आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इराण व पाश्चिमात्य देशांतील अणुकरारावरीच चर्चा यशस्वी ठरली. हा करार परिपूर्ण नाही. ह्यातील दोन प्रमुख मुद्दे म्हणजे (१) इराणला निर्बंधमुक्त करण्यावर अमेरिका, युरोपिय महासंघाचे एकमत आणि (२) अणुकार्यक्रमावरील प्रदीर्थ अंकुश इराणला मान्य.

अमेरिकन काँग्रेसने हा करार मान्य नसल्याचे पुर्वीच सांगितले आहे. पण अमेरिकन काँग्रेसने हा करार संमत करण्यास नकार दिला तर त्यासाठी नकाराधिकार वापरण्याचा इशारा ओबामांनी दिला आहे.

इकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ह्यांनी इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायल आवश्यक त्या सर्व पर्यायांचा विचार करील असे सांगून इराणवर लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. ह्या वाटाघाटींतून पाश्चिमात्य देशांनी इराणला जॅकपॉट दिला आहे. निर्बंध मागे घेतल्यामुळे इराणला अब्जावधी डॉलर्सचा निधी मिळेल व त्याचा उपयोग करुन इराण अणुकार्यक्रम पुढे नेईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

कालच्या दिवसाचा उल्लेख इराणने 'ऐतिहासिक दिवस' असा केल्यावर इस्रायली पंतप्रधानांनी ही अणूचर्चा इतिहासात 'काळा दिवस' म्हणून ओळखली जाईल अशी टीका केली आहे.

इराणवर हवाई हल्ले चढवण्यासाठी सिरिया व तुर्कीच्या हवाईहद्दीचा वापर करण्याचे संकेत इस्रायलने पुर्वीच दिले आहेत. अमेरिकेने इराणबरोबर सुरु केलेल्या वाटाघाटींमुळे इस्रायल आणि सौदी अरेबिया ह्यांच्यात सहकार्य वाढले. इराणवरील कारवाईसाठी सौदीने इस्रायलला आपली हवाईहद्द वापरण्याची परवानगी दिल्याचाही दावा केला जात असला तरी दोन्ही देशांनी ह्यावर खुलासा करण्याचे टाळले आहे.

इराण व पाश्चिमात्यांमधील चर्चा रोखण्यात अपयश आलेल्या इस्रायली सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी इस्रायलमधून होत आहे.

करार झाला आहे आणि आता त्यावर टिका होत रहाणार, पण दुसरा कुठलाही परिणामकारक उपाय समोर नव्हता. तणाव कमी होण्यासाठी हातभार लागेल.

महत्वाचे मुद्दे:
निरीक्षकान्ना प्रकल्पाची तपासणी करण्याचे अधिकार आहेत... अर्थात पुर्व परवानगीची अट आहे.

युरेनियम शुद्ध करण्याच्या साठ्यावर प्रचन्ड मर्यादा आहेत.

आणि करारातुन कुठल्याही तासाला मुक्त होण्याचे स्वातन्त्र्य दोन्ही पक्षान्ना आहे.

दहा दिवसांपुर्वी 'साऊथ चायना सी' संबंधात फिलिपाईन्सने हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीन विरोधात बाजू मांडली. ८०० पानी अहवालात फिलिपाईन्सने चीनची अरेरावी, घुसखोरी, लष्करी हालचालींचा उल्लेख केला असून चीन 'साऊथ चायना सी'चा घास गिळण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला आहे. ह्या आरोपानंतर काल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने चीनकडे खुलासा मागितला आहे. ह्यासाठी चीनला ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. चीनने सहकार्य केल्यास ह्या वर्षाअखेरीपर्यंत साऊथ चायना सीचा प्रश्न सोडवण्याचे जाहिर केले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे दुर्लक्ष करुन चीनने फिलिपाईन्सला चर्चेचे आवाहन केले आहे. परंतु, फिलिपाईन्सला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडूनच हा वाद सोडवता येईल असा ठाम विश्वास आहे. फिलिपाईन्सने चीन दावा करत असलेल्या आपल्याच 'साऊथ चायना सी'च्या हद्दीत जहाज रवाना करायची तयारी केली आहे.

