एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स लोक्स Happy

>>एपिक चॅनल शु स्ट्रिंग बजट वर सुरु झाल्यासारखे वाटते आहे
ह्या चॅनेलला मुकेश अंबानी, आनंद महेन्द्रा ह्यांचं बॅकिंग आहे.

>>सध्या एपिकवर काही नवीन दाखवत नाहीयेत. सगळे रिपिट्स आहेत
हो, ते आहे खरं. आता देवलोकचा सीझ्न २ सुरु होईल असं म्हणताहेत.

'लॉस्ट रेसिपीज' चा कालचा एपिसोड काश्मीरवर होता. इथे मसाल्यांत मुख्य भर शहाजिरे, सौंफ पावडर, सुंठ पावडर, वाळवालेला पुदिना, कसुरी मेथी. मोहरीचं तेल खूप वापरतात. तसंच त्यांचा स्वत:च एक खास मसाला असतो. मला त्याचं नाव नीट कळलं नाही पण त्याची लालभडक वडी दोन डिशेस मध्ये वापरली होती. पहिली डिश Houk Sun. ही सुक्या भाज्यांची बनवतात - सुकवलेले टोमेटो, भोपळा, वांग वगैरे. पूर्वी काश्मीर मध्ये बर्फ पडलं की रस्ते बंद व्हायचे, ताज्या भाज्या मिळत नसत. तेव्हा उन्हाळ्यात वाळवून ठेवलेल्या भाज्या वापरत. आता सगळीकडे फ्रेश भाज्या मिळतात. म्हणून हे कोणी करत नाही. नंतर एका आजीने तिच्या दादीच्या मावशीकडून शिकलेली सलगम आणि बदकाचे मांस ह्यापासून बनलेली शबदेग ही डिश दाखवली. ही रात्री ८ तास दमवर स्लो कुक करतात आणि सकाळी नाश्त्याला खातात. पूर्वी दल लेक मोठा होता त्यात खूप बदकं असत. लोकांकडे स्वत: पाळलेली बदकं असतं. तेव्हा ही डिश होत असे. आता दल लेक तेव्हढा मोठा राहिला नाही. लोकांना एखादी डिश आठ तास शिजत ठेवण्याइतका पेशन्स नाही. तेव्हा ही डिश बनत नाही.

शेवटची डिश काश्मिरी पंडितांची. ही स्वीट डिश shufta ह्या नावाने ओळखली जाते. ह्याचा शब्दश: अर्थ छोटे तुकडे करणे. साखरेचा पाक करून घ्यायचा. तुपात पनीरचे चौकोनी तुकडे डीप फ्राय करायचे. ते पाकात घालायचे. मग खोबऱ्याचे काप, बदाम, इलायची लवंग पूड, खजूर, किसमिस, केशर आणि सर्वात शेवटी लिंबाचा रस घालायचा. उब देणारी ही डिश हे पंडित लोक काश्मीर मध्ये असेतोपर्यंत करत. पुढे ते इथून स्थलांतरित झाले. उष्ण प्रदेशात गेल्याने ह्या डिशची गरज भासेनाशी झाली.

गुड. पण मी म्हणाले तस त्यांना अजुन नवीन बरच काही करायला स्कोप आहे. तो दानव हंटर्स नावाचा येडचापपणा परत करु नका म्हणजे मिळवल.

Lol नैतर काय... कैच्याकै होत ते.. जेव्हा केव्हा मी लावायचे तेव्हा तेव्हा ती मुलगी फॉरेनहुन त्या महालात पहिल्यांदा येते हाच एपिसोड पाहिला आहे... ते प्रकरण नक्की काय होत हे अजुनही कळलेल नाही..

उनाकोटीचा 'एकांत' मधला भाग चुकला होता. तेव्हा एपिक चॅनेल डीश टिव्ही वर येत नव्हतं. नंतर सुद्धा कधी रिपीट टेलिकास्ट पाहता नाही आलं. आज इंडियन एक्स्प्रेस मधे उनाकोटीवर एक मस्त लेख आलाय. फोटोंसकट :-
http://indianexpress.com/article/lifestyle/destination-of-the-week/a-mag...
कसली अद्भुत जागा आहे !

