निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक कळी उमलतानां..... :
घराच्या बाल्कनीत झाडं लावताना ती देशी असावीत किंवा निदान इथे रूळलेली असावीत अशी इच्छा होती.
कारण ही घरची बाग पक्षी, फुलपाखरं, विविध प्रकारच्या माश्या, किटक यांना आकर्षित करणारी, त्यांना काहीतरी देणारी असावी अशी संकल्पना होती.
फुलपाखरं, छोटे पक्षी आणि मुंग्यांना आकर्षित करणारं झाड म्हणून पावडर पफ लावलं.
3 फुटाची फांदी होती. एकही कळी नव्हती.
पहिल्या 15, 20 दिवसात तर त्याला कुठेही पालवी पण नाही फुटली. रुजल्याचं एकही लक्षण दिसत नव्हत.
हळुहळु मुख्य खोड सोडून बाकीच्या फांद्याना पालवी फुटु लागली. आणि त्यानंतर महिन्याभरानी चक्क एक इवलुशी कळी नवीन फुटलेल्या फांदीवर दिसली. दिसामाजी तिचा आकार वाढु लागला. तिच्या मागेमागे आणि आजूबाजूला छोट्या छोट्या जोडीदारीणीही दिसु लागल्या.

01 पहिली कळी....

मग तिची रोज खबरबात ठेवणं हा अॅडिशनल कामधंदा होउन बसला...

02... कळी उमलायची सुरूवात...

03... अजुन थोडी उमलतानां...

04... थोडी आणखी उमललेली...

05... ही दुसरी कळी.. काही दिवसांनंतर... पण हिच्या उमलण्याची तर्‍हा निराळी...

06... पहिली कळी अजून उमललेली.. गुलाब कळ्यांच्या गुच्छाची आठवण करून देणारी... सोबत छोट्या मैत्रीणी..

07.... गुलाब पुष्पांचा गुच्छ...

08... गुच्छाची घडी हळूहळू विस्कटायला लागलेली...
द्वाड मुलाच्या विस्कटलेल्या केसांसारखी..
आता पावडर पफ होण्याकडे वाटचाल...

09.... पूर्ण विकसित पावडर पफ..

आता झाड कळ्या फुलांनी बहरून गेलंय. कळ्या असल्यापासून मुंग्यांची लगबग आहे..
आणि गेल्या तीन चार दिवसापासून सनबर्डही फेर्‍या मारतायत.... Happy Happy

मी इथे थोडी गडबड करू का ?

आमच्याकडे सध्या वसंत ऋतू आहे. बाजारात आंबे भरपूर आलेत. पण इथले लोक कच्च्या कैर्‍यांना हात सुद्धा लावत नाहीत. मग मी जंगलात घुसून काही कैर्‍या तोडून आणल्या.. आणि आंबाडाळ केली !!

या मिरच्या दिसायला गोड असल्या तरी चवीला महातिखट असतात. मी तर त्या हाताळूही शकत नाही. पण नायजेरीयात आवडीने खातात. मी त्याला हात न लावता लोणचे केले आणिमग इथल्या मित्राला दिले.

आणि हे त्या न कापता ( केवळ एक चिर देऊन ) केलेले लोणचे !!

भारतातून मी मुद्दाम कोंब असलेले कोनफळ ( म्हणजेच गुजराथ्यांचा कंद, म्हणजेच गराडू, म्हणजेच पर्पल याम ) आणले होते. ते खाऊन त्याचा कोंब लावला होता, त्यालाही गराडू लागले पण ते कापायचा मला धीर होत नव्हता म्हणून तसेच ठेवले होते. माझे मन त्याने वाचले बहुतेक. त्यालाही असा मस्त कोंब आला. मग तोही मी परत कुंडीत लावला.

आणि मग कोनफळ वापरून, साबुदाण्याची खिचडी केली.

आता लक्षात आली ना गडबड ? मी नि.ग. आणि पाककृती यांची सरमिसळ करुन टाकली.. तडका दिला म्हणा ना !!!

वॉव मस्त मस्त आहेत मिरच्या.....माझ्याकरता घेऊन येशील नेक्स्ट टायमाला, हात न लावता Happy

वा निरु खुप सुरेख लिहीलय आणि प्र.ची व्वा! कीत्ती लोभस आहे तो कळ्यांचा गुच्छ!!!
हेमा ताई अडेनेमिया, खुप सुंदर..
दिनेश दा, कैरी आणि डाळ तोपासु.. मिरच्या गोडुल्या, कोन फळ मस्तच...

