एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज ११ वाजता देवलोकचा एक एपिसोड पाहिला. बहुतेक कालच्या एपिसोडचा रिपिट टेलिकास्ट होता. रंगांवर चर्चा होती. देवदत्त पट्टनाईक ह्यांच्या मते पाश्चिमात्य देशात मुख्यत्त्वेकरुन काळा, पांढरा, ग्रे असे रंग असायचे पण भारतात नानाविध रंगांचे कपडे असत कारण रंग कपड्याला लावण्याच्या कामी वापरत ते Fixer तेव्हा फक्त भारतात बनत असे. त्यातून संन्यासी जीवनाचा रंग एकच. पण गृहस्थाश्रमात मात्र अनेक रंग उपयोगात आणत.

मग चर्चा नानाविध देवतांच्या रंगांवर गेली. शंकर हिमालयात रहाणारा म्हणून कर्पूरगौर. पण अनेक चित्रांतून राख फासलेला म्हणून थोडासा डार्क दाखवला जातो. पावसाळ्याआधी येणारे कृष्णमेघ तसंच काळी जमीन सुपीक म्हणून आपल्या कृषीप्रधान देशात दोन्हीचं महत्त्व अधिक म्हणून कृष्ण काळा दाखवतात. सरस्वती विद्येची देवता म्हणून तिच्या कपड्यांचा रंग पांढरा. पण वसंतपंचमीच्या दिवशी तिची पूजा होते तेव्हा तिच्या वस्त्रांचा रंग पिवळा तेव्हाच्या काळात येणार्‍या मोहरीच्या फुलांचा रंग दर्शवायला. लक्ष्मीच्या साडीचा रंग लाल, कुमारिकेचा हा रंग, पावसाळ्याच्या आधिच्या जमिनीचा. पाऊस पडून शेतं फुलली की जो हिरवा रंग दिसतो तो माता बनलेल्या गौरीच्या साडीचा. तर मारुतीसारखे ब्रह्मचारी देव केशरी वस्त्रांत - हा रंग हळद + कुंकू एकत्र करून होतो तो रंग.

काळा रंग आपल्याकडे फारसा शुभ मानत नाहीत पण दक्षिणेकडे अय्यप्पाचे भक्त मात्र ह्या रंगाची वस्त्रं वापरतात ते कसं असा प्रश्न एकाने विचारला. तेव्हा पटनाईक म्हणाले की पुराणांत वगैरे असा कुठलाही रंग निषिध्द नाही. भारत मोठा देश असल्याने जे एकीकडे असेल तेच दुसरीकडे असेल असं नाही.

आपल्याकडे जी आक्रमणं झाली ती बहुधा उत्तरेकडून आणि ती करणारे मुख्यत्त्वेकरून वर्णाने उजळ. त्यामुळे गोरा रंग सत्तेचं, शक्तीचं प्रतीक ठरून काळा रंग कमी लेखला जाऊ लागला असेल कदाचित. कृषिप्रधान देशांत श्रीमंत वर्गातले लोक घराबाहेर फारसे पडत नाहीत त्यामुळे त्यांचा रंग फिका तर उन्हातान्हात राबणारी जनता थोडी काळ्या वर्णाची असाही भेदभाव निर्माण झाला असेल. असा भेदभाव थोड्याफार फरकाने चीनमध्ये आहे म्हणे.

पट्नाईक ह्यांनी गीतगोविंद मधला एक प्रसंग सागितला की कृष्णावर चिडलेली राधा मला काळा रंग बघायचाच नाही असं म्हणते. डोक्याचे, भुवईचे केस रंगवेन, कृष्ण दिसूच नये म्हणून डोळे मिटून घेईन असं म्हणते. त्यावर तिची एक सखी मिश्किलपणे म्हणते 'पण डोळे मिटलेस तर समोर काळा रंगच दिसेल की. मग कुठे जाशील?' Happy

आज बुधवारच्या देवलोकच्या एपिसोडचा रिपिट टेलिकास्ट पाहिला. एपिसोडच्या आधी लोकांना त्रिमूर्ती कोण विचारलं तर सांगता येईना. फक्त दोन लोकांनी बरोबर उत्तर दिलं. गुरुवारच्या एपिसोडच्या सुरुवातीलाही कृष्णाचा रंग कोणता ह्या प्रश्नाला एकाने ग्रीन असं उत्तर दिलं तेव्हा मी खरोखर कोपरापासून हात जोडले.