'गूगल मॅप'ने ह्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर 'साऊथ चायना सी'मधील चीनी बेटांचे नाव वजा केले आहे. 'झोंग्शा बेट' म्हणून ओळखण्यात येणार्‍या येथील बेटांची ओळख ह्यापुढे फक्त 'स्कारबोरो' अशीच राहील असे बदल केले आहेत. गूगल मॅपवर त्या बेटांचा उल्लेख चिनी तसेच फिलिपिनो भाषेत केलेला असे. पण आता फिलिपाईन्सच्या हद्दीत असलेल्या आणि चीन अधिकार सांगत असलेल्या बेटांबद्दल गूगल मॅपने अशी भूमिका घेतली आहे. चीनने ह्यावर नाराजी दर्शवली आहे.

ग्रीस - युरोझोन-बेलआऊट - युरोझोनच्या बेलआऊट प्रस्तावाला ग्रीसच्या संसदेची मान्यता मिळाली असली तरी जनतेत त्याबद्दल तीव्र असंतोष आहे. इकडे ग्रीसच्या संसदेत बेलआऊटवर शिक्कामोर्तब होत असताना हजारी ग्रीक नागरिकांनी संसदेवर धडक देवून, अथेन्ससह विविध भागांमध्ये निदर्शनं केली. हिंसक वळण लागल्याने सुरक्षायंत्रणांनी अश्रुधुराचा वापर केला. ग्रीक संसदेच्या सभापतींनी नवा बेलआऊट प्रस्ताव म्हणजे सामाजिक वंशसंहार असल्याचा इशारा दिला. प्रस्तावाच्या बाजून २२९ तर विरोधात ६४ मते पडली. विरोध करणार्‍यांत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सत्ताधारी सदस्य व मंत्र्यांनीही पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास ह्यांना धारेवर धरले. अर्थ उपमंत्री नादिया व्हॅलाव्हॅनी ह्यांनी ह्या प्रस्तावाला कधीही समर्थन देवू शकत नसल्याचे सांगून राजीनामा सादर केला. अजूनही कमितकमी ४ मंत्र्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.

पंतप्रधान सिप्रास ह्यांनी देशातील बँकिंग क्षेत्र व नागरिकांना मोठ्या आपत्तीपासून वाचवण्यासाठी हा करार केल्याची कबूली दिली. ग्रीसचे अर्थमंत्री युक्लिड सॅकालोट्स ह्यांनी करार अतिशय कठीण असून येणारा काळच ही गोष्ट व्यवहार्य आहे की नाही ते ठरवेल असे बजावले आहे.

हा प्रस्ताव संसदेत मंजूर झाल्यावर युरोपिअन सेंट्रल बँकेने ताबडतोब अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी पावले उचलली. ग्रीसच्या बँकांना तात्पुरते सात अब्ज युरोचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचे संकेत देण्यात आले. ग्रीसमधल्या बँका अजून बंद असून अर्थसहाय्य मिळाल्यावर त्या उघडतील.

अश्विनी ताई

राष्ट्रीय उत्पन्न न वाढवता सगळ फ़ुकट आणि सब्सीडाईज घ्यायची सवय लागली की देशाचं काय होतं याच उत्तम उदाहरण म्हणजे ग्रीस आहे.

आपल्या देशाने यातुन योग्य तो धडा घ्यावा.

आपल्या देशाने यातुन योग्य तो धडा घ्यावा. > नक्कीच.. पण कोणता योग्य धडा घ्यावा कृपया स्पष्ट कराल का ? आपली कल्पना अधिक स्पष्ट होईल आणि समजायला सोपी होईल.

पाक भारताच्या परराष्ट्रीय निती धिंडवडे काढत आहे
ईदच्या वेळी गोळीबार तर केलाच वर मिठाई देखील परत पाठवली
आणि गोळीबारचा आरोप पण भारतावर लावला
तरी देखील भारत सरकार मुग गिळून बसले? व्वा

विशालदेव, तुम्हाला ही गोष्ट एक बातमी किंवा घडामोड म्हणून द्यायची असेल तर द्या. त्यावर अश्या भाषेत टिपण्णी करण्यासाठी हा बाफ नाही. ह्या बाफला तुमचा नेहमीचा रंग देवू नका. विनंती आहे.

