दाल : तूर डाळ १ वाटी, मूग डाळ व मसूर डाळ प्रत्येकी पाव वाटी, डाळ शिजवताना घालण्यासाठी हिंग, हळद, पाणी, १ तमालपत्र, फ़ोडणीसाठी तूप, हिंग, हळद, जिरे, वरून पेरण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला.
वाटण: २ कांदे, ७/८ लसूण पाकळ्या, २ सुक्या मिरच्या, एक छोटा आल्याचा छोटा तुकडा, सुक्या खोबऱ्याचा खीस अर्धी वाटी.
बाटी: २ वाट्या जाड/भरड दळून आणलेली कणीक, पाव वाटी रवा, १ चमचा तेल, चिमूटभर मीठ, चिमूटभर सोडा किंवा पाव चमचा बेकिंग पावडर. आप्पेपात्रात बाट्या तळण्यासाठी अगदी थोडं तूप.
( इथे मारवाडी समाज बराच मोठा असल्याने त्यांच्या समारंभात दाल बाटीचा आस्वाद घेता येतो. आणि इथे एक दोन हॉटेलातही अगदी अप्रतीम दाल बाटी मिळते. तर सांगण्याचा मुद्दा हाच की दाल बाटी हा माझा एक आवडता पदार्थ झाला आहे. पण तो कसा करायचा याची ऑथेन्टिक रेसिपी माहिती नव्हती.
पण ४/५ वर्षापूर्वी पुण्यात आम्ही सगळ्या मैत्रिणी एका मैत्रिणीच्या घरी जमलो. तिथून तिच्या भोरच्या फार्म हाऊसवर रहायला गेलो. तिथे त्या मैत्रिणीने दाल बाटी केली. व्वा..........अजून चव जिभेवर आहे.
मग काय? अगदी समोरच एखादा पदार्थ केला गेला तर बर्याच गोष्टी क्लिअर होतात.
अगदी तस्संच झालं. फक्त या मैत्रिणीने या बाट्यांसाठी घरातली नेहेमीची कणीकच वापरली. आणि त्या बाट्या गॅसवर जाळी ठेऊन भाजल्या. मी त्यात थोडा बदल केला.
एक तर सगळा शाळेपासूनचा ग्रुप खूप दिवसांनी जमलेला.........त्यामुळे ती दाल बाटी विशेष चविष्ट लागली!)
असो.........तर दाल बाटीची माझी रेसिपी...........
दालः
वाटणः कांदे उभे चिरून थेंबभर तेलात चांगले छान परतून घ्यावे. बाजूला ठेवावेत, त्याच कढईत थेंबभर तेल टाकून २ सुक्या मिरच्या छान भाजून त्यातच खिसलेलं सुकं खोबरंही भाजून घ्यावं. मिरच्या भाजून झाल्यावर गॆस बंद करावा. तेवढ्या उष्णतेत खोबऱ्याचा खीस चांगला भाजला जातो. आता या सर्व भाजलेल्या जिनसांत वाटणाचे उरलेले जिन्नस घालून मिक्सरला छान वाटून घ्यावे.
दालः सगळ्या डाळी हिंग हळद घालून कुकरमधे छान शिजवून घ्या. झाकण पडल्यावर व्यवस्थित हाटून घ्या.
एक चमचा तुपाची फ़ोडणी करा. त्यात जिरं, हिंग, तमालपत्र टाकून त्यावर वरील वाटण परतून घ्या. मग शिजवलेल्या डाळींचं वरण घालून मिक्स करा. गरम मसाला, चवीपुरते मीठ घाला. एक उकळी काढा. गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
दाल तयार!
बाटी:
बाटीचे सर्व साहित्य फ़ूड प्रोसेसरमधून मळा.(तूप सोडून बाकीचे). पाणी अंदाजाने घाला. पिठाचा गोळा अगदी घट्ट असावा.
हा पिठाचा गोळा १ तास झाकून ठेऊन द्या. १ तासाने मग आप्पेपात्राच्या खळग्यांचा अंदाज घेऊन त्यात मावणारे गोळे बनवा.