ह्या चॅनेलला मुकेश अंबानी, आनंद महेन्द्रा ह्यांचं बॅकिंग आहे.

आँ!!! मग पाणी मुरते कुठे आहे? कंटेंट डेवलपमेंट ला पैसा नाही? श्रीगणेश अन महाभारत (त्यातल्यात्यात महाभारत सोडा) चे रिपीट टेलीकास्ट काय , खुप खुप काही काही आहे की बनवायला !!

माझ्यासाठी तरी सगळेच एपिसोड नविन आहेत. धर्मक्षेत्र विशेष उल्लेखनीय कार्यक्रम आहे(हेमावैम). महाभारत वेगळया प्रकारे समोर येतेय माझ्या.

हा हे खरे की या वाहिनीला अनेक विषय मिळू शकतात कार्यक्रम बनविण्यासाठी. इतर रडारडीच्या कार्यक्रमांपेक्षा यावरील कार्यक्रम बरे आहेत.
ती गणेशाची मालिका उगाच दाखवतात असं वाटतं.

काल रात्री ९ला कहीसुनी आणि ९:३० ला एकांत दाखवत होते. कही सुनी चं माहित नाही पण एकांतचा रिपिट एपिसोड होता.

राजस्थान आणि हरियाणा च्या सीमेवर दोसा नावाचा पर्वत आहे तिथे चवनऋषींचा आश्रम अजून आहे. ह्याबद्दल गुरुवारच्या 'काही सुनी' मध्ये एक कथा सांगितली.

चवनऋषी अनेक वर्षं तप करत होते. त्यामुळे त्यांच्याभोवती मुंग्यांचं वारूळ तयार झालं होतं. फक्त त्यांचे डोळे त्यातून दिसत होते. एका राजाची मुलगी फिरत तिथे आली आणि कुतूहलाने तिने त्यांच्या डोळ्यावर खडा मारला त्यामुळे त्यांना इजा झाली. एक उपकथा अशी की त्यांनी संतापून राजाची सेना जगाच्या जागी थिजवली. आणि ति पूर्ववत करून हवी असेल तर तुझ्या मुलीशी माझं लग्न लाव असं सांगितलं. पण मुलीची परवानगी विचारली. दुसरी उपकथा अशी की मुलीने स्वत:च आपल्या पापाचं परिमार्जन म्हणून ऋषींची सेवा करायचं ठरवलं. असो. लग्न झालं आणि ती मुलगी पत्नी म्हणून आश्रमात राहू लागली.

स्वर्गात अश्विनीकुमार हे जुळे बंधू देवांचे वैद्य आणि इंद्राचे गुरु पण त्यांना पूर्ण देवाचा दर्जा नसल्याने यज्ञातला भाग मिळत नसे. इंद्राने त्यांना चवनऋषीची मदत घ्यायला पृथ्वीवर पाठवलं. त्यांना नदीवर त्यांची पत्नी दिसली आणि त्यांनी तुझी जागा तर स्वर्गात आहे म्हणून तिला आपल्यापैकी एकाची पती म्हणून निवड कर असं म्हटलं. तिने ऋषींवर आपलं प्रेम असल्याचं सांगून नकार दिला. ऋषींनी सुध्दा पत्नीला त्यांच्यापैकी कोणासोबत जायचं असल्यास आपली संमती आहे असं सांगितलं (मग आधी का लग्न केलं काय माहीत. लग्नानंतर आपण एकटेच बरे होतो असं झालं असेल बहुतेक!). पण तिने नकार दिला.

