एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना, मी सुध्दा तुझ्यामुळेच एपिक पहायला लागलो, त्यात मी आवर्जून रबिन्द्रनाथ टागोरांच्या कथा - +१

एपिक आता एच डी झालाय ... टाटा स्काय वर तरी.. >> टाटा स्काय वर एपिक एस. डी. चॅनल-१३४ वर सुरु आहे. जुन्या नंबर वर एच. डी. केलय.

स्वप्ना, इथे वाचतेच नेहमी. तू इतकं व्यवस्थित लिहीतेस की एपिसोड पाहिल्यासारखंच वाटतं. म्हणून ते धन्यवाद म्हणाले होते Happy

तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे (एकांत, एपिक चेनेल, ऑक्टोबर ८ २०१५)

उत्तर भारतात गंगा सर्वात पवित्र नदी मानली जाते. असं म्हणतात की गंगेत एक डुबकी मारली की आयुष्यभराची पापं धुतली जातात. तेच स्थान दक्षिणेत कावेरी नदीला आहे. ह्या ७६५ किमी लांब नदीबद्द्ल एक मनोरंजक आख्यायिका आहे. असं म्हणतात की तुळा महिन्यात म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये कावेरी आणि गंगा जमिनीखाली भेटतात. लोकांची पापं धुवून धुवून अस्वच्छ झालेली गंगा कावेरीला भेटून स्वच्छ होते.

कावेरी दक्षिण भारतातली अतिशय प्राचीन नदी आहे. हिला १०० हून अधिक उपनद्या मिळतात. मनुष्याचा इतिहास जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून् त्याच्या आयुष्यातल्या घटनांची झलक कावेरीच्या किनारयावर पहायला मिळते. कावेरीत ३ बेटं आहेत - त्यात सर्वात प्रमुख आहे ते श्रीरंगापटटनम, तीच जागा जिथे टिपू सुलतान आणि त्याचे वडील हैदरअली चार मोठी युद्धं लढले होते. टिपूने हे राज्य वोडीयार राजघराण्याकडून जिंकून घेतलं होतं (हे इथे १४ व्या शतकापासून राज्य करत होते). जेव्हा इंग्रजांनी टिपूला हरवलं तेव्हा त्यांनी म्हैसूरची सूत्रं पुन्हा ह्याच घराण्याकडे सोपवली.

श्रीरंगापटटनम वर असलेल्या श्रीरंगनाथस्वामी मंदिरात शतकानुशतकं विष्णूच्या अवताराची, रंगनाथस्वामीची, पूजा होत आलेली आहे. ह्या मंदिराला वोडीयार राजघराण्याकडून बरीच मदत मिळत असे. हे मंदिर आणि वोडीयार राजघराण ह्याम्च्याशी निगडीत एक अशी अद्भूत कहाणी आहे की जिच्यामुळे ३ घटना आजही घडत आहेत.

१९ पिढ्यांपासून म्हैसूरच्या राजाला मुलबाळ होत नाही.

जवळचं एक गांव मालंगी कावेरी नदीमुळे हळूहळू नष्ट होतंय.

आणि इथून ४५ किमी दूर असलेलं तलक्कड वाळूखाली गाडलं गेलंय.

....................इथे लोक मानतात की हे सगळं होतंय ते एका ४०० वर्षं जुन्या शापामुळे ज्याचा प्रभाव आजही कायम आहे.

कोणी हा एव्हढा जबरदस्त शाप दिला? आणि का?

तलक्कड हे कावेरी नदीतलं मोठं आणि कदाचित एकमेव Sand Dune आहे. हे हवेतून येणाऱ्या वाळूच्या कणांमुळे बनलं आहे. १९५१ मध्ये एका इतिहासकाराने तलक्कड वर एक पुस्तक लिहीलं. त्यानुसार एकाच वर्षात तलक्कड मध्ये १२ फुट वाळू जमा झाली. इथं आणखी खोदकाम केलं तर कदाचित इंडस व्हेली सारखी अजून एखादी जुनी संस्कृती सापडेल. आज हे कावेरीच्या तीरावरच एक छोटं गाव आहे जिथे सगळीकडे वाळूचे ढीग दिसतात. इथे जी ४-५ मंदिरं दिसतात तीसुद्धा एएसआय ने जमिनीतून खोदून काढली आहेत. जाणकार म्हणतात की अशीच आणखी मंदिरं इथे वाळूखाली गाडली गेलेली असतील. इथे मिळालेल्या अवशेषांवरून असं समजतं की इथली वस्ती ३-४ किमी पर्यंत पसरली होती. इथे हिंदु आणि जैन धर्मियांसोबत बौध्द धर्मीय सुध्दा रहात असत. असं अनुमान काढता येतं की इथे एके काळी १५०० हून जास्त कुटुंबं रहात असावीत.

