एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना_राज
तुम्ही फारच मेहनत घेवुन हे आमच्या पर्यंत पोहचवत आहात.
कधी कधी बघायला वेळ मिळतो कधी मिळत नाही. हीच एक जागा आहे जिथे न बघताही सर्व समजते. धन्यवाद.

देवलोक चा ६ जानेवारीचा एपिसोड 'विष्णूचे अवतार' ह्या विषयावर होता.

अवतार म्हणजे काय? हा शब्द 'अवतरण' (खाली येणे) ह्या शब्दावरून आला आहे. वर विष्णूचं घर म्हणजे वैकुंठ आहे. तिथे मृत्यू नसतो. पण देव जेव्हा वरून खाली मृत्युलोकात येतो तेव्हा मर्त्य होतो. मृत्युलोकात येऊन मानवांचा उध्दार करणं हे अवताराचं कार्य.

विष्णूचे किती अवतार आहेत? लोकांत दहा अवतार प्रचलित आहेत. पण ही कल्पना जयदेव ह्यांच्या गीतगोविंदातली आहे. जवळपास हजार वर्षांपूर्वीची. ह्याआधी पुराणांत एक निश्चित असा आकडा नाही. १०, २० किंवा ३०+ आढळून येतात. उदा. भागवत पुराणांत 'मोहिनी' हाही एक अवतार मानला गेला आहे. हंस, ऋषी(उदा. व्यास) हेही अवतार मानले गेले आहेत.

बरं, हे १० अवतार कोणते आहेत? मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुध्द, कल्कि (हा घोड्यावर स्वार असून त्याच्या हातात तलवार आहे). पण ही लिस्ट फिक्स्ड नाही. उदा. जयदेव ह्यांच्या गीतगोविंदात (जिथून दशावतार ही कल्पना आली) कृष्ण ह्या अवतारांत नाही (कारण कृष्ण हा पूर्ण अवतार आहे) तर बलराम आहे. काही लिस्ट मध्ये कृष्ण ८ वा तर बलराम ९ वा अवतार मानतात. अश्या रीतीने काही निश्चित लिस्ट नाही आहे.

मग बुध्द हा विष्णूचा अवतार मानायचा का? तर हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. बौध्द धर्मीय ह्याला नकार देतील. पण हिंदू धर्मियांच्या मते तो विष्णूचा अवतार आहे. कारण इतिहासात एक काल असा होता की ह्या दोन धर्मात स्पर्धा होती. मग हिंदू धर्मियांनी असा मुद्दा काढला की बुध्द हा विष्णूचा अवतार च आहे त्यामुळे विष्णूची पूजा केली तर बुद्धाची केल्यासारखीच आहे. हे बौध्द धर्मीयांना मान्य नाही.

जातककथांत असा उल्लेख आहे की बुद्धाने जनकल्याणासाठी बोधीसत्त्वाच्या रूपात जन्म घेतला. विष्णूनेही तेच केलंय. २५०० वर्षांपूर्वी बौध्द धर्म आला तेव्हा बुद्धाने सांगितलं की दु:खाचं कारण इच्छा आहे. जर दु:ख नको असेल तर निर्वाण मार्ग पत्करावा लागेल. पण हळूहळू लोकांना हा धर्म कट्टर वाटू लागला कारण तो जगाचा त्याग करायला सांगणारा विरक्तीचावाटत होता. हा धर्म masculine वाटत होता. त्यात female energy नव्हती. मग ह्यात एक बदल झाला. त्याला महायान बौध्द धर्म म्हणतात. त्यात बोधीसत्त्वाने म्हटलं आहे की मला निर्वाण नको. मी पृथ्वीवर लोकाच्या कल्याणासाठी येईन. इथे जातक कथांचा जन्म झाला. त्यात असं सांगितलं गेलं की बुद्धाने त्याच्या आधीच्या जन्मांत (जे बोधीसत्त्वाचे अनेक जन्म होते) खूप चांगलं काम केलं म्हणून त्याचं कर्म चांगलं झालं आणि त्याला बुद्धाचा जन्म मिळाला. ह्याच वेळी वैदिक हिंदू धर्मात सुद्धा बदल होत होते. यज्ञ परंपरा बदलून कथा परंपरा आली होती. ह्या कथांत विष्णू, शिव, देवी ह्यांच्या कथा आणि त्यांचे अवतार होते. चीन, जपान, साउथ ईस्ट एशिया मध्ये अजूनही बोधीसत्त्वाचा concept आहे. त्याला अनेक हात आणि डोकी असतात. जेणेकरून तो लोकांच्या व्यथा ऐकू शकेल आणि त्यांना मदत करू शकेल. तसच विष्णूचं आहे.

मग कल्कि अवताराचं काय? तो येऊन गेला की यायचा आहे? तर पुराणात जेव्हा कल्किचा उल्लेख येतो तेव्हाचा काल असा होता की हुण, गुजर, यवन असे आक्रमक नॉर्थ-ईस्ट म्हणजे अफगाणीस्तान, उझबेकीस्तान इथून आक्रमण करून येत होते. तेव्हा कदाचित अशी कल्पना आली असावी की असा कोणी मसीहा येईल जो ह्या लोकांपासून इथल्या जनतेचं रक्षण करेल. असं म्हणतात की तेव्हा ख्रिश्चन लोकांशी व्यापार वाढत होता आणि ह्या धर्मात मसीहा ही कल्पना आहे. तिथून हा प्रभाव पडला असावा.

ह्या अवतारांवरून काय शिकवण मिळते? तर पुराणातल्या कथांत नेहमी एक मुद्दा असतो की माणसाने गृहस्थ व्हायचं का संन्यासी. शंकर बैरागी आहे. त्याला संसारात पडायचं नाही. पण देवी त्याला संसारात घेऊन येते. पण विष्णू हे मार्गदर्शन करतो की संसारात राहून आध्यात्म कसं साधता येत. मत्स्य अवतारात 'मत्स्य न्याय' ही कल्पना येते. 'मत्स्य न्याय' म्हणजे survival of the fittest or might is right. मोठा मासा छोट्या माश्याला खातो. ह्यात पाप नाही. ह्या कथेत एक छोटा मासा मनु म्हणजे आद्य मानव त्याच्याकडे जाऊन म्हणतो की मला मोठ्या माश्यांपासून वाचव. मनु जेव्हा त्याला वाचवतो तेव्हा सभ्यतेचा जन्म होतो. तर कुर्म अवतारात समुद्र मंथन करून धनधान्य काढायला त्याचा उपयोग करतात. इथे
balance चा concept येतो. वराह अवतारापासून बळ ही शिकवण तर नरसिंह अव्तारातून हुशारीची शिकवण मिळते.