ब्रह्मदेव निर्माणकर्ता असूनही त्याची फारशी पूजा का होत नाही ह्याच्या काही कथा सांगितल्या.

१. विष्णू निद्रा घेत होते तेव्हा प्रलय होता. ते जागे झाले तेव्हा सृष्टी निर्माण झाली. विष्णूच्या नाभीतुन निघालेल्या कमळावर ब्रम्हदेव होते. आणि ते हे जग पाहून भयभीत झाले. तेव्हा विष्णूने त्यांना धीर दिला. देव हा भय निवारण्यासाठी असतो. तो स्वतः भयभीत होत असेल तर कसं चालेल म्हणुन कदाचित ब्र्ह्माची पूजा होत नसावी.

२. ब्रहमदेव एकदा पत्नी सावित्रीसह यज्ञाला सुरुवात करणार होते. सावित्री आंघोळ करायला गेली आणि मी येईतो सुरुवात करू नका असं सांगून गेली. खूप वेळ वाट पाहूनही ती न आल्याने ब्रह्माने गाईपासून गायत्री निर्माण केली आणि तिला शेजारी बसवून यज्ञाला सुरुवात केली. सावित्री परत आली आणि हे पाहून संतापली. थोडाही संयम नसलेल्या अश्या तुला लोक कधीही पू़जणार नाहीत असा तिने शाप दिला.

३. एकदा विष्णू आणि ब्रह्मदेवात भांडण लागलं.ब्रह्मदेवाचं म्हण्णं मी सृष्टी निर्माण केली तर माझी पूजा व्हायला हवी. तर विष्णू म्हणे मी पालनकर्ता म्हणून माझी व्हायला हवी. दोघांत वादविवाद सुरु झाला. मग प्रकरण युध्दापर्यंत येऊन ठेपलं तेव्हा शंकराने एका आगीच्या स्तंभाचं रूप घेत दोघांत मध्ये ठाकला. हा स्तंभ आकाशाच्याहीवर आणि जमीनिखाली गेला होता. मग असं ठरलं की दोघांपैकी जो कोणी ह्याचं एक टोक शोधून काढेल तो श्रेष्ठ. विष्णूने वराह रूप घेत पाताळाकडे झेप घेतली तर ब्रह्माने राजहंसचं रुप घेऊन वर झेप घेतली. वाटेत त्याला एक केतकीचं फूल वरून जमिनीच्या दिशेने येताना दिसलं. त्या फुलाने ब्रह्माला सांगितलं की मी ह्या स्तंभाच्या वरून आलो आहे. त्याचं बोलणं ऐकताच ब्रह्माला कळून चुकलं की स्तंभाचं वरचं टोक गाठायला युगं लोटतील. तेव्हा त्याने त्य फुलाला खोटं बोलायला सांगितलं की ब्रह्मानेच मला स्तंभाच्या वरून आणलं. पण ही गोष्ट शंकराच्या लक्षात आली. आणि त्याने ब्रह्माला शाप दिला की तू आपली पुजा व्हावी म्हनून खोटं बोललास. तुझी कोणीही पूजा करणार नाही.

कॉल करून एका माणसाने विचारलं की शंकराने ब्रह्मदेवाचं एक डोकं उडवलं अशी कथा मी ऐकली आहे ती काय आहे? तर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. तिचा मोह त्याला पडला. आणि स्वतःबद्दल गर्वही झाला. त्या सृष्टीला नीट पहाता यावं म्हणून त्याला ५ डोकी आली. पण हे सगळं बघून देवांना वाईट वाटलं. आपण ज्यांना पितामह मानतो त्या ब्रह्माने असं मोहात पडलेलं पाहून ते रडू लागले. त्यांच्या अश्रूतून शंकराचं रुद्ररुप प्रकट झालं. आणि त्याने ब्र्ह्मदेवाचं पाचवं डोकं उडवलं. तेव्हापासून तो चतुरानन म्हणजे चार डोकी असलेला झाला.