गोळे बनवताना कणीक घट्ट असावी. व ती खूप मळू नये. ओबडधोबडच असू द्यावी. म्हणजे त्यात हवा राहून बाट्या हलक्या होतील. तळहातावर कणीक घेऊन दुस़ऱ्या हाताने अलगद दाब देत गोलगोल फ़िरवून गोळे बनवावेत.
एका मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी उकळायला ठेवा. आधण आल्यावर निम्मे गोळे या उकळीच्या पाण्यात टाका. आधी हे गोळे तळाशी असतील. शिजल्यावर ते पाण्यात वर येऊन तरंगू लागतील. मग ४/५ मि. झाकण ठेऊन शिजवा. गॅस बंद करून या बाट्या एका फ़डक्यावर निथळा. गॅसवर आप्पेपात्रात थोडं थोडं तूप टाकून आप्पेपात्र गरम झालं की मग या चांगल्या कोरड्या झालेल्या बाट्या चांगल्या भाजून घ्या. एका बाजूने चांगल्या खरपूस झाल्या की मग पलटा. ३/४ मिनिटांनी गॅस बंद करा. भाजताना या आप्पेपात्रावर झाकण ठेवा.
एका बाऊलमधे २ बाट्या ठेवा. तळहाताने कुस्करा. त्यावर भरपूर दाल घालून वरून थोडं तूप घालून खायला द्या.
याच बाट्या गरम असतानाच कुस्करून त्यात फ़क्त तूप आणि पिठी साखर घालूनही चविष्ट लागतात.
यासाठी प्रत्येकाने एखादी तरी बाटी बाजूला ठेवावी.
बाटीसाठी कणीक भरड/जाड वेगळी दळून आणावी. घरातल्या नेहेमीच्या बारीक कणकेच्या बाट्या इतक्या चांगल्या होत नाहीत.
हा पदार्थ करण्यासाठीचा आयडियल आदर्श सीझन येऊ घातला आहे. तस्मात......थंडीत या पदार्थाची लज्जत काही औरच!
दाल बाटी, गट्टीका साग आणि चुरमा असा ऑथेन्टिक राजस्थानी मेनू म्हणजे अगदी तोंपासु!
चवदार पाककृती. थंडी पडल्यावर
चवदार पाककृती. थंडी पडल्यावर करून बघायला हवी.
आधी पाण्यात उकडून घेऊन, आप्पेपात्रात बाट्या तळण्याची आयडिया मस्तं आहे.
माझ्या अगदी आवडता प्रकार
माझ्या अगदी आवडता प्रकार हा.
मी अगदी राजस्थानात एका रस्त्यावरच्या ढाब्यावर खाल्ला होता. थेट गोवर्यातच भाजल्या होत्या. आम्ही तिघे होतो. त्याने किती खाणार असे विचारले आम्ही प्रत्येकी ४/४ अशी ऑर्डर दिली.
डाळ शिजत होती. त्याने आधी २ बाट्या कुस्करून त्यात भरपूर तूप घालून दिल्या. त्याच आम्हा तिघांना संपेनात. मग डाळीबरोबर तिघात मिळून २ बाट्याच खाऊ शकलो... अप्रतिम प्रकार असतो.
आता लहर आली की घरी करतो. इथे अगदी कोळसा वगैरे पेटवून करतो. कोळश्यावरच डाळ शिजवतो. दोन्हीला मस्त चव येते.
वॉव, मस्त रेस्पी एकदम. फोटू
वॉव, मस्त रेस्पी एकदम.
फोटू मंगताय.
आडो ये ल्लो
आडो ये ल्लो फुट्टू...........
इथे वर कृतीमधे फोटो टाकता येत नाहीत का?
पाण्यात उकळून आप्पेपात्रात जाण्यासाठी तयार बाट्या
आप्पेपात्रात
आप्पेपात्रातून तळून बाहेर आलेल्या बाट्या
तयार डिश
डाळीत आनंदाने डुबकी मारणार्या बाट्या
फोटो तुफान लाळगाळू!