वैष्णव संप्रदायात 'देवाचा अवतार धर्माची स्थापना करायला होतो' ही कल्पना आहे. पण शैव किंवा शक्ती संप्रदायात नाही. पण काही लोक असं मानतात की शंकराचे सुध्दा अवतार आहेत. उदा. हनुमान. तर शक्ती संप्रदायात महाविद्या, मातृका, योगिनी ह्या देवीचे अवतार मानतात. वैष्णव संप्रदायात एक इंटरेस्टिंग कल्पना आहे की जेव्हा देवीला त्रास होतो तेव्हा विष्णू अवतार घेतात. देवी रेणुका होते तर विष्णू तिचा मुलगा परशुराम होतात. ती सीता तर तो तिचा नवरा राम. भागवत पुराणात एक गोष्ट आहे की भूदेवी एकदा रडत रडत विष्णूकडे आली - तेही गाईच्या रूपात. कारण राजांनी केलेल्या शोषणामुळे, अत्याचारांमुळे ती त्रासली होती. सगळीकडे स्वार्थ, दु:ख, लालच बघून ती वैतागली होती. तेव्हा विष्णूने म्हटलं की धरणीचा पालनकर्ता ह्या न्यायाने तिचं रक्षण करणं त्याचं कर्तव्य आहे. ती गोमाता तर तो गोपाल. त्याने वचन दिलं की तो लवकरच गवळ्याच्या रूपात देवकीच्या पोटी जन्म घेईल आणि ज्या लोकांनी भूदेवीला त्रास दिला आहे त्यांचं निर्दालन करेल. तिने विचारलं की असं झाल्यावर अधर्म कायमचा नष्ट होईल का? विष्णू म्हणाला की जेव्हा जेव्हा अधर्म डोकं वर काढेल तेव्हा मी अवतार घेईन. जेव्हा जेव्हा भूदेवीला माझी गरज असेल तेव्हा मी माणसाच्या रूपात जन्म घेईन. दक्षिणेत द्रौपदीला देवीचं रूप मानतात. शिव आणि शक्ती नेहमी नवरा बायको पण शक्ती आणि विष्णू हे रिलेशन नेहमी बदलतं राहिलं आहे. ती कधी आई होते तर कधी बहिण, कधी पत्नी तर कधी मैत्रिण.

राम आणि परशुराम दोघे विष्णूचे अवतार तर दोघे एकाच वेळेस पृथ्वीवर कसे? तर देवदत्त म्हणाले की पौराणिक कथांना लॉजिक लावायचं नसत. देव आहे तो काहीही करू शकतो हे एक सोपं उत्तर आहे. कदाचित असं असू शकेलं की जेव्हा ही गोष्ट प्रथम लिहिली गेली तेव्हा अवतार ही कल्पना नव्हती. मग ती आली. मग कोणी राम विष्णूचा अवतार म्हटला, कोणी परशुराम तर कोणी दोघाना विष्णूचे अवतार मानल. ह्या कथा भारताच्या अनेक भागांतून, निरनिराळ्य ग्रंथातून, निरनिराळ्या काळातील गोष्टी एकत्र होऊन तयार झाल्या आहेत. त्यामुळे असं झालं असावं. परशुराम ह्यांचा जन्म दुष्ट अधर्मी राजांचं (उदा. कृतार्जुन) निर्दालन करण्यासाठी झाला. असं म्हणतात की त्यांनी इतके क्षत्रिय मारले की शेवटी देवाने सांगितलं की पृथ्वीचा कारभार चालावा म्हणून क्षत्रिय हवेत. तेव्हा ते म्हणाले की जेव्हा मला एक चांगला क्षत्रिय भेटेल तेव्हा मी थांबेन. ते रामाला भेटले आणि हा चांगला क्षत्रिय आहे अशी त्यांची खात्री पटली आणि ते थांबले.

प्रेक्षकांतल्या एकाने फोनवरून विचारलं की दशावतार आणि डार्विनची उत्क्रांतीची कल्पना ह्यात काही संबंध आहे का? तर त्याच्या थिअरीनुसार आधी मायक्रोऑर्गनिझम्स, मग जलचर, मग चतुष्पाद प्राणी, मग माणूस अशी उत्क्रांती झाली. जेव्हा हे ज्ञान भारतात आलं तेव्हा लोकांना हे कुठे तरी ऐकलं आहे असं वाटलं. म्हणजे प्रथम मत्स्य, मग कासव म्हणजे उभयचर, मग चतुष्पाद म्हणजे वराह, मग नरसिंह म्हणजे अर्धा प्राणी अर्धां माणूस, मग वामन म्हणजे बुटका माणूस आणि मग परशुराम, राम वगैरे म्हणजे मानव. म्हणून लोकांना हे साम्य वाटलं. पण दोन्ही एकच हे खात्रीने सांगू शकत नाही. एक मात्र खरं की दशावतारात मानव आल्यानंतर वर्णव्यवस्था सुरु होते. वामन, परशुराम हे ब्राह्मण तर राम क्षत्रिय. कृष्णाचा वर्ण निश्चित सांगता येत नाही. मग बुध्द म्हणजे वर्णव्यवस्थेचा त्याग. कल्कि तर बाहेरून आलेला म्हणजे त्याला निश्चित वर्ण नाही.

देवलोक चा ७ जानेवारी चा एपिसोड 'ग्रह, नक्षत्र' ह्या विषयावर होता.

आपल्या संस्कृतीत ग्रह, नक्षत्र ह्यांना एव्हढं महत्त्व का आहे? वेदांत ३ प्रकारची मंडलं असतात - भूमंडळ, प्रभामंडळ (आकाश) ज्यात देवता रहातात आणि पितृलोक. प्रभामंडळ पाहून ऋतुंबाबत अंदाज बांधता येतो. इथे रहाणारे देवता हे ऋतू नियंत्रित करतात ह्या समजुतीतून अनेक संस्कृतीत ह्याचं महत्त्व असावं. वेदातली बरीच rituals आकाशाशी निगडीत असतात. अग्नीची पूजा होते कारण तो वर जातो. आणि असा विश्वास की ह्यात तूप घातलं की सूर्य, चंद्र, इंद्र ह्यांना पोचेल. झाडं सुध्दा वरच्या म्हणजे ह्या प्रभामंडळच्या दिशेने वाढतात. पण पुराणात धरतीला सुद्धा तेव्हढंच महत्त्व दिलं गेलं. आकाश म्हणजे (शिव) male principle आणि धरती म्हणजे female principle (शक्ती).