सकाळी दोघे अश्विनीकुमार ऋषींकडे आले आणि रूप किती महत्त्वाचं आहे हे त्यांना पटवून देऊ लागले. तेव्हा ऋषींनी त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून एक रसायन बनवायची विनंती केली. जेणेकरून ऋषी तरुण आणि सुन्दर दिसतील. मग ते आणि रूप पालटलेले अश्विनीकुमार तिच्यासमोर गेले आणि ह्यातला तुझा पती कोण तो ओळख असं म्हणाले. (इथेही परीक्षा बाईनेच द्यायची!). तिने ऋषींना ओळखलं आणि बाह्य रूपापेक्षा अंतर्गत गुण महत्त्वाचे असं सांगितलं. राजाची लेक दिसायला सुमार पण गुणी असती तर ऋषी हेच म्हणाले असते का देव जाणे. असो.

तर अश्विनीकुमारांनी हे जे रसायन केलं होतं ते म्हणजे आत्ताचं चवनप्राश म्हणे.

कालचा राजा, रसोई चा बनारसचा एपिसोड १०:३० पर्यंत पाहिला. ह्या शहरात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकले जाण्याचं प्रमाण खूप आहे. आणि बरेच लोक ते घेऊन खातात. ही एक प्रकाराची परंपरा आहे. ह्यामागची २ कारणं सांगितली गेली. एक तर पूर्वी इथे लोक फारसे रहात नसत. इथे मरून मोक्ष मिळावा ह्या हेतूने इथे येणाऱ्या लोकांची संख्या अधिक. असे लोक एकत्र एका घरात रहात. त्यामुळे घराबाहेर पडवीत एखादं दुकान थाटूनच अन्नपदार्थ विक्रीस ठेवून व्यवसाय करणं शक्य होतं. तसंच बरेचसे लोक दिवसभर पूजापाठ करण्यात मग्न असत. त्यांना स्वयंपाक करायला वेळ नसे. म्हणून असं विकत मिळणारं अन्न खायचा प्रघात पडला म्हणे. पण सर्व शाकाहारी. ह्यात कचोरी (म्हणजे पूरी), बटाटा भाजी, इमरतीसारखी दिसणारी जिलबी (ह्याला जिलेबा म्हणत होते), दुधाचे नाना पदार्थ, बटाटा/गाजर/दुधी हलवा असे अनेक प्रकार असतात. 'सुरतने जनम अने काशिनु मरण' अशी म्हण म्हणूनच गुजरातीत आहे. दूध, मलाई, गोड असे पदार्थ खाऊन ते पचावेत म्हणून त्यावर बनारसी पानाचा उतारा आहेच. ह्यात जे घटक घालतात ते मात्र भारताच्या चार दिशांतून येतात. शंकराला प्रिय म्हणून इथे भांग, भांगेचे लाडू वगैरे गोष्टीही मिळतात. सरकारी परवानगीने दुकानं ह्या गोष्टी विकतात.

इथे अनेक प्रकारची अन्नछत्र चालतात. ह्यामागेही एक कथा आहे. शंकराने एकदा अन्न-पाणी हासुध्दा एक प्रकारचा मोहच आहे म्हणून त्याचा त्याग केला होता (ही कथा देवलोक च्या एका एपिसोडमध्ये सांगितली होती. बहुतेक देवांचं अन्न ह्या एपिसोड मध्ये) त्यामुळे चिडून पार्वतीने सजीवांना खायला घालायची आपली जबाबदारी पार न पाडायचा निर्णय घेतला. पृथ्वीवर हाहाकार माजल्यावर शंकराला आपली चुक कळून आली. मग त्याने तिला एक शपथ घ्यायला लावली की जोवर माणसाचा जीव आहे तोवर ती अन्नपूर्णा बनून त्याचे पालनपोषण करेल. आणि त्याने स्वत: अशी शपथ घेतली की माणसाचा मृत्यू झाला की तो त्याला तारक मंत्राचा वापर करून मोक्ष देईल.