आय.एस. ने युरोपात लष्करी तळ उभारण्यासाठी बोस्नियाच्या ओस्बे गावात जमिनी खरेदी करत असल्याचा दावा 'द संडे मिरर' ह्या ब्रिटिश दैनिकाने केला आहे. ओस्बे हे निर्जन ठिकाण आहे. तिथे जीपीएस यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे सॅटेलाईटद्वारे दहशतवाद्यांना हुडकून काढणे कठिण जाईल. तसेच तिथे कच्चे रस्ते असल्याने प्रशिक्षण तळाच्या ठिकाणी लष्करी वाहनेही पोहोचू शकणार नाहीत.

दरम्यान, सिरियातील आय.एस. विरोधी हल्ल्यांमध्ये ब्रिटिश लढाऊ विमानांनी सहभाग घेतल्याचे कॅमेरॉन यांनी जाहिर केले. इराकपणे सिरियामध्येही ह्या संघर्षात ब्रिटन अमेरिकेला सहाय्य करेल. खरंतर, ब्रिटनने सिरियातील संघर्षात सहभागी होवू नये अशी भूमिका ब्रिटिश संसदेच्या सदस्यांनी घेतली होती. त्यामुळे ब्रिटन सिरियातील संघर्षात ओढला जाईल अशी भीती ब्रिटनचे विश्लेषक व्यक्त करीत आहेत. ह्या आधी इराक व अफगाणीस्तानात दहशतवाद विरोधी कारवाईत ब्रिटनने भाग घेऊन मोठी चूक केली होती व ती पुनरावृत्ती टाळण्यासाठी ब्रिटनने आता भाग घेवू नये अशी मागणी ब्रिटनचे लोकप्रतिनिधी करत आहेत.

सौदीतील प्रार्थनास्थळे, सरकारी व लष्करी कार्यालये, परदेशी दूतावास ह्यांवर हल्ले चढविण्याच्या तयारीत असलेल्या आय.एस.अच्या तब्बल ४३१ दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. ह्यातील बहुतांश दहशतवादी सौदीचेच नागरिक आहेत Uhoh व येमेन, सिरिया आणि इराकमधूनही काही दहशतवादी सौदीमध्ये दाखल झाले आहेत.

इराक व अफगाणीस्तानात >>> ?? इराक बरोबर आहे. पण अफगाणिस्तानात युनोतर्फे गेले होते ते. अफगाणिस्तानात अमेरिकेने जाणेसुद्धा चूक म्हणत नाहीत जनरली Happy

दुसरे म्हणजे यांना कसली काळजी आहे? खुद्द अमेरिकाच युद्धात उतरायला तयार नाही इराकमुळे आता. २०१६ मधे रिपब्लिकन्स आले तर सांगता येत नाही.

आय.एस.ची ब्रिटनवरची थोडीशी वक्रदृष्टी अजून वक्र होवू नये म्हणून सिरियात कारवाई करण्याबाबत विरोध असावा.

अफगाणिस्तानबद्दल +१. परंतु आता ब्रिटनसारख्या देशांमध्ये असाही दुसरा मतप्रवाह निर्माण झालेला असावा की युद्धाने युद्ध अजून पेटते आणि जगभरात उसळलेला संघर्ष थांबवायचा असेल तर युद्धखोरीला कुठेतरी लिमिट घालायला हवे.

युद्धाने युद्ध अजून पेटते ........ कुठेतरी लिमिट घालायला हवे.
ब्रिटनला महात्मा गांधी आठवले!

महात्मा गांधींचा प्रभाव स्वतंत्र झालेल्या भारतीयांवर अनेक वर्षे जेव्हढा पडला होता, तेव्हढा मुसलमानांवर का बरे पडला नसावा? विचार करण्याजोगा प्रश्न. म. गांधी तर हिंदू नुसलमानांत भेद करीत नसत. शिवाय सगळे मुसलमान असे अतिरेकी नसतात, मग जसे येशू, म. गांधी यांनी शांतीचा प्रसार केला तसा मुसलमानात कुणि महात्मा का निपजला नाही?
मुसलमान म्हणतात अमेरिका आमच्यावर अन्याय करते, आम्ही दरिद्री आहोत, जिहाद करूनच आम्हाला इथे जगले पाहिजे.
तसे तर मग इतर देशांतील इतर धर्मीयांवरहि अन्याय झाले, तेहि गरीबच आहेत, मग ते का नाही अतिरेकी कारवाया करत?