ब्रह्मदेवाची पूजा का होत नाही ह्याच्या पौराणिक कथांसोबतच एक ऐतिहासिक कारणही सांगितलं. ते असं की हिंदू धर्मात सुरुवातीची २००० वर्षं वेदीक परंपरा म्हणजे निसर्गाला देव मानायची - सूर्य, अग्नि, वरूण वगैरे. ह्या काळात ब्रम्हदेवाची पूजा होत असे. पुढे पौराणिक परंपरा म्हणजे यज्ञ, मंदिरं वगैरे आली आणि वेदिक परंपरा मागे पडली. त्यात पूजला जाणारा ब्रह्मदेवसुध्दा म्हणून पुढे कदाचित पूजला गेला नसावा.

जिज्ञासा Happy

दोन कार्यक्रमांच्या मध्ये फिलर असतात त्यात मनिकर्णिका घाटाबद्दल सांगत होते. पार्वतीची कर्णफुलं इथे पडली होती. पण शंकरांनी विचारूनही इथल्या लोकांनी काही सांगितलं नाही तेव्हा शंकर शाप द्यायला निघाले. लोकांनी क्षमा मागितल्यावर त्यांनी असं सांगितलं की हा भाग अंतिम संस्कारांसाठी ओळखला जाईल. आणि चितेला मुखाग्नी देण्याची जबाबदारी तुमची राहील. हे लोक डोंब्/डोम म्हणून ओळखले जातात. असं म्हणतात की शंकरांनी प्रज्वलित केलेला अग्नी इथे अजून आहे आणि तोच चितेला अग्नी द्यायला वापरतात. इथल्या प्रत्येक आत्म्याला मी स्वतः मुक्ती देईन असं शंकरांनी सांगितलं आहे म्हणे.

मस्त गं, स्वप्ना!

त्या केतकीच्या फुलाच्या गोष्टीचं एक्स्टेन्शन असं आहे की ते फूल खोटं बोललं म्हणून शंकराने त्यालाही शाप दिला की तुला माझ्या पूजेसाठी कोणीही वापरणार नाही. म्हणून शंकराला चाफ्याचं फूल वाहू नये असं म्हणतात.
अर्थात ही कधीतरी ऐकलेली स्टोरी आहे. यात तथ्य कितपत आहे माहिती नाही.

मी श्रीरामपूरला होते तेव्हा आमचे मालक आणि आजूबाजूचे म्हणायचे की आम्ही चाफ्याचे फूल वाहात नाही कोणत्याही देवाला, झाडे खूप होती तिथे. कारण कोणालाच माहिती नव्हते. आम्हाला हे नवीन होतं.

केतकी म्हणजे केवडा ना.

कालचा 'देवलोक' चा एपिसोड 'जीवजंतू' ह्या विषयावर होता. म्हणजे मानव, गंधर्व यक्ष, नाग आदी जातींबद्दल. पटनाईक ह्यांच्या मते हे सर्व ब्रह्मदेवाच्या निरनिराळ्या मानसपुत्रांपासून निर्माण झाले. उदा. कश्यप नावाच्या मानसपुत्राला अनेक बायका होत्या. त्यातल्या अदितीपासून देव, दितीपासून दैत्य, विनितापासून गरुड (म्हणून गरुडाला वैनतेय म्हणत असावेत), कद्रूपासून नाग आदी उत्पन्न झाले. तर वैश्रवा नावाच्या दुसऱ्या मानसपुत्राच्या दोन बायकांपासून यक्ष आणि राक्षस झाले.

देव म्हणजे स्वर्गात सुखात रहाणारे, दिसायला चांगले अशी प्रतिमा तर राक्षस देवांच्या विरोधात काळेकुट्ट अशी. यक्ष संपत्ती बाळगून असलेले, थोडे बुटके किंवा डीफोर्मड, सुंदर स्त्रियांनी वेढलेले पण संपत्ती कोणाला न् देणारे असे. तर नाग दैवी सामर्थ्य असलेले मणी बाळगणारे. पृथ्वीच्या वरचा तो लोक आणि तिच्या तळाशी असलेला तो 'तळ'. वेदांत असुरांचा उल्लेख देवांसारखाच केला आहे. पण पुढे पुराणात त्यांचा व्हिलन झाला.

समुद्रमंथनाची कथाही थोडी वेगळी सांगितली. एकदा इंद्र विलासात दंग असताना तिथे दुर्वास ऋषी आले. इंद्राचं त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे त्यांनी चिडून त्याला शाप दिला की तुझी संपत्ती नष्ट होईल. त्या शापाचा परिणाम म्हणून लक्ष्मी समुद्रात जाऊन लपली आणि तिला काढायला मंथन करावं लागलं. त्यावेळी अर्थ, धर्म, काम मोक्ष ह्यापैकी मोक्ष सोडून बाकी तिन्हीचं प्रतीक असलेल्या अनेक गोष्टी निघालेल्या. उदा. धर्माचं प्रतिक ऐरावत आणि घोडा. अर्थाचं प्रतिक पारिजात, चिंतामणी, कामधेनु. कामाचं प्रतिक चंद्रमा, अप्सरा आणि अमृत.