स्वप्ना .. रोज ९ ते ११ एपिक चॅनेल बघणं सुरु झालयं ..नवरोबाला खादाडी आवडतेच .. एखादं दुसरा एकांत एपिसोड पण चांगला वाटला त्याला ... Happy
७ आणि ८ मे ला सगळ्या टागोर स्टोरीज सकाळी ११ ते रात्री ११ दाखवणार आहेत

मग आधी का लग्न केलं काय माहीत. लग्नानंतर आपण एकटेच बरे होतो असं झालं असेल बहुतेक! > Lol
राजाची लेक दिसायला सुमार पण गुणी असती तर ऋषी हेच म्हणाले असते का देव जाणे. > +१

ह्या पराग फाटकांना चॅनेलच्या बाजूने लिहायचं आहे का विरोधात हे प्रथम माझ्या लक्षातच आलं नाही. ज्यांचं आयुष्य आटपाटनगराप्रमाणे आहे त्यांनीच हे चॅनेल बघायचं? का बरं? उलट मी असं म्हणेन की रोजच्या विवंचना, त्रास, कटकट विसरून काहीतरी नवं बघून फ्रेश वाटावं ह्यासाठी हे चॅनेल आहे. बाकीच्या चॅनेलमधली रडारड, आरडाओरडा बघून श्रमपरिहार होतो का? 'बुध्दीजीवी' हा शब्दही तिरकसपणे वापरलेला दिसतो. थोडक्यात काय तर चारचौघासारखे वागला नाहीत तर तुम्ही स्वतःला शहाणे समजता हा खास भारतीय सूर दिसतो ह्या लेखात. अजिबात पटला नाही.

लोक्स, देवलोकचा सीझन २ चालू झाला १८ तारखेपासून - सोम-गुरु रात्री १० वाजता. ह्या शनिवारी रात्री ८ ते १० रिपिट टेलिकास्ट आहे. रविवारी सकाळी ९ ते १० आणि ११ ते १२ आहे.

दर शुक्रवारी रात्री १० वाजता 'द ग्रेट एस्केप' सुरू झालं आहे. पहिले २ भाग दलाई लामांची तिबेटमधून सुटका यावर आधारित होते. वातावरण-निर्मिती आणि कॅमेरावर्क अप्रतिम होतं. दलाई लामांच्या पूर्वायुष्याबद्दल विशेष माहिती नव्हतं. त्यामुळे बघताना गुंगून जायला झालं.

पुढे इतरही वेगवेगळी कथानकं दाखवणार आहेत असं प्रोमोवरून कळतं. त्यात एक रंगीत बुरखा घातलेली महिला, तिच्या हातात लहान मूल, ती कुणापासून तरी पळतेय अशी दृश्यं दिसली. ते 'नॉट विदाऊट माय डॉटर' असेल का असं वाटलं.

ललिता-प्रीति, 'द ग्रेट एस्केप' बद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद! पहिल्या दोन भागांचा रिपिट ह्या आठवड्यात दाखवला तर बघते. ती बाई अफगाणिस्तानात अडकलेली सुश्मिता बॅनर्जी आहे. आत्ता प्रोमोत तसं सांगितलं.

इंडियन मार्शल आर्टस वर एक कार्यक्रम तसंच लूटेरे सीझन २ पण सुरु झालाय.

काल ते जगन्नाथ पुरी वरचे देवलोक बघितले. एकदा पटनाईक म्हणाले की त्या मुर्ती किमान दीड हजार वर्षे जुन्या आहेत आणि मग सांगितले की त्या मुर्ती दर १४ वर्षांनी बदलतात. मूर्ती बदलत असताना मूर्तींंच्या आत जे 'द्रव्य' असती ते नवीन मूर्तीत ट्रान्स्फर केले जाते. हे करणे अगदी गुप्तपणे केले जाते - करणार्‍याचे हात / डोळे बांधलेले असतात. मग असे असताना त्या मूर्ती किमान दीड हजार वर्षे जुन्या आहेत हे कसे समजणार? बाहेरचे लाकूड जास्तीत जास्त १४ वर्षे जूने असेल आणि आतले द्रव्य कोणीच बघितले नाहीये, त्याची टेस्ट करणे तर दूरच.

या एपिक चॅनेल चे प्रोग्राम युट्युब वर किंवा अन्यत्र परत पहाण्याची सोय आहे का? नसल्यास फी आकारुन ते नेटवर उपलब्ध करून का दिले जात नाहीत?

खूप चांगले प्रोग्राम मिस होतायेत

Pages