मनुष्याची मानसिकता मनुष्याच्या कृत्यांना कारणीभूत असते. स्वार्थ, सत्ताभिलाषा या गोष्टींमुळे हे घडते. या "दोषांना" आवर कसा घालावा? म्हणून या जागतिक परिस्थितीची कारणे मानसिकतेचा अभ्यास करून त्याला योग्य वळण देऊनच सुटेल. युद्धाने युद्ध वाढतच जाईल.

UK मध्ये आईवडिलांना १६ वर्षांखालील मुलांचे पासपोर्ट्स रद्द करण्यासाठी ॲप्लिकेशन करायचा हक्क देण्यात आला आहे. इसिसच्या जाळ्यात फसून मुलं सिरियामध्ये जावून दहशतवादाचा भाग बनू नयेत म्हणून हे पाऊल उचलले आहे.

तसेच ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन ह्यांनी इसिसने घडवून आणलेल्या जबरदस्तीच्या विवाहांचे बळी ठरलेल्या मुलींची आयडेंटिटी आजन्म गुपित राखण्यात येईल अशीही घोषणा केली.

http://www.theguardian.com/politics/2015/jul/20/uk-parents-power-cancel-...

सोन्याची घसरण आणि चीन / रशियाकडील सोन्याच्या राखीव साठ्यात वाढ. गेल्या पाच वर्षांत प्रथमच सोन्याच्या किंमतीत ४% घसरण झाली असून एका औंसामागे म्हणजेच २८.३४ ग्रॅममागे दर ११०० डॉलर्सच्या खाली आले आहेत. एकीकडे चीन व रशियासारख्या देशांनी त्याच्या सोन्याच्या साठ्यात प्रचंड वाढ केली आहे.

गेल्या काही महिन्यांत अमेरिकी अर्थव्यवस्था प्रगती करत आहे. ह्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने व्याजात वाढ करायची शक्यता दर्शवली आहे. डॉलरचे स्थान भक्कम होण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांनी सोन्याच्या विक्रीचा सपाटा लावून डॉलर्सची खरेदी सुरु केली आहे. त्यामुळे सोन्याचे दर उतरुन प्रति औंस १०८८.०५ डॉलर्सपर्यंत खाली आले. सोन्याच्या बाजारपेठेतील विश्लेषक इव्हान ल्युकास ह्यांनी ह्या वर्ष अखेरीस सोन्याचे दर प्रति औंस १००० डॉलर्सपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याच बरोबर चांदी आणि प्लॅटिनमच्या किंमतीतही घसरण झाली आहे.

एकीकडे चीनने सहा वर्षांनंतर आपल्याकडील सोन्याच्या राखीव साठ्याची माहिती जाहिर केली. त्याप्रमाणे त्यांच्याकडे सद्ध्या १६५८ MT (मेट्रिक टन) इतका राखीव साठा आहे. २००९ साली त्यांच्याकडे १०५४ टन सोने होते. रशियाकडे तीन वर्षांपुर्वीच्या साठ्यात २५० टनाची भर पडून आता त्यांच्याकडे १२४० टन राखीव सोने आहे.

भारताकडे किती आहे? Uhoh

सश्या :-). कमी आहे नै? जाऊदे, आधी रोटी, कपडा, मकान और सुरक्षा मिळूदे. सगळं झालं की सोन्याचं बघू Wink

किरगिझिस्तानातील अल्पसंख्यांक बंडखोर नेत्याचा सन्मान केल्याबद्दल अमेरिकेवर नाराज असलेल्या किरगिझ सरकारने अमेरिकेशी असलेल्या लष्करी सहकार्यातून माघार घेतली. ह्यामुळे किरगिझिस्तानला मिळणारे अर्थसहाय्य रोखले जाऊ शकते असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

गेल्यावर्षी अमेरिकेने मानवाधिकारांसाठी संघर्ष करणार्‍या अझीमोन अस्कारोव्ह ह्या पत्रकाराचा सन्मान केला होता. आपल्या देशातील शांती आणि स्थैर्याला आव्हान देणार्‍या अझीमोनचा सन्मान म्हणजे किरगिझिस्तानच्या सार्वभौमत्वाचा अपमान असल्याची टीका किरगिझ सरकारने केली आहे.

