहरण देतेय कारण लक्षात राहिलय. असं लॉजिक बाकीच्या सगळ्या उदाहरणात लावून बघा)

मला एवढच म्हणायचय की स्वतःवर जेव्हा अन्याय होत असतो ना तेव्हा आवाज उठवायलाच हवा, तो नाही उठवला तर आपण स्वतःच स्वतःवर अन्याय करतो. आणि मग आपल्याकडे नैतिक अधिकार उरत नाही दुसर्‍याला दोष द्यायचा. तेव्हा वाचणार्‍या प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी स्वतः पार पाडायला हवी मग आपण दुसर्‍याला दोष देऊ शकू.

>>>> अजून एक डॉ वर आरोप केला जातोय, त्यांच्या फी बद्दल, अरे तुम्हाला जर पटत नाही त्यांची फी, तर जाऊ नका ना त्यांच्याकडे. त्या डॉ ने जबरदस्ती केलीये का की तुम्ही त्यांच्याचकडे जा. जा एखाद्या ट्रस्ट मध्ये ट्रीटमेण्ट करून घ्यायला. <<<<
वेल, बाकी तुमची तळमळ पोहोचली, पण वरील वाक्य जरा अतिच होते असे नाही का वाटत?
हे म्हणजे फ्रेंच राज्य क्रांतीच्या वेळचे ते प्रसिद्ध वाक्य "ब्रेड नै मिळत तर केक खा" च्या धर्तीवरचेच फक्त उलटे वाटते आहे.
जर सरकारी/ट्रस्ट वगैरेंच्या इस्पितळात "व्यव्स्था" चांगली अस्ती तर लोक खाजगी दवाखान्यांकडे ढुंकुनही पहाणार नाहीत हे सत्य, व आम्ही आमच्या पूर्वीच्या काळी ८०/९० च्या दशकांच्या आधी चांगली व्यवस्था असलेली स्रकारी इस्पितळे अनुभवली आहेत. नम्तर मात्र या इस्पितळात काम करायलाही कोणि डॉक्टर मिळेनासे झाले , खेड्यपाड्यात जायलाअ तयार नाही, तेव्हा सरकारला मिनिमम नोकरीच्य अटी बनवाव्या लागल्या हे वास्तव कसे विसरता?
एके काळि पुण्यात ससुन हे "फायनल" इस्पितळ होते, नावाजलेले होते, केईएम्/जहांगीर्/रुबी वगैरे बरीच नम्तरची..... इतर दुकाने तर त्याहुन नंतरची.
तेव्हा, वरील वाक्यामुळे जे अप्रत्यक्ष समर्थन होते आहे पेशम्टला बलीच्या बकर्‍या प्रमाणे आर्थिक दृष्ट्या कापुन काढण्याचे ते अनावश्यक आहे. असे माझे मत.

किंबहुना पुर्वी फक्त "कोर्टाची पायरी" चढु नये इतकीच म्हण होती... नम्तर त्यात पोलिस स्टॅशनही आले, वकिलही आले, आता इच्छा येवढीच आहे की "डॉक्टारची पायरीही चढू नये' असे म्हणण्या इतपत मानसिकता पब्लिकची होण्या आधीच तमाम खिसेकापू डॉक्टर/वैद्यकी/औषधे/इस्पितले या व्यवस्थेने स्वतः स सुधरवुन घ्यावे.

ण मला सांगा तुम्हाला कोणी थांबवले होते का त्या डॉ च्या कॅबिन मध्ये घुसायला? तिथे आरडा ओरडा करायला?<<< म्हणजे पेशंटने गुंडागर्दी करायची? त्या रिसेप्शनिस्टला दोन चार फटके देखील हाणायचेच नाही का? हेवी ब्लीडींग हा काय प्रकार असतो तो माहित आहे का?

तुम्हाला अप्रामाणिक डॉ भेटला असेल तर तुमच्यात एवढा स्मार्टनेस आणि डोळसपणा हवा की तुम्हाला ते समजलं पाहिजे आणि योग्य वेळी तुम्ही डॉ बदलला पाहिजे<<< तोपर्यंत तुमचं रामनाम सत्य है झालं तर ती तुमचीच चूक. कारण तुम्ही स्मार्ट नाये!!!

