"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जी काही चर्चा सुरु आहे ती विषयाला धरुनच सुरु आहे. विषयाच्या अनुषंगानेच सुरु आहे. निदान मी तरी काड्या वगैरे घालत नाही. तो माझा स्वभावच नाही.

निंबुडा, इथे ही लिंक वाचा: http://vargiskhan.com/log/legend-shaniwar-wada-fort/

हा एक परिच्छेदः
It is believed that Raghunathrao never wanted to kill his nephew and only asked Gardis for help in order to get out of captivity. According to popular legend, Raghunathrao had sent a message to Sumer Singh Gardi to capture Narayanrao. His message read “Narayanrao la dhara” where dhara means to capture. This message was intercepted by his wife Anandibai who changed the letter dhara to make it read as maaraa or ‘kill’ . The miscommunication led the Gardis to chase Narayanrao and finally kill him. Rumor has it that Narayanrao’s body was hacked into so many pieces that they had to carry the pieces in a pot.

अमेय Lol

बी तुम्ही डोण्ट टेक इट पर्सनली.. आता मिसोच नाव काढल्यावर आम्ही पोरींनीसुद्धा (जाई, मी आणि अन्जु) गुण उधळलेच की पण घेतल का अमेयच वाक्य मनला लावुन?

ध चा मा Lol
तेव्हाच्या राजेरजवाडे लोकांना किंवा त्यांच्या लेखनिकांना 'फर्स्ट टाईम राईट' असा केआरए नसल्याने खाडाखोड झाली तरी 'चुकतो तो माणूस" या उदात्त विचाराने ग्राह्य धरली जात असावी. गार्दी हे नाव जरी विचित्र वाटत असले तरी ते ही माणूसच असल्याने त्यांनी खाडाखोडीकडे काणाडोळा करून खाली फक्त राघोबादादांची सही पाहून काम केले. आनंदीबाईंनी नारायणरावांचे नाव खोडून तुमचे किंवा स्वत:चे नाव लिहीले असते तरी गार्द्यांनी काम चोख केले असते.

हल्ली तर चेकवरही खाडाखोड झाली तर बँकेतले गार्दी खाली फक्त सही करा म्हणतात या परंपरेचा उगम कुठे आहे ते या निमित्ताने कळाले.

बाजीरावाच्या भुमिकेत अस्सल कोब्रा न घेता कुणा भलत्यालाच घेतल्याचा निषेध.
मिलिंद सोमणही चालला असता की बाजीरावाच्या भुमिकेत.... !

पण खोडलेच असेल असे का गृहित धरतात ? पत्र बदलले सुध्दा असेल ना. धरावे ऐवजी मारावे असा बदल करून पुर्ण पत्र देखील बदलता येते

पण खोडलेच असेल असे का गृहित धरतात ? पत्र बदलले सुध्दा असेल ना. धरावे ऐवजी मारावे असा बदल करून पुर्ण पत्र देखील बदलता येते>> ध चा मा हे रुढ का झाले जयंत? कारण बदल फक्त तेवढाच केला होता.

हल्ली तर चेकवरही खाडाखोड झाली तर बँकेतले गार्दी खाली फक्त सही करा म्हणतात या परंपरेचा उगम कुठे आहे ते या निमित्ताने कळाले. <<
नै बर्का.. हल्ली ते पण चालत नाही. रिजेक्ट होतात चेक.

आज पिक्चर पाह्यला.

रणवीर सिंग! जियो मेरे शेर. जरा चांगल्या भूमिका निवडशील तर खरोखर फार उत्तम अभिनेता बनशील. काय सुंदर सहज काम केलंय. अगदी सुरूवातीलाच तो म्हणतो बाजीराव की रफ्तार ही बाजीराव की पैचान है अग्दी याच न्यायानं तो शेवटपर्यंत ही भूमिका करतो. निझामासमोर बसून फडाफडा बोलणारा बाजीराव तर ग्रेटच. मराठी बोलीवर घेतलेली मेहनत आणि युद्धाच्या सीन्समधला त्याचा जोश अप्रतिम. दुर्दैवाने सिनेमा केवळ प्रेमकहाणीभोवती पिंगत ठेवल्याने "बाजीराव द वॉरीयर" या भूमिकेला फारसा न्याय मिळत नाही.