अमेरिकेचे लष्कर गेली कित्येक वर्षं किरगिझिस्तानातील लष्करी तळाचा वापर करत आहे. अफगाणिस्तानातील मोहिमांसाठी या लष्करी तळाचा अमेरिका तसेच नाटो लष्कराकडून वापर केला गेला होता. गेल्यावर्षी अमेरिका आणि नाटोने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यामुळे किरगिझिस्तानातील लष्करी तळाचा वापर कमी असला तरी त्याचे महत्व कमी झाले नसल्याचे अमेरिकेने म्हटले होते. ह्या निर्णयामुळे अमेरिकेच्या मध्य आशियातील तसेच अफगाणिस्तानातील मोहिमेवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जाते.

भारत सरकार कडे नसेल पण भारतिय जनते कडे प्रचंड प्रमाणात आहे. कदाचित ते भारताच्या किती तरी पटीत असेल.

भारतियांचे सोन्याचे वेड हे भारताच्या करंट अकाउंट्वर असलेला भार वाढवणारे आहे.

<<भारत सरकार कडे नसेल पण भारतिय जनते कडे प्रचंड प्रमाणात आहे. कदाचित ते भारताच्या किती तरी पटीत असेल.>>
----- सहमत सोन्याची सर्वात मोठी बाजार पेठ भारत आहे... वर्षाला ७०० ते ११०० टन सोने आयात होते. सरकारकडे केवळ १ वर्षाचा साठा आहे (५५० टन)... जनतेकडे मोजता येणारही नाही इतपत साठा आहे.

दक्षिणेकडच्या मन्दिरात २५ बिलीयन डॉलर्स पेक्षा जास्त सोने वर्षानुवर्षे नुसते पडुन होते. मन्दिरात दडवलेला हा सोन्याचा हा प्रचन्ड साठा केवळ अपघातानेच सापडला. असे अजुन किती मन्दिरे असतील.

शशी थरुर यान्चे ब्रिटिश राज अत्यन्त मार्मिक भाषण... (कुठे शेअर करावे हा प्रश्न होता... ); प्रधान सेवक मोदी यान्नी भाषणाची प्रशन्सा केली.

http://www.ndtv.com/video/player/news/watch-the-tharoor-speech-on-britis...

उदय, दक्षिणेकडल्या मंदिरांतच सोन्याची खाण असल्यासारखं सोनं निघेल Happy

भाषणाची लिंक दिलीत ते बरं केलंत. शशी थरुर ह्यांचे भाषण ब्रिटिश राजची कौतुकं करणार्‍यांना खरी बाजू दाखवून देणारंच आहे. मस्त!
फक्त त्यांनी सारखं सारखं हातातल्या चिठ्ठीतून मुद्दे बघणं नको होतं.
----------------
अवांतर : माझं काहीवर्षांपुर्वी ब्रिटिशांनी आणलेली रेल्वे, बांधलेले पूल वगैरे मुद्द्यांवरुन चर्चा सुरु होऊन भांडण झालं होतं. कुणाशी? तर स्वातंत्र्य सैनिकाची पत्नी असलेल्या साबांशी :-P. घरात आजेसासरे, सख्खे सासरे, मामेसासरे असे तीन स्वातंत्र्य सैनिक होते. सासर्‍यांनी अगदी कॉलेजात असताना तुरुंगवास भोगला आहे व त्यापायी कॉलेजातून काढल्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यावर शिक्षण पुर्ण केलं आणि आजेसासरे कट्टर गांधीवादी काँग्रेसमन, वैकुंठभाई मेहतांच्या सहवासात आलेले. साबा खूप लहान होत्या पण स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांच्या माहेरच्या गावात निघणार्‍या प्रभात फेर्‍यांमध्ये हिरिरीने भाग घ्यायच्या. १६व्या वर्षी लग्न झालेल्या साबांना लग्नातल्या साड्याही जाड्याभरड्या खादीच्या घातल्या गेल्या होत्या त्याबद्दल त्या अजूनही बोलून दाखवतात :डोमा:. तर....मी स्वयंपाक करत असताना मायलेक बाहेरच्या खोलीत बसून रेल्वे, पुल वगैरे गोष्टींवरुन ब्रिटिशांचं कौतुक करत होते. सहजच काहितरी विषय निघाला होता खरंतर. पण इतकं कौतुक असह्य होवून मी गॅस बंद करुन बाहेर आले आणि तुम्ही स्वातंत्र्य सैनिक असून इतकं कौतुक काय करताय असं वैतागून विचारलं होतं. मग ब्रिटिशांनी त्यांच्याच फायद्यासाठी ह्या सुधारणा केल्या होत्या ह्यावरुन वाद सुरु झाला. नवरा मजा बघत होता आणि मधेच काड्या टाकत होता. मी चिडलेली बघून दोघे फिदीफिदी हसू लागले. मग अजून चिडून मी दोघांना "गो बॅक सायमन"च्या चालीत तुम्ही दोघेही आत्ताच्या आत्ता भारतातून चालते व्हा आणि इंग्लंडातच जा असं म्हटल्यावर हास्यस्फोट झाला होता Uhoh Sad :-P. हसल्याने निषेध म्हणून स्वयंपाक निम्माच केला :हाहा:.