आपण असुर आणि राक्षस एकच मानतो. पण असुर हे देवांशी लढाई करणारे तर राक्षस मानवांशी. असुर आणि देव, राक्षस आणि मानव, गरुड आणि नाग हे फोर्स आणि काउंटरफोर्स.

ऑडियन्स मधुन एकाने पश्न विचारला की राहू आणि केतू राक्शस मग त्यांना का पुजतात? तर पटनाईक म्हणाले की जसं सितलादेवी स्मॉलपॉक्सची देवी, जरीमरी कॉलराची देवी. त्यांना पुजतो ते आदर द्यायला पण त्या आपल्या घरी येऊ नयेत म्हणून. तसंच राहू हा eclipse आणि केतू हा comets चं प्रतिनिधित्त्व करतो (धूमकेतू ह्या शब्दाचा उगम ह्यात असावा का?). म्हणून त्यांची पूजा.

दोन कार्यक्रमांच्या मध्ये फिलर प्रोगाम होता त्यात रसगुल्ल्याबद्दल माहिती सांगितली. आपल्याला गाय पवित्र, त्यामुळे तिचं दूध सुध्दा पवित्र म्हणून पूर्वीच्या काळी दूध फाडणे निषिध्द मानत. पुढे पोर्तुगीज आले आणि त्यांना 'छेना' ह्या पदार्थाचं फार वेड त्यामुळे भारतीयांनीसुध्दा दूध फाडायला सुरुवात केली.

नबीनचंद्र दास नावाच्या माणसाने रसगुल्ला बनवून विकायला सुरुवात केली. एके दिवशी त्याच्या दुकानात भगवानदास बागला नावाचा माणूस आला. त्याचं कुटुंब त्याच्यासोबत होतं. त्याच्या मुलाला तहान लागली म्हणून दासने त्याला पाणी दिलं आणि नुसतं पाणी कसं द्यायचं म्हणून एक रसगुल्ला दिला. मुलाला तो भारी आवडला. म्हणून भगवानदासने खाऊन पाहिला. त्यालाही आवडला. आणि त्याने डब्यांत भरून तो सोबत नेला जेणेकरून आणखी लोकांना तो खायला मिळावा. Happy

कालचा देवलोकचा एपिसोड स्वर्ग नरक ह्या संकल्पनेवर होता. ख्रिश्चन-इस्लाम मध्ये एक जन्म आहे. त्यामुळे तिथलं हेवन-हेल किंवा जन्न्त-जहन्नुम 'सदा के लिये' असतं. पण हिंदू धर्मात पुनर्जन्माचा कॉन्सेप्ट असल्याने स्वर्ग किंवा नरक ह्यातलं वास्तव्य काही काळापुरतं असतं. आपण म्हणतो की चांगलं काम केलं की स्वर्ग मिळतो आणि वाईट काम केलं की नरक. पण ह्याबद्दल एक महाभारत कथा आहे जी निदान मी तरी ह्याआधी ऐकली नव्हती.

