"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे >>>> हे केलय त्याने? :कपाळ बडवणारी बाहुली:

वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. >>>>> येस्स!! असेच घडेल असे कुठल्यातरी बीबीवर लिहिले होतेच. वाचिक अभिनय हा बॉलीवूडवाल्यांनी ऑप्शनला टाकलेला विषय असतो आणि रणवीर सिंग त्यतच भारी आहे.

भन्साळीकडून ज्या अपेक्षा होत्या तसाच आहे म्हणायचा चित्रपट. या चित्रपटाकडे इतिहास म्हणून कुणी बघणार नाहीच.

रणवीर खरेच खुप मनापासून काम करतो. पुर्वी रविंद्र मंकणी चा चेहराच बाजीरावाचा वाटायला, आता त्याचा वाटेल.

रविंद्र मंकणी चा चेहराच बाजीरावाचा वाटायला >>>> रविंद्र मंकणीचा चेहेरा माधवरावाचा नाही वाटला का कधी ? Happy

रविंद्र मंकणीचा चेहेरा माधवरावाचा नाही वाटला का कधी ? >>>>>>>>>>> Happy हो त्याने माधवरावांची भुमिका केलेली ना?

खूपच चांगले परीक्षण . लुटेरा पाहिल्यापासून रणवीर माझा तरी अतिशय आवडता अभिनेता झालाय . नक्कीच त्याने बाजीरावाच्या भूमिकेत घुसून एकदम तडफदार अभिनय केला असणार यात काहीच शंका नाही .तरीपण बाजीरावांच्या व्यक्तीरेखेसाठी मला कुठल्याच फिल्मी चेहरयाची कल्पना करवत नाही
बाजीराव ,मस्तानी ही नाव घेताच माझ्या मनात अगदी वेगळ्याच प्रतिमा दिसू लागतात त्याला तडा जाऊ नये म्हणून तरी मी भंन्साळीन्चा बा म. बघणार नाही.

Chris Hemsworth ला बाजीराव म्हणून घ्यायला हवे होते. (बाजीरावचे डोळे घारे निळेच होते असे म्हणणार्‍यांचा आत्मा सुखावला असता)

सोशल मिडियामधे आलेली आणि चांगली वाटलेली एक प्रतिक्रिया देत आहे.

पुण्यात बाजीरावचा शो बंद पाडला गेला!
कुणाला काय बोलायचे आहे ते बोलो, हे व्हायलाच हवे होते आणि झाले ते बरेच झाले. ह्या मूर्ख गल्लाभरू हिंदी सिनेमावाले आता ह्या ऐतिहासिक पुरुषांच्या जीवावर सुद्धा स्वत:चा गल्ला भरत आहेत.
ऐतिहासिक विषयांवर चित्रपट काढताना एक प्रामाणिकपणा असलाच पाहिजे. हा प्रामाणिकपणा बहुतेक सर्व ऐतिहासिक व्याक्तीत्वांच्या चित्रपटातून दिसला आहे. गांधी (बऱ्याच अंशी), Making of Mahatma, सरदार, नेताजी The Forgotten Hero, वीर सावरकर ई.

चित्रपट हे कलेपेक्षा पैसे कमावण्याचा धंदा अधिक आहे हे माहित आहे, आणि एका चित्रपटावर होणारा खर्च लक्षात घेता ते मान्यही आहे. commercial चित्रपट तयार करतानाच त्यातील कला जपण्याचा प्रयत्न करणारे अनेक उत्तमोत्तम कलाकार (त्यात दिग्दर्शकदेखील आलेच) आपल्याकडे होऊन गेले, त्यांना मनापासून मुजरा आहे!

ऐतिहासिक पुरुषांच्या; व्यक्तित्वांच्या जीवनावरील चित्रपट काढताना पैसा कमविणे ह्याहून अधिक काही असे उद्दिष्ट हवेच हवे! हिंदी चित्रपटवाल्या पोट फुटेस्तोवर पैसे कमावलेल्या कशाचीही चाड न उरलेल्या मंडळींकडून हि अपेक्षाच नाही, आणि म्हणूनच त्यांनी असल्या विषयांना हात घालूच नये!