नक्षत्रे म्हणजे काय? आकाशात तारे असतात. सोयीसाठी नानाविध संस्कृतीतल्या लोकांनी ह्याचे भाग पाडले. एक आहे १२ राशींचा. दुसरा आहे २७ नक्षत्रांचा. २७ खेरीज अभिजीत म्हणून एक अदृश्य नक्षत्र सुध्दा आहे. सगळी नक्षत्रं म्हणजे दक्ष प्रजापतीच्या मुली ज्यांचं लग्न चंद्राशी झालं अशी कल्पना आहे. ह्याबाबत एक कथा दाखवली. सगळ्या बायकांत रोहिणी चंद्राची अतिशय लाडकी होती. एके दिवशी सासरेबुवानी त्याला बोलावून घेतलं. चंद्र म्हणाला की रोहिणी म्हणत होती तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे. दक्ष म्हणाला पण मला तर अनुराधाने सांगितलं. चंद्र म्हणाला कदाचित ती रोहिणीशी बोलली असेल. म्हणून रोहिणीने येऊन मला सांगितलं. दक्ष म्हणाला की तू माझ्या बाकीच्या मुलीकडे लक्ष देत नाहीस. चंद्र म्हणाला हे तुम्हाला कोणी सांगितलं? अनुराधा की विशाखा? दक्ष म्हणाला तू त्या दोघींना नीट ओळखत असतास तर तुळा माहीत असतं की त्या दोघींचा स्वभाव तक्रार करण्याचा नाही. चंद्र म्हणाला की मी रोहीनिशी बोलून ह्यावर तोड काढतो. दक्ष म्हणाला तू इथे येऊन काही क्षण गेले असतील पण तेव्हढ्यात तू किमान १० वेळा रोहिणीच नाव घेतलस. चंद्राने विचारलं की तू राजा आहेस, तुझे खूप सेवक आहेत, अधिकारी आहेत. त्यातला एक असा असेल ज्यावर तुझा सर्वात जास्त विश्वास असेल, त्याचा तू सगळ्यात जास्त आदर करत असशील. दक्षाने सांगितलं की मला सगळेच सारखे आहेत, सगळ्यांबद्दल माझं तेच कर्तव्य आहे. तसंच तुला सगळया बायकांना सारखं वागवलं पाहिजे. चंद्राने त्याला मी तुमचा आदर करतो पण मला माझ्या वैवाहिक जीवनाबद्दल सल्ला देऊ नका असं बजावलं. दक्ष म्हणाला की मी उपदेश देणार आणि तुला ऐकावं लागेल. चंद्राने सांगितलं की तो आणि रोहिणी राजवाडा सोडून जातील आणि बाकीच्या २६ बायक दक्शाकडेच राहतील. दक्षाने विचारलं की तू त्यांचा त्याग करतो आहेस का? चंद्र म्हणाला हो, नाहीतरी माझं असणं नसणं सारखंच आहे. ह्यावर दक्षाने त्याला चिडून शाप दिला 'माझं असणं नसणं सारखंच आहे असं म्हणालास ना तू? जसा तू माझ्या मुलींचा त्याग केलास तसंच तुझं शरीर आणि तेज तुला सोडून जाईल. एक अशी वेळ येईल की पूर्णपणे लुप्त होशील.'

घाबरून चंद्र शंकराकडे गेला आणि ह्या शापापासून आपली सुटका करायची विनंती केली. म्हणाला माझी स्थिती बघा, मी नाहीस होत चाललोय. माझ्या बायकांचं काय होईल? शंकर म्हणाला आता तुला बायकांची आठवण झाली का? तू तर त्यांचा त्याग केला होतास. चंद्र म्हणाला मला धडा मिळाला आहे. शंकराने त्याला म्हटलं की मी दक्षाचा शाप पूर्णपणे नष्ट करू शकत नाही. पण तुझ्यासाठी तपश्चर्या करेन. त्यामुळे तू लुप्त होशील पण परत पुर्वपदाला येशील. असं होत राहील.

असं म्हणतात की चंद्र रोज एका नक्षत्राजवळ जातो. तो जेव्हा रोहीनिजवळ जातो तेव्हा शुक्लपक्ष असतो तो पूर्ण चंद्राकडे वाटचाल करत असतो. आणि तो तिच्यापासून दूर जातो तेव्हा त्याचा क्षय होत असतो. अमावास्येच्या दिवशी तो अभिजीत नक्षत्राजवळ असतो म्हणे.

ग्रह म्हणजे काय? तर जे फिरतात ते ग्रह. सुर्याब्द्दल बऱ्याच romantic stories आहेत. असं म्हणतात की रातराणीचं सूर्यावर खूप प्रेम होतं. पण त्याचं नव्हतं. ती खूप दु:खी होते आणि म्हणते की मी तेव्हाच उमलेन जेव्हा सूर्य आकाशात नसेल. सुर्यमुखीची कथा अशीच. फक्त ती तरीही सूर्याकडे बघतच फुलते. मंगळ युद्धाशी निगडीत आहे. कार्तीकेयाशी आहे. गणेशाच्या उग्र रूपाशी आहे. मंगळ ह्याचा अर्थ शुभ असाही आहे. लाल रंग अशा अर्थाने देवीशीही जोडला गेला आहे. बुध intelligence and communication शी निगडीत आहे. ग्रह पुरुष असले तरी ह्या ग्रहाची मूर्ती कधीकधी स्त्रीरूपात असते कारण तो नपुंसक आहे. तो आईजवळ जातो आणि म्हणतो की वडिलांच्या शापामुळे मी असा झालो तर माझं लग्न कसं होणार? आई म्हणते की काळजी करू नकोस, प्रत्येक समस्येवर उपाय असतोच. एक राजा असतो जो चंद्रवंशी असतो. तो एका वनात जातो जिथे शिव-पार्वती क्रीडा करत असतात. त्या जंगलाला शाप असतो की तिथे जी जाईल त्याचं रूप स्त्रीचं होईल. तर हा राजा स्त्री होतो. मग तो शिव-पार्वतीला म्हणतो की मला ह्या शापाबद्द्ल माहीत नव्हतं. आता तर माझं आयुष्य उध्वस्त झालं. मग शंकराने त्याला म्हटलं की आम्ही ऊ:शाप देऊ शकतो. तू शुक्लपक्षात पुरुष आणि कृष्णपक्षात स्त्री होशील. हा आणि बुध दोघे अर्धे पुरुष आणि अर्धी स्त्री. दोघांचं लग्न होऊन चंद्रवंशाची सुरुवात झाली.

गुरु म्हणजे बृहस्पती. हा देवांचा गुरु. तर शुक्र असुरांचा गुरु. दोघांत नेहमी स्पर्धा. शुक्राचा एकच डोळा आहे आणि तो creative समजला जातो तर गुरु rational समजला जातो. शनि सूर्याचा मुलगा. पायाने अधू. थोडं मंद आहे. म्हणून तो सगळ्या कामांना उशीर लावतो.

तारे स्त्री असतात असं नाही. उदा. ध्रुवतारा. तसंच सप्तर्षी आहेत. त्यांची एक कथा अशी - ह्यांनी दक्षाच्या ७ मुलींशी लग्न केली होती. (ह्या दक्षाला किती मुली होत्या?). त्या सगळ्या एकदा अग्निकुंडाजवळ गेल्या. तेव्हा त्यांचं सौंदर्य पाहून मोहित झालेल्या अग्नीने त्यांना स्पर्श केला. हे त्या सगळ्या बायकांना कळलं नाही. फक्त वशिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती लांब उभी होती. त्यामुळे तिला अग्नीचा स्पर्श झाला नाही. जेव्हा ह्या बायका आपापल्या नवऱ्याजवळ गेल्या तेव्हा ते म्हणाले की तुम्हाला परपुरुषाचा स्पर्श झाला आहे. तुम्हाला आम्ही यज्ञशालेत येऊ देऊ शकत नही. त्या म्हणाल्या आम्ही असं काहीही केलेलं नाही. आणि चिडून घर सोडून गेल्या. ह्या सहा ताऱ्यांना कृतिका म्हणतात. आणि सातवा अरुंधती मात्र सप्तर्षीजवळ आहे. लग्नाच्या वेळी नवरा बायकोला तू अरुंधतीसारखी (पतिनिष्ठ) पत्नी हो असं म्हणून तिचा हात धरून त्याने तिला त्या तारयाकडे point करायची प्रथा आहे (आधी नवर्याने बायकोला रात्री एक तारा दाखवायचा आणि मग जन्मभर ती त्यला दिनमे तारे दाखवणार!). हे ritual romantic समजतात म्हणे कारण तेव्हा तो बायकोला प्रथम स्पर्श करतो.