फोटो तुफान लाळगाळू! आप्पेपात्रातून तळलेल्या बाट्या कसल्या देखण्या आहेत!
आप्पेपात्रातून तळलेल्या
आप्पेपात्रातून तळलेल्या बाट्या कसल्या देखण्या आहेत!>>>+१!
सॉलिड आलेत फोटो.
मस्त रेसिपी, मी पण साधारणतः
मस्त रेसिपी, मी पण साधारणतः अशीच करते .. पण बाटी पाण्यात उकडून , गार झाल्यावर तेलात तळते
एकदा बेक करून पाहिली पण म्हणावी तशी खरपूस झाली नाही मग तो नाद सोडुन दिला ..
आता ही आप्पे पात्राची आयडीया आवडली... पुढच्या वेळेस अशीच करेन...
दिवाळीत भावजयीने केली होती
दिवाळीत भावजयीने केली होती पध्दत सेमच फक्त तिने त्या तळल्या होत्या. जाड कणिक दिलीये त्याच्या करुन पाहीन. आप्पे पात्राची आयडीया लई भारी !
आहाहा मस्त फोटो
आहाहा मस्त फोटो !!
आप्पेपात्रातून तळलेल्या बाट्या कसल्या देखण्या आहेत! >> +११
तोंपासु फोटो!
तोंपासु फोटो!
मानुषीताई, मस्त फोटो. वर्णनही
मानुषीताई, मस्त फोटो. वर्णनही मस्त आहे.
दाल बाटी हे वन डिश मील आहे कां?
मेरे पास आप्पे पात्र नहीं है. तव्यावर शॅलो फ्राय केल्या तर चालतील कां? :प
हो ...ऑल्मोस्ट वन डिश मील!
हो ...ऑल्मोस्ट वन डिश मील!
आणि जरा खोलगट फ्राय पॅनमधे थोड्या तुपात करून बघ. मला वाटतं झाकणही ठेवावं आणि मधून मधून हलवून सगळीकडून भाजले गेलेत की नाही ते पहावं.
मानुषीताई धन्यवाद. खूप मस्त
मानुषीताई धन्यवाद.:स्मित: खूप मस्त आहे कृती आणी सोप्पी देखील. अप्पेपात्राची आयडीया अफाट आवडली. काम एकदम सोप्पे झाले.
आउटडोअर्स, केकपात्र असेल तर त्यात पण भाजता येईल कदाचीत. अप्पेपात्र नसते तर मी हाच पर्याय ठेवणार होते.
माझ्या पण अगदी आवडीची डिश आहे
माझ्या पण अगदी आवडीची डिश आहे ही!
इथे वर कृतीमधे फोटो टाकता येत नाहीत का?>> नाही देता येत. पण एक उपाय आहे. प्रतिसादामधे तुम्ही जसे फोटो टाकले तसे टाकायचे आणि ती लिन्क कॉपी करुन परत आपली रेसेपी संपादीत करुन त्यात ती लिंक तुम्हाला हव्या ठिकाणी पेस्ट करता येते हे आता अॅडमिननी वाचायला नको
चित्रावळ काढून ठेवा अख्ख्या
चित्रावळ काढून ठेवा अख्ख्या माबोच्या नावानं. नाहितर पोट दुखणार नक्की
मानुषी तै फोटो फारच जबरी आहे, तुम्ही पण दिनेश च्या लायनीत उभं राहून जळवा आम्हाला
भारी फोटो. रेसिपीपण मस्त
भारी फोटो. रेसिपीपण मस्त वाटतेय.
तयार बाट्यांचे फोटो अगदी
तयार बाट्यांचे फोटो अगदी जानलेवा आहेत.
ती वाटण घातलेली डाळ तर नुसती सुद्धा वाटीत घेऊन खायला मस्त लागते. वरून भरपूर तूप हवं मात्र.
खूप दिवसांत केल्या नाहीत बाट्या. आता करणं भाग आहे
मस्त मस्त! फोटो तोपासु!