कौरवांचा पाडाव केल्यावर पांडवांनी ३६ वर्षं राज्य केलं. आपण धर्माच्या बाजूने असल्याने आपल्याला सदेह स्वर्गात जायला मिळणार असं त्यांना वाटलं होतं. पण स्वर्गात पोचेतो धर्म वगळता सर्व पांडव आणि द्रौपदी मृत्युमुखी पडले. धर्माने सर्वाचा त्याग केल्या असल्याने त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. राज्याबाहेर पडल्यापासूने क कुत्रा त्याच्यासोबत होता तो स्वर्गात पोचेतो सोबत होता. पण तिथे इंद्राने त्याला आत घ्यायला नकार दिला. म्हणून धर्माने स्वर्गात आत यायला नकार दिला. ते पाहून खूश झालेल्या इन्द्राने दोघांना आत घेतलं. पण आत जाऊन धर्म बघतो तर काय आत एकही पांडव नाही मात्र कौरव स्वागताला उभे. तो हैराण झाला. त्यावर इन्द्राने सांगितलं की त्यांचा मृत्यू कुरुक्षेत्राच्या पावन भूमीवर झाला म्हणून ते स्वर्गात गेले. पण पांडव मात्र नरकात आहेत. हे ऐकून धर्म म्हणाला मग मला स्वर्ग नको, मी नरकातच जाईन. हा शुध्द अन्याय आहे. पांडव नरकात का गेले तर कुठे ना कुठे तरी त्यांच्याकडून अन्याय, अधर्म असं काहीस झालं होतं. द्रौपदीने पाच पती असून अर्जुनावर जास्त प्रेम केलं म्हणून ती नरकात, भीम जास्त खायचा म्हणून (बाप रे!), नकुलाला आपल्या सुंदर दिसण्याचा अभिमान वगैरे. धर्म आणखी भडकला. ह्यावर इन्द्र म्हणाला की तू सर्वाचा त्याग केला म्हणतोस पण राग आणि इर्षा अजून तुझ्यात आहेत. कौरवांचा पाडाव करून त्यांना मारून वर्ष लोटली पण अजून तू त्यांना क्षमा करू शकला नाहीस. तू स्वर्गात जायला योग्य आहेस का?

मृत्यूदेवता यम ह्यावरही एक कथा सांगितली. सर्वात आधी आले ते यमा आणि त्याची बहिण यमी. वंशवृध्दी व्हावी म्हणून हा आद्य पुरुष आणि ही आद्य स्त्री एकत्र येणं जरुरी होतं पण ते बहिण-भाऊ असल्याने असं करायला यमाने नकार दिला. यथावकाश तो वारला आणि पितृलोकात गेला. (ह्या लोकात मृत्यू झाल्यावर माणसं पुढल्या जन्मी जाईतो थांबतात. सॉर्ट ऑफ ट्रान्झिट पॉइंट :-)) पण पोटी मूल नसल्याने कोणी श्राध्द करणारं नाही म्हणून तो तिथेच अडकून राहिला आहे. फक्त कोणी गेलं की त्याचे प्राण हरण करायला त्याला पृथ्वीवर यायची परवानगी आहे. भावाच्या जाण्याचं दु:ख करत अश्रू गाळणारी यमी बनली यमुना नदी. आणि तिचंच दुसरं रूप म्हणजे यामिनी अर्थात रात्र. थोडी ऑकवर्ड स्टोरी आहे म्हणून फार लोकांना माहित नाही.

श्राध्द म्हणजे आपल्या पितृलोकांत पोचलेल्या पितरांना दुसरा जन्म घेता यावा यासाठी करतात. तिथे त्यांना अन्न मिळावं म्हणून पिंडदान देतात. पितरांना दात नसतात म्हणून हा घास मुरडून देतात. कावळा शिवणे हा कॉन्सेप्ट आला कारण कावळा 'का का' करतो. संस्कृतातले सर्व प्रश्न 'क' वरून असतात. 'किम' ', 'कुत्र' वगैरे. तसाच हा कावळा आपल्याला 'का का' करून 'तू आपल्या आयुष्याचं काय करतो आहेस' असा प्रश्न विचारून सावध करत असतो. मला नीट सांगता येत नाहिये. ऐकताना मात्र पटत होतं बुवा Happy

राजा रसोई और अन्य कहानिया मध्ये काल लडाखची खाद्यसंस्कृती दाखवली.

ह्या दोन कार्यक्रमांच्या मध्ये फिलर होता त्यात हाताने चित्र काढून भीष्माने अंबा, अंबिका आणि अंबालिका चं हरण केलं तिथपासून भीष्माच्या आणि दुर्वासांच्या लढाईपर्यंतचा भाग सांगितला. कसलं मस्त चित्र काढत होते. मान गये उस्ताद! मला वाटतं महाभारताची कथा अश्या प्रकारे दररोज थोडी थोडी सांगत असावेत. हे चॅनेल म्हणजे खजिना आहे नुसता.

तू स्वर्गात जायला योग्य आहेस का? >>> Happy
नेहेमीच मला पांडवाच्या बाजूबद्दल प्रश्न पडलेले आहेत... पण एकुणातच जीवनात जेत्याची बाजू ती खरी बाजू, न्याय्य बाजू हा निसर्गनियम आहे...

धन्यवाद स्वप्ना!