राशीत मकर आणि कर्क ह्या महत्त्वाच्या राशी. मकरसंक्राती नंतर सूर्य मकर राशीत येतो. उत्तरायण सुरु होतं. आणि तापमान बदलतं. दिवस मोठे होतात. जेव्हा सूर्य कर्क राशीत जातो तेव्हा दक्षिणायन सुरु होतं. दिवस लहान होतात. असं म्हणतात की ह्या काळात असुर शक्तिशाली होतात म्हणून दसरा, दिवाळी सारखे सण साजरे केले जातात. जेणेकरून देव जागे होऊन असुरांचा नाश करतील. असं म्हणतात की मकर ते कर्क असा सूर्याचा प्रवास समुद्रमंथनाचा आहे. देव खेचत असतात तेव्हा दिवस मोठे तर असुर खेचत असताना दिवस लहान होतो.

आता प्रेक्षकांचा प्रश्न - विष्णूचा मकर राशीशी काही सम्बंध आहे का? तर विष्णूला 'मकरकुंडल' म्हणतात. जेव्हा सूर्य मकर राशीत येतो तेव्हा spring ची सुरुवात होते. जीवनाला सुरुवात होते. आणि विष्णू निसर्गाच्या ह्या रूपाशी, उन्हाळ्याशी, शुक्ल्पक्षाशी,सूर्याशी निगडीत आहे. तर शंकर चंद्राशी (म्हणून त्याला सोमशेखर म्हणतात), दक्षिणायन, कृष्णपक्ष ह्यांच्याशी निगडीत आहे.

काल एपिकवर रविन्द्रनाथ टागोरांच्या कथा सोम-शुक्र रात्री १० वाजता दाखवणार असं पाहिलं. गाईड चेक केलं तर आज रात्री १० वाजता आहे. हे कधी सुरु झालं? रिपिट टेलिकास्ट आहे काय?

आज रात्री ९:३० ला 'देवलोक' पण आहे. आय होप, रिपिट टेलिकास्ट असेल.

खुपच छान माहिती देत आहात या चॅनेलवर होणार्‍या प्रोग्रॅमविषयी!
इथे वाचुनच हे कार्यक्रम आवर्जुन बघायला लागलो. Happy

देवलोकचा १३ जानेवारी चा एपिसोड 'पुराण, वेद ह्यातील वनस्पती' ह्या विषयावर होता.

आपल्या जीवनात वनस्पतींचं खूप महत्त्व आहे. त्यांच्यापासून आपल्याला कपडे, अन्न मिळत. मग वनस्पतीना देव मानतात का? उत्तर आहे हो. कारण वेदकाळापासून माणसाच्या हे लक्षात आलं होतं की प्रत्येक वनस्पतीत काही ना काही चांगला गुणधर्म आहे. मध, औषधं, घर बांधायला लाकडं, थोडक्यात दैनंदिन जीवनात जे काही लागतं ते सगळं त्यांच्यापासून मिळतं. त्यामुळे झाडांत देव आहे ही भावना रुजली. म्हणून वृक्षांची पूजा होऊ लागली. वेदांत एका देवीचा उल्लेख आहे - आरण्यानी. ही जंगलाची देवी मानतात. पुराणात 'शाकंभरी' देवीचा उल्लेख आहे. ही लता-वेली, झाडं ह्यांची देवी मानली जाते. जंगलातच आपली संस्कृती सुरु झाली म्हणून त्यांना खूप महत्त्व. पुराणात अमृतमंथनाची कहाणी आहे त्यात असं होतं की रवी म्हणून जो मंदार पर्वत वापरला त्याच्यावरची झाडं घर्षणाने जळू लागली. त्यांचा रस गळला तो क्षीरसागरात मिसळून त्यापासून अमृत बनल म्हणून ते औषधी.

ह्याच मंथनात पारिजात वृक्ष क्षीरसागरातून बाहेर आला. ह्याची एक कथा आहे. इंद्राने हा वृक्ष स्वर्गात ठेवून घेतला. पुढे स्वर्गावर नरकासुराने हल्ला केला तेव्हा त्याच्या विरुद्धच्या युद्धात कृष्ण आणि सत्यभामेने त्याला मदत केली आणि नरकासुराचा वध केला. तिने कृष्णाला त्या बदल्यात पारिजात मागायला सांगितलं. पण इंद्राने नकार दिला. कृष्ण आणि इंद्र ह्यांच्यात लढाई होऊन इंद्राचा पराभव झाला आणि पारिजात भूलोकावर आला. सत्यभामेने विचार केला की हे झाड रुक्मिणीला तिच्या अंगणात लावायला सांगू म्हणजे तिला त्याची देखभाल करावी लागेल पण फुलं आपल्या अंगणात पडतील. हे कृष्णाला कळताच त्याने म्हटलं की ह्या वृक्षाला तेव्हाच फुलं येतील जेव्हा मी रुक्मिणीसोबत असेन. सत्यभामेला फुलं तर मिळाली पण त्यासोबत ही टोचणी सुध्दा की आपला नवरा ह्या क्षणी सवतीच्या महालात आहे.

कोणतं फूल, पान कोणत्या देवाला वाहातात? शंकराला बेल. तसंच धोतरा (जो जंगलात उगवतो) फूल. काशी विश्वनाथला भांग. मारुतीला रुईची पानं (ही विषारी असतात. आणि रस्त्याच्या कडेला उगवनार्या ह्या वनस्पतीची फूल जांभळी असतात). विष्णूच्या मंदिरात सुगंधी फुलं उदा. तुळस, चंपा, कमळ. कृष्णाला 'वनमाळी' म्हणजे वनातल्या फुलांची माळा घालणारा असंही एक नाव आहे. गणपतीला दुर्वा (कारण गवत कधी नष्ट करता येत नाही. उपटलं तरी काही दिवसांनंतर परत उगवतं. असं म्हणतात की अमृतकलश क्षीरसागरातून बाहेर काढल्यावर गवतावर ठेवला होता. त्यामुळे गवताला अमृत स्पर्श झाला आहे, त्यात अमृताचे काही गुण उतरले आहेत म्हणून त्याला नष्ट करता येत नाही आणि शुभ मानतात. यज्ञात आणि पूजेत खूप महत्त्व आहे), तसंच पानसुपारी, सुपारीचं फूल. झेंडूची फुलं सुध्दा अनेक ठिकाणी वाहतात. त्याच्या प्रत्येक पाकळीत एक बी असतं त्यामुळे ते symbol of fertility आहे. म्हणून घरात पूजा असेल तर झेंडू आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावतात. आंबा विष्णूला, गणपतीला वाहातात. कारण ते गृहस्थ देवता आहेत. पण शंकराला वाहत नाहीत. देवीला विशेष अशी फुलं वाहत नाहीत. पण तिच्या पूजेत मात्र लिंबाची पानं, चिंचेची पानं, लिंबू, मिरची अश्या आंबट, तीव्र चव असलेल्या गोष्टी वापरतात.