पण नाही! ह्यांना चैन पडत नाही. इतिहासातील एक पुरूष घ्यायचा, एक बाई घ्यायची आणि काढायचा त्यावर एक चित्रपट. मोठमोठे नाव असलेले (पण तेवढी लायकी नसलेले) नट-नट्या घ्यायच्या (हे शब्द हल्ली विसरलेत लोक, पण ह्या मंडळींना कलाकार म्हणणार नाही, त्यांच्यासाठी कला दुय्यम आहे, जमली तर कला दाखवायची, मूळ उद्देश पैसा!), भव्य देखावे उभे करायचे आणि वाट्टेल ती कथानके जोडून ह्या ऐतिहासिक कर्तृत्ववान पुरुषांविषयी चित्रपट काढायचे! हलकट साले! बरे झाले मुस्काड फोडून सगळे शो बंद केले!

कोण तो अफवा पसरवत आहे रे ... थोरल्या श्रीमंतांचे डोळे काळे होते Wink उगा निळे पिवळे करू नये.

- आदेशाहून
शनवारवाडा.

सोशल मिडियामधे आलेली आणि चांगली वाटलेली एक प्रतिक्रिया देत आहे.

असो. संजय लीला भन्साळी बद्दल मला अजिबात प्रेम नाही.
मी शक्यतो कोणताच सिनेमा पहात नाही, बाजीराव मस्तानी पण पाहणार नाही.
पण....
सिद्ध करायचा मुद्दा वेगळाच होता. तो असा की,
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे का तुमचा?तर मग 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि 'बाजीराव मस्तानी' हे विकृतीकरण हे कसं काय?

(मधले अनावश्यक गाळण्यात आले आहे)

इतिहासाचं विकृतीकरण हा तुमचा मुद्दा असेल तर 'मी नथुराम बोलतोय' हे सर्वात मोठं विकृतीकरण आहे. य.दि. फडके यांचं 'नथुरामायण' हे पुस्तक किंवा कुरुन्द्करांचा 'गांधीह्त्त्या आणि मी' हा लेख वाचा म्हणजे कसं ते तुमच्या लक्षात येईल.
'मी नथुराम' च्या खोट्या पल्लेदार वाक्यांवर टाळ्या पिटणं थांबवा, मग तुम्हाला बाजीराव मस्तानीला विरोध करण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होईल.

---- Vishwambhar Choudhari (फेसबुक सभार)

माझ्या प्रतिक्रियेनंतर आवर्जुन आलेल्या प्रतिक्रियेबद्दल - - - - -
चौधरी नामक व्यक्तीने लिहिलेले अगदी बरोबर आहे. तसेही मला नथुराम, त्याने केलेले कृत्य आणि त्याचे समर्थन हे सगळेच अगदीच डोक्यात जाते. त्यामुळे असल्या विषयावर नाटक बिटक काढले गेले हे अजिबातच कौतुकास्पद नाही. हे.मा.वै.म.

.

फडणवीस वहिनींना बाजीराव मस्तानी चित्रपट फार आवडला. त्यांनी तो पहिल्याच दिवशी आवर्जुन बघितला.

भक्तांची (खासकरून पुण्यातल्या भक्तांची) काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यास उत्सुक्त आहे

वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. >>>>>
Great !!! Only Ranveer can do this .. Love Ranveer ... definitely have to watch the movie ASAP !

मी राऊ सिरीयल बद्दल नव्हतो बोलत, त्यापूर्वी एक नाटक आले होते. राऊ मी बहुतेक नाही बघितली. पेशव्यांच्या कारकिर्दीवर बरीच नाटके येऊन गेली. आता मंकणी बद्दल पण आठवण दगा देतेय कि काय ?

Pages