मला वाटतं महाभारताची कथा अश्या प्रकारे दररोज थोडी थोडी सांगत असावेत. >> हो. आणि तो रेखाचित्रकार तर अप्रतीम चित्र काढतो.

---
कानडा

vt220, कृपया धन्यवाद म्हणू नये Happy

>>आणि तो रेखाचित्रकार तर अप्रतीम चित्र काढतो.

+१०००००. हे काही ठराविक वेळी असतं का रोज? तर बघायचा प्रयत्न करेन.

त्या दिवशी पिंडदानाच्या बद्दल आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे - मन, आत्मा आणि शरीर ह्या तिघांना represent करण्यासाठी पिंडाचे ३ गोळे ठेवतात.

गुरुवारचा एपिसोड शक्ती म्हणजे देवी ह्या विषयावर होता. शंकर-पार्वती ची एक कथा दाखवली. दोघांचा विवाह झाल्यानंतरची. काशी नगरात पार्वती जेवण्यासाठी शंकराची विनवणी करत होती. तो मात्र जेवण नको असं सांगून ध्यानात मग्न. वर म्हणे मला अन्न वगैरे नको, माझी कोणी काळजी घ्यायला नको. मी असा निरंकारी आहे म्हणून माझ्या भक्तांना मी आवडतो. पार्वती म्हणाली की तुमच्या भक्तांच्या, सृष्टीच्या खाण्याची काळजी मी घेते. तिने पुन्हा शंकराला खाण्याविषयी विचारलं. तो काही बोलेना तेव्हा तिने माझी तुम्हाला काही गरज आहे का विचारलं तरी शंकर गप्प. शेवटी ती त्याला सोडून गेली. शंकराने नंतर डोळे उघडले तेव्हा बाजूच्या हिरव्यागार जंगलाऐवजी रखरखीत वाळवंट त्याला दिसलं. त्याचे गण मरून पडले होते. लोक काशी नगर सोडून चालले होते आणि जाताना त्याचा आशिर्वाद मागत होते. त्याला भिक्षा द्यायलाही कोणाकडे अन्न नव्हतं. शेवटी फिरत फिरत तो एका जंगलात आला तिथे एक स्त्री लोकांना जेवण देत होती. शंकरसुध्दा त्या रांगेत जाऊन बसला. जेव्हा ती स्त्री त्याच्यापर्यंत आली तेव्हा त्याला कळलं की ती पार्वती आहे. त्याने आपला कटोरा पुढे केला आणि म्हटलं 'भिक्षा मिळेल का?'. पार्वतीने अन्न वाढलं तेव्हा तो म्हणाला 'मला तुझी गरज आहे'. Happy

ह्यावर विवेचन झालं ते असं - मध्ययुगात अनेक संत महंत लोकांना तेव्हा सर्वसंगपरित्याग करायला सांगत. ही कथा सांगितली ती लोकांवर हे ठसवायला की संन्यास, तप वगैरे शब्द कितीही चांगले वाटले तरी संसारी जनांना कुटुंब पोसायला, चरितार्थ चालवायला काम करणं जरूरी आहे. त्यांनी काही न करता नुस्तं ध्यान धरून बसायचं म्हटलं तर बायका शिजवणार काय? मुलांना खायला घालणार काय?

असाही एक कॉन्सेप्ट सांगितला की निर्गुण म्हणजे पुरुष आणि सगुण म्हणजे स्त्री/प्रकृती. आत्मा हा निर्गुण तर शरीर हे सगुण. ब्रह्मा, विष्णू, महेश हे विश्वाला जन्म देणारे, पालन करणारे, नाश करणारे म्हणजे एका अर्थी verbs. तर त्यांच्या बायका सरस्वती (ब्रह्मदेवची बायको सावित्री ना?) म्हणजे विद्या, विष्णूची बायको लक्ष्मी म्हणजे धन आणि शंकराची पार्वती म्हणजे शक्ती. ह्या बायका nouns.

aaj kaal ekaant dakhavat naahit ka? me kiti divas shodhate aahe tyacha time, please ekaant cha time saanga

विद्या१, एकांत गुरुवारी रात्री १०:३० वाजता दाखवायचे. पण गेले काही आठवडे लावत नाहीत. ह्या आठवड्यात चेक करायचं राहिलं. http://www.epicchannel.com/schedule वर चेक करुन बघा.

Pages