तुम्ही असं कधी करता का की मी गडबडीत होतो म्हणून दार उघडच ठेवून निघालो आणि म्हणून चोराने चोरी करु नये, ती त्याची नैतिक जबाबदारी आहे? नाही ना? तुम्ही दार लावून लॉक करून जाता ना? घरातले सोने नाणे गॅलरीत मांडून ठेवता का? नाही ना ते बरोबर कडीकुलुपात किंवा लॉकर मध्येच ठेवला ना मग डॉ कडे जातानाच व्हिजिलण्ट का नाही राहात? इथे जर कोणी माझी मानसिकता म्हणून कारण देणार असेल तर तुमची मानसिकतेची जबाबदारी तुम्ही घ्या आणि आता तरी बदला, do not be emotional fool be practical.<>>>> तुमच्या घरात चोर आलाच तर उद्या पोलिस तुम्हाला "तुम्ही व्हिजिलंट नाही म्हणून चोरी झाली तस्मात आम्ही काही करू शकत नाही" असे कारण देतील. चालेल? त्यावेळी तुम्ही तुमचा सर्व प्रॅक्टिकलपणा अवश्य दाखवाल ना?

मान्य आहे की काही डॉ पेशंट च्या समोर स्वत:चे पर्सनल कॉल घेतात, ओटी मध्ये ऑपरेशन करताना गप्पा मारतात जोक्स करतात. पण का करु नये त्यांनी. जर एखादा डॉ दिवसभर काम करत असेल आणि पर्सनल लाईफ जगायला पुरेसा वेळच नसेल तर त्यांनी कॉल्स घेतले आनि इतर कलिग्ज बरोबर जोक्स मारले तर त्यांचे काय चुकले?<<<< हापिसात काम करतानाही तुम्ही पर्सनल कॉल्स घेऊन त्यावर तासभर बोलता का? कस्टमर असेल तर त्याच्यासमोर आज रात्री काय भाजी करावी यावर नवर्‍याबरोबर गप्पा मारता का? कस्टमर बसलेला असताना कलिगबरोबर "आजची मॅच काय फाडू झाली" वगैरे गप्पा मारता का? मीटिंग चालू असेल तर तिथे इतर विषयावर फिदीफिदी हसत बस्ता का? डॉ. ला पर्सनल लाईफ नसते हेच म्हणणे प्रत्येक डॉक्टरकडून ऐकलेले आहे. पेश्ट बरा करणे अगदी कुठल्याही वेळेत हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांनी शिक्षण घेतले आहे, आणि तशी शपथही घेतली आहे.

प्रोफेशनल एथिक्स नावाची काही गोष्ट असते बाई. समोर पेशंट उर्फ कस्टमर बस्ला असेल तर त्याच्यासमोर पर्सनल कॉल्स घेणे चुकीचेच. अगदी इमर्जन्सी कॉले असेल अथवा दुसर्‍या एखाद्या पेशंटचा कॉल असला तर एक वेळ समजू शकतो. पण पेशंटसमोर कलिग्जसोबत हस्णे खिदळणे कधीही क्षम्य नाही. (पेशंटदेखील त्यात सामिल असेल तर गोष्ट वेगळी पण तरीही डेकोरम हा सांभाळावाच.) हॉस्पिटल हसतखेळत आणि प्रसन्न असलेले कुणालाही आवडेल, पण पेशंटवरून विनोद??

तुम्हाला कोणत्या डॉ.चा कसा अनुभव आलाय वागलेत हे नावानिशी सांगायलाही हरकत नसते, मग त्या डॉ च्या प्रॅक्टिस वर परिणाम झाला तर ते त्याचे नशिब किंवा त्याच्या काळ्या कृत्यांसाठी त्याला झालेला दंड म्हणा हवं तर, पण तुम्ही ती सिच्युएशन आता इथे लिहिताना तरी एक थर्ड पर्सन म्हणून बघा आणि ह्यात पूर्णपणे दोष डॉ चाच आहे की ह्यात माझी काही जबाबदारी होती का की जी मी डॉ वरचा (आंधळा) विश्वास ह्या नावाखाली टाळली ह्याचा विचार करा जरा introspection करा.<<< जरी समजा माझी चूक होती हे मान्य करूया, मग काय? डॉ. च्या प्रॅक्टीसवर परिणाम होणं ना होणं हा भाग अलाहिदा. पण जर मला वाईट अनुभव आला आणी मी तो मांडला तर त्यात परत मी माझीच चूक म्हणू का? तुम्ही आजवर तुम्हाला आलेले वाईट अनुभव कधीच इतरांसमोर मांडले नाहीत का?? की त्यात अप्रत माझीच चूक असेल म्हणून गप्प बसला आहात???