दीपिका अजिबात खास वाटली नाही. मेकपमध्ये पूर्ण गंडली आहे, आणि संवादफेक टोटल गंडलेली. ती सर्वात जास्त आवडली ती तलवारबाजीच्या प्रसंगामध्ये. खास् करून लेकाला घेऊन मारेकर्‍यांशी लढते तो संपूर्ण प्रसंग उत्तम चित्रित झालाय आणि तिने छान केलाय.

प्रियंका पिक्चरमध्ये काही सीन्समध्ये कातील काम करते. काही सीन्समध्ये जॉनी लीव्हरला टफ कंपीटीशन देते. पण तिचे मराठी उच्चार छान जमले आहेत. तिची नव्वारी काहीतरी मेजररीत्या घोळ घातलेली आहे. पेशवीणीची साडी वाटतच नाही. तिचा सर्वात सुंदर जमलेला लूक ती रावेरखीडीला येते तो आहे. खूप सिंपल तरी खूप गोड दिसते.

काशी बाजीरावाचं नातं नीट एस्टाब्लिश होतच नाही. जिथं ते एस्टाब्लिश करायचं तिथे एक प्रणयप्रसंग आणि एक अतिशय विनोदी प्रसंग घालून त्या नात्याचा डौलच बिघडवला आहे.

सुरूवातीचे होळीचे गाणे खूप आवडले. मल्हारी आणि पिंगा दोन्ही गाणी असण्याची विशेष गरज नव्हती. "गानी" म्हणूनही ती फारसा इम्पॅक्ट टाकत नाहीत. मल्हारी तर कधी एकदा संपत असं झालं होतं कोरीओग्राफी खूप क्लिशेड वाटली.

पिंगा च्या आधी अतिशय नाट्यपूर्ण प्रसंग आहे पण त्या गाण्यामुळे त्या प्रसंगाची गंभीरताच निघून जाते. काशीबाई अचानक ज्या काही नाचतात त्यामुळे हसूच येतं. दीपिका केवळ त्यागाण्यापुरतीच नव्वारी नेसते त्यामुळे तिला बर्‍याचशा चुका माफ.

अख्ख्या सिनेमात छाप पाडून जाते ती तन्वी आझमी. समजून उमजून काम करनं म्हणजे काय ते अशा लोकांकडे बघून कळतं. आई म्हणून तिची तगमग, बाजीरावावर अंकुश ठेवायची धडपड आणि किचन पॉलिटिक्स नामक प्रकरण तिनं मस्त दाखव्लंय.

मिलिंद सोमण छान दिसतो. वैअभव तत्त्ववादीने दोन तीन प्रसंगामध्ये रणवीर सिंगला टशन दिली आहे. शाहू महाराज उर्फ महेश मांजरेकर एकाच रोलमध्ये असल्यासारखे काम करत असतात. यतीन कार्येकरचं काम एकदम भारी आहे. तो आणि आदित्य पंचोली मस्त दिसतात.

सिनेमामध्ये बरेच संवाद मराठीमध्ये आहेत आणि बरेच बिगर मराठी कलाकार असूनदेखील ते मराठी खटकत नाही हे विशेष. समशेर बहाद्दरबद्दल फारच अर्धवट दाखवलंय, सध्यातरी त्यामधून इतकाच अर्थ निघतो की नानासाहेब त्याला मारण्यासाठी घेऊन गेले. अर्थात इतिहास केवळ फोडणीपुरताच असल्याने इतर बर्‍याच भरमसाठ चुका आहेतच. तेव्हा मे त्या बाबीकडे पूर्ण्पने इग्नोर केले.