इथे एक मंदिर आहे - वैद्येश्वर मंदिर. हे मंदिर पाहून लगेच कळून चुकतं की जेव्हा ते बांधलं तेव्हा इथे अजिबात वाळू नसेल. एव्हढ्या मोठ्या दगडी इमारतीचा पाया घालायला जमीन मजबूत हवी. वाळूत अशक्य आहे. मग ही एव्हढी वाळू आली कुठून? जवळपास तर कुठे समुद्रसुध्दा नाही. इथे रचैय्या म्हणून एक गृहस्थ होता (जवळच्या गावात रहाणारा) ज्याने सूत्रधाराला ह्यामागची कथा सांगितली. हीच त्या शापाची गोष्ट.

हा शाप दिला आलामेलाम्मा नावाच्या स्त्रीने जी एकेकाळी राणी होती. ह्या कथेचा पाया आहे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. अशी घटना ज्यामुळे तलक्कड आणि म्हैसूर वोडीयार घराण्याच्या साम्राज्याचा भाग बनले. १४ व्या शतकापासून म्हैसूरवर वोडीयार घराण्याचं राज्य होतं. तेव्हा म्हैसूर एक छोटं राज्य होतं आणि विजयनगर साम्राज्याचा भाग होतं. जवळचं श्रीरंगापटटनम म्हैसूरहून मोठं होतं. १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्य नष्ट झालं. आणि त्या भागातलं राजकारण ढवळून निघालं. तेव्हा श्रीरंगापटटनम चा राजा होता रंगराय. ह्याला तिरुमलराय असंही म्हणतात. ह्याला अशी भीती होती की आसपासच्या राज्याचे राजे त्याच्यावर हल्ला करतील. म्हणून त्याने कट केला आणि त्या राजांना नवरात्रीच्या पुजेला बोलावून कपटाने त्यांना मारू लागला. पण म्हैसूरच्या वोडीयार राजाला ह्या कटाचा सुगावा लागला आणि तो वाचला. मग त्याने श्रीरंगापटटनम वर हल्ला केला आणि ते जिंकून घेतलं ह्या लढाईत तिरुमलराय मारला गेला. त्याची बायको आलामेलाम्मा जवळच्या मालंगी गावात जाऊन राहू लागली. ही भगवान रंगनाथस्वामीच्या पत्नीची भक्त होती. ह्या देवीचं मंदिर, आदिरंगामंदिर, आजही दक्षिण भारतातलं एक प्रमुख देवस्थान आहे. तेव्हाच्या काळात दर मंगळावर आणि शुक्रवार मंदिरात मोठी आरती होत असे. तेव्हा देवीची मूर्ती दागीन्याने मढवत असत. आरतीनंतर हे दागिने आलामेलाम्माजवळ सुरक्षीत ठेवण्यासाठी दिले जात. जेव्हा ती मालंगी गावात गेली तेव्हा हे दागिने सोबत घेऊन गेली. युध्दानंतर काही काळाने मंदिराचे पुजारी राजा वोडीयार कडे गेले. त्यांनी विनंती केली की हे दागिने परत घेऊन यावेत. राजाने लगेच आपले शिपाई मालंगी गावात पाठवले. आलामेलाम्माने फक्त एक मोत्याची नथ दिली आणि बाकीचे दागिने द्यायला नकार दिला. आपल्या आज्ञेचे पालन होत नाही हे पाहून राजा भडकला. त्याने शिपायांना हुकुम दिला की दागिने परत घेतल्याशिवाय यायचं नाही. जेव्हा शिपाई आलामेलाम्मा ला शोधात दुसऱ्यांदा आले तेव्हा ती तलक्कडमध्ये होती. ही तिची जन्मभूमी होती. तिला शिपाई कश्यासाठी आलेत ते कळलं. ती नदीच्या काठावर उभी राहिली आणि तिने दागिन्यांसकट कावेरीत उडी घेऊन जीव दिला. पण त्याआधी तिने राजा वोडीयार ला शाप दिला.

म्हैसूरच्या राजाला कधी मुलबाळ होणार नाही.

मालंगी कावेरी नदीत बुडेल.

तलक्कड वाळूखाली गाडलं जाईल.

तेव्हापासून तलक्कडवर वाळू पसरायला लागली आणि ते वैराण झालं. मालंगी जवळ नदीचा प्रवाह फार तीव्र आहे. इथे पाण्यात भोवरे आहेत. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही की म्हैसूरच्या राजाला गेल्या ४०० वर्षांपासून दर दुसर्या पिढीत (१९ पिढ्यांपैकी १० पिढ्यांत) मुलबाळ होत नाही. दत्तकपुत्र च राजा होतो.