वेल, फार काही न लिहिता, इथल्यासारखे वाईट अनुभव कधीही तुमच्या वाट्याला न येवोत, इतकेच लिहितो.

(जरी एखादा डॉने एखाद्या स्त्री पेशंटचा विनयभंग केला असला तरी तो त्या किश्श्यात सांगितलाय तसा उघडपणे थिल्लरपणा करणार नाही)>>>>>> अरेरे! हे काय आहे?? Uhoh Uhoh

अजून एक डॉ वर आरोप केला जातोय, त्यांच्या फी बद्दल, अरे तुम्हाला जर पटत नाही त्यांची फी, तर जाऊ नका ना त्यांच्याकडे. त्या डॉ ने जबरदस्ती केलीये का की तुम्ही त्यांच्याचकडे जा. जा एखाद्या ट्रस्ट मध्ये ट्रीटमेण्ट करून घ्यायला. <<<< अतिशय असंवेदनशील विधान!!! थोडक्यात ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं डॉक्टरबद्दल बोलायचं नाही. त्याला तसा नैतिक अधिकार नाही.

तुम्ही साधी साडी आणि गाडी विकत घेता तेव्हा किती चौकश्या करता, मग ज्या डॉ च्या हातात तुम्ही स्वतःला सुपूर्त करता बरं करायला त्या डॉची माहिती मिळवून जाता येत नाही का तुम्हाला? उठले आणि शिरले डॉ च्या दवाखान्यात असं का करता?>>> पुन्हा एकदा असंवेदनशील विधान!! इमर्जन्सीमध्ये हार्ट अ‍ॅटॅक आलेला असताना किंवा मिसकॅरेज होत असताना तुम्ही डॉक्टरच्या डिग्रीज बघणार आहात का? बरं, डॉक्टरची माहिती मिलवली, आणि त्याने तुमच्याच ट्रीटमेंटमध्ये चूक केली तर तुमचीच चूक.
चार वर्षाच्या मुलाला किडनी स्टोनच्या त्रीटमेंटसाठी अ‍ॅडमिट केले असताना नर्स येऊन त्याला ओटीमधेय घेऊन गेली आणि सर्जननी मागेपुढे काही न बघता त्याची सुंता केली. सुंता करायचा पेशंट भलताच. आता ही त्या पेशंटचीच चूक कारण त्याला सांगता आलं नाही!!!! पेशंटचय आईवडलांची चूक कारण ते खेड्यामधून आले होते आणि नक्की काय ट्रीटमेंट चालू आहे हे त्यांना समजलं नाही.

मला एवढच म्हणायचय की स्वतःवर जेव्हा अन्याय होत असतो ना तेव्हा आवाज उठवायलाच हवा, तो नाही उठवला तर आपण स्वतःच स्वतःवर अन्याय करतो. आणि मग आपल्याकडे नैतिक अधिकार उरत नाही दुसर्‍याला दोष द्यायचा. तेव्हा वाचणार्‍या प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी स्वतः पार पाडायला हवी मग आपण दुसर्‍याला दोष देऊ शकू.>>>> एक्झाक्टली, इथे प्रश्न अन्यायाचा नाही तर फसवणुकीचादेखील आहे. आणि ज्याची फसवणूक झाली आहे त्याने इतरांना त्याबद्दल सांगणे यात काहीच चुकीचे नाही. नैतिक अधिकार कसला डोंबलाचा!!!!

वेल, फार काही न लिहिता, इथल्यासारखे वाईट अनुभव कधीही तुमच्या वाट्याला न येवोत, इतकेच लिहितो.>>>

गजानन + १

आमच्या ग्रामिण भागात एक म्हण आहे तिचा मतितार्थ तेवढा देतो. ''प्रसुतीच्या वेदना केवळ त्या स्त्रीलाच ठाऊक असतात जी अनुभवते''..

ज्यांनी डॉक्टरां कडून वेदना अनुभवल्यात त्या इथे मांडलेल्या आहेत... त्यावरील आपली मते खुपच रुक्ष आणि एकांगी.. असो..

नंदिनी, अचूक मत मांडलयं!

Pages