ह्या वनस्पती ब्रम्हांडात आल्या कश्या? तर एक कथा अशी आहे की ब्रह्मदेवाच्या केसांपासून ह्या निर्माण झाल्या. दुसरी कथा अशी की हिरण्याक्ष असुर भूदेवीला समुद्रात घेऊन गेला तेव्हा विष्णूने वराहरूप घेऊन तिला बाहेर काढलं. त्याचे सुळे पृथ्वीत घुसले. त्यातून वनस्पती निर्माण झाल्या. आणखी एक कथा अशी की रामायणात सीता जमिनीत सामावली गेली तेव्हा रामाने तिला धरून ठेवायचा यत्न केला पण तिचे काही केसच तेव्हढे जमिनीच्या बाहेर राहिले. ह्याच वनस्पती.

ह्या वनस्पतीवरून देवांची नावं पडली आहेत. उदा. विष्णूला कमलनयन म्हणतात. रामाची एक कथा बंगालात प्रसिद्ध आहे. राम दुर्गेची पूजा करत होता आणि त्याने १०८ कमळं वाहिली. देवीला त्याच्या भक्तीची परीक्षा घ्यावीशी वाटली म्हणून तिने त्यातलं एक कमळ गायब केलं. रामाच्या ते लक्षात येताच तो म्हणाला की माझी आई म्हणते की माझे डोळे कमळासारखे आहेत. मी एक डोळा काढून तुला वाहतो आणि त्याने तसं केलं. पुराणात विष्णूने शंकरासाठी हे केलं अशी कथा आहे. ज्यामुळे त्याला सुदर्शन चक्र मिळाल. अश्या रीतीने डोळ्यांना कमलाची उपमा मिळाली. तर असं म्हणतात की अप्सरांचे हात वेलींसारखे ग्रेसफुल असतात. बुध्द विहारात एक प्रसिद्ध चित्र असतं 'लतानायिका' म्हणून. ही खूप दागिने, सुंदर वस्त्रं ल्यालेली सुंदर स्त्री असते जी रानात एका झाडाच्या फांदीला धरून आनंदाने झुलते आहे. हे एक शुभ चिन्ह मानतात. अस म्हणतात की गुप्त काळात असं मानत की बायकांनी गाणी म्हटल्याशिवाय, नांच केल्याशिवाय वसंत ऋतूचं आगमन होणार नाही. कदंब, अशोक हसनार्या बायकांचा आवाज ऐकल्याखेरीज बहरत नाहीत म्हणे. असं म्हणतात की स्त्री आणि जमीन ह्यांचं एक विशेष नातं आहे. स्त्री दु:खी असेल तर जमिनीत काही उगवणार नाही.

वडाच्या झाडाचं काय महत्त्व आहे? तर ह्याला शुभ आणि अशुभ दोन्ही मानतात. अशुभ अश्यासाठी की वडाच्या झाडाखाली काही उगवत नाही. जसं संन्याश्याला लोक मान देतात पण तो घराबाहेर असतो. तसं वडाच्या झाडाला मान देतात पण ते घराजवळ लावत नाहीत कारण त्यामुळे घराच्या पायाला धोका पोचू शकतो. गावात ते नेहमी स्मशानाजवळ असतं. असं म्हणतात की स्मशानात भूतं असतात आणि शंकर हा गणांचा देव. म्हणून वडाच्या झाडाचं शंकराशी असोसिएशन आहे. पण वडाचं पान मात्र जोडलं गेलंय ते कृष्णाशी, विष्णूशी. असं म्हणतात की मार्कंडेयाला जेव्हा प्रलयाच दृश्य दाखवलं गेलं तेव्हा समुद्राच्या लाटेवर एक वडाचं पान आणि त्यावर एक छोटं बाळ शांतपणे पहुडले आहे असं त्याला दिसलं. हे बाळ म्हणजे कृष्ण/विष्णूचं रूप. त्याला 'वटपत्रशयी' अस नाव आहे. हे बाळ प्रलयातही हसतं आहे आणि त्याच्या हाताला लोणी लागलं आहे.

तुळशीच्या पानांची एक गोष्ट आहे. सत्यभामा नारदाशी खेळलेला डाव हरली आणि त्यानुसार कृष्णाला नारदासमवेत सेवक म्हणून जावं लागलं असतं. म्हणून तिने एक तोड काढली आणि कृष्णाच्या ऐवजी त्याच्या वजनाइतक्या वजनाचे दागिने नारदाला द्यायचे ठरवलं. पण जेव्हा तिने पारड्यात सगळे दागिने घातले आणि वर स्यमंतक मणी (ह्यातून दररोज सोनं निघत असे)आणून ठेवला तरी तितकं वजन होईना. तेव्हढ्यात तिथे रुक्मिणी आली आणि तिने तुळशीला नमस्कार करून एक पान तोडून घेतलं आणि ते दागिन्यावर ठेवलं. लगेच ते पारडं खाली आलं. सगळे दागिने आणि स्यमंतक मणी काढून घेऊन नुसतं ते पान ठेवलं तरी त्याचं वजन कृष्णाच्या वजनापेक्षा जास्त झालं. कारण दागिने आणि संपत्ती हे सत्यभामेच्या घमेंडीचं पतीक तर तुळशीचं पान रुक्मिणीच्या भक्तीचं.

प्रेक्षकांतून एकाने विचारलं की मंदिरात नारळ का फोडतात? नारळ फोडण्याची एक रीत असते. तो एका फटक्यात फुटला पाहिजे (इथे मला ओम शांती ओम मधला शाहरुखचा नारळ फोडण्याचा सीन आठवला). काही लोक ह्याआधी त्यावर सिंदूर लावतात. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी पशुबळी, नरबळी देत असत. आता हे होत नाही. म्हणून हे प्रतिक वापरतात. तर काही जण म्हणतात की आपला अहंकार तोडण्याचं हे प्रतिक आहे. अशीही एक विचारसरणी आहे की नारळाचं पाणी हवं असेल तर नारळ तोडावा लागतो. तसंच देवाची मूर्ती न बघता त्यामागची शक्ती, शब्दार्थ न बघता भावार्थ ओळखणं वगैरे अर्थ ह्यामागे आहेत. दक्षिणेत नारळ च नाहीत तर भोपळा सुध्दा फोडतात. तेही जुन्या पशुबळी, नरबळी चं प्रतिक. तंत्रपुजेत नारळाच्या आत भोक करून तूप घालतात. आणि ते आगीत घालायच्या वेळी म्हणतात की आम्ही हा ब्राह्मणाचा बळी देत आहोत. असं हे बळी देण्याचं प्रतिक.

देवलोकचा १४ जानेवारी चा एपिसोड 'पूजा आणि विधी' ह्या विषयावर होता.