आजचा मुक्तपीठ मधला लेख आववडेल निगकरांना Happy

वाटेवरचं हिरवं वैभव (मुक्‍तपीठ)
- डॉ. विलिना इनामदार

पुण्यातील निसर्गसंपदेचा शोधप्रवास कधीच न संपणारा आहे. एक शोधता शोधता अन्य बरंच काही अलौकिक सापडतं! अनुभवसमृद्ध करून टाकतं. ‘शब्द शब्द जपून ठेव’ म्हणणारी ‘बकुळ’ शनिवारवाड्यातील अनेक सुवर्णक्षणांची साक्षीदार आहे. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ गीतातील ‘चाफा’ पर्वतीवरील शंकर मंदिरात भेटतो. जवळच पुण्यातील सर्वांत जुना, अडीचशे वर्षांचा ‘पांढरा चाफा’ भेटतो. गुलाबी पिवळ्या तंतुमयी कोंदणाची ‘दुरंगी बाभूळ’, पेशवेकालीन मौंजविधी केलेला ‘पिंपळ’ हे पर्वतीचं हरित वैभव. दसऱ्याला लुटतो ते सोनं म्हणजे ‘आपटा’ भेटतो तळजाई टेकडीवर. त्याचा भाऊबंद रक्तकांचन ‘बाहुनिया’ नावानं तिथंच भेटतो. तळजाईवर हमखास सापडणारा ‘खैर’ काताचं महत्त्व सांगतो. आतल्या जंगलात ‘चंदन’, ‘उंदीरमारी’, ‘साग’ भेटतात. तुळशीबागेतील अजस्र ‘मुचकुंद’ ऋषींच्या तपश्‍चर्येची आठवण करून देतो. मऊ कोंदणाच्या चेंडू फुलातून ‘कदंब’ भेटतो, भवानी पेठेतल्या कुंदेन शॉपीमध्ये. तटस्थ ‘चिनार’ पु. ल. देशपांडे उद्यानात आढळतो. ‘हेलिकोनिया’ आणि ‘बर्ड ऑफ पॅरेडाइज’सुद्धा इथंच भेटतात. ‘एक अकेला इस शहर में’ असलेला ‘वाळूंज’ नदीकिनारी कर्वे रस्त्यावर दिसतो.

फर्ग्युसन, महात्मा गांधी रस्त्यावर ‘कॅरिओटा’च्या शंकरजटा दीड मीटरच्या फळांच्या घोसात देखणेपण जपतात. कमला नेहरूमधील ‘कैलासपती’ आपल्या अंगाखांद्यांवर तोफगोळे मिरवताना बघून मजा वाटते. अफ्रिकेचा पाहुणा ‘गोरखचिंच’ अभिनव कलासमोर महाकाय बुंध्याचं अजस्रपण जपतो. भरतनाट्यजवळची ‘वावळ’ माकडांना पापुद्य्रांच्या रूपात नाश्‍त्यासाठी भेट देते, म्हणून ती ‘मंकीज्‌ बिस्कीट’! वेताळ टेकडीवरची ‘मेढशिंगी’ची पांढऱ्या झग्यातील फुलं बार्बीचा भाव खाऊन जातात. ‘मोई’, ‘कंदीलपुष्प’ हे या टेकडीचं वैभव!

खिंडीत सापडणारा ‘पिवळा बहावा’ कायम वाहवा मिळवतो. सारसबागेतील ‘बॉटलपाम’ उद्यानाची शोभा वाढविण्यात गर्क असतात. सारसबागेत जिन्याखालील भिंतीला लपेटलेली ‘वाघनखी’ मनाला गारवा देऊन जाते. ‘कर्दळ’, ‘मुसांडा’, ‘युफोर्बिया’ लाल करंडे रिते करत असतात. महालक्ष्मी मंदिरासमोर उजवीकडे ‘सिल्व्हर ओक’ची रांग, तर डावीकडे बियांनी लगडलेला ‘पुत्रंजीव’ त्या-त्या रस्त्यांचे वैभव! मुक्तांगण शाळेजवळची ‘गगनजाई’ येणाऱ्या-जाणाऱ्याला सुगंधित करते. देसाई महाविद्यालयासमोरील ‘इंडियन महोगनी’ वाहनांच्या आवाजाला सामावून घेतो.