पण वैज्ञानिकांचं आणि इतिहासकारांचं काय मत आहे ह्याबद्दल? कुठून आली एव्हढी वाळू तलक्कडमध्ये? का बुडतंय मालंगी? का वोडीयार घराण्याला आपला वंश टिकवायला दत्तक मुलं घ्यावी लागतात?

इतिहास सांगतो की १७ व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात मोठा दुष्काळ पडला होता. कावेरीतल पाणी बरंच कमी झालं. जे काही उरलं होतं ते १४ व्या शतकात बनलेल्या जवळच्या एका धरणाने अडवलं होतं. कावेरी सुकल्यावर तिच्या तळाशी जी बारीक रेती होती ती उडून जाऊ लागली. हवा दक्षिणेकडून येत असल्याने ती ह्या वाळूला तलक्कडकडे नेऊ लागली. आणि हळुहळू सगळं तलक्कड त्यात बुडालं.

कावेरी मालंगी जवळ Elbow Bend म्हणजेच एक तीव्र वळण घेते. हे जलद वाहणारं पाणी ह्या तटाला आणि त्यावर वसलेल्या गावाला हळूहळू नष्ट करतंय. ह्या वळणाजवळच पाण्यात मोठेमोठे खडक आहेत. म्हणून इथे भोवरे बनलेत.

नक्की काय आहे? तेव्हाच्या लोकांना हे शास्त्रीय कारण माहित नव्हतं. म्हणून त्यांनी ह्या कथा रचल्या? का ह्या कथा न पटणाऱ्या लोकांनी शात्रीय कारणं शोधून काढली? आणि मग वोडीयार घराण्याचं काय? असं म्हणतात की राजा वोडीयार ने आपल्या म्हैसूरच्या महालात आलामेलाम्मा ची मूर्ती ठेवली होती. ह्या मूर्तीची आजही पूजा होते ह्या आशेपायी की तिच्या आत्म्याला शांती मिळून हा शाप संपेल. बरं शाप तर असा होता की म्हैसूरच्या कुठल्याच राजाला मुलबाळ होणार नाही. त्यात दर दुसरया पिढीचा उल्लेख नव्हता. ऐकायला काहीतरी गडबड वाटते नाही का? पण नीट विचार केलात तर लक्षात येईल की एका मुलाला दत्तक घेऊन राजा बनवलं गेलं तरी तो मुळचा राजा नसल्याने शाप त्याला लागू नाही. पण त्याचा मुलगा मात्र राजकुमार म्हणून त्याला मात्र शाप लागू. हे असं चाललंय ४०० वर्षांपासून. अगदी शेवटचा राजा श्रीकांतदत्त वोडीयार २०१३ मध्ये गेला तेव्हा त्यालाही मूल नव्हतं. मग ह्यामागच कारण काय?

काही लोकांची ह्याबद्दल एक थिअरी आहे. ह्या राजांची लग्नं त्यांच्या नात्यात होतात. म्हणून एक बायोलॉजिकल डिफेक्ट, इनब्रिडीन्ग डिप्रेशन, येतो. म्हणून ह्या राजांना मुलं होत नाहीत. असं म्हटलं जात की जेव्हा इंग्रजांनी सर्व भारतावर आपला Doctrine of Lapse लागू केला तेव्हा आपलं राज्य वाचवायला इथल्या राजपरिवाराने स्वत:च ही शापाची अफवा पसरवली.

आता कश्यावर विश्वास ठेवायचा ते तुमच्यावर अवलंबून.

काल एपिक वर संध्याकाळी ६ ते ७ महाभारत चा एक आधी न बघितलेला एपिसोड बघितला. जे महाभारत दूरदर्शन वर दाखवले होते (९४ एपिसोड्स) त्यात भिष्म प्राणत्याग करुन संपले होते. मात्र कालच्या एपिसोड मधे भिमाचा नातु बर्बरीक युद्धाच्या तयारिने आलेला दाखवलेला होता. ही कथा महाभारत युद्धाच्या आधिची आहे. कोणी सांगु शकेल का कि हे नविन एपिसोड्स कधी व कुठल्या चॅनल वर दाखवले होते? त्यांच्या ऑनलाईन व्हिडीओ लिंक मिळु शकतील का?

या एपिसोड मधे बरेचसे (जवळपास सर्वच) कॅरॅक्टर पुर्वीच्या महाभारतातीलच आहेत पण वयं वाढलेली आहेत. B. R. TV enterprises च प्रोडक्शन आहे. आधीचा बलराम कृष्ण म्हणुन दाखवलेला आहे.