पूजा ही संकल्पना वेदकाळापासून होती का? तर उत्तर आहे 'नाही'. वेदांत (४००० वर्षांपूर्वी) यज्ञाचा उल्लेख आहे. तर पूजा हा शब्द २५०० वर्षांपासून प्रचलित आहे. 'ग्रहसुत्र' (ज्यात विधींचा उल्लेख आहे) मध्ये हा शब्द सर्वप्रथम येतो. यज्ञात मूर्ती नसते तर अग्नीला फार महत्त्व असतं. कारण त्याच्या माध्यमातून देवतांना आवाहन केलं जातं. ह्याला 'निगम परंपरा' म्हणतात. तर पूजा परंपरा 'अगम परंपरा' होय. काही लोक म्हणतात की पूजेची संकल्पना दक्षिण भारतातून आली. कारण तमिळ भाषेत 'पूजई' किंवा 'पूसई' चा अर्थ फूल असा होतो. फुलं वाहणं हे वेदांत नाही, तर पूजेत आहे. हळूहळू यज्ञ बंद पडत गेले (आजकाल फक्त हवन होतं) आणि पूजा होऊ लागली.

यज्ञ आणि पूजेत फरक काय? तर यज्ञात मूर्ती नसते, पूजेत असते. यज्ञ खुल्या जागेत करतात. पूजा मंदिराशी निगडीत आहे. यज्ञात अग्नीला महत्त्व तर पूजेत पाण्याला (उदा अभिषेक) आणि फुलांना. पण दोन्हीचं तत्व एकच.

पूजेची प्रक्रिया काय असते? तर घरी कोणी पाहुणा आला तर आपण जे जे करतो ते पूजेत देवासाठी करायचं. यज्ञात आधी देवतांच आवाहन केलं जाई. मग त्यांना 'स्वाहा' म्हणून तूप दिलं जाई जेणेकरून त्यांची क्षुधाशांती होईल. मग त्यांच्याकडे आशीर्वाद मागून त्यांची पाठवणी केली जाई. आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून, देवतेच्या स्वागताची तयाई करून मग त्यांना आवाहन करतात. आवाहन म्हणजे प्राणप्रतिष्ठा. ह्याआधी ती नुसती मूर्ती असते. प्राणप्रतिष्ठा झाली की तो साक्षात देव. मग देवता येतात तेव्हा त्यांना बसायला आसन देतात. पाणी देतात म्हणजे त्यांना मुखप्रक्षालन करता येईल. त्यांना अभिषेक करून नवे कपडे, दागिने देतात. त्यांना नटवतात. देवी असेल तर तिला मंगळसूत्र दिलं जातं. देव असेल तर जानवं. मग जेवण देतात. यांच्या अंगाला चंदनाचा लेप लावतात. अगरबत्ती लावतात. आरती केली जाते. त्यांची स्तुतीपर भजनं म्हणतात. काही चुक झाली असेल तर माफ करा असं सांगितलं जातं. मग त्यांचं विसर्जन केलं जातं. पूजा म्हणजे pray करणं नव्हे तर एक प्रकारचा exchange. यज्ञात सुध्दा यज्ञ समाप्त झाल्यावर पूर्ण मांडवाला आग लावून तो नष्ट केला जात असे. तसंच गणेश, दुर्गा विसर्जनानंतर त्यांची स्थापना केली होती त्या जागेवरचा मंडप, मखर काढून टाकतात.

जिथे देव कायम आहेत उदा. मंदिर तिथे पूजा वेगळ्या प्रकारची असते. इथे प्रत्येक पूजेच्या वेळी प्राणप्रतिष्ठा करायची गरज नसते, आवाहन नसतं कारण देव तिथे असतोच असं मानतात. पण पूजा करण्यामागचा हेतू देवाकडे काहीतरी मागण्याचाच असतो. ते मिळेलच ह्याची हमी मात्र नाही. ते तुमच्या कर्मावर अवलंबून,

'भोग चढाना' म्हणजे काय? तर जिवंत माणसाला अन्न लागणारच हे सर्वमान्य. तसंच देवतांना सुध्दा भूक लागणार, त्यांनाही इच्छा असणार. पण भोग फक्त अन्नाचा नाही. तर कपडे, सुगंध, संगीत, प्रकाश/दीप (उदा. आरती), ध्यान हे सगळं वाहू शकता.

पूजा आणि संगीत ह्याम्चा सम्बंध कसा आला? मध्यकाळात आक्रमण करणारया लोकांकडून मंदिरांचा विध्वंस झाला. ऋषी/संत म्हणाले की देव थोडाच मंदिरात असतो. तो तर मनांत असतो. मन + अंदर = मंदिर. तेव्हा देवाची पूजा करायला मंदिरं आणि बाकी सामुग्री नकोच फक्त ध्यान, लक्ष, एकाग्रता हवी. त्यामुळे आपण मनातच मंदीर उभारू शकतो. हे संगीताच्या माध्यमातून झालं. राजस्थानातल्या नाथद्वारात श्रीनाथजीचं मंदिर आहे तिथले वल्लभाचार्य म्हणाले की मी कविता, राग, संगीत ह्याम्च्यातून मंदिर उभारेन, पूजा करेन. मंदिरात आठ वेळा पूजा होते (आठ प्रहर असतात म्हणून) तेव्हा प्रत्येक वेळचं,प्रत्येक काळातलं (उदा. उन्हाळा किंवा हिवाळा) संगीत वेगळं असतं. हे १४-१५ व्या शतकात सुरु झालं.

मग संगीतातून भजन/आरती निर्माण झाल्या का? आरती म्हणजे दिवा फिरवणे जेणेकरून सर्वांना देव नीट दिसेल. म्हणजे दर्शन. यज्ञात बघायचं काही नसे तेव्हा मंत्र ऐकले जात. म्हणजे श्रुती करणे. दक्षिणेत काळ्या दगडांच्या मूर्ती, मंदिरं असतात ते नीट दिसत नाहीत पण पुजारी जेव्हा आरतीच्या वेळी दिवा फिरवतो तेव्हा मात्र मूर्ती, काही क्षणांसाठी का होईना, दिसते. नाथ्द्वारात 'झांकी' म्हणतात म्हणजे देवासमोर एक पडदा असतो ज्याला उघडून बंद करतात जेणेकरून दर्शन व्हावं. असं म्हणतात की तुम्ही अगदी लक्ष देऊन पहिलं तर दर्शनाने एवढे मंत्रमुग्ध व्हाल की मंदिरातू जाउच शकणार नाही. तर भजन म्हणजे देवाच्या रंगरुपाची, महिम्याची, पराक्रमाची, भक्तावरच्या प्रेमाची स्तुती. जेणेकरून देवाला छान वाटेल.