विद्यापीठातली ‘सावर’ पसारा वाढविण्यातच मग्न असते! बंगल्यांची कुंपणं ‘टिकोमा’, ‘रंगून वेल’, ‘संक्रांत’, ‘लसण्या वेला’ने सुशोभित होतात. स. प.मधील ‘कळलावी’, ‘शिकेकाई’ व ‘सागरगोट्या’सारख्या दुर्मिळ वनस्पतींचं वेगळंपण जपतो. ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ केशरी रंगाचा अंगार मे महिन्यात उधळत असतो. आघारकरमधील दुर्मिळ ‘कॅलाबरा’, ‘बेगर्स बाऊल’ वाडग्यांना खोडावर घेऊन मिरवीत असतो. इथलीच ‘कारवी’, ‘मोह’, ‘पेपर मलबेरी’, ‘बदक वेल’, ‘सेमल कांचन’ या वनस्पती शास्त्रज्ञांना भुरळ घालतात. कन्याशाळेजवळील ‘सप्तपर्णी’ शांतिनिकेतनच्या स्नातकांना रोपट्याने सन्मानित करतात.
प्रभात रोडवरील केशरी रंगनिर्मिती करणारा ‘बिक्‍सा’, राजीव गांधी इ-लर्निंग सेंटरच्या परिसरातील ‘कॉर्डिया’ तर लाजबाब! अनिकेत सोसायटीतील ‘चेंडूफळ’ गुलमोहराच्या कुळातला. पेरूगेटजवळचा पिवळा ‘सयामिया’, महानगरपालिकेतला ‘ट्रॅव्हलर पाम’, बालगंधर्वजवळचा ‘पर्जन्यवृक्ष’, ‘टॅबेबुइया’, ग. प्र. प्रधान उद्यानातील ‘रुद्राक्ष’, ‘मुरूड शेंग’. पुण्यात नवीन आलेला रम्यनगरीतला पाहुणा ‘मणिमोहर’.. किती नाना प्रकार वृक्षांचे! स्तिमित करणारे! जुन्या-नव्या पुण्यानं आधुनिक होताना देशी-विदेशी समस्त वृक्षांना सदैव सामावून घेतलं. हा आपला - तो परका, अशी भावना कधीच ठेवली नाही. निसर्गभेटीची ओढ लावणाऱ्या या मित्रांचं संरक्षण आपण सारे प्राणपणानं करूया!

निरु,कसला गोड आहे तो लाल कृ.क.
नताशा मस्त लेख, धन्स शेयर केल्या बद्द्ल..
आत्ताच्या आत्ता पुण्याला यावेसे वाटते आहे:)
गगन जाई नाव खुप आवडले.. पण कधी पाहिली नाही.. प्र.ची आहे का कोणाकडे?

निरु,कसला गोड आहे तो लाल कृ.क.
नताशा मस्त लेख, धन्स शेयर केल्या बद्द्ल.. >>>>+११११११११

वाटेवरचं हिरवं वैभव (मुक्‍तपीठ) - डॉ. विलिना इनामदार >>>>> लेख नीट वाचला - सहकारनगर क्र. २ मधे एक अतिशय दुर्मिळ वृक्ष आहे - शेविंग ब्रश नावाचा ....... ( Pseudobombax ellipticum )

निरु, कळीपासून फ़ुलापर्य़ंत, प्रत्येक टप्प्यातील फ़ोटो खूपच सुरेख! Happy
दिनेशदा, तुमची गडबड पण छान आहे. Happy
नताशा, लेख छानच. Happy

Pseudobombax ellipticum आत्ता तुम्ही सांगितल्या वर गुगलुन बघीतले, मस्तयत फुल, झाड चाफ्यासारखे दिसतेय, धन्स शशांक जी नविन झाडाची ओळख तुमच्या मुळे.. शेविंग ब्रश नाव अगदी समर्पक..:)

नताशा, सुंदर आहे लेख, इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद Happy

ममो चं अ‍ॅडेनियम, निरू कडील लाल कृ क.. वाह!!!! ब्यूटीज

Pages