मस्त मस्त! फोटो तोपासु! आप्पेपात्राची आयडिया आवडली!
मानुषी, मस्तच आयडिया
मानुषी, मस्तच आयडिया आहे!!
भारी फोटो!!
मस्त लागतो हा प्रकार. आणि
मस्त लागतो हा प्रकार. आणि त्या बाट्या तुपात बुडबून काढलेल्या असतात त्यामुळे १ खाल्ली तरी पोट भरतं.
ते बाटी कुस्करून गूळ/साखर घलून लाडू/चुरमा ह प्रकार पण भन्नाट लागतो.
फोटो खरच मस्त आलेत.
दोन थेंब तेलात रेसिपी,
दोन थेंब तेलात रेसिपी, गरिबांची रेसिपी मारवाडी कशी काय?
आप्पेपात्रातल्या बाट्या मस्त
आप्पेपात्रातल्या बाट्या मस्त दिसतायत. एक दोनदा अगदी ऑथेंटिक बाट्या खाल्ल्या आहेत. अशा करून बघायला हव्यात.
मला इथे रवाळ कणिक मिळणार
मला इथे रवाळ कणिक मिळणार नाहीये आणि आप्पेपात्रही बाजारात शोधावं लागेल.तस्मात्, फोटो टाकलेत - कुफेहेपा?
मस्त फोटो! मला पण करून बघायचा
मस्त फोटो! मला पण करून बघायचा जाम मोह होतो आहे. मुलांना अन नवर्याला आवडेल की नाही कोण जाणे. मला हे असले वरणफळे वर्गातले पदार्थ आवडतात. यात गरम मसाला हा कोणता स्पेसिफिक वापरला का? रजवाडी मसाला मिळतो तो वापरला तर ?
एक चमचा तेलात
एक चमचा तेलात राजस्थानी/मारवाडी पदार्थ होणे शक्यच नाही हे अगदी खरंय.
मूगडाळ म्हणजे पिवळी की हिरवी सालासकट?
वरदा, साधी कणिक घेऊन त्यात
वरदा, साधी कणिक घेऊन त्यात थोडा रवा घातला तर चालतो.
मै, मी रोजच्या स्वयंपाकातला गरम मसाला घालते वरणात. चांगला लागतो.
मैत्रेयी , माझ्या तरी मुलीला
मैत्रेयी , माझ्या तरी मुलीला हा प्रकार खुप आवडतो.. आणि बाकी माहितीतल्या मुलांना पण आवडतो हे पाहिलं आहे ..
(तिला वरणफळं खुप आवडतात म्हणुन पण हा पदार्थ आवडत असेल कदाचित)
एक चमचा तेलात राजस्थानी/मारवाडी पदार्थ होणे शक्यच नाही हे अगदी खरंय. >>> म्हणुनच मी आतापर्यंत तळून घेत होते..
धन्यवाद, सिंडे जरा कडाक्याची
धन्यवाद, सिंडे
जरा कडाक्याची थंडी पडली की करून बघेन
जबरी फोटो. दालबाटी माझा
जबरी फोटो.
दालबाटी माझा अत्यंत आवडता पदार्थ. बेस्ट वन डीश मिल एव्हर. महिन्यातून एकदातरी केला जातोच.
इथे मी साध्या कणकेत रवा मिसळून बाट्या करते, पण तूपात तळण्याची हिंमत होते नाही म्हणून त्या अवन मध्ये बेक करते.
रूनी, अवन मध्ये बेक केल्यावर
रूनी, अवन मध्ये बेक केल्यावर क्रिस्पी (आतून पण) होतात का? मी केल्या होत्या तेंव्हा बाहेरून क्रिस्पी आणि आतुन कच्च्या वाटत होत्या ...
मी तेलातच तळते पण बाट्या खुप काही तेलकट होत नाहीत .. एकदा एका मैत्रीणी ने बार्बिक्यु मध्ये केल्या होत्या.. त्या एक्दम अप्रतीम झाल्या होत्या ..
Pages