एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकांतचा २० जानेवारीचा एपिसोड भुजपासून १३५ किमी वर असलेल्या 'लखपत' वर. एके काळी दररोज लाखांची उलाढाल असलेलं हे बंदर. म्हणून त्याचं हे नाव. सातव्या शतकात युआन श्वांगही इथे येऊन गेला होता म्हणे. ओमान, मस्कत, पुर्व आफ्रिकेतल्या अनेक देशांशी ह्याचा व्यापार चाले. जहांगीर बादशहा इथे आला तेव्हात्याने इथल्या राजाला सांगितलं की इथून हजला जायची सोय केली आणि त्यासाठी कर वसूल केला गेला नाही तर त्यांना वार्षिक खंडणी भरावी लागणार नाही. ते राजाने मान्य केल्याने इथून हजला जायचं मोठं केन्द्रही होतं. गुरु नानक इथूनच मक्का-मदिनेच्या यात्रेला गेले होते.

भाटिया आणि अगवानी (हे आडनाव नीट ऐकू आलं नाही) ही व्यापार करणारी प्रमुख घराणी. अगवानी तर खूप दानशूर होते. ह्या भागात दुष्काळ पडला तेव्हा सर्व गावाला आपल्या घरच्या विहिरीचं पाणी त्यांनी देऊ केलं. संकट आलं तर एक तर अल्लाचा सहारा नाहीतर अगवानीचा अशी म्हणच होती तिथे. सततच्या पाणी टंचाईला उत्तर म्हणून लोक निरनिराळे उपाय शोधून काढत. ह्यातला एक म्हणजे कापूस ताकात बुडवून वाळवून ठेवायचा. उन्हाळ्याच्या दिवसात थोड्याश्या पाण्यात कापूस भिजवला की ताक तयार. मला तरी हा उपाय अनहायजिनिक वाटला. असो.

इथे जमिनीवर सर्वत्र एक विशिष्ट प्रकारचे दगड मिळतात. त्यांना 'कोरी' (बहुतेक कवडीचा अपभ्रंश असावा का?) म्हणतात. ह्याबद्दल अनेक कथा आहेत. एक अशी की इथे एक प्रसिध्द पीर होता. त्याच्याकडे एकदा एक गरिब माणूस मुलीच्या लग्नासाठी पैसे मागाय्ला आला. पीराने त्याला सांगितलं की नदीकिनारी जाऊन दगड उचलले की त्याच्या कोरी होतील. अट एव्हढीच की फक्त लग्नाला लागतील तेव्हढेच दगड उचलायचे. तो माणुस नदीकिनारी गेला व दगड उचलू लागला. त्यांच रुपांतर कोरीत होताना पाहून त्याला हाव सुटली आणि तो आणखी दगड उचलू लागला. तेव्हा मात्र त्या कोरींचं रुपांतर परत दगडांत झालं. अर्थात हा भाग अनेक शतकांपूर्वी पाण्यात होता त्यामुळे हे खरं तर शिंपले आहेत. फक्त तेव्हाच्या काळात त्यांचा पैसा म्हणून वापर होत असे एव्ह्ढंच. एक कोरी म्हणजे आजचे ५-७ रुपये.

तेव्हाच्या काळातली अनेक घरं, कचेर्‍या कार्यक्रमात दाखवली. पण प्रश्न हा की एव्हढं संपन्न बंदर ओस का पडलं. १८१९ मधे एक प्रचंड भूकंप झाला. त्याने ज्या नदीचा व्यापारासाठी उपयोग व्हायचा तिचा प्रवाह बदलला. जिथे आधी बंदर होतं तिथे वाळू पसरली आणि त्यात मोडक्या नावा. तरी व्यापार पूर्ण बंद झाला नव्हता. १९४७ च्या फाळणीने आणखी एक दणका दिला. कारण ज्या शहराशी मुख्य व्यापार चाले ते कराची पाकिस्तानात गेलं. मग १९६५ च्या युध्दानंतर व्यापाराला आणखी उतरती कळा लागली. आणि शेवटी १९८० च्या आस्पास इथली सरकारी ऑफिसेस दयापूरला हलली आणि लखपत ओस झालं. आता तिथे फक्त काही मासेमार रहातात.

धन्यवाद स्वप्ना विनंतीला मान दिल्याबद्दल Happy

मला तर मुळात हाच प्रश्न पडतो की भारतात ओसाड गावं कशी? कारण मुंबई-पुणे किंवा अगदी कोकण साईडलाही आता दिसली रिकामी जमीन की बांध टॉवर अशी परिस्थिती आहे. अगदी गाव म्हणावं अशा जागीही किती रेट्स वाढलेत गेल्या २५-३० वर्षांत. वखवख सुटली आहे डेव्हलपर्स-राजकारणी-अंडरवर्ल्ड या त्रयीला. अशावेळी एकांत म्हणावं अशा जागा अजून आहेत हेच आश्चर्य!