रामायणात एक गोष्ट आहे ज्यात ह्याची सुरुवात आहे. सीतेचं हरण झाल्यावर हनुमान आणि जांबवंत समुद्राजवळ उभे असतात. तेव्हा समुद्र बघून हनुमान म्हणतो ह्याला पार करणं कठिण आहे. तेव्हा जांबवंत त्याला म्हणतो की हे काम कोणी करू शकत असेल तर तो तूच आहेस. तू वायुपुत्र आहेस, सर्व प्राणीमात्रात शक्तिमान आहेस, प्रत्यक्ष सुर्याला गिळायला निघाला होतास, तुला संकटमोचन, महाबली म्हणतात, तू महाकाय आहेस, गरुडापेक्षा तुझा वेग अधिक आहे, तू परम रामभक्त आहेस. अश्या रीतीने स्तुती करून तो मारुतीला समुद्र पार करून जायचं बळ देतो. आरती अशीच असते.

प्रेक्षकांतून एकाने विचारलं की घरात आणि मंदिरात केली जाणारी देवाची पूजा ह्यात काय फरक आहे? घरात देव्हारा असतो किंवा सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा किंवा गणपती येतो तेव्हा तात्पुरतं पूजाघर केलं जातं. तर मंदिर हे देवाचं शाश्वत पूजाघर (shrine). मंदिरात रोज विधी, पूजा केले जातात. घरी पूजा करायला ब्राह्मणाची गरज नसते, घरचे लोक पूजा करतात. काही लोक असंही मानतात की देव हे घरचे खरे मालक आणि घरचे लोक हे भाडेकरू. पण गणपती किंवा दुर्गा जेव्हा येतात तेव्हा ते पाहुणे मानले जातात.

पूजा आणि व्रत ह्यात काय फरक आहे? यज्ञात सगळे पुरुष सामील होत - यजमान, पुजारी (उदा. ऋत्विक, उद्गात्र). पूजेत सुध्दा पुजारी पुरुष असतो. पण व्रत मुख्यत्वेकरून स्त्रिया करतात. तिथे मूर्ती, मंदिर वगैरेंची गरज नसते तर मनात पूजा करू शकतो. इथे विधी असतात पण ते वेगळ्या प्रकारचे उदा. रात्रीचं जागायचं (ह्याला जागरण म्हणतात) किंवा विशिष्ट अन्न खायचं (उदा. संतोषी मातेचं व्रत चणे, गूळ खाऊन), एक वेळ जेवायचं किंवा निर्जळी उपवास. म्हणजे शरीराचा ('तन') वापर करून पूजा म्हणून तंत्र. पण ध्यान लावून पूजा करतो तेव्हा 'मन' वापरतो म्हणून 'मंत्र'. तर 'यंत्र' वापरून केलेला तो यज्ञ. व्रत ही एक प्रकारची पूजा आहे ज्यात मूर्ती, पुजारी, मंदिर, सामुग्री काही लागत नाही तर फक्त मन आणि शरीर आवश्यक आहेत.

कालपासून दररोज रात्री ९:३० वाजता देवलोकच्या एपिसोडसचा रिपिट टेलिकास्ट दाखवत आहेत. काल पहिला एपिसोड होता.

कालचा एपिसोड स्वर्ग नरक सन्कल्पनेवर होता. रिपीट होता का तो?
खुप सुन्दर झाला. त्याचे डीटेल्स टाक ना!

ओके.

मी_आर्या, आजकाल देवलोकचे रिपिट एपिसोड्स आहेत म्हणून मी पहात नाही. स्वर्ग-नरक च्या एपिसोड्वर ह्या धाग्याच्या १२ व्या पानावर माहिती आहे.

परवा ९ ते १० लॉस्ट रेसिपीज चा पारशी खाद्यसंस्कृतीतल्या लॉस्ट रेसिपीज वरच्या एपिसोडचा (उडवाडा आणि संजाण) रिपिट टेलिकास्ट होता. एका गृहस्थाने उंबरियो म्हणून साधारण उन्धियू सारखा एक पदार्थ बनवला. फरक हा की ह्या पारसी डिशमध्ये चिकन आणि त्यात भरलेलं लिव्हर होतं. बाकी बेबी पोटॅटोज, चेरी टॉमेटोज, वांगी, वालीच्या शेंगा आणि मसालेहोते. टॉडी पण घातली होती. एका मटक्याच्या तळाशी कसलीशी वनस्पती घातली. त्याने म्हणे भाज्या जळत नाहीत. मग चिकन, मग भाज्या, मग पुन्हा ती वनस्पती घालून मडकं कणिक घालून सील केलं आणि जमिनीत ठेवून पदार्थ शिजवला.

एका काकूंनी केळीच्या पानात गुंडाळून हिल्सा माशाची रेसिपी दाखवली. ह्या केळीच्या पानावर मलमल गुंडाळली. मग बहुतेक वरून ओली माती थापली. आणि मग किचनमध्येच एका स्पेशल ट्रेमध्ये तो ठेवून वरून कोळसे ओतले.

आणखी एका बाईने अंड्याचा हलवा कसा करायचं ते दाखवलं. १५ अंडी (बलकासकट हं!) आणि अर्धा किलो तूप, साखर, वेलची पूड, गुलाबपाणी, व्हॅनिला इसेन्स, बदाम पूड असा सगळा जामानिमा होता.

कालचा 'Lost Recipes' चा एपिसोड ईस्ट इंडियन लोकांच्या खाद्यसंस्कृतीवर होता. ह्यात ब्रिटीश, पोर्तुगीज आणि महाराष्ट्रीयन खाण्याचा प्रभाव दिसतो. हे मुंबईचे सर्वात जुने रहिवासी होत. ह्यांचं नाव त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीवरून ठेवलं कारण त्यांना आपण ब्रिटिशांशी एकनिष्ठ आहोत हे दाखवायचं होतं. आणि गोव्याच्या ख्रिश्चन (जे पोर्तुगीज राजवटीशी एकनिष्ठ होते) लोकांपासून स्वत:ला भिन्न दाखवायचं होतं. ह्यांच्यात मसाल्याच्या ४० जिन्नसापासून बनलेला एक खास मसाला असतो ज्याला 'बॉटल मसाला' असं म्हणतात. जवळपास ४०० वर्षापासून त्याची रेसिपी तीच आहे.

प्रथम तो मनोरी/गोराई इथे गेला. तिथे एका बाईने लेटरी (Letri) चं पुडिंग दाखवलं. तांदळाचं पीठ उकडून घेतलं. मग त्याच्या पार्या केल्या. त्या पुन्हा पाण्यातून उकडून घेतल्या. मग एक स्टुलासारखं उपकरण होतं लाकडाचं (त्याला ती घोडा म्हणत होती). त्यात सोर्या होता. त्यात तिने ते पिठाचे उंडे टाकले. चकलीच्या सोर्यासारखा भाग वरून दाबल्यावर स्टुलाच्या तीन पायांमध्ये ठेवलेल्या ताटलीत त्याच्या शेवया पडल्या मग दूध गरम केलं आणि त्यात दालचिनी घातली. त्यात ह्या शेवया टाकून घट्ट होईतो शिजवलं. मग एक मिश्रण बनवलं, मला ते नीटसं कळलं नाही पण बहुतेक अंडी, क्रीम आणि साखर असावी. त्यात शेवया टाकून मिक्स केलं. आणि मग चुलीवर मातीच्या भांड्यात खाली माती पसरून त्यावर हे भांडं ठेवलं आणि वरून झाकण लावून बेक केलं. हा अव्हन चा आद्य अवतार. फोरमां का असं काहीतरी त्याचं नाव सांगितलं. पोर्तुगीजांनी दालचिनी श्रीलंकेहून आणली आणि ती ईस्ट इंडियन लोकांणी आपल्या जेवणात वापरली.

