निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://kisan.in/devrai/

यंदाच्या 'किसान' आयोजित कृषी प्रदर्शनात ह्या उपक्रमाबद्दल माहीती देणारा विभाग आहे. आवर्जून भेट द्यावा असा.

कृषी प्रदर्शनाचे ऑनलाईन नोंदणी केल्यास जवळपास १०० ते १५० रु. सुट दिली गेली आहे.प्रदर्शन केंद्रावर मोठी रांग असते.

मसाईमाराला प्रवेश केल्याच्या पहिल्याच संध्याकाळी एका
झाडाखाली ४/५ जिप्स थांबलेल्या दिसल्या. आपल्याकडच्या पारंपारिक सवयीनुसार थांबून जिथे गर्दी पहात होती तिथे म्हणजे झाडावर पहायला सुरवात केली...
नेहमीप्रमाणेच आधी काहीच दिसल नाही... तरीपण गर्दीवर विश्वास ठेवून बघायचा वसा काही सोडला नाही...
आणि मग थोड्याच वेळात फांदीवर उठून उभ्या राहिलेल्या आणि झाडाच्या पाना फांद्या मधे कॅमाॅफ्लॅज झालेल्या चलाख, चपळ, उमद्या जनावराचे दर्शन झाले...

प्रचि ०१ : African Leopard....

बिबळ्याने त्याच फांदीवर पुढे आणून ठेवलेल्या हरणाचे Kill पण दिसले..
अंधार पडल्यामुळे आम्हाला निघायला लागले पण "झाडावर ठेवलेली शिकार झाडावरच खाणारा बिबळ्या" पहायची दुर्मीळ संधी दवडायची नाही म्हणून सकाळ संध्याकाळच्या सफारी राउंड्सच्या सुरवातीला आणि शेवटी त्या झाडापाशी जायचा परिपाठ आम्ही चालूच ठेवला.. पण दर्शन काही झाले नाही..
दोन दिवस (४ राउंड्स) झाले. ३ र्‍या दिवसाचा सकाळचा ५ वा राउंड पण निराशाजनक ठरला...
पण मारा नदीवरून संध्याकाळी परत येताना मात्र बिबळ्या महाराज पावले...

प्रचि ०२...

सुदैवाने आमच्या शिवाय एकही गाडी आसमंतात नव्हती... त्यामुळे लोकांचा कोलाहल नाही, अधीर, अत्युत्सुक हालचाली नाहीत की चांगल्या जागेसाठी वसवस नाही...
सारं कस निवांत...
इथे झाडाखाली आम्ही निवांत, तिथे झाडावर बिबळ्या निवांत.. आणि हरिण कशाच्याही पलीकडे निवांत...
जन्मल्यापासून जगण्यासाठी चाललेली धडपडच संपलेली..

प्रचि...०३

Candle Light Dinner खुप खास असतं... (म्हणे..)
पण त्याही पलीकडचं हे Sun Set Dinner पहायला मिळालं त्याला तोड नाही.
३०-३५ फुट उंचावर गर्द झाडाच्या फांदीवर नेऊन ठेवलेले भक्ष मावळत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर शांतपणे खाणारा बिबळ्या.
त्याला कोणी वाटेकरी नाहीत..
म्हणून कसली घाईही नाही.
खाली फक्त आमची व्हॅन.. त्याच्या हिशोबाने किरकोळीत असलेले आम्ही ४ मित्र आणि आमच्याहून जास्त प्राणीप्रेमी स्थानिक गाईड.
त्याला कुठेही Disturb न करता आम्ही तो भोजन सोहोळा डोळे भरून पहात होतो..... एक जीव गेला होता.. तर एका जीवाची आजची सोय झाली होती...
आनंद होत होता की दु:ख होत होतं की दोन्हीही... माहित नाही...
पण निसर्ग नियम मात्र पक्का होत होता. आतून कळत होता..

प्रचि....०४

उन्हं झपाट्याने उतरत होती. सूर्य अस्ताचलाला चालला होता. संपूर्ण घटनेने आमचा ताबाच घेतला होता. हे अदभूत द्रुष्य, हा दुर्मीळ प्रसंग आम्ही भारावून जाऊन पहात होतो. निस्तब्ध... नि:शब्द....
आख्ख्या वातावरणाने मोहिनीमंत्र घालून आमची नजरबंदीच केली होती...
पण मग आमचा गाईड भानावर आला.. पार्क राउंड्सची वेळ संपत आली होती.. मग आम्ही नाइलाजाने निघालो...
पण ते गारुड मनावर बाळगत... ज्याचा अमीट ठसा आजही मनावर जसाच्या तसा आहे....

प्रचि...०५

निरु - काय जबरदस्त वर्णन केलंय आणि फोटोग्राफीही अप्रतिम - दोन्ही गोष्टींनी मोहिनीमंत्र घालून आमची नजरबंदीच केली .....

...

कॅमाॅफ्लॅज झालेल्या चलाख, चपळ, उमद्या जनावराचे दर्शनही --- केवळ केवळ ....

_____/\______

वॉव निरु, काय फोटोग्राफी, वर्णनही मस्त. हरणासाठी वाईट वाटलं. पण खाणं आहे त्याचं ते.

आज एम आय डी सी च्या परीसरात, एका झाडावर चिमण्यांची शाळा बघितली. नेहेमीच्याच चिमण्या पण त्या ब्राऊन करड्या रंगात फार विविधता होती. Happy

निरु , छान वर्णन व प्रचि ! नागझिर्याला गेलो होतो. रानकुत्र्यांनी लावलेली फिल्डींग अन पाडसाची केलेली शिकार ... मी तर डोळे मिटूनच घेतले ...आजही हे दृश्य आठवलं की अंगावर काटा येतो....

निरु, सुंदर वर्णन आणि फोटो.. खरं तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तसा केला तर जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.

निरु, सुंदर वर्णन आणि फोटो.. खरं तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तसा केला तर जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.>>>>> +१११११११ नक्कीच विचार करा याचा .....

ओके दिनेशदा... प्रयत्न करतो.. लेख लिहून होईपर्यंत अप्रकाशित ठेवायला जमत नाही...
कोणत्या विभागात जाणार..? (म्हणजे प्रकाश चित्र वगैरे) तेही कळत नाही...:( Sad
मार्गदर्शन घेऊन प्रयत्न करतो...

आत्ताच छोटासा चिमणीसारखा पक्षी बघितला गॅलरीत, डार्क कॉफी कलरचा आणि स्लिम स्लिम पिटुकला, साईडला थोडासा मोरपिशी कलर होता. मी गेल्यावर पळून गेला, आता नाही दिसत.

हो.. लाजाळूच...
पानांवरून कल्पना येते ना..? हे झुडूप ८/१० वर्ष येता जाता बघतोय... पण फुलं पहिल्यांदाच पाहिली... Sad
बहुतेक नि.ग. मुळेच लक्ष गेले... Happy Happy

Pages