धानी१, मला तरी कुठे व्हिडिओज मिळाले नाहीत ह्याचे. साती, लिंकमध्ये दाखवल्या आहेत त्या कवड्या. ते दगड थोडे चपटे होते. वेदिका खरं आहे तुझं म्हणणं पण ह्या जागा तशा मोठ्या शहरांपासून दूर आणि बर्‍याच कदाचित पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असाव्या. आय होप ह्या कार्यक्रमामुळे त्यांचा एकांत भंग होणार नाही.

धन्यवाद स्वप्ना.
चपटे दगड म्हणजे वेगळाच प्रकार दिसतोय पैशांचा.
पुढिल भाग आणि वेगवेगळ्या 'एकांत' जागांविषयी वाचायची उत्सुकता लागलीय.

सुंदर माहिती. डीश टीव्ही वर दिसत नाही का हे चॅनल?
ओमान, मस्कत, पुर्व आफ्रिकेतल्या अनेक देशांशी ह्याचा व्यापार चाले>>> थोडीशी दुरुस्ती. मस्कत ही ओमान देशाची राजधानी आहे, वेगळा देश नाही Happy

स्वप्ना_राज - छान झालं तू धागा काढलास, मी आज काढणारच होते सध्या मी हेच चॅनेल बघते. कही सुनी ह्या मालिकेत एखाद्या प्रथेमागच्या दंतकथा सांगतात मागच्या एपिसोड मध्ये 'ओरछा' मप्र मधल्या रामाच्या लग्नाला संपूर्ण गाव लोटत त्याची कथा सांगितली तसेच अहमदाबादजवळ एक बावडी (विहीर) आहे त्याची कहाणी सांगितली. 'धर्मक्षेत्र'मध्ये 'आप की अदालत' टाईप चित्रगुप्त आरोप /प्रत्यारोप व त्याव्यक्तीचं त्यावरचं त्याव्यक्तीची सफाई दाखवतात. मला आवडलेला एक एपिसोड कशात दाखवला ते माहीत नाही पण ऑपरेशन ब्लू स्टार (अमृतसर) त्यात डॉवेल (जे सध्य पंतप्रधानांचे सल्लागार आहेत) ह्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय व स्वतः त्यांनी सांगितली बहुतेक 'अदृष्य' ह्या मालिकेतील असावी 'हेरेगिरी' ह्यावर आधारित ही मालिका आहे २६ जा सगळे एपिसोड दाखवणार आहेत त्यात 'बहिर्जी नाईक'ची दाखवणार आहे चॅनेलवर जाहिराती कमी आहेत ब्रेकही दोन मि असतो जाहिरात नाही पण मी फॅन झालेय ह्या चॅनेलची

संरचना नविन कार्यक्रम सुरु झालेला आहे तो देखील अवश्य बघा. आपल्याभारतातील विविध पुरातन वास्तुंची संरचना कशी वेगळी होती आणि त्यातले वैशिष्टे काय आहेत यावर आधारीत आहे.

स्वप्ना, छान वाटतंय ह्या धाग्यावरच्या पोस्ट्स वाचायला! बरेच चांगले कार्यक्रम दिसत आहेत ह्या चॅनेलवर. बरं झालं वेगळा धागा काढलास Happy

>>>>थोडीशी दुरुस्ती. मस्कत ही ओमान देशाची राजधानी आहे, वेगळा देश नाही

ओह, हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्यांनी जसं सांगितलं तसं मी डोकं न वापरता लिहिलं Happy

>>'अदृष्य' ह्या मालिकेतील असावी 'हेरेगिरी' ह्यावर आधारित ही मालिका आहे २६ जा सगळे एपिसोड दाखवणार आहेत त्यात 'बहिर्जी नाईक'ची दाखवणार आह

हो, उद्या बघयचा प्रयत्न करणार आहे मी.

>>तसेच अहमदाबादजवळ एक बावडी (विहीर) आहे त्याची कहाणी सांगितली

अदलज नी वाव का? आम्ही पाहिली मागच्या वर्षी. मस्त आहे एकदम. मंजू, तू दरिबा डायरीज पहातेस का? दर सोमवारी रात्री ९ वाजता असतं. इंग्रजांच्या काळातला मिर्जा म्हणून एक डिटेक्टिव्ह केसेस सॉल्व्ह करतो. मस्त असतो हा पण कार्यक्रम.

>>संरचना नविन कार्यक्रम सुरु झालेला आहे तो देखील अवश्य बघा

हो, आज ह्याबद्दल संचायामावर लिहिलं. इथे लिहायला विसरले. काल हैदराबादच्या गोवळकोंडा किल्ल्यावर एपिसोड होता तो थोडाच पाहिला. कधी असतो हा प्रोग्राम? पाहिला तर इथे नक्की माहिती टाकेन.

>>स्वप्ना, छान वाटतंय ह्या धाग्यावरच्या पोस्ट्स वाचायला! बरेच चांगले कार्यक्रम दिसत आहेत ह्या चॅनेलवर

हो अग, मी पण मंजूसारखी फॅन झालेय ह्या चॅनेलची.