मग बांद्राच्या एका घरात एका बाईने कांजी करी दाखवली. आधी पेज हलकी गरम करायची. मग त्यात (नारळ, जिरे आणि हिरव्या मिरच्या) भाजून केलेली पेस्ट घालायची. मग नारळाचं दूध, squid चे तुकडे, कोलंबी, छोटे खेकडे, शेवग्याच्या शेंगा, भोपळा, कांदे ह्यांचे तुकडे घातले. अख्ख्या हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस आणि मीठ घातलं. हा म्हणे शेतकरी आणि कोळी लोकांचा नाश्ता असे.

एक वेगळ्या प्रकारचे ड्रिंक दाखवलं. ह्यात आधी थोडी साखर caramelize करून घेतली. मग त्यात liquor टाकून नंतर लवंगा, दालचिनी, इलायची आणि चहाची पानं घातली. हे गाळून मातीच्या छोट्या कपातून सर्व्ह केलं.

सर्वात शेवटी एका बाईने आणि तिच्या मुलीने केळीच्या पानात मीठ घालून त्यात वागटी नावाचे लांब मासे आणि छोटे खेकडे घालून ते निखाऱ्यावर भाजून तांदळाच्या पिठाच्या भाकरीसोबत सर्व्ह केले. ह्याला भूजलेले वागटे आणि भूजलेली चिंबोरी म्हणतात.

काल 'लॉस्ट रेसिपीज' मध्ये आदित्य बाल कुर्गला गेला होता. तिथल्या कोडवा कम्युनिटीच्या लोकांची एक डिश एका बाईने त्याला करून दाखवली. भाताच्या शेतात मिळणारे एक प्रकारचे छोटे मासे सुकवले जातात. ते तेलावर भाजून घेतात, मग पाण्यात भिजवून त्यात हिरवी मिरचीची पेस्ट आणि एका खास फुलापासून तयार केलेलं दाट व्हिनेगर घालून ते मेरीनेट करतात. कारलं, राजमा आणखी एका प्रकारची बिन घालून जी करी करतात त्यात हे मासे घातले जातात. आता भाताची शेती कमी होते आणि जी होते त्यातही हे मासे मिळणं कठिण झाल्याने ही डिश कोणी सहसा करत नाही.

आणखी एका बाईने फणसाच्या आठळ्याची चटणी दाखवली. आठळ्या उकडून त्यांची साल काढायची. आणि मग रगड्यात वरवंटा घेऊन आठळ्या, खडे मीठ, कांदा आणि ओलं खोबरं असं वाटून घेतलं. मग तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, कांदा (चकत्या) अशी फोडणी केली आणि ही चटणी थोडं पाणी घालून त्यात घातली. मग तांदळाच्या भाकरीसोबत (ज्याला अक्की रोटी म्हणतात) सर्व्ह केली.

इथे गोवडा समाजाचे लोकही राहतात. ते इथे कसे आले ह्याची एक गोष्ट आहे. २०० वर्षांपूर्वी टिपू सुलतानाने ह्या प्रांतावर आक्रमण केलं. तेव्हा कोडवा लोकांनी शेती सोडून हाती शस्त्र घेतलं. पण पराभव समोर दिसू लागला तेव्हा राजाने इंग्रजांची मदत घेऊन टिपूचा पराभव केला. राजाला त्याचं राज्य परत मिळालं खरं पण ह्या लढाईत अनेक कोडवा लोक मारले गेले. तेव्हा शेती कसायला राजाने दक्षिण कनार्टकमधून गोडवा जमातीच्या लोकांना पाचारण केलं. तेव्हापासून ते इथेच आहेत. इथल्या रीतीभाती, भाषा, जेवणखाण त्यांनी आपलंसं केलं आहे पण त्यांच्या काही खास चालीरीती, पदार्थ आहेत जे त्यांनी अजून जपलेत. अशीच एक डिश आहे लिंबाच्या (नीम) फुलांचं पायसम. हे त्यांच्या उगडी सणाला नेहमी करतात. ह्याची चव कडू-गोड असते म्हणून आयुष्यात आनंदाचे आणि दु:खाचे क्षण येतात हे त्यातून दर्शवतात. ह्यात प्रथम तूप तापवून त्यात चणाडाळ, साबुदाणा परतून घेतात. मग त्यात पाणी, गूळ (हा एव्हढा केशरी आणि घट्ट होता की मला आधी तो गूळ आहे हे कळलंच नाही. एखाद्या मिठाईच्या वडीसारखा दिसत होता) घालतात. गूळ विरघळला की नारळाचं दूध, खजूर, काजू, किसमिस घालतात. इलायची-लवंग पूड घालतात. सर्वात शेवटी धुवून घेतलेली (किडे वगैरे काढून टाकायला) लिंबाची फुलं घालतात. जास्त घालायची नाहीत नाहीतर खीर फार कडू होते. आजकाल ही फुलं मिळणं दुरापास्त झाल्याने ही डिश फारशी बनत नाही.

ह्याआधी हैदराबादच्या एपिसोडमध्ये फलकनुमा पेलेसच्या शेफने 'आश्' नावाचं बकऱ्याच्या मीटचं सूप दाखवलं होतं. त्यात तूप परतून लसूण आणि मोठी इलायची ह्याची फोडणी दर अर्ध्या तासाच्या अंतराने अशी सात वेळा पडते. एका बाईने चक्क कांद्याची खीर पण दाखवली होती.

काल एपिक वर सांगत होते की 'देवलोक' चा सिझन २ लवकरच सुरु होतोय. त्यासाठी फेसबुक आणि ट्विटर वर त्यांनी सूचना मागवल्या आहेत. आजकाल ह्या धाग्यावर शुकशुकाट दिसतो. एपिसोड्स सुरु झाले की लिहिलं तर वाचायला कोणी येणार आहे का? Uhoh

स्वप्ना तू लिही! माझ्या सारखे बरेच जण इथे वाचून माहिती मिळवतात कारण आमच्या केबलवाल्याच्या अवकृपेने आमच्या कडे एपिक चॅनल दिसत नाही.

लिहिलं तर वाचायला कोणी येणार आहे का>>>
अशी शंका मनात कधीही आली तर, आधीची काही पानं बघा, माझ्या सारखे अनेक जण येत असतातच इकडे Happy

सध्या एपिकवर काही नवीन दाखवत नाहीयेत. सगळे रिपिट्स आहेत.. खरतर या चॅनलला खूप स्कोप आहे नवनवीन प्रयोग करायला.

स्वना, लिहीणं सोडू नकोस बाई स्मित प्रतिसाद देते किंवा देत नाही पण मी वाचतेच हं ....+१
मीपण एपिक पहाते आणि मिसलेले एपिसोड इथे येउन वाचते.. आता प्रतिसाद देत जाईन.. Happy

Pages