संपूर्ण सिनेमावर देवदासपेक्षाही मुगले आझमचा प्रभाव जास्त जाण्वला. होळीच्या गाण्याची कोरीओग्राफी बहुतेक बिर्जू महाराजांनी केली आहे पण त्या गाण्यावर "मोहे पनघट पे" चा छाप जास्त जाणवत राहतो. युद्धाच्या सीन्समध्येही मुघले आझमटाईप "शॉट्स" घेतलेले आहेतच. साखळदंडामधल्या मस्तानी बहुतेक "बेकस पे करम" टाईप गाणं म्हणेल अशी आशा होती (ती सिच्युएशन गाण्याला परफेक्टच होती. वाया घालवली)

आनंदीबाई राघोबा दादा यांना येणारी भाषा - मराठी, लिपी - मोडी असावी
ती गार्दी ई. लोकांना पण येत होती का ? एभाप्र

It is believed
popular legend

म्हणजे काय ? अजून एभाप्र

>>>>>>> पत्र बदलले सुध्दा असेल ना. धरावे ऐवजी मारावे असा बदल करून पुर्ण पत्र देखील बदलता येते <<<<
अहो हल्लीच्या कॉम्प्युटरवरुन प्रिन्टरला पत्र धाडुन छापुन घ्यायच्या युगातुन थोडे बाहेर या, त्या काळी प्रिन्टर नव्हते, पत्रे हातीच लिहावी लागत, ती देखिल बोरुने...... ! आत्तासारखे एफोर आकाराचे रीमच्या रिमही नसायचे तेव्हा.... कागद खुप महाग होता.... Wink

होळीच्या गाण्याची कोरीओग्राफी बहुतेक बिर्जू महाराजांनी केली आहे पण त्या गाण्यावर "मोहे पनघट पे" चा छाप जास्त जाणवत राहतो. >>

ओहो. आत्ता लक्शात आले की हे गाणे पाहताना अश्या प्रकारचे गाणे/ चित्रीकरण आधी कुठेतरी पाहिलेय असे सारखे का वाटत होते ते.
अगदी परफेक्ट नंदिनी. धन्यवाद, लक्शात आणोन दिल्या बद्दल.

कागद खुप महाग होता..> काय सांगतात ? पण तो लिंब्यासाठी महाग असेल आनंदीबाईंसारख्या पेशवाईना नाही. जरा गरीबीतून बाहेर या Rofl

डीजे आणि जाई, धन्यवाद. आपल्याला काय मिसो कसाही दिसला/ एक्टिंग केली न केली तरी आवडतोच Wink

@ निंबुडा,
माझ्या अल्प माहितीनुसार गारदी हे तलवारधारी पायदळ असणारे अंगरक्षकांचे दल. (संदर्भ - ना.स. इनामदार यांचे त्रिंबकजी डेंगळेंवर असलेले "झेप" हे पुस्तक. तरी पुन्हा एकदा तपासुन उद्या लिहीतो.)
तसचं गारदी लोक हे पगारी कामगार या कॅटॅगिरीत बसणारे. मला आठवतय की पुस्तकात असा उल्लेख आहे की बडोद्याच्या गायकवाडांचे दिवाण गंगाधर शास्त्री हे त्यांच्या शत्रुंपासुन बचावा साठी गारद्यांचे पथक बाळगत असत.

इथेच एक विचारते ( विषय निघालाच आहे म्हणून बरं का. नाहीतर आम्हाला अवांछितपणा करायला आवडत नाही.) गप्पी माशांची पैदास करण्यासाठी कोणत्या नदीचे पाणी लागेल? आणि त्यात कोणत्या माशांची अंडी सोडावी लागतील?

गंगा नदीचे पाणी चालणार नाही ती पवित्र आहे. तुम्ही तापी या झेलमचे वापरून बघा. तापी उलट दिशेने वाहत असल्याने (हे शाळेत शिकवलेले) तीला पवित्र मानणार नाहीत आणि झेलम तर त्या लोकांची आहे तर ती ही चालेल. अश्या नद्यांना मच्छी चालेल Proud

Pages