अवांतर समाप्त. आता विषयावर बोलूया Wink

मालदीवमधील जमिनी दुसरे देशही खरेदी करु शकतील असा कायदा मालदीवच्या संसदेत बहुमताने मंजूर झाला आहे. ही बाब भारतासाठी चिंताजनक आहे. नव्या कायद्याचा वापर करुन चीन हिंदी महासागरात आपला प्रभाव वाढवून भारताला आव्हान देईल. मालदीवचे आताचे 'प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव' पार्टीचे सरकार चीन समर्थक आहे. गेल्यावर्षी मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद ह्यांच्या अटकेनंतर भारताच्या पंतप्रधानांनी मालदीव दौरा रद्द केला होता त्यामुळे भारत आणि मालदीवमध्ये कटुता निर्माण झाली होती.

एकीकडे चीन मालदीवबरोबर द्विपक्षीय संबंध दृढ करुन भारताला आव्हान देतो आहे. मालदीवमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे. नवं सरकार आल्याबरोबर चीनच्या झी जिनपिंग ह्यांनी मालदीवला भेट दिली होती.

ह्या कायद्यामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला मोठा लाभ होईल आणि अर्थव्यवस्था सुधारेल.

शशी थरुर यान्चे स्पिच मस्तच आहे. बातम्यांमधे बघितले.
अश्विनी छान माहिती शेअर करत आहेस. धन्यवाद ग.

वर एका प्रतिसादात मी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या भावाची घसरण होते आहे ह्याबद्दल लिहिलं आहे. अजूनही भाव खूप घसरणार आहेत. पण ह्यामुळे भारताला मोठा फटका बसणार आहे (अर्थात, वैयक्तिक खरेदीदारांची मजा आहे).

२०११ मध्ये RBI ने सोने खरेदी केली होती. त्यावेळी असलेल्या किंमतीपेक्षा आता ४४%ची घट झाली आहे. आर्थिक संकटाच्यावेळी शेवटचा पर्याय म्हणून सोने उपयोगी ठरते. पुर्वी १९९१ मध्ये भारताने आर्थिक परिस्थिती गंभीरपणे खालावल्यावर RBI ने युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे सोने गहाण ठेवले होते. तेव्हा आपली परकीय गंगाजळी १.२ अब्ज डॉलर्सवर आली असल्याने ६० कोटी ५० लाख डॉलर्स उभे करण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडलाही सोने देण्यात आले होते. दोन्ही बँकांकडे मिळून ६७ टन सोने दिले गेले. त्यातच सोन्याचे दर घसलयामुळे राखीव साठ्याचेही मूल्य घसरले आहे.

------------
सहजच मनात आलं.....आपण वाचलेले असते की स्वातंत्र्यपुर्व काळात लोकांनी आपल्याकडले सोने देशकार्यासाठी नेत्यांकडे मोठ्या विश्वासाने सुपुर्द केले होते. आता कधी ग्रीससारखी दिवाळं निघण्याची आपली वेळ आली तर अमर्याद सोन्याचा साठा ज्या देशाच्या नागरिकांकडे आहे त्या देशाला वाचवण्यासाठी हे सोन्याने लगडलेले नागरिक आपले सोने उतरवून देतील काय?

Pages