ही कथा महाभारत युद्धाच्या आधिची आहे. कोणी सांगु शकेल का कि हे नविन एपिसोड्स कधी व कुठल्या चॅनल वर दाखवले होते? त्यांच्या ऑनलाईन व्हिडीओ लिंक मिळु शकतील का? >> ???

लोक्स, देवदत्त पटनाईक ह्यांची 'देवलोक' आजपासून सुरु होतेय. बहुतेक दर बुधवारी रात्री १० वाजता. १०:३० ला 'राजा, रसोई और अन्य कहानिया'

रात्री ९ वाजता सियासत रिपिट दाखवत आहेत. कधीपासून सुरु केलं माहित नाही.

'देवलोक' चा कालचा एपिसोड पाहिला. वेद, पुराण, उपनिषदं ह्यातला फरक छान समजावून दिला. हा पहिलाच एपिसोड होता. पण पुढले एपिसोड्स शक्यतो एकाच विषयावर असावेत असं वाटतं म्हणजे सखोल माहिती देता येईल. आज पण एपिसोड आहे वाटतं.

हिन्दू धर्मासोबतच बाकी धर्मांवरही असे माहितीपर कार्यक्रम सुरु केले तर फार बरं होईल.

महेश भट्टचा जुन्या स्टुडिओजवरचा कार्यक्रम कधी सुरु झाला? ह्या सोमवारी रात्री १० वाजता पहिला एपिसोड आहे का?

काल दुपारी देवलोक बघत होते तेव्हा त्यात वाल्याचा वाल्मिकी झाला त्याची गोष्ट दाखवत होते. एपिक छान आहे चॅनल. दानव हंटर्स सारखा एखादा टुकार कार्यक्रम एपिकच्या सौंदर्यावरची तीट वाटतो... बाकी सगळे कार्यक्रम सुं द र..

महेश भट्टचा जुन्या स्टुडिओजवरचा कार्यक्रम कधी सुरु झाला? ह्या सोमवारी रात्री १० वाजता पहिला एपिसोड आहे का?
१९ तारखेला १ ला पार्ट होता . R K स्टुडिओ वर होता . बहुतेक once a week असावा .
( सेट top box असेल तर information मध्ये season & episode no येतो )
देवदत्त पटनाईक ह्यांची 'देवलोक' - मस्त

गेल्या सोमवारी (१९ ऑक्टो.) सुरु झाला 'ख्वाबोंका सफर'.
मी नाही पाहिला.
रविवारी दुपरी १ वा. आणि रात्री १० वा. परत दाखवणार आहेत.

'ख्वाबोंका सफर' उद्या सकाळी (शनिवार - २४-ऑक्टो) सकाळी ९ वा. सुद्धा रिपीट आहे.

तसेच उद्या सिसायतचे १ ते ५ एपिसोड्स दुपारी २ ते ६ सलग दाखवणार आहेत.

http://www.epicchannel.com/schedule

खरच एपिक चॅनेल लै भारी आहे.
इतिहासात नी पुराणात रमायला आवडतं.
खरतरं तुमच्या मुळेच बहुसंख्यांना याची गोडी लागलीय.

आज महेश भट्ट यांचा एक शो आणि "दरिबा डायरीज" पाहिले ..छान आहेत.
शो च्या मधे.. महाभारत ची कथा "ड्रॉ" करताना दाखवली..मजेदार आहे.

देवलोकचा कालचा एपिसोड चुकला. आज सकाळी ११ ला पाहेन. सध्या बरं नसल्याने ऑफिसला बुट्टी आहे.

मागच्या एपिसोडमध्ये त्या अँकरने देवदत्त पटनाईकना महाभारत आधी का रामायण असं विचारलं तेव्हा त्यांनी ह्याबद्दल निश्चित सांगता येणार नाही असं म्हटलं. एका तर्कानुसार रामायण द्वापारयुगाच्या सुरुवातीला तर महाभारत त्याच युगाच्या अखेरीस. काहींच्या मते महाभारतातलं संस्कृत थोडं क्रूड आहे, त्यामानाने रामायणातलं संस्कृत वरच्या दर्जाचं आहे त्यामुळे रामायण नंतरच्या काळातलं असावं. एका कथेत असा उल्लेख आहे की वनवास +अज्ञातवास भोगायला लागल्यामुळे युधिष्ठिर कुरकुर करत होता तेव्हा एक ऋषींनी त्याला तू द्यूत खेळलास म्हणून हे तुझ्या नशिबी आलं पण रामाची काही चूक नसताना त्याने वनवास भोगला असे खडे बोल सुनावले तेव्हा रामायण आधी घडलं असावं Happy

Pages