दरिबा डायरीज - सोमवार ९
एकांत - मंगळवार १०:३०
अदृश्य - ???
संरचना - गुरुवार १०

http://www.epicchannel.com/ वर काही व्हिडीओज दिसत आहेत. प्रोमोज आहेत का एपिसोड्स माहित नाही>

हो स्वप्ना तो गोवळकोंडा एपिसोड पाहीला होता..आवडलाही. दरिबा डायरीजही पाहतेच... यम किसीसे पाहत नाही..

सुमेधा, टाटा स्काय १३३, एयरटेल १२५ (एस्डी), १२६ (एच्डी), व्हिडिओकॉन (११७) आणि रिलायन्स २२३ अशी माहिती चॅनेलच्या साईट्वर आहे. हॅथवे असेल तर २५

राजा, रसोई व कहानिया ही पण मालिका चांगली आहे. ह्या वेळच्या एपिसोडमध्ये हिमाचलची खाद्य संस्कृती दाखवली 'धाम' ची व तिथे असणारा तिबेट व नेपाळच्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव ह्यावरची माहिती छान होती.

'सांबार' हे संभाजी व्यंकोजींना तंजावूर्ला भेटायला गेले असता आमटी बनवली व ती संभाजीकरता तयाव्रुन 'सांभार" पडलेलं नांव ...>>>> अरे बाप रे!!! कितीवेळा यावर मायबोलीवरच खुलासा करायचा? चिनूक्सचे अन्न वै प्राणा: वाचून पहा बरे.

अरे हो का .. माझी ती चिनुक्सची मालिकाचे काहीच भाग वाचलेत ... असो..

एकांत चा २४ डिसेंबरचा एपिसोड त्रिपुरातल्या उनाकोटीवर होता.जंगलाने वेढलेला हा पर्वताचा भाग. ह्यात हिंदू देवतांच्या असंख्य मूर्ती आहेत. एव्हढ्या मूर्ती कोरल्या आहेत म्हणजे हे काम अनेक वर्ष चाललं असणार आणि कोण्या राजाचा वरदहस्त असेलच. पण इतिहासात त्याचा कुठेच उल्लेख नाही. ह्या जागेभोबती अनेक आख्यायिका म्हणूनच आहेत. आणि त्या सर्व जागेच्या नावाशी जोडल्या गेल्या आहेत. उनाकोटी म्हणजे बंगालीत एक कोटीला एक कमी.

पहिली आख्यायिका शंकरा बरोबर वाराणसीला जाणार्‍या देवांबद्दल. उनाकोटीला पूर्वी रघुनंदन पर्वत म्हणत. हे सर्व देवता सूर्यास्ताच्या वेळेस ह्या पर्वतावर पोचले.सर्व दमले होते म्हणून रात्री तिथेच विश्रांती घ्यावी आणि सकाळी निघावं असं ठरलं. पण सकाळी सूर्य उगवला तेव्हा फक्त भगवान शंकरच उठले. बाकी सर्व देव झोपून होते. शंकर वाराणसीच्या वाटेला लागले. पण त्यांनी बाकी देवांना शाप दिला की झोपले आहेत तेथेच त्यांच्या शिळा व्हाव्यात.

दुसरी अख्यायिका पार्वतीभक्त कल्लूकुमार बद्दल. त्याला शंकर पार्वतीसोबत कैलासावर जायचं होतं. पण ते भगवान शंकरांना फारसं पसंत नव्हतं. त्यांनी त्याला सांगितलं की एका रात्रीत १ कोटी मूर्ती बनवल्या तर ते त्याला घेउन जातील. रात्रभर खपून त्याने त्या मूर्ती बनवल्या पण सकाळ होईतो एक कोटीला एक मूर्ती कमी पडली. बिचार्‍या कल्लूकुमारला त्याच्या मूर्तींसोबत मागे ठेवून शिव-पार्वती कैलासावर निघून गेले.

तिसरी दंतकथा कल्लूकुमार एक निष्णात शिल्पकार असल्याचं सांगते. एका राजाने त्याला एक कोटी मूर्ती बनवायला सांगितलं तेव्हा त्याने एक कोटी - १ मूर्ती बनवल्या व शेवटची मूर्ती स्वतःची बनवली.

चौथी दंतकथा - कलियुगाच्या सुरुवातीला सर्व देवांनी पृथ्वी सोडून स्वर्गात जायचा निर्णय घेतला कारण ह्या युगात पृथ्वी राहाण्यायोग्य नसणार. जाताना कोणा भक्तांना आपली भक्ती करावीशी वाटली किंवा आपले आशिर्वाद पाहिजे असतील तर त्यांची सोय म्हणून आपल्या मूर्ती ते मागे सोडून गेले.

आजचा अदृष्य चा १२ वाजताचा एपिसोड बहिर्जी नाईक ह्यांच्यावरहोता. अफझलखानचा वध, शाहिस्तेखान आणि सुरतेची लूट वगैरे प्रसंग दाखवले. निनाद बेडेकर आणि वझे कॉलेजच्या हिस्टरी डिपार्टमेंटच्या एचओडी सोनाली पेडणेकर माहिती सांगायला होते. माहिती खूप छान दिली.

उद्याचा एकांतचा एपिसोड कर्नाटकमधल्या कित्तूर किल्ल्यावर आहे.

Pages